Tuesday, October 13, 2020

वाचनालयाच्या दैनंदिन कामकाजाचे संगणकीकरण....


'कर्म कोणतेच चांगले किंवा वाईट नसते. त्या कर्मामागील हेतू त्या कर्माला सत्कर्म किंवा दुष्कर्म या श्रेणीमध्ये नेत असतो.' असं श्री. गोंदवलेकर महाराज म्हणत असत. हेतू शुद्ध, व्यापक व समाजाभिमुख असेल तर त्या कर्माला समाजाची सुद्धा अनपेक्षितपणे साथ मिळून जाते. मोगर्‍याचा सहवास घडला की मन व शरीर सुगंधाने, आनंदाने भरून जाते तशी काही माणसे आपल्या मदतीला येऊन आपला ईप्सित कार्यपथ उजळून टाकतात. 'शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी' याची मग प्रचिती येऊ लागते. फ्रेंड्स लायब्ररीचे नाव काही वर्षातच डोंबिवलीतल्या शाळा, कॉलेज व वाचकांच्या सर्वतोमुखी झाले होते. अजय, मामा व गोडबोले माझ्या पश्चात वाचनालय उत्तमरित्या संभाळत होते. त्या तिघांचा जनसंपर्क व जनसंवाद उत्कृष्ट असल्याने सभासद सुद्धा खूप समाधानी होते. असे असले तरी वर्तुळच्या केंद्रबिंदुप्रमाणे माझी उपस्थित अपरिहार्य व निर्णायक होती. काही महत्वाचे निर्णय मलाच घ्यावे लागणार होते. माझ्याकडे जपान लाईफमधील पाच वर्षांचा अनुभव होता. आता तो अनुभव पणाला लावून वाचनालयाची भरभराट करायची होती. परिणाम आपला विषय नसला तरी ईशकृपेने प्रयत्नांचे चांगलेच परिणाम समोर येतील यावर माझा पुर्ण विश्वास होता. फ्रेंड्स लायब्ररीमार्फत वाचन चळवळ उभी करून वाचनालये डोंबिवलीतल्या कानाकोपऱ्यापर्यंत न्यायची व जास्तीत जास्त लोकांना पुस्तकं वाचायला प्रेरित करायचे हेच माझे ध्येय होते. एके काळी वाचनालयांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीतील वाचनालये एक एक करत बंद पडत चालली होती. पुस्तकांच्या वाढत्या किंमती, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार वाचनालयाच्या व्यावसायिकांना परवडत नव्हते. नवीन पिढीला या व्यवसायात रुची नव्हती. त्यामुळे वाचनालय व्यवसायाला उतरती कळा लागली होती. तरी सुद्धा अश्या प्रतिकुल परिस्थितीत मी दोन ते तीन बंद पडलेल्या वाचनालयांची पुस्तकं विकत घेतली. 


ठाण्याला जाणे बंद झाल्याने आता दिवसभर वाचनालयाकडे लक्ष देऊ शकत होतो. वाचनालयाकडे पुर्णवेळ लक्ष द्यायला लागल्यावर माझ्या दैनंदिन कार्यक्रमात खूप बदल झाला होता. मला वाचनालयात अमुलाग्र बदल घडवून आणायचा होता. तेव्हा सुद्धा मला काही लोकं विचारायचे की, ''तू अजूनही वाचनालय चालवतोस का?" परंतु मी कोणाला कारणमिमांसा सांगण्याच्या भानगडीत पडत नसे. मला पुढे काय करायचे आहे ते मी आधीच ठरवलेले होते. पुस्तकं, सभासद, विविध कार्यक्रम या सर्व बाबतीत मला अव्वल दर्जा गाठून एक मानदंड स्थापित करायचा होता.


