"किनारों से टकराते है उसे तुफान कहते है और तुफानों से टकराते है उसे नौजवान कहते है।" असं जरी असले तरी प्रतिकूल परिस्थितीच्या वादळवार्याशी संघर्ष करायला सामर्थ्यवान तरूण खर्या अर्थाने तेव्हाच सक्षम होतो जेव्हा त्याचे शिक्षण वीनासंघर्ष व वीनाअडथळा व्यवस्थित पुर्ण होत असते. घराच्या आत दिवा लावला तर फक्त घरातच त्याचा प्रकाश पसरतो. घराबाहेर दिवा लावला तर फक्त घराबाहेर प्रकाश पडतो. परंतु सुवर्णमध्य असलेल्या उंबरठ्यावर नंदादिप दिवा लावला तर त्याचा प्रकाश घराच्या आत व बाहेर दोन्हीकडे पसरतो. त्याचप्रमाणे घरातील कुलदिपकाचे शिक्षण जेव्हा विना अडथळा पार पडते तेव्हा त्याच्या शैक्षणिक ज्ञानाच्या नंदादीपाचा प्रकाश हा घरातील ज्येष्ठ पिढीला व पुढे घराबाहेर पडणार्या भावी पिढीला दोघांनाही लाभदायक होत असतो. इतर कोणत्याही आर्थिक गुंतवणूकीपेक्षा तरूणांना मिळणारे शिक्षण ही सर्वार्थाने समाजासाठी व राष्ट्रासाठी सर्वोत्तम गुंतवणुक बनत असते. या शिक्षणासाठी ज्या काही अडचणी येतात त्यातील काही अडचणींचा सामना मी सुद्धा केला होता. पुन्हा त्याच अडचणींचा सामना करण्यामध्ये इतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अमुल्य वेळ, श्रम व पैसा वाया जाऊ नये म्हणून उंबरठ्यावरील नंदादिपाप्रमाणे सुवर्णमध्य बनून अखंडपणे ज्ञानाचा प्रकाश देणारा वाचनालयाचा शैक्षणिक विभाग चालू करण्याचा दुरोगामी विचार मी करत होतो.
शैक्षणिक पुस्तकांची वाचनालये तशी मोजकीच होती. कारण शैक्षणिक पुस्तकांचे वाचनालय चालविणे खूप खर्चिक व कठीण होते. अभ्यासक्रमात बदल झाला की पुस्तकांच्या नवीन किंवा सुधारित आवृत्त्या निघायच्या व वाचनालयातील उपलब्ध शैक्षणिक पुस्तके आपोआपच कालबाह्य व निरूपयोगी होऊन जायची. महाविद्यालयीन विद्यार्थी पुस्तकांच्या नवीन आवृत्यांची मागणी करीत असत. तसेच एकाच पुस्तकाच्या अनेक प्रति ठेवणे आवश्यक असे. विद्यार्थी पुस्तकं वेळेवर आणून देत नसत. काही मुलं पुस्तके हरवून ठेवत असत. पुस्तक फाडून ठेवणे किंवा त्यातील पाने फाडणे, पुस्तकांच्या भरमसाठ किंमती वगैरे अनेक कारणांमुळे शैक्षणिक पुस्तकांचे वाचनालय चालविणे खचितच सोपं नव्हते. याव्यतिरिक्त इतर अनेक कारणे होती ज्यामुळे शैक्षणिक पुस्तकांची खाजगी वाचनालये खूपच कमी होती. आपल्या फ्रेंड्स लायब्ररीमध्ये काही प्रमाणात शैक्षणिक पुस्तके सुरूवातीपासूनच उपलब्ध होती. काही विद्यार्थी तर केवळ शैक्षणिक पुस्तकांसाठीच सभासद झाले होते. शैक्षणिक पुस्तकांचे स्वतंत्र दालन असावे जेणेकरून शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तम सेवा-सुविधा देऊ शकू असा विचार माझ्या मनात तेव्हापासूनच येत होता. वास्तविक पाहता प्रत्येक विद्यालयामध्ये मोठे वाचनालय असायचे. तिथे विद्यार्थ्यांना हवी ती शैक्षणिक पुस्तके उपलब्ध असायची. परंतु त्या वाचनालयांमध्ये पुस्तकांच्या प्रति कमी असल्याने विद्यार्थ्यांना हवी ती पुस्तके वेळेवर मिळत नसत. काही विद्यार्थी विद्यालयातील वाचनालयाचा उपयोग करून घेत नसत. विद्यालयातील वाचनालयाचे कायदे कानून कडक असल्याने हे विद्यार्थी तिथे जायला टाळंटाळ करीत असत. सदर विद्यार्थी एक तर पुस्तके विकत घेत असत किंवा मित्र मैत्रिणींकडून ती पुस्तके घेत असत. परीक्षा जवळ आली की विद्यार्थी पुस्तकांच्या शोधात बाहेर पडायचे आणि नेमका त्याचवेळी बाजारात पुस्तकांचा तुटवडा सुरू व्हायचा. मी स्वतः या समस्येचा सामना केला होता. मी पुस्तकांच्या दुकानात अनेक वर्षे काम केले होते त्यामुळे शैक्षणिक पुस्तकांबाबत माझ्याजवळ भरपूर अनुभवांचे बोल व बोलके अनुभव होते.
