Thursday, May 28, 2020

(१९८७) "युथ असोसिएशन ऑफ डोंबिवलीची" स्थापना व डोंबिवली नागरी समस्यांवर व्यंगचित्र स्पर्धेच आयोजन....

कुंदापूरवरून डोंबिवलीत येऊन मला दहा वर्षे झाली. चार वर्ष मुलुंडला शाळेत गेलो आणि पाच वर्ष दुकान सांभाळत कॉलेजला जाऊन कॉमर्सची डिग्री मिळवली. लायब्ररीची सुरुवात होऊन वर्ष झालं. जसा उद्योग व्यवसाय माझ्या रक्तात होता तशी समाजसेवा करायला ही मला खूप आवडायचं. टिळकनगर मला आपलं वाटायचं तसच डोंबिवली सुद्धा. डोंबिवलीत पुष्कळश्या नागरीक समस्या होत्या. जन आंदोलनाने नागरीक समस्या सोडवणे शक्य होत. मी त्यात पुढाकार घेऊन उतरायचं ठरवलं. मी एकटा काहीच करू शकत नव्हतो. एखादी संघटना बरोबर असायला पाहिजे होती. काय करता येईल? याचा सारखा विचार करायचो. एक कल्पना सुचली. स्वतः एक संघटना उभी करायची. साथ द्यायला मित्र तर होतेच. माझे सर्व मित्र तरुण होते. काही कॉलेजमध्ये जात होते तर काहींचा स्वतःचा व्यवसाय... फक्त टिळकनगर मर्यादित न ठेवता अख्या डोंबिवलीचा विचार केला. स्वतः पुढाकार घेऊन "युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली'ची स्थापना केली. चेतन ,समीर, प्रवीण, शैलेश, शर्मिला, मंगेश, दीपक असे बरेचसे मित्र सभासद झाले. आमच्या दुकाना समोर गुंजन सोसायटीच्या बाजूला टिळकनगरचा 'रोड-मॅप' लावून विविध उपक्रमांना सुरुवात केली.

       टिळकनगर परिसर तसा खूप मोठा, बाहेरून आलेली लोकं आमच्या दुकानात पत्ता विचारण्यासाठी यायचे. मला सर्व पत्ते पाठ होते. पत्ता विचारायला आलेल्या प्रत्येकाला मी नीट मार्गदर्शन करून त्यांना पत्ता सांगायचो. संघटनेला सुरुवात झाल्यावर आपण इमारतींच्या आणि रस्त्यांच्या नावाचा एक फलक तयार करूया अशी कल्पना मी मांडली. सभासद जास्त करून टिळकनगरचे रहिवासी होते, जेणेकरून सर्व सभासदांनी होकार दिला. डोंबिवली पलिकेकडून टिळकनगरचा मॅप मिळवला. रस्त्यांची नावे, इमारतींची नावे, शाळा, टेलिफोन एक्सचेंज नाव, पोस्ट ऑफिस वगैरे दर्शवणारा '12 x 12' चा खूप मोठा बोर्ड पेंट करून घेतला. या बोर्डाच उद्घाटन डोंबिवलीतल्या एका पोलीस अधिकारी यांच्या हस्ते करून घेतल. नावा वरून थोडेसे वाद झाले बाहेरून टिळकनगरला येणाऱ्या बराच लोकांना या बोर्डच्या फायदा झाला.

