Tuesday, May 26, 2020

"गेटवे ऑफ इंडिया" वर Happy New Year ३१ डिसेंबर १९८६


दुपारच्या वेळेत गिऱ्हाईक कमी असल्यामुळे आमच्या दुकानात माझ्या मित्रांची फौज जमलेली असायची. कॉलेजचा मित्र विनायक शेट्ये, पेप्सी कोला विकायला येणारा विष्णू नाईक, सकाळी दूध टाकणारा किशोर समोर रजत सोसायटीत राहणारा प्रवीण, इमारतीतला संतोष ओक अजून बरेचसे मित्र जमायचे. क्रिकेटचे किस्से, सिनेमाचे किस्से स्वतःच्या करिअर बद्दलच्या चर्चा असायच्या. १९८६ डिसेंबरचा महिना होता. आम्ही गप्पा मारता मारता ३१ डिसेंबरला काय करायचं यावर चर्चा सुरू झाली. विनायक बोलला आपण "गेटवे ऑफ इंडिया"ला जाऊया. तिकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम छान असतो अस मी ऐकलंय. काही मित्रांनी होकार दिला. ते यायला तयार झाले. ट्रेनने जायचं आणि ट्रेनने यायचं त्यामुळे जास्त खर्च येणार नव्हता. फक्त जाण्या येण्याचा आणि थोडाफार खाण्याचा खर्च. मी थोडा विचार करायला लागलो. बाकीच्यांना फरक पडणार नव्हता मला सकाळी उठून दुकान उघडायचा होतं. काही जण तयार झाले मग मी पण होकार दिला.

   अण्णांची तब्यत सुधारली होती. अण्णांच्या पाठीच्या मणक्याचे दुखणे कमी होऊन ते दुकानात यायला लागले. सर्वेश हॉल च्या बाजूला पिठावाला हे  गृहस्थ मुंबईहून आठवड्यातून एकदा यायचे. ते रुग्णाच्या पाठीवर लाथ मारायचे. त्यांनी बरेचसे रुग्ण बरे केले होते. अण्णा पण त्यांच्याकडे गेले. त्यांच्या उपचारामुळे अण्णांना बर वाटायला लागलं. अण्णा चालायला फिरायला लागले. अण्णांना मी मित्रांबरोबर ३१ तारखेला "गेटवे ऑफ इंडिया"ला जाण्याचं सांगितलं. अण्णा चालेल बोलले तू जाऊन ये सकाळी दुकान मी उघडतो. मग काय मी हवेत!! हॅपी न्यू इयर थेट मुंबईत "गेटवे ऑफ इंडियावर" मित्रांसोबत साजरा करणार...

    ३१ तारखेला आठ वाजता निघायचं ठरलं. अण्णा दुकान बंद करणार होते. लायब्ररीत गेलो त्यादिवशी काहीच पैसे जमा नव्हते. दुकानात येऊन अण्णा कडे खर्चासाठी तीस रुपये मागितले. एवढा गल्ला माझ्या ताब्यात असताना मी कधीही एक रुपया पण काढायचो नाही. अण्णा जे देतील ते. आणि मी मागितलं की अण्णा कधीच नाकारायचे नाही. अण्णांनी लगेच तीस रुपये काढून दिले. सात वाजता मी घरी निघालो. घरी जाऊन जेवलो. आठ वाजता डोंबिवली स्टेशन तिकीट खिडकीच्या इथे आम्हीच जमायचं ठरलं होतं. मी V.T. च रिटर्न तिकीट काढलं. थोड्यावेळात बाकीचे सर्व जमले. ८.३०ची स्लो ट्रेन पकडली. मला "गेटवे ऑफ इंडिया" बघायची उत्सुकता होती. ट्रेन तशी रिकामी होती. आमच्यासारखे ३१ डिसेंबर साजरा करणारे थोडेफार लोकं होते. मी, विनायक, प्रवीण अजून तिघे असे आम्ही सहा जण होतो. ट्रेनला V.T. ला पोचायला कमीत कमी दीड तास लागणार होता. आम्ही आमच्या सोबत पत्ते घेतले होते. थोडावेळ पत्ते खेळलो. नंतर चित्रपटातली गाण्यांना सुरुवात केली. दादर स्टेशन आल्यावर मस्ती करायला सुरुवात झाली. V.T. स्टेशनला गाडी थांबली. तसं स्टेशन मला परिचित होतं. यापूर्वी दोन तीन वेळा घरातल्यांसोबत V.T. स्टेशनला यायची संधी मिळाली होती. स्टेशनवर उतरल्यावर प्लॅटफॉर्म, गर्दी, शेकडोंच्या संख्येने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या, कामावर जाणारी माणसं बघून मुंबईचा अभिमान वाटायचा.

    आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो, समोरच्या घड्याळात सव्वा दहा वाजले होते. बराच सिनेमामध्ये मुंबईत उतरला म्हटलं की जे दृश्य दाखवायचे ते दृश्य आता माझ्या डोळ्यांसमोर होतं. जगातल्या काही मोजक्या रेल्वे स्टेशनमध्ये हे एक स्टेशन मोजल जायचं. V.T.  स्टेशनची इमारत रात्रीच्या वेळेला छान दिसत होती. सर्वजण बोलले इथंच काहीतरी खाऊन घेऊया पुढे महाग पण असेल आणि गर्दीही असेल. आता काय खायचं समोर वडापाव, पाव भाजी, सँडविच ची दुकाने होती. वडापाव घ्यायचं ठरलं. मी घरून जेवून आलो होतो तरी पण मी एक वडापाव खाल्ला. जेवलो नसतो तर कमीत कमी तीन चार तरी वडापाव खाल्ले असते. वडापाव जाम चमचमीत होता.


   आम्ही D.N. रोड वरून चालत निघालो. विनायक बोलला चालत गेलो तर अर्धा तासात आपण पोचू. आमच्याकडे वेळ होता. आत्ताशी फक्त अकरा वाजले होते. आम्हाला बाराच्या आधी तिकडे पोचायचं होत. रात्रीची वेळ असली तरी सर्वजण ३१ डिसेंबर न्यू इयर साजरा करण्यासाठी बाहेर पडले होते. बरेचसे जण आमच्यासारखे "गेटवे ऑफ इंडिया" बघायला आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक चालत होते. रस्त्यावर गाड्या वेगाने धावत होत्या. चालत आम्ही फ्लोरा फाऊंटनला पोचलो. विनायक सर्व ठिकाणाची नावे सांगत होता. तो आमचा गाईडच होता म्हणा.पुढे डाव्याबाजूला जहांगीर आर्ट गॅलरी लागली मग रिगल सिनेमा. आता दहा मिनिटात आपण पोचू असा विनायक बोलला. पुढे छोटीसी गल्ली लागली त्यातून बाहेर पडताच समोर गेटवे ऑफ इंडिया दिसत होतं. सागरा सारखा जनसमुदाय दिसत होता. जास्त करून कॉलेजला जाणारे तरुण मुलं मुली आणि काही प्रमाणात फिरायला आलेली फॅमिली होती. थोडाफार प्रमाणात विदेशी नागरिकही होते. "गेटवे ऑफ इंडियाची" इमारत प्रकाश झोतात उठून दिसत होती. ताज हॉटेल सुद्धा लायटिंगमुळे एखाद्या चित्रकाराने चित्र रंगवल्यासारख दिसत होतं. मला विश्वासच बसेना की मी हे सर्व माझ्याच डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतोय. सर्व लोकं छान सजून दजून आले होते. लाऊड स्पीकर वर म्युझिक सुरू होतं. मुलं मुली त्या चालीवर नाचत होते. फोटो काढणारे आपले कॅमेरा घेऊन फिरत होते. लोकं आपापल्या ग्रुप चे फोटो काढून घेत होते. खाण्यापिण्याचे काही दुकाने उघडी होती. या दुकानात सुद्धा काही लोकांनी गर्दी केली होती. समुद्रात बोटी हालचाल करत होत्या. बोटीतून माणसं फिरायला जात होते. बारा वाजायला काही सेकंद बाकी होते. इतक्यात सर्व लाईट्स बंद झाल्या. सर्वत्र अंधार पसरला. लोकांनी जोरात ओरडायला सुरुवात केली "हॅपी न्यू इयर!!!". इतक्यात बारा वाजले, १९८६ साल संपून १९८७ सालची सुरुवात झाली. समोर समुद्रात आणि बाजूला फटाके वाजायला सुरुवात झाली. आकाशात वेगवेगळ्या रंगाचे फटाके उडतांना दिसत होते..., ते दृश्य बघण्यासारख होतं. मला अजिबात विश्वास बसत नव्हता की मी घरातून फक्त अडीच तासाच्या अंतरावर असलेल्या जगातल्या काही मोजके रमणीय स्थळातल्या "गेटवे ऑफ इंडिया" येथे नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटत होतो....

12 comments:

  1. क्या बात है! पै सर खूप छान वर्णन करता तुम्ही !

    ReplyDelete
  2. पै खूप सुंदर वर्णन केले आहे 31 डिसेंबर चा आनंद घेतला. त्यात ताज चे वर्णनव परिसराचे अप्रतिम .आज लाँक डाउनमधे गेटवे ला नेले धन्यवाद

    ReplyDelete
  3. खूप छान वर्णन
    चित्र डोळ्यासमोर उभे राहिले

    ReplyDelete
  4. काही काही गोष्टी आयुष्यात एकदाच घडतात. त्या आठवणी तुम्ही छान जपतात.

    ReplyDelete
  5. तुमची तेव्हाची मनस्थिती तंतोतंत उभी केलीत. सुरेख !!

    ReplyDelete