Friday, October 2, 2020

कोंडाणा लेणीसाठी केलेले गिर्यारोहण व पावसाच्या आस्मानी संकटाशी केलेला सामना...

'देव तारी त्याला कोण मारी' हे वाक्य मनोधैर्य वाढवण्यासाठी व ईश्वराप्रती आपला विश्वासपुर्ण श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी बोलून दाखवणे ठीक असते. परंतु जेव्हा संकट खरोखरच समोर येते तेव्हा मनुष्याची खरी सत्व परिक्षा पाहिली जात असते. संकटकाळात लहानांना रडण्याचा अधिकार असतो. स्त्रीयांना घाबरण्याचा अधिकार असतो. परंतु जवाबदारी खांद्यावर असलेल्या व्यक्तीला 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' या विचारानुसारच संकटाचा खंबीरपणे मुकाबला करावा लागतो. मग ईश्वर सुद्धा अश्याच व्यक्तीला साथ देत असतो. कोंडाणा लेणीच्या वर्षासहलीचा माझा अनुभव यापेक्षा वेगळा नव्हता. सर्वांनी सकाळी सात वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकावर जमायचे ठरले होते. मी सर्वांच्या आधीच साडेसहा वाजता पोहचण्याचा विचार केला होता. कारण मला सर्वांची तिकिटे काढायची होती. त्या दिवशी लवकर उठलो. डोंगर चढायचा असल्याने सुमन व संतोषला सहलीला नेता येणे शक्य नव्हते. सकाळचे सर्व कार्यक्रम आटोपले. सहा वाजताच सुमनने गरम गरम चहा बनवून दिला. चहा बरोबर काही मारी बिस्किटे खाऊन घरातून बाहेर पडलो. डोंबिवली रेल्वे स्थानकावर माझ्या आधीच काहीजण पोहचले होते. सर्वांसाठी कर्जतची तिकीटे काढली. ठीक सात वाजता सर्वजण ठरलेल्या ठिकाणी जमले. स्थानक क्रमांक एक वरून कर्जतला जाणारी गाडी पकडली.


रविवार असल्याने गाडीमध्ये आमच्यासारखी सहलीला जाणारी बरीच मंडळी दिसत होती. त्या सहलप्रेमी लोकांत आमची संख्या जास्त होती. डोंबिवलीहुन गाडी सुटल्यावर सर्वांच्या मौजमस्तीला सुरुवात झाली. सर्व वयोगटातले मिळून आम्ही जवळपास तीस सहलप्रेमी होतो. मला या सर्व लोकांना एकत्र घेऊन चालायचे होते. एक गोष्ट मात्र विशेष होती, ती म्हणजे मी सांगितलेले प्रत्येकजण ऐकत असे. वाचनालयात मी वेगळा असायचो. परंतु सहल म्हटली की मी सर्वांमध्ये मिसळून जायचो. सर्वात जास्त दंगामस्ती मीच करायचो. गाडी कल्याण स्थानकावरून पुढे निघताच गाण्यांच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली. सहलीच्या आनंदामुळे सकाळी सकाळी सर्वजणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भेंडीची गाणी, अधून मधून विनोद, मौजमस्ती वगैरे चालू असताना एक तास कधी गेला आणि कर्जत रेल्वे स्थानक कधी आले ते कळलेच नाही. खरतर असं वाटत होते की हा प्रवास संपूच नये. आम्ही सर्वजण कर्जतला उतरून रेल्वे स्थानकाबाहेर पडलो. सकाळचे सुमारे साडेआठ वाजले असतील. कोंडीवडे गावाला पोहचण्यासाठी दोन वेळा रिक्षा बदलावी लागणार होती. पहिल्या रिक्षेने एका पुलापर्यंत नेले. मग तिथून सर्वांनी दुसरी रिक्षा केली. ठरलेल्या वेळेनुसार सकाळी नऊ वाजायच्या आधीच आम्ही कोंडीवडे गावातील उपहारगृहापाशी (हॉटेलवर) पोहचलो. 


