Monday, June 15, 2020

जून महिन्यात(१९९१) वृक्षारोपण आणि सुमन बरोबर मुंबई दर्शन....

"फ्रेंड्स लायब्ररी" बरोबर "फ्रेंड्स प्लॅस्टिकस" आणि दुकानही मी सांभाळत होतो. त्यातल्या त्यात मला दुकानात जास्त वेळ द्यावा लागायचा. जून महिना आला की माझी खूप धावपळ व्ह्याची. जरी अण्णा आणि पांडुरंग अण्णाने खरेदीची जबाबदारी घेतली असली तरी दुकान मलाच सांभाळायला लागायचं. कुठल्या वस्तू संपल्यात कोणाची कुठल्या पुस्तकांची मागणी आहे, कुठलं पुस्तक देणे बाकी आहे सर्व ठिकाणी मलाच लक्ष्य द्यावं लागायचं. लायब्ररीमध्ये ललिता नावाची नवीन मुलीला स्टाफ म्हणून कामाला ठेवली. कविताच लग्न होऊन ती तिच्या नवऱ्याच्या व्यवसायात मदत करायला लागली. प्लॅस्टिक मशीनच काम बबलू बघायचा, जास्त ऑर्डर असले तर रात्री दुकान बंद केल्यावर दहा ते बारा वाजेपर्यंत मी बसायचो आणि ऑर्डर पूर्ण करूनच घरी जायचो. या दरम्यान व्यापारी संघटनेची आणि युथ असोसिएशनची मीटिंगस असायच्या. तिकडे पण लक्ष द्यावं लागायचं.

             लहानपणा पासूनच मला झाडं खूप आवडायची. झाडांवर चढायचो आणि फळे काढायचो झाडांबरोबरच माझं बालपण मी जगलो म्हणायला हरकत नाही. झाडे लावायची त्यांना पाणी घालायचं हा माझा छंद. एप्रिल, मे मधल्या तापत्या उन्हात याच झाडांनी मला आश्रय दिला. जोरात पाऊस पडत असताना याच झाडाखाली मी उभा राहिलो. गावाच्या तुलनेत डोंबिवलीत खूप कमी झाडं दिसायची. मला खूप वाटायचं आपण पण भरपूर झाडं लावायला हवीत. आता युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली संघटना माझ्या बरोबर होती. डोंबिवली नगरपालिकेत गेलो झाडांची चौकशी केली. तिथल्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या नावाने पत्र द्यायला सांगितले. संघटनेचं पत्र त्यांना नेऊन दिले. नगरपालिकेकडून तीस एक झाडं मिळाली. गुलमोहर, निलगिरी, आंबा, अशोक आणि वडाची झाडं त्यात होती. रिक्षाने सर्व झाडं लायब्ररीत आणून ठेवली. झाडं लावण्यासाठी "डोंबिवलीत हरित क्रांती" असा एक अनोखा उपक्रम राबविला. प्रमोद शानभाग, प्रवीण, विष्णू, शैलेंद्र असे काही मित्र आणि युथ असोसिएशनचे सभासदांनी या उपक्रमाला मदत केली. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली, आम्ही सर्वजण रविवारी सकाळी सातच्या सुमारे लायब्ररीच्या इथे जमलो. टिळकनगर शाळेचा रस्ता आणि डॉक्टर राजेंद्रप्रसाद रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर नीट खड्डे खणून आणलेली लाल माती वापरून सर्व तीस झाडे लावली. सर्व झाडे लावे पर्यंत दहा वाजले. पुढे सर्व झाडे जगविण्याची जबाबदरीही आम्ही सर्वांनी घेतली.

