Monday, June 29, 2020

कळसा मधील ते आठ दिवस....

पुढची पावले !


कळसाला आल्यानंतर जास्तीत जास्त वेळ सुमनचा सहवास मिळावा, यासाठी मी प्रयत्न करीत होतो. संधी मिळेल, त्याप्रमाणे तिला भेटत असे. तीही मला बोलवायची. दर वेळी मला काहीतरी नवीन कल्पना सुचत असे.  ' हे सगळं कसं काय सुचतं तुला?' तिचा उत्सुकतेनं प्रश्न... 'आयुष्य  सुंदर आहे, त्याच्या प्रत्येक क्षणाचा उत्कट आनंद आपण घेतला पाहिजे' असं मी काहीसं साहित्यिक उत्तर देत असे. सुमनच्या दैनंदिन कामात तिला मदत करताना तिच्यासोबत प्रत्येक क्षणाच्या सहवासाचा आनंद मी घेत होतो. रोज सकाळी उठल्यानंतर गुलाबाचं फूल तिच्या अंगावर टाकण्याबरोबर दिवसाला सुरुवात होत होती.

अक्काचं माझ्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष असे. कळसाच्या थंड वातावरणात भूक खूप लागायची. सकाळी सात वाजता चहा, साडेआठपर्यंत नाश्ता. परत ११ वाजता घरातलीच फळं... पपई, पेरू, केळी खायला असायची. जेवणासाठी जास्त करून तोंडली, भेंडी, वांगी, लाल भोपळा, दुधी अशा घरातल्या भाज्या. अनेक प्रकारच्या भाज्या घराच्या आसपास लावल्या होत्या. त्यामुळे जेवणाचा स्वाद निराळाच ! दुपारी एक ते दीडच्या दरम्यान देवपूजा उरकून सर्वजण एकत्र गप्पा मारत जेवत असत. त्यानंतर दुपारी तासभर वामकुक्षी. हीच संधी साधून सुमनबरोबर गप्पा. मग संध्याकाळी तासभर आमची भटकंती. घरी येताना सुमनच्या लहान आणि मोठ्या काकांची घरं आणि बाजूलाच तिच्या चुलत काकांचंही घर होतं. त्यांना मी मुंबईहून आल्याचं समजलं. त्यांच्याकडे अजूनही एक प्रथा आहे. बाहेरून कोणी पाहुणे आले की त्यांना जेवायला किंवा कमीत कमी नाश्त्याला  तरी ते बोलवायचे. गेलो नाहीतर ते रागवायचे. त्यामुळे त्यांच्याकडे जाणं भागच. सुमनबरोबर बाहेर जायला एक निमित्त्य म्हणून ते मला आवडत असे...तेवढाच तिचा सहवास ! साहजिकच पुढचे चार दिवस संध्याकाळी नाश्त्यासाठी सुमनबरोबर काकांकडे ! नाव नाश्त्याचं आणि गाव मात्र...

सुमनचे दोन्ही भाऊ नेहमीच मला नेहमी बाग बघायला चलायचा आग्रह करत असत. पण मी काहीतरी सबब सांगून त्यांना टाळत होतो. शेवटी एक दिवस सकाळी सत्यानंद या सुमनच्या भावाबरोबर शेती आणि बाग बघायला निघालो. मलाही शेती, झाडं, बागेची पहिल्यापासून आवड. पण या वेळी मात्र मी फक्त सुमनसाठी आणि
तिच्या सहवासात वेळ घालवण्यासाठी कळसाला आलो होतो. सत्यानंद मला बागेतली सगळी झाडं दाखवत होता. पाणी वाचवण्यासाठी त्यांनी पाणी शिंपडणार जेट सगळीकडे लावून घेतलं होतं. त्यांची सुपारीचीही मोठी बागायत. काही माणसं सुपारीच्या झाडांवर चढून सुपारीचे गड रस्सीने खाली सोडत असत. ते फक्त एकच झाड चढून मग खाली न उतरता त्या झाडावरून दुसरं झाड खेचायचे. हे बघायला मजा येत होती. मला बालपण आठवलं. त्या वेळी मलाही झाडावर चढायची इच्छा झाली. पण पडलो तर लग्नात निष्कारण विघ्न येण्याच्या भीतीनं शांत राहिलो. पुढे दुसऱ्या बाजूला नुकतीच कॉफीची कलमं लावली होती. तिकडे कॉफीची जवळपास हजारभर झाडं होती. पण ती नुकतीच लावल्यामुळे कॉफीची फळं अजून यायची होती.

कॉफी ची फळं

 कॉफीच्या मोठ्या झाडांखाली वेलचीचीही झाडं होती. वेलचीच्या झाडांच्या तळाला हिरव्या वेलची आल्या होत्या. काही ठिकाणी काळ्या मिरीची झाडं होती. आम्ही जसजसं  पुढे जात होतो, तसतशी विविध निरनिराळी झाडं दिसत होती. फणस, केळी,पपई,पेरू, चिकू, लिंबू, अशी बरीचशी फळांची झाडं होती. कधी कधी इथंच असा निसर्गरम्य वातावरणात कायमचं वास्तव्य करावं, असाही विचार मनात डोकावत असे !  तिकडे बघण्यासारखं खूप काही होतं. पण तोपर्यंत दुपारची जेवणाची वेळ झालेली. महत्त्वाचं म्हणजे सुमन माझी वाट बघत असेल, हा एकच ध्यास ! लगेचच सत्यानंदबरोबर घरी निघालो.

लाल भोपळा कापताना सत्यानंद.



संध्याकाळी थोडाफार वेळ मी भावजींबरोबर घालवत असे. त्यांचं बोलणं तसं कमी. पण एकदा बोलायला लागले की, अजूनही ऐकतच रहावं, असं त्यांचं वेधक बोलणं ! भावजींचं नांव अनंतराम शेणॉय. ते काही काळ शिक्षक होते. नंतर घरच्या शेतीकामामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. आता तर त्यांनी चांगलीच मोठी इस्टेट उभी केली. एके दिवशी संध्याकाळी त्यांनी एक सत्यकथा सांगितली. "भावजींचे एक ओळखीतले गृहस्थ मासे पकडण्याचा व्यवसाय करीत असत. ते मोठे सावकारही होते. एके दिवशी त्यांच्याकडे परिचयाचा एक गरीब माणूस आला. त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्यांच्याकडे थोडेफार पैसे होते. तरीही थोडे पैसे कमी पडत होते.पण त्यांना कर्ज काढून मुलीचं लग्न करायचं नव्हतं. त्यांनी या सावकाराला पैसे कमी पडत असल्याचं सांगितलं. तेव्हा एकमेकांना मदत करण्याची प्रथा होती.  सावकारांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, ‘सध्या मासे कमी येत असल्यामुळे धंद्यात नफा कमी झालाय. तरीही उद्या सकाळी ये. मासे विकून जे काही पैसे मिळतील, ते सगळेच तुला देतो’! सावकार थोडासा नाराज झाला होता. धंदा खूपच कमी असल्यामुळे इच्छा असूनही जास्त मदत करु शकत नसल्याचा सल त्यांच्या मनात उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस सावकारांना भेटला. एवढे दिवस मासे कमी येत होते. तर त्या दिवशी मात्र पुष्कळ दिवसांत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात मासे आले. आठवड्या भरातला धंदा त्या एका दिवसात झाला ! सावकारांच्या मनाला समाधान वाटलं. ठरल्याप्रमाणे त्यांनी जमलेली रक्कम त्यांना दिली. त्यांनी आपल्या मुलीचं लग्न कर्ज न काढता धूम धडाक्यात केलं !"  भावजींनी सांगितलेली ही गोष्ट अजूनही लक्षात आहे. त्यादिवशीची संध्याकाळ भावजींबरोबर गप्पा मारण्यातच गेली.

मी कळसाला येताना बसनं आलो होतो. जाताना सुमनची मोठी बहीण प्रतिमानं 31 डिसेंबरचं मंगलोरहून कल्याणसाठी रेल्वेचं तिकीट काढलं होतं. यामुळे सुमनच्या सहवासात राहण्यासाठी मला अजून चार दिवसांचा बोनस मिळाला ! या दिवसांमध्ये मी आणि सुमननं एकमेकांना मनापासून समजून घेतलं.आम्हा दोघांची मनं जुळली. ‘पुढे  काय करायचं, घरी काय, कसं आणि कधी सांगायचं’? याचाच एकमात्र विचार करत होतो. निघण्याच्या आदल्या दिवशीही आम्ही दोघांनी या बाबतीत चर्चा केली. तिनं सर्व माझ्यावर सोपवलं. तिला फक्त माझ्याशी विवाहबद्ध होऊन माझ्या साथीनं पुढचा प्रवास करायचा होता...

Saturday, June 27, 2020

.....आणि दुर्लभ संधी मिळाली!

...आणि दुर्लभ संधी मिळाली !


सुमनचं कळसा हे गांव कर्नाटकच्या चिकमंगळूर या जिल्ह्यात येतं. याच जिल्ह्यातून  माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी १९७८ मध्ये निवडून आल्या होत्या. सुमनचं घर ज्या डोंगरावर होतं, त्याचं नांव ‘देवर गुड्डे’ आणि  घरच्या ठिकाणाला ‘देवरपाल’ म्हणत असत. सुमनचा जन्म १९६७ मधला. कॉलेज घरापासून खूप लांब असल्यामुळे तिचं शिक्षण झालं, कनिष्ठ महाविद्यालात. शाळाही खूप लांब. पावसाळ्यात शाळेत जाता येत नसे. घर मोठं असल्यामुळे घरात प्रचंड कामं. ही कामं करून मग शाळेचा अभ्यास करायला सुमनला वेळ मिळत नसे. तरीही जिद्दीनं चांगले गुण मिळवून तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे उच्च शिक्षण घ्यायची खूप इच्छा असूनही ते घेता आलं नाही. अधूनमधून अक्का आजारी पडल्यावर सुमन एकटीच सगळं घर संभाळत असे.

स्वयंपाकात ती एकदम तरबेज. कधी कधी त्यांच्याकडे खूप कामगार असायचे. त्या सगळ्यांचा नाश्ता, जेवण सुमन एकटीच सहजपणे तयार करायची. तिला उत्तम सुगरण म्हणायला हरकत नाही. इडली सांबार आणि गोडाची खीर हे तिचे एकदम चविष्ट खाद्यपदार्थ ! त्यामुळे घरात ती सर्वांचीच लाडकी ! नेहमी हसत खेळत काम करायच्या सुमनच्या स्वभावमुळेच मी तिच्यावर फिदा झालो. सुमनलाही मी आवडू लागलो होतो... आमच्या अबोध कहाणीची ही सुरुवात होती !

आता, ‘कट टू’... दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास मला जाग आली असेल.खूप थंडी होती. सुमनचे दोघे भाऊ अजून झोपलेलेच होते. पंखा नसल्यानं आत अक्का कामं करत असल्याची चाहूल लागतच होती. सुमन जागी झाली आहे का, याचा हळूच अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. पण तिच्या खोलीचं दार बंदच होतं. देवाला नमस्कार केला. स्वयंपाक घरात डोकावून पाहिलं. अक्काचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी हळूच बाहेर पडलो. बाहेरच्या दृश्यानं डोळे दिपून गेले. गायी चारा खात होत्या. मी दार उघडलेलं बघून गायी माझ्याकडेच एकटक बघू लागल्या. डिसेंबर महिन्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्यानं बाहेर थोडा अंधार होता, पण सूर्यनारायणाचीही चाहूल लागत होती. थंड हवेची लाट चेहऱ्याला मुलायम स्पर्श करत होती. चेहऱ्यावर थंडी जाणवत होती.श्वास घेताना तोंडातून वाफ बाहेर पडत होती. सर्व झाडांवर धुक्याची दुलई पसरली होती. झाडांच्या पानांवर धुक्याच्या पाण्याचे पडत असलेले मोत्यासारखे थेंब पावसाचीच जाणीव करून देत होते. त्यात अधूनमधून पक्ष्यांचे मधुर गुंजन एकूण वातावरणात उत्साह निर्माण करत होते.





मागच्या दरवाजातून बाहेर पडलो. तिथलं दृश्यही वेधक होतं. भरपूर फुलांची झाडं, त्यात निरनिराळ्या रंगांची गुलाबाची आणि डेलियाची झाडं होती. गुलाबाची झाडं उंचीला माझ्याएवढी, मोठमोठ्या गुलाबांनी लगडलेली. त्यावर धुक्याचं पाणी विखुरलेलं बघून एखाद्या चित्रपटातल्या दृश्याचा भास होत होता ! एकूणच वातावरण अतिशय ‘रोमॅण्टिक’ ! त्यात फक्त कमतरता सुमनची...जी मला प्रकर्षानं जाणवली !



साहजिकच सुमन ज्या खोलीत झोपली होती, तिथली बंद खिडकी हळूच उघडायचा प्रयत्न केला. आजूबाजूला बघून कोणी आपल्याला बघत नसल्याची खात्री करून घेतली आणि एक छानसं गुलाबाचं मोठं फूल हळूच झाडावरून तोडलं. मला फुलं आवडतात. त्यामुळे फूल तोडताना जीवावर आलं. गुलाबाचं फूल तोडताना हात थरथरत होते. सुमनच्या खोलीची खिडकी आवाज न करता उघडली. परत एकदा इकडे तिकडे नजर टाकून हातातलं गुलाबाचं फूल सुमनच्या अंगावर फेकलं! ती गाढ झोपेत होती. समोरच्या बाजूला कुत्रा असल्यानं मी तातडीनं घरात शिरलो.



अक्कानं माझ्यासाठी चहा केला. मी बाहेर पडल्याचं अक्कानं पाहिलं तर नसेल ना? असा विचार मनात आला. तसा मी अक्काचा खूप लाडका असल्यानं ती माझे खूप लाड करायची. मी चहा पीत होतो. सुमनचे दोघे भाऊही उठलेले दिसले. अजून ‘पैंजणां’चा आवाज ऐकू आला नव्हता. पटकन उठून बाहेरच्या खोलीत गेलो. तेव्हा मात्र सुमन उठून अंथरुणं गुंडाळीत होती. तिनं माझ्याकडे कटाक्ष टाकून ‘गुलाबाचं फूल तूच टाकलंस ना, माझ्या अंगावर’? असं दबक्या स्वरात विचारलं. मीही आजूबाजूला पाहून कबुली देत, ‘अजून कोण टाकणार, माझ्याशिवाय’? असं विचारलं. सुमन हसायला लागली. या गोड हास्याचा अर्थ मला अचूक उमगला. मी गुलाबाचं फूल तिच्या अंगावर टाकलेलं आवडलं, हे तिनं सूचकपणे सांगितलं होतं !

दिवसभरात काय काय करायचं, हे मी आधीच ठरवलं होतं. सुमन अंगण झाडायला बाहेर पडली आणि तिनं मलाही बोलावलं. सुमन मला एकेरी हाक मारत असे. तिनं `ये रे, इकडे’ म्हटलं की मी तिच्या मागे गेलोच ! दिवसभरात ती काय काय कामं करते, तेही पहायचं होतं मला. अंगण झाडल्यावर गायीचं दूध काढायला निघाली. आधी सर्व गायींना चारा घालून मग वासराला गायीपाशी सोडायची. नंतर वासराला बाजूला करून दूध काढायला सुरुवात. मी हे सर्व पहिल्यांदा पाहत होतो, तेही सुमन तिथं आहे म्हणून ! नंतर आम्ही आत गेलो. अक्का नाश्त्याची तयारी करत होती. सुमन तिच्या मदतीला लागली. मी आल्यामुळे दररोज नाश्त्याला  छान छान वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अक्का बनवत असे. नाश्ता झाल्यावर सर्व आपापल्या कामाला लागले.

आता मी ‘योग्य वेळे’ची प्रतीक्षा करत होतो. कोणाला न कळत मी आणलेलं ड्रेस मटेरियल आणि साडी सुमनला द्यायची होती. सकाळपासून माझ्या नियोजनाप्रमाणेच सगळं चाललं होतं. अक्काच्या बेडरूममध्ये गेलो. बॅग उघडली. त्यातलं ड्रेस मटेरियल आणि साडी काढून सुमनच्या खोलीत गेलो. ते तिच्या हातात दिलं. साडी बघून सुमन खूश झाली, पण एवढं किंमती तिला अपेक्षित नव्हतं. ‘पण हे सर्व आणायची काय गरज होती’?  तिनं विचारलंच. मी काहीच बोललो नाही. मी फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो. पण एवढ्या किंमतीच्या वस्तू याआधी कधीच घेतल्या नसल्यानं ती खूशच झाली होती, हे तिचा प्रसन्न चेहराच सांगत होता.

संध्याकाळी घरात कामं कमी असायची, हे मला ठाऊक होतं आणि हीच संधी साधून सुमनला मी तिला विचारलं, ‘संध्याकाळी आपण फिरायला जायचं का’? ती हळूच म्हणाली, ‘घरात काय सांगायचं? कुठे जायचं’? मी अक्काकडे ‘फिल्डिंग’ लावून दुपारी विचारलं, ‘मी आणि सुमन संध्याकाळी मंदिरात जाऊन येऊ का’? अक्कानं होकार दिला आणि मला स्वर्ग जणू दोन बोटं उरला ! कळसामध्ये खूप लांब पुरातन शिव मंदिर होतं आणि तिथं जाऊन यायला दोन ते तीन तास निश्चितच लागणार होते. म्हणजे मला आणि सुमनला एकमेकांचा एवढा दीर्घकाळ सुखद सहवास लाभणार होता, खूप गप्पा मारता येणार होत्या. मी हुरळलो...

