"आप कभी भी कुछ बनने के सपने मत देखीए। हमेशा कुछ करने के सपने देखीए। जैसेही आप करते जाओगे फिर आप अपनेआप बनते जाओगे।" असा संदेश तरूणांना माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सन २०१४च्या निवडणूकीआधी रजत शर्माच्या 'आप की अदालत'मध्ये मुलाखत देताना दिल्याचे अनेकांना आठवत असेलच. थोडक्यात लौकिक प्रसिद्धीचा मनामध्ये कोणताही हव्यास न बाळगता ध्येयाला अनुसरून काम करत राहीलो की हारतुरे, मानसन्मान आपोआपच मिळत जातात. म्हातारपणी मिळणार्या हारतुरे व मानसन्मानापेक्षा तरूणपणी त्या गोष्टी मिळणे अधिकच आनंददायी असते. विशेषतः त्यांची अपेक्षा केलेली नसताना जेव्हा लोक तुमच्यासाठी हारतुरे घेऊन तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतात तेव्हा मग आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने योग्यरितीने वाटचाल करत आहोत याची खात्री होते. त्या शुभेच्छा व हारतुरे म्हणजे लोकांच्या अपेक्षांची पुर्तता केल्याची ती पोचपावती असते. परंतु या अपेक्षापुर्तीच्या प्रवासातच मग नकळतपणे काही ऋणानुबंध व सात्विक नाती सुद्धा तयार होत असतात. मी सुद्धा तो अनुभव घेतच होतो.
आपला व्यवसाय व्यापक पातळीवर लोकांपर्यंत नेण्यासाठी जाहिरातीची आवश्यकता असते. जाहिरातीसाठी कितीही पैसा खर्च केला तरी तो कमीच पडतो. खरं तर वाचनालयाच्या व्यवसायात जाहिरात करण्याची आत्यंतिक गरज कधीच नव्हती. उत्तम दर्जाची विपुल पुस्तके, बाजारात नवीन आलेली पुस्तके, वेळोवेळी प्रसिद्ध होणारी मासिके ज्या वाचनालयात वाचकांसाठी वेळच्यावेळी उपलब्ध होतात त्या वाचनालयाकडे वाचक आपोआप खेचले जातात. उत्तम वाचक हे नेहमी पुस्तकांच्या शोधत फिरतच असतात. जसे जातीचे खवय्ये क्षुधाशांतीसाठी चविष्ट पदार्थांची विविध ठिकाणे शोधून काढतात तसे पट्टीचे वाचक मेंदूच्या खुरकासाठी निरनिराळी वाचनालये शोधून काढून आपली ज्ञानतृष्णा शांत करीत असतात. सर्वांना पुस्तक खरेदी करणे परवडणारे नसते. अश्या वाचकांसाठी वाचनालय हा आवश्यक पर्याय बनतो. मग त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी वाचनालयाच्या प्रसिद्धीची आवश्यकता निर्माण होते. आता आपल्या वाचनालयाला लवकरच तशी प्रसिद्धी मिळणार होती. रविवारच्या वर्तमानपत्रात आपल्या वाचनालयाची सविस्तर बातमी छापून येणार होती.