सन १९८६ यावर्षी फ्रेंड्स लयब्ररीची स्थापना झाली होती. गेल्या सतरा वर्षात पंधरा हजार पेक्षा अधिक पुस्तके जमा झाली होती. विविध मासिकं नियमितपणे येत होती. त्यात दर महिन्याला नवीन पुस्तकांची भर पडत होती. जवळजवळ एक हजार वाचकांनी फ्रेंड्स लायब्ररीत आपले नाव नोंदवले होते. दिवसातून शंभर सभासद पुस्तकं बदलायला वाचनालयात येत असत. सभासदांची संख्या जसजशी वाढत चालली तसतशी मेजवरील (टेबलावरील ) सभासदांच्या फाईलींची संख्या पण वाढत चालली होती. बाजूला पिठाची गिरणी असल्याने त्या फाईलींवर पीठ जमा होत असे. नवीन नाव नोंदवायला आलेल्या सभासदांना त्या पीठाचे 'व्यासपीठ' तयार झालेले पहावे लागे हे माझ्या मनाला पटत नव्हते. सर्व सभासदांचे कागदी दस्तऐवज (फॉर्म) ज्या फाईलमध्ये जमा केले जात असत त्याला काहीतरी दुसरा पर्याय मी शोधत होतो. अनेक कागदांना पर्याय म्हणून कार्ड वापरायचा विचार त्यावेळी मनात आला. कार्डमुळे कागदं कमी होऊन थोडीफार जागा वाचली असती. सकृतदर्शनी थोडे तरी बरं दिसले असते. परंतु शेवटी कार्ड सुद्धा किती सांभाळायची हा प्रश्न मनाला सतावू लागला. अर्थात सकारात्मक विचार केल्यावर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडतेच. 


माझा मित्र संजय वेलणकर आपल्या वाचनालयाचा सभासद होता व तो नियमितपणे वाचनालयामध्ये पुस्तक बदलायला येत असे. त्याला मी लहानपणापासून ओळखायचो. तो फ्रेंड्स स्टोअर्समध्ये शाळेची पुस्तकं खरेदी करायला नियमितपणे येत असे. त्याचे आई वडील सुद्धा माझ्या चांगले परिचयाचे होते. ते फ्रेंड्स स्टोअर्ससमोरील मानस सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर राहत होते. त्याला आपल्या लायब्ररीबद्दल खूप अभिमान होता. आपण पुस्तकांवर विलंब शुल्क व भरमसाठ वर्गणी आकारात नाही याचे त्याला कौतुक वाटायचे. मी वाचनालयाकडे फक्त एक व्यवसाय म्हणून पहात नव्हतो. वाचकांना पाहिजे ते पुस्तक वेळेवर मिळावे, वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा हे माझे एकमेव ध्येय होते. 'वाचकांची संख्या वाढली की उत्पन्न आपोआप वाढेल' असं मी संजयला सांगायचो. त्याचा संगणक कार्यप्रणाली संबंधीत खूप मोठा व्यवसाय होता. डोंबिवलीत सी.के.पी. सभागृह जवळ संजयचे खूप मोठे कार्यालय होते. बरेच कर्मचारी त्याच्याकडे कामाला होते. एके दिवशी संजय वाचनालयात पुस्तक बदलायला आलेला असताना गप्पा मारता मारता त्याने वाचनालयाच्या कामकाजाचे पुर्णपणे संगणकीकरण करण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. मला सुद्धा तेच हवे होते. वाचनालय अद्ययावत करण्यासाठी दैनंदिन कामकाजाचे संगणकीकरण करणे आवश्यक होते. मला ते पटले व मी लगेचच त्याला होकार दिला. आम्ही दोघे एकमेकांशी बोलताना अरे तुरे भाषा वापरायचो. मी माझी आर्थिक अडचण त्याला सांगताच त्याने उच्चारलेले शब्द मला अजूनही जसेच्या तसे आठवतात. "पुंड्या तू पैश्यांचा विचार करू नकोस. तू वाचकांसाठी एवढी धडपड करत आहेस, त्यात हा माझा खारीचा वाटा समज. आपल्या वाचनालयासाठी मी तुला छानशी आज्ञावली (सॉफ्टवेअर) बनवून देतो, जी तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी उपयुक्त व सोयीस्कर होईल." 


