'Well begun is half done' म्हणजे चांगली सुरुवात होणे हे अर्धे काम झाल्यासारखेच आहे असं इंग्रजीत म्हणतात. शुभकार्याला उशीर कश्याला असं आपल्याकडे त्याच भावार्थाने म्हटले जाते. कार्यारंभ शुभमुहूर्तावर होत असेल तर मग अर्धेच कश्याला पुर्ण काम झाल्याची श्रद्धा मनात निर्माण होते व तसा अनुभव सुद्धा येतो. फ्रेंड्स लायब्ररीमध्ये दिवाळीच्या काही दिवस आधी फटाके वाजवून दिवाळी अंकांच्या वाटपाला सुरुवात करण्याची प्रथा होती. ही प्रथा सुरू होऊन दहा वर्ष लोटली होती. दरवर्षी ही प्रथा पाळली जात होती. सन २००२ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी अंकांचे वाटप करण्याचा माझा विचार होता. वाचनालयाचे नूतनीकरण केल्याने सभासद संख्या व दिवाळी अंकांची मागणी या दोन्हीमध्ये खूप वाढ झाली होती. काही वाचक फक्त दिवाळी अंक वाचण्यासाठी सभासद बनायचे. त्या काळी दिवाळी अंक वाचणारा खूप मोठा वाचकवर्ग होता. दिवाळी सण कधी येतो व दिवाळी अंक कधी हातात पडतो याची ही वाचक मंडळी उत्सुकतेने वाट पहात असायची. दिवाळी अंकांतील लेख, कथा, कविता यातून मिळणारा वाचनानंद लुटायला सदर वाचक आतुर झालेले असायचे. प्रत्येक वाचक त्याच्या आवडीनुसार दिवाळी अंकाची निवड करीत असे. वाचकांच्या सोयीसाठी आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात दिवाळी अंक मागवून घ्यायचो.
यंदा मात्र दिवाळी अंकाच्या वाटपाची सुरुवात काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचा माझा मानस होता. माझे सर्वात ज्येष्ठ बंधू श्री. श्रीधर अण्णा, ज्यांच्यामुळे आम्ही कुंदापुरहून डोंबिवलीत येऊन स्थायिक झालो, ते कधी कधी माझ्याबरोबर ठाण्याच्या कार्यालयात यायचे. त्यांना आम्ही गेले दहा वर्षं फटाके वाजवून दिवाळी अंकांच्या वाटपाला सुरुवात करतो हे माहीत होते. एकदा ते माझ्या ठाणे कार्यालयात आले असताना मी त्यांना विचारले की "दिवाळी अंकाच्या संदर्भात आपण नाविन्यपुर्ण असं वेगळे काही करू शकतो का?" त्यावर ते म्हणाले की, "सर्व सभासदांना वाटप करण्याएवढे दिवाळी अंक जमा झाले की आधी आपण शुभमुहूर्त काढू या. मग सर्व सभासदांना आमंत्रण देऊन त्यांच्या साक्षीने दिवाळी अंकांची जाहीरपणे सार्वजनिक पूजा करू या. पुजा आटोपल्यावर मग दिवाळी अंकांच्या वाटपाला सुरुवात करू या". श्री. श्रीधर अण्णांनी जे मला सुचवले त्याबाबत मी सुमन बरोबर बोललो. देवाची पूजा, मंदिरात जाणे वगैरे धार्मिक विधी हे सुमनचे आवडते प्रकार. विधीवत पुजा म्हटल्यावर तिने लगेच अण्णांच्या कल्पनेला पाठींबा दिला. घरून परवानगी मिळताच मी श्रीधर अण्णांना शुभमुहूर्तावर दिवाळी अंकांचे सार्वजनिक पूजन करण्यासाठी माझी तयारी असल्याचे कळविले.
सन १९९२ यावर्षी जेव्हा दिवाळी अंकांच्या वाटपाला सुरुवात केली होती तेव्हा मला दिवाळी अंकांची फारशी माहिती नव्हती. फक्त अंकांची नावं माहीत होती. कथा, लेख, विनोदी साहित्य यासाठी कोणती मासिकं प्रसिद्ध आहेत? स्त्रीविषयक, आहारविषयक कोणती मासिकं निघतात? लहान मुलांमध्ये कोणती मासिकं वाचली जातात? इत्यादी गोष्टींची संपूर्ण माहिती गेल्या दहा वर्षात मी मिळवली होती. कुठले दिवाळी अंक कधी प्रकाशित होतात? ते कुठे विकत मिळतात? त्यावर किती सवलत मिळते? याबाबत मी सविस्तर माहिती गोळा केली होती. गेल्या काही वर्षात माहेर, मेनका, आवाज, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, ग्रहांकीत, आवाज, किशोर यासारख्या दर्जेदार दिवाळी अंकांच्या वीस ते पन्नास प्रती मी मागवायचो. एवढ्या प्रती घेऊन सुद्धा त्या कमी पडत असत. त्या काळी दिवाळी अंक मिळू लागले की कथा कादंबऱ्या या पुस्तकांकडील ओघ आपोआप कमी होत असे. दिवाळी संपल्यावर सुद्धा महिनाभर सभासद मंडळी फक्त दिवाळी अंकांच्या वाचनालाच प्राधान्य देताना दिसायची. त्यामुळे दिवाळी अंकांच्या मला जास्त प्रती मागवायला लागत असत.
