'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी' या सुप्रसिद्ध गीतातील राजा राणीचे दुःख व नकारात्मक भावना वजा केल्या तर हेच गीत थोडेफार शाब्दिक बदल करून खेळीमेळीच्या वातावरणातील एखाद्या गंमतशीर प्रसंगाला सुद्धा अचूकपणे लागू होऊ शकते. अश्या गंमतशीर प्रसंगात सुद्धा खेळ भातुकलीचाच असतो व राजाराणी उपाध्या सुद्धा काल्पनिकच असतात. परंतु त्या प्रसंगाचा आनंद लुटणारी मंडळी मात्र काल्पनिक नसून वास्तवातील खरीखुरी माणसे असतात. अर्थात खरोखरच असा एक गंमतशीर प्रसंग घडला होता.
कोंडाणा लेणीच्या सहलीतील काळजी वाटायला लावणार्या थरारक अनुभवानंतर कोणत्याही डोंगर-पर्वतावर किंवा धबधब्यावर सहल काढायची नाही व फक्त पर्यटनगृहीच (रिसॉर्टवरच) सहलीला जायचे असं आम्ही निश्चित केले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही २००३च्या जून महिन्यात पावसाळी सहल काढायची होती. नेहमी सहलीला येणार्या लोकांनी व सभासदांनी जून महिन्याच्या प्रारंभीच यंदा सहल कधी आहे? कुठे जाणार आहे? पैसे किती भरायला लागतील? वगैरे विचारपूस करायला सुरुवात केली होती. अद्याप आम्ही काहीच ठरवलेले नव्हते. पर्यटनगृह आरक्षित करण्यासाठी (रिसॉर्टसाठी) थोडे जास्त पैसे मोजायला लागत असले तरी तिथे सहलीचा मनमुराद आनंद लुटता येणार होता. पाऊस पडो न पडो, तिथे जलतरण तलाव (स्वीमिंग पूल) असल्याकारणाने सर्वांना पाण्यात खेळायला मिळणार होतेच. त्याच बरोबरीने निरनिराळे खेळ सुद्धा खेळता येणार होते. वेगवेगळ्या प्रकारे सहलीचा क्रिडानंद लुटता येणार होता. फक्त यावर्षी सहल कोणत्या पर्यटनगृही (रिसॉर्टवर) काढायची हे मात्र ठरवायचे बाकी होते.
नेहमीप्रमाणे पर्यटनस्थळ सुचवायला श्री. विनायकराव आपल्या सेवेला उपलब्ध होतेच. वर्षा सहलीला अंदाजे किती लोकं येणार आहेत आणि किती पैसे खर्च करायची तयारी आहे फक्त एवढ्याचा तपशील त्यांच्या समोर मांडला की काम झालेच म्हणून समजायचे. सहलीला येणारी मंडळी प्रामुख्याने नोकरी करणारी असल्याने अवाजवी पैसे मोजून सहलीचा आनंद लुटण्याची त्यांची मानसिकता नव्हती व त्यामुळे सहलीला येणार्यांची संख्या कमी होण्याची सर्वाधिक शक्यता होती. पर्यटनगृहाच्या खर्चाव्यतिरिक्त प्रवासाच्या खर्चाचा सुद्धा विचार करावा लागणार होता. मी आणि विनायकने मिळून दोन तीन पर्यटनगृहे (रिसॉर्ट) पाहिली. परंतु त्यातील एकही मला पसंत पडले नाही. परत जे पर्यटनगृह पसंतीस उतरत होते ते एक तर लांब होते किंवा त्यांच्या सेवा सुविधांचा खर्च परवडणारा नव्हता. शेवटी शहद (शहाड) नजीकचे एक पर्यटनगृह विनायकने सुचवले. प्रवासादि सर्व खर्चांचा विचार करता प्रत्येकी रुपये ३००/- इतका खर्च येणार होता. मी त्या पर्यटनस्थळांवर विचार करण्यास अनुकूलता दर्शविली. मग काही दिवस आगोदर शहदच्या त्या पर्यटनगृहाची पहाणी करून यायचे ठरवले.
