'कुणी घर देता का रे घर' असं नटसम्राट या नाटकातील सुप्रसिद्ध संवादानुसार 'कुणी प्रसिद्धी देता का रे प्रसिद्धी' असं आगतिक होऊन म्हटल्याने कोणी कोणाला प्रसिद्धी देत नसते व कोणी तसे प्रसिद्ध सुद्धा होत नसते. प्रसिद्धीसाठी जाहीरात करणे हा खर्चिक व महागडा पर्याय उपलब्ध असला तरी तो परवडत नसल्यास मुलखावेगळे अनोखे कार्य करून समाज व प्रसारमाध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे हा दुसरा पर्याय मात्र सर्वांसाठी उपलब्ध असतो. मला सुरूवातीला या दुसऱ्या पर्यायाची सुस्पष्ट कल्पना नव्हती.
फ्रेंड्स लायब्ररी सुरु केल्यापासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जाहिरात केली नव्हती. व्यवसाय म्हटल्यावर थोडीफार जाहिरात ही करावीच लागते. तो पर्याय परवडत नसल्यास मग दुसरा पर्याय म्हणजे वर्तमानपत्रात बातमीद्वारे प्रसिद्धी मिळवणे. परंतु त्यासाठी तहानलेल्याने पाण्याच्या झर्याजवळ जाणे आवश्यक असते. जेव्हा एखाद्या उदात्त, व्यापक व समाजाभिमुख हेतूने चालू केलेल्या मुलखावेगळ्या कार्याला ईश्वराची कृपा लाभते तेव्हा निर्मळ पाण्याची गंगा स्वतःहून तहानलेल्याकडे चालून येण्याची व्यवस्था सुद्धा तो करून देत असतो. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या आपल्या वाचनालयाच्या चळवळीला प्रसिद्धी देऊ शकेल अशी निर्मळ गंगेसारखी असलेली प्रतिभासंपन्न व्यक्ती स्वतःहून मला भेटायला आली होती. डोंबिवलीत फ्रेंड्स लायब्ररी अस्तित्वात असून ते वाचनालय वाचकांसाठी सतत चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यमातून जाहिरात किंवा बातमीद्वारे प्रसिद्धी मिळणे गरजेचे होते. परंतु वाचनालयाच्या व्यवसायात उत्पन्न कमी असल्याने कोणी खर्चिक व महागडी जाहिरात करायच्या भानगडीत पडत नसे. व्यवसायाचे स्वरूप स्थानिक पातळीपुरते मर्यादित असल्यामुळे प्रसारमाध्यमांनी सुद्धा या व्यवसायांकडे बातमी देण्याच्या अनुषंगाने कधी लक्ष दिले नव्हते. काहीतरी वेगळं केल्यास प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले जाऊन बातमीद्वारे प्रसिद्धी मिळणे शक्य होते. मी कधी याचा खोलवर विचारच केला नव्हता. आपला व्यवसाय डोंबिवलीपुरता मर्यादित होता. आपले वाचनालय सुरू होऊन फक्त अठरा वर्षे झाली होती. डोंबिवलीत आपल्यापेक्षा सुद्धा जुनी नावाजलेली काही ग्रंथालये होती. त्यांनी कधी जाहिरात केल्याचे माझ्या निदर्शनास आले नव्हते. तसेच कोणत्याही वर्तमानपत्राने सुद्धा त्यांची कधी दखल घेतल्याचे माझ्या वाचनात कधी आले नव्हते. प्रत्येक जण आपआपल्या परीने वाचनालयाचा व्यवसाय कसाबसा रेटत होता.
