Saturday, October 17, 2020

माझा कुटुंबासह नव्या वास्तूतील गृहप्रवेश...

'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' असं जे म्हटले जाते त्यामध्ये शहाणपण म्हणजे सुज्ञपणा, समंजसपणा, प्रामाणिकपणा असा सकारात्मक अर्थ अभिप्रेत असतो. चुक करणार्‍या प्रबळ सत्तेला बरोबर व चांगले काय ते सांगण्याचा प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचा त्या शहाणपण या शब्दात अंतर्भाव असतो. परंतु 'बळी तो कानपिळी' या तत्वानुसार शेवटी 'अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी' अशीच अवस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्‍या सुज्ञाची होत असते. मला सुद्धा 'जुलुमाचा राम राम' करायला लावणार्‍या अशाच एका तापदायक अनुभवातून जावे लागले. सन १९७७ यावर्षी कुंदापूरहून डोंबिवलीमध्ये स्थायिक झाल्यानंतर आतापर्यंत चार घरं बदलली होती. सुरुवातीला आम्ही सर्व भाऊ, बहीण व आई एकत्र टिळकनगर मधील शिवप्रसाद इमारतीतील एका खोलीत राहत होतो. ती इमारत म्हणजे पूर्वीची चाळ होती. त्या चाळीच्या घरातील वास्तव्यात केलेली मौजमजा व दंगामस्ती आजही स्मरणात आहे. सन १९८४ यावर्षी गोपाळनगर मधील न्यू-अश्विनी इमारतीमधील दोन खोल्यांच्या (सिंगल रूम किचन) वास्तूमध्ये रहायला गेलो. सन १९९२ यावर्षी माझं लग्न झाले. लग्नानंतर मी आणि सुमनने वडारवाडी येथील सुंदराबाई इमारतीमध्ये एका खोलीच्या (सिंगल रूम) घरात संसाराला सुरूवात केली. परंतु ते घर व परिसर बरोबर नव्हता. सन १९९४ यावर्षी गोपाळनगर, गल्ली क्रमांक एक, येथील नीलकंठ दीप इमारतीमध्ये स्वतःच्या मालकीची (ओनरशिप) दोन खोल्यांची (सिंगल रूम व किचन) सदनिका कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता विकत घेतली. आता हे घर सुद्धा विकायचे ठरवले होते. फक्त परिस्थिती व कारणं वेगळी होती.


या सर्व चारही घरांमध्ये आई माझ्यासोबत राहत होती. आई नेहमी म्हणायची 'जो पर्यंत त्या जागेचे ऋण आपल्यावर आहे तोपर्यंत आपण तिथे राहतो. त्या जागेचे ऋण फिटले की आपल्याला ती जागा सोडावीच लागते. अर्थात कारणं काहीही असो आपण जी मेहनत करतो ती अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी. या तीन गरजांची पुर्तता झाली की मग आपण बाकीच्या चैनी जीवनाकडे वळतो.' हे माझ्या आईचे म्हणणे मी कधीच विसरलो नव्हतो. माझ्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मी नीलकंठ दीप मधील रहाते घर विकायला तयार झालो होतो. घर विकायची कल्पना सुमनने प्रथम मांडली असली तरी आमचे दोघांचे त्याबाबतीत एकमत होते. परिणामतः घर विकण्याचा विचार निश्चित केला आणि काही दिवसांतच ते विकत घेण्यासाठी गिर्‍हाईक सुद्धा चालून आले.