मी, विनायक, अजय व अजून एकजण असे आम्ही चारजण पर्यटनगृहाची पहाणी करायला निघालो. डोंबिवलीहुन कसारा गाडी पकडली व शहद रेल्वे स्थानकावर उतरलो. तिथून रिक्षाने पर्यटनगृही पोहचलो. विनायकच्या ओळखीमुळे आम्हाला संपुर्ण पर्यटनगृहाची व्यवस्थित पहाणी करायला मिळाली. विविध खेळांसाठी मोठ्ठ पटांगण, एक मोठा व एक छोटा असे दोन जलतरण तलाव (स्वीमिंग पूल), जेवणाची उत्तम व्यवस्था इत्यादी आवश्यक सोयी सुविधा तिथे उपलब्ध होत्या. आम्ही तिथे जेव्हा पोहचलो होतो तेव्हा दुपारची जेवणाची वेळ झाली होती. पाहुणाचार म्हणून त्यांनी आम्हाला जेवण दिले. विनायकची ओळख व आदरातिथ्य म्हणून त्यांनी आमच्याकडून जेवणाचे पैसे सुद्धा घेतले नाहीत. आम्हा चौघांना जेवण आवडले होते. मग काय विचारता? लगेच काही रक्कम आगाऊ देऊन पर्यटनगृहाची तारीख आरक्षित (बुक) केली. फक्त किती माणसे येणार आहेत ते काही दिवसांत कळवू असं त्यांना सांगितले. मग परत काही वेळ पर्यटनस्थळांवर फेरफटका मारून तिथून परतीला निघालो.
आता फ्रेंड्स लायब्ररीच्या बाहेर वर्षा सहलीचा फलक लावण्यात आला होता. सहलीचे ठिकाण, पर्यटनगृहाचे नावं, दिनांक, प्रत्येकी किती खर्च येणार याची सविस्तर माहिती सभासदांना देण्यात आली होती. दोन तीन दिवसांतच चाळीसएक लोकांनी पैसे भरून आपले नांव नोंदवले. सन १९९८ पासून फ्रेंड्स लायब्ररीची वर्षासहल निघत होती. सहलीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मी स्वतः जातीने लक्ष देत होतो. अजय आणि मामा सुद्धा सर्वांची काळजी घेत असत. लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना आम्ही बरोबर घेऊन जायचो. प्रत्येकजण सहलीचा आनंद लुटायचे. अनेक सभासद तर असे होते की जे आमच्याबरोबर दरवर्षी सहलीला येत होते. त्यांची संख्या सुद्धा प्रत्येक वर्षी वाढत चालली होती. सहलीमध्ये फक्त मजा-मस्ती होत नसे तर त्याचबरोबर आम्ही सर्व पर्यटकांची व्यवस्थित काळजी घेत असल्यामुळे लोकांचा आमच्यावरील विश्वास वृद्धिंगत होत चालला होता. दरवर्षीच्या प्रघातानुसार जून महिन्याचा शेवटचा रविवार हा वर्षासहलीचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला होता.
रविवारचा दिवस म्हटला की अनेकजण सकाळी आरामात उठणे पसंत करतात. आठवड्यातील सहा दिवस चाकोरीबद्ध कामं करून झाल्यावर हा एकच दिवस सुट्टी मिळत असल्याने विश्रांती घेण्याकडे बहुसंख्य लोकांचा कल असतो. परंतु सहल म्हटले की त्यादिवशी आपण सर्व दैनंदिन कामे, घर, संसार, इतर रोजची डोकेदुखी इत्यादी सर्व काही विसरून एका वेगळ्या जगात प्रवेश करत असतो. रविवारी सकाळी सात वाजता टिळनगरमधील आपल्या वाचनालयाच्या समोर सर्वांना जमण्यास सांगण्यात आले होते. काही लोकं वेळेआधीच आले होते तर काही लोकांचे येणे चालूच होते. काही लोकं अजून यायचे बाकी होते. सर्वांसाठी चहा बिस्किटे मागवली होती. सातची वेळ ठरली असली तरी सर्वजण जमेपर्यंत आठ वाजले. आठ वाजता बस निघाली. "गणपती बाप्पा मोरया" या घोषणांनी बस दुमदुमली व बस प्रवासाला प्रारंभ झाला. बसला पर्यटनगृही (रिसॉर्टवर) पोहचण्यासाठी एक तास लागणार होता. दरम्यानच्या काळात बस प्रवासात पर्यटनस्थळी पोहचेपर्यंत गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सुरू होता. फक्त मध्यंतरी एकदा एके ठिकाणी थोडावेळ बस थांबवून फोटो काढण्यात आले होते. अंदाजे नऊच्या आसपास बस पर्यटनगृही पोहचली. सर्वांना गरमागरम कांदेपोहे व उपमा असा नाष्टा देण्यात आला.
