"आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदची अंग, आनंदाचे" असं तुकामाऊली विठ्ठल नामाबरोबर अद्वैत साध्य केल्यावर लिहून जातात. सर्वसामान्याला तीच अद्वैताची अनुभूती रोजच्या जीवनात पुस्तक वाचताना मिळत असते. परंतु विषयांशी एकरूप झाल्याने फक्त त्या विषयापुरतीच अनुभूती आपल्याला येते. परंतु अद्वैतानंद देणारे हे पुस्तक असंख्य उलथापालथी करून जाते. ते अशक्त मस्तक सशक्त करते. अंहकारी सशक्त मस्तकाला नतमस्तक करते. अशक्त मनाला विदेशाचे हस्तक बनवून गतमस्तक सुद्धा करते. पुस्तक म्हणजे मनावर सतत पडणारी दस्तक असते. पुस्तक म्हणजे घागर में सागर. पुस्तक गुरू आहे. पुस्तक म्हणजे हळूहळू होणारी वैचारिक उत्क्रांती. पुस्तक म्हणजे एकदम होणारी लाल क्रांती. पुस्तक मानवी जीवनाची गाथा आहे. या पुस्तकाची महती किती वर्णावी तेवढी कमीच आहे. परंतु एखादे पुस्तक जागतिक पातळीवर सामुहीक मनाला संमोहीत करून असे काही बदल घडवते की त्या परिवर्तनाचे सारे श्रेय त्या एका पुस्तकालाच द्यावे लागते. माझ्या वाचनालयाच्या व्यवसायावर सुद्धा सकारात्मक आनंददायी परिणाम करणारे एक पुस्तक मी अनुभवले.
कुंदापुरला लहानपणी कन्नडमधील चंदमामा मासिक हाती पडले की सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी वाचून काढायचो. मग मोठ्या गोष्टी वाचायचो. वेताळ कथा मोठी असल्याने सर्वात शेवटी वाचत असे. छोटेखानी पुस्तके मला खूप आवडायची. मग मुंबईत डोंबिवली येथे स्थायिक झालो. दहावीची परीक्षा दिल्यानंतर आमच्या फ्रेंड्स स्टोअर्स दुकानात तिर्थस्वरूप ज्येष्ठ बंधू आण्णांना मदत करू लागलो. माझे शिक्षण कन्नडमधून झाले असले तरी मराठी पुस्तकं मी आवडीने वाचायचो. मी लहान असताना सुद्धा मराठीतील छोटी छोटी गोष्टींची पुस्तके वाचत असे. गोष्टीचे पुस्तक खूप जाडजुड असेल तर मात्र थोडा कंटाळा यायचा. परंतु याला अपवाद होता तो बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकांचा. बाबुराव अर्नाळकरांचे कोणतेही पुस्तक वाचायला सुरूवात केली की कधी एकदा पुस्तकाचा शेवट येतो अशी मनामध्ये उत्सुकता निर्माण व्हायची. बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकांनी मला अक्षरशः वेड लावले होते. रण झुंजार, काळा पहाड हे माझे आवडते नायक (हिरो) होते. तेव्हा त्या पुस्तकांची किंमत रुपये २.५०/- होती. दुकानात असताना मी बाबुराव अर्नाळकरांची खूपसारी पुस्तकं विकली होती. बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकांमुळे मला वाचनाची गोडी लागली. तीच पुस्तके माझ्या वाचनानंदाचे व अद्वैतानंदाचे प्रेरणास्त्रोत बनली.
माझ्या मते लहान मुलांना पुस्तकांच्या सानिध्यात सोडून दिले की ते आपोआप पुस्तकांकडे आकर्षित होतात. घरी पालक वाचन करत असतील तर मुले सुद्धा वाचनाकडे आपोआप वळतात हा माझा अनुभव आहे. परंतु त्याऐवजी पालक आपल्या मुलांकडून वाचनाची अपेक्षा करतात. त्यांच्यावर पुस्तक वाचनाची सक्ती करतात परिणामतः मुले वाचन विन्मुख होऊन वाचनाचा कंटाळा करू लागतात. काही पालक मुलांकडून वारेमाप अपेक्षा करतात. त्यांची अपेक्षा असते की आपल्या मुलांनी मृत्युंजय किंवा इंग्रजीतील हिटलरचे 'माईन काम्फ' या सारखी जडबंबाळ पुस्तके वाचावीत. अशी पुस्तकं मुलांना वाचायला लावली की मग ती मुले परत कुठलीही पुस्तके वाचण्याकडे वळत नाहीत हा माझा कित्येक वर्षाचा अनुभव आहे.