दसऱ्याच्या दिवशी सामनाचा दिवाळी अंक प्रकाशित होत असे. मग त्या दिवसापासून एकामागोमाग एक करत इतर दिवाळी अंक बाजारात येऊ लागत. वाचनालयाचे नियमित सभासद व फक्त दिवाळी अंकासाठी होणारे सभासद या सर्वांच्या संख्येची गोळाबेरीज करून यंदाच्या वर्षी अंदाजे किती दिवाळी अंक खरेदी करावे लागतील व प्रत्येकाच्या किती प्रती मागवाव्या लागतील याची आकडेवारी मी निश्चित केली. कमीत कमी एक हजार दिवाळी अंक मागवायला लागणार होते. जरी अंदाजे किंमत प्रत्येकी शंभर रुपये पकडली तरी एक लाख रुपये फक्त दिवाळी अंकांच्या खरेदीसाठी यंदा खर्च करावे लागणार होते. सर्व अंक रोख रक्कम देऊन खरेदी करावे लागणार होते. रुपये पन्नास हजार वर्गणीमधून जमा होऊ शकत होते. परंतु बाकीच्या पन्नास हजार रुपयांसाठी कर्ज घ्यावे लागणार होते. त्या पन्नास हजारांपैकी रूपये पंचवीस हजार कर्ज शिवप्रसाद इमारतीतील किराणा व्यापारी श्री. मनसुखलाल यांच्याकडून घेतले. उरलेले रूपये पंचवीस हजार टिळकनगर मधील श्री. गुंजीकर यांनी मला काही काळासाठी वापरायला दिले. आता मी हवे ते अंक हव्या त्या प्रमाणात मागवू शकत होतो.
दसर्यानंतर काही दिवसांनी अंक आणायला सुरुवात केली. साधारणतः किती दिवसात किती अंक उपलब्ध होतील याचा अंदाज घेतला व श्रीधर अण्णांना पुजेचा शुभमुहुर्त काढायला सांगितले. माझी कुंडली, रास, नक्षत्र वगैरे बघून त्यानुसार दिवाळीच्या आठ दिवस आगोदरचा म्हणजे रविवार दिनांक २७ ऑक्टोबरचा संध्याकाळी सात वाजताचा शुभमुहूर्त त्यांनी निश्चित केला. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सभासदांना आमंत्रण देण्यासाठी वाचनालयाच्या बाहेर शुभदिनांक आणि शुभमुहूर्ताच्या वेळेचा फलक लावण्यात आला. तसेच सर्व सभासदांना तोंडी आमंत्रण सुद्धा दिले गेले. प्रथमच दिवाळी अंकांची जाहीरपणे सार्वजनिक पूजा करीत असल्याने सर्वांना पूजेचा समारंभ कसा असेल याची कुतूहलवजा उत्सुकता होती. पूजा समारंभानंतर आपल्या हाती कुठला अंक पडेल याची सुद्धा वाचक मंडळींना प्रतिक्षा होती. माझ्यासाठी सुद्धा हा नवा उपक्रम व अनुभव होता.
आतापर्यंत हाती आलेल्या सर्व दिवाळी अंकांची नोंदवहीमध्ये (रजिस्टरमध्ये) नोंद केली होती. जवळपास दोनशे अंक जमा झाले होते. पूजेच्या आदल्या दिवशी मी, मामा, अजय व नियमित वाचनालयात येणारे माझे काही मित्र या सर्वांनी मिळून वाचनालयाची साफसफाई केली. तेव्हा इतर बरेच सभासद सुद्धा मदतीला आले होते. वाचनालयाच्या बाजूला पिठाची गिरणी असल्याने वाचनालयात पिठकणासह पुष्कळ धुळ जमा झाली होती. मला आठवतंय प्रथमच दिवाळी अंकांची पूजा करत असल्याने आलेल्या सर्व दिवाळी अंकांना अच्छादन (कव्हर) घालण्याचे काम आणि साफसफाईची कामं पूर्ण होईस्तोवर रात्रीचे बारा वाजून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी वाचनालय फुलांनी सजवण्यासाठी कल्याणला जाऊन झेंडूची फुले आणायची होती.
