Wednesday, June 3, 2020

(१९८९) युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली तर्फे नागोठणे भागात पूरग्रस्तांना सामग्री पोचविण्याची संधी मिळाली....

"फ्रेंड्स लायब्ररी'ची सुरुवात होऊन अडीच वर्षे लोटली. पहिल्या वर्षी फक्त बाहत्तर नवीन सभासद जोडले गेले. त्यातले पण चाळीस सभासद सोडून गेले. त्यामागे बरीचशी कारणे होती. या दरम्यान सात ते आठ स्टाफ बदलले होते. सुरुवातीला माधुरी होती त्यानंतर सुनिता, अमिता, पुष्पलता, सुजाता असे काही स्टाफ तीन चार महिने काम करायचे आणि सोडून जायचे तेव्हा मी त्यांना २०० रुपये पगार द्यायचो. मध्ये थोडे दिवस माझा मित्र विनायक पण लायब्ररी सांभाळायचा. त्याला मी १०० रुपये पगार ठरवला होता. पण त्याने पगार रोख कधीच घेतला नाही. तो दुकानातून पेप्सी कोला, कॅडबरी चॉकलेट, आइस्क्रीम वगैरे घ्यायचा यातच त्याचा पगार संपायचा. तो स्टाफ पेक्षा माझा जवळचा मित्र होता. विनायकच वाचन अफाट होतं. तो वोलगा ते गंगा. नाझी भस्मासुरचा उदयास्त, काळे पाणी, कोंडुरा सारखे पुस्तकं वाचायचा. विनायक श्रीकांत टोल काकांची विकास वाचनालय आणि परांजपे यांच्या ज्ञानविकास वाचनालयाचा सभासद होता. तो जी पुस्तक वाचायचा ते सर्व माझ्या डोक्यावरून जायचं. विनायक म्हणायचा आपण दर्जेदार पुस्तक वाचनालयात ठेवायला पाहिजे जेणेकरून सभासद वाढतील. त्याच वेळेला लता नायक ही मुलगी लायब्ररीत कामाला लागली. मुलगी तशी गरीब होती घरची परिस्थिती चांगली नव्हती. कामाला मात्र हुशार सभासदांशी चांगला संवाद साधायची. तिची मैत्रीण कविता कधी कधी तिला भेटायला यायची.लताची आर्थिक परिस्थिती बघून कविताच्या मित्राने लताला चांगल्या पगाराची नोकरी मिळवून दिली आणि तिच्या जागी कविता स्टाफ म्हणून यायला लागली. कविता खूप हुशार तिने B.A. केलं होतं. कविता मी आणि विनायकने मिळून वाचनालयात काही बदल करण्याचे ठरविले. त्यासाठी भांडवल लागणार होतं. मला अण्णाकडे पैसे मागायचे नव्हते. स्वतःच भांडवल उभ करायच होत. एकच पर्याय होता तो म्हणजे बँके कडून कर्ज घेणे. देना बँकेचे मॅनेजर माझ्या परिचयाचे होते. त्यांना मी कर्जच्या बाबतीत विचारलं. ते बोलले मी जास्तीत जास्त दहा हजार पर्यंत कर्ज देऊ शकतो पण मला सर्व कागदपत्रे हवेत. मी दहा दिवसांत कागदपत्रे जमा करून मॅनेजराना दिली. पंधरा दिवसात मला दहा हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. आता माझ्याकडे दहा हजार रुपये होते सांभाळून उपयोग करायचं ठरवलं. मला पै सरांचं वाक्य आठवलं. पैसे घेणे सोपं आहे पण परतविणे कठीण आहे. मी सरांच्या म्हणयाप्रमाणे सोपं काम केलं होतं. आता पुढे बँकेचा हप्ता वेळोवेळी भरायचं हे कठीण काम करायचं होतं.

