Sunday, May 24, 2020

"फ्रेंड्स लायब्ररी" चे पहिले काही दिवस आणि "फ्रेंड्स स्टोअर्स" मध्ये जून महिना...

२२ मे १९८६ रोजी "फ्रेंड्सलायब्ररी" ची सुरुवात झाली. लायब्ररीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळाच होता. डोंबिवलीतल्या इतर वाचनालयात किती वर्गणी आहे? ते किती पुस्तके देतात? त्यांच्याकडे किती पुस्तके आहेत? किती सभासद आहेत? या सर्वांचा मी कधीच विचार केला नाही. त्यांचे वेळापत्रक, नियम व अटी वेगळ्याच होत्या. फ्रेंड्स लायब्ररीत मी तीस रुपये अनामत रक्कम आणि दहा रुपये महिन्याची वर्गणी ठेवली होती. एकावेळी एक पुस्तक आणि ते महिन्यातून कितीही वेळा बदलण्याची मुभा. विलंब शुल्क नाही. कमीत कमी नियम व अटी ठेवल्या. त्या मानाने आपल्या लायब्ररीत सभासद खूप कमी होते. कारण पुस्तकांची संख्या कमी, नवीन पुस्तकांची भर पडत नव्हती. मासिकं ठेवायला सुरुवात केली नव्हती. सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी पाच ते आठ एवढाच वेळ लायब्ररी उघडी असायची. वाचकांना पुस्तकं बदलायला वेळ कमी मिळायचा. त्यात सोमवारी लायब्ररी बंद. वाचक यायचे पुस्तकं बघून निघून जायचे. जी मुलगी स्टाफ ठेवली होती ती नवीन असल्यामुळे वाचकांना समजून सांगू शकत नव्हती. दुकानाच्या जबाबदारीमुळे मला स्वतःला लायब्ररीसाठी वेळ देता येत नव्हता. रोज संध्याकाळी लायब्ररीत जायचो. दिवसातून एखादा सभासद पुस्तक बदलून गेला किंवा नवीन सभासद नाव नोंदणी झाली की मी खुश. घरी व मित्रांना सांगायचो आज एक सभासदांनी पुस्तक बदललं!! आज एक नवीन सभासद झाला!!! माझ्याकडे भांडवल कमी होतं, त्यामुळे मी जास्त पैसे लायब्ररीत गुंतवू शकत नव्हतो. पण मी ठरवलं होतं जे काही उत्पन्न होईल ते न वापरता त्या उत्पन्नातून नवीन पुस्तके खरेदी करायची. जेणे करून नवीन पुस्तकं वाढतील तसेच नवीन सभासदही नाव नोंदवतील. मला मात्र दुकानात जास्त लक्ष द्यायला लागायचं.

     जून महिन्याला सुरुवात झाली की खूप मज्जा असायची. जून तेरा तारखेला जास्त करून डोंबिवलीतल्या सर्व शाळा सुरू होत होत्या. डोंबिवलीत बरेचसे लोक मुंबईला नोकरीला जात होते. एक तारीखेनंतर सर्वांचा पगार यायचा. एकदा पगार हातात आला की खरेदीला सुरुवात. एक जून नंतर दुकानात तुफान गर्दी असायची. मे महिन्यातच आम्ही वह्या, पाट्या, पाठ्य पुस्तके, नवनीतचे गाईड, जीवनदीप प्रकाशनाचे वर्क बुक, पेन ,पेन्सिल, कंपास पेट्या सर्व समानांचा भरपूर स्टॉक करून ठेवायचो. सकाळी गर्दी कमी असायची तेव्हा सर्व सामान लावून घ्यायचो. संपलेल्या सामानाची यादी तयार करून मार्केटला पाठवायचो. संध्याकाळी मात्र पाच वाजल्यापासून गिऱ्हाईकांच्या गर्दीला जी सुरुवात व्हायची तर कधी नऊ वाजले हे कळायचं नाही. दुकानात मी आणि दोन कर्मचारी असायचो. कॅश सांभाळण्यासाठी कामत पेनचे मालक लक्ष्मण कामत असायचे. दहा ,वीस, पन्नास रुपयांच्या नोटांनी गल्ला भरलेला असायचा. मी आलेल्या गिऱ्हाईक सांभाळायचो. वेगवेगळ्या शाळांची यादी लोकं घेऊन यायचे. पुस्तक शोधताना खूप वेळ जायचा. सर्व पुस्तकं मिळाली की गिऱ्हाईक खुश!! नाहीतर ते नाराज होत होते. मग त्यांना त्या पुस्तकांसाठी दुसऱ्या दुकानात जायला लागायचं आम्ही सांगायचो की एक दोन दिवसात मागवून देतो पण लोक काही ऐकायचे नाही. संध्याकाळी गर्दी असताना काही लोकं पुस्तक डबल झाली म्हणून परत घेऊन यायचे. घरातले दोन तीन माणसं यादीत न मिळणारी पुस्तकं जिथे मिळेल तिथून आणायची आणि डबल झाली की आमच्याकडे परत करायला यायचे. या वरून पुष्कळ भांडण व्हायची. तुमच्या बिलावर पुस्तके परत घेतले जाणार नाही असं कुठेच लिहलेले नाहीये असे काही लोक म्हणायचे. मी मष्करीत म्हणायचो बिलावर पुस्तके परत घेतो असं पण कुठेही लिहलेले नाहीये!! ओळखीचे असले तर त्यांना दुपारी मी एकटा असतांना पुस्तक बदलून देण्यासाठी बोलवाचो. मला भांडण करायला आवडायचं नाही!!


