Thursday, October 15, 2020

पै फ्रेंड्स लायब्ररी हे मुंबईतील पहिले संगणकीय वाचनालय बनले...

'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' या विशुद्ध, सर्वव्यापक व समाजाभिमुख हेतूने वाचनालयात 'संगणेशाची' स्थापन करण्याचे मनावर घेतल्यापासून त्यात येणार्‍या सर्व अडीअडचणी दूर करत 'निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषुु सर्वदा' यानुसार 'श्रीगणेशाने' सुद्धा संगणकीकरणाला आशीर्वाद दिल्याचे मला जाणवले. तेव्हा संपुर्ण ठाणे जिल्ह्यात संगणेशाची स्थापना झालेले म्हणजे संगणकीकरण झालेले एकही वाचनालय नव्हते. परंतु श्रीगणेशाच्या आशीर्वादामुळे पुढील काही दिवसांत पै फ्रेंड्स लायब्ररी तो मान पटकावणार होती. मला त्याचा आनंद व अभिमान वाटत होता. मुंबईतील काही वाचनालयांचे दैनंदिन कामकाज संगणकावर चालते असे मी ऐकले होते. परंतु त्यांची आज्ञावली (सॉफ्टवेअर) वेगळी होती. ती आज्ञावली फक्त विशिष्ट शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या उमेदवारांच्या अनुषंगाने बनवलेली होती व ती फक्त त्यांनाच वापरता येत होती. परंतु मला कोणीही सर्वसामान्य व्यक्ती सहजपणे वापरू शकेल अशी साधी, सोपी (युझर फ्रेंडली) आज्ञावली (सॉफ्टवेअर) हवी होती. माझ्याकडील कर्मचारी सुशिक्षित असले तरी संगणकीय कार्यप्रणालीबाबत पुर्णतः अनभिज्ञ होते. तेव्हा त्यांना सुद्धा समजायला व वापरायला सहजसुलभ होईल अशी आज्ञावली (सॉफ्टवेअर) बनवायला मी संजयला सांगितले. त्याने त्याबाबत सहमती दर्शवली. "फक्त सुरुवातीला एकदाच सर्व सभासदांची व पुस्तकांची अनुक्रमे माहिती संगणकात भरली की पुढील काम एकदम सोप्पं झालेलं असेल", असे संजय म्हणाला. मामा आणि अजय यांना मी संगणकाबाबत पुर्वकल्पना दिली होती. संगणकाचा कामकाजात वापर करताना त्यात सराईत होईस्तोवर थोडे दिवस प्रशिक्षण दिले जाणार असल्याने ते दोघेही मनाने संगणकीकरणास अनुकूल झाले होते.


तंत्रज्ञान वापरून कुठल्याही क्षेत्रात प्रगती करता येते. वर्षानुवर्षे वाचनालय चालविणारी मंडळी जुन्या पद्धतीने आपआपली वाचनालये चालवीत होती असं माझ्या निदर्शनास आले होते. संगणकामुळे वेळ, श्रम व पैसा वाचणार होताच परंतु त्याच बरोबर इतर अनेक फायदे मिळणार होते. वाचनालयात नवीन पुस्तकं आली की ती वाचायला कोणी व कधी नेली हे शोधायला पुर्वी खूप वेळ लागत असे. तो वाचणार होता. तसेच दिवसातून किती सभासद वाचनालयात येतात? ते काय वाचतात? त्यांनी कधीपर्यंत वर्गणी भरली आहे? या महिन्यात किती लोकांची वर्गणी येणे बाकी आहे?अश्या काही प्रश्नांची उत्तरे शोधताना पुर्वी भरपूर वेळ व श्रम लागत असे ते सुद्धा संगणकामुळे कमी होणार होते. जुन्या पद्धतीने कामकाज चालवायला कर्मचारी जास्त लागत होते. पंरतु असे असूनही संगणक आल्यावर कर्मचारी कमी करण्याचा माझा अजिबात विचार नव्हता. सभासदांना उत्तम सेवा, सुविधा पुरवणे या माझ्या मुळ एकमेव उद्दिष्टाशी मी नेहमीच प्रामाणिक होतो.