       लायब्ररीच्या बाजूला चक्कीची गिरणी होती गिरणीच्या पिठामुळे पुस्तके जुनी दिसत होती त्यामुळे काचेचा दरवाजा बसवून घेतला. लांबून लायब्ररीच नाव दिसेल असं मोठा बोर्ड बनवला. बोर्ड आणि दरवाजा मिळून हजार रुपये खर्च झाले. हजार रुपये हातात ठेवून तब्बल आठ हजार रुपयांची नवीन पुस्तके खरीदी केली. घाऊक विक्रेते एकदम चालू होते लायब्ररीत पुस्तक द्यायचं असेल तर २५ टक्के सवलत आणि पुस्तक विक्रेता असेल तर ३० ते ४० टक्के सवलत द्यायचे.मला आधीच माहीत असतं तर मी "फ्रेंड्स स्टोर'च्या नावाने पावती बनवली असती. या वेळी खूप चांगली पुस्तक मागवली. विनायकच्या म्हणण्यानुसार दर्जेदार पुस्तके होती. पू. ल. देशपांडे, व.पू. काळे, द.मा. मिराजदार, वि.स. वाळिंबे, रणजित देसाई, व्यंकटेश माडगूळकर अश्या नावाजलेल्या लेखकांची पुस्तके काही ऐतिहासिक पुस्तके ही त्यात समाविष्ठ होती. पुस्तके कप्प्यावर लावल्याने लायब्ररी पुस्तकाने भरलेली दिसत होती. हळू हळू वाचक वाढायला सुरुवात झाले.

          जुलैचा महिना असेल जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचली अलिबाग नागोठणे भागात मुसळधार पावसामुळे बरेचसे घरे वाहून गेली.  लोकांना खायला अन्न, प्यायला पाणी नाही जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंबिवलीतल्या बराच सामाजिक संस्थांनी कपडे, धान्य, औषधे बाकीचे वस्तू गोळा करायला सुरुवात केली लायब्ररीमध्ये आम्ही सर्व युथ असोसिएशनचे सदस्य जमलो. मी विनायक, प्रवीण, चेतन, शैलेंद्र, शर्मिला, कविता आणि काही जण. आमचं पण अलिबाग नागोठणेच्या लोकांना मदत पोचवण्याचा ठरलं. टिळकनगर चौकात युथ असोसिएशनचा बोर्ड लागला. टिळकनगर राहिवासीयांनी भरभरून भांडी, कपडे, गहू, तांदूळ असे बरेचसे वस्तू आणून जमा केल्या. बराच लोकांनी रोख रक्कम ही आमच्याकडे जमा केली. त्या सर्वांना आम्ही रीतसर पावतीही दिली. आमच्या अपेक्षे पेक्षा जास्त सामान गोळा झाले. युथ असोसिएशनचे सर्वजण कामाला लागले. आलेल सामान वेगवेगळ्या पिशवीत भरून तयार ठेवल. आलेल्या रोख रक्कममधून अजून काही धान्य विकत घेतल. आम्ही सर्वांनी रविवारी सकाळी निघायचं असा ठरवलं. सामान खूप असल्यामुळे तो घेऊन जाण्यासाठी मोठा टेम्पो लागणार होता. एका मित्राचा टेम्पो होता त्याला सर्व समजावून सांगितल, तो बोलला तुम्ही फक्त गाडीत पेट्रोल भरा बाकी काही नाही दिलं तरी चालेल. त्यामुळे आमचे बरेचसे पैसे वाचले!! रविवारी पहाटे लवकर सामान सर्व टेम्पोमध्ये भरून निघालो. मी प्रवीण, विनायक अजून दोघे आणि ड्राइवर असे आम्ही सहाजण होतो. ड्राइवर बरोबर दोघे आणि मागे तीन लोकं. मी टेम्पोच्या मागे कपड्यांच्या ढिगावर बसलो. सकाळची वेळ होती त्या कपड्यांच्या ढिगऱ्यावरच झोपी गेलो. थोडा वेळाने जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही वडखळ नाक्यावर होतो. ड्रायव्हर ने गाडी बाजूला लावली. बाजूलाच हॉटेल होतं. सर्वांना जोरदार भूक लागली होती. पोट भरून जेवलो. टेम्पोमध्ये पूरग्रस्तांना देण्याचे सामान बघून हॉटेल मालक आमच्याकडून पैसे घ्यायला मागत नव्हता. आम्ही जबरदस्तीने त्यांना पन्नास रुपये दिले. त्याच्याकडे विचारपूस केली. त्यांनी जे सांगितले ते असं की दोन ते तीन दिवस सतत मुसळदार पावसाने शेतात, घरात, रस्त्यावर पाणी तुंबायला सुरुवात झाली त्यात धरण भरून वाहू लागल्याने धरणाचं पण पाणी सोडलं गेलं. पाण्याचा पुरात बरेचसे घर,जनावर, झाडं, माणसं वाहून गेले. भयानक दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले. त्यात एक बरं होत गेले काही दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. ते बोलले तुम्ही नागोठण्याला जा तिकडे अजून काही सामान पोचलेले नाही. त्यांनी ड्रायव्हरला नीट समजावून कुठल्या गावात आणि कसे जायचे  सांगितले. आम्ही थोडावेळ विश्रांती घेऊन त्यांनी सांगितलेल्या गावाच्या दिशेने निघालो. जसं जसं आम्ही पुढे जात होतो बराच ठिकाणी आम्हाला तिकडच्या स्थानिक लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला आमचा ड्राइवर हुशार होता त्यांनी कुठेही न थांबता सरळ टेम्पो आतल्या एका गावात नेऊन थांबवला.

