Friday, May 8, 2020

दहावीत ६१ टक्के आणि शेवटी पेंढरकर कॉलेजात कॉमर्स विभागात प्रवेश मिळाला .....

  दहावीच्या परीक्षेनंतर जास्तीत जास्त माझा वेळ दुकानात जायचा. सर्व शाळांना सुट्टी लागली होती. दुकानात गर्दी कमी असली की मी  मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला जायचो. कधी-कधी पत्ते खेळायचो. दुकान सकाळी सात वाजता उघडलं की रात्री दहा वाजता बंद करायचो. घरी जाऊन लवकरात लवकर जेवण संपवून झोपायला गच्चीवर. घर छोटं आणि माणसं जास्त त्यामुळे घरचे काहीच बोलत नव्हते, त्यांची परवानगी होती. शाळेला सुट्टी लागली होती, घरी उकडत असल्यामुळे इमारतीतले बरेचसे लोकं झोपायला गच्चीवर यायचे. गच्चीवर झोपायची मजा काही निराळीच होती.गच्चीवर झोपायला जाताना बरोबर रेडिओ असायचा. रेडिओवर रात्रीचे बेलाके फूल, छायागीत असे कार्यक्रम असायचे. त्या व्यतिरिक्त नवीन चित्रपटाची गाणी आणि माहिती असायची. मग त्या चित्रपटावर आमच्या गप्पा असायच्या. गच्चीवरील गार वारा, आकाशातील तारे, धावते ढग ती मजा वेगळीच होती. कधीतरी अधून-मधून पाऊस पडायचा. पाऊस पडला की अंथरूण व उशी सकट पायऱ्यांवर जाऊन बसायचो. पाऊस थांबण्याची वाट बघायचो. पाऊस थांबेपर्यंत गाण्याच्या भेंड्या खेळायचो. भेंड्याच्या आरडाओरडामुळे इमारतीतले लोक ओरडायला यायचे रात्रीचे किती वाजले बघा? तुम्ही झोपत नाही आम्हाला तरी शांतपणे झोपू द्या!!

  जून महिन्यात दहावीचा निकाल होता, तारीख समजली होती. आमच्याकडे टिळकनगरला शिल्पा प्रिंटिंग प्रेसमध्ये दहावीचा निकाल एक दिवस आधीच मिळायचा. प्रेस असल्यामुळे त्यांच्याकडे एक दिवस आधी बातमी पत्रात छापण्यासाठी दहावीचा निकाल आलेला असायचा. आपला दहावीचा नंबर दिला की ते निकाल सांगायचे. यासाठी दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी असायची.कधी-कधी गर्दी आवरण्यासाठी पोलीस ही यायचे. मी पण माझा नंबर चिट्टीवर लिहून दिला. मिळालेल्या निकालाप्रमाणे मला दहावीत ६१% गुण मिळाले होते. एवढे कमी गुण मिळाल्यामुळे मी खूपच नाराज झालो. माझा निकाल हातात येताच सरळ रडत रडत घरी गेलो. आई, प्रेमाक्का, भाऊ सर्वांनी विचारलं "काय झालं?" त्यांना निकालाच सांगितलं पण मला काही रडू आवरेना. तेवढ्यात अण्णा पण आले त्यांना कळलं होतं मला ६१ टक्के मिळालेत. ताई पण आली, सर्वांनी समजूत घातली, रडून रडून चेहरा सुजला होता माझा. मी माझा चेहरा लपवत होतो. मी ज्याप्रमाणे अभ्यास केला होता त्यापेक्षा मला खूपच कमी गुण मिळालेले.

   सर्वांशी हसत खेळत राहणार मी त्यादिवशी कोणाशीच बोललो नव्हतो.जेवण पण नीट जात नव्हतं. मला अजून आठवतंय त्यादिवशी गच्चीवर न जाता आईच्या समाधानासाठी थोडा फार जेवून झोपलो....

  दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शाळेत जायच्या तयारीला लागलो अण्णा बोलले मार्कशीट आणि शाळेचा दाखला घेऊन सरळ घरी ये, कॉलेज ऍडमिशनच नंतर बघूया तू काळजी करू नकोस. अण्णांनी धीर दिला. ठरल्याप्रमाणे मार्कशीटआणि स्कूल लिविंग सर्टिफिकेटसाठी शाळेत पोचलो. माझा निकाल मला माहीत असल्यामुळे मी शांत होतो. शाळेत बरेचसे मित्र भेटले. नववीत मी वर्गात चौथा आलो पण यावेळी दहावीत बरेचसे मित्रांना माझ्यापेक्षा जास्त गुण मिळाले होते. सर्व विषयाचे गुण बघत होतो सर्व कागदपत्र घेऊन मी घरी आलो. निकाल हातात होता,सर्व विषयांवर नजर फिरवली ज्या विषयात जास्त गुण पाहिजे होते नेमकं त्याच विषयात कमी गुण मिळाले होते. कन्नडमध्ये शंभर पैकी फक्त त्रेपन्न गणितात दीडशे पैकी फक्त ऐंशी गुण मिळाले होते. एकूण सातशेपैकी चारशे एकोणतीस म्हणजे ६१ टक्के फक्त.

