"ॐ पूर्णमद: पूर्णमिदं, पूर्णात पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते।।" भावार्थ - एक असे 'पुर्ण' जे दृश्यमान नाही पण ज्यांमध्ये तसेच एक 'पुर्ण' मिसळले तर ते दुप्पट न होता 'पुर्णच' राहाते व त्यातून तसेच एक 'पुर्ण' वजा जरी केले तरी ते कमी न होता 'पुर्णच' राहाते....प्रत्येक जीवात्मा जन्मोजन्मी पुर्णत्वासाठी सतत एक सुप्त संघर्ष करीत असतो. पुर्णत्वाच्या या संघर्षयात्रेत पुर्णत्वाचा अनुभव घेण्यासाठी मानवयोनी सर्वात मोठा कोणता प्रयोग करत असेल तर तो म्हणजे विवाह करणे. विवाह म्हणजे तरी काय? तर दोन अर्धवटांनी पुर्णत्वाचा व एकत्वाचा अनुभव घेण्यासाठी एकत्र येणे. पण इथे पुर्णत्वाचा, एकत्वाचा अनुभव तर काही येत नाही वरती आणखी एक अर्धवटराव पुर्णत्वाच्या नव्या संघर्षासाठी जन्माला येतात. मग पुर्णत्वाची ही संघर्षयात्रा पिढीदर चालूच राहाते. बालकाला आपण पुर्ण आहोत की अपुर्ण हे माहितच नसते तर पालक मुलांच्या बाललीलांशी एकरूप होऊन आपले पुर्णत्व त्यात शोधत असतात. नोव्हेंबर महिन्यात संतोषला दिवाळीची सुट्टी लागली होती. तेव्हा आम्ही गोपाळनगरच्या गल्ली क्रमांक एक मधील निळकंठ दीप इमारतीमध्ये राहत होतो. संतोष आणि त्याच्या बालगोपाळ मित्रांनी किल्ला बनवायचा महाकाय अवजड प्रकल्प हाती घेतला होता. सर्व बालगोपाळांनी इमारतीतील प्रत्येक घरातून दहा रुपये 'बालक नैसर्गिक हक्क' या अलिखित कायद्याचा गोड धाक दाखवून किल्ला बनविण्यासाठी अतीप्रचंड धनराशी गोळा केली होती. त्यांना किल्ला बनविण्यासाठी लाल माती लागणार होती. रविवारी सकाळी संतोष व इमारतीतील दोन मुलांना घेऊन मी रिक्षाने खंबाळपाडा येथे जायला निघालो. खंबाळपाडाच्या पुढे कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक छोटासा डोंगर लागतो. तो डोंगर माकडाच्या भाषेत बोलत होता. त्या डोंगरावर लाल माती होती. तिथे माती गोळा करण्यासाठी थांबलो. आम्ही माती गोळा करण्यासाठी बरोबर फावडे सुद्धा नेले होते. किल्ल्याच्या महाकाय प्रकल्पासाठी सगळा डोंगर उचलून न्यायला हनुमानाची मदत न मिळाल्याने आम्हाला उचलता येईल तेवढी लाल माती बरोबर आणलेल्या पिशवीत भरली व त्याच तीन चाकाच्या पुष्पक विमानाने म्हणजे रिक्षाने परत डोंबिवलीला आलो. इमारतीमधील सर्व मुलांनी मिळून दिवाळीच्या सुट्टीचा सदुपयोग करताना स्थापत्यशास्त्राचा किस पाडत मजबूत अभेद्य किल्ला तयार केला. किल्ला छानपैकी सजवल्यामुळे सुंदर दिसत होता.