फ्रेंड्स लायब्ररीत शैक्षणिक व शाळा-महाविद्यालयांशी संबंधित जी काही थोड्या फार प्रमाणात पुस्तके उपलब्ध होती त्यामध्ये प्रामुख्याने दहावीच्या पुस्तकांबरोबरच महाविद्यालयांच्या कला, वाणिज्य व विज्ञान (कॉमर्स, आर्टस्, सायन्स) अश्या तीनही शाखांची पुस्तके होती. केवळ या शैक्षणिक पुस्तकांकरिता जी काही शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मंडळी आपल्या वाचनालयाची सभासद झाली होती त्यांच्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक विभाग चालू करण्यास कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात यावर मी विचार करू लागलो. अर्थात स्वतंत्र दालन म्हटले की जागा तर लागणारच होती. फ्रेंड्स लायब्ररीची विद्यमान जागा खूपच छोटी होती. पंधरा हजारपेक्षा अधिक पुस्तकांनी वाचनालय खचाखच भरून गेले होते. आपल्या वाचनालयाच्या जवळपास जागा मिळाली तर तिथे स्वतंत्र शैक्षणिक विभाग सुरू करून मी त्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकणार होतो. तसेच विविध विषयांवरील शैक्षणिक पुस्तकांची संख्या वाढवावी लागणार होती. माझ्याकडे तब्बल अठरा वर्षाचा वाचनालयाच्या व्यवसायाचा अनुभव होता तरी सुद्धा स्वतंत्र शैक्षणिक वाचनालय सुरू करणे कठीण काम आहे हे मला जाणवत होते. सभासद मिळतील की नाही? कोणत्या विषयावर जास्त पुस्तके लागतील? त्यासाठी वर्गणी किती आकारायची? जागा कुठे शोधायची? सर्वात महत्वाचे म्हणजे भांडवल कसे उभे करायचे? असे अनेक यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले होते. परंतु 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' या उक्तीनुसार सुरुवात केल्याशिवाय त्यात येणाऱ्या समस्या समजणार नाहीत हे मी जाणुन होतो.
शिवप्रसाद इमारतीतील फ्रेंड्स स्टोअर्सच्या बाजूला जे किराणामालाचे दुकान आहे त्याचे मालक श्री. मनसुखलाल हिरजी यांनी नुकतेच टिळकनगर शाळेच्या बाजूला लक्ष्मीप्रल्हाद इमारतीमध्ये एक दुकान घेऊन ठेवले होते. ते दुकान त्यांना भाडेतत्त्वावर द्यायचे होते. मी त्यांच्याशी संपर्क साधला. अनेक वर्ष आम्ही शेजारी असल्याने अनामत रक्कम (डिपॉझीट) न घेता फक्त भाडे दर महिन्याला द्यावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. माझ्या डोक्यावरील एक मोठ्ठ ओझं कमी झाले. तसेच त्या जागेमध्ये आधीच बनविलेले फर्निचर होते तो माझ्यासाठी बोनसच होता. मला सर्व आयते तयार मिळत होते. अनामत रक्कम व फर्निचर हा सर्व महत्त्वाचा खर्च वाचत असल्याने मी ताबडतोब सर्व व्यवहार पुर्ण करून आधी जागा ताब्यात घेतली.
फ्रेंड्स लायब्ररीचे संगणकीकरण झालेले असल्याने उपलब्ध सर्व शैक्षणिक पुस्तकांना वेगवेगळे क्रमांक दिले गेले होते. परिणामतः आम्ही एकाच दिवसांत सर्व शैक्षणिक पुस्तके इतर पुस्तकांपासून वेगळी करून सहजपणे नवीन जागेवर हलवू शकलो. नवीन जागा अगदी जवळ असल्याने त्याचा सुद्धा खूप फायदा झाला. मी वाचनालयाचा कोणताही अभ्यासक्रम (कोर्स) केलेला नव्हता. परंतु तरी सुद्धा पुस्तकांची कश्या पद्धतीने मांडणी करायची? त्यांना कश्या प्रकारे क्रमांक द्यायचे? याची मला पूर्ण कल्पना होती. फक्त तीच गोष्ट दुसऱ्या कोणाला शिकवणे हा प्रकार थोडासा कठीण वाटत असे. अजय माझ्याबरोबर गेले अकरा वर्षे वाचनालयात काम करत असल्याने त्याला शैक्षणिक पुस्तकांची थोडीफार कल्पना होती. मी व अजय दोघांनी मिळून सर्व शैक्षणिक पुस्तकांची नवीन जागेमध्ये पद्धतशीरपणे मांडणी करायला सुरुवात केली. जेव्हा सर्व पुस्तके नीट लावून झाली तेव्हा दोन हजारपेक्षा अधिक शैक्षणिक पुस्तके आपल्या वाचनालयात आतापर्यंत जमा झाली असल्याचे लक्षात आले. एवढी शैक्षणिक पुस्तके आपल्याकडे आहेत याचे मलाच आश्चर्य वाटत होते.
