Friday, May 22, 2020

२२ मे १९८६ रोजी "फ्रेंड्स लायब्ररी" ची स्थापना झाली!!!!

पेंढरकर कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षी आम्हाला कॉम्प्युटर हा एक अभ्यासातील विषय होता. तेव्हा डोंबिवलीत कॉम्प्युटर आला नसावा, कॉम्प्युटर शिकवणारा मॅडमने आम्हाला कॉम्प्युटरच्या प्रॅक्टिकलसाठी मुलुंड पश्चिमेला घेऊन गेले. तेव्हा मी पहिल्यांदा कॉम्प्युटर पहिला. तिकडच्या शिक्षकाने त्यांच्याकडे कॉम्प्युटर क्लास लावायला सांगितलं. दोन वर्षांचा कोर्स होता. फीस सात हजार रुपये इतके होते. सर्टिफिकेट मिळाल्यावर अमेरिकेत नोकरी मिळु शकेल असे ते बोलले. मला माहित होतं आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मी तो विचार मनातून काढून टाकला. नाहीतर मी तेव्हा कोर्स पूर्ण करून अमेरिकेत गेलो असतो!!

    मी T.Y. कॉमर्सला असताना अण्णा आजारी होते. आम्ही चार भावंडं अण्णांनी आमच्या तिघांच्याही भविष्याची सोय केली होती. वेंकटेश अण्णा इकॉनॉमिक्समध्ये M.A. करून lecturer बनणार होता. त्याची शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी घेतली होती. पांडुरंग अण्णाला मंजुनाथ शाळे समोर संदेश स्टोअर्स दुकानाची व्यवस्था करून दिली. आता राहिलो मी. माझ्यासाठी अण्णाने टिळक नगर विद्यामंदिरा समोर जागा घेऊन ठेवली. त्या जागेवर किराणाचा दुकान होतं. टिळकनगर शाळेसमोर राम कृपा बिल्डिंगमध्ये मुरडेर्श्वर आजी राहायच्या. त्यांची जागा होती. एका बाजूला पिठाची गिरणी तर दुसऱ्या बाजूला पॉवर लॉड्री होती. जानेवारी १९८३ ला ती जागा अण्णांनी घेऊन ठेवली. त्या जागेवर काय करायचं ठरवलं नव्हतं. अण्णांच आणि माझं  चांगलं पटायच. "फ्रेंड्स स्टोअर्स' अक्ख मी सांभाळायचो. त्यामुळे अण्णा माझ्यावर खुश!!! माझी T. Y. B.com ची परीक्षा संपल्यावर घरी चर्चा झाली घेतलेल्या जागेवर काय सुरू करायचं?

     "फ्रेंड्स स्टोअर्स'मध्ये बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी यायचे. त्यातले काही विद्यार्थी कॉलेजच्या पुस्तकांची लायब्ररी सुरू करायला सांगायचे. जर विद्यार्थी स्वतःहून सांगत असतील तर छोट्या प्रमाणात कॉलेजची लायब्ररी सुरू करायला हरकत नाही असा विचार मनात आला. मी अण्णा आणि वेंकटेश अण्णांने निर्णय घेतला. दोन कॉमर्सचे आणि तीन सायन्सचे विद्यार्थी सभासद होण्यासाठी तयार झाले. वेंकटेश
अण्णांने काही अकाउंट्सची पुस्तके, केमिस्ट्रीची पुस्तके छान बायडिंग करून आणले. पुस्तकांचे सिलेबस बदलत असल्यामुळे पुढे लायब्ररी सुरू ठेवण्यास जमलं नाही.