पै फ्रेंड्स लायब्ररीची सुरुवात झाली तेव्हा मराठी पुस्तकांच्या सभासदांची संख्या इंग्रजी पुस्तकांच्या सभासदांपेक्षा जास्त होती. त्यामुळे सरूवातीला आमच्याकडे इंग्रजी पुस्तकांचे प्रमाण कमी होते. परंतु लहान मुलांची इंग्रजी पुस्तके मात्र मराठीपेक्षा अधिक होती. पालक मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी पुस्तकं वाचायला सांगायची. बाजारात सुद्धा इंग्रजीतील लहान मुलांची पुस्तके मराठीपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध असायची. इंग्रजी पुस्तकांना अधिक मागणी असल्याने ती पुस्तके जास्त विकली सुद्धा जात होती. रंगीबेरंगी छपाई, छान मुखपृष्ठ, नीटनेटकी बांधणी, उत्तम दर्जा या सर्व गोष्टींमुळे मुले इंग्रजी पुस्तकांकडे पटकन आकर्षित होत असत. त्याकाळी एका इंग्रजी पुस्तकाने व त्या पुस्तकाच्या विविध आवृत्त्यांनी किंवा भागांनी मुलांना अक्षरशः वेड लावले होते. पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्या जाडजुड पुस्तकाचे विविध भाग वाचायला सुरुवात केली होती. साधारणपणे तीनशे ते सातशे पानं असलेल्या त्या पुस्तकाचे विविध भाग बाजारात येत होते. सन १९९७ ते २००४ या कालावधीत त्या पुस्तकाचे पाच भाग बाजारात आले होते. अर्थात एव्हाना सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच की ते पुस्तक कोणते होते. त्या पुस्तकाचे नाव होते "हॅरी पॉटर".
सन १९९७ यावर्षी हॅरी पॉटर पुस्तक मालिकेतील 'हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर स्टोन' या नावाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन झाले होते. त्यानंतर दरवर्षी त्याचे पुढचे भाग प्रकाशित होत गेले. या दरम्यान सन २००१ यावर्षी पुस्तकाच्या पहिल्या भागावर चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला. डोंबिवलीतील पूजा चित्रपटगृहात हा चित्रपट झळकला होता. मी, सुमन आणि संतोष आम्ही तिघांनी हा चित्रपट पाहिला होता. चित्रपटातील प्रत्येक गोष्ट लहान मुलांना आवडेल अशीच होती. पुस्तकातील कथानकाचे अचूकपणे जसेच्या तसे चित्रपटात रूपांतर केले होते. सहाजिकच मुलांना चित्रपट आवडला. मग आता पुढे काय होते हे रहस्य जाणवून घेण्यासाठी अनेकांनी हॅरि पॉटरचे पुढील भाग वाचायला सुरूवात केली. हॅरी पॉटरच्या सर्व भागांची पुस्तके जाडजुड असून सुद्धा वाचक मंडळी आठ दहा दिवसांत पुस्तक वाचून काढायची. अनेक पालकांनी आपल्या मुलांची आवड व कल लक्षात घेऊन हॅरी पॉटर हे पुस्तक बाजारात आले की लगेच ते मुलांना विकत घेऊन द्यायला सुरूवात केली. हॅरी पॉटरच्या पुस्तकांना जास्त मागणी असल्याने मी सुद्धा आपल्या वाचनालयामधील या पुस्तकांची संख्या वाढवली. हॅरी पॉटर पुस्तक मालिकेतील प्रत्येक भागाच्या तीन ते चार प्रति मी मागवल्या होत्या परंतु तरी सुद्धा त्या प्रति कमीच पडत होत्या.