नाष्टा आटोपल्यावर साधारणतः दहाच्या सुमारास सर्वांनी विविध खेळ खेळायला सुरुवात केली. अर्थातच सर्व खेळांची सूत्रे माझ्याकडे होती. विविध वयोगटातील लोकांना एकत्र ठेवणे कठीण होते. परंतु ते कलाकौशल्य माझ्याकडे होते त्यामुळे प्रत्येकजण खेळात सहभागी होत होते. काही छोटे मोठे खेळ खेळून झाल्यावर राजा-राणी नावाचा खेळ सुरु करीत असल्याचे मी जाहीर केले. हा खेळ मोठा गंमतशीर होता. सहलीला आलेल्या लोकांमध्ये दोन गट बनवण्यात आले. दोन्ही गटात एक नेता (लिडर) नेमण्यात आला. दोन्ही गटातल्या लोकांना काही अंतर राखून बसायला सांगितले. त्यातील एकाची न्यायाधीश (जज) म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, मी एखाद्या वस्तूचे नावं सांगितले की दोन्ही गटातील लोकांनी ती वस्तू शोधून काढून ती आपल्या गटाच्या नेत्याकडे (लीडरकडे) आणून द्यायची. मग तो नेता ती वस्तू न्यायाधीशाकडे (जजकडे) घेऊन जाणार. जर ती वस्तू बरोबर असेल तर सर्वात आधी ती वस्तू शोधून आणणार्या गटाला एक गुण बहाल केला जाणार होता. अश्याप्रकारे जो गट सर्वाधिक गुण मिळवेल तो विजयी घोषित केला जाणार होता. मी दोन्ही गटातील लोकांना नियम व अटी व्यवस्थित समजावून सांगितल्या व काही वेळातच खेळ सुरू करत असल्याचे सांगितले.
माझ्याकडे विविध वस्तूंची नावे लिहून तयार होती. सर्वांचे माझ्याकडे लक्ष होते. वाढत जाणारी उत्सुकता सर्वांच्या चेहर्यावर व देहबोलीतून दिसत होती. मी नाव घ्यायला सुरुवात केली. मी पहिल्या वस्तूचे नाव घेतले. पुरुषांच्या खिशातील फणी. दोन्ही गटातील तरुण मुले फणीच्या शोधात निघाली. एका गटातील मुलाने एका पुरुषाकडून खिशातली फणी आणून दिली. त्या गटाला एक गुण मिळाला. दुसऱ्या वस्तूचे नाव होते जुना बाद झालेला पास. ते नावं घेताच सर्वांची तारांबळ उडाली. सर्वजण आपआपली पाकिटे व पर्स शोधायला लागले. या गडबडीत काही लोकांचे पैसे सुद्धा खाली पडले. परंतु काही वेळातच एका गटातल्या मुलांनी जुना बाद झालेला पास त्यांच्या नेत्याकडे आणून दिला. न्यायाधीशांनी तो पास पडताळून पाहिला. तो बरोबर बाद झालेला पास असल्याने मग त्या गटाला एक गुण बहाल करण्यात आला. तिसरी वस्तू पुरुषांचा कंबरपट्टा. मी जसे नाव घेतले काही पुरुषांनी लगेच कंबरपट्टा काढून दिला. चौथी वस्तू होती 'न भिजलेला रुमाल'. पावसामुळे सर्वांचे रुमाल भिजले होते. त्यात सर्वांनी आपले सामान उपहारगृहाच्या खोलीमध्ये ठेवले होते. सर्वजण आपआपल्या खोलीच्या दिशेने धावत सुटले आणि येताना कोरडा रुमाल घेऊन आले. पाचवी वस्तू बनियन होती. आता स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह इतका शिगेला पोहचला होता की अनेकांनी गुण मिळवण्यासाठी वेळ वाचावा म्हणून शर्टाची बटन न काढता सरळ शर्टच फाडून टाकला व झटपट आतील बनियन काढून दिली. सहलीला आलेला प्रत्येकजण या खेळाचा अक्षरशः मनसोक्त आनंद लुटत होता. सहावी वस्तू होती डोक्यातील पांढरा केस. विचार करा काय धमाल उडाली असेल. गटातील स्पर्धक, नेता, न्यायाधीश आणि मी सुद्धा सर्वजण या प्रसंगाचा मनमुराद आनंद घेत होतो. एका पांढऱ्या केसासाठी झिंज्या उपटायला जो तो एकमेकांच्या अंगावर पडत