मी माझ्याकडचा सर्वात छान ड्रेस घातला, सुमनही तयार झाली. ती मेकअप करत नसे. आज ड्रेसमध्ये छान दिसत होती. संध्याकाळी चारच्या सुमारास आम्ही निघालो. जाताना सुमनबरोबर काय बोलायचं, ते सुचत नव्हतं. तसं आम्हाला खूप काही बोलायचं होतं,बरंच काही तिला सांगायचं होतं, पण शब्द निघत नव्हते. ती माझ्याकडे बघून हसायची आणि मी तिच्याकडे. शब्दांवाचूनच आमचा परस्परांशी मूक संवाद सुरू होता. वेळ कसा निघून गेला, कळलंच नाही. आम्ही मंदिरात आलो. मंदिर खूप सुंदर. सुमननं मंदिराचं महत्व सांगितलं. पण माझं लक्ष त्याकडे नव्हतं ; तर ते होतं, सुमनकडे ! देवाला नमस्कार करून आम्ही निघालो. तिकडून निघताना सहा वाजले असतील. अंधार पडायला लागला होता. डोंगराच्या पायथ्याशी आलो, तर मला पुढे चालणं कठीण वाटत होतं. एकतर डोंगर,त्यात पायऱ्या शिवाय दोन्ही बाजूला झाडं.अंधारात मला पुढचं काही दिसत नव्हतं. पण त्या संपूर्ण भागाचा कायम सराव असलेल्या सुमनला ते बरोबर कळलं आणि तिनं माझा हात धरला... तो भारलेला क्षण मला आजही आठवतोय. तिच्या स्पर्शात माझ्याबद्दल कमालीचा अबोल विश्वास होता, अबोल प्रेमाची अव्यक्त कबुलीही होती ! त्या दिवशी माझ्या जीवनाचं सार्थकच झाल्यासारखं वाटलं... मावळत्या सूर्यकिरणांच्या साक्षीनं आमच्या भावी वाटचालीचा जणू तो मला एक शुभशकूनच वाटला, श्रीगणेशा वाटला ! सुमनच्या प्रेमळ हाताचा स्पर्श मी कधीच विसरू शकणार नाही. तिचा हात हाती घेऊन मी डोंगर चढायला लागलो. असं वाटत होतं की हा डोंगर संपूच नये, सुमनबरोबर असंच जीवनभर चालत राहावं. एरवी तिनं माझा हात धरला नसता. वाटेत  मी तिच्याशी गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता आम्ही घरी पोहोचलो. तब्बल तीन तास मी सुमनबरोबर होतो. पण आयुष्यभराच्या गाठी त्या प्रवासात घातल्या गेल्या. हे तेव्हा अप्रत्यक्षपणे ध्यानी आलं आणि ...

कळसा शिव मंदिर

Thursday, June 25, 2020

..आणि प्रवासाचा थकवा विसरलो !

...आणि प्रवासाचा थकवा विसरलो !

संध्याकाळी सहाच्या दरम्यान मी सुमनच्या घरी पोहोचलो असेन. घरात सुमनची आई म्हणजेच माझी मोठी बहीण इंदिरा अक्का, जिजाजी (ज्यांना आम्ही भावजी म्हणत असू.) आणि सुमनचे दोन लहान भाऊ सुखानंद, सत्यानंद असे पाचजण रहात होते. सुमनची मोठी बहीण प्रतिमा ही लग्न होऊन मंगलोरला रहायला होती. पोस्ट कामामुळे काही काळ ती इकडेच असायची. मोठा भाऊ प्रेमानंद कामानिमित्त मुंबईला रहात होता. तोही नुकताच विवाहबद्ध झालेला.

त्या दिवशी मला अचानक आलेला बघून इंदिरा अक्काला सुखद धक्का बसला ! तिनं मला बेडरूममध्ये नेलं. पाणी आणून दिलं. बेडरूम खूप छोटी. तिथं फक्त एक पलंग आणि दोन कपाटं. तिथंच पलंगावर बसलो. बाजूला छोटीशी खिडकी. खिडकीतून वेगवेगळ्या फुलांची झाडं दिसत होती. माझी नजर मात्र सुमनच्या आगमनाकडे खिळली होती. सुमन आता येईल कधी ? कधी तिला एकदाचा  बघतो,असं झालं होतं. एवढ्या लांबून प्रवास करून फक्त सुमनसाठीच मी आलो होतो. अक्काला हळूच विचारलं, ' बाकीचे कुठे आहेत'? पण मला फक्त सुमन कुठे आहे, हेच जाणून घ्यायचं होतं. पण अक्काला थेट विचारण्याचं धाडस होत नव्हतं ! अक्का म्हणाली,  'भावजी मार्केटला गेलेत, सुखानंद आणि सत्यानंद बागेत काम करताहेत. सुमन मागेच आहे आता येईलच'. तेवढ्यात पैंजणांचा आवाज ऐकू आला आणि माझ्या हृदयाचा ठोकाच जणू चुकला ! अक्काबरोबर बोलत असलो तरी माझं लक्ष दाराकडेच होतं. माझी खात्री होती, सुमनच आली असेल. मी येत असल्याचं तिला पत्रात लिहिलं होतं. पण कधी येणार, हे मात्र सांगितलं नव्हतं. त्यामुळे मला अचानक समोर बघून सुमन गोंधळली आणि हसलीही. तसं ती नेहमीच हसत असे. पण आज तिचं हसणं काहीसं वेगळं, सूचकही होतं. मी आल्याचा अस्फुट आनंद त्या हसण्यामध्ये प्रतिबिंबित झाला होता. तिच्या त्या हसण्यामागे मला वेगळ्याच हळुवार भावना जाणवल्या, माझ्यावरचं प्रेम तिच्या डोळ्यांत दिसत होतं. मीही हसलो. काही क्षण तिच्याकडेच एकटक बघत राहिलो. आता काय बोलायचं, हेच मला सुचत नव्हतं. सुमनही काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती. तीही गोंधळली होतीच.

      भावजी     आणि      इंदिरा अक्का

तेवढ्यात अक्कानं हाक मारली आणि मी जरा भानावर आलो. 'पाणी गरम आहे अंघोळ करत असशील तर'... अक्काच्या बोलण्यावरून एकदम दचकलो आणि  'हो अंघोळ करायला जातो' , असं काहीसं पुटपुटलो. सुमननं टॉवेल आणून दिले आणि मला बाथरूमपर्यंत सोडलं. बाहेर खूप थंडी होती. एक बरं होतं. अंघोळीसाठी गरम पाणी होतं. आम्ही बाथरूमला कोकणीमध्ये 'न्हाणी' म्हणतो. तिकडे केळीचा घड लोंबकळत ठेवला होता. त्यातली काही केळी पिकली होती. मला खूप भूक लागलेली. अंघोळ करता करता त्यातलीच दोन पिकलेली केळी खाल्ली !



अंघोळ करून बाहेर आलो. दिवसभराच्या प्रवासामुळे अंग दुखत होतं. गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर अंग दुखणं कमी झालं. कपडे बदलून बाहेर येताच अक्कानं नाश्ता तयार ठेवला होता. नंतर तिनं मोठ्या ग्लासात गरमागरम कॉफी दिली. अशा थंडीत गरम कॉफी पिण्याचा आनंद वेगळाच. सात वाजायला आले असतील. बाहेर अंधार पडला होता. मी सुमनच्याच शोधात होतो. ती देवघरात होती. रोज संध्याकाळी देवघरात सुमन किंवा अक्का देवाची भजनं म्हणत असत. सुमन देवघरात भजनं म्हणत होती. मीही तिच्या बाजूला जाऊन बसलो. आजपर्यंत कधी भजन म्हटलं नव्हतं. लहानपणी देवळात जात होतो, तेव्हा सगळी भजनं पाठ होती. आमच्याकडे जास्त करून भजनं मराठीतच असायची. थोडीफार कन्नडमधली. 'अमृताहूनी गोड, नाम तुझे देवा', 'केशवा माधवा', 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' अशी नेहमीची भजनं गायली जात असत.

कळसामधील देवघर 

भजनं संपल्यावर आम्ही देवघरातून बाहेर पडलो. अक्का ताक घुसळून लोणी काढत होती. घरीच तीन चार गायी होत्या. त्यामुळे दूध भरपूर. लोणीही पुष्कळ येत असे. मला लोणी खूप आवडायचं. एवढं लोणी बघून मी मात्र खूप खुश होतो. चार पाच दिवस मला भरपूर लोणी खायला मिळणार होतं ! इतक्यात भावजी मार्केटहून परतले. त्यांनाही मला अचानक आलेला बघून आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, 'एकटाच आलास की अजून कोणी आलंय बरोबर' ?मी एकटाच काही दिवस फिरायला आल्याचं सांगितलं. ते म्हणाले, 'बरं झालं, तसं तू कधी बाहेर पडत नाहीस. कामं नेहमीचीच असतात. असं अधून मधून बाहेर पडत जा'. तेवढ्यात सुखानंद आणि सत्यानंदही आले. दोघेही मला बघून हसले. 'कधी निघालास, काही काम काढलं का, असंच फिरायला आलास ? असं त्यांनी विचारलं. मी सहज फिरायला आल्याचं सांगितलं.

आतापर्यंत कोणालाच पत्ता लागला नव्हता, मी कशासाठी आलो ते ! मी मनातल्या मनात खूश होतो आणि एकीकडे सुमनलाही शोधत होतो. ती जेवणाच्या तयारीला लागली होती. मीही स्वयंपाक घरात शिरलो. तिकडे अक्काही होती. माझं सुमनच्या कामाकडे लक्ष होतं. आता मला खूप थंडी वाजायला लागली. हे कळल्यावर सुमननं आतून ग्रे कलरचा लांब हातांचा छानसा स्वेटर आणून दिला. मी तो स्वेटर घातला आणि थोडंसं गरम पाणी प्यायलो. आता मला बरं वाटायला लागलं. त्यांच्याकडे रात्री आठ-साडेआठ पर्यंत जेवणं होत असत. त्यादिवशी मी, भावजी, सुमनचे दोघे भाऊ आदी जेवायला बसलो. गप्पा मारता मारता जेवण उरकलं. आचा फक्त अक्का आणि सुमन जेवायच्या राहिल्या होत्या. त्यांचं जेवण होईपर्यंत मी स्वयंपाक घरातच चिकटून राहिलो.

दोघींचं जेवण झाल्यावर सुमन भांडी घासायला बाहेर पडली. मीही तिच्या मागे. बाहेर खूप अंधार होता त्याचबरोबर शांतताही पसरली होती. सर्व बाजूंनी झाडी होती. किड्यांच्या आवाज ऐकू येत होता. आजूबाजूला अंधारच असल्यामुळे आकाशात तारे स्पष्ट दिसत होते. अशा मोहक वातावरणात एकीकडे समोर मुग्ध सुमन आणि त्याचवेळी चंद्र ढगांतून अधून मधून बाहेर पडत होता. अतिशय छान वाटत होतं. सुमनच्या तेवढ्याही थोड्या सहवासात दिवसभरातल्या प्रवासाचा थकवा विसरलो !

अक्काकडे आल्यापासून मी आणि सुमन तसे एकत्र होतो. तरीही, माझं आणि सुमनचं जास्त बोलणं झालं नव्हतं. फक्त एकमेकांना बघून हसण्यावरच समाधान मानावं लागत होतं... रात्रीचे नऊ वाजले असतील. सुमननं माझं अंथरुण तयार केलं. खूप थंडी असल्यामुळे मला दोन साध्या चादरी आणि एक जाड चादर दिली. तहान लागली तर एक तांब्या पाणी. रात्री बाथरूमला जायचं असेल तर टॉर्च दिला. मी, सुखानंद, सत्यानंद एका खोलीत, अक्का आणि भावजी बेडरूममध्ये आणि सुमन तिच्या स्वतंत्र खोलीत झोपली. त्यांच्याकडे कुठल्याही खोलीत पंखा नव्हता. बाहेर थोडासा आवाज आला तरी मला आत ऐकायला येत होता. दिवसभराच्या प्रवासात थकल्यामुळे कधी झोप लागली, कळलंच नाही. खूप थंडी असल्यानं रात्री 12 च्या सुमारास जाग आली. बाथरूमला जायचं होतं. टॉर्च घेऊन दार उघडलं. पण बाहेर जायची भीती वाटत होती. खूप अंधार होता. तेवढ्यात अक्काला जाग आली. तिनं बाहेरचे दिवे लावून दिले. घाबरत घाबरत बाथरूमला जाऊन आलो आणि तीन पांघरूणं घेऊन परत आडवा झालो. 'आता उद्यापासून सुमनला निवांतपणे कसं भेटायचं', याचाच एकमात्र विचार करत असताना केव्हा झोप लागली, हेही कळलं नाही !

Tuesday, June 23, 2020

...आणि थेट सुमनच्या घरीच!

...आणि थेट सुमनच्या घरीच !

सुमनला गावी जाऊन पाच महिने झाले होते. यादरम्यान, तिचा होकारही आला... आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो ! माझ्या घरच्यांना मी काहीच सांगितलं नव्हतं, तसंच तीही तिच्या घरी यासंबंधी काहीच बोलली नव्हती. मी कामात बुडालेलो असल्यामुळे दिवस कसा संपायचा, हेही मला कळत नसे. शेवटी मलाच पुढाकार घ्यायला लागणार होता.

सुमन मुंबईत येऊन गेली होती. मला असं वाटत होतं की, मीही तिच्या गावाला जाऊन तिला एकदा भेटून यावं. पण कधी जायचं? कसं जायचं? तिला भेटण्यासाठी घरी सबब काय सांगायची? एकटंच जायचं की अजून कोणाला तरी बरोबर घेऊन जायचं? असे एक ना एक असे बरेचसे प्रश्न फेर धरत होते. सुमनला भेटायला जायचं म्हटलं तर गाव काही जवळ नव्हतं. दोन दिवस जायला, दोन दिवस यायला लागायचे आणि तिकडे गेल्यावर कमीत कमी चार पाच दिवस रहायला लागणार होतं. म्हणजे सर्व मिळून आठ दिवस तरी काढणं आवश्यक होतं.

लायब्ररी संभाळायला स्टाफ होता. प्लॅस्टिकचंही जास्त काम घेऊन ठेवलं नव्हतं. दुकानाचं काय? दुकान मी एकटाच संभाळत असे. डिसेंबर महिन्यात शाळांना आठ दिवसांची ख्रिसमसची सुट्टी असते. डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सुमनच्या गावी जायचं ठरवलं. अण्णांना विचारलं, 'डिसेंबर महिन्यात मी गावी फिरायला जाऊन येऊ का? खूप वर्षं झाली, गाव बघितलं नाही. तिकडूनच इंदिरा अक्काकडेही जाऊन येईन. मला जाऊन यायला आठ दिवस लागतील. लायब्ररीची सर्व व्यवस्था मी केली आहे'. अण्णा अधूनमधून लग्न मुंज जत्रेला वगैरे गावाला जात असत. ते म्हणाले,' मी नेहमी गावाला जात असतो. तू एकदा जाऊन ये' .अण्णांकडून पडत्या फळाची आज्ञा मिळताच मी गावी जायचं बाशिंद बांधायला उत्साहात सुरुवात केली !

त्यावेळी आमच्या गावाला जाण्यासाठी थेट डोंबिवलीहून बस सेवा नव्हती. बससाठी ठाण्याला किंवा सायनला जावं लागायचं... आमच्या गावचे तिकीट विकणारे एक एजंट आमच्या दुकानात येत असत. त्यांच्याकडून २२ डिसेंबर १९९१ चं ठाण्याहून सुटणाऱ्या बसचं तिकिट बुक केलं. माझ्याकडे तयारीसाठी काही दिवस होते. गावाला जाताना सुमनसाठी काय घेऊन जायचं, असा प्रश्न पडला. मी नक्की कशासाठी गावी चाललोय, हे घरी माहीत नसल्यामुळे घरच्यांची मदत घेऊ शकत नव्हतो. 'रेडी मेड ड्रेस' घेण्यात अर्थ नव्हता. कारण फिटींग नीट नसेल तर नेलेला ड्रेस बदलून घेणं शक्य नव्हतं. म्हणून ड्रेस मटेरियल आणि साडी घ्यायचं ठरवलं. तेव्हा माझ्याकडे हजार एक रुपये असतील. जाण्या येण्याचा खर्च आणि खरेदीसाठी लागणारे पैसे याच रकमेतून बसवायचे होते.

गावाला जाण्याच्या काही दिवस आधी माझ्या एका मित्राबरोबर डोंबिवली महापालिकेसमोरच्या 'मोर्विका साडी'च्या दुकानात शिरलो. दुकानात साडी घेणाऱ्या सर्व महिलाच होत्या. आम्हाला बघून दुकानदारही विचार करायला लागले. 'हे नक्की साडीच घ्यायला आलेत का टाईमपास करायला'? आम्ही बऱ्याच साड्या बघितल्या. पण मला कळेना की सुमनला कुठली साडी आवडेल? शेवटी ३०० रूपयांची पिवळ्या रंगाची साडी घेतली. तिथून दुसऱ्या दुकानात गेलो. तिकडे पिवळ्या आणि हिरव्या रंगांचं १५० रुपयांचं 'ड्रेस मटेरियल' ही घेतलं.आता हे सर्व नेण्यासाठी माझ्याकडे बॅग नव्हती. जवळच्या दुकानातून १०० रुपयांची व्ही.आय.पी. बॅग विकत घेतली आणि बॅगसकट सर्व सामान मित्राच्या घरी नेऊन ठेवलं. गावाला जायच्या आदल्या दिवशी दुकानातून 10-12 मॅग्गी ची पाकीटं, थोडी चॉकलेटस, फरसाण वगैरे खाऊ घेतला.