      आता पुढचे कार्यक्रम ठरवायचे होते. संघटनेत जास्त करून कॉलेजला जाणारे विद्यार्थी होते. तरी पण संघटनेसाठी वेळ काढत होते. आम्ही सर्वजण लायब्ररीत जमायचो. डोंबिवलीत वारंवार लाईट जायचे ठीक ठिकाणी कचऱ्याचा ढिग, पाणी तुंबलेली उघडी गटारे, गटारांमुळे होणारे डास, रस्त्यांची दशा, अनियमित पाणी पुरवठा अशा बराच समस्या होत्या. नागरीक समस्यांवर मला एक भन्नाट कल्पना सुचली. डोंबिवलीतल्या नागरी समस्यांवर एक व्यंगचित्र स्पर्धा भरावयाची. व्यंगचित्रांद्वारे लोकांना जागरूक करायचे. मग मी ती मीटिंगमध्ये सदस्यांसमोर मांडली. सर्वांना माझी व्यंग्यचित्र स्पर्धेची कल्पना आवडली. आता सुरुवात कशी करायची? युथ असोसिएशन ऑफ डोंबिवलीचा बोर्ड बनवला होता. लिहण्याचं व पत्र व्यवहारच काम चेतनकडे होतं. चेतनच अक्षर सुंदर आणि मराठीवर कमालीचं प्रभुत्व होतं. मला त्याच लिखाण आवडायचं. स्पर्धेच नियम व अटी आम्ही तयार केल्या. डोंबिवली पलिकेसमोर व्यंग्यचित्र स्पर्धेचा बोर्ड लावला. अखेरच्या तारखेपर्यंत तब्बल दीडशे लोकांनी स्पर्धेत भाग घेतला.

     डोंबिवलीतल्या विविध नागरिक समस्यावर व्यंग्यचित्र काढून आणायच होत. डोंबिवलीतल्या विविध नागरिक समस्येवर लोकांनी छान कल्पना व्यंग्यचित्र द्वारे मांडल्या. त्यातला व्यंग चित्रांना क्रमांक देऊन पहिले तीन आणि उत्तेजनार्थ बक्षीस निवडायचे होते. रामनागरला उतेकर सरांचं नाव मी ऐकलं होतं. आम्ही काहीजण आलेले व्यंग्यचित्र घेऊन उतेकर सरांकडे गेलो. त्यांना आमचं ध्येय आणि स्पर्धे विषयी समजावून सांगितले. सरांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवसात क्रमांक निवडून देतो बोलले. आता स्पर्धेचं बक्षीस समारंभ कुठे आणि प्रमुख पाहुणे निवडायचे होते. आम्ही सर्वांनी आंबेडकर हॉलमध्ये कार्यक्रम व आलेल्या व्यंग्यचित्रांचे प्रदर्शन भरावयाचे ठरवले. चेतनने पत्र तयार केलं. तारीख व कार्यक्रमाचे तपशील लिहून आंबेडकर सभागृह बुक केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द जागतिक पातळीचे व्यंग्यचित्रकार आर के लक्ष्मण यांना बोलवायचं ठरलं.

    आमच्या येथे टेलिफोन केंद्रासमोर डॉक्टर तारा नाईक यांचा दवाखाना होता. त्यांचा नवरा श्री शंकर नाईक हे माझ्या चांगलेच परिचयाचे होते. ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये वितरण विभागात मुख्य पदावर होते. त्यांना मी नागरीक समस्येवर आम्ही घेतलेल्या स्पर्धेबद्दलची माहिती दिली. बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आर के लक्ष्मण यांना बोलावण्याचे ठरविल्याच सांगितले. ते बोलले कठीण आहे तरी आपण प्रयत्न करूया. आर के लक्ष्मण सर्वांना भेटतात फक्त त्यांना वेळ असायला पाहिजे असं ऐकलं होतं. चेतनने पत्र तयार केलं. तारीख व वेळ ठरवून मी त्यांच्या ऑफिसला गेलो. V.T. स्टेशनच्या बाहेरच टाइम्स ऑफ इंडिया ची इमारत होती. मी सांगितलेल्या वेळेवर पोचलो. नाईक अंकलना भेटण्यासाठी थोडा वेळ बाहेर बसलो. नाईक अंकल आल्यावर त्यांच्या सोबत आर के लक्ष्मण यांच्या केबिनकडे गेलो. बाहेरून समजलं की ते खूप व्यस्त आहेत आज भेटू शकत नाही असं समजल्यावर मी आणलेलं पत्र अंकलकडे देऊन डोंबिवलीला परतलो. दुसऱ्या दिवशी आर के लक्ष्मण सर महिना भर वेळ देऊ शकत नाही असं अंकल कडून समजलं. आता प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं याचा प्रश्न पडला. सर्वांनी मिळून लोकसत्ताचे व्यंगचित्रकार सत्येन टंनू यांना बोलावण्याचे ठरविले. त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी येण्याचे कबुल केले.

