Saturday, May 16, 2020

माझ्या कारकिर्दीत "फ्रेंड्स स्टोअर्स" मध्ये मी विकलेलं सर्वात महागडं पुस्तक....

आमच्या "फ्रेंड्स स्टोअर्स" दुकानाला सुरू करून पाच वर्षे होऊन गेले होते. हळूहळू धंदा वाढत होता. त्याकाळी परीक्षा संपल्यानंतर किंवा परीक्षेचा निकाल लागल्यावर लोक आपल्या मुलांचे वहीमध्ये उरलेल्या न लिहलेल्या पानं बांधून घेऊन येत होते. आम्ही त्यातले एकेरी, दुहेरी, चारेगी, चौकटी व इतर पानं वेगळे करायचो आणि ती पानं एकत्र करून छान पुठ्ठा बायडिंग करून तयार झालेली नवीन वही अत्यल्प किमतीत द्यायचो. बायडिंगला बाजूच्या काकी स्मृती मधील भारत प्रिंटिंग प्रेसमध्ये द्यायचो. तिकडे डेव्हिस नावाचा मित्र होता तो कमी किमतीत वह्या बायडिंग करून द्यायचा. ती वही मुलं रफ वही म्हणून वापरायचे. त्यामुळे वहितल्या उरलेल्या पानाचा सदुपयोग होत होता. मुलांना कमी किमतीत वही बनवून मिळायची. सुट्टीमध्ये दुकानात असे भरपूर वह्या यायच्या. थोडीफार भांडणही व्हायची. आम्ही जास्त पानं दिली होती आमची दुरेगी पान होती वगैरे.. धंदा म्हटलं की सर्व चालायचं!!

    त्याकाळी कॉलेजची नवीन पुस्तके कमी लोकं खरेदी करायचे. कॉलेजच्या पुस्तकांची किमती ही जास्त असायची. काही पुस्तके खूप महाग असायची. सर्वसामान्य लोकांना नवीन पुस्तके खरेदी करायला परवडत नसे. लोक काठ कसर करून पैसे खर्च करायचे. दुकानातून जुनी पुस्तके किंवा मित्र-मैत्रिणीकडून पुस्तके आदल्या-बदली करून घेत असायचे. जुनी पुस्तके निम्म्या किमतीत  मिळत असल्यामुळे जुनी पुस्तकांना जास्त मागणी असायची. मी तेरावीत असताना कॉलेजच्या पुस्तकांसाठी एक नवीन योजना सुरू केली. अशी योजना मुंबईत प्रचलीत होती. जे कोण कॉलेजची पुस्तके आमच्याकडून घेत होते ते पुस्तक एक वर्षांनी मूळ किंमतीच्या साठ टक्क्यांनी आम्ही परत घ्यायचो. पुस्तके देताना त्या पुस्तकाच्या मागे नियम व अटीचे रबर स्टॅम्प मारून द्यायचो. दोनच नियम महत्वाचे एक पान फाटलेली नसावी,दुसरं अभ्यासक्रम बदलेला नसावा. बरेच लोक त्याबदल्यात पुढच्या वर्षाची पुस्तके घ्यायचे. ज्यांना पुस्तके नकोत त्यांना पुस्तकांच्या मूळ किंमतीच्या साठ टक्के रक्कम परत. याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचे पैसे वाचायचे. पुस्तकांचा चांगलाच उपयोग होत होता. या योजनेमुळे बरेचसे विध्यार्थी आमच्याकडे यायला लागले.

   आमचं दुकान थोडंसं आत असलं तरी आमच्याकडे अख्या डोंबिवलीतून लोकं पुस्तकं घ्यायला यायचे. अण्णांचा अनुभव व आमच्या तिन्ही भावंडांची मेहनत, लोकांशी असलेल्या व्यवहार, संबंधांमुळे सर्वांशी चांगली नाती जुळत होत होती.

