Tuesday, May 12, 2020

(१९८३) मी बारावीत असताना अनुभवलेली रंगपंचमी.....

भारतात लोकं वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे सण साजरा करत असतात. या सणांमुळेच भारतीय संस्कृतीची ओळख आहे. जन्माष्टमी, गोविंदा, राखीपूर्णिमा, गणेशोत्सव,दसरा, दिवाळी आणि होळी असे कित्येक सण आपण साजरा करत असतो. प्रत्येक सणांमागे कारणे ही असतात व त्या दिवसांचे महत्व ही असते. बरेचसे सण पुरातन काळापासून चालत आलेले आहेत. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे वयाप्रमाणे त्या सणांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलत जातो.लहान असताना आपल्याला कोणाची भीती नसते. इतर लोक करतात त्याचप्रमाणे आपण ही त्यांच अनुसरण करत जातो. लहानपणी जी मस्ती-मजा आपण प्रत्येक सणांच्या वेळेला करतो ते कधीच पुढच्या आयुष्यात अनुभवायला मिळत नाही त्या फक्त आठवणी म्हणून आपल्या सोबत राहतात. सारख्या शहरात वेगवेगळ्या प्रांतातून लोकं येऊन स्थायीक झाले आहेत. सणांच्या वेळेला सर्व एकत्र येतात आणि जाती धर्म सर्व विसरून धुमधडाक्यात प्रत्येक सण साजरा करत असतात. आमच्या शिवप्रसाद बिल्डिंगमध्ये सुद्धा आम्ही सर्व एकत्र येऊन नवरात्रीला दांडिया, जन्माष्टमीला गोविंदा, मार्च महिन्यात रंगपंचमी साजरा करायचो.

    मी बारावीची परीक्षा होतो त्याचवेळी २९ मार्चला होळी होती व ३० मार्चला रंगपंचमी आणि माझा हिंदीचा शेवटचा पेपर ३१ मार्च ला होता. हिंदीच्या पेपरला चार दिवसाची सुट्टी होती. शनिवारी २६ मार्चपासून आम्ही होळीच्या तयारीला लागलो होतो. इमारतीच्या आजूबाजूला जिथे जिथे सुके लाकड पडलेली होती ते सर्व आम्ही जमा करायला लागलो. मंगळवारपर्यंत पुष्कळ लाकडं जमा झाली होती. संध्याकाळी इमारतीतले सर्वजण जमा झाले काहींनी नारळ तर काहींनी आरतीचा समान वगैरे आणलं. आम्ही सर्वांनी मिळून एका काठीला आग लावून त्या काठीने होळी पेटवली. लाऊड स्पीकर वर गाणं सुरू होत. प्रत्येकाचं नाव घेऊन त्याच्या बैलाला ढोल जोरात ओरडायला सुरुवात केली. जे जे आम्हाला खेळताना त्रास देत होते त्या प्रत्येकच नाव आम्ही घेत होतो. या सर्व कार्यक्रमात पुढाकार माझाच होता. वर्गणी काढायचो सामान आणायचो खूप मजा केली.

    रंगपंचमीच्या दिवसही. सकाळी लवकर उठून दुकानात गेलो. दुकानात आम्ही रंगपंचमीचे रंग, पिचकारी, फुगे सर्व सामान विक्रीला ठेवायचो. जास्त करून सामान सर्व आदल्या दिवशीच संपायच. उरलेल सामान रंगपंचमीच्या दिवशी दहा वाजेपर्यंत विकायचो.त्यादिवशी आम्ही पिचकारी, फुगे, रंग खूप विकले काही लोकांनी अंडी पण विकत घेतली लोकांवर फेकायला!!! दहा वाजता दुकानातून थोडे रंग, दोन पाकीट फुगे, एक पिचकारी घेऊन घरी निघालो. सर्व मित्र बोलवत होते मी त्यांना घरी जाऊन येतो अस सांगितलं. घरी आई, वहिनी माझी वाट बघत होते. शेजारच्यांनी पुरणपोळी दिली होती. आमच्याकडे पुरण पोळीची पद्धत नव्हती. मला पुरणपोळी वर साजूक तूप, साखर आणि मध टाकून खायची सवय होती. साजूक तूप, साखर आणि मध टाकून दोन पुरणपोळ्यावर दाबून खाल्या. आईने सांगितल्याप्रमाणे चेहऱ्याला, केसांना आणि हाताला खोबरेल तेल लावलं. आदल्या दिवशीच काढून ठेवलेले जुने कपडे घातले आणि मित्रांसोबत होळी मज्जा करायला निघालो. इमारतीतले सर्व मित्र गच्चीवर जमले होते. मला बघताच माझ्या अंगावर धावून आले. सर्वांनी माझ्यावर मनसोक्तपणे रंग लावला.मी पण कोणालाच सोडलं नाही. थोड्यावेळाने आम्हीसर्वजण गच्चीवरून खाली उतरलो. जे घरून बाहेर पडले नव्हते अश्या लोकांच्या घरी जाऊन प्रत्येकाला रंग लावत सुटलो. गम्मत म्हणजे कोणीही विरोध केला नाही. त्यांनाही आवडत होत या खेळण्याच्या नादात कधी एक वाजला समजलंच नाही. सर्वाना भूक लागली, सर्वजण आपापल्या घरी निघून गेले मी पण घरी गेलो अंगोळ केली चेहऱ्याला तेल लावल्यामुळे रंग लवकर निघाला. घरी जेवण तयार होत.थोडासा जेवलो आणि दुपारच्या कामाला लागलो.