आईच्या पाया पडून तब्बल १३ वर्षांनी गावाला निघालो होतो, तेही एकटाच. ठाण्याहून संध्याकाळी बस सुटणार होती. मित्राच्या घरून न विसरता बॅग घेतली. आता दुकान आणि बाकीचं काम विसरून फक्त सुमनला बघण्यासाठीच गावी जायचा एकच निर्धार होता. ट्रेन पकडून ठाण्याला पोहोचलो. टेम्भी नाक्यावरून बस सुटणार होती. तिथं सुजय हॉटेलात चहा घेतला.काही वेळात बस आली. मी कुंदापूरपर्यंत तिकीट काढलं होतं. कुंदापूरला उतरून अजून तीन बस बदलायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी कुंदापूरला पोहोचलो.

कुंदापूरला उतरून वेंकटरमण देवस्थानात गेलो. याच देवळात माझं बालपण फुललं होतं. देवाच्या पाया पडलो, नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. कुंदापूरला बरेचसे नातेवाईक होते. काकांचं घरही होतं. पण कुठेच गेलो नाही. सुमनचं घर डोंगरावर असल्या कारणानं अंधार होण्यापूर्वी मला कळसाला पोहोचायचं होतं. कुंदापूरहून उडुपी, तिथून कारकळा, मग कळसा ! दुपारी एकच्या सुमारास कुंदापूरहून उडपीची बस पकडली असेल. कुंदापूरहून निघताना लहानपणच्या असंख्य आठवणी मनात रुंजी घालत होत्या ! लहानपणी मी केलेली मस्ती,धडपड...  ती सगळी ठिकाणं माझ्या डोळ्यासमोर येत होती. दुपारी दोनच्या दरम्यान उडुपीला पोहोचलो. समोरच कारकळाला जाणारी बस उभी होती. पटकन चढलो. आता अजूनही एक बस बदलायची होती. कळसाचे वेध लागत होते, तशी माझी उत्सुकता वाढत चालली होती. कधी एकदा कळसाला पोहोचून सुमनला भेटतो, यासाठी मन कमालीचं अधीर झालं होतं !

लहानपणी कळसाला जात असतानाचा मार्ग वेगळा होता, तर आताच वेगळा. तेव्हा अक्काला भेटायला जात असे. तर आता सुमनला भेटण्यासाठी ! थोड्याच वेळात कारकळाला पोचलो. आता पकडायची, शेवटची बस !कळसाला जाणाऱ्या बससाठी मला थोडा वेळ वाट बघायला लागली. भूक लागली होती. पण खायला गेलो आणि मध्येच बस आली तर? म्हणून काही न खाताच बसची प्रतीक्षा करत राहिलो आणि तेवढ्यात बस आलीच. बसमध्ये खूप गर्दी होती. कसंतरी धक्के मारून आत शिरलो. ती बस चुकली असती तर पुढच्या बससाठी अजून तासभर वाट बघायला लागली असती. पुढे 'कुद्रेमुख आयर्न ओर' प्रोजेक्ट सुरू झाला होता. तिकडे जाणारे सगळे या बसमध्ये चढले होते. 'कुद्रेमुख' बसस्टॉप वर सर्व उतरले. मला खिडकीजवळ बसायला जागा मिळाली. बस निघाली. बाहेर 'लख्या धरण ' दिसत होतं. माझ्यासारखे नवीन प्रवासी आश्चर्यानं ते दृश्य बघत होते. मातीनं बांधलेल्या या धरणावर 'Lakya Dam' असं लिहिलेलं सुंदर दिसत होतं.



पुढे 'संसे टी इस्टेट' आलं. एका डोंगरावर फक्त चहाची झाडं लावली होती.ते बघून मला आसाममध्ये आल्यासारखंच वाटलं. आता कळसा फक्त २० मिनिटांवर आणि माझी उत्सुकता, तसंच हुरहूरही वाढत चालली होती. संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान मी कळसाला पोहोचलो. मला एक स्टॉप आधीच उतरायचं होतं. पण गडबडीत पुढच्या स्टॉपवर उतरलो. आता परत चालत मागे यायला लागलं. मला रस्ताही माहीत नव्हता. आजूबाजूला पाहिलं तर सर्व डोंगरच दिसत होते.



सुमनची मोठी बहीण प्रतिमा पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करीत होती. तिची तिथं चौकशी केली. तर ती नव्हती. तेव्हा 'देवरपाल'ला कसं जायचं, हे तिथंच विचारलं. तिकडच्या लोकांनी रस्ता दाखवला. हातात मोठी बॅग, त्यात वजनही घेऊन डोंगर चढायचा होता.जवळपास एक किलोमीटर चालल्यावर डोंगराच्या पायथ्याशी आलो. रस्त्याच्या बाजूला एक छोटा झरा वाहत होता. त्यावर बांधलेल्या तीन लाकडांच्या लहानशा बांधावरून पलीकडे जायचं होतं. तिकडच्या लोकांना याची सवय असली तरी, माझ्यासाठी हे नवीन होतं. जीव मुठीत धरून मी  बांध ओलांडला.खाली पाणी वाहत होतं. डिसेंबर महिना असूनही पाणी स्वच्छ होतं.पाण्याखालचे पांढरे दगड दिसत होते. बांध ओलांडल्यावर शेती लागली.त्या शेतामधूनच डोंगराला सुरुवात झाली. लोकांच्या वहिवाटीमुळे दोन शेतांमधून  पायवाट निर्माण झाली होती. थोडावेळ चालल्यावर पायऱ्या दिसू लागल्या.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे मला तेवढा थकवा जाणवत नव्हता. मी लहानपणी आलो होतो, त्यावेळी अक्काचं सासरचं अख्खं कुटुंब एकत्र राहत असे. आता तीन भावंडं वेगळी झाली होती. सुमनच्या छोट्या काकांचं घर पाहिलं लागलं. त्यांना न कळत त्यांचं घरं ओलांडलं. आता मोठ्या काकांचं घर येणार होतं. डोंगर संपतच नव्हता.आता मात्र मी खूप दमलो.त्यात खूप तहानही लागली.कसंबसं मोठ्या काकांच घर गाठलं. तेवढ्यात कोणीतरी मला पाहिलं असेल. त्यांनी काकूंना हाक मारली. काकू बाहेर आल्या त्यांनी मला आत बोलावलं, पण बहुधा ओळखलं नसावं. मी 'पुंढा' म्हटल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. काहीच न कळवता मी आलो होतो. त्यांनी प्यायला पाणी दिलं. चहा नाष्ट्यासाठी आग्रह केला. पण मला अंधार पडायच्या आधी सुमनचं घर गाठायचं होतं. काकूंनी त्यांच्याकडच्या एका मुलाला माझ्या सोबत पाठवलं.

इकडून पुढे जंगलच होतं. मी एकटा जाऊ शकलो नसतोच. पुढे त्या झाडांमधून 10 मिनिटं चाललो असेन. पपई, पेरुची झाडं दिसायला लागली. मनाशी खात्री पटली की आता घर जवळ आलं. काही पायऱ्या चढलो. समोर मोठं अंगण दिसलं. बाजूला वेगवेगळ्या फुलांची झाडं लावली होती. बाहेरून कौलारू घर मोठं दिसत होतं.समोरच छान सुंदर तुळशीचं झाड होतं. घरात शिरलो. पण कोणीच नव्हतं. इतक्यात इंदिरा अक्का स्वयंपाक घरातून बाहेर आली. मला बघून अक्काला आश्चर्याचा धक्काच बसला !



...कारण मी 13 वर्षांनंतर (२३ डिसेंबर १९९१) सुमनला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचलो  होतो आणि ही बाब अक्काला मात्र ठाऊक नव्हती !

Sunday, June 21, 2020

फ्रेंड्स लायब्ररी: मध्ये मराठी मासिके ,दिवाळी अंकांची धुमधडाक्यात सुरुवात (ऑक्टोबर १९९१)

वेळ आली की सर्वकाही आपोआपच जुळलं जातं असं मी ऐकलं होतं. माझ्या बाबतीत तसंच घडून आलं. तेरा वर्षानंतर सुमन मुंबईत आली. रोज गप्पा मारल्या, मुंबई फिरून आलो राणीच्या बागेत जाऊन आलो. दोघे आजारी पडलो. नकळत एकमेकांच्या प्रेमात पडलो. हा नियतीचा खेळ नाहीतर काय. सुमनच्या होकारामुळे माझ्यात एक वेगळ हुरूप आणि नवीन चैतन्य निर्माण झाले. लग्न झाल्यावर घर खर्च कसं चालेल? पुढे मला उत्पन्ना कडे लक्ष देणे गरजेचे होते. माझ्याकडे उत्पन्नासाठी "फ्रेंड्स लायब्ररी", "फ्रेंड्स प्लॅस्टिकस" आणि "एल आय सी" असे तीन मार्ग होते. हे सर्व अण्णांमुळे शक्य झाले म्हणजेच "फ्रेंड्स स्टोअर्स" मुळे. मला याची संपूर्ण जाणीव होतीच त्यामुळे थोडाफार वेळ दुकानासाठी देणं भाग होतं. माझं कर्तव्य मी करायचो. दर महिन्याला कमीत कमी चार ते पाच हजार उत्पन्न मिळवण्यासाठी मी विचार करत होतो. त्यासाठी मी लायब्ररीकडे लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.

      डोंबिवली मधल्या बाकीच्या लायब्ररी जोरात चालत होत्या. नाही म्हटलं तरी एक एक लायब्ररीत हजार हजार सभासद होते. सर्व लायब्ररी खूप वर्षांपासून अस्तित्वात असल्या कारणाने आणि त्यांच्याकडे पुस्तकांची संख्या ही जास्त होती. माझं लक्ष परांजपे सरांच्या ज्ञानविकास वाचनालायकडे होतं. त्यांच्याकडे मासिक खूप मोठ्या प्रमाणात सतत येत असल्यामुळे त्यांच्याकडे सभासद संख्या जास्त होती. मी पण मासिक ठेवण्याचा विचार केला. मला कुठली मासिकं? कधी येतात? ते कुठे मिळत असतील? याची कल्पना नव्हती. मी अण्णांना मासिकांबद्दल विचारलं त्यांनी मुंबईला मिळत असल्याचे सांगितले. सोमवारी मुंबईला जायचं ठरवलं. त्या आधी लायब्ररीतल्या सभासदांकडून मासिकांची यादी तयार करून घेतली.

       सोमवारचा दिवस होता लायब्ररी आणि दुकान दोन्ही बंद असायची. सकाळचा नास्ता करून अकराच्या सुमारे मी मुंबईला निघालो. पाचशे रुपये रोख रक्कम बरोबर घेतली.फास्ट ट्रेन पकडून V.T. स्टेशनला उतरलो. उजव्या बाजूने स्टेशनच्या बाहेर पडलो. तसं मी बरेच वेळा V.T. स्टेशनला आलेलो पण नेहमी बाहेर पडताना गोंधळून जायचो. अण्णांनी सिनेमाच्या बाजूच्या इमारतीच्या मागे मासिकाचे मार्केट असल्याचे सांगितले होते. त्या इमारतीच्या जवळ गेलो तिकडच्या दुकानदाराकडे विचारपूस केली. त्यांनी आतल्या गल्लीत जायला सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे मी आत शिरलो बघतो तर अख्खी गल्ली मासिक विक्रेत्यांनी भरलेली. कोणी हिंदी मासिकं विकत होते? तर कोण इंग्रजी मासिक विकत होते? प्रत्येकाकडे मासिकाचा ढीग होता. पुष्कळ गर्दी होती तसं बघितलं तर विकत घेणारे जास्त करून उत्तर भारतीय भय्ये लोक होते. एवढ्या छोट्याश्या गल्लीत एकमेकांना ढकलून एकमेकांच्या अंगावर पडून घाई घाईने मासिकं विकत घेताना मी पहिल्यांदा पाहिलं. मी विचार केला पुढे मागे मला पण यांच्यासारखे धक्का बुक्की करून मासिक घ्यावे लागतील. पण आज मला फक्त मराठी मासिकं घ्यायची होती. तिकडे चौकशी केल्यावर दुसऱ्या गल्लीत दांगट पेपर वाल्यांकडे मराठी मासिकं मिळतात अस कळलं. हिंदी इंग्रजी मासिक बघत बघत दुसऱ्या गल्लीत पोचलो. या गल्लीत कमी विक्रेते होते. दांगट पेपर वाल्यांचं छोटसं दुकान, पानाच्या टपरी एवढं. एवढूश्या दुकानात भरपूर मराठी मासिकं रचून ठेवली होती. विकत घेणारे गर्दी करून उभे होते. इथे मात्र मला जास्त मराठी माणसे मासिके विकत घेताना दिसले. जास्त करून लायब्ररीवाले असतील. मी आणलेली चिठ्ठी पुढे केली तर ते बोलले वाचायला मला वेळ नाही तुम्ही नवीन आहात का? पटकन वाचून सांगा कुठले मासिक किती किती हवेत? ते सर्व मासिक नाहीत जेवढे आहेत तेवढे देईन. यादीतली काही मासिकं त्यांनी दिली मासिकांवर २५ टक्के सवलत होती. दहा तारीखेच्या आत आलात तर सर्व मासिक मिळतील कृपया सुट्टे द्यावेत काउंटर वर मासिक मोजून घ्यावेत कमी जास्त आलेत तर आम्ही जबाबदार नाही असं बोर्डवर लिहलं होतं. मी अंक मोजून घेतले तीनशे रुपयेच्या आसपास बिल झालं मी पैसे चुकते केले. त्यांच्या बाजूलाच जिन्याखाली लोकप्रभा, चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ असे तीन साप्ताहिक ठेवली होती. प्रत्येकी एक प्रत घेऊन मार्केट मधून बाहेर पडलो. या पुढे यांच्याशीच मला व्यवहार करायचा होता. कॅपिटल सिनेमाच्या बाजूला वडा पाव वाला होता. समोरच कॅनन पावभाजीच दुकान दिसल पण पावभाजीचे पाच रुपये होते. भूक लागली होती गपचूप एक रुपयाचा वडा पाव घेऊन खाल्ला आणि परत स्टेशनवर पोचलो फास्ट लोकलने डोंबिवलीला निघालो.

      मुंबईहून माहेर, मेनका, गृहलक्ष्मी, अहेर, अलका, प्रपंच, अनुराधा, चंदेरी, स्त्री असे काही मासिके मी घेऊन आलो. त्या दिवसापासून लायब्ररीमध्ये मासिकाची सुरुवात केली. याच दरम्यान मी लायब्ररीत नवीन स्टाफ नेमला. त्या आलेल्या नवीन स्टाफ आधी परळमध्ये राहायच्या तिकडच्या एका वाचनालयात त्यांनी चार पाच वर्षे काम केले होते. त्या नेहमी तिकडच्या वाचनालयाबद्दल बोलायच्या. आपण दिवाळी अंकांना सुरुवात करूया. आमच्याकडे दिवाळीला एक आठवडा असतानाच फटाके वाजवून आम्ही दिवाळी अंकांची सुरुवात करायचो. वाचनालया समोर फटाके वाजले की वाचकांना समजायचं की दिवाळी अंकांची सुरुवात झाली. वाचक फक्त दिवाळी अंकासाठी वाचनालयात गर्दी करायचे असं त्यांनी सांगितले. चांगली कल्पना आहे. आपण पण सुरुवात करायला हरकत नाही. दिवाळीला अजून दोन महिने होते. मी दर सोमवारी मासिकं आणायला मार्केटला जायचो.
मार्केट मध्ये समजलं की दिवाळी अंक ठाण्याला बागवे अँड कंपनी यांच्याकडे पंधरा दिवस आधीपासून यायला सुरू होतात. एक दिवस मी ठाण्याला अंकांची चौकशी करायला निघालो. ठाण्यात पश्चिमेला स्टेशनच्या जवळच नवापाडा येथे बागवे यांचं छोटसं दुकान होतं. दिवाळी अंकांची चौकशी केली. तिकडच्या काकांनी विचारपूस केली. कुठून आलात? किती अंक घेणार? पैसे रोख लागतील उधारी नाय चालणार, अंक परत घेतले जाणार नाहीत, पाहिजे तेवढेच अंक घ्या, समोर यादीत बघून अंक सांगायचे, दहा अंकांपर्यंत सूट नाही दहाच्या वर अंक असतील तर दहा टक्के सूट पन्नास अंकापेक्षा जास्त घेतलं तर २५ टक्के सूट, अंक दसरा पासून यायला सुरुवात होईल. तिकडचे काका जाम कडक होते. त्यांच्या कडून दिवाळी अंकांची यादी घेतली तर त्यांनी माझ्याकडून यादीचे ५० पैसे घेतले. तिकडचे नियम व अटी ऐकून मी विचार करायला लागलो वाचनालय चालवणं खरच कठीण आहे!!! जुन्या लोकांना यांची सवय झाली असेल माझ्या सारख्या नावख्याच काम नाही.

दसऱ्याच्या दिवशी सामनाचा पहिला दसरा-दिवाळी विशेषांक आला.
त्यादिवसा पासून दिवाळी अंकांची सुरुवात झाली.मला दिवाळी अंक नवीनच होते.नेहमीचे मासिकं आणायचो.ठाण्याहून आणलेल्या यादीत पुष्कळ दिवाळी अंकांची नावे होती.त्यात वाचक कुठले अंक वाचतात ?आपण कुठले आणायचे? याच चांगलं नियोजन करायचं होतं.
त्यासाठी भांडवल पण जास्त लागणार.फक्त दिवाळी अंकांसाठी बरेचसे वाचक नाव नोंदवतील याची मला खात्री होती.विनोदी,कथा,लेख,
स्वयंपाक,मुलांचे गूढ रहस्य कथा, वैचारिक असे वेगवेगळ्या अंकांची निवड केली.प्रत्येकी एक एक प्रत घेऊन आलो.दिवाळी सणाच्या आठ दिवस आधी अंक सभासदांना द्यायला सुरुवात करायची असं ठरल.आवाज, किशोर,किस्त्रीम,अहेर,अलका,विचित्र विश्व.असे तीस एक अंक जमा झाले.पाच नोव्हेंबरला दिवाळी होती ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन हजारांची फटाक्यांची माळ वाजवून धुमधडाक्यात दिवाळी अंक द्यायला आम्ही सुरुवात केली.....