       माझी शेवटच्या वर्षाची परीक्षा संपली. आता पुढे काय? याचा विचार करणं भाग पडलं. कुठल्याही परिस्थितीत नोकरी करायची नाही असं माझ ठामपणे ठरवलं!! घरून पण काही आग्रह नव्हताच. मी जे काय ठरवणार त्याला घरातल्या सर्वांचा पाठिंबा होताच. नेमकं अण्णाने जागा घेऊन ठेवली होती. कुठला तरी व्यवसाय सुरू करूया असा मनात विचार आला. दुकानात सुरू केलेलं वाचनालय त्या जागेवर करूया असा मनात विचार आला. अण्णा आणि इतरांशी चर्चा केली. वाचनालय सुरू करायचं ठरलं. काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा. वाचनालय व्यवसाय निवडण्याचामागे बरीशी कारण होती. वाचनालयात स्वतः बसायची गरज नव्हती. एखादा स्टाफ ठेवलं तरी चालत. माझ्याकडे गेले पाच सहा वर्षांचा पुस्तकांबरोबरचा अनुभव होता. दुकानामुळे ओळखीही भरपूर होत्या. महत्वाचं म्हणजे गुंतवणूक कमी लागणार. त्यामुळे जास्त भांडवलाची गरज नव्हती.
 
     वाचनालय सुरू करायचं अजून एक मुख्य कारण माझी स्वतःची वाचनाची आवड. लहानपणी कुंदारपूरमध्ये संघाच्या लायब्ररीत जायचो. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस असे बरेचसे थोर पुरुषांचे चरित्र वाचले होते. दहावी नंतर दुकानात बसायचो. दुकानात बाबुराव अर्नाळकरांचे बरीचशी छोटी छोटी पुस्तके होती तेव्हा त्यांची किंमत दीड ते दोन रुपये असायची. दुपारी एकटा असताना मी त्यांची पुस्तके वाचायचो. रणझुंझार, काळापहाड असे नायक असलेली रहस्यमयी छोटी छोटी पुस्तके मला खूप आवडायची.बाबुराव अर्नाळकरांची ही पुस्तके मला वाचनालय सुरू करण्यास कारणीभूत ठरली.

     अण्णांनी दुकानासाठी सारस्वत बँकेकडून कर्ज घेतलं होतं. सारस्वत बँकेला दुकानाच कागदपत्र व वार्षिक अहवाल द्यायला लागायचं. दुकानाच अकाउंटसाठी मी पै सरांकडे गेलो. सरांनी विचारलं दुकान कसं चालाय तुझं शिक्षण झालाय फक्त निकाल लागायचं बाकी आहे. पुढे काय करणार आहेस? मी वाचनालय सुरू करण्याच सांगितलं. थोडाफार भांडवल ही लागेल असं बोललो. सरांनी लगेच पाच हजार रुपये काढून दिले!!

     हातात पैसे होते अण्णांनी घेऊन ठेवलेली जागाही होती. वाचनालय सुरू करायचं ठरलं. लगेच कामाला लागलो. सुरुवातीला जागेच काम सुरू केलं. बरेच दिवस जागा रिकामी पडून असल्यामुळे वरचे पत्रे बाजूची भिंत खराब झाली होती. समोरच शटर पण गंजल होत. आमच्या ओळखीच्या एका कडीयाला बोलावलं सर्व नीट करून भिंतीला रंग-रंगोटी करून घेतली. सर्व काम संपल्यावर जागा छान दिसत होती. जागा समोरून छोटी असली तरी आतून खूप मोठी. वाचनालयाला पुरेशी एकूण तीनशे फूटची जागा. पुस्तक मांडण्यासाठी तयार असलेले चार लोखंडी रॅक मागवले. एक टेबल, एक पंखा, चार बल्ब मागवून इलेक्ट्रिक कामं करून घेतल.


     जागा तयार होती आता नाव काय द्यायचं? कधी पासून सुरुवात करायची?? हे ठरवायचं होतं. त्यावेळी डोंबिवलीत शंभराहून अधिक छोट्या-मोठ्या वाचनालय होत्या. त्यातले काही वाचनालयामध्ये एक हजारपेक्षा जास्त सभासद होते. फक्त मानपाडा रोडवर पाच सहा वाचनालय होत्या. विकास वाचनालय, ज्ञान विकास वाचनालय, योगायोग वाचनालय, ज्ञानदा वाचनालय अश्या कित्येक वाचनालयात पुष्कळ गर्दी असायची आणि वाचकही खूप असायचे. प्रत्येक वाचकांचे दोन-दोन, तीन-तीन वाचनालय असायच्या. वाचक एका वाचनालयातून पुस्तके तर दुसरीकडून मासिकं आणायचे. घरातले सर्वजण पेपर व पुस्तके वाचायचे. वाचनालये सुद्धा नवीन पुस्तके, नवीन मासिकांनी भरलेली असायच्या. आपली जागा डोंबिवली शहराच्या एका कोपऱ्यात होती. कितपत सभासद जमतील याची शंका होती. मी पण पुस्तकांच्या जमवा जमविला लागलो.


