'जीवन हे स्वभावतःच दुःखमय आहे' हे प्रखर सत्य महात्मा गौतम बुद्ध जगाला सांगून गेले. परंतु तरी सुद्धा 'एक धागा सुखाचा अन् शंभर धागे दुःखाचे' असं गीत गुणगुणत प्रत्येकजण सुखी माणसाचा सदरा विणु पहात असतो. जेव्हा दुःखाच्या एका धाग्यातच जीव गुरफटतो तेव्हा 'दुःख मुक्त जगला का रे कुणी या जगात?' हा भगवान श्रीरामांनी भरताला विचारलेला प्रश्न मग सर्वांना आठवू लागतो. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हा विचार मग त्या प्रसंगी दुःख पचवायला शिकवून जातो. अश्याच एका प्रसंगाला मला अचानक सामोरे जावे लागले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझे कार्यक्रम ठरलेले असायचे. सन १९९८ मध्ये जपान लाईफच्या कार्यालयात जायला सुरुवात केल्यापासून वाचनालयाकडे माझे लक्ष कमी झाले होते. जपान लाईफ व्यवसायातून मला चांगले उत्पन्न मिळत होते. साहजिकच मी तिकडे अधिक लक्ष व वेळ द्यायला लागलो होतो. सकाळी नऊ वाजता ठाण्याला जायला निघायचो व संध्याकाळी सात वाजता डोंबिवलीत परत यायचो. घरी येऊन नाष्टा करून एखादा तास वाचनालयात जाऊन बसायचो. वाचनालयात आलेल्या सभासदांबरोबर गप्पा मारल्या की मन परत एकदा ताजेतवाने होत असे. जपान लाईफच्या व्यवसायानिमित्ताने कधी कधी मला लोकांच्या घरी जायला लागायचे. मग त्यादिवशी मला स्वगृही परत यायला रात्रीचे दहा-अकरा वाजायचे. मग अश्यावेळी सुमन वाचनालयात जाऊन दिवसभर आलेली वर्गणी गोळा करायची. मासिकं आणायला रोज पैसे लागायचे. कधी कधी महिना अखेरीस मासिक खरेदीसाठी पुरेशी वर्गणी जमा होत नसे. मग अश्या वेळी मला माझ्याकडचे पैसे गुंतवावे लागायचे. सन २००३ पासून जपान लाईफ स्लीपिंग सिस्टीमच्या व्यवसायातून पैसे येणे कमी झाले होते. खर्च मात्र खूप वाढला होता. दररोज मला कंपनीच्या कार्यालयात जाणे भागच होते. माझी काही ठरलेली कामे असायची व ती मला वेळेवर पुर्ण करायला लागायची.
दिनांक १ एप्रिल २००३, मंगळवार, हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही. नेहमीप्रमाणे मी सकाळी नऊ वाजता ठाण्याला जायला निघालो. अकरा वाजता माझ्या गटातील सभासदांबरोबर माझी बैठक (मीटिंग) ठरली होती. कंपनीकडून धनादेश (चेक), स्लीपिंग सिस्टीम, हर्बल उत्पादने (प्रॉडक्ट्स) वेळेवर मिळत नसल्याने माझ्या गटातील सभासद नाराज होते. कंपनीेच्या कार्यालयाची जागा सुद्धा बदलण्यात आली होती. मुलुंड चेकनाका येथे कार्यालय हलवण्यात आले होते. परिणामतः कार्यालयात जाण्या येण्यासाठी होणारा खर्च माझ्या गटामधील लोकांना परवडत नव्हता. यावर उपाय शोधण्यासाठी मी माझ्या गटातील सभासदांची बैठक (मीटिंग) आयोजित केली होती. बैठकीत आपले उत्पन्न कसे वाढवता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली. उत्पन्न वाढले की वाढीव खर्च आपोआप सुसह्य होईल हे समजावे हा त्या चर्चेमागील उद्देश होता. मी सुद्धा सभासदांना उत्पन्नवाढीचे विविध उपाय सुचवले. त्या दिवशी सुमारे एक वाजता ती बैठक संपली.