     पाठ्यपुस्तके अण्णा मुंबईहून घेऊन यायचे. दरवर्षी कुठल्यातरी इयत्तेचा पाठ्यक्रम बदलेला असायचा. सरकारी कारोबार असल्यामुळे आधी छापून तयार नसायचे. रोज एक दोन विषयांचे पुस्तके येत होती. डोंबिवलीतील काही पुस्तकांचे दुकानदार जसे बागडे, गद्रे बंधू,आम्ही आणि काही कल्याणचे दुकानदार मिळून टेम्पो करून मुंबईहून पाठ्यपुस्तके घेऊन यायचो. त्यांना डोंबिवलीमध्ये यायला रात्रीचे आठ ते नऊ वाजयचे. टेम्पो यायच्या आधीच लोकं गर्दी करून थांबायचे. प्रत्येक पुस्तकांचे पन्नास साठ प्रति असायच्या ते एका तासात संपायचे. त्यानंतर आलेल्या लोकांना पुस्तके मिळायचे नाही.

     एका वर्षी दहावीच्या अभ्यास क्रमातले शंभर मार्कचे संस्कृत पुस्तकाचे सरकारने कमी प्रति छापल्या होत्या. ते काही दिवसात संपल्या पण. एक दिवशी संध्याकाळी दहावीच्या दोन मुली दुकानात आल्या. दुकानात पुष्कळ गर्दी होती. त्या दोघींनी दहावीच्या शंभर मार्क्सच्या संस्कृत पुस्तकाची चौकशी केली. मी पटकन बोलून गेलो शंभर मार्क्सचे संस्कृतचे पुस्तक संपलेत पन्नास मार्कचे दोन पुस्तके दिले तर चालतील का? किती गर्दी असली तरी दुकानात माझी मस्करी चालू असायची. त्या मुलींना माझा राग आला वाटतं त्या मुली दुकानातून निघून गेल्या.थोड्यावेळाने त्या दोघी त्यांच्या घरातल्यांना घेऊन आल्या. त्यांच्याबरोबर एकीची आई तर एकीचा भाऊ होता. भाऊ माझ्या ओळखीचा होता. त्या दोघी मला बोट दाखवून बोलल्या हाच तो ज्यांनी आम्ही शंभर मार्क्सचे संस्कृत पुस्तक विचारलं तर म्हणतो कसा पन्नास मार्क्सचे दोन घ्या!! आलेल्या दोघांना मी कसं तरी समजावून सांगितलं की मी मस्करीत बोललो. शंभर मार्क्सचे पुस्तक मिळत नाहीये पण एक दोन दिवसात कुठूनतरी मागवून द्यायचा प्रयत्न करतो. मी समजावून सांगितल्यावर ते निघून गेले काही दिवसांनी त्यांना दोन पुस्तक मागवून दिली. असे बरेचसे किस्से शाळा सुरू होत असताना दुकानातल्या गर्दीत होत होते. आलेल्या प्रत्येक गिऱ्हाईकांना पुस्तके व इतर सामान मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असायचा...

6 comments:

  1. पै काका आम्ही तिथूनच पुस्तके घेत असे ही मजा अनुभव ली आहे छान लिहिले

    ReplyDelete
  2. ही गंमत धावपळ आम्ही अनुभवली आहे पुस्तके घेताना! किती बारकावे वर्णन केले आहेत तुम्ही !छानच !

    ReplyDelete
  3. तारांबळ उत्तम रेखाटली आहे !

    ReplyDelete