Wednesday, May 6, 2020

१९८०-८१ दहावीची परीक्षा दिली.....

  घरातल्यांना माझ्या अभ्यासाची काळजी नव्हतीच. आई, प्रेमआक्का, अण्णा, भाऊ सर्वांना माहीत होत की मी चांगले गुण मिळवून पास होणारच.त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नववीत मी वर्गात चौथा आलो. नववीत असतानाच काही विध्यार्थी दहावीच्या तयारीला लागले होते. वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे क्लासेस, पाठ्यपुस्तके व्यतिरिक्त, सर्व विषयांचे नवनीत चे गाईड, कुटमुटिया प्रश्नसंच,जीवनदिप प्रश्नसंच, नवनीत प्रकाशनाचे २१ अपेक्षित प्रश्नसंच असे बरेचसे पुस्तकं जमवायला लागले. सुट्टीचे वेगळे क्लास. ज्या विषयात जास्त गुण मिळण्याचे शक्यता आहे त्यासाठी शाळेत वेगळे वर्ग. असं सर्वांनी दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती.

  दहावीत पोचलो की पालकांची खूप अपेक्षा असते. चांगले गुण मिळाले तर पुढचं शिक्षण सोपं जाईल. पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन सहज मिळू शकेल. डॉक्टर, इंजिनिअर सारख्या पुढच्या शिक्षणाला सोपे जाईल.म्हणून नववीपासून त्याचे क्रिकेट खेळणे, पत्ते, कॅरॅम सर्व प्रकारचे खेळ, टि.व्ही. बघणं सिनेमागृहातील चित्रपट, बाहेर फिरायला जाणं, मित्राच्या घरी जाणं सर्व बंद!!! एकच ध्येय फक्त अभ्यास आणि अभ्यास. दहावीत चांगले गुण मिळाले पाहिजेत. तुझा मित्र बघ किती अभ्यास करतोय त्याला तुझ्यापेक्षा जास्त गुण मिळतील. त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल तुझ्यापेक्षा तो पुढे जाईल असा ओरडा असायचा.

  मला दहावीच काहीच विशेष वाटलं नव्हतं. नववीनंतर दुकानात बसायला सुरुवात केली. दुकानात दहावीची पुस्तके होतीच. पण मी कधी उघडून बघितलीच नाही. शाळा सुरू झाल्यावर पुस्तकांना हात लावला. मी नियमितपणे शाळेत जायचो. जे शाळेत शिकवायचे घरी येऊन गृहपाठ करायचो घरीच न कंटाळता अभ्यास असायचा तेवढच. बाकी कुठलाही क्लास नाही किंवा कोणी मार्गदर्शन करणारही नाही. घरातल्यांनी पण कधी माझा अभ्यास घेतला नाही. किती अभ्यास झालाय? काय करतोस? कधीच काही विचारलं नाही. दिवाळीत दुकानात नवनीत प्रकाशनाची नवीन २१ अपेक्षित प्रश्नसंच आले.मी त्याबद्दल खूप ऐकलं होतं .पण ते सर्व मराठीत किंवा इंग्रजीत होते .इंग्रजी माझी भारी होती!! सर्व डोक्यावरून जात होतं मग काय !! अण्णाना विचारून कन्नड सोडून बाकी  सर्व विषयांचे मराठीतले २१ अपेक्षित प्रश्नसंच घेतले. कन्नड विषयाचे काहीच उपलब्ध नव्हतं, किव्हा गाईड दुसर काहीच नव्हतं. फक्त पाठ्यपुस्तक. सरांनी शाळेत शिकवलेलं जे वहीत उतरवून घेतलं तेवढच. दिवाळीनंतर मी दहावीच्या अभ्यासाला सुरुवात केली.

   नेहमी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दहावीची परीक्षा सुरू होत असते. माझ्याकडे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस होते. सात विषय, प्रत्येक विषयाला सतरा दिवस मिळणार त्यानुसार अनुक्रमणिका तयार केली. जानेवारीपर्यंत शाळा होती तेव्हा शाळा सुटल्यावर घरी येऊन ठरलेल्या विषयाचा अभ्यास करायचो. थोडावेळ शाळेत दिलेल्या गृहपाठ करत होतो. तसेही अण्णा बोलले होते दहावीच वर्ष आहे परीक्षा संपेपर्यंत दुकानात नाही आलास तरी चालेल. माझ्याकडे पाठ्यपुस्तक शाळेच्या नोट्स आणि सर्व विषयांचे मराठीतून नवनीतचे २१ अपेक्षित प्रश्नसंच होते.अभ्यासाला सुरुवात केली, २१ अपेक्षित मराठीत असले तरी मी त्याच्यावरूनच जास्त अभ्यास केला. इमारतीत माझ्याबरोबर संतोष ओक पण दहावीला होता. तो माझ्यापेक्षा हुशार होता. मला काही प्रश्न पडले की त्याला विचारायचो संतोष नीट समजावून सांगायचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. इमारतीत एक खोली रिकामी होती. त्याची किल्ली संतोष कडे होती. त्या खोलीत मी, संतोष, मुन्ना, अशोक, मनसुख असे आम्ही पाच-सहाजण एकत्र अभ्यास करायचो. दोन तास अभ्यास केला की पंधरा मिनिटं त्याच खोलीत क्रिकेट खेळायचो. अभ्यासाबरोबर थोडं मनोरंजन ही असायचं.