Friday, June 19, 2020

मैने प्यार किया.....

सुमनचा स्वभाव मला खूप आवडायचा. तसं मी मुलींपासून खूप लांब असायचो. पहिल्यांदा सुमन बरोबर मुंबई फिरून आलो. सुमन काही दिवस आमच्याकडे राहणार असं कळल्यावर मला खूप आनंद झाला. रोज रात्री इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचो. एक दिवस भायखळा येथील राणीच्या बागेत फिरायला जायचं ठरलं. आमच्या बरोबर कविता आणि तिचा नवरा वेणू पण येणार होते. आम्ही चौघे भायखळाला निघालो. स्टेशनवर उतरून चालत गप्पा मारता मारता राणीच्या बागेत पोचलो. वेणूने पुढे जाऊन चौघांचे तिकिट काढले.आम्ही बागेत फिरायला सुरुवात केली. मी तर थोडावेळ स्वतःला विसरून तिकडच्या प्राणी बरोबर मिसळून गेलो. मला प्राणी म्हणजे जीव की प्राण. ते काय खातात? कसे उडया मारतात?ते कसे चालतात? आम्हाला बघून त्यांना काय वाटत असेल? याचा मी विचार करत होतो. आमच्या बरोबर सुमन पण बागेत चांगली रमली. तिच घरं डोंगरावर असल्या कारणाने तिला तसं प्राणी, पक्षी आणि झाडे नेहमीचेच!! जवळपास दोन तास फिरल्यानंतर आम्ही तिकडून निघालो. जसं आम्ही राणीच्या बागेतून निघालो पावसाला सुरुवात झाली. याच्या आधी मी आणि सुमन मुंबई फिरायला गेलो होतो तेव्हा पाऊस नव्हता. जून महिना म्हणजे पाऊस येणारच होता. आमच्याकडे दोन छत्र्या होत्या. पाऊस जोरात यायला लागला. एका छत्रीत कविता आणि वेणू तर दुसऱ्या छत्रीत मी आणि सुमन. छत्री छोटी त्यात पावसाचा वेग वाढल्यामुळे माझा एक हात पावसात पूर्णपणे भिजला. कसबस आम्ही भायखळा स्टेशन गाठलं. भिजल्यामुळे मला थोडीसी थंडी वाजत होती. गाडी पकडून डोंबिवलीत पोचलो.

        पावसात भिजल्यामुळे दुसऱ्या दिवशी मला ताप भरला. कधीच सुट्टी न घेणारा मी एक अखा दिवस अंथरुण पकडलं. त्यावेळी सुमनने दिवसभर माझी देखभाल केली. ताप जास्त होता डॉक्टर कडून औषध आणली. वेळेवर औषध द्यायचं, सकाळचा नास्ता, दुपारच जेवण,ताप तपासणे सर्वीकडे सुमनने माझी काळजी घेतली. तिला फिरवायला नेलं आणि मला ताप आला म्हणून याच तिला वाईट वाटलं. नेहमी हसत खेळत असणारी सुमन आज शांत शांत वाटत होती. दुसऱ्या दिवशी माझा ताप उतरला. पण त्यादिवशी सुमनला ताप आला डॉक्टर कडून तिच्यासाठी मी औषध आणलं. आता तिला ताप आल्यामुळे मला वाईट वाटायला लागलं. मी तिला फिरायला नेलं नेमका पाऊस आला दोघे भिजलो माझ्यामुळे हे सर्व घडलं. मला वाटत हा सर्व नियतीचा खेळ असेल. अजून एक दिवस मी घरीच आराम केला तिसऱ्या दिवशी परत कामाला लागलो. सुमनच मात्र मला खूप कौतुक वाटलं कुठे पाहुणी म्हणून आली मी आजारी पडलो आणि माझी सेवा करायला लागली. दुसऱ्या दिवशी ती स्वतः आजारी पडली!! काही दिवसांनी सुमन गावाला निघून गेली. ती असताना हसत खेळत कसे दिवस निघून गेले ते मला कळलेच नाही. पण ती निघून गावाला गेल्यावर मला मात्र काहीतरी चुकल्या चुकल्या सारख वाटायला लागलं. सारख तीच बोलणं आम्ही मुंबई फिरायला गेलेलो नंतर राणीच्या बागेत गेलेलो, छत्री असून सुद्धा पावसात भिजलेला तो क्षण. जेव्हा घरचं काम संपल्यावर सुमन दुकानात यायची मग मी तिला लायब्ररीत घेऊन जायचो. तिला मराठी येत नव्हतं आम्ही काय बोलायचो हे तिला नाही कळायचं तरी पण समजून घेण्याचा ती प्रयत्न करायची. मी आजारी पडल्यावर तिने जी माझी सेवा केली होती माझ्या बाजूला बसलेली ताप उतरण्यासाठी तिने घेतलेली काळजी. ती आजारी पडल्यावर मला वाईट वाटलेलं सर्व माझ्या डोळ्यांसमोर दिसायला लागलं. माझ्या सख्या बहिणीची मुलगी म्हणजे माझी भाची. पण न कळत मी सुमनच्या प्रेमात पडलो!!!

     माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नाचा विचार केला नसेल कदाचित. किंवा ते माझ्यापर्यंत आलं नसेल. तेव्हा मी २६ वर्षांचा होतो. एक दोन वर्षात माझं लग्न झालंच असतं. माझ्या कामाच्या व्यापामुळे मी लग्नाचा विचारच नाही केला. मी प्रत्येक गोष्टीत घरच्यांवर अवलंबून होतो. निर्णय घेणारे अण्णांच. अण्णांच्या निर्णयाला आई, वहिनी, भाऊ बहिणींचा होकार असायचा. अण्णा मला वडीलांसारखे. वडील वारल्यापासून आमचं अखं कुटुंब अण्णांनी सांभाळल. त्यामुळे निर्णय सर्व अण्णांचेच. माझ्या मेहनतीमुळे घरात मी सर्वांचा लाडका.मी जे काही व्यवसाय सुरू केले प्रत्येकाला घरच्यांचा पाठिंबा असायचा. जे काही करशील नीट विचार करून कर एवढच ते मला सांगायचे. समाजसेवा कमी करून व्यवसायाकडे लक्ष्य द्यायला सांगायचे. मला सुमन विषयी त्यांच्याशी बोलायचं होतं. कसं बोलायचं? समजत नव्हतं. मी सुमनच्या प्रेमात पडलो हे ठीक आहे पण तिच्या मनात माझ्या विषयी काय असेल? तिला विचारायचं तिचे विचार जाणून मगच घरच्यांना सांगायचं असा मी विचार केला.

     सुमनच घर डोंगरावर होतं. काही समान आणायचं झालं तर घरच्यांना तीन किलोमीटरवर डोंगर उतरून चालत खालच्या गावात जावं लागायचं. पोस्टमन पत्र एका दुकानात ठेवायचा. रोज घरातून कोणीतरी खाली यायचे समान घ्यायला त्याबरोबर पत्र रोजचा पेपर आणि काही मासिक घेऊन जायचे. मला कुठल्याही परिस्थितीत आमचं प्रेमप्रकरण घरी कळून द्यायचं नव्हतं. मी सुमनला पहिलं साधं पत्र लिहलं. खाली मित्राचा पत्ता लिहला. पुढचे पत्र व्यवहार या पत्त्यावर करावे आणि एखाद्या मैत्रिणीचा पत्ता पाठवयाला सांगितले जेणे करून मी त्या पत्त्यावर पत्र पाठवू शकलो असतो. तिच्या पत्राची वाट बघत होतो. दहा दिवसांनी सुमनच पत्र आलं. पत्रात तिच्या मैत्रिणीचा पत्ता पाठवला होता. सुमन टायपिंग क्लासला जात होती तिथल्या मैत्रिणीचा पत्ता होता मैत्रिणीचे बाबा पोलीसमध्ये होते. पत्रात काय लिहायचे? याचा विचार मी करत होतो. मैत्रिणीचा पत्ता दिला याचा अर्थ कुठेतरी तिच्या मनात माझ्यासाठी जागा होती. मलाच पुढाकार घ्यायचा होता. खूप विचार करून माझं तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. तुझ्याकडून होकार असेल तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम असेल तर आपण पुढचा विचार करूया असं पत्र लिहून तिच्या मैत्रिणीच्या पत्त्यावर पाठवल. आता तिच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो. एक मात्र होतं माझं कुठेच मन लागत नव्हतं. तिची प्रतिक्रिया काय असेल आणि पुढे काय याचा विचार करण्यात दिवस जात होते.

     दुकानात असतांना मला वेळ मिळायचं नाही पण लायब्ररीत गेलो की प्लॅस्टिक मशीनवर काम करत असताना सुमनच्या प्रेमात पडल्याच जाणवत होतं. माझ्याकडे एक तुटका फुटका टेप रेकॉर्डर होता तो अधून मधून बंध पडायचा. त्याला जोरात मारलं की तो परत चालायचा. तीन चित्रपटाची गाणी मी सतत ऐकायचो. त्या काळात "मैने प्यार किया" चित्रपट खूप चालला त्यामधील सर्व गाणी लोकप्रिय झाली होती.त्याच बरोबरीने आमिर खान चा "दिल", राहुल रॉय ची "आशिकी' असे एकसे एक चित्रपट गाजले होते. या तिन्ही चित्रपटाचे गाणी पण लोकप्रिय झाली. "मैने प्यार किया" चित्रपट मला खूप आवडला. व्हिडीओ कॅससेट्स आणून बरेच वेळा हा चित्रपट मी पहिला. त्यात नायिकेचे नाव पण "सुमन" होतं!! चित्रपटयाची गोष्ट सुरुवातीला जवळपास आमच्या सारखीच होती. इकडे गावावरून सुमन आमच्याकडे राहायला आली आणि  चित्रपटात नायिकेचे वडील नायिकेला नायकाचा घरी काही दिवसांसाठी राहायला सोडून जातात. चित्रपटातील सर्व गाणी मला पाठ झाली. काही दिवसात मित्राच्या घरी सुमनच पत्र आलं. पत्र उघडून वाचायला लागलो पत्र वाचता वाचता डोळ्यांसमोर सुमन दिसत होती जसं काय तीच माझ्यासमोर बोलतीये. पत्रात सुमनचा होकार होता ती पण माझ्या प्रेमात पडली होती......

Wednesday, June 17, 2020

एल.आय.सी.एजन्सी घेतली,(४४९ ९१जी) रात्री १२.३० वाजता विमा पॉलिसी उतरवली....

डोंगरे साहेब महिन्यातून एकदा तरी आमच्या दुकानात काही कागदपत्रे घेऊन यायचे. आले की वेंकटेश अण्णाला विचारायचे.कुठे गेलाय? कधी येणार? त्यांनी काही कागदपत्रे किंवा चेक देऊन ठेवलंय का?वगैरे विचारायचे. मला नेहमी प्रश्न पडायचा की डोंगरे साहेब का येत असतील? वेंकटेश अण्णा आणि हे काय कामं करत असतील? डोंगरे साहेब उंचीला कमी तोंडात नेहमी पान, डोळ्यांना चष्मा, चांगले कपडे घालून जेटलमन दिसायचे. ते कधी कधी गाडी पण घेऊन यायचे. मला ते पुंडलिका म्हणून हाक मारायचे. डोंगरे साहेब डोंबिवलीतल्या जीवन आयुर्विमा मंडळात अधिकारी असल्याचे मला समजले. वेंकटेश अण्णा एल आय सी चे एजंट म्हणून डोंगरे साहेबांबरोबर काम करायचा. माझा भाऊ वेंकटेश अण्णा जोगेश्वरीला इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करत असल्यामुळे त्याला वेळ मिळत नव्हता. एके दिवशी डोंगरे साहेबांनी वेंकटेश अण्णा ची एजन्सी तू घेशील का? असं मला विचारलं. माझ्याजवळ खूप कामे होती. दुकान सांभाळायचं त्यात लायब्ररी, फ्रेंड्स प्लॅस्टिकस या सर्व व्यापामुळे मला वेळ मिळत नव्हता. तरी पण त्यांना विचार करून कळवतो अस सांगितल.


        भारतीय आयुर्विमा म्हणजेच "एल आय सी'एजंट बनायचं सोपं पण दरवर्षी टार्गेट पूर्ण करायचं कठीण असत असं मी ऐकलं होतं. प्रत्येकाने विमा उतरवला पाहिजे जेणे करून घरच्या लोकांना संरक्षण मिळणे शक्य होतं. आपल्याकडे कितीही पैसे आले तरी खर्चाला मार्ग खूप पण त्यातले थोडे पैसे बाजूला काढून ठेवले की पुढे हेच पैसे व्याजा सकट आपल्याला वापरायला मिळणार हाच खरा विमाचा उपयोग. त्यात पॉलिसी धारकाला काही बरे वाईट झाले तर घरच्यांना एक रकमी पैसे मिळणार म्हणजे सेविंग बरोबर फॅमिली प्रोटेक्शन हा एल आय सी चा उद्देश. पण एल आय सी एजंट हे आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी लोकांच्या मागे लागायचे ज्यामुळे लोक एल आय सी एजंट दिसला की रस्ता बदलायचे त्यांच्याशी बोलणंही टाळायचे कधी हा पॉलिसी गळ्यात मारेल याची भीती वाटायची लोकांना. त्यामुळे लोक एल आय सी एजंटना टाळायचे. मी खूप विचार करून एल आय सी एजंट बनायचं ठरवलं.

      डोंगरे साहेबांनी मला एल. आय. सी. (L.I.C.) ऑफिसला बोलावलं. आधी ऑफिस रामनगरला होतं. आता पेंढरकर कॉलेजच्या पुढे स्वतंत्र जागा घेऊन ऑफिस तिकडे हलवलं होतं. मी डोंगरे साहेबाना भेटायला ऑफिस वर गेलो. ऑफिसची जागा तशी मोठी होती. तिथे बरेच लोक काम करत होते. एका बाजूला कॅश काउंटर मागच्या बाजूला सर्व अधिकाऱ्यांना बसण्यासाठी टेबल होते. मी आत गेलो आणि डोंगरे साहेब कुठे आहेत विचारलं. साहेब अजून यायचे होते. तिकडच्या कर्मचाऱ्यांनी मला बसायला सांगितले. मी ऑफिसवर नजर फिरवली. एका फलकांवर बरीचशी नावं लिहलेली होती त्यात डी. डी. देशपांडे यांचं नाव होतं. तेवढ्यात डोंगरे साहेब आले. माझं साहेबांकडे लक्ष होतं.त्यांचा स्वभाव वेगळाच, आल्याबरोबर सर्वांशी काय? कस काय? असं सर्वांशी गप्पा मारत आत आले. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. कोणाकडून कसं काम करून घ्यायचे ते त्यांच्या कडून शिकायला पाहिजे. मला त्यांनी सर्वांशी ओळख करून दिली. तसे सर्व अधिकारी त्यांचे प्रतिस्पर्धी होते तरी पण सर्वांशी हसत खेळत ते काम करायचे. मला बसायला सांगितले आणि दोन कटिंग चहा ची ऑर्डर दिली. थोडेसे इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या मग त्यांनी सांगितलं एजन्सी घ्यायचं असेल तर परीक्षा द्यावी लागेल. मी माझी तयारी दाखवली. डोंगरे साहेबांनी परीक्षेच्या तयारीला लागायला सांगितले आणि पहिली पॉलिसी तयार ठेवायला सांगितले.

     डोंगरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षेची तयारी केली. एल. आय. सी. च्या ऑफिसमध्ये परीक्षा घेतली गेली ब्रँच मधील बरेचसे अधिकारी उपस्थित होते. काही दिवसात मला कळलं की मी परीक्षेत उत्तीर्ण झालो मला एल आय सी ची एजन्सी मिळाली. डोंबिवलीत एजन्सी असल्या कारणाने माझा एजंट नंबर ४४९९१G असा होता. पुढे सर्व व्यवहारात हा नंबर वापरायचा असं सांगितलं गेलं. पहिली पॉलिसी मी अण्णांची दहा हजाराची काढली नंतर माझी अजून काही मित्रांच्या पॉलिसी काढल्या. मला जसं वेळ मिळेल तसं मी ऑफिसला जात होतो. डोंगरे साहेबांकडून शिकण्यासारखे खूप होत. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळीच. ते मला नेहमी म्हणायचे तुझे एवढी माणसे ओळखीची आहेत, आज प्रत्येकाला जीवन विमाचे गरज आहे तू जर त्यांना समजावून सांगून पॉलिसी दिली तर आज न उद्या ते सर्व लोकं तुझं कौतुक करतील मात्र तुला यासाठी वेळ द्यावा लागेल. पॉलिसी असे पटकन कोण घेत नाही, प्रत्येकाचे कोण न कोणतरी विमा एजंट ओळखीचा निघतो. तुझ्याकडे कोण येणार? तुला यासाठी खूप मेहनत करावी लागेल. बाकीच्या व्यवसायापेक्षा यात जास्त पैसे मिळू शकतील!!!