जून २००४ च्या शेवटच्या रविवारी सौ. मीना गोडखिंडी यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या रविवारी म्हणजेच दिनांक ४ जुलै २००४ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रात पै फ्रेंड्स लायब्ररीची बातमी छापून येणार होती. मी त्या रविवारची आतुरतेने वाट पाहत होतो. सुमनला मुलाखतीबाबत कल्पना दिली होती. वाचनालयाला प्रसिद्धी मिळणार म्हणून ती पण खुश होती. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री वाचनालय बंद करून घरी आलो. मनात फक्त उद्याचा विचार होता. अती उत्सुकतेपोटी जेवण सुद्धा नीट गेले नाही. जेवण झाल्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होतो. एरवी कितीही ताणतणाव असला तरी मला अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागत असे. परंतु त्यादिवशी मात्र काही केल्या झोप येत नव्हती. प्रथमच नामांकित मराठी वर्तमानपत्रात आपल्या वाचनालयाची बातमी छापून येणार होती. सर्व मित्र, नातेवाईकांना सुद्धा या बातमीबद्दल कळवले होते. बातमी कशी असेल? किती मोठी असेल? माझे छायाचित्र (फोटो) कसे असेल? वर्तमानपत्र वाचून झाल्यावर सभासदांची प्रतिक्रिया काय असेल? असे निरनिराळे विचार मनात येत होते. महत्वाचे म्हणजे 'तु अजूनही वाचनालय चालवतोस का?' असं खोचकपणे विचारणाऱ्यांना चोख उत्तर मिळणार होते. मनात घोंघावणाऱ्या या सर्व वैचारिक वादळामुळे रात्री उशिरा झोप लागली. वेळ आठवत नाही परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी लवकर उठून बसलो. उठल्यावर लगेचच पहिला दूरध्वनी ठाण्याहून एका परिचित व्यक्तीचा आला. त्यांनी वर्तमानपत्रातील आपली बातमी वाचली होती. त्यांनी वाचनालयाचे खूप कौतुक केले व 'अशीच वाचनालयाची प्रगती होऊ दे' अशी शुभेच्छावजा प्रतिक्रिया दिली. मला वाचनालयात लवकर जायचे होते. झटपट सकाळची कामं आटपून नवीन कपडे परिधान केले व वाचनालयात जाण्यासाठी तयार झालो. रविवार असल्याने संतोष अजूनही झोपला होता. सुमनने गरम गरम चहा तयार ठेवला होता. मी आईबरोबर चहा घेतला. अधून मधून दुरध्वनी वाजतच होता. गरम गरम चहा घाईघाईतच प्यायलो. आईच्या पाया पडून वाचनालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलो. त्यादिवशी माझा उत्साह वेगळाच होता.
रविवार, दिनांक ४ जुलै २००४ या दिवशी लोकसत्ता वर्तमानपत्रातील ठाणे वृत्तांत या विशेष पुरवणीमध्ये आपल्या वाचनालयाची बातमी छापून आली होती. डोंबिवलीत लोकसत्ता वर्तमानपत्राचा सर्वाधिक खप होता. मी वाचनालयात पोहचण्याआधीच तीन चार परिचितांनी वर्तमानपत्रातील बातमी वाचून माझे अभिनंदन केले होते. मी आधी वाचनालयाच्या बाजूला असलेल्या जोशी पेपरवाले यांच्या गल्ल्यावरून (स्टॉलवरून) लोकसत्तेचे दहा अंक विकत घेतले. मग मी वाचनालयात पोहचलो. तिथे अगोदरच काही सभासद माझी वाट पाहत उभे होते. वर्तमानपत्र घेऊन वाचनालयात प्रवेश करताच उपस्थित सर्व सभासद व कर्मचार्यांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले. सर्वांचे मी मनापासून आभार मानले. मी विकत घेतलेले लोकसत्ता वर्तमानपत्र उघडले. ठाणे वृत्तांत या विशेष पुरवणीमध्ये माझ्या छायाचित्रासह (फोटोसह) मोठी सविस्तर बातमी छापून आली होती. मी भावूक होऊन दाभणटोक नजरेने एक एक शब्द वाचून काढला. मी मुलाखतीत सौ. मीना गोडखिंडी यांना जे सांगितले होते ते सर्व जसेच्या तसे छापून आले होते. वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रणं बाहेर लावलेल्या फलकावर बाहेरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या नजरेत पडेल अश्याप्रकारे लावण्यास सांगितले. त्या दिवशीचा माझा रागरंग निराळाच होता.