हॅरी पॉटर ही पुस्तक मालिका शालेय विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. लहान मुलांच्या वाचनाची सुरूवात ही प्रामुख्याने 'ट्विंकल' या पुस्तकापासून होत असे. त्यानंतर छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं वाचली जात असत. मग फेमस फाईव्ह, हार्डी बॉयस, नॅन्सी ड्रिव अशी इंग्रजी पुस्तके वाचनाची आवड निर्माण करून त्यातूनच वाचक तयार होत असे. हॅरी पॉटर आल्यापासून इंग्रजीतील वाचकांची संख्या भूमितीश्रेणीने वाढण्यास सुरुवात झाली असं म्हणावे लागते.
हॅरी पॉटर पुस्तक मालिकेतील पहिल्या भागाचे सन १९९७ यावर्षी प्रकाशन झाले होते. आता सहावा भाग जुलै २००५ मध्ये बाजारात येणार होता. यंदा मुलांसह ज्येष्ठ मंडळी सुद्धा सहाव्या भागाची आतुरतेने व उत्सुकतेने वाट पाहत होते. 'हॅरी पॉटर अँड दि हाफ ब्लड प्रिन्स' असं सहाव्या भागाच्या पुस्तकाचे शिर्षक जाहीर झाले होते. तसेच पुस्तक बाजारात येण्याआधीच त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुद्धा प्रदर्शित झाले. आम्हा व्यवसायिकांना त्या मुखपृष्ठाची छायाचित्रे (पोस्टर्स) देण्यात आली. अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांच्या बाहेर ती छायाचित्रे (पोस्टर्स) लावली होती. अनेक व्यवसायिकांना वाचकांनी त्या पुस्तकाचे आगाऊ पैसे देऊन पुस्तक राखून ठेवण्यास सांगितले होते. एका पुस्तकामुळे पुस्तक विक्रेत्यांच्या आर्थिक उलाढालीमध्ये खूप मोठा बदल झाला होता.
पै फ्रेंड्स लायब्ररीमध्ये सुद्धा अनेक वाचकांनी हॅरी पॉटर पुस्तक मालिका वाचलेली होती. ते सुद्धा सर्वजण सहाव्या पुस्तकाची वाट पाहत होते. आपल्या वाचनालयाच्या बाहेर हॅरी पॉटरच्या सहाव्या भागाचे छायाचित्र (पोस्टर) लावण्यात आले. कहर म्हणजे फक्त हॅरी पॉटर वाचण्यासाठी काही वाचक सभासद झाले होते तर काही लोकांनी पुस्तक विकत घेण्यासाठी आगाऊ पैसे देऊन आपली नावे नोंदवली होती. पुस्तकाच्या इतिहासात असे प्रथमच घडत होते. जगात सर्वत्र या पुस्तकाची मागणी होती. लहानमोठ्या सर्व वयोगटातील वाचक या पुस्तकाची वाट पाहत होते.
दिनांक १६ जुलै २००५ रोजी हॅरी पॉटर पुस्तक मालिकेतील सहावा भाग प्रकाशित होणार असं जाहीर करण्यात आले. पुस्तक येण्याआधीच वाचकांनी त्या पुस्तकासाठी आपली नांव नोंदणी करून ठेवली होती. तो शनिवारचा दिवस होता पुस्तकं आणण्यासाठी मी दोघांना मुंबईला पाठवले. सकाळी अकराच्या आसपास हॅरी पॉटर पुस्तकाचा सहावा भाग आपल्या वाचनालयात दाखल झाला. एकाद्या पुस्तकाच्या सर्वात जास्त प्रति आज मी प्रथमच मागवल्या होत्या. हॅरी पॉटरच्या सहाव्या भागाच्या सर्वात जास्त म्हणजे २५ प्रति मी मागवल्या होत्या. एका प्रतिची किंमत रुपये ६९५/- इतकी होती. पुस्तक येणार असल्याचे मी सभासदांना आधीच सांगून ठेवल्याने त्यादिवशी सभासद दहा वाजल्यापासून पुस्तकाच्या प्रतीक्षेत वाचनालयात जमा झाले होते. फक्त एका पुस्तकामुळे वाचनालयात वाचकांची रेलचेल वाढली होती. केवळ एक पुस्तक आपल्या वाचनालयासह जगभर काय काय उलथापालथी करू शकते याचा मी अनुभव घेत होतो....
वा वा! क्या बात है?नेहमी प्रमाणे सुंदर 👌
ReplyDelete