Monday, June 1, 2020

पुण्यातील "टिळक स्मारक" रंग मंदिरात "शोधून आईलेली सोयरीक" नाटकात नायकाची भूमिका...

डोंबिवलीत G.S.B (गौड सारस्वत ब्राह्मण) मंडळाची स्थापना झाली होती. मंडळाची सुरुवात आमच्याच दुकानातून झाली. हळूहळू मंडळाचे सदस्य वाढत गेले. डोंबिवली स्टेशन जवळ तांदूळ बाजाराच्या वर तिसऱ्या मजल्यावर मंडळाने कार्यालयासाठी जागा घेतली. दरवर्षी जानेवारी महिन्यात विविध खेळांची स्पर्धा, वार्षिक स्नेह संमेलनाचे अायोजन होत होतं. डोंबिवली पश्चिमेला भरतनाट्य मंदिराच्या मैदानावर विविध खेळांच्या स्पर्धा असायच्या. मी स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचो. वार्षिक स्नेहसंमेलन टिळकनगरमधल्या कुलकर्णी हॉलमध्ये भरायचं. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, एखादं नाटक, शाळा आणि कॉलेजमध्ये जास्त गुण मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप, आलेल्या मान्यवरांचे मार्गदर्शन आणि बक्षीस समारंभ असे विविध कार्यक्रम असायचे. या वार्षिक स्नेहसंमेलनाला डोंबिवलीतल्या बरेचसे G.S.B. लोकं एकत्र जमायचे.


     १९८८ जानेवारीत होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मी भाग घ्यायचं ठरवलं. युथ असोसिएशन ऑफ डोंबिवलीकडून डोंबिवली नागरिक समस्यावर जी व्यंग चित्रांची स्पर्धा घेतली होती त्यात पहिला क्रमांक ज्या व्यंग चित्राला मिळाले होते तोच विषय मी घ्यायचा ठरवल. त्या व्यंगचित्रात डोंबिवलीतल्या बरेचसे नागरिक समस्या दर्शविले होते. रस्ता, कचरा, वीज, मोकाट सुटलेले जनावर व इतर समस्या होत्या. स्पर्धेच्या आधी मी चांगलीच तयारी केली. स्टेजवर मला बोलायचं काहीच नव्हतं!! त्यामुळे मी बिनदास होतो. रस्त्यावरचे खड्डे आणि चिखलावर चालण्यासाठी पायात गम बूट, कचरा हटवण्यासाठी हातात झाडू, वीज गेली तर हातात टॉर्च, पाणी साठवणारी रबर बॅग, धूळ प्रूफ कपडे एवढी तयारी करून मी सज्ज होतो. माझा नंबर येताच माझ्या वेशभूषेची माहिती देण्यात आली. मी स्टेजवर पोचताच जोरदार टाळ्या वाजल्या. मनात थोडीशी भीती होती. मी पहिल्यांदाच आशा स्पर्धेत भाग घेतला होतो. मुळात बक्षीस मिळवणं हा माझा उद्देश नव्हताच. नागरिक समस्या लोकांपर्यंत पोचवणे आणि त्यावर तोडगा काढणे हा एकमेव हेतू होता. कार्यक्रम संपल्यावर बक्षीस समारंभाला सुरुवात झाली.त्यात माझं नाव घेतलं गेलं. मला विश्वासच बसत नव्हता स्पर्धेत मला तिसरं बक्षीस मिळालं होतं!!!

नाटक किंवा सिनेमा म्हटलं की सर्वांचा आवडत विषय. हा सिनेमा असाय तसाय अमुक पात्र छान आहे, त्यातलं हे गाणं मला आवडलं, प्रेम प्रकरण, मारा मारी असे बरेचसे गप्पा आपण मारत असतो. समजा एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात आपल्याला काम करायला मिळालं तर!!! असंच काहीतरी घडलं माझ्या बाबतीत. G.S.B. सेवा मंडळ किंग सर्कल येथे दरवर्षी आम्ही गणपतीला जायचो. पाच दिवसांचा गणेशोत्सव असायचा. रोज संध्याकाळी निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम, गाण्यांचा कार्यक्रम, नाटकं असे विविध कार्यक्रम असायचे. १९८८ गणेशोत्सवमध्ये एखादा कार्यक्रमासाठी आमच्या डोंबिवलीतल्या G.S.B. मंडळाला त्यांनी आमंत्रण दिलं. मंडळाने नाटक बसवायचं ठरवलं. नाटक कोंकणीतून पाहिजे होत. आमच्या डोंबिवली मंडळाचे चिटणीस सुधीर कुडवा आणि रत्नाकर नायक यांनी नाटक लिहून तयार केलं. एकूण दोन तासाच नाटक लिहून तयार झालं. आता नाटकात कोणाला घ्यायचं? नायक, नायिका नायिकेचे आई वडील, नायकाचे आई वडील, आजोबा, एक छोटा भाऊ वगैरे. सर्व तयारी झाली पण नायकाची भूमिका कोण करणार? त्यांनी नायकाच्या भूमिकेसाठी माझं नाव घेतलं. छोटा मोठा रोल ठीक होता पण नायकाची भूमिका म्हटल्यावर मी विचार करायला लागलो. नायकाची भूमिका ते पण मुंबईच्या प्रेक्षकांसमोर!!
   