सन २००२ मध्ये टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्रात फ्रेंड्स लायब्ररीबद्दल फक्त दोन ओळी छापून आल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपात्राच्या छायाचित्रकाराने वाचनालयात येऊन छायाचित्र (फोटो) काढले. त्यांच्याबरोबर असलेल्या एका वार्ताहराने वाचनालयात किती सभासद आहेत? कधी सुरुवात केली? मराठी इंग्रजी मिळून किती पुस्तकं आहेत? फक्त एवढीच जुजबी चौकशी त्यावेळी केली होती. मग काही दिवसानंतर वाचनालयाचे छायाचित्र (फोटो) व खाली दोन ओळींचे शिर्षक (कॅप्शन) टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आले. आपल्या वाचनालयाची एखाद्या वर्तमानपत्रात छापून आलेली ही पहिलीच बातमी होती. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमान पत्राच्या काही इंग्रजी प्रती विकत घेऊन त्यातील आपल्या बातमीची कात्रणे सभासदांच्या माहितीसाठी वाचनालयाच्या फलकावर लावली. ती कात्रणे पाहून काही सभासद सुद्धा आनंदाने उत्साहित झाले. "तुम्ही या क्षेत्रात जे काही काम करीत आहात याची मराठी वर्तमानपत्रांनी दखल घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला प्रसिद्धी मिळायलाच हवी", असे ते सभासद मला निक्षून सांगू लागले. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले कारण मला माझी वैयक्तिक प्रसिद्धी नको होती. अर्थात प्रसिद्धीमुळे वाचकांची संख्या वाढून वाचन चळवळीचा प्रचार व प्रसार होणार असेल तरच ते मला मान्य होते.
श्री. अजय फाटक या नावाचे सभासद नियमितपणे वाचनालयात येत असत. ते अण्णांचे मित्र होते. फ्रेंड्स स्टोअर्सपासून माझी आणि त्यांची ओळख होती. ते टिळकनगर विद्यामंदिराच्या बाजूला असलेल्या मातृश्रद्धा इमारतीमध्ये रहायचे. ते उत्तम वाचकही होते. ते नेहमी फ्रेंड्स लायब्ररीचे कौतुक करत असत. आधी आपल्या वाचनालयाचे नुतनीकरण झाले. मग मुंबईतील संगणकीकरण झालेले पहिले वाचनालय असा सन्मान आपल्या वाचनालयाला लाभला, हे सर्व त्यांना समजले. "आपल्या वाचनालयाची बातमी मोठ्या वर्तमानपत्रात छापून यायला पाहिजे" असे ते एकदा माझ्याशी बोलताना म्हणाले. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार तसेच वाचकांची संख्या वाढविण्यासाठी प्रसिद्धीची गरज होतीच. वर्तमानपत्रात बातमी छापून आणू शकेल असे कोणी पत्रकार त्यावेळी माझ्या परिचयाचे नव्हते. श्री. अजय फाटक हक्काने व आपुलकीने मला 'पुंडा' या कौटुंबिक नावाने संबोधीत असत. "माझ्या ओळखीत वर्तमानपत्रात बातमी छापून आणू शकेल अशी एक व्यक्ती आहे. त्यांना वाचनालयात घेऊन येऊ का?" असे त्यांनी मला विचारले. मग काय, मी लगेच त्यांना घेऊन यायला सांगितले. माझ्याकडून होकार मिळताच श्री. अजय फाटक यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला. रविवारी सकाळी अकरा वाजता फ्रेंड्स लायब्ररीत भेटीची वेळ ठरली. भेटायला येणार्या त्या व्यक्तीचे नाव होते, "सौ. मीना गोडखिंडी."