     दुकानात बरीचशी कॉलेजची पुस्तके होती. सुहास शिरवळकर, अरुण हरकारे, गुरुनाथ नाईक, प्र.के.अत्रे, व्ही. स. खांडेकर अशा वेगवेगळया लेखकांच्या आणि काही ऐतिहासिक मिळून शंभरेक मराठी कथा, कादंबऱ्या विकत आणल्या. पुस्तकांना शिवून बायडिंग करून घेतले. आता फक्त नाव आणि तारिख ठरवायची होती.

       उदघाटन समारंभ करायचा नव्हता. फक्त देवाचा फोटो ठेवून जवळचे नातेवाईक, काही मित्र, काही दुकानाचे नेहमीच्या गिऱ्हाईकांना बोलवायचं ठरवलं. अण्णा बोलले फ्रेंड्स नावं चांगलं आहे पुढे लायब्ररी किंवा वाचनालय शब्द लावलं की झालं. मी विचार केला फ्रेंड्स इंग्लिश शब्द आहे त्याला लायब्ररी हाच शब्द जुळेल म्हणून फ्रेंड्स लायब्ररी असं नाव सुचलं. आणि सर्वांनी ते मान्य ही केलं. आता तारीख आणि नावाचा फलक फक्त राहिलं होतं. बोर्ड लिहून देणाऱ्या एका पेंटरला बोलवलं त्यांनी निळा आणि लाल रंगात छानपैकी फ्रेंड्स लायब्ररी नावाचा बोर्ड बनवून दिला. माझ्या कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाचा निकाल यायचा होता. त्याच्या आधीच बावीस मे ला वाचनालय सुरु करायचं ठरलं.


    एकवीस मे ला सर्व तयारी पूर्ण केली. दुकानातील पुस्तके, नवीन विकत आणलेल्या कथा, कादंबऱ्या लोखंडी रॅकवर सजवून ठेवल्या. पुस्तकांना नंबरही दिले गेले. नावाचा बोर्ड लावून घेतला. फक्त कोणाला आधी दिसू नये म्हणून त्यावर रद्दीचा कागद लावून घेतला.वेंकटेश अण्णाने माधुरी म्हणून एका स्टाफची नेमणूक केली.


                                            २२ मे १९८६ रोजी "फ्रेंड्स लायब्ररीची" स्थापना झाली!!!
    पहिल्याच दिवशी तीन सभासद झाले. वृषाली वालावलकर हिने "फ्रेंड्स लायब्ररीची" पहिली सभासद म्हणून नाव नोंदणी केली...

16 comments:

  1. पै वाचनालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा वाचनालय कसे सुरु केले याची सविस्तर माहिती मिळाली. तुम्ही खूप प्रगती केली आणि कराल यात तुमच्या अण्णांच्या दुरद्रुष्टीला प्रणाम

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद.

      Delete
  2. खूप लहान वयात स्वतःचा व्यवसाय सुरू केलात आणि नांव
    कमावलेत! Great Achievement!

    ReplyDelete
  3. मेहनती आहात म्हणून यश आहे
    आनंद वाटला.......

    ReplyDelete
  4. अभिनंदन आणि शुभेच्छा!

    ReplyDelete
  5. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा ! पुढल्या वर्षी Silver Jubilee !!

    ReplyDelete
  6. वर्धापनदिनाचा औचित्य साधून तुम्ही खूप छान आठवण लिहीली आहे.तुमच्या लेखनाला आणि लायब्ररीला खूप शुभेच्छा!

    ReplyDelete