Monday, May 18, 2020

एका दिवसात ६०० अंडी आणि ३०० ब्रेड विकण्याचा विक्रम

माझा जास्तीत जास्त वेळ दुकानात जायचा. कॉलेज नसेल तर सकाळी साडेसहाच्या सुमारास मी दुकान उघडायचो. दुकानातल्या सामानांची मांडणी करेपर्यंत नऊ वाजायचे. फ्रेंड्स स्टोअर्स एक सुपरमार्केट सारखच होतं. पुस्तकाचं दुकान असलं तरी आम्ही दुकानात अंडी, ब्रेड, पाव, बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट, फरसाण, अगरबत्ती, नारळ असे बरेचसे सामान ठेवायचो. सकाळी दुकान उघडायच्या आधीच लोकं अंडी आणि ब्रेड खरेदीला यायचे. लोक जास्त करून अर्धा ब्रेड घ्यायचे त्या काळी कंपनी कडून अक्खा ब्रेड येत होता. तो ब्रेड चाकूने मध्येच कापून वर रद्दी पेपर ने बांधून देत होतो. त्यात खूप वेळ जात होता. सर्व सामान बाहेर काढायला मला कमीत कमी एक दीड तास लागायचा. त्यामध्ये आलेल्या गिराई गिऱ्हाईकांना सामानही द्यायचं. त्यात अंडीसाठी कागदी पिशव्या वापरायचो. दुपारच्या वेळेला कागदी पिशव्या मीच तयार करायचो. पिशव्यांसाठी खळ पण मीच बनवायचो. एका तपेलात एक ग्लास पाणी, दोन चमच मैदा टाकून उकळल की दोनशे पिशव्यासाठी खळ तयार!! दुकानाची मांडणी झाली की चहा प्यायला घरी.

   १९८४ ला माझ्या भाचा (मोठ्या बहिणीचा मुलगा) प्रेमानंद गावाहून (कळसा ,चिकमंगळूर जिल्हा कर्नाटक) पुढच्या शिक्षणासाठी राहायला आमच्याकडे आला होता. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. त्याला पेंढरकर कॉलेजमध्ये आर्टससाठी प्रवेश मिळाला. तो पण माझ्यासोबत दुकानात असायचा. दुकानाची खरेदी सर्व अण्णा बघायचे. त्यांचं पेमेंट पण अण्णांच करायचे. मी फक्त विकायचं काम करायचो. जर अण्णा कुठे बाहेर गेले, समजा गावाला वगैरे तर सर्व जबाबदारी माझ्याकडे असायची. एकदा सर्वात जास्त ब्रेड विकणारी विब्स कंपनी बंध झाली होती. तेव्हा आम्ही मुलुंड वरून मॉडर्न ब्रेड आणून विकायचो. कुठलही गिऱ्हाईक परत जावू नये हा त्यामागचा एकमेव हेतू असायचा.
दिवाळीत आम्ही भरपूर सामान विकायचो. अण्णा मुंबईच्या बाजारातून दिवाळीत विक्रीसाठी ग्रीटिंग कार्ड्स आणायचे. दिवाळी शुभेच्छा पत्र, वेग वेगळ्या नक्षीचे हे पत्र लोकं बाहेरगावी पाठवण्यासाठी पण खरेदी करायचे. जवळपास दिवाळीच्या दहा दिवस आधीपासून लोकं खरेदीला यायचे. आम्ही दुकानात फटकेही ठेवायचो. तेव्हा दुकानात फटाके ठेवण्यासाठी परवान्याची गरज नव्हती. फटाक्यांचा धंदा असा होता की त्यात जो नफा असतो तेवढाच माल उरायचा. पुढच्या वर्षीसाठी ठेवायला लागायचा.

    १९८४ बुधवार चोवीस ऑक्टोबरला दिवाळी होती.दिवाळीसाठी खूप सामान भरलं होतं. मी ,अण्णा, प्रेमानंद आणि दोन कामगार होते. दुकानात फटाके ,ग्रीटिंगस, ड्रायफ्रूट चे बॉक्स , उटणे, मोती साबण असे बरेचसे वस्तू विकायला ठेवले होते .गर्दीही भरपूर होती.भरपूर सामान विकलं गेलं होतं.फक्त थोडेफार फटाके आणि ड्रायफ्रूट बॉक्स शिल्लक होते.ते पुढच्या पाच सहा दिवसात संपणार होते.