होता. सगळेजण बेभान होऊन बाल की खाल काढण्यात 'गॉन केस' झाले होते. त्यातल्या त्यात सुरक्षित होते ते फक्त अगोदरच 'गॉन केस' म्हणून जाहीर झालेले म्हणजे टकले मंडळी. त्यांचा कोणी बाल सुद्धा बाका करू शकले नाही. शेवटी एका गटाने पांढरा केस आणुन स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले व त्याच केसाने दुसर्या गटाचा गळा कापला. गुण मिळवण्यासाठी सुप्तावस्थेतील दबा धरून बसलेले हे अंगीभूत गुण उफाळून वर येत होते. सातवी वस्तू होती लिपस्टिक. हे तसं तुलनेने सोपं होते. परंतु ती वस्तु लवकर आणून देण्यासाठी पर्स ठेवलेल्या जागेपर्यंत पोहचणे, मग ती वस्तु पर्समध्ये शोधताना व पर्स रिकामी करताना उडालेली तारांबळ, नंतर सापडलेली लिपस्टिक आणताना केलेली कसरत या सर्व गोष्टी पहाताना हसून हसून पुरेवाट झाली होती. सौंदर्याचा भाग म्हणून नाजूक नखं लांब वाढवण्याची सवय असताना सुद्धा कोणत्याही महीलेने लिपस्टीकसाठी आपल्या वाघनखांनी पर्स फाडून काढल्याचे मात्र निदर्शनास आले नाही. स्नायुबळाच्या आभावापोटी त्यांनी ते टाळले असावे. आतापर्यंत हा राजाराणीचा खेळ खेळायला सुरुवात करून जवळपास एक तास तरी झाला होता. पुढे आठवी वस्तू एकदम मजेदार होती. सर्वांचे माझ्याकडे लक्ष लागले होते. स्पर्धकांनी निरनिराळ्या वस्तू आधीच काढून तयार ठेवल्या होत्या. मला त्या सगळ्यांना चकवायचे होते. यावर मी अगोदरच विचार करून ठेवला होता. एकदम धमाल येईल असं वेगळे नाव मी वस्तुंच्या यादीत टाकले होते. सर्वजण माझ्या घोषणेकडे उत्सुकतेने पहात असतानाच मी पटकन 'वेटर' असं नाव घेतले. सगळेच पावसात भिजलेले होते त्यामुळे मीच 'वेटर' आहे म्हणजे 'ओला आहे' असा दावा करण्याचे त्यावेळी कोणाला सुचले नाही हे नशीबच म्हणायला हवे अन्यथा न्यायाधीश सुद्धा न्यायनिवाडा करू शकले नसते. सगळ्यांनी त्या शब्दाचा सर्वज्ञात, सर्वमान्य मतीतार्थच घेतला व दोन्ही गटातील तरुण मुलं वेटरच्या शोधत पळत सुटली. एका गटातल्या मुलांना त्या पर्यटनगृहात काम करणारा एक वेटर भेटला. उत्साहाच्या भरात त्यांनी त्यालाच उचलले. त्या वेटरला काय चाललय काही कळेना. तो घाबरून, वैतागून ओरडायला लागला. त्याचे ओरडणे ऐकून तिथला व्यवस्थापक (मॅनेजर) सुद्धा धावत आला. सहलीला आलेला प्रत्येकजण यावेळी एक एक मिनिटांचा, एक एक प्रसंगाचा आनंद घेत होता. शेवटी मी त्या वेटरला सोडायला सांगितले. दोन्ही गटांना एक गुण एक बहाल केला. वेटरच्या मदतीला धावून आलेल्या व्यवस्थापकाला (मॅनेजरला) राजाराणीचा भातुकलीचा खेळ समजावून सांगितला व त्याला सोडतं घेण्यासाठी म्हणजे 'टेक इट पॉलिसी'साठी विनंती केली. तेव्हा कुठे त्या राजाने कोंडलेला श्वास सोडला व तो शांत झाला. तर अशी ही भातुकलीच्या खेळातील राजाराणीची अधुरी कहाणी. काही गोष्टींच्या अधुरेपणातच त्यांच्या पुर्णत्वाचा आनंद दडलेला असतो, त्यामुळेच त्यादिवशीचा तो राजाराणीचा भातुकलीचा अधुरा खेळ चिरस्मरणीय झाला....
मस्त मस्त!! ब्लाॅग वाचताना ट्रीपची मजा अनुभवता आली.
ReplyDeleteब्लॉग वाचताना राजाराणी खेळ प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहिला आणि मजा आली.
ReplyDelete