सन १९९४ ते २००४ अशी दहा वर्षे गोपाळनगर मधील नीलकंठ दीप इमारतीमध्ये रहीवास होता. हे घर जेव्हा मी विकत घेतले होते तेव्हा आधीच्या मालकांनी जी कागदपत्रे (पेपर्स) मला दिली होती ती सर्व मी जपून ठेवली होती. त्यावेळी रोखीने व्यवहार झाला असल्याने ती सर्व कागदपत्रे मी बारकाईने तपासून घेतली नव्हती. आता तीच सर्व कागदपत्रे तेच घर माझ्याकडून विकत घेणाऱ्याला मी जेव्हा दाखवली तेव्हा त्यामध्ये एक विशिष्ट व महत्त्वाचे कागदपत्रं कमी असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यासाठी मी जुन्या मालकाकडे गेलो. मुळ मालकाने त्यांच्याकडे तसं पत्र नसल्याचे सांगून त्यांच्याकडे होते तेवढे सर्व दस्तऐवज त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केले असल्याचे सांगितले. त्या एका पत्रामुळे माझा घर विकण्याचा व्यवहार पुढे सरकत नव्हता. पुढे काय करायचे समजत नव्हते. मी काही ओळखीच्या लोकांकडे या संदर्भात थोडी चौकशी केली. परंतु ते एक विशिष्ट व महत्त्वाचे पत्र असल्याशिवाय पुढचा व्यवहार करता येणार नाही असे मला सर्वांनी सांगितले. मग मानपाडा मार्गावरील कस्तुरी प्लाझा येथे कार्यालय असलेल्या एका ओळखीच्या वकिलांकडे गेलो. त्यांनी माझ्या घराचे दस्तऐवज बारकाईने तपासले व मला रीतसर कायदेशीर मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबई शहरातील एक पत्ता दिला आणि माझ्याकडे असलेली सर्व कागदपत्रे तिकडे दाखवून कमी असलेलं पत्र बनवून घेण्यास सांगितले.


वकिलांनी मुंबईतील बॅलॉर्ड इस्टेट येथील एका सरकारी कार्यालयाचा पत्ता दिला होता. एके सोमवारी माझ्याकडची सर्व कागदपत्रं घेऊन पत्ता शोधत शोधत दुपारी एकच्या दरम्यान मी त्या कार्यालयात पोहचलो. त्या सरकारी कार्यालयातील दृश्य शिसारी आणणारे होते. एक तर ते कार्यालय खूप छोटे व कोंदट होते परत तिथे स्वच्छता नावाची चीज नव्हती. सर्व फाईली धूळखात पडल्या होत्या. दोन चार कर्मचारी काम करत होते. चौकशी केली असता कळले की त्यांचे साहेब त्या दिवशी सुट्टीवर होते त्यामुळे मला रिकाम्या हाताने परतावं लागले. परत दोन दिवसांनी तिथे गेलो, तेव्हा सुदैवाने ते साहेब जागेवर होते. त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनी माझी सर्व कागदपत्रे तपासली व मूळ मालकांकडून एक अर्ज लिहून आणायला सांगितला. आपले काम होणार या विचाराने मनाला थोडं समाधान वाटले. मूळ मालकांकडून अर्ज लिहून घेतला व तीन दिवसांनी परत त्या कार्यालयात जाऊन त्याच साहेबांकडे अर्ज सोपवला. त्यांनी तीन चार दिवसांनी यायला सांगितले. आपले काम होत आहे या कल्पनेने मी तेव्हा खुश झालो होतो. ते पत्र मिळाले की माझा घराचा व्यवहार पुढे सरकणार होता.


पुढे मी त्या कार्यालयात कमीत कमी चार-पाच चकरा मारल्या असतील परंतु ते पत्र काही केल्या माझ्या हाती पडेना. आज 'हे नाही' तर कधी 'ते नाही' असं सांगून नुसते हेलपाटे घालायला लावत होते. काही झाले तरी शेवटी ती सरकारी यंत्रणाच. सर्व काही मुजोर व प्रबळ नोकरशाहीच्या हातात होते. एक दिवशी मी कंटाळून थेट त्या साहेबांकडे गेलो व रोखठोक प्रश्न विचारला, "तुम्ही कधीपर्यंत माझे ते पत्र देताय?" त्यांनी बरीच अडवणूक करणारी कारणं सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. वादाला सुरुवात होऊन शेवटी त्याचे पर्यावसान जोरदार भांडणात झाले. ज्यावेळी भांडण विकोपाला पोहचले त्यावेळी माझा संयम सुटला. माझा फ्युज उडाला व रागाच्या भरात मी त्यांना मारायला हात उचलला. पण तेवढ्यात तेथील काही कर्मचाऱ्यांनी मला सावरले अन्यथा मी त्यांना मारले असते आणि मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता. परंतु ईश्वर कृपा, आई-आण्णांचा आशीर्वाद व सुमनची पुण्याई बरोबर असल्याने थोडक्यात वाचलो. तिकडच्या एका कर्मचाऱ्याने मला बाजूला नेऊन पाणी पाजले. "साहेब, इकडे सर्व कामं अशीच होतात. तुम्ही दोनशे रुपये द्या आणि उद्या येऊन तुमची कागदपत्रे घेऊन जा," असे तो कर्मचारी म्हणाला. माझ्या मनाला हा मार्ग पटत नव्हता तरी सुद्धा 'अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी' करत नाईलाजाने त्याच्या हातात दोनशे रुपये टेकवले आणि 'जुलमाचा राम राम' करत पराभूत मनःस्थितीत तिथून बाहेर पडलो. दुसऱ्याच दिवशी कागदपत्रे माझ्या हातात होती. तेव्हा कन्नड मधील एक म्हण आठवली 'दुड्डे दोडप्पा' म्हणजे 'पैसाच सर्व काही आहे'. वास्तविक पाहता 'पैसा खूप काही आहे परंतु सर्व काही नाही' हे मला मान्य असून सुद्धा सुज्ञपणा, समंजसपणा व प्रामाणिकपणाचा पराभव झाल्याने विमनस्क मनःस्थितीत उपरोक्त नकारात्मक म्हण माझ्या सारासार विवेकबुद्धीवर डंख मारत होती. जुलुमाने व वाममार्गाने कमावलेला पैसा 'दुड्डे दोडप्पा' असूच शकत नाही. 