    "शोधून आईलेली सोयरीक" अस आमच्या कोंकणी नाटकाचं नांव. नाटकातले सर्व पात्रे ठरले तालीमला सुरुवात केली. गोपाळनगर येथील रत्नाकर नायक यांच्या घरी आम्ही भेटायचो. दुकानात असल्यामुळे मला फक्त रात्री साडेनऊनंतर वेळ मिळायचा. बाकीचे पण यायचे ९.३० ते ११ तालीम असायची. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव सुरू होणार होता आम्हाला १६ सप्टेंबर ही तारीख दिली होती. नाटकात मी तसा हुशार असतो पण लाजाळू, मुलींपासून चार हात लांब. नायिका बाबांच्या मित्राची मुलगी लंडनवरून आलेली एकदम मॉडर्न असते. येऊन आमच्या घरी राहतात मी तिच्या प्रेमात पडतो. तेव्हा एक गाणं असतं. ते गाणं जंगली चित्रपटातलं. शम्मी कपूर बर्फाच्या डोंगरावरून खाली घसरत "याहु!! चाहे कोई मुझे जंगली कहे." जे गाणं म्हणतो ते बसविण्यासाठी खूप वेळ घेतला मी तस डान्स खूप सोपा फक्त मान आणि हात हलवायचा होता पण माझं आणि डान्सचं छत्तीसचा आकडा त्यामुळे मला खूप प्रयत्न करायला लागले. माझे आई बाबा साधे असतात त्यांना मुलगी आवडते. मुलीचे आई बाबा पण राजी होतात मग आमचं लग्न ठरत. सुरुवातीला फक्त शनिवार, रविवार तालीम घेत होतो दिवस जवळ यायला लागले की रोज तालीम असायची. तालीम सुरू असताना खूप मजा असायची रोज कोणतरी खायला आणायच खात खात मस्ती करत जोक्स करत आमची तालीम सुरू असायची.

      शुक्रवारी १६ सप्टेंबरला ७ वाजता नाटक होत. आम्ही सर्व किंग सर्कल गणेशोत्सव च्या परिसरात ५ वाजताच पोचलो. रत्नाकर नायक यांनी आधीच स्टेजची सजावट केली होती. समोर पडदा लावून थोडावेळ तालीम केली. आधीचा कार्यक्रम लांबल्याने नाटक अर्धा तास उशिराने सुरू झालं.समोर सर्व खुर्च्या प्रेक्षकांनी भरल्या होत्या. मागे काही लोक उभे होते. प्रत्येक डायलॉगला लोक हसत होते म्हणजे लोकांना नाटक आवडलं होत. मला फक्त डान्सच टेन्शन होत. त्यामुळे मध्येच एक डायलॉग चुकला बाकीच्यांनी संभाळून घेतलं. कसं माहीत नाही त्यादिवशी मी उत्तम डान्स केला. नाटक लोकांना आवडलं. त्यात गंमत अशी झाली पुण्यावरून काही लोकं नाटक बघायला आले होते. त्यांना नाटक आणि आमचा परफॉमन्स खूप आवडला. एक तर कोकणी नाटकं कमी बघायला मिळतात आणि आम्ही जी कामगिरी केली होती ती त्यांना खूप आवडली. त्यांनी आम्हाला एक ऑफर दिली. तुम्ही हेच नाटक पुण्याला करणार का? डिसेंबर महिन्यात असेल आम्ही तारीख कळवतो. स्थळ पुण्यातील "टिळक स्मारक' रंगमंदिरात!!! रत्नाकर नायक आमचा ग्रुप लीडर होता. त्यांनी सर्वांशी बोलून कळवतो असं सांगितल.


     पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याचा आम्हा सर्वांना आनंद झाला. आमच्या सर्वांशी बोलल्यानंतर रत्नाकरने पुण्यावाल्याना होकार दिला. तसा आमच्याकडे भरपूर वेळ होता. डिसेंबरमध्ये नाटक होतं. एका प्रयोगाचा अनुभव होताच. सर्व तेच कलाकार होते त्यामुळे जास्त तालीम ची गरज नव्हती. सात ते आठ वेळा भेटून आम्ही चांगली तयारी केली. टिळक स्मारक खूप मोठा आहे पुण्याचे सर्व रसिक असतात त्यांना दर्जेदार नाटक पाहायला आवडत असं आम्ही ऐकलं होतं. त्याप्रमाणे आम्ही तयारीही केली. मला तारीख आठवत नाही संध्याकाळी सहा ते आठची वेळ दिली होती. आम्ही सर्वजण डोंबिवलीहून सकाळी अकराच्या दरम्यान बसने निघालो तीन पर्यंत पोचणार होतो पण ट्राफिकमुळे "टिळक स्मारक' रंगमंदिरात पोचताना आम्हाला पाच वाजले. नीट हॉल पण बघायला नाही मिळाला. आतल्या बाजूने सरळ आम्हाला ड्रेसरूममध्ये नेलं. आम्ही शांतपणे आपापले डायलॉग पाठ करत होतो. स्टेज ची तयारी आधीच करून ठेवली होती. आठ वाजता नाटक सुरू झालं. डिसेंबर महिना होता बस वरून येताना थंडी वाजत होती. हॉलमध्ये A.C. सुरू होता अजून थंडी वाजत होती मी एक क्रोसिन ची गोळी मागवली गोळी घेतल्यावर थोडं बरं वाटलं. नाटकाला सुरुवात झाली. माझं पात्र यायला पाच मिनिटे होते. मी हळूच बाहेर वाकून पाहिलं हॉल तुडुंब भरला होता. लोकं हसत होते, टाळ्या वाजत होत्या मला थोडासा धीर आला. आज मात्र एकही डायलॉग विसरायचा नाही असं ठरवून स्टेजवर उतरलो. सर्वांनी उत्तम कामगिरी केली आणि नाटक एकदम हिट झालं. नाटक संपल्यावर बरेचसे जण आम्हाला भेटायला आले. सर्वांनी आमचं कौतुक केलं. सर्वात महत्वाचं पुण्यासारख्या शहरात जिथे एकसे एक नाटकांच्या प्रयोग होत असताना आमच्या कोंकणी नाटकाचा प्रयोग त्यांना आवडणं खूप अभिमानाची बाब होती. ज्या संस्थेने हा प्रयोग ठेवला होता त्या संस्थेच्या पदादीकार्यांनी आम्हाला प्रयोग संपल्यावर हॉटेलमध्ये जेवायला नेले. नाटक पाहायला आलेली बरीचशी मंडळी त्याच हॉटेलमध्ये जेवत होते. काही लोक माझ्या जवळ येऊन हात धरून उत्तम कामगिरी बद्दल माझं कौतुक केलं. ही माझ्या अभिनयाबद्दल लोकांनी दिलेली पोच पावती होती.....

18 comments:

  1. वा पै तुम्ही कलाकार होता ही नवीन ओळख झाली खूप कौतुक. एकदा डायलॉग आम्हाला म्हणून दाखवा तुम्हाला आठवेल.

    ReplyDelete
  2. पै काका, तुम्ही चतुरस्र कलाकार आहात.ह्या लिखाणामुळे तुमचे कलागुण कळतायत. खूप खूप शुभेच्छा!!

    ReplyDelete
  3. कोरोना जाताच कट्ट्यावरचा पहिला कार्यक्रम पै काकांच्या पुस्तक प्रकाशनाचा..

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की विचार करूया.

      Delete
  4. पै सर छुपेरुस्तम निघालात,बर झाके त्या मुळे आम्हाला तुमचा एक कलागुण अवगत झाल.
    पुन्हा असा कार्यक्रम होऊदे.हिच सदिच्छा.

    ReplyDelete
  5. वा पै सर तुम्ही तर छुपेरुस्तम निघालात बरे झाले आम्हाला तुमचा एक कलागुण अवगत झाला.
    असा ऐखादा कार्यक्रम पुन्हा होवू दे.
    हिच सदिच्छा.

    ReplyDelete
  6. सर खूपच छान
    चोखंदळ पुणेकर प्रयोग आवडला म्हणाले म्हणजे उत्तम प्रयोग झाला यात शंका नाही
    प्रत्येक अनुभव नवीन काही शिकवून जातो
    मस्त

    ReplyDelete
  7. वाह! वाह! आज तुमच्यातला हा कलागुण समजला.✌️

    ReplyDelete
  8. वाह वाह ! नुसती धमाल !!

    ReplyDelete