वाचनालयाची आज्ञावली (सॉफ्टवेअर) कशी असेल याची मला काहीच कल्पना नव्हती. सर्वसामान्यांसाठी सहज सुलभ होईल अशी आज्ञावली संजय सुद्धा प्रथमच बनवत होता. कितीही अडचण आली तरी संगणकीकरण करायचेच हा आमचा निर्धार पक्का झालेला होता. आता फक्त सुरुवात करणेच बाकी होते. मग संजयने पुढील सर्व कार्यक्रमांची क्रमवारी व कार्यवाही समजावून सांगितली. ही सर्व जवाबदारी कोणा एकाच्या खांद्यावर टाकायला लागणार होती. संजयने त्याच्याबाजूने आज्ञावली बनवायची जवाबदारी त्याच्या एका मित्राकडे सोपवली. माझ्याबाजूने मी त्या मित्राला काय हवे नको ते पहाण्याची सर्व जवाबदारी घेतली. सभासदांच्या नावं नोंदणीचा अनुक्रम तसेच पुस्तकांची तपशीलवार नोंद इत्यादी सर्व माहिती मला गोळा करायला लागणार होती. वाचनालयाच्या आज्ञावलीची मुलभूत संरचना तयार करण्यासाठी संजयने त्या मित्राची नेमणूक केली होती. मी त्या मित्राच्या सतत संपर्कात होतो. संगणकीकरण करण्यासाठी त्याला जे काही लागणार होते ती सर्व माहिती व साहित्य पुरवण्याची जवाबदारी मी घेतली होती. संपूर्ण आज्ञावली (सॉफ्टवेअर) तयार होण्यासाठी तीन ते चार महिने सहज लागणार होते. पण एकदा का ती आज्ञावली तयार झाली की मग विशेष काही काम शिल्लक रहाणार नव्हते. 


सन १९८६ यावर्षी जेव्हा पै फ्रेंड्स लायब्ररीची सुरुवात झाली तेव्हापासूनच सभासद व पुस्तक नोंदणी एका विशिष्ट पद्धतीने केली जात होती. परंतु आता संगणकीकरण करायचे होते. पुर्वीच्या पद्धतीचा आता नविन संगणकीय स्वरूपात विचार करावा लागणार होता. आपल्या वाचनालयात मराठी, इंग्रजी कथा-कादंबऱ्या, लहान मुलांची पुस्तके या व्यतिरिक्त महाविद्यालयाच्या वाणिज्य, कला व विज्ञान या शाखांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची पुस्तके सुद्धा होती. संगणकीकरणासाठी एक या संख्येने सुरूवात करून पुढे अनुक्रमे सर्व पुस्तकांना संख्येची ओळख देत जाण्याचा माझा विचार होता. परंतु माझा मित्र विनायक याने दूरोगामी विचार करून पुस्तकांना थोड्या वेगळ्या पद्धतीने अनुक्रमांक देण्यास मला सुचविले. मी एक, दोन, तीन अश्या अनुक्रमाने सुरुवात करणार होतो. परंतु त्याने इंग्रजी मुळाक्षरांनी सुरुवात करून मग पुढे अनुक्रमांक देण्याचे सुचविले. उदाहरणार्थ, मराठी पुस्तकांना M101 तर इंग्रजी पुस्तकांना E101 अश्या क्रमाने सुरुवात करायला सांगितले. मी तेव्हा एवढा दूरचा विचार केला नव्हता. M101 या क्रमांकावर वी.स. खांडेकर लिखित 'साखरपुडा' नावाचे पहिले पुस्तक आज सुद्धा पै फ्रेंड्स लायब्ररीत उपलब्ध आहे. २२ मे १९८६ रोजी जेव्हा वाचनालय चालू झाले तेव्हा पहिल्याच दिवशी पहिले नाव नोंदवलेल्या सभासद श्रीमती वृषाली वालावलकर यांचा पहिला क्रमांक संगणकीकरणात सुद्धा नोंदवला गेला. 