बोलायला पावसाळी सहल परंतु पावसाचा अद्याप पत्ता नव्हता. तिथल्या लोकांना विचारले, "या मागच्या काही दिवसात पाऊस पडलेला का?" मध्यंतरी एकदाच थोडासा पाऊस पडून गेल्याचे त्यांच्याकडून कळले. आज ढगाळ वातावरण होते. आम्ही सर्वजण पाऊस पडण्याची वाट बघत होतो. उपहारगृहामुळे आमची चांगली सोय झाली होती. जरी ते उपहारगृह जुनं वाटत असले तरी ते स्वच्छ व नीटनेटके होते. गरम गरम कांदेपोहे तयार होते. उपहारगृहाचे मालक आमचीच वाट पाहत होते. सर्वांना चांगलीच भूक लागली होती. गाण्यांच्या भेंड्यानी पोट भरत नाही असा दिव्य जावईशोध लागल्यामुळे काही जणांनी दोन तीन प्लेट कांदेपोहे हादडले. हवेत थोडासा गारवा असल्याने गरम गरम पोह्यांबरोबर चहा पिताना मन धुंद झाले होते. सर्वांचा नाष्टा संपेपर्यंत दहा वाजले असतील. मग आम्ही सर्वजण कोंडाणा लेणीच्या दिशेने निघालो.


जसे आम्ही बाहेर पडलो तशी पावसाची एक मोठी सर आली. सर्वजण पावसात मनसोक्त भिजलो. आम्ही विनायकच्या पाठी पाठी चालत होतो. विनायक आम्हाला मागलं दर्शन देत पुढचे मार्गदर्शन करत होता. तरुण मुले-मुली भराभरा चालत होती तर बाकीचे धिम्यागतीने मार्गक्रमण करीत होते. मला सर्वांना बरोबर घेऊन जायचे होते. डोंगर चढत असताना मध्येच एक छोटीसी जागा दिसली. मग तिथेच थोडावेळ आराम करायचे ठरवले. आमच्याबरोबर काही स्त्रिया व मुली होत्या, त्या डोंगर चढताना थोड्याशा दमल्या होत्या. परंतु एकीचाही उत्साह कमी झालेला नव्हता. बरोबर आणलेले पाणी आणि अल्पोपहार करून पुढच्या प्रवासाला निघालो.



थोडावेळ विश्रांती घेतल्यामुळे सर्वांच्या मनाला तरतरी आली होती. शरीरात जोश आला होता. सर्वजण भराभरा डोंगर चढायला लागले. थोडेसे पुढे गेल्यावर आभाळ भरून आले. आम्ही सर्वजण ज्याची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला होता. वारा जोरात वाहू लागला. झाडे सळसळ आवाज करत डोलू लागली. आभाळातून पावसाच्या सरी जमिनीवर पडायला सुरुवात झाली. सर्वत्र तृषार्त मातीचा सुगंध पसरू लागला. निव्वळ पावसाचा आनंद लुटण्यासाठी काही मिनिटे आम्ही सर्वजण एकाच जागेवर थांबून राहीलो. सर्वजण मनसोक्त भिजलो. कोंडाणा लेणी अजून काही अंतरावर होती. तरुण मुले-मुली मध्येच फोटो काढण्यासाठी थांबत होती, मस्ती करत होती, तर इतरांना डोंगर चढायला वेळ लागत होता. परिणामतः जिथे पोहचायला एक तास लागतो तिथे आम्ही दोन तासाने पोहचलो होतो.