नेहमीप्रमाणे नवीन आलेल्या लोकांसाठी चर्चासत्राला सुरुवात झाली. आम्ही काही वरिष्ठ अधिकारी आपले अनुभव कथन करण्यासाठी ठीक पावणे दोन वाजता चर्चासत्राच्या सभागृहात गेलो. हा कार्यक्रम सर्वसाधारणतः अर्ध्या तासाचा असायचा. तेव्हा आम्हां सर्वांना आपला भ्रमणध्वनी (मोबाईल) बंद ठेवायला लागे. अनुभव कथन संपताच मी सभागृहातून बाहेर आलो व भ्रमणध्वनी (मोबाईल) सुरू केला. काही वेळातच घरून दूरध्वनी (फोन) आला. "संतोष शेजार्यांकडे पाय घसरून पडला आहे. त्याच्या पायाचे हाड मोडले (फ्रॅक्चर) आहे. त्याला कोपर्डे इस्पितळामध्ये नेण्यात आले आहे." हे सर्व ऐकल्यावर माझे अवसान गळले व डोळ्यातून अश्रु बाहेर पडू लागले. एवढे काय लागले असेल? तो कसा असेल? या विचारांमुळे मला काहीच सुचत नव्हते. मी माझी बॅग वगैरे काही न घेता नुसता पळत सुटलो. रिक्षा पकडून रेल्वे स्थानक गाठले. डोंबिवलीसाठी गाडी पकडली. डोंबिवली येईपर्यंत फक्त संतोषचा विचार मनात घोंघावत होता. काय झालं असेल? कुठे मार लागला असेल? त्याला किती दुखत असेल?इस्पितळामध्ये दाखल करण्याएवढे काय झाले असेल? असे वेगवेगळे विचार मनात येत होते. काही झाले तरी धीर सोडायचा नाही असं मनात निश्चित केले. अर्ध्या तासात डोंबिवलीला पोहचलो. डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरून रिक्षा केली व थेट कोपर्डे इस्पितळ गाठले. कधी एकदा संतोषला पाहतो असं झाले होते. तोपर्यंत दुपारचे तीन वाजले होते.
डोंबिवलीतील कल्याण मार्गावरील टिळक पुतळ्याजवळ असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोपर्डे इस्पितळ होते. मी इस्पितळात प्रवेश केला. तिथे भाऊ, बहीण व मित्र अशी बरीच मंडळी माझी वाट पहात होती. मी सुमनच्या जवळ गेलो. मला पाहताच तिच्या डोळ्यात टचकन् पाणी आले. मी तिला धीर दिला. संतोषला शस्त्रक्रिया दालनात (ऑपरेशन थिएटरमध्ये) नेले होते. त्याला वेदना सहन होत नव्हत्या. मला डॉक्टरांनी बोलावून घेतले. त्यांनी मला संतोषच्या उजव्या पायाचे क्ष-किरण छायाचित्र (एक्सरे) दाखवले. पाय घसरून पडल्यामुळे त्याच्या उजव्या पायाच्या हाडाचे तीन भाग झाले होते. पायाला वेष्ठनात गुंडाळून (प्लास्टर करून) तीन भाग एकत्र करणे गरजेचे होते अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मला काही सुचत नव्हते. मी डॉक्टरांना एवढेच विचारले, "वेष्ठन (प्लास्टर) काढल्यानंतर तो पुर्ण बरा होईल ना? पुर्वीसारखा चालू फिरू शकेल ना?" डॉक्टरांनी संतोषसारखी अनेक प्रकरणे (केसेस्) मला सांगितली. या सर्व प्रकरणांत वेष्ठन (प्लास्टर) केल्यावर व ते नंतर काढल्यावर सर्वजण ठणठणीत बरे झाले होते असं सांगून डॉक्टरांनी मला अश्वस्त केले. मला थोडासा धीर आला. मी लगेच डॉक्टरांना वेष्ठन (प्लास्टर) उपचार करायला सांगितले.
माझ्याकडून परवानगी मिळताच डॉक्टरांनी पुढच्या उपचारासाठी तयारी सुरू केली. मी संतोषला पाहून आलो त्याला गुंगीचे औषध देण्यात आले होते. त्याला पाहून मी एकटाच ढसाढसा रडलो. परंतु तिथून बाहेर पडताना मी स्वतःला सावरून घेतले. जर मी खचलो असतो तर सुमनला कोण सांभाळणार? याच विचाराने स्वतःला धीर दिला. बरीच नातेवाईक व मित्र मंडळी जमली होती. सर्वांनी मला धीर दिला. जवळपास तीन तासानंतर डॉक्टर शस्त्रक्रिया कक्षातून (ऑपरेशन थिएटरमधून) बाहेर पडले. काही दिवसांत संतोष बरा होईल याची त्यांनी खात्री दिली. काही वेळाने संतोषला शस्त्रक्रिया कक्षातून (ऑपरेशन थिएटरमधून) बाहेर आणले गेले आणि अन्य दालनामध्ये (वॉर्डमध्ये) हलविण्यात आले. मी आणि सुमन त्याच्या जवळच बसून राहिलो.