    गाव तसं छोटं कवलारु घरं काही छोट्या झोपड्या ही होत्या. आम्ही टेम्पो एक ठिकाणी उभा केला. काही लोकांच्या घरी जाऊन तपासणी केली. सर्वांचे खूप हाल झाले होते.सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोचली नव्हती कोणीही त्या गावात फिरकले नव्हते. आम्हाला बघून काहींच्या डोळ्यात पाणी आलं. आणलेल्या वस्तूं लोकांच्या घरोघरी जाऊन द्यायला सुरुवात केली. घरात पाणी शिरल्यामुळे कुबट वास येत होता. गादी उशी बरीचशी सडलेल्या वस्तू लोकांनी घराबाहेर फेकल्या होत्या. त्याला दुर्गंधी येत होती. आम्ही सर्वांनी नाकाला रुमाल बांधून घेतला. वस्तू वाटप करताना तिथल्या लोकांना आमच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली. इथे कोणाचं आले नाही तुम्ही अगदी देवासारखा आलात.

कपडे, गहू, तांदूळ, तेल, डाळ, बिस्कीट काही प्रमाणात औषध सर्व वाटप करण्यात आले. आम्ही नेलेल सामान आम्हाला खूप वाटत होता पण फक्त मोजके तीस ते चाळीस घरातच वाटप करू शकलो. पण मनाला एक समाधान वाटत होता आपण या लोकांना काहीतरी मदत करु शकलो!! सर्व वस्तू संपल्यावर दुपारी तिकडून निघालो आणि संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत डोंबिवलीला पोचलो. आम्ही जी एक मोठी कामगिरी स्वतःवर घेतली होती ती शंभर टक्के यशस्वी करून परतलो याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटत होता...

10 comments:

  1. सामाजिक बांधिलकी जपली एवढ्या कमी वयात आपल्या बांधवांना बरोबर घेऊन खूप छान

    ReplyDelete
  2. तुम्हाला खूप चांगले मित्र भेटले त्यामुळे तुमच्या कडून चांगली कामगिरी झाली.आणि तुम्हाला सर्वांना मदत करायला आवडतंच!!

    ReplyDelete
  3. Tumchaya kadun changli kamgiri zalele aahe. Eatrana madat karne khup changli gosht aahe.

    ReplyDelete
  4. अत्यंत पारदर्शक आणि सेवाभावी !

    ReplyDelete
  5. सर तुम्ही सामाजिक बांधिलकी खुप छान जपली.
    तुमच्या कार्याला मझा सलाम.

    ReplyDelete