      डोंबिवलीतल्या आंबेडकर सभागृह येथे कार्यक्रम करण्याचे ठरविले. कार्यक्रमाच्या दिवशी पाहुणे सत्येन टंनू ठरल्या प्रमाणे वेळेवर डोंबिवली स्टेशनवर उतरले. मी आणि काही सदस्य त्यांना घ्यायला स्टेशनवर गेलो. आंबेडकर हॉलवर आम्ही सर्व तयारी केली होती. सभागृहाच्या दोन्ही बाजूला लोकांकडून आलेले व्यंग्यचित्र लावले होते. सभागृह दीडशे ते दोनशे नागरिकांनी भरलेला होता. युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली चा पहिलाच कार्यक्रम आम्ही सर्वांनी छान पैकी हाताळला. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे वेळेवर सुरू केला. स्टेजवर मी चेतन आणि प्रमुख पाहुणे सत्येनं टंनू होतो. सूत्रसंचालन विनायकने उत्तम रीत्या सांभाळले. प्रास्ताविक मी मांडले. स्पर्धेच्या मागचा उद्देश लोकांसमोर मांडून नागरिक समस्यावर त्यावर तोडगा काढण्यासाठी उपाय योजना मांडल्या. चेतनने युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली संघटने विषयी माहिती व आजच्या कार्यक्रमा विषयी थोडक्यात माहिती दिली. नंतर अध्यक्षीय भाषण झाले. नागरीक समस्यांवर लोकांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे भरभरून कौतुक केलं. नागरीक समस्यांवर व्यंगचित्र स्पर्धा ही एक वेगळीच कल्पना आहे. याच्यामुळे जन जागृती होईल. प्रशासनाने याची दखल घेतली तर डोंबिवलीतल्या बरेचसे समस्या सुटू शकतील असे ते बोलले. त्यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. आलेलं नागरिकांनी कार्यक्रम आयोजनाच खूप कौतुक केलं. व्यंगचित्र बघण्यासाठी डोंबिवलीतल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर या व्यंगचित्रांचे समोरच्या पाटकर हॉल मध्ये प्रदर्शन भरवलं. डोंबिवलीतल्या नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन व्यंग चित्रांचे भरभरून कौतुक केले. युथ असोसिएशनचा हा पहिलाच कार्यक्रम यशस्वी ठरला. या कार्यक्रमात  चेतन, समीर, विनायक, मंगेश, शैलेंद्र, शर्मिला, दीपक, विष्णू, किशोर अजून बरेचसे सदस्यांनी हातभार लावला होता....

12 comments:

  1. पै. कल्पना भन्नाट होती आणि ती अ मलात आणली सामाजिक बांधिलकी जपली व जपत आहात कौतुकास्पद उपक्रम

    ReplyDelete
  2. लिखाण छानच झालं आहे पण फोटो ह्या ब्लॉगचा highlight आहे !

    ReplyDelete
  3. हो आठवते मला पण.
    तुमच्या कार्याला मन:पुर्वक पाठिंबा.

    ReplyDelete
  4. तुमच्या उजव्या बाजूला व साहेबांच्या डाव्या बाजूला कोण उभे आहेत.नावे सांगता येतील

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या उजव्या बाजूला त्यांचे नाव प्रवीण आणि साहेबांच्या डाव्या बाजूला उभे राहिलेले त्यांचे नाव राजू.

      Delete
  5. नागरिकांकडून नागरी समस्यांवर व्यंगचित्र मागविण्याची आणि त्याचे प्रदर्शन भरविण्याची कल्पना भन्नाट.

    ReplyDelete