     मी तेरावीची परीक्षा दिली होती दुपारी दुकानात मी एकटा होतो. दुकानासमोर निळया रंगाची प्रीमियर पद्मिनी कार येऊन उभी राहिली. कार तशी माझ्या परिचयाची, अधून-मधून त्या कार मधून विको कंपनीचे घरातली एक छोटी मुलगी आणि मॅडम आमच्या दुकानात पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर सामान घ्यायला याच गाडीतून यायच्या. पण त्या सकाळच्या वेळी यायच्या. आज एक गृहस्थ त्या गाडीतून उतरले त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं. ते स्वतःगाडी चालवून आले होते. ते आमच्या दुकानात आले आणि मला विचारलं दुकानात अजून कोण आहे का? नाही सध्या मी एकटाच आहे, बोला ना काय हवंय? तुम्ही बाहेरची पुस्तके मागवून देता का? मी हो बोललो. मी हो म्हणताच त्यांनी एक चिट्टी काढली आणि माझ्याकडे दिली. त्यात पुस्तकाचं नाव आणि प्रकाशनच नाव लिहलं होतं. ते बोलले पुस्तक इंग्लंडच आहे तुम्ही मागवून देऊ शकता का? मी बोललो मला दोन तीन दिवस द्या मी कळवतो तुम्हाला. आपल्या घरातले आमच्याकडे खरेदीला येत असतात त्यांच्याकडे निरोप देतो. चालेल बोलून ते निघून गेले. आम्ही कॉलेज व इंग्रजी पुस्तकांची ऑर्डर मुंबईतल्या स्टुडंट एजन्सीकडे द्यायचो. त्यांचं मागच्या महिन्याचं बिल या महिन्याच्या पाच तारीखपर्यंत आम्ही चुकतं करायचो. मी विकोतल्या सरांनी दिलेली चिट्टीतल नाव एका वहीवर लिहून घेतलं चिट्टी एजन्सीकडे पाठवली. तेव्हा आमच्याकडे फोन नव्हता. बाजूला मनसुखलाल हिरजी यांच्याकडे एकच फोन होता. काही अर्जेन्ट असेल तर आम्ही तो नंबर द्यायचो. दुसऱ्याच दिवशी एजन्सी वरून त्या फोनवर मला कॉल आला. त्यांनी विचारलं अण्णा कुठे आहेत? मी बोललो ते गावाला गेलेत सध्या मीच दुकान संभाळतोय. काल जे चिट्टी पाठवली होती ना ते पुस्तक इंग्लंडच आहे त्याची किंमत पाउंड स्टर्लिंगमध्ये आहे अंदाजे सात ते आठ हजार किंमत होईल ट्रान्सपोर्ट वगैरे पकडून चालत असेल तरच आम्ही ते पुस्तक मागवू आणि हां पुस्तक कुठलाही कारणाने परत घेतलं जाणार नाही. ज्यांनी ऑर्डर दिली त्यांना नीट विचारून कळव बोलले. किंमत सात ते आठ हजार ऐकल्यावर मी पण सुन्न झालो.