सर्व पुस्तकांची सन १९८६ पासून अनुक्रमे नोंद असलेली नोंदवही संजयने नियुक्त केलेल्या त्या मित्राच्या हाती मी सुपूर्द केली. त्या नोंदवहीत प्रत्येक पुस्तकाचा क्रमांक, नावं, लेखक, किंमत अशी संपुर्ण तपशीलवार माहिती नोंदवलेली होती. आज्ञावलीची मुलभूत संरचना तयार झाल्यावर त्यातील काही नावे व माहिती आज्ञावलीच्या संरचनेची तपासणी करण्यासाठी त्या मित्राने आमच्याकडून संगणकात भरवून घेतली. त्या मित्राने आज्ञावलीची तपासणी करून झाल्यावर आम्हाला जेव्हा आज्ञावली ओके झाल्याचा संदेश दिला तेव्हा आज्ञावलीचे मुलभूत, पायाभूत व महत्वाचे ३० टक्के काम पुर्ण झाले होते. नंतर पुढे आम्हाला ७०टक्के काम करायचे होते. आम्हाला पंधरा हजार पुस्तकांची माहिती संगणकामध्ये भरायची होती व त्यासाठी जवळ जवळ दोन-तीन महिने लागणार होते. परत ही माहिती संगणकाला पुरवित असताना दुसरीकडे नवीन पुस्तकांची भर सुद्धा पडणारच होती. माझी भाची मनिषा भट हिने पंधरा हजार पुस्तकांची सर्व माहिती संगणकात भरण्याचे महत्वाचे काम केले. तीच्या कामाला इतरांचा हातभार सुद्धा लागला होताच. मग ही सर्व विपुल माहिती एका फ्लॉपी डिस्कमध्ये साठवल्यावर संजयच्या मित्राने आपल्या वाचनालयाची आज्ञावली संगणकाच्या पडद्यावर सर्वसाधारणतः कशी दिसेल व कसे कार्य करेल याचे प्रात्यक्षिक दाखवले. आता ती आज्ञावली प्रत्यक्ष वापरण्यासाठी प्रशिक्षणाची व एका संगणकाची गरज होती. त्या काळातील दुरदर्शनच्या संचासारखा पसरट असलेला एक जूना मॉनिटर विकत घेतला. त्याच्या सोबत नवीन कुंजीपट (की-बोर्ड) आणि माउस सुद्धा विकत घेतला. आता फक्त सी.पी.यु. लागणार होते. काही दिवसांनी एका जूना सी.पी.यु. विकत घेतला. या सर्व उपकरणांचा मिळून एक संगणकसंच तयार झाला. संगणक संचाची ही सर्व उपकरणे ठेवण्यासाठी एक मेज (टेबल) लागणार होते. मॉनिटर काचेच्या आतमध्ये बंद राहील असे वरती काच असलेले एक वेगळेच मेज बनवून घेतले. वाचनालयातील या सर्व घडामोडी व बदल नियमितपणे येणारे सभासद पाहत होते. एकदा संगणकीकरण झाले की त्याचा उपयोग सर्व सभासदांना सुद्धा होणार होता.

आता त्या आज्ञावलीच्या मदतीने आम्हा सर्वांना संगणकात दैनंदिन कामकाज तसेच नविन पुस्तकांची माहिती भरायला येणे आवश्यक होते. त्यासाठी आम्हा सर्वांना तीचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. सर्व शिकून घ्यायला किमान दोन ते तीन दिवस लागणार होते. सुरुवातीला कुठले बटन दाबले की काय होते हे काहीच समजत नव्हते. वारंवार मॉनिटरकडे पहावे लागायचे. मी खरंतर संगणक वापरला होता. परंतु ही वाचनालयाची नवीन वेगळी आज्ञावली असल्याने समजायला व वापरायला थोडा वेळ लागणार होता. नवीन शिकायला मिळत असल्याने आम्ही सर्वजण उत्साहात होतो. चुकीची कळ (बटन) दाबल्याने काहीतरी उलट सुलट होईल याची थोडीशी भीती वाटत होती. तरी सुद्धा सर्वांमध्ये शिकण्याची जिद्द होती. संगणकावर आज्ञावली स्थापित (इन्स्टॉल) केल्यानंतर मी आणि अजय त्यामध्ये दहा-बारा दिवसांत तरबेज झालो. फक्त मामांना सर्व समजून घेण्यासाठी थोडे जास्त दिवस लागले.