 आता पुढे काय? तसं मला मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हतं. जास्त करून सगळे कॉमर्स, आर्टस् आणि सायन्स या तीन पैकी एक पर्याय निवडत होते. मी पुढचा विचारच केला नव्हता. नोकरी करायची का व्यवसाय करायचा? माझा मित्र संतोष ओक ला ७७ टक्के मिळाले होते, त्यांनी सायन्स निवडलं. मला एकच पर्याय दिसत होता आणि तो म्हणजे कॉमर्स. मी कॉमर्स निवडलं पण ऍडमिशनच काय? कुठलं कॉलेज? तेव्हा डोंबिवलीत कॉलेज फक्त अकरावी बारावी पर्यंतच होतं. पुढच्या शिक्षणासाठी डोंबिवलीच्या बाहेर जायला लागायचं. मी पास झालो त्याच वर्षी डोंबिवली M.I.D.C. मध्ये पेंढरकर कॉलेज सुरू झालं. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला विको कंपनीचे मालक पेंढरकर यांनी कॉलेजसाठी जागा उपलब्ध करून दिली त्या जागेवर कॉलेज बांधलं होतं. पण तिकडे कॉमर्ससाठी एकच वर्ग होता आणि त्या वर्गासाठी फक्त सत्तर टक्केला ऍडमिशन फुल झाली होती. आता डोंबिवलीच्या बाहेर जावं लागणार होतं. व्यंकटेश अण्णा घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये शिकायला होता. त्याने त्याच्या कॉलेजचा फॉर्म आणला होता. नाहीतर मग उल्हासनगर किंवा मुलुंडला जावं लागणार बहुतेक. मला डोंबिवलीतच पुढचं शिक्षण करायचं होतं. ऍडमिशनसाठी धावपळ सुरू होती. एका दिवशी व्यंकटेश अण्णा माझे कागदपत्रे घेऊन ठाण्याला जिल्हा परिषदच्या ऑफिसला जाऊन तिकडेचा फॉर्म भरला. जिल्हा परिषद कडे माझ्यासारखे अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म्स आले होते. मला वाटत जिल्हापरिषदने पेंढरकर कॉलेजमध्ये दुसरा वर्ग सुरू करण्यास सांगितल असावं. पेंढरकर कॉलेजमध्ये दुसरा वर्ग सुरू करण्यात आला. भावाने जिल्हा परिषद मधून कागदपत्रे आणले मग मी आणि भाऊ पेंढरकर कॉलेज मध्ये ऍडमिशनसाठी गेलो. एवढ्या दिवसांमध्ये कॉलेजला सुरुवात पण झाली होती. माझा जीव कासावीस होत होता. कधी एकदाचं ऍडमिशन मिळतय, कधी एकदाचं कॉलेज सुरू होतं असं झालं होतं. पेंढरकर कॉलेजमध्ये फॉर्म भरून दिले. त्यांनी दोन दिवसांनी बोलावलं. आम्ही फी किती भरावी लागेल आणि कॉलेजच्या वेळेची चौकशी करून निघालो.

  आधी आम्ही टिळकनगर वरून पाथर्लीला सुद्धा जायला घाबरायचो. पाथर्लीच्या कोपऱ्यावर जकात नाका होता. तिथून पुढे पंधरा मिनिटाच्या अंतरा वर कॉलेज होतं आजूबाजूला खूप झाडी होती. रात्री तर त्या वाटेने कोणचं जात नव्हतं. दोन दिवसांनी कॉलेजला जाऊन चौकशी केली तर माझं नाव नवीन वर्गात नोंदवल गेल होत. लगेच मी फी भरली आणि मला पेंढरकर कॉलेजात अकरावी कॉमर्समध्ये प्रवेश मिळाला. पुढच्या पाच वर्षांसाठी मी डोंबिवलीतल्या पेंढरकर कॉलेजचा विध्यार्थी झालो....

12 comments:

  1. सर त्या काळात ६१% म्हणजे चांगलेच होते.तुम्ही का वाईट वाटून घेतलेत!सर तुमच्यासारखी बहुआयामी आसामी पेंढरकर महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहात हे महाविद्यालयाला अभिमानाची बाब आहे.लेख नेहेमी सारखा वाचकालाही nostalgia मध्ये घेऊन जातो.

    ReplyDelete
  2. आतापर्यंत सर्व अडचणी वर मात करून परिस्थिती ची जाणीव ठेवून आपण यश मिळवले हे कौतुकास्पद आहे पेंढारकर।चा विद्यार्थी म्हणून पुढील शिक्षण सुरु झाले .लिखाण छान.

    ReplyDelete
  3. SSC syndrome is an ancient concept still very much popular. Though it is not at all related to what one achieves and where one stands and how one feels about self.

    ReplyDelete
  4. स्वागत आहे कॉलेज कुमार !

    ReplyDelete
  5. अभिनंदन सर तेव्हा नाही आता करुया.

    ReplyDelete
  6. त्याकाळात first class म्हणजे कौतुक वाटायचं. तुम्ही उगीचच खट्टु झालात.आठवणी रंगतदार होऊ लागल्यात.

    ReplyDelete