तो रविवारचा दिवस होता. सुमारे अकराच्या दरम्यान सौ. मीना गोडखिंडी यांची आम्ही वाट पाहत होतो. त्या वेळेच्या बाबतीत खूप कडक असल्याचे श्री. अजय फाटक यांनी मला आधीच बजावले होते. त्यादिवशी मी अर्धा तास आधीच वाचनालयात पोहचलो. थोड्याच वेळात श्री. अजय फाटक सुद्धा येऊन पोहचले. वाचनालयात काही सभासद पुस्तकं बदलायला आले होते त्यामुळे आम्ही दोघे वाचनालयाच्या बाहेर उभे राहून मीनाताईंची वाट पहात होतो. बरोबर अकराला काही मिनिटे असताना मीनाताई समोरून येत असल्याचे श्री. अजय फाटक यांनी मला सांगितले. माझा सौ. मीना गोडखिंडी यांच्याशी काही परिचय नव्हता. मी प्रथमच त्यांना भेटत होतो. ठीक अकराच्या ठोक्यावर सौ. मीना गोडखिंडी वाचनालयात दाखल झाल्या. डोळ्यांना चष्मा, सुंदर नीटनेटकी साडी, हातात छोटीसी पर्स अश्या सौ. मीना गोडखिंडी यांची ओळख श्री. अजय फाटक यांनी करून दिली. त्याच बरोबर माझी सुद्धा त्यांना ओळख करून दिली. प्रथमच भेटत असून सुद्धा मला त्यांचे खूप कौतुक वाटत होते. त्या खूुप लांबून चालत आल्या होत्या तरी सुद्धा औपचारिक विश्राम थांबा न घेताच त्यांनी आल्या आल्या वाचनालयाविषयी एकामागोमाग एक प्रश्न विचारायला सुरूवात केली. मी त्यांच्यासाठी आणि अजय फाटक यांच्यासाठी चहा मागविला होता. "आपण आत्ताच आल्या आहात, तेव्हा दोन मिनिटे विश्रांती घ्या. चहा पिऊन झाल्यानंतर आपण सविस्तर बोलू या", असं मी त्यांना विनंतीवजा सुचविले.
ग्रंथालयात दोनच मेज (टेबल) व खुर्च्या होत्या. एका खुर्चीवर अजय दैनंदिन कामांसाठी बसला होता. मी, मामा, गोडबोले व श्री. अजय फाटक उभे होतो. सौ. मीना गोडखिंडी यांना आम्ही दुसर्या खुर्चीत स्थानापन्न होण्याची विनंती केली. परंतु त्यांनी आमच्याप्रमाणे उभे रहाणेच पसंत केले. चहा घेऊन झाल्यावर त्यांनी आपल्या बॅगेतून वही आणि पेन काढले. मग उभे राहूनच त्यांनी प्रश्नं विचारायला सुरुवात केली. त्या प्रश्न विचारत गेल्या. मी जी काही उत्तरे देत होतो ती माहिती त्या वहीमध्ये भराभर लिहून घेत होत्या. मराठी भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व असल्याचे त्यांच्या लिखाणावरून जाणवत होते. माझे शिक्षण, बालपण, वाचनालयाची आवड, वाचनालयाची स्थापना ते नुतनीकरण, सभासद संख्या, पुस्तकांची संख्या, वाचनालयाचे संगणकीकरण इत्यादी अनेक गोष्टींची इथंभूत माहिती मी त्यांना पुरवली. जवळपास अर्धा तास त्यांनी माझी मुलाखत घेतली. मला पण खूप बरं वाटले. एका वर्तमानपत्रात फ्रेंड्स लायब्ररीची संपूर्ण माहिती छापून येणार होती. मुलाखत संपल्यावर त्यांनी माझे छायाचित्र (फोटो) मागून घेतले. वाचनालयात येऊन माझी मुलाखत घेतल्याबद्दल सौ. मीना गोडखिंडी यांचे मी मनापासून आभार मानले. तसेच मीनाताईंची ओळख करून दिल्याबद्दल श्री. अजय फाटक यांच्याकडे सुद्धा आभार व्यक्त केले. नंतर थोड्या अनौपचारिक गप्पा मारून झाल्यावर बाराच्या सुमारास त्या ग्रंथालयातून बाहेर पडल्या. "पुढल्या रविवारचा लोकसत्तेचा अंक घ्यायला विसरू नका", असं जाताना त्या म्हणाल्या. मुलाखत पुढील रविवारी छापून येणार हे त्यांनी अश्याप्रकारे स्पष्ट केले होते. वाचनालयाच्या प्रसिद्धीची तहान भागविण्यासाठी ईश्वरानेच मीना गोडखिंडी सारख्या आभ्यासू, प्रतिभासंपन्न,ज्ञानगंगेला माझ्याकडे पाठवले होते याची मला आतून जाणीव होत होती....(क्रमशः)
मीनाशी परिचय म्हणजे तुमची एका उत्तम मुलाखतकाराशी ओळख झाली.आणि ती ओळख पूढे जाऊन छानसे कौटुंबिक संबंध निर्माण करणारी ठरणार हे पण नक्की झालं!कारण तुम्ही आणि मीना नाती छान जपता हे मला माहित आहे.