  जानेवारी अखेरीस प्रिलियम परीक्षा जाहीर झाली माझी तेवढी तयारी नव्हती, परीक्षा दिली. सर्व विषयात खूप कमी गुण मिळाले होते. सर ओरडले  सरांचे कन्नड मधील एक वाक्य मला अजून ही आठवत "बर बरूता रायन कुदुरे कथे अगुतीदे' म्हणजे हळू हळू राजाचं घोडं गाढव होत चालंय!! अजूनही दिवस आहेत नीट अभ्यास केलास तर चांगले गुण मिळतील. दिवस व विषयाचे नियोजन केलंच होतं आता मात्र जास्त लक्ष देऊन अभ्यास करायला लागणार. नंतरचा एक महिना मी दिवस रात्र एक करून अभ्यास करायला सुरुवात केली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हॉल तिकीट मिळालं मुलुंड पश्चिमेला माझं सेंटर आलं. माझ्या मित्रांपैकी माझ्या एकट्याच नंबर त्या शाळेत आला होता. मी एकटा जाऊन शाळा बघून आलो. शाळा स्टेशनवरून लांब होती अर्धा तास चालायला लागत होतं. आदल्या दिवशी परीक्षेसाठी नवीन पेन, पेन्सिल, पॅड सर्व तयारी केली. दहावीचा पहिला पेपर असूनसुध्दा घरातून कोणच मला सोडायला आले नव्हते. आईच्या पाया पडून मी एकटाच निघालो. वेळेच्या आधीच शाळेत पोचलो सर्व मुलं पुस्तक काढून वाचत होते. मी मात्र शांत होतो. मला मी जेवढा अभ्यास केला होता तो पुरेसा वाटायचा. मी शेवटच्या घडीला अभ्यास कधीच केला नव्हता. घरून रोज मला खर्चासाठी एक रुपया मिळायचा. पेपर सुटला की स्टेशन जवळच्या दुकानातून आइस्क्रीम घेऊन खायचो. घरी जाऊन परत पुढच्या पेपरच्या तयारीला लागायचो. कुठलाही विषय कठीण गेला नव्हता सर्व पेपर सोपे होते. माझ्याप्रमाणे मी सर्व विषय चांगले लिहिले होते. गुण मिळणं माझ्या हातात नव्हतं. इतिहासाचा शेवटचा पेपर होता. पेपर सुटल्यावर आम्ही सर्व मित्र एकत्र भेटणार होतो. ठरल्याप्रमाणे मुलुंडला मेहुल सिनेमागृहाच्या बाहेर सर्वजण भेटलो.पेपर कसे गेले? कोणाला कुठल्या विषयांवर अंदाजे किती गुण मिळतील? कुठला पेपर सोपा होता? कुठला कठीण गेला? यावर चर्चा झाली. माझं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. पेपर देऊन झाला होता आता जे गुण मिळणार त्यातच समाधान मानल्याशिवाय बाकी काहीच आपल्या हातात नव्हतं. परीक्षेच्या आधीच माझं ठरलं होतं मुलुंडच्या मेहुल सिनेमागृहात जो चित्रपट असेल तो बघायचा. मेहुलला मनोजकुमार, दिलीपकुमारचा 'क्रांती ' चित्रपट लागला होता. घरून आधीच पैसे घेऊन ठेवले होते. सर्वांनी पैसे काढले तिकीट घेतलं आणि "जिंदगी की ना तुटे लडी प्यार करले घडी दो घडी" क्रांती चित्रपटात मग्न झालो....

8 comments:

  1. अभ्यासाचे फारचा ताण न घेता दहावीची परिक्षा पार पाडली. आता रिझल्ट ची उत्सुकता बाकी पालकांचे वर्णन बरोबर आहे.

    ReplyDelete
  2. प्रत्येकाला दहावीच्या परीक्षेच्या दिव्यातून जावेच लागते
    तो आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा
    मस्त वर्णन
    योगायोगानं माझे घर मेहुल सिनेमाच्या जवळ आहे
    मी दहावीनंतर burning ट्रेन सिनेमा तिथे बघितला होता ते आठवले

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच योगायोग आहे, धन्यवाद.

      Delete
  3. जिंदगी की ना तुटे लडी प्यार करले घडी दो घडी... Blogs मधून हाच संदेश प्रतीत होतो. अप्रतिम !!

    ReplyDelete
  4. गोष्ट कशी रंगतदार करायची,ते पै कडुन शिकावे.

    ReplyDelete