     मी जो पर्यंत एल. आय. सी. ऑफिस मध्ये होतो तो पर्यंत मनात विमाचा विचार असायचा तिकडून निघालो की बाकीच्या कामामुळे विम्याचे विचार डोक्यातून निघून जायचे. दुकानात आलो की दुकानाची कामे, लायब्ररीत गेलो की लायब्ररीची कामे त्यातच दिवस जायचा. एके दिवशी दुपारी दुकानात बसून विमासाठी ज्यांना भेटायला जायचय अशा लोकांची जे माझे खास ओळखीचे होते त्यांची यादी बनवली. यादीतल्या सर्वांना एक एक करून भेटायचा विचार केला. यादीत पहिलं नाव नाईक अंकल यांचं होतं. ते लायब्ररीच्या समोरच मेघदूत बिल्डिंगमध्ये राहायचे आणि कामाला टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वितरण विभागात मोठ्या पदावर होते. माझी त्यांच्याशी खूप जुनी ओळख होती. त्यांची बायको डॉक्टर श्रीमती तारा नाईक या डोंबिवलीतील सुप्रसिद्द स्त्री रोग तज्ञ होत्या. त्या लायब्ररीच्या सभासद होत्या त्यांनी बरीचशी पुस्तके आपल्या लायब्ररीला भेट म्हणून दिलेली. अंकल आणि डॉक्टर दोघे एकत्र भेटणं म्हणजे खूप कठीण. तरी मी एकदा त्यांच्या घरी गेलो आणि एल आय सी एजन्सी घेतल्याचे सांगितले. त्यांनी विम्याची सविस्तर माहिती विचारली मी नवीनच असल्या कारणाने मला काहीच माहीत नव्हत. त्याच्या काही प्रश्नांनी माझी तारांबळ उडाली. कशी बशी त्यांची समजूत घातली आणि पुढच्या वेळी माझ्या अधिकाऱ्यांना घेऊन येतो सांगून त्यांच्या घरून निघालो. घडलेली घटना सर्व जशीच्या तशी डोंगरे साहेबाना सांगितली. परत ते कधी भेटू शकतील मी येतो तुझ्या बरोबर त्यांच्याकडे असे ते बोलले. मला थोडासा धीर आला.एके दिवशी रात्री भेटायच ठरलं. नाईक अंकल रोज दहाच्या सुमारास घरी यायचे ते आले की कळवतो अस सांगून मी लायब्ररीत त्यांची वाट बघत थांबलो. अकरा वाजले तरी अंकल आले नाहीत काय करायचं कळत नव्हतं डोंगरे साहेब बोलले होते किती उशीर झाला तरी चालेल आज त्यांना भेटायचंच. त्यादिवशी अंकलना यायला पावणे बारा वाजले मी लायब्ररीतच होतो समोरच त्यांचं घर असल्या कारणाने ते घरी जाताना दिसले मी त्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या आम्ही थोड्या वेळात येतो. मला त्यांच्या नकाराची भीती होती. पण ते माझी जिद्ध बघून चालेल या अस बोलले. माझ्या जिवात जीव आला. मी डोंगरे साहेबाना बोलवून घेतलं. अंकलच जेवण झाल्यावर आम्ही त्यांचा घरी गेलो. डोंगरे साहेबांनी त्यांना वेगवेगळ्या प्लॅन्स समजावून सांगितले. मला वाटत अंकल ने आधीच प्लॅन ठरवले होते, फक्त हप्ते किती येतात ते विचारलं आणि त्यांनी त्यांची मुलगी सुषमा साठी  अंडउमेन्ट प्लॅन त्यांच्या दोघांसाठी जीवनसाथी हा प्लॅन घेतला!!! सर्व कागदपत्र सही करून चेक घेऊन निघेपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजले असतील. फक्त आणि फक्त चिकाटी मुळेच त्याकाळी एका मोठ्या रकमेची मी पॉलिसी उतरवू शकलो......

Monday, June 15, 2020

जून महिन्यात(१९९१) वृक्षारोपण आणि सुमन बरोबर मुंबई दर्शन....

"फ्रेंड्स लायब्ररी" बरोबर "फ्रेंड्स प्लॅस्टिकस" आणि दुकानही मी सांभाळत होतो. त्यातल्या त्यात मला दुकानात जास्त वेळ द्यावा लागायचा. जून महिना आला की माझी खूप धावपळ व्ह्याची. जरी अण्णा आणि पांडुरंग अण्णाने खरेदीची जबाबदारी घेतली असली तरी दुकान मलाच सांभाळायला लागायचं. कुठल्या वस्तू संपल्यात कोणाची कुठल्या पुस्तकांची मागणी आहे, कुठलं पुस्तक देणे बाकी आहे सर्व ठिकाणी मलाच लक्ष्य द्यावं लागायचं. लायब्ररीमध्ये ललिता नावाची नवीन मुलीला स्टाफ म्हणून कामाला ठेवली. कविताच लग्न होऊन ती तिच्या नवऱ्याच्या व्यवसायात मदत करायला लागली. प्लॅस्टिक मशीनच काम बबलू बघायचा, जास्त ऑर्डर असले तर रात्री दुकान बंद केल्यावर दहा ते बारा वाजेपर्यंत मी बसायचो आणि ऑर्डर पूर्ण करूनच घरी जायचो. या दरम्यान व्यापारी संघटनेची आणि युथ असोसिएशनची मीटिंगस असायच्या. तिकडे पण लक्ष द्यावं लागायचं.

             लहानपणा पासूनच मला झाडं खूप आवडायची. झाडांवर चढायचो आणि फळे काढायचो झाडांबरोबरच माझं बालपण मी जगलो म्हणायला हरकत नाही. झाडे लावायची त्यांना पाणी घालायचं हा माझा छंद. एप्रिल, मे मधल्या तापत्या उन्हात याच झाडांनी मला आश्रय दिला. जोरात पाऊस पडत असताना याच झाडाखाली मी उभा राहिलो. गावाच्या तुलनेत डोंबिवलीत खूप कमी झाडं दिसायची. मला खूप वाटायचं आपण पण भरपूर झाडं लावायला हवीत. आता युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली संघटना माझ्या बरोबर होती. डोंबिवली नगरपालिकेत गेलो झाडांची चौकशी केली. तिथल्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या नावाने पत्र द्यायला सांगितले. संघटनेचं पत्र त्यांना नेऊन दिले. नगरपालिकेकडून तीस एक झाडं मिळाली. गुलमोहर, निलगिरी, आंबा, अशोक आणि वडाची झाडं त्यात होती. रिक्षाने सर्व झाडं लायब्ररीत आणून ठेवली. झाडं लावण्यासाठी "डोंबिवलीत हरित क्रांती" असा एक अनोखा उपक्रम राबविला. प्रमोद शानभाग, प्रवीण, विष्णू, शैलेंद्र असे काही मित्र आणि युथ असोसिएशनचे सभासदांनी या उपक्रमाला मदत केली. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली, आम्ही सर्वजण रविवारी सकाळी सातच्या सुमारे लायब्ररीच्या इथे जमलो. टिळकनगर शाळेचा रस्ता आणि डॉक्टर राजेंद्रप्रसाद रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर नीट खड्डे खणून आणलेली लाल माती वापरून सर्व तीस झाडे लावली. सर्व झाडे लावे पर्यंत दहा वाजले. पुढे सर्व झाडे जगविण्याची जबाबदरीही आम्ही सर्वांनी घेतली.

        झाडे लावण्याच्या उपाक्रमाला दोन तीन दिवस झाले असतील नेहमी प्रमाणे मी एक वाजता जेवायला घरी गेलो. जून महिन्यात दुकानात पुष्कळ गर्दी असल्यामुळे घरी जास्त वेळ मी थांबत नव्हतो. घरी यायचो हात पाय धुतले तर धुतले नाहीतर नाही सरळ जेवायला बसायचो आणि पटकन जेवून परत दुकानाकडे निघायचो. त्यादिवशी जेव्हा मी घरी गेलो तर माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी "सुमन" गावावरून आली होती. इंदिरा माझी सर्वात मोठी बहीण. माझ्या जन्माच्या आधीच तिचं लग्न झालं. तिला आम्ही इंदिरा अक्का म्हणायचो. अक्का ला दोन मुली आणि तीन मुलं. सर्वात मोठ्या मुलीचं नाव प्रतिमा. ती दोन वर्षांपूर्वीच मुंबईत येऊन गेलेली. तिच्या नंतर प्रेमानंद जो आमच्याकडे काही वर्षापूर्वी राहायला आलेला, तिसरी मुलगी सुमन तिच्या नंतर दोन मुलं सुखानंद आणि सत्यानंद. वेंकटेश अण्णा आणि वहिनी गावाला गेले होते. येताना ते त्यांच्या बरोबर "सुमन"ला घेऊन आले. घरच्या कामाच्या व्यापामुळे ती सहजासह घरा बाहेर पडायचची नाही. जवळपास तेरा वर्षानंतर मी तिला आज बघितलं. आम्ही जेव्हा आमचं गावं कुंदापूर सोडलं तेव्हा ती कुंदापूरला आलेली तेव्हा ती दहा वर्षाची असेल. त्यानंतर तिला मी आज पाहत होतो. अण्णा गावाला नेहमी जायचे. अक्काच्या घरी गेले की ते "सुमन"चा कामाचे खूप कौतुक करायचे. अक्काच घर खूप मोठं, माणसं पण जास्ती त्यामुळे कामे खूप असायची. अक्का आजारी पडली की घराचं काम सुमन एकटीच सांभाळायची. मी घरात गेलो तेव्हा सुमन आतमध्ये स्वयंपाकघरात काम करत होती. ती कमी बोलायची आणि काम जास्त करायची. मी पण तेव्हा मुलींशी कमी बोलायचो. आईने विचारलं सुमन शी बोललास की नाही? तरी पण मी जास्तवेळ थांबलो नाही सुमनशी दोन शब्द बोललो आणि लगेच दुकानाकडे निघालो.

        त्यादिवशी रात्री जेवण झाल्यावर थोडावेळ गप्पा मारत बसलो. त्यात अण्णांची मुलं संदेश आणि संकेत मस्ती करत असल्यामुळे जास्त काही बोलता आलं नाही. संदेश थोडा शांत स्वभावाचा पण संकेत खूप मस्ती करायचा. एक मिनिट एका जागेवर बसायचा नाही. मी दोघांचेही खूप लाड करायचो. जून महिना असल्या कारणाने मला सुमनसाठी जास्त वेळ देता आला नाही. अजूनही काही दिवस ती आमच्याकडे राहणार असल्याचे समजल्यावर मला बरं वाटलं. घरातली कामं झाल्यावर सुमन दुकानात यायची. मग गर्दी कमी झाल्यावर तिला लायब्ररीत घेऊन जायचो... चार पाच दिवसांनी दुकानातली गर्दी कमी झाली. मी घरच्यांना सुमनला मुंबई फिरवून आणायचं सांगितलं. अण्णांनी होकार दिला आणि घेऊन जायला सांगितले. सोमवारी मुंबई फिरायला जायचं ठरलं.

            सकाळी ट्रेनला खूप गर्दी असल्याने अकरा वाजता निघायचा विचार केला. फास्ट लोकलने V.T. स्टेशनला निघालो. सव्वा तासात मुंबईत पोचलो. कुठे कुठे जायचं ते मी आधीच ठरवलेलं. V.T. स्टेशनच्या बाहेरून नरिमन पॉइंटची बस पकडली. जाताना मला जे काही माहीत होतं ते सर्व सुमनला दाखवलं.फ्लोरा फाऊंटन, चर्चगेट, मंत्रालय नंतर शेवटच्या स्टॉप वर उतरलो. सुमनच्या गावात वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ मोठी झाडं होती तर मी तिला मुंबईतल्या मोठमोठ्या इमारती दाखवल्या. तिला हे सर्व नवीन होतं. तिकडून चालत मरिन ड्राईवला आलो. दुपारची वेळ होती. एक बरं होत पाऊस नव्हता. मरिन ड्राईव्हचे ते दगडं, समोर अरबी समुद्र हे सर्व दृश्य दिसायला खूप सुंदर होत. समोरच असलेलं फिरत हॉटेल "हॉटेल आंबेसेडॉर" दाखवलं. जिथे अमिताभ बच्चनच "नसीब" चित्रपटाचं चित्रीकरण केलेलं. खूप वेळ पायी फिरत असल्याने मरिन ड्राईव्ह वरून बस पकडून फोर्टला आलो. दोघांना जोरात भूक लागलेली फोर्टच्या कामत हॉटेलमध्ये पोट भरून जेवलो ट्रेन पकडून डोंबिवलीला निघालो. मुलीं पासून लांब राहणारा मी आज चक्क सुमन बरोबर मुंबई फिरून घरी परतलो....

Saturday, June 13, 2020

"फ्रेंड्स लायब्ररी" बरोबर (१९९१) मध्ये "फ्रेंड्स प्लॅस्टिक' या नवीन व्यवसायाला सुरुवात....

टिळकनगर मधील फ्रेंड्स लायब्ररी मध्ये माझ्याकडची जागा खूप मोठी पण मी लायब्ररी साठी मात्र त्यातला अर्धा भागच वापरला. माझ्याकडे लायब्ररीमध्ये सहा लोखंडी रॅक होते. त्यातले दोन उजव्या बाजूला, दोन डाव्या बाजूला तर उरलेले दोन समोरच्या बाजूला लायब्ररीच्या मधोमध लावून मागे जागा तयार केली. सहाच्या सहा लोखंडी रॅक पुस्तकांनी भरलेली लायब्ररी छान दिसायची. एका बाजूला कॉलेजची पुस्तके, समोर आणि दुसऱ्या बाजूला मराठी कथा कादंबऱ्या, लेखकाप्रमाणे आणि काही विषयाप्रमाणे पुस्तके आम्ही लावले. त्यामुळे सभासदांना पुस्तक शोधायला सोपं पडायचं. आतल्या भागात "युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली"च्या मीटिंग होत होत्या. जास्त करून रविवारी मीटिंग असायची. पावसाळ्यात झाडे लावणे, नागरिक समस्यांवर व्यंगचित्र स्पर्धा, पूरग्रस्तांना मदत, टिळकनगर मधले इमारतींचे नावाचे फलक असे बरेचसे उपक्रम आम्ही राबविले.


      अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी डोंबिवलीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून अयोध्ये त घेऊन जाण्याकरिता रामशीलाच्या पूजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले. त्यात एका रामशीलचे पूजन आपल्या लायब्ररीमध्ये करण्यात आले. टिळकनगर मधल्या सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर श्रीमती तारा नाईक यांच्या हस्ते रामशिलाचे पूजन करण्यात आले. पूजनासाठी टिळकनगर मधील बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती, संघाचे काही लोकं, टिळकनगरातील सामान्य नागरिक आणि लायब्ररीचे वाचक उपस्थित होते. माझ्यासाठी ही एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती.

        लायब्ररीचा मागचा भाग रिकामा होता त्या जागेचा काहीतरी चांगला उपयोग करायच अस मी  ठरवलं. लायब्ररीत सभासद संख्या कमी असल्यामुळे पाहिजे तेवढं उत्पन्न होत नव्हतं. त्याकाळी बरेचसे वाचनालय चालवणारे लोक जोड व्यवसाय करत होते. उदारणार्थ ज्ञानविकास वाचनालयाचे परांजपे काकांनी परांजपे उद्योग नावाने कंपनी सुरू केली. लादी साफ करण्याचे सामग्री ते तयार करायचे. मी पण विचार केला काहीतरी जोड धंदा सुरू करायचा. माझे जिजाजी ताईचा नवरा डोंबिवलीत एम.आय.डी.सी. मध्ये एका कंपनीत काम करायचे. त्यांच्या कंपनीत प्लॅस्टिक सिलिंगचे मशीन तयार होत होते.जिजाजी मला म्हणायचे तू मशीन घे आणि प्लॅस्टिकचे फोल्डर वगैरे तयार करता येईल त्यात चांगला नफा आहे. तुझ्या जागेचा पूर्णपणे उपयोग होईल. मी विचार केला सुरू करायला काही हरकत नाही. तसेही जिजाजी घरचेच होते मशीनचे पैसे नंतर दिले तरी चालणार होतं. मी मशीन घ्यायचं ठरवलं आणि त्यांना ऑर्डर दिली.मला वाटत १९९१ साली एप्रिल महिन्यात मी मशीन घेतली.