ReplyDeleteसौ.मीनाताई ( माझी मोठी बहीण) हीच्यावर साक्षात सरस्वती ची कृपादृष्टी आहे. तिने कित्येक नामवंत मंडळींची मुलाखती घेउन प्रसिद्ध केल्या आहेत.हे कार्य तिच्या कडुन असेच घडत राहो ही मी सरस्वती चरणी विनम्र प्रार्थना करते. व सौ ताईला शुभेच्छा.
ReplyDeleteएका ज्ञानगंगेनी घेतलेली मुलाखत जिथे ज्ञानसागर आहे, आणि तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांना दिलात, तुमचे दातृत्व ही मोठे आहे, एखादे नवीन वाचनालय उघडण्यासाठी तुम्ही अनेकांना मदत केलीत,मीनाचे आणि पै सर दोघांचेही कौतुक आणि नमस्कार
ReplyDeleteसौ.मीनाताई ( माझी मोठी बहीण) हिच्यावर साक्षात सरस्वती ची कृपादृष्टी आहे.तिने कित्येक नामवंत मंडळी ची मुलाखती घेतल्या आहेत व प्रसिद्ध केल्या आहेत. तिचे कार्य असेच पुढे देखील चालु राहु दे अशी मी सरस्वती चरणी विनम्र प्रार्थना करते. व ताई ला शुभेच्छा देते .
ReplyDeleteसौ रेखा कावळे
मीना माझी मैत्रीण म्हणजे एक निर्व्याज व्यक्तिमत्व , स्वतः आपली ओळख समाजात निर्माण करणे सोपे नाही.मीनाने स्व प्रयत्नाने आपले स्थान निर्माण केले परंतु अनेकानेक लोकांना निःस्वार्थपणे ओळख निर्माण होण्यास आपल्या लेखणीने मदत केली आहे.तिला खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteअंजली खिस्ती.
छान लिहिलंय. ही किती सालची गोष्ट?
ReplyDeleteजून २००४
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete🌹ध्येयपूर्तीसाठी अखंड परिश्रम, व्यवसाय शुचिता, व्यावहारिक बुध्दीप्रामाण्यवाद, सातत्य व विलक्षण आत्मविश्वास इत्यादी गोष्टी मला पुंडलीक पै या पुस्तकवेड्या अवलियाजवळ आढळल्या व म्हणूनच त्यांचे हे गुणपैलू प्रकाशित होण्यासाठी मी मुलाखत घेतली. मला असे वाटते जो स्वतःला विसरतो तोच काही करू शकतो. याच भावनेने पै यांनी ग्रंथालयाला आपले अवघे जीवनच समर्पित केले आहे. त्यांना लक्षलक्ष शुभेच्छा आणि पै फ्रेन्डस् लायब्ररीच्या शेकडोनी शाखा महाराष्ट्रात विस्तारित होण्यासाठी सदिच्छा..सौ. मीना गोडखिंडी।🌹📕📘📗
ReplyDeleteवाचून खूपच आनंद झाला मिनाचेही कौतुक . पुड लिकजी आता लेखकही बनायला वेळ नाट्टी
ReplyDelete