    दुकानातून दोन पाकीट फुगे आणले होते. फुग्यात पाणी भरायचं होत. नळाला पाण्याचा दाब कमी होता. फुग्यात पाणी भरलं जात नव्हत .एका बादलीमध्ये पाणी भरलं त्यातून पिचकरीने एक एक फुग्यात पाणी भरून वीस ते पंचवीस पाण्याचे फुगे तयार केले. ते सर्व फुगे बादली ठेवले आणि ती बादली घेऊन गच्चीवर गेलो दुपारचे दोन वाजले होते रस्त्यावर शुकशुकाट होता. दोन-चार लोकं दिसत होते. जाणारा-येणारंमध्ये कोणी ओळखीचे दिसले की फुगा मारायला सुरुवात केली. त्यातलं कोण ओरडायला लागले की खाली लपून बसायचो. माझ्या बरोबर अजून माझे दोघे मित्र होते. कोण होत आठवत नाही. फुगे मारत असताना माझ्या ओळखीतला एकजण रिक्षात बसताना मला दिसले.माझ्याकडे बरेच फुगे शिल्लक होते. त्यातला एक फुगा काढून नेम धरून मी त्यांना मारला. इतक्यात बाजूनी एक जीप वेगाने आली, मी मारलेला फुगा त्या जीपच्या बॉंनेटवर आपटला. फुग्यातलं पाणी आत बसलेल्या माणसावर पडलं. त्यांनी चांगला सफारी ड्रेस घातला होता. गाडीला वेग असल्यामुळे ड्रायव्हरने ब्रेक मारून सुद्धा ती जीप पुढे जाऊन थांबली आणि त्याने गाडी मागे घेतली. गाडी  इमारतीजवळ थांबली त्यातून तीन चार जण खाली उतरले. मी घाबरलो .मी आणि माझे मित्र गच्ची वरून सटकलो. मी बादली घरी ठेवली आणि घाबरत घाबरत खाली आलो. आमच्या इमारतीत तळमजल्यावर VCR च दुकान होतं. तिथला मालक माझ्या ओळखीचा होता. त्याने माझ्या चेहऱ्यावर सिल्वर रंग लावला. मला खूप भीती वाटत होती. तिकडून बाहेर पडलो. रस्त्यावर गुंजन, मानस, काकी स्मृती, राजहंस सोसायटीमधली लोक जमली होती. खूप गर्दी होती. मी जिना चढून घरी जात होतो इतक्यात चार पाच माणसं हातात लोखंडी सळी घेऊन खाली उतरत होते. माझ्या चेहऱ्याला सिल्वर रंग लावल्यामुळे त्यांनी कदाचित मला ओळखलं नाही ते सरळ निघून गेले मी घरी गेलो. नंतर कळलं की त्यांना शेजरच्या रमेशभाई यांनी समजावून सांगितलं लहान मुलं असतील परत असं करणार नाहीत!! त्या दिवशी जर मी सापडलो असतो तर तो पाण्याचा फुगा माझ्या जीवावर बेतला असता.... आणि मी जो पाण्याच्या फुगा ओळखीच्यांवर मारायला गेलेलो तो फुगा चुकून ज्यांना लागला ते होते स्वतः सीताराम शेलार (S. B. शेलार).

10 comments:

  1. प्रत्येक सण समारंभात आनंद मिळवित असे .आठवणी चांगल्या जपल्या

    ReplyDelete
  2. काही आठवणी विसरता न येणार्‍या असतात.आता आठवून मजा वाटते पण तेव्हाची परिस्थिती खूप गंभीर असते. तुमची पण अशीच रंगवून लिहीलेली आठवण!!

    ReplyDelete
  3. फारच मजेशीर किस्सा आणि घाबरवणारा सुध्दा?
    वाचतांना मजा आली

    ReplyDelete
  4. एकदम thrilling )!!

    ReplyDelete