काही मित्र व सभासदांबरोबर मी वाचनालयाचे संगणकीकरण करण्याबाबत चर्चा केली. कामाचे ओझे कमी होऊन ते नीटनेटके, अचूक व अद्ययावत होईल तसेच संगणक शिकायला मिळेल वगैरे गोष्टींमुळे सर्वांना ही कल्पना खूप आवडली. जसजशी पुस्तके व सभासद संख्या वाढत जाईल तसतशी त्यांची नोंद (रेकॉर्ड) ठेवणे कठीण होत जाणार हे निश्चित होते. परंतु जर सर्व माहिती संगणकाद्वारे हाताळली तर सभासदांना उत्तम सेवासुविधा देता येईल हाच विचार करून मी वाचनालयाच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्याचे ठरविले. संजय वेलणकरने जवाबदारी उचल्याने आता मला पैश्यांची सुद्धा चिंता नव्हती. तो स्वतः एक उत्तम वाचक व माझा चांगला मित्रही असल्याने तो एक चांगली आज्ञावली (सॉफ्टवेअर) बनवून देणार याबाबत मला तिळमात्र शंका नव्हती. 


वाचनालयाची आज्ञावली (सॉफ्टवेअर) कशी असेल? ती आज्ञावली कशी वापरता येईल? त्यासाठी मला काय करावं लागेल? वगैरे बाबत मला काहीच कल्पना नव्हती. त्याबद्दल मी पूर्णपणे संजयवर अवलंबून होतो. त्याने मला त्याच्या सी.के.पी. सभागृहाजवळील त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले. मी जेव्हा त्याच्या कार्यालयात पोहचलो, तेव्हा मला त्याच्या व्यवसायाचा व व्यवहाराचा व्याप पहायला मिळाला. त्याच्या कार्यालयात बरेच कर्मचारी काम करत होते. ते सर्व आपआपल्या कामात व्यस्त होते. माझ्याकडून काही पैसे मिळणार नाहीत हे माहीत असून सुद्धा संजयने माझ्यासाठी खास वेळ काढला होता. त्याने मला संगणकाच्या आज्ञावलीमध्ये (सॉफ्टवेअरमध्ये) काय काय सोयी हव्या आहेत ते सर्व विचारून घेतले. मग त्याने मला अंदाजे आज्ञावली (सॉफ्टवेअर) कशी दिसेल, कसे कार्य करील आणि ती बनवायला किती दिवस लागतील याची संपूर्ण माहिती दिली. माझ्या पसंतीचा होकार मिळताच त्या दिवसापासून त्याने वाचनालयाच्या संगणकीकरण करण्याच्या कामाला सुरुवात केली. या अनपेक्षित घटनेतून माझ्या लक्षात आले की कर्मामागील हेतु शुद्ध, व्यापक व समाजाभिमुख ठेवून जेव्हा आपण आपले कर्म निःस्वार्थीपणे करत रहातो तेव्हा आपल्याला मदत करणारे हात नकळतपणे पुढे येतात. ही एकप्रकारची ईश्वरकृपाच असते......

5 comments:

  1. तुम्ही लिहीलेले शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे"निस्वार्थ पणे काम करत राह्यलं की मदतीचे हात नकळतपणे पुढे येतात.आणि ही ईश्र्वरकृपाच असते"तीच कृपा तुमच्यावर सतत राहूदे ह्याच शुभेच्छा 🌺

    ReplyDelete
  2. अनेकदा ईश्वर जरा जास्तच कठोर परीक्षा घेतो असं वाटतं. हरकत नाही. त्यातून सुखरूप बाहेरही तोच काढतो.

    ReplyDelete
    Replies
    1. जसे आपले प्रारब्ध असते त्यानुसार देव परिक्षा घेतो.

      Delete
  3. वाचनालयाच्या ह्या महत्वाच्या टप्प्यावर श्री.वेलणकर ह्यांनी केलेले सहकार्य खूपच कौतुकास्पद आहे !

    ReplyDelete
  4. बदलत्या काळासोबत आपणही काही बदल स्विकारले की वाटचाल सोपीहोते. बदल हा निसर्गाचा नियम आहे. खूप छान वाटचाल सुरू 👌👌👌

    ReplyDelete