पूजेच्या दिवशी मी ठाण्याच्या कार्यालयातून सुट्टी घेतली होती. संपूर्ण दिवस मी वाचनालयासाठी राखून ठेवला होता. पहाटे लवकर उठून कल्याणला जाऊन दहा किलो झेंडूची फुले घेऊन आलो. त्यात पाच किलो पिवळ्या रंगांची आणि पाच किलो भगव्या रंगांची फुले होती. वाचनालयातील काही महिलांनी हार बनविण्याचे काम स्वीकारले. खरतर नेहमी दुपारी एक वाजता आम्ही वाचनालय बंद करायचो, परंतु त्यादिवशी संध्याकाळच्या पूजेच्या आधी वाचनालय फुलांनी सजवून सर्व कामे संपवायची होती म्हणून दिवसभर वाचनालय उघडे ठेवायचा निर्णय घेतला. मला संध्याकाळची काळजी वाटत होती. किती सभासद येतील? कुठल्या दिवाळी अंकांना जास्त मागणी असेल? सभासदांना पाहिजे ते दिवाळी अंक नाही मिळाले तर? वगैरे सकारात्मक नकारात्मक विचार मनात रूंजी घालत होते. माझ्या परीने मी यथाशक्ती सर्व प्रयत्न केले होते. पितृतुल्य श्री. श्रीधर अण्णांचे व ज्येष्ठांचे आशीर्वाद पाठीमागे होतेच. परिणामस्वरूप ईश्वर कोणते फळ पदरात टाकतो याच उत्सुकतेतून आता फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहात होतो.
संध्याकाळी मी आणि सुमन पूजेच्या तयारीनेच वाचनालयात आलो. झेंडूच्या फुलांच्या विविध हारतुर्यांनी वाचनालय सजले होते. सर्व दिवाळी मासिकं प्लास्टिकचे अच्छादन (कव्हर) घालून तयार ठेवली होती. काही वेळातच श्रीधर अण्णा तयार होऊन आले. सभासद सुद्धा हळूहळू जमायला लागले. मंत्रोपचारांच्या वेदनादात पूजेला सुरुवात झाली. माझे संपुर्ण लक्ष पूजेकडे होते. मी एकाग्रतेने देवाची प्रार्थना करत होतो. घंटानादासह देवाची व अंकांची श्रीधर अण्णांनी आरती केली. आरतीच्या वेळी वाचनालयाबाहेर पाच हजार फटाक्यांची माळ लावण्यात आली. फटाके वाजवायची जवाबदारी विनायक आणि नितीन यांच्याकडे सोपवली होती. दिवाळी अंकांच्या पहिल्याच सार्वजनिक पूजेला सभासदांनी उदंड प्रतिसाद दिला होता. वाचनालय तुडुंब भरले होते. वाचनालयात जागा शिल्लक न राहिल्याने काही सभासद बाहेर रस्त्यावर उभे राहून पुजेमध्ये सहभागी झाले होते. सर्वांना आरतीचे दर्शन देण्यात आले. मग प्रसाद वाटण्यात आला. ज्याची सभासद आतुरतेने वाट पाहत होते ती वेळ आली होती. आता सर्व सभासदांचे लक्ष फक्त दिवाळी अंकांच्या वाटपाकडे होते. दिवाळी अंकांची पूजा संपन्न झालेली असल्याने 'आता अंक घ्यायला सुरुवात करा' अशी मी सूचना करताच सर्वजण दिवाळी अंकांवर तुटून पडले. बघता बघता सर्व अंक संपत आले. आलेले सर्व सभासद समाधानी होते. अश्या पद्धतीने दिवाळी अंकांची पहिली सार्वजनिक पूजा जनता जनार्दनरूपी परमेश्वराच्या साक्षीने संपन्न झाली. आई-अण्णा-ज्येष्ठांचे आशीर्वाद, सभासदांच्या सदिच्छा व कर्मचारी-मित्रांचे सहकार्य यांच्यामुळे फ्रेंड्स लायब्ररीमध्ये सुरू झालेली दिवाळी अंकांच्या सार्वजनिक पूजेची ही प्रथा तेव्हापासून आजतागायत अखंडित चालूच राहिलेली आहे....
लायब्ररीतल्या ह्या दिवाळी अंकांच्या पूजेच्या दिवशी माहित झाल्यापासून मी नेहमीचहजर रहाते. अगदी वर्णन केल्यासारखीच ही पूजा मन प्रसन्न करते.
ReplyDeleteवा वा छान पद्धत आहे. 💐💐👍👍
ReplyDeleteछान लिहिलं आहे एकदम !!
ReplyDelete