        मशीन कशी चालवायची त्याचे पार्टस कुठे मिळतात. त्याला लागणार प्लॅस्टिक कुठे मिळेल? वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक वस्तू बनवण्यासाठी वेगळे डाय लागणार होते ते कोणाकडून बनवून घ्यायचे? असे बरेचसे प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले.पुढचं महत्वाचं म्हणजे ऑर्डर कशी?कुठून मिळवायची. कामत पेन साठी पाउच ची ऑर्डर मिळणार होती अजून फोल्डर बनवून एका पार्टीला द्यायचं होतं. हे सर्व छोट्या ऑर्डर्स होत्या मला मोठ्या प्रमाणात नियमित पणे ऑर्डर्स पाहिजे होत्या. मी विचार केला आधी आपण छोट्या कामा पासून सुरुवात करूया त्यातून शिकायला मिळेल समजा काही नुकसान झालं, एखादी ऑर्डर कॅन्सल झाली किंवा रिजेक्ट झाली तर जास्त नुकसान झालं नसत. आधी सर्व शिकून घ्यायचं ठरवलं. तसे जिजाजी मदतीला होतेच म्हणा. आपण काय काय तयार करु शकतो? याची यादी मी तयार केली. शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी आणि वव्ह्यांना लागणारे प्लॅस्टिक कव्हर, रेल्वे पास कव्हर,पेन ठेवण्या साठी प्लॅस्टिक फोल्डर, फोल्डर फाईल्स व इतर वस्तू बनविणे शक्य होते. तेव्हा पुस्तकांच्या प्लॅस्टिक कव्हर साठी खूप मागणी होती. थोडे दिवसात सर्व शाळा सुरू होणार होत्या. पुस्तकांच्या कव्हर पासून सुरुवात करण्याचं ठरवलं. समजा ऑर्डर कॅन्सल झाली तरी आपल्याच दुकानातून विकता आलं असतं. त्यासाठी लागणार प्लॅस्टिक मस्जिद बंदर ला मिळत होत. जिजाजींनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन प्लॅस्टिकची चौकशी केली सुरुवातीला फक्त एक प्लॅस्टिक रोल मी घेऊन आलो. एक रोल शंभर मीटरचा जवळपास आठ ते दहा किलो वजनाचा असायचा. तेव्हा एका किलो ला चाळीस रुपये इतकी किंमत होती. आता कव्हरच्या साईजची डाय बनवून घ्यायची होती. कंपनीकडून बनवून घेतलं तर खूप महाग मिळायची. जिजाजिंनी सायन पूर्वीकडे राहणारा एका डाय बनवणाऱ्याचा पत्ता दिला. मी त्यांच्या घरी गेलो. सायन पूर्वेकडे स्टेशन जवळच एका चाळीत त्यांच घर. मी सुमारे अकराच्या दरम्यान पोचलो असेन त्याच्या घरी त्यांचा मुलगा अजून अंथरूण पांगरून झोपलेला. ते लोकं सिंधी होते. ते उशिरा झोपायचे आणि उशिरा उठायचे. ते काका वयस्कर होते त्यांना मी डोंबिवलीहून आल्याचे सांगितले आणि दोन डाय बनविण्याची ऑर्डर दिली बरोबर पैसे देऊन आलो. त्यांनी चार दिवसांनी येऊन घेऊन जायला सांगितलं.

           मे महिन्याच्या सुरुवातीला "फ्रेंड्स प्लॅस्टिकस" नावाने नवीन जोड व्यवसायाला मी सुरुवात केली. डोंबिवलीतल्या पुस्तकांच्या दुकानदारांना, शालेय सामग्री पुरवणारा माझा मित्र राजेश मोटा याला मी प्लॅस्टिक कव्हर बनविण्याचे मशीन घेतल्याचे सांगितले. त्याने मला तीन हजार छोटे व दोन हजार मोठे कव्हर्सची ऑर्डर दिली थोडे पैसे ऍडव्हान्स ही दिले. माझा जास्ती वेळ दुकानात जात असल्यामुळे मी जास्त वेळ देऊ शकत नव्हतो. टिळकनगर मधल्या रजत सोसायटीत राहणाऱ्या बबलू नावाच्या एका मित्राला कामाला ठेवल. मी रात्री दुकान बंद करून घरी जाऊन जेवून आल्यावर सुमारे साडे दहा ते बारा वाजेपर्यंत काम करायचो. जवळपास दहा दिवसांनी आम्ही दोघांनी मिळून पहिली ऑर्डर पूर्ण केली!!! मला सर्व मटेरियल इतर खर्च मिळून छोटे कव्हर्स साठ पैसे आणि मोठे कव्हर्स नव्वद पैसेला पडले. दहा पैसे एका कव्हरच्या मागे नफा ठेवून पाच हजार प्लॅस्टिक कव्हर्स राजेश मोटाला पाठवून दिले. फक्त दहा दिवस काम करून पाचशे रुपये कमवले!!! "फ्रेंड्स लायब्ररी" बरोबर "फ्रेंड्स प्लॅस्टिक" या नावाच्या नवीन व्यवसायाला मी सुरुवात केली.....

Thursday, June 11, 2020

सर्व तयारीनिशी बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेतला..

मी चौदावीत असतानाच आम्ही सर्व शिवप्रसाद बिल्डिंग सोडून मंजुनाथ शाळे समोरील प्लाझमा ब्लड बँकेच्या समोरच्या गल्लीत "न्यू अश्विनी" सोसायटीत राहायला गेलो. आमच्या घरासमोरच छोटीसी रहदारी तिथे आम्ही रोज रात्री बॅडमिंटन खेळायचो. खेळायला मीच सुरुवात केली. मग सर्व लोकं खेळायला यायला लागले. जसे लोक खेळायला यायला लागले तसे सर्वांनी पैसे काढून नवीन बॅडमिंटनच नेट घेतलं. गवत उगवलं तर खेळायला अजून मजा येईल म्हणून टाटा पॉवर लेनच्या वनराज ऍग्रो दुकानातून गवताच्या बिया आणल्या. त्या जागेवर बिया टाकून मी रोज सकाळी पाणी मारायचो. बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढलं. ही जाण्या येण्याची रहदारी आहे रोज लोकं गाड्या, सायकली ये जा करत असतात इथे गवत उगवणार नाही. असे लोकं बोलू लागले. तरी पण मी माझा प्रयत्न करतच राहिलो. नगरपालिकेत जाऊन आमच्या इथे लायटीच्या खांब्यावर नवीन दिवे बसवून घेतले. दुकानातून घरी आलो की थोडंसं जेवायचं लगेच बॅडमिंटन खेळायला खाली उतरायचो. एप्रिल महिन्यात आम्ही खेळायला सुरुवात केली खूप मजा यायची. एक तास खेळलो की दमायला व्हायचा. घरी जाऊन अंथरूण टाकलं की कधी झोप लागली समजायचं नाही.

       तसा माझा आवडता खेळ क्रिकेट. मला क्रिकेट खेळण्यापेक्षा बघायला आवडायचं. क्रिकेट खेळताना शरीराला जास्त व्यायाम मिळत नव्हता जेवढं बॅडमिंटन खेळताना मिळायचा. बॅडमिंटन मध्ये दोघे किंवा जास्त म्हणजे चौघे खेळत असल्यामुळे अर्धा तास जरी बॅडमिंटन खेळलो की थकायला व्हायचं. शरीराला भरपूर व्यायाम मिळायचा. त्यामुळे बॅडमिंटन खेळायला मला खूप आवडायचं. बॅडमिंटनमध्ये सर्व्हिस, बॅक स्ट्रोक आणि स्मॅश करायला मला मजा यायची. मी जर नीट अभ्यास केला असता आणि त्याच बरोबर कोच जर मिळाला असता तर मी एक उत्तम बॅडमिंटन खेळाडू बनू शकलो असतो....

       मला माझे मित्र सांगायचे की नॉनव्हेज खाल्याने ताकत वाढते. माझ्या घरी मच्छी अधून मधून आणायचे. आईला मच्छी खूप आवडायची. आई मच्छीचा रस्सा मस्त बनवायची. मी पण खायचो. आमच्या घरी मच्छीचे पदार्थ बनवण्यासाठी वेगळी भांडी असायची. मी अंड्याची भुर्जी आणि ऑम्लेट छानपैकी बनवायचो. पण चिकन, मटण कधीच खाल्लं नव्हतं. माझा मित्र प्रवीणच्या घरी मटण बनवायचे तो सारखा विचारायचा घेऊन येऊ का एकदा खाऊन बघ. त्याला मी एकदा घेऊन यायला सांगितलं. मला वाटत रविवार असेल तो छोट्याश्या डब्यात मटण घेऊन आला. मी दुकानात होतो. तो बोलेला मटणचे तुकडे काजू सारखे लागतात. मी दुकानातले दोन पाव काढले. दुकानात मागे बसून पहिल्यांदा मटण खाल्लं. मला तो मसाला खूप आवडला.... मग मला चिकन खायची इच्छा झाली. माझ्या घराजवळ जानकी हॉटेल पण तिकडे सर्व माझे ओळखीचे असल्यामुळे तिकडे जायचं विचार नव्हता. फडके रोडवर असलेल्या दुर्गा हॉटेलात जायचं ठरवलं. एक दोनदा आत जायचा विचार केला पण हिम्मत नाही झाली. दुर्गा हॉटेल बीअर बार होतं, लोकांना वाटेल की मी ड्रिंक्स घेतो हे मला नको होतं. मला फक्त चिकन खायचं होतं. एके दिवशी मी हिम्मत करून आजू बाजूला पाहिलं ओळखीचं कोण नाही ना? मग हॉटेलात शिरलो. मी थोडासा घाबरलो पहिल्यांदा एकटा बिअर बार मध्ये आलेलो काय मागवायच कळत नव्हतं. वेटरला बोलवलं आणि चिकन डिश विचारलं. चिकनफ्राय, हाफ चिकन हंडी आणि दोन नान मागवलं. असा माझा नॉन व्हेज चा प्रवास सुरु झाला...

       माझ्या मित्रांकडून डोंबिवली पश्चिमेला बॅडमिंटन स्पर्धा आयोजन होणार असल्याचे समजले. डोंबिवली पश्चिमेला बावन चाळीत एक बॅडमिंटन कोर्ट होतं तिकडे स्पर्धच आयोजन करण्यात येणार असल्याचे समजलं. प्रवेश शुल्क पाच रुपये आणि स्पर्धा जिंकलो तर एकशे अकरा रुपये मिळणार!! मला स्पर्धेत भाग घ्यायचं होतं बक्षिसाच मी विचारच केला नव्हता. तेव्हा माझ्याकडे बजाज कंपनीची लाल रंगाची एम फिफ्टी जुनी गाडी होती. एका मित्रांकडून तीनशे रूपयेला जुनी गाडी विकत घेतली होती. त्याला दिलेल्या पैसापेक्षा जास्त खर्च मी त्या गाडीच्या दुरूस्तीवर केला. सकाळी गाडी घेऊन पलीकडे नाव नोंदवायला निघालो. सारस्वत कॉलनी वरून पुढे एक छोटासा ब्रिज होता त्या ब्रिज वरून एकच गाडी जाऊ किंवा येऊ शकत होती. बाकी माणसं ये जा करायचे. त्याच ब्रिजने पलीकडे गेलो. ब्रिज उतरल्याबरोबर समोरच बावन चाळ परिसर छोटी छोटी चाळी होत्या तिकडे विचारपूस केल्यावर समजलं जवळच एक मंदिराच्या बाजूला बॅडमिंटन कोर्ट आहे. गाडी बाहेर ठेवून आत गेलो. जागा मोठी आणि प्रशस्त, तशी खूप जुनी पण स्वछ. तिथे काही मुलं अभ्यास करत होते. चौकशी केली फॉर्म भरला त्या बरोबर पैसे देऊन स्पर्धेसाठी माझं नाव नोंदवलं.

       जास्ती जास्त सराव करायला लागणार होता. नेहमी आवड म्हणून खेळत होतो आता स्पर्धेत भाग घेतला होता जिंकण्यासाठी. सरावाला सुरुवात केली. शाळेला सुट्टी असल्या कारणाने दुकानात गर्दी कमी होती. घरी लवकर येऊन जेवण करून रोज सुमारे एक ते दीड तास प्रॅक्टिस करायला लागलो. फिटनेस साठी पेंडसे नगरला कानविंदे व्यायाम शाळेत जायला सुरुवात केली. सरानी आधी एक महिन्यासाठी पैसे भरायला सांगितले. लोक तीन तीन महिन्याचे पैसे भरतात फक्त दहा पंधरा दिवस येतात पुढे व्यायाम शाळेकडे फिरकत पण नाहीत. फुकटचे पैसे वाया घालवतात. सुरुवातीला जोश असतो पण थोडे दिवसांनी अंग दुखायला लागले की सकाळी उठायचा कंटाळा करतात. मी त्यांचं ऐकलं नाही सरळ तीन महिन्याचे पैसे भरले. रोज पहाटे ६ वाजता व्यायाम शाळेत जायला सुरुवात केली. दिवसभर काम करत असल्याने अंगदुखी हा प्रकारच मला माहीत नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर फक्त बॅडमिंटन स्पर्धा होती.

       दोन दिवसांवर स्पर्धा येऊन पोचली, माझ्याकडे कपडे शूज आणि चांगलं रॅकेट नव्हतं. मानपाडा रोडवर माझ्या मित्राच "गुप्ता स्पोर्ट्स'' नावाचं दुकान नुकतंच उघडलं होत. दुकान ज्ञान विकास वाचनालयाच्या वरती पहिल्या मजल्यावर होत. त्याला स्पर्धेचं सांगितलं तर त्यांनी मला तब्बल १२० रुपयेची रॅकेट दाखवली. मला ती पसंद ही आली. ती मी विकतही घेतली. रॅकेट आली आता कपडे आणि शूज पाहिजे होते. एका मित्रांकडून दोन दिवसाकरिता शूज आणले. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी हाफ पॅन्ट विकत घेतली. स्पर्धेची सर्व तयारी एक दिवस आधीच करून ठेवली. सर्व मित्रांना माहीत होतं मी स्पर्धेत भाग घेतलं ते घरच्यांना फक्त दोन दिवस आधी सांगितलं. मला घरच्यांच नेहमी प्रोत्साहन असायच.

        स्पर्धा सकाळी दहा वाजता होती.माझ्याकडे गाडी होतीच घरून निघालो की दहा मिनिटात पोचलो असतो. निघायच्या आधी आईच्या पाया पडलो डोंबिवली पश्चिमेला पोचायला पाचच मिनिट लागले जवळच छोटसं मंदिर होतं लांबूनच देवाला नमस्कार केला आणि स्पर्धेच्या ठिकाणी पोचलो. दहा वाजायला आले ही माझी पहिलीच स्पर्धा असल्या कारणाने मनात थोडीसी भीती होती समोरचा मुलगा कोण असेल कसं खेळत असेल वगैरे. गम्मत अशी झाली समोरचा प्रतिस्पर्धी त्यादिवशी आलाच नाही!!! खेळच झाला नाही आणि मी थेट दुसऱ्या राऊंड ला पोचलो. पुढचे तीनच मॅच जिंकलो की स्पर्धा जिंकलीच समजा. घरी आलो आधी घरच्यांना मग मित्रांना सांगितलं की मी दुसऱ्या राऊंड ला पोचलो. लगेच दुसऱ्या दिवशी सेकंड राऊंड होतं. समोरचा मुलगा माझ्या आधीच पोचला होता. अगदी वेळेवर स्पर्धेला सुरुवात झाली. समोरच मोठा चॅम्पियन होता मला त्याने एकही पॉईंट करू दिले नाही मी मागे गेलो की शटल पुढे मारायचा पुढे आलो की मागे मारायचा. त्याचे स्मॅश जबरदस्त होते एकदाही मला उचलता आले नाही तीन ही गेम त्यांनी मला सहज शून्याने ने हरविले... सरळ गाडी घेतली रॅकेट घरी टाकल आणि दुकानात जाऊन बसलो माझी स्पर्धेत भाग घ्यायची हौस पूर्ण झाली.पुढे कधी ही त्या जागेवर फिरकलो नाही आणि स्पर्धेचा विचार ही केला नाही....

Tuesday, June 9, 2020

ठाण्याच्या टेंभी नाक्याच्या जवळील आदर्श विवाह मंडळ येथे साकारलेलं कविताच लग्न ...

लता जवळजवळ एक वर्षतरी लायब्ररीत कामाला होती. तिला मी तीनशे रुपये पगार द्यायचो. तिची घरातील परिस्थिती खराब होती म्हणून ती दुसरा पर्याय शोधत होती. कविता लताची मैत्रीण. कविताने आपल्या मित्राला सांगून लताला जास्त पगारवाली दुसरी नोकरी मिळवून दिली. त्यानंतर कविता माझ्याकडे लायब्ररीत कामाला यायला लागली. तसं कविताला नोकरीची गरज नव्हती. स्वतः कमवून पुढचं शिक्षण पूर्ण करावं अशी तिची इच्छा.कविताला पुस्तक वाचायलाही आवडायचं. लायब्ररीत नोकरी केली की पुस्तकही वाचायला मिळतील.

   कविताने SNDT युनिव्हर्सिटी मधून B.A. पूर्ण केले होते. तिला पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. लायब्ररीत कामाला लागल्यावर सर्वांबरोबर ती रुळली होती. विनायक, प्रवीण, चेतन, शैलेंद्र, शर्मिला सर्वांबरोबर मैत्री झाली. कविताची उंची कमी असल्यामुळे आम्ही सर्वजण तिला 'दीड'म्हणून हाक मारायचो!! शर्मिला जरा ताब्यातीने होती तर तिला आम्ही "जाड' नाव ठेवलं, विनायक सर्वांना पिडायचा तर त्यांनी स्वतः ला पिड्या नाव ठेवलं. सर्वजण युथ असोसिएशन ऑफ डोंबिवलीचे सदस्य.

    कविता शिवमंदिराच्या बाजूच्या इमारतीत राहायची. तिच्या घरी वडील,आई, मोठा भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा आणि एक छोटा भाऊ. मी कधी घरी गेलो तर तिची आई मस्त गप्पा मारायची. गरम गरम खाऊ त्याबरोबर चहा पण मिळायचा!! कविताच्या वडिलांनाही वाचनाची आवड होती. तिच्या वडिलांशी आणि भावाशी माझे जास्त संबंध नव्हते. कविता सकाळी ठीक नऊ वाजता लायब्ररीत यायची येताना काहीतरी खाऊ घेऊन यायची. मी आणि माझे मित्र ती येण्याची वाट बघत बसायचो. सकाळी सकाळी गरम गरम कांदे पोहे घेऊन यायची. ती उपमाही छान बनवायची. गरम गरम कांदे पोह्यांवर बारीक शेव, ओल खोबर, कोथिंबीर आणि त्यावर लिंबू पिळलेला असला की दोन ते तीन प्लेट माझ्या पोटात गेलंच समजा एवढं आवडायचे मला कांदे पोहे!! आमच्याकडे इडली, डोसा, मेंदू वडा, सांबर छान बनायचे पण कांदे पोहे आणि उपमा कविताचे हातचे मी कधीच विसरलो नाही.

