''घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा'' असं एक सुंदर गीत वरदक्षिणा या मराठी चित्रपटात लहानपणी पाहीले-ऐकले होते. संगीताच्या सुंदर चालीवर घनघोर पावसाची कल्पना करणे व प्रत्यक्षात पावसाचा रूद्रावतार अनुभवणे यातील फरक त्यावेळी लक्षात आला नव्हता. पावसावरती आजपर्यंत असंख्य कवींनी वेगवेगळ्या सुंदर कविता केल्या आहेत. त्या वाचताना अनेकजण त्यातील शब्दतुषारांच्या आनंदात भिजून चिंब सुद्धा झाले असतील. परंतु प्रत्यक्षात भयचकीत करणार्या पावसाच्या तांडव नृत्याचा अनुभव माझ्यासह आपण सर्वांनी केव्हा घेतला होता ते आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना आजही नक्कीच आठवत असेलच. माणसातील माणूसपण जागे करणारा तो दिवस होता.
दिनांक २६ जुलै २००५ हा दिवस कोणताही मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही. आजही कधी कधी पावसाचा जोर वाढताना दिसला की गतकालीन तो २६ जुलैचा दिवस माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. वाचनालयाच्या व्यवसायाचा एक अपरिहार्य भाग म्हणून रोजच्या रोज मासिकं आणायला मुंबईला जावे लागत असे. रविवारी मुंबईतील मासिकांचा बाजार बंद असायचा तर सोमवारी आपले वाचनालय बंद असायचे. आपले कर्मचारी श्री. सुनील वडके उर्फ मामा यांची सोमवारी एक दिवसाची साप्ताहिक सुट्टी असायची. तेव्हा रविवार व सोमवार वगळता बाकीच्या सर्व दिवशी मामा मुंबईला मासिकं आणायला नियमितपणे जात असत. पावसामुळे रेल्वेगाड्या बंद असतील तरी सुद्धा काहीही करून मासिक आणण्यासाठी मुंबईला जावंच लागे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या बाहेर कॅपिटल सिनेमागृहाच्या शेजारीच मासिकांचा बाजार होता. रोजच्या रोज बाजारात विविध नवीन अंक यायचे. यातील काही अंक सकाळी बाजारात येत असत व दुपारपर्यंत संपून जात असत. त्यामुळे रोज मुंबईतील बाजारात जाऊन मासिकं घेऊन येणे अपरिहार्य होते. ती जवाबदारी पूर्णपणे श्री. सुनील वडके (मामा) यांच्याकडे होती.
आपले वाचनालय रोज सकाळी साडेसात वाजता उघडले जायचे. सकाळपासून सभासद मासिकं, पुस्तकं बदलायला यायचे. सकाळी कामावर जायला निघालेले काही सभासद तर चक्क रिक्षा थांबवून मासिक बदलायचे कारण त्यांना गाडीमध्ये (ट्रेनमध्ये) मासिक वाचायला हवे असायचे. सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत मामा आणि गोडबोले वाचनालय सांभाळायचे. नऊ वाजता अजय यायचा. अजय आला की मामा घरी जाऊन नाष्टा करून परत वाचनालयात यायचे. मग माझ्याकडून मासिकांसाठी रोख रक्कम घेऊन सुमारे अकरा वाजता मुंबईला जायला निघायचे. मंगळवार ते शनिवार मामांचा हाच दिनक्रम असायचा. ते कधीच सुट्टी घेत नसत. एखाद्या अपवादात्मक वेळी मी स्वतः मुंबईला जाऊन मासिकं आणायचो.