मी लहान असताना शिवप्रसाद इमारतीत दर दिवाळीला किल्ला बनवायचो. दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की लगेच दगड व लाल माती गोळा करायला सुरुवात करायचो. दुकानात बसायला लागत असल्याने सदर कामांसाठी मला फक्त दुपारची फुरसत मिळायची. दगड आणि लाल माती हा कच्चा माल गोळा झाला की मग कारंजे बनवण्यासाठी बाटली आणि रबरी पाईप यांच्या शोध प्रकल्पाला सुरूवात होत असे. बाटली किल्ल्याच्या मध्यभागी ठेवून पाईपद्वारे पाणी सोडून फवारे तयार करायचो. हेच आम्हा बालगोपाळांचे फ्लोरा फाऊंटन म्हणजे कारंजे. 'चांदणे शिंपत जा तू' या गीतानुसार मग घरून मोहरी आणून किल्ल्यावर शिंपडायचो. मग काही दिवसांत कारंज्याच्या पाण्यामुळे मस्तपैकी हिरवेगार गवती चांदणे चमचम करू लागे. शिवप्रसाद या आमच्या इमारतीचे संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या या किल्ल्यावर मग तात्काळ सशस्त्र सैनिकांची नेमणूक केली जायची. तोफा वगैरे युद्ध साहित्य आयात करून युद्धासाठी किल्ला स्वयंपुर्ण बनवला जायचा. शिवप्रसाद इमारतीच्या बाजूला रहदारी असल्याने जाणारे येणारे लोकं किल्ला बघण्यासाठी जमायचे. त्यातील काही लोकं कौतुक करायचे. दिवाळी संपत आली की रशियाच्या 'दग्धभू' या युद्धनितीनुसार मग किल्ल्याच्या आत फटाके लावून किल्ला उध्वस्त करून टाकायचो. तेव्हा खूप मजा यायची.
संतोष आणि त्याच्या मित्रांनी मिळून गोळा केलेल्या धनराशीतून किल्ल्यासाठी लागणार्या विविध वस्तू विकत घेतल्या. बळीच्या बकर्याला सजवतात तसे त्या सर्व वस्तूंच्या मदतीने किल्ला छानपैकी सजवला. मला माझ्या लहानपणीची आठवण आली व मी नकळतपणे माझे पुर्णत्व शोधू लागलो. मला स्वतःला किल्ला बनवण्याची आवड होती म्हणून मी संतोष अँड बॉईज् कंपनीला पाहिजे ती मदत केली. 'एक हौशी मुलांना मदत करत आहे ना, मग कशाला आपले हात चिखलात कालवून घ्या' असा बहुधा इमारतीतील स्वघोषित सुज्ञ प्रौढांनी माझ्याकडे पाहून विचार केला असावा. इमारतीतील लहान मुलं वगळता कोणीही मोठी माणसे मदतीला आली नाही. परंतु किल्ला तयार झाल्यावर तो बघण्यासाठी मात्र सर्वजण हजर होते. आपल्या धनराशीचा मुलांनी खरोखरच योग्य वापर केलेला आहे ना याची खात्री झाल्याचा आनंद कदाचित काही जणांना झाला असेल. किल्ला तयार करत असताना इमारतीतील काही मुलं सर्कस बघून आली होती. ती मुलं सर्कसची चर्चा करत होती. 'अगोदरच एक सर्कस पार पाडली, तेव्हा आता आणखी एक सर्कस नको' बहुधा असा सुद्धा विचार करून इमारतीतील काही प्रौढ मंडळी किल्ले बांधणीत सामिल झाली नसावीत. ''माझे मित्र सर्कस बघून आलेत. आपण सुद्धा सर्कस पहायला जाऊ या का?'' असं संतोषने मला विचारले. मला सुद्धा सर्कस बघायची हौस होतीच. आम्ही पिता-पुत्र एकाच वयाचे झालो होतो. संतोषच्या आग्रहाला मी होकार दर्शविला.
कल्याणच्या बैल बाजारात जम्बो सर्कसने डेरा टाकला होता. सर्कशीचे दिवसातून तीन खेळ (शो) होत असत. सर्कशीची डोंबिवलीत अनेक ठिकाणी जाहिरात झळकत होती. दुपारी तीन ते सहाच्या खेळाला जायचा विचार केला. तसं सुमनला सांगितले. सर्कसला जायचे असल्याने संतोष कमालीचा खुश झाला होता. 'हम किसी से कम नही' अश्या थाटात त्याने सर्व मित्रांना आपण सुद्धा सर्कस पहायला जात असल्याचे छाती फुगवून सांगितले. त्यावेळी संतोष मंजुनाथ शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता. त्याला सर्कस बघायची खूप ओढ लागली होती. प्राण्यांवर त्याचा फार जीव होता. पक्षी-प्राण्यांवर तो खूप प्रेम करायचा. प्रेम एकतर्फी होते का ते माहित नाही. आतापर्यंत चित्रपटात सर्कसची अनेक दृश्ये पाहिली होती. परंतु आता प्रत्यक्षात सर्कस पाहण्याचा योग आला होता. सर्कसमध्ये विविध वन्य प्राणी, पक्षी व त्यांच्या कसरती पाहायला मिळणार होत्या. संतोषला जोकर खूप आवडायचा. तो मला उत्सुकतेपोटी सारखा विचारायचा 'सर्कस पहायला कधी जायचे?' मग त्याच्या उत्सुकतेच्या शमनार्थ मला तात्पुरते जोकर व्हावे लागे.
रविवारी मी खास संतोषसाठी वेळ काढला होता. सकाळी वाचनालयात जाऊन आलो. मग घरी येऊन जेवलो व थोडीशी विश्रांती घेतली. तीन वाजताचा खेळ (शो) होता. कल्याण तसं जवळच असल्याने रिक्षाने गेलो तर पोहचायला पंधरा मिनिटे लागणार होती. दुपारी दीडच्या सुमारास घराबाहेर पडलो. टिळक चौकापासून कल्याणच्या बैल बाजारपर्यंत रिक्षा केली. रिक्षेतून खाली उतरताच समोर मोठ्ठा तंबू उभारलेला दिसला. बाजूलाच तिकिट घर होते. संतोषला सोबत घेऊन तीन तिकीटे काढली. सर्कस सुरू व्हायला अजून अर्धा तास होता. तंबू बाहेर सर्कसच्या संबंधी काही मोठे मोठे चित्रफलक (पोस्टर) लावले होते. संतोषला एक एक करीत सर्व चित्रफलक जवळून दाखवले. त्याला आतमध्ये कधी जातोय आणि सर्कस कधी पाहतोय असं झाले होते.
लहानपणी कुंदापूरला असताना इयत्ता तिसरीपासून मी एकटा हिंडायचो फिरायचो. मस्तीकरून अनेकांची डोकी फिरवायचो. तेव्हा कुंदापूरमध्ये गांधी मैदानात विविध सर्कसवाले येत असत. त्याकाळी सर्कस हे मनोरंजनाच्या प्रमुख माध्यमांपैकी एक होते. छोटी छोटी मुलं व पालक मंडळी सर्व एकत्र मिळून सर्कस पाहायला जायचे. तेव्हा एक तिकिट तीस पैश्याला मिळत असे. माझ्याकडे तेवढे पैसे नसायचे. मग मी माझी सर्कस चालू करायचो. मी गांधी मैदानात जाऊन सर्कशीच्या तंबू भोवती फेरफटका मारायला सुरुवात करायचो. कुठेतरी एखादा हत्ती, घोडा किंवा कुठलाही प्राणी दिसला तरी मनाला तीस पैसे वसुल झाल्याचे समाधान वाटायचे. मग घरी आल्यावर सर्व मित्रांना रूबाबात सांगायचो की आज मी सर्कशीजवळ गेलेलो असताना तिकडे मी हत्ती पाहिला, अमुक प्राणी पाहीला, तमुक प्राणी पाहीला. आपली सर्कस फेरी कशी यशस्वी झाली ते वर्णन करून सांगण्याची ती मजा काही औरच होती. जेव्हा मी संतोष व सुमनला तंबूच्या जवळ घेऊन गेलो तेव्हा मला लहानपणीची ती रम्य आठवण आली.
तीन वाजायला दहा मिनिटे असताना सर्कशीचे प्रवेशद्वार उघडले गेले. सर्वजण एकमेकांना ढकलून आत जात होते. प्राणी तंबूच्या आतमध्ये आहेत की बाहेर हा यक्ष प्रश्न मला पडला. संतोषचा मी हात धरला होता नाहीतर तो पण पळत सुटला असता. आम्ही तिघे आत गेल्यावर आपल्या जागेवर जाऊन बसलो. संतोषने आग्रह धरला म्हणून मलाही सर्कस पाहायची माझी हौस फेडून घेता आली. माझे लक्ष वर बांधलेल्या दोरीकडे गेले. मी विचार करू लागलो की एवढ्या उंच दोऱ्या कश्या बांधल्या असतील? इतक्यात माझ्या विचारांचा दोर कापला गेला कारण सर्कस सुरू होण्याचा इशारा झाला होता. काही बुटके जोकर्स मधल्या भागात बनविलेल्या रिंगणात आले. तंबूच्या आतील भाग प्रेक्षकांनी तुडुंब भरला होता. जोकर्स बाहेर येताच टाळ्यांच्या जोरदार कडकडाटाने त्यांचे स्वागत करण्यात आले.
सुरुवातीला जवळपास दहा बुटक्या जोकर्सनी पंधरा ते वीस मिनिटे आम्हा सर्वांचे मनोरंजन केले. त्यांचे हावभाव, त्यांच्या मर्कटलीला आणि त्याला साजेसे पार्श्वसंगीत यामुळे निर्माण झालेल्या विनोदांमुळे हसून हसून पोट दुखायला लागले होते. त्यानंतर वेगवेगळ्या उंचीचे सात-आठ हत्ती आले. त्यांचे सायकल चालवणे, उठणे, बसणे वगैरे कसरती बघताना खूप मजा येत होती. मदारी ज्या आज्ञा द्यायचा त्याचे हत्ती पालन करीत होते. त्यांना कसून प्रशिक्षण दिलं गेलेले जाणवत होते. त्यानंतर विविध प्राण्यांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले. मग काही मुली एकाच छोट्याश्या सायकलीवरून विविध कसरती सादर करू लागल्या. त्या सर्व मुलींचे शरीर खूप लवचिक असल्याने ते कसेही वळत होते. साडेचार वाजता मध्यांतर झाले. मी संतोषला बाहेर नेऊन खाऊ घेऊन दिला व परत जागेवर येऊन बसलो. काही वेळातच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सर्कस मधील शेवटची काही मिनिटे सर्वांना जागेवर खिळवून ठेवणारी होती. उंचावर दोऱ्या बांधण्यात आल्या होत्या. त्या दोरीला पकडून एका दोरीतून दुसऱ्या दोरीकडे उडी मारायची व एकमेकांना पकडायचे. चित्रपटात हे दृश्य बघताना मजा येत असे. पण आज प्रत्यक्षात बघत असताना थोडी भीती वाटत होती. तंबूमध्ये शांतता पसरली होती. पायाला दोरी अडकवून झोके घेत एकमेकांना पकडणे कठीण होते. त्यांना दिलेले प्रशिक्षण, अचूक वेळ व एकाग्रता यांच्यामुळे एवढी मोठी जोखीम ते घेत होते. थोडी जरी चुक झाली तर प्राण गमावण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. ते दृश्य रोमहर्षक होते. सर्व प्रेक्षक जीवमुठीत धरून एकाग्रतेने ती कसरत पाहत होते. सर्कसचे सर्व कार्यक्रम संपल्यावर त्यात भाग घेतलेले सर्व कलाकार निरोप घेण्यासाठी मधल्या रिंगणात आले. तंबूतील प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. सर्कसमध्ये काम करणाऱ्या एवढ्या लोकांना एकत्रित ठेवणे, त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त, राहण्याची सोय, त्यांचे प्रशिक्षण, त्याच बरोबर विविध प्राण्यांचे संगोपन व सांभाळ तसेच परत काही दिवसांनी जागा बदलावी लागणे इत्यादी अनेक गोष्टींचे व्यवस्थापन कसे काय केले जात असेल याची मनामध्ये वैचारिक सर्कस करत मी त्या सर्कसमधून बाहेर पडलो. मुंगीपासून हत्तीपर्यंत यच्चयावत जीवांचे पोट भरणार्या व त्यांची जीवन कहाणी चालू ठेवणार्या विधात्याचे ब्रह्मांडव्यापी व्यवस्थापन शिकण्याच्या पुर्व तयारीचा एक छोटासा भाग म्हणून बहुधा मी सर्कशीचे व्यवस्थापन जाणून घेण्याचा वैचारिक प्रयत्न करीत असेन. पुर्णत्वाच्या संघर्षयात्रेतील ते एक छोटेसे पाऊल असावे.....
सर्किशीचे खूप सुंदर वर्णन केले आहेत. किल्ला पुराण देखील धमाल !
ReplyDelete