पाण्याला संस्कृतमध्ये जीवन म्हटले आहे. वाहणे हा पाण्याचा गुणधर्मच आहे. त्यामुळे जीवन हे सुद्धा प्रवाही असते. वाहते पाणी जिथे थांबते तिथे डबके तयार होते. परंतु मानवी प्रयत्नं हे जीवनाला कुंठीत होऊ न देता प्रवाही करत असतात. जीवनात जो थांबतो तो हरतो. थांबून हरणे मला बिलकुल मान्य नव्हते. संतोषचा अपघात होऊन दोन महिने लोटले होते. जीवन संगीत परत एकदा ध्रुवपदाकडे प्रवाही होऊ लागले होते. संतोषला आता नीट चालता येत होते. त्याच्या अपघातानंतर जवळपास पंधरा दिवस मी जपान लाईफच्या कार्यालयात न जाता त्याच्या बरोबरच राहीलो होतो. मी घरी असलो की स्वारी खुश असायची. आता तो परत पुर्वीसारखी मस्ती सुद्धा करायला लागला होता. जून महिन्यात त्याची शाळा सुरू झाली होती. इयत्ता तिसरीमध्ये चांगले गुण मिळवून तो यंदा इयत्ता चौथीत गेला होता. मी परत नियमितपणे जपान लाईफच्या ठाणे कार्यालयात जायला सुरुवात केली. मी जपान लाईफचा सभासद (जॉईन) होऊन तब्बल पाच वर्षाचा काळ लोटला होता. सन १९९८च्या मार्च महिन्यात मी कंपनीचा सभासद झालो होतो. या पाच वर्षात खूप काही शिकायला मिळाले होते. मात्र गेले काही महिने जपान लाईफच्या व्यवसायातून आर्थिक लाभ होत नव्हता. परंतु असे असूनही माझ्या गटातील (टीम मधील) लोकांसाठी आणि माझ्या काही नियमित कामांसाठी मला दररोज कंपनीच्या कार्यालयात जावे लागायचे. तिथे दिवसभर काहीना काही कामे निघतच रहायची. जरी आर्थिक परतावा मिळत नसला तरी त्या कार्यालयीन कामांमध्ये मी अडकून रहायचो.
व्यवसायामध्ये जोपर्यंत आर्थिक लाभ होत आहे तोपर्यंत व्यवसाय सुरू ठेवणे सोईचे असते. व्यवसायात आर्थिक उत्पन्न कमी झाले तरी विविध खर्च मात्र कमी होत नसतात. एकूण खर्च आहे तेवढाच होत असतो. पहिले चार वर्षे जपान लाईफ कंपनीेचे काम सुरळीत चालले होते. नंतर मात्र एकामागोमाग एक समस्या निर्माण होत गेल्या. स्लीपिंग सिस्टीम हे कंपनीचे प्रमुख उत्पादन होते आणि ते कोरियाहून येत असे. त्याची विक्री हळूहळू कमी होत गेली. अनेक वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडून गेले. आर्थिक चणचण भेडसावू लागली. कंपनीकडून आमचे पैसे थकत गेले. आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे माझ्यासमोर सुद्धा अनेक समस्या निर्माण झाल्या. पुढे काय करायचे हा विचार मनात येऊ लागला. तरी सुद्धा कार्यालयात जाणं-येणं व गटातील लोकांना मदत करणे हे सुरूच होते. परिणामतः खर्च काही कमी होत नव्हता.
उत्पन्न कमी होत गेल्याने समस्या वाढत चालल्या होत्या. मी आर्थिक संकटात सापडलो. वाचनालयातून जे उत्पन्न येत होते ते मी फक्त वाचनालयासाठीच वापरायचो. नवीन पुस्तकं व मासिकांच्या खरेदीसाठी रोज पैसे लागायचे. तसेच कर्मचार्यांना वेळेवर पगार देणे, वीजदेयक (बिल) भरणे, इतर व्यवसायानुषांगिक होणारे छोटेमोठे खर्च इत्यादी बाबतीत कधीही व्यत्यय आला नव्हता. परंतु घर खर्चासाठी मात्र मला पैश्याची ओढाताण जाणवू लागली. माझ्याकडे आयसीआयसीआय, स्टँडर्ड चार्टर्ड व सिटी बँक या तीन बँकांची उधारपत्रे (क्रेडिट कार्ड्स) होती. या उधारपत्राद्वारे (कार्डाद्वारे) जपान लाईफच्या व्यवसायामध्ये मी आवाक्याबाहेर जाऊन पैसे खर्च केले होते. तेव्हा झटपट गरज पुर्ण होत असल्याने खर्च करताना खूप मजा वाटली होती. आता कर्ज वाढत चालल्याने त्यांचे पैसे चुकते करताना नाकी नऊ येत होते. त्यांचा व्याजदर खूप जास्त होता. उधार पत्राद्वारे (क्रेडिट कार्डद्वारे) वापरलेले पैसे चुकते करताना खूप विलंब होत होता त्यामुळे कर्ज वेगाने वाढत चालले होते.