सोमवार, दिनांक २५ जुलै २००५ला रात्रीपासून पाऊस रिमझीम स्वरूपात पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक २६ जुलै रोजी लोकं नेहमीप्रमाणे कामावर जायला बाहेर पडले. पाऊस सुरूच होता. त्या दिवशी दहाच्या आसपास पावसाचा जोर वाढला. मामांना पाठवायचे की नाही अशी माझी द्विधा मनस्थिती झाली होती. त्या दिवशी का ते माहीत नाही परंतु पावसाचा जोर पाहील्याने मनात थोडी धाकधूक निर्माण झाली होती. प्रश्न माझा एकट्याचा असता तर काळजी वाटली नसती. मी स्वतः कुठल्याही परिस्थितीचा सामना करायला कधीही तयार असायचो. परंतु आज मामांना मुंबईला पाठवायचे होते. थोड्यावेळाने कदाचित पावसाचा जोर ओसरेल या आशेवर मी मामांना मुंबईला जाऊ दिले. मामा मुंबईला जायला निघाले. मामा गेल्यानंतर सकाळी अकरापासून पावसाचा जोर आणखीनच वाढू लागला. सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. जणू काय आकाश कोसळतय असं वाटावे इतक्या जोरात पाऊस पडू लागला.
टिळकनगरच्या ज्या भागात आपले वाचनालय होते त्या भागात आजपर्यंत कधी पाणी तुंबलेलं मी बघितले नव्हते आणि ऐकले सुद्धा नव्हते. त्यादिवशी मात्र सर्व गटारे दुथडी भरून वाहत होती. आपले वाचनालय तसं बर्यापैकी उंचावर होते. वाचनालयाच्या समोरील नाला भरून वाहत होता. नंतर पावसाचा जोर एवढा वाढला की हळू हळू त्या गटारातील पाणी बाहेर येऊन वाचनालयामध्ये शिरायला लागले. जमिनीलगत खालच्या भागात ठेवलेली सर्व पुस्तके मी आणि अजयने भराभरा उचलून वरच्या भागात ठेवली. इन्व्हर्टरची बॅटरी सुद्धा खाली ठेवली होती परंतु ती मात्र उचलता आली नाही. रस्त्यावरून रिक्षा किंवा एखादे वाहन गेले की पाण्यामध्ये लाटासदृश तरंग निर्माण होऊन सर्व पाणी वाचनालयात शिरायला सुरुवात झाली. यावर उपाय म्हणून मी आणि अजयने समोर रस्त्यावर असलेल्या गतीरोधकाचा (स्पीड ब्रेकरचा) काही भाग फोडून तुंबलेले पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार केला. हे खोदकाम करताना आम्ही दोघेही ओलेचिंब झालो होतो. अजून सुद्धा पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता.
रस्त्यावर शुकशुकाट होता. बोटावर मोजण्याइतकी लोकं घराबाहेर पडत होती. पावसामुळे सर्व शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. डोंबिवलीतील विविध विभागांच्या बातम्या कानावर पडू लागल्या. औद्योगिक निवासी विभाग, गांधीनगर परिसर सर्व जलमय झाल्याचे समजले. माझ्यातील माणुस अस्वस्थ झाला. माझी खूप इच्छा होती त्या जलग्रस्त भागात जाऊन लोकांना मदत करायची. परंतु वाचनालय सोडून अन्यत्र जाता येत नव्हते. त्यानंतरच्या काही बातम्या ऐकल्यावर तर मी थक्कच झालो. डोंबिवलीत बऱ्याच ठिकाणी मोठमोठे नाले दुथडी भरून वाहत असल्याने काही भागातील इमारतींच्या थेट पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले अशी बातमी ऐकली. मी विचारात पडलो असं कसे शक्य आहे? नंतर समजले की जोरदार पावसामुळे बदलापुरचे बारवी धरण पुर्ण भरले होते व खबरदारीची उपाय योजना म्हणून बारावी धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. धरणातील ते अतिरिक्त पाणी डोंबिवलीतील सखल भागात शिरले होते. मला त्या सखल विभागातील लोकांची काळजी वाटायला लागली. तेथील काही मित्रांना व नातेवाईकांना दूरध्वनी करून त्यांची विचारपूस केली. दुपारी दिडच्या आसपास वाचनालय बंद करून घरी जायला निघालो. पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. घराजवळ आलो तर आमच्या इमारतीच्या मागील भागात पाणी भरले असल्याचे समजले. आमच्या इमारतीच्या मागेच माझ्या जिजाजींची बहीण राहायची. त्यांच्या घरात चार फुटापर्यंत पाणी शिरले होते. त्यांच्या घराची अवस्था खूप वाईट झाली होती. कपाट, फ्रीज, पलंग या सर्व वस्तुंमध्ये पाणी शिरले होते. कपडे व इतर सर्व सामान पाण्याखाली गेले होते. ते दृश्य वेदनादायी होते. ते पाणी घराबाहेर कसे काढायचे? कुठून सुरुवात करायची? असे प्रश्न मला पडू लागले. रस्त्यावरील पाणी ओसरल्याशिवाय घरात शिरलेले पाणी बाहेर जाऊच शकत नव्हते. त्यात बाथरूमच्या पाण्यामुळे घरात कुबट वास येत होता. वीज नसल्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता. एकंदरीत परिस्थिती भयानक होती. पाणी ओसरायला रात्रीचे आठ वाजले असतील. मग रात्री आम्ही काहीजणांनी मिळून घरात शिरलेले पाणी बाहेर काढले.