सर्व कागद पत्रे हातात आल्यावर मध्येच खंडित झालेली घर विकण्याची प्रक्रिया आता परत सुरू झाली. ज्यांना माझे घर विकत घ्यायचे होते त्यांना कर्ज घेण्याची गरज नव्हती. त्यांच्याकडे सर्व रक्कम तयार होती. त्यातील थोडी रोख रक्कम मला आगाऊ देऊन त्यांनी घर नोंदणीच्या (रजिस्ट्रेशनच्या) प्रक्रियेला सुरुवात केली. त्यांच्या नावाने घर नोंदणी (रजिस्टर) होताच उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे (चेकद्वारे) मला देण्यात आली. अवघ्या दहा दिवसाच्या आत सर्व कामे पूर्ण झाली. आलेली रक्कम कुठेही खर्च न करता सर्वात आधी ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते त्यांचे कर्ज फेडून टाकले. उधारपत्रे (क्रेडिट कार्ड) व इतर सर्व छोटीमोठी थकीत देणी सुद्धा चुकती केली. सुमनने सांगितल्यानुसार घर विकून मी आता पुर्णपणे कर्जातून मुक्त झालो होतो. नवीन घरासाठी हातात काही रक्कम शिल्लक राहिली होती. 


एकीकडे घर विकण्याच्या हालचाली सुरू असताना नवीन घराचा शोध सुद्धा चालूच होता. परंतु या वेळेला घर शोधण्याची पूर्ण जवाबदारी सुमनने घेतली होती. या दरम्यान दोन चार घर पहिली होती परंतु त्यातील कुठलीच जागा पसंत पडली नव्हती. दिवसभर पाणी, स्वच्छ परिसर, भरपूर उजेड असलेल्या स्वस्त व मोठ्या जागेच्या शोधात आम्ही होतो. हातात थोडे फार पैसे शिल्लक राहिले होते. तसेच कॉर्पोरेशन बँकेकडून कर्ज मिळणार होते. संत नामदेव पथ येथे काही नवीन इमारतींची कामे सुरू होती. त्यातील दोन इमारतीतील सदनिका (ब्लॉक) विकण्यास तयार होत्या. एकनाथ म्हात्रे नगर असे त्या परिसराचे नाव होते. आम्हाला पाहिजे त्या सोयी सुविधा तिथे उपलब्ध होत्या. आम्हा दोघांना जागा पसंत पडली. लगेच रूपये १००००/- आगाऊ देऊन एकनाथ कृपा या इमारतीतल्या दुसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांची (सिंगल रूम किचनची) जागा आरक्षित (बुक) केली. काही दिवसांत कॉर्पोरेशन बँकेकडून कर्ज उपलब्ध झाले. घराची किल्ली हातात येताच गरजेची व आवश्यक असलेली सर्व कामे उरकून घेतली. दिनांक १२ एप्रिल २००४ रोजी विधीवत पूजा अर्चना करून मी, आई, सुमन व संतोष नवीन घरात रहायला आलो. अखेर घरं झाले व मनाची घरघर थांबली....



4 comments: