Thursday, June 11, 2020

सर्व तयारीनिशी बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेतला..

मी चौदावीत असतानाच आम्ही सर्व शिवप्रसाद बिल्डिंग सोडून मंजुनाथ शाळे समोरील प्लाझमा ब्लड बँकेच्या समोरच्या गल्लीत "न्यू अश्विनी" सोसायटीत राहायला गेलो. आमच्या घरासमोरच छोटीसी रहदारी तिथे आम्ही रोज रात्री बॅडमिंटन खेळायचो. खेळायला मीच सुरुवात केली. मग सर्व लोकं खेळायला यायला लागले. जसे लोक खेळायला यायला लागले तसे सर्वांनी पैसे काढून नवीन बॅडमिंटनच नेट घेतलं. गवत उगवलं तर खेळायला अजून मजा येईल म्हणून टाटा पॉवर लेनच्या वनराज ऍग्रो दुकानातून गवताच्या बिया आणल्या. त्या जागेवर बिया टाकून मी रोज सकाळी पाणी मारायचो. बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढलं. ही जाण्या येण्याची रहदारी आहे रोज लोकं गाड्या, सायकली ये जा करत असतात इथे गवत उगवणार नाही. असे लोकं बोलू लागले. तरी पण मी माझा प्रयत्न करतच राहिलो. नगरपालिकेत जाऊन आमच्या इथे लायटीच्या खांब्यावर नवीन दिवे बसवून घेतले. दुकानातून घरी आलो की थोडंसं जेवायचं लगेच बॅडमिंटन खेळायला खाली उतरायचो. एप्रिल महिन्यात आम्ही खेळायला सुरुवात केली खूप मजा यायची. एक तास खेळलो की दमायला व्हायचा. घरी जाऊन अंथरूण टाकलं की कधी झोप लागली समजायचं नाही.

       तसा माझा आवडता खेळ क्रिकेट. मला क्रिकेट खेळण्यापेक्षा बघायला आवडायचं. क्रिकेट खेळताना शरीराला जास्त व्यायाम मिळत नव्हता जेवढं बॅडमिंटन खेळताना मिळायचा. बॅडमिंटन मध्ये दोघे किंवा जास्त म्हणजे चौघे खेळत असल्यामुळे अर्धा तास जरी बॅडमिंटन खेळलो की थकायला व्हायचं. शरीराला भरपूर व्यायाम मिळायचा. त्यामुळे बॅडमिंटन खेळायला मला खूप आवडायचं. बॅडमिंटनमध्ये सर्व्हिस, बॅक स्ट्रोक आणि स्मॅश करायला मला मजा यायची. मी जर नीट अभ्यास केला असता आणि त्याच बरोबर कोच जर मिळाला असता तर मी एक उत्तम बॅडमिंटन खेळाडू बनू शकलो असतो....

       मला माझे मित्र सांगायचे की नॉनव्हेज खाल्याने ताकत वाढते. माझ्या घरी मच्छी अधून मधून आणायचे. आईला मच्छी खूप आवडायची. आई मच्छीचा रस्सा मस्त बनवायची. मी पण खायचो. आमच्या घरी मच्छीचे पदार्थ बनवण्यासाठी वेगळी भांडी असायची. मी अंड्याची भुर्जी आणि ऑम्लेट छानपैकी बनवायचो. पण चिकन, मटण कधीच खाल्लं नव्हतं. माझा मित्र प्रवीणच्या घरी मटण बनवायचे तो सारखा विचारायचा घेऊन येऊ का एकदा खाऊन बघ. त्याला मी एकदा घेऊन यायला सांगितलं. मला वाटत रविवार असेल तो छोट्याश्या डब्यात मटण घेऊन आला. मी दुकानात होतो. तो बोलेला मटणचे तुकडे काजू सारखे लागतात. मी दुकानातले दोन पाव काढले. दुकानात मागे बसून पहिल्यांदा मटण खाल्लं. मला तो मसाला खूप आवडला.... मग मला चिकन खायची इच्छा झाली. माझ्या घराजवळ जानकी हॉटेल पण तिकडे सर्व माझे ओळखीचे असल्यामुळे तिकडे जायचं विचार नव्हता. फडके रोडवर असलेल्या दुर्गा हॉटेलात जायचं ठरवलं. एक दोनदा आत जायचा विचार केला पण हिम्मत नाही झाली. दुर्गा हॉटेल बीअर बार होतं, लोकांना वाटेल की मी ड्रिंक्स घेतो हे मला नको होतं. मला फक्त चिकन खायचं होतं. एके दिवशी मी हिम्मत करून आजू बाजूला पाहिलं ओळखीचं कोण नाही ना? मग हॉटेलात शिरलो. मी थोडासा घाबरलो पहिल्यांदा एकटा बिअर बार मध्ये आलेलो काय मागवायच कळत नव्हतं. वेटरला बोलवलं आणि चिकन डिश विचारलं. चिकनफ्राय, हाफ चिकन हंडी आणि दोन नान मागवलं. असा माझा नॉन व्हेज चा प्रवास सुरु झाला...