        कविताचा मित्र वेणू नायर राहायला पेंडसे नगरला. तो आणि त्याची आई राहायचे वडील नव्हते. तो कन्सुमर सेंटर नावाने बिझिनेस करायचा. सम्राट बिस्कीट, चॉकलेट असे बरेचसे वस्तूंचे घाऊक विक्रेता, त्याचे डोंबिवलीत तीन चार ठिकाणी दुकाने होती. पैश्यांची कमतरता नव्हती. त्याच्याकडे बरीचशी लोकं कामाला होती. स्वभावाने शांत आणि दिसायला ही सुंदर टिपिकल मल्याळी वाटायचा. वेणूची आणि कविताची जोडी मला छान वाटायची. दोघे माझ्या माहितीप्रमाणे तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखायचे. दुपारी बरोबर एक वाजता लायब्ररी बंद करताना वेणू कविताला भेटायला लायब्ररीत यायचा. एकदा मी दोघांना विचारलं तुम्हाला लग्न करायचा विचार आहे का? आम्ही लवकरच लग्न करणार आहोत लग्न सादेपणाने असेल शक्यतो कोर्ट मॅरेज करण्याचा विचार अस त्यांनी सांगितलं. मी मल्याळी आणि ती मराठी लग्न कुठल्या पद्धतीने करायचे? दोघांच्या घरातले राजी होतील का? असे बरेचसे प्रश्न होते. मी म्हटलं मी जबाबदारी घेतो..

    आधी मी कॉलेजमध्ये असताना एकाच्या लग्नासाठी मदत केली होती. दोघेही टिळकनगर मध्ये राहणारे. मुलगा क्रिशन तर मुलगी हिंदू. दोघांना ही मी ओळ्खयचो. मी शाळेत असल्यापासून त्यांना एकत्र फिरताना पाहिलं होतं. आमच्या इमारतीच्या मागे लतिका टाईल्स कंपनीच्या इकडे जिथे माझी ताई काम करायची तिकडे एक नारळाचं झाड होतं. शाळेत जाताना बरेच वेळा त्यांना तिकडे बसलेलं मी पाहिलं. मी बारावीत असताना तो मुलगा तिला घ्यायला आमच्या कॉलेजमध्ये आला. मी त्या मुलीच्या वर्गात जाऊन तिला बोलावून आणलं. नंतर त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. मी ऐकलं की ते दोघे दुबईला जाऊन सेटल झाले. जर एकमेकांवर खरं प्रेम असेल तर त्यांनी एकत्र येऊन लग्न करावं असं माझं मत. त्याचं पुढे काय परिणाम होतील याचा मी विचार केलाच नव्हता. शेवटी त्यांच नशीब...

     कविताची लग्नाची जबाबदारी मी घेतली.कवितांच्या आईला भेटलो. घरच्यांना ते लग्न करणार ते माहीत होतं. कविताने जास्त खर्च न करता अगदी सध्या पद्धतीने लग्न करायचं ठरवलं!! तशी तयारी सर्व आधीच त्या दोघांनी करून ठेवलेली. कविता सर्वांची लाडकी त्यामुळे विरोधाचा प्रश्न नव्हताच. वेणूचा घरून पण होकार मिळाला. लग्न रजिस्टर करायच असल्यामुळे ठाण्याला टेम्बी नाक्या जवळचा आदर्श विवाह मंडळ हॉल निवडला. लग्नाची तारीख ठरली १२ डिसेंबर १९८९..

       आदल्या दिवशी आम्ही सर्व तयारी केली. कोण कोण कसं येणार? किती वाजता पोचणार? तस मोजक्याच लोकांना तोंडी आमंत्रण दिलं गेलं. कविताच्या आईला ट्रेनमध्ये चढायला जमत नव्हतं. ते पण सकाळची वेळ ट्रेनमध्ये ही गर्दी आमचेच चढायचे वांदे आईला तर जमलंच नसत. म्हणून मी गाडी केली. दुपारी बारा वाजताच मुहूर्त होता. मी पहाटे सात वाजताच गाडीवाल्याला बोलावलं तो माझ्या ओळखीचा निघाला. तो गोपाळनगर गल्लीत राहायचा. कविता तिचे आई, बाबा मामा आणि मी असे पाच जण गाडीने निघालो. बाकीचे काही मित्र आणि नातेवाईक ट्रेनने हॉलवर आमच्या आधीच पोचले. हॉल तसा छोटा पण छान सजवलेलं, बसायला खुर्च्या, विधीची सर्व तयारी आम्ही पोचायच्या आधीच तयार करून ठेवली होती. आम्ही पोचल्यावर लगेच नाश्ता तयार होता. नेमके नाश्त्याला कांदे पोहे होते!! लग्न लावून देणारे भटजी कुठेतरी अडकल्यामुळे विधी सुरू होयला उशीर झाला. तो पर्यंत मी आणि माझे मित्र तलाव पाली वर फिरून आलो. ठाण्याचे तलाव पाली मी पहिल्यांदा पहिलं लांबून गडकरी रंगायतन सुद्धा मला बघायला मिळालं. सर्व फिरून आम्ही एका तासात हॉलवर पोचलो. तो पर्यंत लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. तसे मी अगदी जवळच मित्र किंवा नातेवाईक असेल तरच लग्नाला जायचो. ते पण लांब बसून मित्रांसोबत गप्पा मारायचो. लग्नाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे आज मी समोरच बसलेलो पण विधिकडे लक्ष्य नव्हतं. मला सर्व चित्रपटात लग्न होतात अस दृश्य डोळ्यांसमोर आलं. तीन चार वर्ष मित्र मैत्रिण म्हणून एकत्र असलेले आज लग्नाच्या बंधनात बांधले जाणार....

Sunday, June 7, 2020

फ्रेंड्स लायब्ररीत पुस्तकातलं पानं फाडलेल्या तीन मुलांची गोष्ट....(१९८९)

कुठलाही व्यवसाय म्हटलं की नफा तोटा असतोच. जोखीम जिथे जास्त असते तिथे नफा जास्त, जोखीम जिथे कमी तिथे नफा पण कमी असतो.हा कुठल्याही व्यवसायाचा नियम.मी वाचनालयाचा व्यवसाय निवडला. जिथे जोखीम कमी त्याबरोबर नफाही कमी होता.मला वाटलेलं की वाचनालय चालवणं खूप सोपं काही पुस्तके ठेवायची, एक स्टाफ नेमायचा की लगेच सभासद यायला सुरुवात होतील. मला स्वतःला काही करावं लागणार नाही. कालांतराने मला समजलं की लायब्ररीत मला स्वतःला वेळ द्यावा लागेल. सुरुवातीला मी लायब्ररीकडे जास्त लक्ष्य दिलं नव्हतं. बँकेतून कर्ज घेतल्यावर हप्ते भरावे लागणार होते. आता मात्र लायब्ररीकडे लक्ष देणे गरजेचे होतं. नवीन दर्जेदार पुस्तक मागावल्यामुळे सभासदांची संख्या वाढत होती. जसे सभासद वाढायला लागले तसे तसे समस्या पण वाढत होत्या.

       डोंबिवलीतल्या काही वाचनालयात बरेचसे नियम व अटी असायच्या. एका वेळेस एकच पुस्तक वाचायला घेऊन जाता येईल, एका दिवसातून एकदाच पुस्तक बदलून दिलं जाईल, पुस्तक आठ दिवसापेक्षा जास्त काळ राहिले तर दिवसाचे विलंब शुल्क भरावे लागेल, जास्त किंमतीचे पुस्तक असेल तर अनामत रक्कम जमा करावे लागेल, पुस्तक हरवलं तर पुस्तकाची मूळ किंमत भरावी लागेल, पुस्तके वाचनालयात जास्ती वेळ चाळत बसायचं नाही असे बरेचसे नियम व अटी होत्या. काही वाचनालयात नियम व अटीचे रबर स्टॅम्प बनवून प्रत्येक पुस्तकाच्या मागे त्याचे ठसे मारले होते तर काही वाचनालयात नियम व अटींचे बोर्ड लावलेले असायचे. मी फ्रेंड्स लायब्ररीत कमीत कमी नियम लागू केले त्यामुळे काही काळाने लायब्ररीत काही समस्या निर्माण होऊ लागल्या. वाचक पुस्तकातल्या पानांवर लिहून आणायचे तर काही वाचक पुस्तकातील मधली पान फाडून आणायचे. नेमकं रेसिपींची पाने फडलेली असायची. कधी कधी चुकून दुसऱ्या वाचनालयाची पुस्तके आमच्याकडे घेऊन यायचे. तर कधी पावसाळ्यात सभासद पुस्तके भिजवून आणायचे. विलंब शुल्क नसल्याने सभासद काही पुस्तकं महिनाभर ठेवून घ्यायचे. घरातले सर्वजण व  शेजारचे सर्व जणांनी पुस्तक वाचून झाले की परत करायचे. काही सभासद दुकाना पासून मला ओळखत असल्यामुळे एका वेळेस दोन दोन पुस्तके घेऊन जायचे वर्गणी मात्र एकाच पुस्तकाचे भरायचे.त्यात काही मित्रही होते. माझा वाचनालायकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच होता!!!

   आपल्या लायब्ररीत कथा, कादंबऱ्या होत्याच त्याच बरोबरीने कॉलेजची पुस्तकेही मी ठेवली होती. कॉमर्स आणि सायन्सची पुस्तके होती. कॉमर्स साठी बरेच सभासद होते. महिन्याचे फक्त वीस रुपये भरून बरीचशी पुस्तके त्यांना वाचायला मिळत होती. मध्यंतरी माझ्याकडे लता म्हणून जी स्टाफ कामाला होती ती सर्व सभासदांशी संवाद साधायची त्यामुळे सर्वांशी चांगले नाते जुळले होते. कॉलेजची मुलं मात्र जास्त मस्ती करायचे. त्यांच्याकडे जास्त लक्ष ठेवायला लागायचं. लता आलेली पुस्तके अधून मधून चाळून बघायची.  एकदा अकरावीच्या नवनीत प्रकाशनाचे eco च पुस्तक चाळताना मधली काही पानं काढून दुमडून परत चिटकवून आणलेली आढळून आले. लताने ते पुस्तक माझ्या निदर्शनास आणले.मग आम्ही ते पुस्तक कोणी कोणी नेलं ते तपासायला सुरुवात केली. सुरुवाती पासूनच आमच्याकडे प्रत्येक सभासदांचे एक फॉर्म भरून फाईलला लावलेलं असायचा. प्रत्येक सभासदाने कोणत्या तारिखेला कोणतं पुस्तक नेलं आणि कोणतं पुस्तक परत केलं हे लिहलेलं असायचं. आम्ही सर्व अकरावीच्या सभासदांची नावं शोधून काढली त्यांचा नंबर काढून ते पुस्तक कोणी नेलं? कधी नेलं? आणि कधी परत केलं? हे सर्व शोधलं. ते पुस्तक शेवटी कोणी नेलं हे आम्हाला कळलं. त्यांनी ह्याच्या आधी कुठली पुस्तके नेली ते पण शोधलं. त्याच्या नावावरचे सर्व पुस्तके शोधली. आणि बघितलं तर अजून दोन पुस्तके O.C. आणि S.P. ची पुस्तके ही अशीच मध्ये फाडून चिकटवली होती. त्याच्या बरोबर अजून दोन मित्र पण होते दोघांचे खाते तपासले तर त्यांनी पण तीच पुस्तके नेली अस आमच्या निदर्शनास आलं. तिघांनाही मी लायब्ररीत बोलवलं. विचारपूस केली तर कोणीही पुस्तक फडलेलं कबुल करायला तयार नव्हत. तिघे ही एकमेकांवर ढकलत होते. शेवटी मी ठरवलं त्यांच्या घरच्यांना भेटायच घडलेलं त्यांना समजावून सांगायचं. मला पुस्तक फडलेल्याच काहीच नव्हतं पण मुलं शाळेत कॉपी करून पेपर देतात याच खूप वाईट वाट होतं. ती मुलं जे काही करीत आहेत ते चुकीचं आहे त्यांनी या पुढे असं करू नये असं मला वाटत होतं. मी शाळेत, कॉलेजमध्ये असताना खूप मस्ती केली पण कधी परीक्षेत नक्कल केली नव्हती. कधीच असा प्रकार केला नव्हता. अभ्यास करून सरळ मार्गाने जे गुण मिळतील तेवढ्यातच समाधान मानायचो. नक्कल करून गुण मिळवून काहीच उपयोग नाही असं माझं ठाम मत होतं. या मुलांच्या घरी कसं जायचं? काय सांगायचं? असे प्रश्न होते. तिघांच्याही पत्ता लिहून घेतला. सर्व टिळकनगरमध्ये राहणारे होते. पहिल्या मुलाच्या घरी गेलो, फ्रेंड्स लायब्ररीतून आल्याचं सांगितलं. त्यांनी बसायला सांगितलं. ते अण्णांच्या ओळखीचे होते. फ्रेंड्स स्टोअर्समुळे ओळख झाली होती. मुलगा वर्गणी वेळेवर भरतोना पुस्तक वेळेवर देतोना लायब्ररीत मग कशी? काय चालाय? वगैरे विचारपूस केली. मुलगा समोरच बसला होता. मला बघून खूप घाबरला होता. जाताना तिन्ही पुस्तके मी बरोबर घेतली होती. त्याच्या घरच्यांना ती पुस्तके दाखवली आणि जे घडलं ते सांगितले. घरच्या लोकांसमोर त्याने कबूल केल की परत असं करणार नाही. त्याने घरच्यांची आणि माझी माफी मागितली. मग मी तिकडून दुसऱ्याच्या घरी गेलो ते माझे ओळखीचे निघाले त्यांनी मल बसायला सांगितलं. परिचयाचे असल्या कारणाने मला चहाही दिला. त्यांनी मला येण्याचे कारण विचारलं. मग मी ती पुस्तके त्यांना दाखवली आणि सविस्तर माहिती दिली त्यांनी सर्व नीट ऐकून घेतलं. तो मुलगा आतमध्ये अभ्यास करत होता त्याला बाहेर बोलवून घेतलं. त्यांना खूप राग ही आला होता ते सरळ त्याला मारायला उठले मी कसंबसं त्यांची समजूत घातली. मुलांनी ही पुस्तके फाडल्याचे काबुल केले. त्याच्या घरच्यांनी यापुढे असं घडून देणार नाही आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ असे सांगितल्यावर मी तिकडून निघालो. नंतर तिसऱ्याच्या घरी गेलो त्यांनी मात्र मला आत सुद्धा घेतलं नाही आमचा मुलगा असं काही करणार नाही हे सर्व त्याचे मित्रांचे कामं असतील उगाच याला अडकवू नका वगैरे बोलले. मी माझं काम केलं होतं. पुढचं भविष्य त्यांच्या हातात होत. माझ्या या एका निर्णयामुळे ते तिन्ही मुलं पुढे शिकून खूप मोठया पदावर पोचले. त्यातला एक सॉफ्टवेअर इंजिनिअर बनून अमेरिकेत सेटल झालाय. दुसरा बंगलोरला जॉब करतोय तर तिसरा स्वतःचा व्यवसाय सुरू करून मुंबईला राहायला गेलाय. आज सुद्दा ते माझी आठवण काढतात, डोंबिवलीत आले तर मला लायब्ररीत येऊन भेटतात....

Friday, June 5, 2020

दोन सरदारजींनी आपला किमती वेळ देऊन वासरुचे प्राण वाचविले...

रस्त्यावर बरेचसे घटना घडत असतात. कधी अपघात होत असतो कधी लोक चक्कर येऊन पडतात तर कधी पाय घसरून पडतात. चोर मंगळसूत्र ओढून पळून जातो तर कधी कोणाची चावी हरवते, सायकली वरून किंवा गाडी वरून माणसं पडत असतात, तर कधी लोकांना सुट्टे पैशांसाठी भटकायला लागतं. हे सर्व नेहमी घडत असतं. या घटना घडत असताना जास्त करून आजूबाजूचे लोक मदतीला येतात पण कधी कधी समोरचे दुकानदार सुद्धा मदतीला येतात. चक्कर आली तर त्यांना दुकानात घेऊन जाऊन पाणी पाजतात, बसायला टेबल देतात. जखम झाली असेल तर डॉक्टरकडे जायला सांगतात. चोर चोरी करून पळत असेल तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. पैसे सुट्टे करून देतात चावी शोधायला मदत करता. कोणी रस्त्यावर पडलेली चावी दुकानात आणून दिली तर त्या हरवलेल्या माणसापर्यंत पोचवण्याची जबाबदारी दुकानदार घेत असतात. दुसऱ्यांच्या मदतीला धावणे ह्यालाच तर माणुसकी म्हणतात.


     आमचं "फ्रेंड्स स्टोअर्स" दुकान डोंबिवलीतल्या हार्ट ऑफ द सिटी म्हणजे टिळकनगरमध्ये होतं. टिळक नगरमध्ये आत येताना गोविंदाश्रम हॉटेल त्याच्या समोर फडके वॉच सेंटर, आत वळलो की डॉक्टर राजेंद्रप्रसाद रोड, बाजूला मानव कल्याण केंद्र आमच्या दुकानावरून थोड पुढे चालत गेलो की टिळकनगर पोस्ट ऑफिस, समोरच टिळकनगर विद्यामंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि  मधोमध आमचं दुकान. बरेचसे घटना आमच्या दुकानाच्या समोर घडताना मी पहिल्या. जरी दुकानात गिऱ्हाईक असले तरी थोडाफार माझं लक्ष बाहेर असायचं. काही घटना घडल्या किंवा वेगळा प्रकार घडला की मदतीला मी हजर!!