जेव्हा शैक्षणिक पुस्तकांचे वाचनालय सुरू करण्याचा विचार केला होता तेव्हा सी.ई.टी.च्या पुस्तकांना पुष्कळ मागणी होती. त्याकाळी सी.ई.टी.च्या एक एक पुस्तकांची किंमत पाचशे ते आठशे रुपये इतकी असे. केवळ दोन महिन्यांसाठी एवढी महागडी पुस्तकं विकत घ्यायची व नंतर त्या पुस्तकांचा तसा काहीच उपयोग नाही त्यामुळे विद्यार्थी जुन्या पुस्तकांसाठी विविध पुस्तकांची दुकाने शोधत फिरत असत. या समस्येवर उत्तर म्हणून आपल्या शैक्षणिक वाचनालयात मोठ्या संख्येने सी.ई.टी.ची पुस्तके ठेवण्याचे मी तेव्हा निश्चित केले. त्याच बरोबर मुलांना विकत घेणे परवडणार नाही अश्या मायक्रो-बायोलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी, सायकॉलॉजी या विषयावरील उपयुक्त पुस्तके ठेवायचा विचार सुद्धा पक्का केला. मग मुंबईतील एका ओळखीच्या घाऊक विक्रेत्याकडून सर्व पुस्तके दोन महिने उधारीतत्वावर विकत घेतली. त्या सर्व पुस्तकांना संगणकीय पद्धतीने क्रमांक दिले. सर्व पुस्तकांना शिवून त्यावर प्लास्टिकचे आच्छादन (कव्हर) घातले. सर्व पुस्तके विषयानुसार निरनिराळ्या कप्यात लावण्यात आल्यानंतर काही दिवसातच नवीन जागा संपुर्णपणे शैक्षणिक पुस्तकांनी भरून गेली.
आपण सुरू करत असलेल्या शैक्षणिक वाचनालयाची विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी थोडीफार जाहिरात करणे सुद्धा गरज होते. त्या जाहिरातीचाच एक भाग म्हणून शैक्षणिक वाचनालयाचे उद्-घाटन कोणाकडून करून घ्यावे असा मला प्रश्न पडला होता. डोंबिवलीमधील शैक्षणिक क्षेत्रातील एखाद्या सुपरिचित व सुप्रतिष्ठीत व्यक्तीकडून उद्-घाटन करायचे हे मग निश्चित केले. श्री. उमेश पै म्हणजेच पै सर हे नाव वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वतोमुखी होते. मी पदवीच्या शेवटच्या वर्षी म्हणजे टी.वाय.बी.कॉमला असताना त्यांची शिकवणी (क्लास) लावली होती. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच मी पदवीधर झालो होतो त्यामुळे त्यांच्याच हस्ते उदघाटन करायचे ठरवले. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भेटलो. त्यांना शैक्षणिक वाचनालय सुरू करत असल्याचे सांगितले. त्यांना ती कल्पना आवडली व त्यांनी माझे अभिनंदन केले. परंतु जेव्हा त्यांच्या हस्ते उद्-घाटन करण्याचे मी त्यांना सांगितले तेव्हा "मी कशाला? दुसरं कोणी नाही का?" असे प्रश्न विचारून ते सविनयपणे व विनम्र भावनेने विषय टाळू लागले. मी मात्र 'तुम्हीच पाहिजे' असा आग्रह धरला व शेवटी त्यांच्याकडून होकार मिळवला.
पै यांची फ्रेंड्स लायब्ररी - शैक्षणिक विभाग |
उद्-घाटक म्हणून पै सरांचे नांव असलेली काही पत्रकं छापली. डोंबिवलीमधील काही नावाजलेल्या महाविद्यालयात व क्लासेस् मध्ये ती पत्रकं वाटण्यात आली. शैक्षणिक पुस्तकांनी भरलेली नवीन जागा स्वच्छ व नीटनेटकी करून ठेवली. अश्याप्रकारे सन २००४ यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सायंकाळी ठीक सहा वाजता पै फ्रेंड्स लायब्ररीच्या शैक्षणिक विभागाची श्री. उमेश पै यांच्या हस्ते मुहुर्तमेढ लावली गेली. एक व्यवसायिक म्हणून मी माझ्या संपुर्ण आयुष्यात बर्यापैकी पैसा कमावला. अधिक लाभदायक परताव्यासाठी अनेक ठिकाणी आर्थिक गुंतवणूक सुद्धा केल्या. परंतु पुढल्या अनेक पिढ्यांना लाभाचा परतावा देणारी, ज्ञानाचा प्रकाश देणारी शैक्षणिक लायब्ररीची गुंतवणूक हीच माझ्या आयुष्यातील आजपर्यंत केलेली सर्वोत्तम गुंतवणूक ठरली....
लायब्ररीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात पण काम करणाऱ्या आपल्याला मनापासून शुभेच्छा!!
ReplyDelete