दिनांक २६ जुलै २००५ ला पडलेला पाऊस एवढा धुमाकूळ घालेल याची कोणी कधी कल्पना सुद्धा केली नसेल. खरंतर यापेक्षा सुद्धा अधिक पाऊस मी सुमनच्या डोंगरावरील घरी व कोंडाणा लेणीच्या सहलीत तसेच अन्यत्र पाहिला होता. परंतु या पावसाने तर जनजीवनच ठप्प करून टाकले होते. आमच्या परिसरात दिनांक २६ व २७ या दोन दिवशी २४ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज नसल्यामुळे दोन दिवस नळाला पाणी नव्हते. सर्वांनी पिण्यासाठी बिस्लेरीच्या बाटल्या मागवल्या होत्या. गच्चीवरून वाहत जाणारे पावसाचे स्वच्छ पाणी इतर घरगुती कामांसाठी सर्वांनी भरून घेतले होते. एका प्रलयंकारी पावसामुळे नंतर पुढे अनेक दिवस विविध समस्या व त्याचे परिणाम दिसू लागले होते. प्रत्येकजण एकमेकांना त्यासाठी मदत करत होता व आपल्यातील माणुसपण जिवंत ठेवत होता.
मासिकं आणायला गेलेले श्री. सुनील वडके (मामा) मुंबईतच अडकून पडले होते. ते जाताना कसेबसे मुंबई पोहोचले. त्यांचा एक तास मासिकं खरेदी करण्यात गेला. मग ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात पोहचले. मामा फलाटावर (प्लॅटफॉर्मवर) येईपर्यंत रेल्वे ठप्प झाली होती. जवळ असलेले पैसे सुद्धा संपले होते. मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांच्या रेल्वे स्थानकांवर पाणी भरल्याने सर्व रेल्वे यातायात बंद करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर खिशात पैसे नसताना मामांनी तब्बल दोन रात्र आणि दोन दिवस काढले होते. त्याही अवस्थेत त्यांनी विकत घेतलेल्या मासिकांचे बंडल व्यवस्थित सांभाळले. त्यावेळी दूरसंचारसेवा कोलमडल्याने दुरध्वनी (फोन) संपर्क सुद्धा करता येत नव्हता. परिणामतः मामा कोणाशीच संपर्क साधू शकले नाहीत. मी सुद्धा मामांशी संपर्क साधण्याचा मार्ग शोधत होतो परंतु त्यावेळी वाट पहाण्याशिवाय काहीच हाती शिल्लक नव्हते. दिनांक २८ जुलै रोजी मामा डोंबिवलीला सहीसलामत परत आले. त्यांना दोन दिवसांची सुट्टी दिली. एका आठवड्यात सर्व जनजीवन परत पुर्वपदावर आले. मुंबईकर नियमितपणे परत कामावर जायला लागले. जनजीवन सुरळीतपणे सुरू झाले. त्यादिवशी मामांना मुंबईला पाठवले नसते तर बरं झाले असते ही खंत मात्र माझ्या मनात आजही बाकी राहीली आहे. परंतु मामा मात्र परत मुंबईला जायला लागले. शेवटी ही मुंबई आहे जी कधी थांबत नाही कारण तीला भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे असते हे माहित आहे.....