एखाद्या ठिकाणी जायचे ठरवल्यावर तिकडे पोहचेपर्यंत कमालीची उत्सुकता असते. कधी एकदा ती जागा पाहतो असं वाटत असते. आम्हाला सुद्धा लेणी बघायची उत्सुकता होती. लेणीच्या जवळ काही अंतरावर पोहचताच त्यांचे दूरून दर्शन होऊ लागले. आम्ही सर्वजण कोंडाणा लेणीवर पोहचलो. आता लेण्या प्रत्यक्ष आमच्या डोळ्यासमोर होत्या. डोंगरातील दगड कोरून त्या लेण्या तयार करण्यात आल्या होत्या. आमच्या सारखी बरीच लोकं तिथे लेणी पहायला आली होती. त्यात आमचीच संख्या जास्त होती. एकीकडे सर्वजण फोटो काढण्यात व मस्ती करण्यात व्यस्त होते तर दुसरीकडे पावसाचा जोर वाढत चालला होता. पावसात भिजल्यामुळे काही जणांना थंडी वाजत होती. सर्वांना भूक सुद्धा लागली होती. आम्ही बरोबर आणलेले खाद्यपदार्थ एकमेकांना देत होतो. एव्हाना तिथे पोहचून एक तास झाला होता. पावसाचा जोर आणखीनच वाढला. डोंगरावरून जे पाणी पडत होते ते सुरुवातीला दगडांवर आपटून एक फूट उंच उडत होते. ते पाणी नंतर चक्क सहा फुटापर्यंत उंच उडू लागले. पावसाचा जोर एवढा वाढला की पाण्याबरोबर वरून दगड खाली पडायला सुरुवात झाली.


हळू हळू इतर पर्यटक मंडळी तिथून काढता पाय घेऊ लागली. फक्त आम्ही आणि काहीजण शिल्लक राहिलो. आमच्यातले सर्वजण फोटो काढण्यात आणि मस्ती करण्यात मग्न होते. मी पावसाचा जोर कमी होण्याची वाट पाहत होतो. पाऊस काही कमी होईना. मी निघण्याच्या विचारात होतो परंतु तोपर्यंत पावसाने रौद्ररूप धारण केले. एव्हाना आणलेले सर्व खाद्यपदार्थ व प्यायचे पाणी सुद्धा संपले. दुपारचे दोन वाजले असतील. सर्वांना भूक लागली होती. मी पुढाकार घेऊन सर्वांना निघण्याचा इशारा केला. सर्वजण परतीच्या प्रवासाला लागलो.


पावसाचे रौद्ररूप पाहून सर्वांच्या मनात भय निर्माण झाले होते. मला सुद्धा काळजी व भीती वाटायला लागली होती परंतु सर्वांच्या समोर काही बोलता येत नव्हते. स्त्रिया व मुलींची चिंता वाटत होती. डोंगर उतरायला सुरुवात केली. उतरायला सुरुवात करून पाच मिनिटे झाले असतील तर काही अंतरावर डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह आडवा आला. त्या प्रवाहाचा जोर आता एवढा वाढला होता की आम्ही जर त्या प्रवाहात उतरलो तर सर्वजण वाहून जाऊ असं वाटत होते. इतक्यात आमच्यातील तीन मुले त्या पाण्याच्या प्रवाहात उतरली. पाण्याचा जोर बघता असं वाटले की आता ते तिघे वाहून जातील. बाकीच्या सर्वांना मागे सरकायला सांगितले. जोरात ओरडून त्या तिघांना पाण्यातून बाहेर यायला सांगितले. त्यातील एकाच्या चपला वाहून गेल्या. मी, विनायक, नागेंद्र, विकास भाई सर्वांनी मिळून प्रयत्न केल्याने त्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्ही सफल झालो. माझ्या मनात नको ते विचार येत होते. ते तिघे वाहून गेले असते तर? सर्वांची जवाबदारी माझ्यावर होती. तो क्षण आठवला की आजही अंगावर काटे येतात. थोडक्यात तिघांच्या जीवावरचे संकट टळले होते.