माझे शिक्षण कन्नड मधून झाले होते. परंतु मला मराठी व्यवस्थित लिहता, वाचता, बोलता येत होते. सन १९८६ला फ्रेंड्स लायब्ररीची स्थापना झाल्यापासून ते संगणकीकरण करण्यापर्यंतची सर्व सविस्तर माहिती सौ. मीना गोडखिंडी यांनी वर्तमानपत्राकडे पाठवली होती. ती सर्व जशीच्या तशी माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती. लोकसत्ता वर्तमानपत्रातील बातमीचा सर्व मजकूर वाचून मला खूप आनंद झाला होता. फ्रेंड्स लायब्ररीचा पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंतचा सर्व प्रवास डोळ्यासमोर उभा राहीला. वर्तमानपत्राचा हा अंक संपुर्ण ठाणे जिल्ह्यातील असंख्य लोकांनी वाचला असेल, फ्रेंड्स लायब्ररी किती वाचकांपर्यंत पोहचली असेल? असे वेगवेगळे विचार माझ्या मनात येत होते. सौ. मीना गोडखिंडी यांच्यामुळे फ्रेंड्स लायब्ररीची ही पहिली बातमी छापून आली होती.
सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत मी वाचनालयातच होतो. मध्यंतरी फक्त एकदाच दहा मिनिटांसाठी फ्रेंड्स स्टोअर्समध्ये जाऊन अण्णांना वर्तमानपत्र दाखविले व त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. मग परत वाचनालयात येऊन बसलो. अनेक मित्र व नातेवाईक बातमी वाचून मला भेटायला आले होते. त्यातील काहीजण येताना पुष्पगुच्छ सुद्धा घेऊन आले होते. आलेल्या प्रत्येकाने माझे तोंडभरून कौतुक केले. श्री. अजय फाटक यांनी सौ. मीना गोडखिंडी यांना बातमीसाठी वाचनालयात आणले होते. परंतु त्या घटनेआधी वाचनालयाचे नूतनीकरण झाले होते. मग त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला श्री. संजय वेलणकर यांच्यामुळे वाचनालयाचे संगणकीकरण झाले होते. मी स्वतः काही बनण्याऐवजी ध्येयपूर्तीसाठी काम करत गेलो व मग असा हा विविध घटनांचा विलक्षण प्रवास वर्तमानपत्रातील बातमी बनून वाचनालयाच्या प्रसिद्धीसाठी कारणीभूत झाला. आता सभासद संख्या वाढत चालली होती. मला पुढील उद्दीष्टपुर्तीसाठी विचार व कृती करायला सुरुवात करणे आवश्यक होते.
काही माणसे आपल्या जीवनात आल्यावर अशी नाती तयार होतात की जणू काही रक्ताच्या नात्यांपेक्षा ही माणसे आपल्याला अधिक जवळची वाटू लागतात. आपल्या नकळतपणे ही नात्यांची वीण जुळून येत असते. असंच काहीसं माझ्या बाबतीत झाले. आमच्या कुटुंबात आईसह आम्ही चार भाऊ आणि तीन बहिणी. तीन बहिणींपैकी फक्त मोठी बहीण गावाला होती. बाकी आम्ही सर्वजण डोंबिवलीत स्थायिक झालो होतो. श्री. अजय फाटक यांनी सौ. मीना गोडखिंडी यांची ओळख करून दिली. त्यांनी वर्तमानपत्रात बातमी छापून आणली. त्यानंतर सौ. मीना गोडखिंडी वाचनालयात नियमितपणे येत असत. काही वर्षात सौ. मीना गोडखिंडी या माझ्या मीनाताई कश्या झाल्या समजलेच नाही. माझी एक मोठी बहीण डोंबिवलीबाहेर गावी होती. मीनाताईंनी तीची उणीव भरून काढली होती. आमच्या भाऊ बहिणीच्या नात्याने आमच्या संपुर्ण कौटुंबिक वर्तुळाला पुर्तता आली.....
आनंदाचे क्षण
ReplyDeleteआनंदाचे क्षण
ReplyDeleteतुमच्या दोघांच्या भाऊ-बहिणीचं नातं मी जवळून अनुभवले आहे.तुमच्या कर्तृत्वाला छान कोंदण मिळालं.
ReplyDelete