परत दोन दिवसांनी सर स्वतः दुकानात येऊन पुस्तकाबद्दल चौकशी केली. मी त्या पुस्तकाची किंमत सांगितली पुस्तक ऑर्डर देऊन पंधरा दिवसांनी येईल, ते परत करता येणार नाही चालेल का? ते चालेल बोलले फक्त त्याच लेखकाचे तेच पुस्तक पाहिजे. लगेच त्यांनी पाच हजार रुपये ऍडव्हान्स ही दिले. आता ऑर्डर नक्की झालं होतं. पाच हजार रुपये हातात आले होते महिन्याभरात सुध्दा एवढी रक्कम जमा होत नसायची. आता पुस्तक मागवयाचं होत. मी लगेच एजन्सीला त्या पुस्तकाची ऑर्डर दिली. ऍडव्हान्स पाच हजार पाठवून दिले. पुस्तकाची ऑर्डर देऊन पंधरा दिवस होऊन गेले अजून पुस्तक आलं नव्हतं परत चौकशी केली तर दोन दिवसात येईल असं कळलं. दोन दिवसांनी किशोर ट्रान्स्पोर्टची गाडी दुकानासमोर येऊन उभी राहिली. मला फक्त एक पुस्तक ट्रान्सपोर्टमध्ये येईल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की एजन्सीचा माणूस पुस्तक घेऊन येईल. मी ट्रान्सपोर्टवाल्यांना बोललो की माझं सामान नाहीये. ट्रान्सपोर्टवाल्यांनी बिल दाखवल ते एजन्सीच होतं. ट्रान्सपोर्ट वाल्यांनी ट्रक मधून आंब्याच्या पेटी सारखी एक पेटी काढली आणि दुकानात घेऊन आले. त्यांनी जे दहा रुपये मागितले ते मी देऊन टाकले. पेटी ताब्यात घेतली. ती पेटी थेट इंग्लंड वरून मुंबईला आली होती. मुंबईहून ते पुस्तक पेटीमध्ये ठेवून नीटसर पाठवलं होतं. एवढं किमतीच पुस्तकं मी कधीच बघितलं नव्हतं. अंदाजे पेटी सकट त्याच वजन चार किलो असावं बहुतेक. आता विकोवाले सरांची वाट बघत होतो. सकाळी मॅडम आल्या, त्यांच्या बरोबर निरोप पाठवला.दुसऱ्या दिवशी सर स्वतः आले त्यांनी ती पेटी बघितली पैसे विचारले मी त्यांना सात हजार सातशे पन्नास रुपयांच बिल दिलं. त्यांनी पाच हजार रुपये ऍडव्हान्स दिले होते ते वजा करून उरलेले दोन हजार सातशे पन्नास रुपये देऊन पुस्तकाची पेटी ताब्यात घेतली ते बोलले मी घरी जाऊन पेटी उघडून बघतो काही असेल तर निरोप देतो. पैसे हातात आले होते पण निरोप आल्याशिवाय चैन पडत नव्हतं. दोन दिवसांनी पुस्तक बरोबर असल्याचा निरोप आला. पुस्तकबरोबर नसतं तर खूप नुकसाव न झालं असतं. माझ्या जीवात जीव आला. माझ्या पुस्तकातल्या व्यवहारातील सर्वात जास्त किमतीच पुस्तक मी विकलं होतं.....

16 comments:

  1. वा।पै सर हे तर मोठे आव्हान होते छान तुम्हाला खूप आत्मविश्वास निर्माण झाला मस्त अनुभव.

    ReplyDelete
  2. वा सर नुसत वाचतांना आमचाही जीव टांगणीलाच होता की सर त्या पुस्तका बद्दल काय म्हणतात हे ऐकण्यासाठी. हेट्स ओफ सर.

    ReplyDelete
  3. मला कॉलेजमधील ऑनलाईन पुस्तक खरेदीची आठवण झाली
    पुस्तक अमेझॉन वर शोधा faculty ला सांगा बजेट तपासा आणि ऑर्डर दिली की पुस्तक येण्याची वाट बघा
    एवढं करून कन्टेन्ट wise पुस्तक योग्य नसेल तर बजेट वाया गेल्याचे दुखः वेगळेच.

    ReplyDelete
  4. विलक्षणीय!
    केल्याने होत आहेर आधी केलेच पाहिजे.. हे तुम्ही दाखवून दिले, तुमच्या हिंमतीची दाद द्यायला हवी!

    ReplyDelete
  5. खूप adventurous आयुष्य.

    ReplyDelete
  6. सर, फारच सुंदर प्रसंग!वाचताना ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतेय.अत्तराच्या कुपीतल्या अत्तरासारखी आठवण!

    ReplyDelete
  7. तुम्हाला ह्या प्रसंगामुळे खूप आत्मविश्वास मिळाला असेल हे खरच. पेंढरकरांनी डोंबिवली शहराच्या उन्नतीमध्ये खूप महत्वाचा वाटा उचलला आहे.

    ReplyDelete