       माझ्या मित्रांकडून डोंबिवली पश्चिमेला बॅडमिंटन स्पर्धा आयोजन होणार असल्याचे समजले. डोंबिवली पश्चिमेला बावन चाळीत एक बॅडमिंटन कोर्ट होतं तिकडे स्पर्धच आयोजन करण्यात येणार असल्याचे समजलं. प्रवेश शुल्क पाच रुपये आणि स्पर्धा जिंकलो तर एकशे अकरा रुपये मिळणार!! मला स्पर्धेत भाग घ्यायचं होतं बक्षिसाच मी विचारच केला नव्हता. तेव्हा माझ्याकडे बजाज कंपनीची लाल रंगाची एम फिफ्टी जुनी गाडी होती. एका मित्रांकडून तीनशे रूपयेला जुनी गाडी विकत घेतली होती. त्याला दिलेल्या पैसापेक्षा जास्त खर्च मी त्या गाडीच्या दुरूस्तीवर केला. सकाळी गाडी घेऊन पलीकडे नाव नोंदवायला निघालो. सारस्वत कॉलनी वरून पुढे एक छोटासा ब्रिज होता त्या ब्रिज वरून एकच गाडी जाऊ किंवा येऊ शकत होती. बाकी माणसं ये जा करायचे. त्याच ब्रिजने पलीकडे गेलो. ब्रिज उतरल्याबरोबर समोरच बावन चाळ परिसर छोटी छोटी चाळी होत्या तिकडे विचारपूस केल्यावर समजलं जवळच एक मंदिराच्या बाजूला बॅडमिंटन कोर्ट आहे. गाडी बाहेर ठेवून आत गेलो. जागा मोठी आणि प्रशस्त, तशी खूप जुनी पण स्वछ. तिथे काही मुलं अभ्यास करत होते. चौकशी केली फॉर्म भरला त्या बरोबर पैसे देऊन स्पर्धेसाठी माझं नाव नोंदवलं.

       जास्ती जास्त सराव करायला लागणार होता. नेहमी आवड म्हणून खेळत होतो आता स्पर्धेत भाग घेतला होता जिंकण्यासाठी. सरावाला सुरुवात केली. शाळेला सुट्टी असल्या कारणाने दुकानात गर्दी कमी होती. घरी लवकर येऊन जेवण करून रोज सुमारे एक ते दीड तास प्रॅक्टिस करायला लागलो. फिटनेस साठी पेंडसे नगरला कानविंदे व्यायाम शाळेत जायला सुरुवात केली. सरानी आधी एक महिन्यासाठी पैसे भरायला सांगितले. लोक तीन तीन महिन्याचे पैसे भरतात फक्त दहा पंधरा दिवस येतात पुढे व्यायाम शाळेकडे फिरकत पण नाहीत. फुकटचे पैसे वाया घालवतात. सुरुवातीला जोश असतो पण थोडे दिवसांनी अंग दुखायला लागले की सकाळी उठायचा कंटाळा करतात. मी त्यांचं ऐकलं नाही सरळ तीन महिन्याचे पैसे भरले. रोज पहाटे ६ वाजता व्यायाम शाळेत जायला सुरुवात केली. दिवसभर काम करत असल्याने अंगदुखी हा प्रकारच मला माहीत नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर फक्त बॅडमिंटन स्पर्धा होती.