        झाडे लावण्याच्या उपाक्रमाला दोन तीन दिवस झाले असतील नेहमी प्रमाणे मी एक वाजता जेवायला घरी गेलो. जून महिन्यात दुकानात पुष्कळ गर्दी असल्यामुळे घरी जास्त वेळ मी थांबत नव्हतो. घरी यायचो हात पाय धुतले तर धुतले नाहीतर नाही सरळ जेवायला बसायचो आणि पटकन जेवून परत दुकानाकडे निघायचो. त्यादिवशी जेव्हा मी घरी गेलो तर माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी "सुमन" गावावरून आली होती. इंदिरा माझी सर्वात मोठी बहीण. माझ्या जन्माच्या आधीच तिचं लग्न झालं. तिला आम्ही इंदिरा अक्का म्हणायचो. अक्का ला दोन मुली आणि तीन मुलं. सर्वात मोठ्या मुलीचं नाव प्रतिमा. ती दोन वर्षांपूर्वीच मुंबईत येऊन गेलेली. तिच्या नंतर प्रेमानंद जो आमच्याकडे काही वर्षापूर्वी राहायला आलेला, तिसरी मुलगी सुमन तिच्या नंतर दोन मुलं सुखानंद आणि सत्यानंद. वेंकटेश अण्णा आणि वहिनी गावाला गेले होते. येताना ते त्यांच्या बरोबर "सुमन"ला घेऊन आले. घरच्या कामाच्या व्यापामुळे ती सहजासह घरा बाहेर पडायचची नाही. जवळपास तेरा वर्षानंतर मी तिला आज बघितलं. आम्ही जेव्हा आमचं गावं कुंदापूर सोडलं तेव्हा ती कुंदापूरला आलेली तेव्हा ती दहा वर्षाची असेल. त्यानंतर तिला मी आज पाहत होतो. अण्णा गावाला नेहमी जायचे. अक्काच्या घरी गेले की ते "सुमन"चा कामाचे खूप कौतुक करायचे. अक्काच घर खूप मोठं, माणसं पण जास्ती त्यामुळे कामे खूप असायची. अक्का आजारी पडली की घराचं काम सुमन एकटीच सांभाळायची. मी घरात गेलो तेव्हा सुमन आतमध्ये स्वयंपाकघरात काम करत होती. ती कमी बोलायची आणि काम जास्त करायची. मी पण तेव्हा मुलींशी कमी बोलायचो. आईने विचारलं सुमन शी बोललास की नाही? तरी पण मी जास्तवेळ थांबलो नाही सुमनशी दोन शब्द बोललो आणि लगेच दुकानाकडे निघालो.

        त्यादिवशी रात्री जेवण झाल्यावर थोडावेळ गप्पा मारत बसलो. त्यात अण्णांची मुलं संदेश आणि संकेत मस्ती करत असल्यामुळे जास्त काही बोलता आलं नाही. संदेश थोडा शांत स्वभावाचा पण संकेत खूप मस्ती करायचा. एक मिनिट एका जागेवर बसायचा नाही. मी दोघांचेही खूप लाड करायचो. जून महिना असल्या कारणाने मला सुमनसाठी जास्त वेळ देता आला नाही. अजूनही काही दिवस ती आमच्याकडे राहणार असल्याचे समजल्यावर मला बरं वाटलं. घरातली कामं झाल्यावर सुमन दुकानात यायची. मग गर्दी कमी झाल्यावर तिला लायब्ररीत घेऊन जायचो... चार पाच दिवसांनी दुकानातली गर्दी कमी झाली. मी घरच्यांना सुमनला मुंबई फिरवून आणायचं सांगितलं. अण्णांनी होकार दिला आणि घेऊन जायला सांगितले. सोमवारी मुंबई फिरायला जायचं ठरलं.

            सकाळी ट्रेनला खूप गर्दी असल्याने अकरा वाजता निघायचा विचार केला. फास्ट लोकलने V.T. स्टेशनला निघालो. सव्वा तासात मुंबईत पोचलो. कुठे कुठे जायचं ते मी आधीच ठरवलेलं. V.T. स्टेशनच्या बाहेरून नरिमन पॉइंटची बस पकडली. जाताना मला जे काही माहीत होतं ते सर्व सुमनला दाखवलं.फ्लोरा फाऊंटन, चर्चगेट, मंत्रालय नंतर शेवटच्या स्टॉप वर उतरलो. सुमनच्या गावात वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ मोठी झाडं होती तर मी तिला मुंबईतल्या मोठमोठ्या इमारती दाखवल्या. तिला हे सर्व नवीन होतं. तिकडून चालत मरिन ड्राईवला आलो. दुपारची वेळ होती. एक बरं होत पाऊस नव्हता. मरिन ड्राईव्हचे ते दगडं, समोर अरबी समुद्र हे सर्व दृश्य दिसायला खूप सुंदर होत. समोरच असलेलं फिरत हॉटेल "हॉटेल आंबेसेडॉर" दाखवलं. जिथे अमिताभ बच्चनच "नसीब" चित्रपटाचं चित्रीकरण केलेलं. खूप वेळ पायी फिरत असल्याने मरिन ड्राईव्ह वरून बस पकडून फोर्टला आलो. दोघांना जोरात भूक लागलेली फोर्टच्या कामत हॉटेलमध्ये पोट भरून जेवलो ट्रेन पकडून डोंबिवलीला निघालो. मुलीं पासून लांब राहणारा मी आज चक्क सुमन बरोबर मुंबई फिरून घरी परतलो....

8 comments:

  1. आता आठवणीच्या प्रवासातील वेगळे वळण आलेले दिसते आहे
    मस्त
    हा प्रवासही नक्कीच सुंदर असेल .

    ReplyDelete
    Replies
    1. आता खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.

      Delete
  2. आठवणी चा विषय आणि मुंबई दर्शन खूप छा

    ReplyDelete
  3. मुंबईत पहिल्यांदा फिरायला गेलात तो दिवस आणि हा दिवस. मस्त !!

    ReplyDelete