लहानपणी संतोष खूप मस्ती करायचा. मी जेवायला बसलो की माझ्या खांद्यावर चढून बसायचा. माझी आई त्याला ओरडायची. परंतु त्याने मस्ती केल्याशिवाय मला जेवण जात नसे. सकाळी एकदा का झोपून उठला की मग त्याची दिवसभर सुरू झालेली मस्ती रात्री झोपेपर्यंत चालूच असायची. मला त्याची मस्ती आवडायची. मी सुद्धा लहानपणी खूप मस्ती करायचो. फक्त फरक एवढाच होता की तो घरातच मस्ती करायचा व मी संपुर्ण गावभर मस्ती करत फिरायचो. माझा संतोषच्या सर्व बाललीलांना शक्यतो पाठिंबाच असायचा. आज तो शांत झोपला होता. दुपारी जेवणानंतर शेजारच्या मित्राकडे तो खेळायला जात असताना त्याचा पाय घसरला. शेजारची मंडळी साबणाच्या पाण्याने लादी धुत होती. ते त्याच्या लक्षात आले नाही. साबणाच्या पाण्यामुळे पाय घसरून तो थेट भिंतीला जाऊन आपटला. पायाचे हाड मोडल्याने (फ्रॅक्चरमुळे) त्याला वेदना सहन होत नव्हत्या. तो जोर जोराने रडत होता. इमारतीमधील काही लोकं गोळा झाली. तेवढ्यात चौथ्या मजल्यावर राहणार्या श्री. भट्टाचार्य यांनी त्याला खांद्यावर उचलून खाली आणले व रिक्षा करून इस्पितळात घेऊन आले. सुमनने त्यावेळी मला संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु माझा भ्रमणध्वनी (मोबाईल) बंद होता. मग तिने विनायकला दूरध्वनी करून मला लवकर यायचा निरोप दिला. नंतर माझ्याशी संपर्क होईस्तोवर व मला इस्पितळात पोहचेपर्यंत दुपारचे तीन वाजून गेले होते.
संतोषच्या देखभालीसाठी मी कार्यालयातून सुट्टी घेतली. चार दिवस तो इस्पितळात उपचार घेत होता. पाचव्या दिवशी डॉक्टरांनी त्याला घरी न्यायची परवानगी (डिस्चार्ज) दिली. आता घरी आल्यावर संतोषला वेष्टनामुळे (प्लास्टरमुळे) चालता येत नव्हते. काही दिवस बसूनच काढावे लागणार होते. त्याच्या मनोरंजनासाठी एकच जागी बसून खेळता येतील असे काही व्हिडीओ गेम्स आणले. त्याचे बालमित्र त्याच्या सोबत खेळायला घरी येत असत. कधी कधी मी पण त्याच्या सोबत खेळायला बसायचो. काही दिवसात संतोष बरा झाला. त्याच्या पायावरचे वेष्टन (प्लास्टर) काढण्यात आले. तो पुर्वीसारखा चालायला लागला. माझ्या मनातील शंकेचे मळभ दूर झाले. ज्या दिवशी तो पडला त्यावेळी त्याला खूप वेदना सहन करायला लागल्या होत्या. त्याच्या वेदना मला सहन होत नव्हत्या. ती वेळ त्याच्यासाठी प्रारब्धाचे भोग घेऊन आली होती. विधात्याने ते दुःख सहन करण्यासाठी मला आवश्यक तो धीर दिला. त्यामुळेच मी ते दुःख सहन करू शकलो. ईश्वराच्या कृपेने ती वेळ प्रारब्धांचे भोग पुर्ण करून निघून गेली. माझी त्या शक्तीदात्याकडे सदैव एकच विनंती राहील की मला कितीही दुःख, यातना दे परंतु ते सर्व सहन करण्याची शक्ती सुद्धा मला दे. ते इस्पितळातील चार दिवस सुमन आणि माझ्यासाठी खूप कठीण होते. आज ते दिवस आठवले की डोळ्यातून परत पाणी वाहायला लागते. परंतु 'पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा' हा विचार परत एकदा दुःख पचवायची ताकद देऊन जातो.....
दुःखा शिवाय सुख नाही,,,हेच जीवन
ReplyDeleteशंभरावा ब्लॉग अगदी खणखणीत आहे. अविरतपणे ब्लॉग्सचे शतक केल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन !!
ReplyDeleteतुमचे अनुभव आम्हालाही खुप काही शिकवून जातात. लेखन असेच चालू ठेवावे ही विनंती.
ReplyDelete