     एके दिवशी संध्याकाळचे चार पाच वाजले असतील. मी आणि दुकानातले  दोघे कामगार दुकानात साफ सफाई करत होतो. पोस्ट ऑफिसच्या बाजूने एक गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन चार रस्त्याकडे जात होते. त्यांनी आपल्या मुलाला समोर बसवला होत. बरोबर आमच्या दुकाना समोरून जात असताना समोर बसलेला मुलगा जोरजोराने ओरडायला लागला. त्याचा वडीलांनी सायकल जागच्या जागी थांबवली. मुलगा समोर बसल्याने त्यांना सायकल वरून खाली उतरता येत नव्हतं. मी दुकानातून हे सर्व बघत होतो. वेळ न घालवता आमच्या दुकानाच्या टेबल वरून उडी मारली आणि त्यांच्याकडे धावत सुटलो. जवळ जाऊन बघतो तर त्या मुलाचे पाय सायकलच्या समोरच्या चाकेत अडकले होते आणि रक्त येत होतं. मी त्यांना म्हटलं समोरच्या टायर चे स्पोक तोडायला लागतील चाक पुढे मागे होत नव्हते. त्याच्या वडिलांना काहीच सुचत नव्हतं. मी पटकन दुकानात गेलो हातोडी आणि पक्कड घेऊन आलो. लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. मी गर्दी बाजूला सरकावून सायकल गाठली. पक्कडने टायरच्या दोन तीन स्पोक्स तोडल्या आणि त्याचा पाय बाहेर काढला. मुलाला उचलून दुकानामध्ये घेऊन आलो. दुकानात आजूबाजूचे दुकानदार जमले. त्याच्या बोटांना जखमा झाल्या होत्या. त्याला टेबलवर बसवलं. दुकानातल्या चॉकलेटच्या भरणीतून एक लॉलीपॉप काढून त्याच्या हातात देताच त्याचं जखमेकडे दुर्लक्ष झालं!! लॉलीपॉप हातात देताच मुलगा हसायला लागला. त्याच्या वडिलांना शेजारच्या दुकानदारांनी पाणी पाजलं. थोडं बरं वाटल्यावर दोघे सायकली वरून घरी गेले. मला एक चांगलं काम केल्याच मनाला समाधान वाटलं.

     सकाळी साडेसहाच्या सुमारास मी दुकान उघडायचो. दुकानात सामान पुष्कळ असल्याने ते सर्व बाहेर लावून ठेवेपर्यंत आठ वाजायचे. दुकान उघडल्यापासूनच गिऱ्हाईक सुरू असायचे. सकाळी शाळेत जाणारी मुलं आणि त्यांचे पालक काही न काही वस्तू घ्यायला दुकानात यायचे. या दरम्यान कसे नऊ वाजयचे कळायचंच नाही. बरोबर नऊ वाजता अण्णा घरून निघून पाच मिनिटात दुकानात यायचे. आमचं तसं जास्त बोलणं होत नव्हतं. कामा पुरतेच बोलायचो आम्ही. मी घरी जाऊन अंघोळ आणि नास्ता करून होईपर्यंत दहा वाजयचे. आई छान इडली, डोसा बनवायची. इडली,डोसा बरोबर चटणी पेक्षा मला लोणी जास्त लागायच. लोणी असेल तर मी दोन इडली जास्त खायचो!! नास्ता उरकला की परत दुकानात जायला तयार.

   असेच एक दिवस मी नास्ता करून दुकानात गेलो. अण्णांना बाहेर जायचं होतं. अण्णा मला सर्व समजावून सांगून निघून गेले. दुकानात मी आणि दोघे कर्मचारी होतो. दुकानाच्या समोरून काही लोकं डावीकडे पळत जाताना मी बघितलं. पटकन मी दुकानाच्या बाहेर पडलो. मी पण त्या दिशेने धावलो. आमच्या इमारतीच्या बाजूला गटारात गायीचं वासरू अडकलं होतं. वासरू मोठं आणि खूप जाड होतं. तेव्हा गटारे सर्व उघडी असायची. वासरू कसं पडलं समजलं नव्हतं. त्याचे चारही पाय वरती होते. त्याच पोट गटारात दोन्ही बाजूने अडकलं होतं. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गर्दी केली होती. कोण वासरुला पाणी पाजत होतं तर कोण पाय पकडून बाहेर खेचायचे प्रयत्न करत होते. वासरू पायाला हात लावून देत नव्हतं. ते खूप घाबरल होतं. वासरूला बाहेर काढायचा आम्ही खूप प्रयत्न केला. आम्हाला काय करायचं सुचत नव्हतं. इतक्यात रस्त्यावरची गर्दी बघून रिक्षावरून जाणारे दोन सरदारजी रिक्षातून खाली उतरले. त्यांनी वासरू गटारात अडकलेलं पाहिलं. रिक्षावाल्याला पैसे देऊन जायला सांगितल. दोघे सरदारजी सहा फूट उंच असतील दिसायला धीपाड होते. ते आमच्याजवळ आले आणि मोठी रस्सी मागवायला सांगितली. मी माझ्या माणसाकडे पैसे देऊन नवीन जाड रस्सी आणायला सांगितलं. थोड्याच वेळात रस्सी आली सरदारजीने त्या रस्सीचे दोन तुकडे केले दोघांनी मिळून एक रस्सीचा तुकडा वासरूच्या मानेच्या इकडे आणि दुसरा तुकडा पोटाच्या आतून दुसऱ्या बाजूला ओढून घेतला. वासरू सारख ओरडत होतं. पाय झटकत होतं. दोघे सरदार मजबूत होते. त्यांचा उंचीचा त्यांनी फायदा घेतला. एक सरदारजी गटारात उतरला. आम्हा सर्वांना त्यांनी रस्सी खेचायला सांगितले. खाली उतरलेला सरदारने दोन्ही हातानी वासरूला उचलले आम्ही सर्वांनी रस्सी ओढून वासरूला गटारातून बाहेर काढले. वासरू बरेच वेळ गटारात अडकून पडल्यामूळे पोटाच्या दोन्ही बाजूला खरचटल होतं. जसं त्याला आम्ही बाहेर काढताच लंगडत लंगडत ते वासरू पळून गेलं. आम्ही सर्वांनी त्या दोन्ही सरदारजींचे आभार मानले. त्यांना मी दुकानात घेऊन गेलो कोल्ड्रिंक विचारलं पण त्यांनी फक्त पाणी मागितलं. आम्ही त्यांना बसायला टेबल दिलं आणि पाणी आणून दिलं. त्यांच्याशी बोलल्या नंतर समजलं की ते उल्हासनगर हुन आले होते. त्यांना पोलीस स्टेशनला महत्वाचं काम होतं. पण वासरूला बघून ते थांबले. त्यांनी आपला किमतीचा वेळ देऊन वासरूला वाचवलं होतं. हा एक माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस होता....

Wednesday, June 3, 2020

(१९८९) युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली तर्फे नागोठणे भागात पूरग्रस्तांना सामग्री पोचविण्याची संधी मिळाली....

"फ्रेंड्स लायब्ररी'ची सुरुवात होऊन अडीच वर्षे लोटली. पहिल्या वर्षी फक्त बाहत्तर नवीन सभासद जोडले गेले. त्यातले पण चाळीस सभासद सोडून गेले. त्यामागे बरीचशी कारणे होती. या दरम्यान सात ते आठ स्टाफ बदलले होते. सुरुवातीला माधुरी होती त्यानंतर सुनिता, अमिता, पुष्पलता, सुजाता असे काही स्टाफ तीन चार महिने काम करायचे आणि सोडून जायचे तेव्हा मी त्यांना २०० रुपये पगार द्यायचो. मध्ये थोडे दिवस माझा मित्र विनायक पण लायब्ररी सांभाळायचा. त्याला मी १०० रुपये पगार ठरवला होता. पण त्याने पगार रोख कधीच घेतला नाही. तो दुकानातून पेप्सी कोला, कॅडबरी चॉकलेट, आइस्क्रीम वगैरे घ्यायचा यातच त्याचा पगार संपायचा. तो स्टाफ पेक्षा माझा जवळचा मित्र होता. विनायकच वाचन अफाट होतं. तो वोलगा ते गंगा. नाझी भस्मासुरचा उदयास्त, काळे पाणी, कोंडुरा सारखे पुस्तकं वाचायचा. विनायक श्रीकांत टोल काकांची विकास वाचनालय आणि परांजपे यांच्या ज्ञानविकास वाचनालयाचा सभासद होता. तो जी पुस्तक वाचायचा ते सर्व माझ्या डोक्यावरून जायचं. विनायक म्हणायचा आपण दर्जेदार पुस्तक वाचनालयात ठेवायला पाहिजे जेणेकरून सभासद वाढतील. त्याच वेळेला लता नायक ही मुलगी लायब्ररीत कामाला लागली. मुलगी तशी गरीब होती घरची परिस्थिती चांगली नव्हती. कामाला मात्र हुशार सभासदांशी चांगला संवाद साधायची. तिची मैत्रीण कविता कधी कधी तिला भेटायला यायची.लताची आर्थिक परिस्थिती बघून कविताच्या मित्राने लताला चांगल्या पगाराची नोकरी मिळवून दिली आणि तिच्या जागी कविता स्टाफ म्हणून यायला लागली. कविता खूप हुशार तिने B.A. केलं होतं. कविता मी आणि विनायकने मिळून वाचनालयात काही बदल करण्याचे ठरविले. त्यासाठी भांडवल लागणार होतं. मला अण्णाकडे पैसे मागायचे नव्हते. स्वतःच भांडवल उभ करायच होत. एकच पर्याय होता तो म्हणजे बँके कडून कर्ज घेणे. देना बँकेचे मॅनेजर माझ्या परिचयाचे होते. त्यांना मी कर्जच्या बाबतीत विचारलं. ते बोलले मी जास्तीत जास्त दहा हजार पर्यंत कर्ज देऊ शकतो पण मला सर्व कागदपत्रे हवेत. मी दहा दिवसांत कागदपत्रे जमा करून मॅनेजराना दिली. पंधरा दिवसात मला दहा हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. आता माझ्याकडे दहा हजार रुपये होते सांभाळून उपयोग करायचं ठरवलं. मला पै सरांचं वाक्य आठवलं. पैसे घेणे सोपं आहे पण परतविणे कठीण आहे. मी सरांच्या म्हणयाप्रमाणे सोपं काम केलं होतं. आता पुढे बँकेचा हप्ता वेळोवेळी भरायचं हे कठीण काम करायचं होतं.

       लायब्ररीच्या बाजूला चक्कीची गिरणी होती गिरणीच्या पिठामुळे पुस्तके जुनी दिसत होती त्यामुळे काचेचा दरवाजा बसवून घेतला. लांबून लायब्ररीच नाव दिसेल असं मोठा बोर्ड बनवला. बोर्ड आणि दरवाजा मिळून हजार रुपये खर्च झाले. हजार रुपये हातात ठेवून तब्बल आठ हजार रुपयांची नवीन पुस्तके खरीदी केली. घाऊक विक्रेते एकदम चालू होते लायब्ररीत पुस्तक द्यायचं असेल तर २५ टक्के सवलत आणि पुस्तक विक्रेता असेल तर ३० ते ४० टक्के सवलत द्यायचे.मला आधीच माहीत असतं तर मी "फ्रेंड्स स्टोर'च्या नावाने पावती बनवली असती. या वेळी खूप चांगली पुस्तक मागवली. विनायकच्या म्हणण्यानुसार दर्जेदार पुस्तके होती. पू. ल. देशपांडे, व.पू. काळे, द.मा. मिराजदार, वि.स. वाळिंबे, रणजित देसाई, व्यंकटेश माडगूळकर अश्या नावाजलेल्या लेखकांची पुस्तके काही ऐतिहासिक पुस्तके ही त्यात समाविष्ठ होती. पुस्तके कप्प्यावर लावल्याने लायब्ररी पुस्तकाने भरलेली दिसत होती. हळू हळू वाचक वाढायला सुरुवात झाले.

          जुलैचा महिना असेल जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचली अलिबाग नागोठणे भागात मुसळधार पावसामुळे बरेचसे घरे वाहून गेली.  लोकांना खायला अन्न, प्यायला पाणी नाही जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंबिवलीतल्या बराच सामाजिक संस्थांनी कपडे, धान्य, औषधे बाकीचे वस्तू गोळा करायला सुरुवात केली लायब्ररीमध्ये आम्ही सर्व युथ असोसिएशनचे सदस्य जमलो. मी विनायक, प्रवीण, चेतन, शैलेंद्र, शर्मिला, कविता आणि काही जण. आमचं पण अलिबाग नागोठणेच्या लोकांना मदत पोचवण्याचा ठरलं. टिळकनगर चौकात युथ असोसिएशनचा बोर्ड लागला. टिळकनगर राहिवासीयांनी भरभरून भांडी, कपडे, गहू, तांदूळ असे बरेचसे वस्तू आणून जमा केल्या. बराच लोकांनी रोख रक्कम ही आमच्याकडे जमा केली. त्या सर्वांना आम्ही रीतसर पावतीही दिली. आमच्या अपेक्षे पेक्षा जास्त सामान गोळा झाले. युथ असोसिएशनचे सर्वजण कामाला लागले. आलेल सामान वेगवेगळ्या पिशवीत भरून तयार ठेवल. आलेल्या रोख रक्कममधून अजून काही धान्य विकत घेतल. आम्ही सर्वांनी रविवारी सकाळी निघायचं असा ठरवलं. सामान खूप असल्यामुळे तो घेऊन जाण्यासाठी मोठा टेम्पो लागणार होता. एका मित्राचा टेम्पो होता त्याला सर्व समजावून सांगितल, तो बोलला तुम्ही फक्त गाडीत पेट्रोल भरा बाकी काही नाही दिलं तरी चालेल. त्यामुळे आमचे बरेचसे पैसे वाचले!! रविवारी पहाटे लवकर सामान सर्व टेम्पोमध्ये भरून निघालो. मी प्रवीण, विनायक अजून दोघे आणि ड्राइवर असे आम्ही सहाजण होतो. ड्राइवर बरोबर दोघे आणि मागे तीन लोकं. मी टेम्पोच्या मागे कपड्यांच्या ढिगावर बसलो. सकाळची वेळ होती त्या कपड्यांच्या ढिगऱ्यावरच झोपी गेलो. थोडा वेळाने जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही वडखळ नाक्यावर होतो. ड्रायव्हर ने गाडी बाजूला लावली. बाजूलाच हॉटेल होतं. सर्वांना जोरदार भूक लागली होती. पोट भरून जेवलो. टेम्पोमध्ये पूरग्रस्तांना देण्याचे सामान बघून हॉटेल मालक आमच्याकडून पैसे घ्यायला मागत नव्हता. आम्ही जबरदस्तीने त्यांना पन्नास रुपये दिले. त्याच्याकडे विचारपूस केली. त्यांनी जे सांगितले ते असं की दोन ते तीन दिवस सतत मुसळदार पावसाने शेतात, घरात, रस्त्यावर पाणी तुंबायला सुरुवात झाली त्यात धरण भरून वाहू लागल्याने धरणाचं पण पाणी सोडलं गेलं. पाण्याचा पुरात बरेचसे घर,जनावर, झाडं, माणसं वाहून गेले. भयानक दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले. त्यात एक बरं होत गेले काही दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. ते बोलले तुम्ही नागोठण्याला जा तिकडे अजून काही सामान पोचलेले नाही. त्यांनी ड्रायव्हरला नीट समजावून कुठल्या गावात आणि कसे जायचे  सांगितले. आम्ही थोडावेळ विश्रांती घेऊन त्यांनी सांगितलेल्या गावाच्या दिशेने निघालो. जसं जसं आम्ही पुढे जात होतो बराच ठिकाणी आम्हाला तिकडच्या स्थानिक लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला आमचा ड्राइवर हुशार होता त्यांनी कुठेही न थांबता सरळ टेम्पो आतल्या एका गावात नेऊन थांबवला.

    गाव तसं छोटं कवलारु घरं काही छोट्या झोपड्या ही होत्या. आम्ही टेम्पो एक ठिकाणी उभा केला. काही लोकांच्या घरी जाऊन तपासणी केली. सर्वांचे खूप हाल झाले होते.सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोचली नव्हती कोणीही त्या गावात फिरकले नव्हते. आम्हाला बघून काहींच्या डोळ्यात पाणी आलं. आणलेल्या वस्तूं लोकांच्या घरोघरी जाऊन द्यायला सुरुवात केली. घरात पाणी शिरल्यामुळे कुबट वास येत होता. गादी उशी बरीचशी सडलेल्या वस्तू लोकांनी घराबाहेर फेकल्या होत्या. त्याला दुर्गंधी येत होती. आम्ही सर्वांनी नाकाला रुमाल बांधून घेतला. वस्तू वाटप करताना तिथल्या लोकांना आमच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली. इथे कोणाचं आले नाही तुम्ही अगदी देवासारखा आलात.

कपडे, गहू, तांदूळ, तेल, डाळ, बिस्कीट काही प्रमाणात औषध सर्व वाटप करण्यात आले. आम्ही नेलेल सामान आम्हाला खूप वाटत होता पण फक्त मोजके तीस ते चाळीस घरातच वाटप करू शकलो. पण मनाला एक समाधान वाटत होता आपण या लोकांना काहीतरी मदत करु शकलो!! सर्व वस्तू संपल्यावर दुपारी तिकडून निघालो आणि संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत डोंबिवलीला पोचलो. आम्ही जी एक मोठी कामगिरी स्वतःवर घेतली होती ती शंभर टक्के यशस्वी करून परतलो याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटत होता...