आता सर्व पुस्तकांची व सभासदांची नावे संगणकात समाविष्ट झाली होती व माझ्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण सुद्धा मिळाले होते. परंतु मध्येच एक यक्षप्रश्न उभा राहीला. मासिकांची नोंद कशी करायची. साप्ताहिक सकाळ, लोकप्रभा, चित्रलेखा, इंडिया टुडे, विकली, आऊटलुक या सारखी काही मासिकं आठवड्याने येत होती तर काही पाक्षिकं व अनेक मासिकं ही महिन्यातून एकदाच येणार होती. परत अंकाचे नाव दरवेळी तेच रहाणार असले तरी संगणकात त्यांची संख्या ओळख मात्र निरनिराळी नोंदवली जाणार होती. उदाहरणार्थ इंडिया टुडे साप्ताहिकाच्या एक ते शंभर अनुक्रमांक दिलेल्या शंभर प्रती संगणकाने मॉनिटरवर दाखवल्या तरी त्यातील कोणत्या प्रती कोणत्या आठवड्यात व कोणत्या महिन्यात आल्या हे कसे समजणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावर आम्ही सर्वांनी खूप विचार केला. परंतु काही तोडगा निघाला नाही. अखेर माझ्या डोक्यात एक अभिनव कल्पना आली. मासिकांना MG101 पासून सुरुवात करून पुढे तो अनुक्रम चालू ठेवायचा. अनुक्रमांकाबरोबर मासिकाचे नावं, दिनांक आणि महिना याची सुद्धा नोंद करायची, जेणेकरून त्या अंकाच्या कितीही प्रत असल्या तरी त्याची तपशीलवार माहिती समजेल असा सोपा उपाय मी सुचविला. ही कल्पना सर्वांना आवडली. पुढे त्याच पद्धतीने मासिकांना अनुक्रमांक देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला संगणकात काही बनावट अनुक्रमांक व बनावट अंकांची नावे नोंदवून आम्ही संगणकीय प्रयोग करून पाहिले. आज्ञावली अचूक उत्तरे देत होती. अशाप्रकारे मासिकांसह संगणकाला माहिती देऊन संगणकीकरणाचे संपुर्ण काम जवळपास चार महिन्यांनी पुर्ण करता आले.


सभासदांची नावे संगणकात समाविष्ट असल्याने त्यांचा सभासद क्रमांक लक्षात ठेवण्याची आता गरज उरली नव्हती. केवळ पुस्तकाचा क्रमांक टाकला की ते पुस्तक कोणी नेलं? कधी नेलं? पुस्तकाचे नाव? वगैरे संपूर्ण माहिती संगणकाच्या पडद्यावर (स्क्रीनवर) दिसत होती. कोणत्या सभासदांची मासिक वर्गणी बाकी आहे-नाही हे सुद्धा सहज समोर दिसत होते. एखादं पुस्तक बाहेर वाचकांकडे गेलंय की वाचनालयातच उपलब्ध आहे हे सुद्धा कळणे सहज शक्य झाले होते. आता मेजवरील (टेबलावरील) सर्व फाईल्स काढून टाकल्या. फाईलींची जागा संगणकाने घेतली. अश्याप्रकारे सन २००४ च्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात "पै फ्रेंड्स लायब्ररी" हे मुंबईतील पहिले संगणकीय वाचनालय बनले....

4 comments:

  1. संगणकाचा वापर हे प्रगती दर्शवते,,चांगले नियोजन,,
    वाचनालयात पाहिले आहे बे काम,
    सुंदर

    ReplyDelete
  2. संगणकाचा वापर हे प्रगती दर्शवते,,चांगले नियोजन,,
    वाचनालयात पाहिले आहे बे काम,
    सुंदर

    ReplyDelete
  3. आधुनिकते कडे योग्य वाटचाल

    ReplyDelete