    ३१ ऑक्टोबरला सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास रेडिओ आणि टीव्हीवर बातमी आली, भारताचे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्याच अंगरक्षकाने मारले. बातमी हळू हळू पसरायला लागली. दुकाने सर्व बंध ठेवण्यासाठी लोक आग्रह करत होती. मानपाडा रस्त्यावरील सर्व दुकानं बंद करायला सुरुवात झाली. मला पण लोकांनी दुकान बंद करायला सांगितलं. मला आपल्या देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी बद्दल खूप आदर होतं. त्यादिवशी मी खूप विब्स ब्रेड घेऊन ठेवले होते. सर्वांनी दुकानं बंध ठेवल्यामुळे आम्ही पण साडेअकरा च्या दरम्यान दुकान बंद केलं. दुपारी जेवून शांतपणे झोपलो. संध्याकाळी पाच वाजता खाली उतरलो. बघतो तर सर्व दुकानं बंद होती. अख्या टिळकनगर परिसर शांत होतं. मला फक्त ब्रेडची चिंता होती. सेल्समॅनने उरलेले ब्रेड पण माझ्याकडे ठेवले होते. संध्याकाळी घरून चहा नास्ता करून आलो. मी आणि प्रेमानंदने संध्याकाळी सात वाजता अर्ध शटर उघडं ठेवून दुकान उघडलं. सर्व दुकानं बंध होती, टिळकनगरमधील आपलं एकच दुकान उघडं असल्यामुळे पुष्कळ गर्दी झाली. त्या दिवशी फक्त दोन तासात जवळपास सहाशे अंडी आणि जवळ जवळ तीनशे विब्स ब्रेड विकले गेले....

माझा आवडता नट राजेश खन्ना. त्याची एक वेगळीच स्टाईल होती. डोळे मारणं, मान हलवण्, त्याची बोलायची पद्धत या सर्व गोष्टींमुळे मला खूप आवडायचा तो राजेश खन्ना. त्याच्या चित्रपटाची स्टोरी पण चांगली असायची. त्याच्या जास्त करून सर्व चित्रपटाची गाणी हिट होती. किशोर कुमारचा आवाज त्याला एकदम सूट करायचा. सर्वांच्या तोंडावर त्याच्या चित्रपटाची गाणी असायची. त्याची हेअर स्टाईल पण खूप प्रचलित होती. अमिताभचा मुकदर का सिकंदर हा माझा सर्वात आवडता चित्रपट "ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना' माझं आवडत गाणं.का माहीत नाही हे गाणं लागलं की थोड्या वेळासाठी मी स्तब्ध होतो. बुधवारी एकतीस ऑक्टोबरला श्रीमती इंदिरा गांधी यांचं निधन झालं. दुकाने बंद होत्या. शुक्रवारी टिळक सिनेमगृहमध्ये अमिताभचा "शराबी" चित्रपट लागला. अमिताभच्या कुठल्याही चित्रपटाला पाहिल्या दिवशी खूप गर्दी असायची. तिकीट ब्लॅक ने घ्यायला लागायचं. त्यादिवशी लोकं घरातून बाहेर पडायला मागत नव्हते. आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं रात्री नऊच्या शो ला जायचं. सर्वांच्या घरातले नाही म्हणत होते. एवढं काय आहे दोन दिवस जाऊ दे. आम्हाला तर त्याच दिवशी जायचं होतं. पावणे नऊला घरून निघालो. टिळक सिनेमगृहच्या बाहेर पहिल्यांदा अमिताभचा चित्रपट असून सुद्धा काहीच गर्दी नव्हती. एका माणसाकडे बरेचसे तिकीट होते. तो त्या तिकिटं कमी दराने विकत होता. आयुष्यात पहिल्यांदा छापील किंमतीपेक्षा कमी पैसे देऊन अमिताभचा सिनेमा पाहायला मिळाला. ते पण पहिल्याच दिवशी!!! चित्रपट आवडला सर्वांना पण येतानाची भीती होती आम्ही चार जण होतो न घाबरता दहा मिनिटात आपापल्या घरी पोचलो...

10 comments:

  1. कठीण परिस्थितीत शांत पणे निर्णय घेतला आणि विक्रमी विक्री केली. आणि आवडता पिक्चर बघितला ग्रेट आहात पै

    ReplyDelete
  2. फार छान
    बरकाव्यासाहित वर्णन

    ReplyDelete
  3. तुमच्या अनुभवांची शिदोरी नसून जादुगाराची पोतडी आहे, त्यातून तुम्ही काय बाहेर काढून वाचकांना आश्चर्याचा सुखद धक्का देत असता! एवढे वैविध्य पूर्ण आयुष्य फार कमी लोकांच्या वाटेला येत! आणि तुमची लेखनशैली त्यात भर घालते, वाचकाला खिळवून ठेवते

    ReplyDelete
  4. तुमच्या यशामागचं रहस्य तुमची मेहनत आणि शांत मनाने घेतलेले निर्णय! जो तुमचा स्वभावच आहे. खूप खूप शुभेच्छा!!

    ReplyDelete