विनायक आणि मी पुढे काय करायचे या विचारात होतो. पाऊस कमी होण्याची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सर्वजण घाबरले होते. कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते. वातावरण गंभीर झाले होते. सर्वांच्या मनात डोंगर उतरायचा कसा हा एकच विचार होता. त्यात सर्वांना मरणाची भूक लागली होती. आमच्याकडे कोणतेही खाद्यपदार्थ शिल्लक नव्हते. मी हतबल झालो होतो. फक्त मला तसे दर्शविता येत नव्हते. मी मनातल्या मनात ईश्वरापुढे हात जोडले. एवढ्यात खालून काही माणसे हातात काहीतरी घेऊन वर येताना दिसली. ती माणसे जवळ आली. त्यांच्या हातात रश्शी (रोप) होती. त्या स्थानिक लोकांना उपहारगृहाच्या मालकानेच पाठवले होते. त्यांना आम्ही जेवणाची आगाऊ सूचना (ऑर्डर) केली होती. बराच वेळा वाट पाहिल्यावर आम्ही वरती अडकलो असणार याचा त्यांना अंदाज आला व त्यांनी आमच्या शोधात स्थानिक लोकांना पाठवले. त्यांना पाहिले तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. त्यांच्यामुळे माझ्या मनाला खूप हायसे वाटले. आम्हां सर्वांना देवदूतच त्यांच्या रूपाने आल्यासारखे वाटले. त्या लोकांनी प्रत्येकाच्या हाताला धरून पाण्यातून वाट काढून तिथून खाली उतरण्यास मदत केली. त्या स्थानिकांना त्याची सवय होती. कधी एकदाचे डोंगर उतरून उपहारगृहापाशी पोहचतो असे झाले होते.


आता पावसाचा जोर कमी झाला होता. परंतु डोंगर उतरताना आमच्यातले बरेच जण दोन-तीन वेळा पाय घसरून पडले. डोंगराच्या वाटेवर माती वाहत आल्याने चिखल जमा झाला होता. पाय घसरून पडल्यामुळे काहींना किरकोळ जखमा झाल्या होत्या. उपहारगृहावर पोहचेपर्यंत चार वाजले होते. गरम गरम तांदळाची भाकरी, तेथील विशिष्ट भाजी, डाळ, भात असं चवदार जेवण मिळाल्याने सर्वजण परत खुश झाले. काहीवेळ विश्रांती घेऊन कर्जत रेल्वे स्थानक गाठले व डोंबिवलीसाठी गाडी पकडली. सर्वजण थकले होते. तरी सुद्धा मनोरंजनात वेळ जावा म्हणून सर्वांना सहभागी करून दोन चार खेळ खेळलो. काही लोकांना आणलेल्या भेट वस्तू दिल्या. आमच्यातील श्री. विकास नागदा यांनी खूप सारे विनोद सांगून सर्वांना हसवत ठेवले. एका तासात सर्वजण सुखरूप डोंबिवलीला पोहचलो. खरतर कोणीही तक्रार केली नव्हती परंतु माझ्या डोळ्यासमोरून "ते" दृश्य काही जात नव्हते. सर्वजणांना आपापल्या घरी सुखरूप पोहचवल्याबद्दल व 'देव तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यक्षानुभव दिल्याबद्दल मी ईश्वर कृपेपुढे नकळतपणे नतमस्तक झालो....

2 comments:

  1. गाण्यांच्या भेंड्यानी पोट भरत नाही या दिव्य जावईशोधाचे पेटंट आपल्यालाच मिळणार या आनंदात दोन तीन प्लेट कांदेपोहे हादडणे ही खर्च प्रत्येकी रुपये ३००/- च्या वसुलीची पुर्व तयारी होती, तर चार वाजता मिळालेले चवदार जेवण हे प्रत्येकी खर्च रुपये ३००/-वर चढलेले व्याज होते. उपहारगृहाच्या मालकाने मदतीला पाठवलेले स्थानिक लोकं ही ईश्वरबँकेने कायमचे कर्जबाजारी झाल्याची कपाळावर चिकटवलेली नोटीस होती. शेवटी वर्षासहल महागात पडली की स्वस्तात हा प्रश्न शिल्लक रहातो.

    ReplyDelete
  2. थरारक अनुभव वाचताना रोमांच उभे राहिले

    ReplyDelete