       दोन दिवसांवर स्पर्धा येऊन पोचली, माझ्याकडे कपडे शूज आणि चांगलं रॅकेट नव्हतं. मानपाडा रोडवर माझ्या मित्राच "गुप्ता स्पोर्ट्स'' नावाचं दुकान नुकतंच उघडलं होत. दुकान ज्ञान विकास वाचनालयाच्या वरती पहिल्या मजल्यावर होत. त्याला स्पर्धेचं सांगितलं तर त्यांनी मला तब्बल १२० रुपयेची रॅकेट दाखवली. मला ती पसंद ही आली. ती मी विकतही घेतली. रॅकेट आली आता कपडे आणि शूज पाहिजे होते. एका मित्रांकडून दोन दिवसाकरिता शूज आणले. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी हाफ पॅन्ट विकत घेतली. स्पर्धेची सर्व तयारी एक दिवस आधीच करून ठेवली. सर्व मित्रांना माहीत होतं मी स्पर्धेत भाग घेतलं ते घरच्यांना फक्त दोन दिवस आधी सांगितलं. मला घरच्यांच नेहमी प्रोत्साहन असायच.

        स्पर्धा सकाळी दहा वाजता होती.माझ्याकडे गाडी होतीच घरून निघालो की दहा मिनिटात पोचलो असतो. निघायच्या आधी आईच्या पाया पडलो डोंबिवली पश्चिमेला पोचायला पाचच मिनिट लागले जवळच छोटसं मंदिर होतं लांबूनच देवाला नमस्कार केला आणि स्पर्धेच्या ठिकाणी पोचलो. दहा वाजायला आले ही माझी पहिलीच स्पर्धा असल्या कारणाने मनात थोडीसी भीती होती समोरचा मुलगा कोण असेल कसं खेळत असेल वगैरे. गम्मत अशी झाली समोरचा प्रतिस्पर्धी त्यादिवशी आलाच नाही!!! खेळच झाला नाही आणि मी थेट दुसऱ्या राऊंड ला पोचलो. पुढचे तीनच मॅच जिंकलो की स्पर्धा जिंकलीच समजा. घरी आलो आधी घरच्यांना मग मित्रांना सांगितलं की मी दुसऱ्या राऊंड ला पोचलो. लगेच दुसऱ्या दिवशी सेकंड राऊंड होतं. समोरचा मुलगा माझ्या आधीच पोचला होता. अगदी वेळेवर स्पर्धेला सुरुवात झाली. समोरच मोठा चॅम्पियन होता मला त्याने एकही पॉईंट करू दिले नाही मी मागे गेलो की शटल पुढे मारायचा पुढे आलो की मागे मारायचा. त्याचे स्मॅश जबरदस्त होते एकदाही मला उचलता आले नाही तीन ही गेम त्यांनी मला सहज शून्याने ने हरविले... सरळ गाडी घेतली रॅकेट घरी टाकल आणि दुकानात जाऊन बसलो माझी स्पर्धेत भाग घ्यायची हौस पूर्ण झाली.पुढे कधी ही त्या जागेवर फिरकलो नाही आणि स्पर्धेचा विचार ही केला नाही....

16 comments:

  1. स्पर्धेचा अनुभव नेहमी असाच असतो.कधी खेळ अजिबात सुटतो तर कधी पुढे जायला मिळतं.पण तुम्ही मात्र त्या स्पर्धेलाच हरवलंत!

    ReplyDelete
  2. खेळापेक्षा खिलाडू वृत्तीचा जय हा महत्त्वाचा आहे. आणि त्यात तुम्ही कायमच विजयी आहात.

    ReplyDelete
  3. Play 💓 indoor or outdoor games it keeps you fit .

    ReplyDelete
  4. खेळ सुरू करण्यासाठी धडपड,प्रयत्न केले फार महत्त्वाचे.

    ReplyDelete
  5. आपले व्यक्तिमत्त्व उत्साहाने आणि मेहनतीने ठासून भरलेले आहे यात वाद नाही. आपल्या ही शब्दकोषात अशक्य हा शब्द नसावा असे वाटते.प्रसंग आणि ठिकाणाचे वर्णन फारच सुंदर करता.

    ReplyDelete
  6. काय सर प्रयत्नांती परमेश्र्वर ( यश) पुन्हा खेळायचे.
    असो तुमच्या मधला आणखी एक सुप्त गुण ( खेळाडू) ची ओळख झाली.
    धन्यवाद

    ReplyDelete
  7. खेळ,स्पर्धा, जिंकणंहरणं सगळ्याची मजा घेण्याची निरलस वृत्ती....👍👍👍

    ReplyDelete
  8. आता तुम्हीच एखादी बॅडमिंटन स्पर्धा भरवायला हरकत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अजून तसा काही विचार केला नाही....

      Delete