एके दिवशी माझे वरिष्ठ कोरियन अधिकारी श्री. झँग यांनी मला त्यांच्या दालनात (केबिनमध्ये) बोलावून घेतले. ते माझ्या घरी सुद्धा येऊन गेले होते. त्यांना माझी आर्थिक समस्या समजली होती. मी त्यांच्या दालनात जाताच त्यांनी मला गेल्या तीन महिन्यातील माझे उत्पन्न विचारले. त्यांना मी वाचनालय चालवत असल्याचे माहित होते. "जर तुला इथून पैसे मिळत नसतील तर तुझ्याकडे वाचनालयाचा दुसरा पर्याय आहेच. तेव्हा तू आता वाचनालयाकडे लक्ष केंद्रित कर." असा त्यांनी मला सल्ला दिला. त्या दिवसापासून मी कंपनीच्या ठाणे कार्यालयात जाणे कमी केले. वास्तविक पहाता मी वाचनालायाकडे लक्ष ठेवून होतोच परंतु आता ठाणे कार्यालयात जाणे येणे कमी केल्यावर मला वाचनालयासाठी जास्त वेळ देता येत होता. पाच वर्षांत जपान लाईफ व्यवसायातून मिळालेला अनुभव मी आता वाचनालयाच्या विकासासाठी वापरू शकत होतो.
जपान लाईफ व्यवसायात उडी मारणे हा माझाच निर्णय होता. वाचनालयाच्या व्यवसायचा विस्तार करण्याचे माझे ध्येय मी विसरलेलो नव्हतो. फ्रेंड्स लायब्ररीच्या सेवासुविधा सर्व वाचकांपर्यंत पोहचवणे हा माझा संकल्प होता. त्यासाठी मी स्वतः कमावलेल्या चार पैश्यांची धनराशी माझ्या पदरी जमा असणे गरजेचे होते. जपान लाईफच्या व्यवसायाकडे त्यासाठीच मी एक चांगली संधी म्हणून पहात होतो. या व्यवसायाच्या माध्यमातून चार पैसे कमवून मला माझे लक्ष्य गाठायचे होते. अर्थात थोड्याफार प्रमाणात मी त्यात यशस्वी झालो होतो. जपान लाईफ व्यवसायातून सन २००० यावर्षी कमवलेले सर्व उत्पन्न मी वाचनालयासाठी वापरले. वाचनालयाचे नूतनीकरण करून एक सुसज्ज वाचनालयाची निर्मिती केली होती. आर्थिक उत्पन्न पुर्णपणे बंद झाल्यामुळे मला जपान लाईफ कंपनीला राम राम करणे भागच होते. अर्थात तो सुद्धा माझाच निर्णय होता. चांगले झाले तरी मी जवाबदार व वाईट झाले तरी सुद्धा मीच जवाबदार अशी माझी ठाम भूमिका होती. मी कधीच कोणाला दोष देऊ इच्छित नव्हतो. जपान लाईफ सोडण्याच्या माझ्या निर्णयामुळे सुमन खुश झाली होती. पुर्वी त्या व्यवसायामुळे मला घरी जास्त वेळ देता येत नव्हता. बहुसंख्य वेळ मी बाहेर असायचो. मुळात तो व्यवसाय तिच्या मनाला कधीच पटला नव्हता. आता मात्र मी डोंबिवलीतच राहणार, बाहेर कुठे जाणार नाही, तिच्यासाठी वेळ देणार, माझे पूर्ण लक्ष वाचनालयाकडे राहणार, या सर्व लाभांमुळे सुमन खुश झाली होती.
सन १९९८ पासून ते २००३ पर्यंत मी जपान लाईफ कंपनीचा व्यवसाय केला. क्वचितच कधीतरी डोंबिवलीच्या बाहेर पडणारा मी या पाच वर्षाच्या काळात भारतातल्या निरनिराळ्या भागात भरपूर फिरलो. अगदी हाँगकाँगचा परदेश दौरा सुद्धा केला. भारतातील नाशिक, दिल्ली, औरंगाबाद, गोवा, चेन्नई येथील पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये पाच ते सहा दिवस मुक्काम केला. बंगलोर, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, नाशिक, औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पणजी या सारख्या शहरात आठ आठ दिवस राहिलो. दररोज शे दोनशे लोकांशी संपर्क साधण्याची संधी मला या जपान लाईफ कंपनीमुळेच मिळाली होती. विक्रम दुबल, विनायक काविळकर, किरण भिडे, अभय फासे, उदय, डी.व्ही.सोले, मोझेस, दाभाडे, अमोल, गुडेकर अश्या असंख्य लोकांशी याच व्यवसायामुळे चांगली मैत्री झाली हे मी कधीच विसरू शकत नाही. मोठमोठ्या विद्यापीठात पैसे भरून जे शिक्षण, पदवी व अनुभव मिळतो तेच ज्ञान व भरपुर अनुभव या पाच वर्षांच्या कालावधीत घेऊन मी कंपनीबाहेर पडलो होतो.
'आमदनी अठन्नी और खर्चा रूपैया' यानुसार माझे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने माझ्या डोक्यावर दीड-दोन लाखाचे कर्ज झाले होते. पेट्रोलचा खर्च परवडत नाही म्हणून मी माझी गाडी सुद्धा विकून टाकली. माझे सर्व आप्तजनांशी-परिचितांशी चांगले सौहार्दपुर्ण संबंध होते. त्यांना अडचण बोलून दाखवली असती तर त्यातील कोणीही मित्र किंवा नातेवाईक सहजपणे मदतीला धावून आला असता. परंतु मला ते मान्य नव्हते. अडचण असली तरी सुमन माझ्यासोबत होती. ते माझ्यासाठी पुरेसे होते. कठीण प्रसंगी ती मला चांगले सल्ले द्यायची. ते मी मनापासून स्विकारत सुद्धा होतो. यावेळी सुद्धा आर्थिक अडचणीमुळे कुंठीत होऊ पहाणार्या जीवनाला प्रवाहीत करणारी एक चांगली कल्पना सुमनने सुचवली. सध्याचे नीलकंठ दीपमधील रहाते घर विकायचे व बँकेचे कर्ज घेऊन नवीन घर घ्यायचे अशी कल्पना तीने मांडली. ती कल्पना मला सुद्धा पटली. सध्याचे राहते घर विकण्यासाठी खरेदीदार शोधायला सुरुवात केली. त्याच बरोबर बँकेचे कर्ज मिळु शकेल असं नवीन घर शोधण्यास सुद्धा सुरुवात केली. नीलकंठ दीप मधील घराला पावणे दोन लाख रुपये किंमत मिळत होती. तेवढ्या पैश्यांतून लोकांची उधारी-कर्ज फेडून काही पैसे माझ्याकडे शिल्लक राहणार होते. नवीन घर खरेदीसाठी ते पैसे उपयोगी पडतील म्हणून जास्त विचार न करता घर विकण्याचा निर्णय घेतला. घर खरेदी-विक्रीचा हा सर्व व्यवहार झाल्यावर मी कर्ज मुक्त होणार होतो. नंतर मला वाचनालयाच्या व्यवसायाकडे लक्ष देणे सोपे जाणार होते. थांबू पहाणार्या जीवनाला प्रवाही करण्याच्या प्रयत्नाला मी लागलो होतो. जीवनात थांबून राहून हार मान्य करणे मला मान्य नव्हते. त्यामुळे त्यावेळी आठवलेले 'रुक जाना नही तू कहीं हारके' हे गीत माझ्या मनाला उर्जितावस्था देऊन गेले......
तुमचं पाण्यासारखं वाहतं रहाणं,तुम्हाला नेहमीच यश देऊन गेलंय!! खूप शुभेच्छा 🌺
ReplyDeleteआम्ही मात्र लोकांमध्ये नुसतेच वाहत जातो. तुम्ही लोकांना वाहून नेता. जो लोकांना बरोबर घेतो तो कधीच थांबत नसतो. असेच सर्वांना बरोबर घेत चला. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!
ReplyDeleteपुंडलिक तुझ्या क्रिएटिव्हिटी ला सलाम
ReplyDelete-Aniruddha Mulherkar
सुंदर
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteआपल्या struggle चा अवडंबर न माजवता अगदी साध्या शब्दात सुंदररीतीने मांडता तुम्ही. खूप छान !
ReplyDelete