Thursday, May 28, 2020

(१९८७) "युथ असोसिएशन ऑफ डोंबिवलीची" स्थापना व डोंबिवली नागरी समस्यांवर व्यंगचित्र स्पर्धेच आयोजन....

कुंदापूरवरून डोंबिवलीत येऊन मला दहा वर्षे झाली. चार वर्ष मुलुंडला शाळेत गेलो आणि पाच वर्ष दुकान सांभाळत कॉलेजला जाऊन कॉमर्सची डिग्री मिळवली. लायब्ररीची सुरुवात होऊन वर्ष झालं. जसा उद्योग व्यवसाय माझ्या रक्तात होता तशी समाजसेवा करायला ही मला खूप आवडायचं. टिळकनगर मला आपलं वाटायचं तसच डोंबिवली सुद्धा. डोंबिवलीत पुष्कळश्या नागरीक समस्या होत्या. जन आंदोलनाने नागरीक समस्या सोडवणे शक्य होत. मी त्यात पुढाकार घेऊन उतरायचं ठरवलं. मी एकटा काहीच करू शकत नव्हतो. एखादी संघटना बरोबर असायला पाहिजे होती. काय करता येईल? याचा सारखा विचार करायचो. एक कल्पना सुचली. स्वतः एक संघटना उभी करायची. साथ द्यायला मित्र तर होतेच. माझे सर्व मित्र तरुण होते. काही कॉलेजमध्ये जात होते तर काहींचा स्वतःचा व्यवसाय... फक्त टिळकनगर मर्यादित न ठेवता अख्या डोंबिवलीचा विचार केला. स्वतः पुढाकार घेऊन "युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली'ची स्थापना केली. चेतन ,समीर, प्रवीण, शैलेश, शर्मिला, मंगेश, दीपक असे बरेचसे मित्र सभासद झाले. आमच्या दुकाना समोर गुंजन सोसायटीच्या बाजूला टिळकनगरचा 'रोड-मॅप' लावून विविध उपक्रमांना सुरुवात केली.

       टिळकनगर परिसर तसा खूप मोठा, बाहेरून आलेली लोकं आमच्या दुकानात पत्ता विचारण्यासाठी यायचे. मला सर्व पत्ते पाठ होते. पत्ता विचारायला आलेल्या प्रत्येकाला मी नीट मार्गदर्शन करून त्यांना पत्ता सांगायचो. संघटनेला सुरुवात झाल्यावर आपण इमारतींच्या आणि रस्त्यांच्या नावाचा एक फलक तयार करूया अशी कल्पना मी मांडली. सभासद जास्त करून टिळकनगरचे रहिवासी होते, जेणेकरून सर्व सभासदांनी होकार दिला. डोंबिवली पलिकेकडून टिळकनगरचा मॅप मिळवला. रस्त्यांची नावे, इमारतींची नावे, शाळा, टेलिफोन एक्सचेंज नाव, पोस्ट ऑफिस वगैरे दर्शवणारा '12 x 12' चा खूप मोठा बोर्ड पेंट करून घेतला. या बोर्डाच उद्घाटन डोंबिवलीतल्या एका पोलीस अधिकारी यांच्या हस्ते करून घेतल. नावा वरून थोडेसे वाद झाले बाहेरून टिळकनगरला येणाऱ्या बराच लोकांना या बोर्डच्या फायदा झाला.

      आता पुढचे कार्यक्रम ठरवायचे होते. संघटनेत जास्त करून कॉलेजला जाणारे विद्यार्थी होते. तरी पण संघटनेसाठी वेळ काढत होते. आम्ही सर्वजण लायब्ररीत जमायचो. डोंबिवलीत वारंवार लाईट जायचे ठीक ठिकाणी कचऱ्याचा ढिग, पाणी तुंबलेली उघडी गटारे, गटारांमुळे होणारे डास, रस्त्यांची दशा, अनियमित पाणी पुरवठा अशा बराच समस्या होत्या. नागरीक समस्यांवर मला एक भन्नाट कल्पना सुचली. डोंबिवलीतल्या नागरी समस्यांवर एक व्यंगचित्र स्पर्धा भरावयाची. व्यंगचित्रांद्वारे लोकांना जागरूक करायचे. मग मी ती मीटिंगमध्ये सदस्यांसमोर मांडली. सर्वांना माझी व्यंग्यचित्र स्पर्धेची कल्पना आवडली. आता सुरुवात कशी करायची? युथ असोसिएशन ऑफ डोंबिवलीचा बोर्ड बनवला होता. लिहण्याचं व पत्र व्यवहारच काम चेतनकडे होतं. चेतनच अक्षर सुंदर आणि मराठीवर कमालीचं प्रभुत्व होतं. मला त्याच लिखाण आवडायचं. स्पर्धेच नियम व अटी आम्ही तयार केल्या. डोंबिवली पलिकेसमोर व्यंग्यचित्र स्पर्धेचा बोर्ड लावला. अखेरच्या तारखेपर्यंत तब्बल दीडशे लोकांनी स्पर्धेत भाग घेतला.

     डोंबिवलीतल्या विविध नागरिक समस्यावर व्यंग्यचित्र काढून आणायच होत. डोंबिवलीतल्या विविध नागरिक समस्येवर लोकांनी छान कल्पना व्यंग्यचित्र द्वारे मांडल्या. त्यातला व्यंग चित्रांना क्रमांक देऊन पहिले तीन आणि उत्तेजनार्थ बक्षीस निवडायचे होते. रामनागरला उतेकर सरांचं नाव मी ऐकलं होतं. आम्ही काहीजण आलेले व्यंग्यचित्र घेऊन उतेकर सरांकडे गेलो. त्यांना आमचं ध्येय आणि स्पर्धे विषयी समजावून सांगितले. सरांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवसात क्रमांक निवडून देतो बोलले. आता स्पर्धेचं बक्षीस समारंभ कुठे आणि प्रमुख पाहुणे निवडायचे होते. आम्ही सर्वांनी आंबेडकर हॉलमध्ये कार्यक्रम व आलेल्या व्यंग्यचित्रांचे प्रदर्शन भरावयाचे ठरवले. चेतनने पत्र तयार केलं. तारीख व कार्यक्रमाचे तपशील लिहून आंबेडकर सभागृह बुक केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द जागतिक पातळीचे व्यंग्यचित्रकार आर के लक्ष्मण यांना बोलवायचं ठरलं.

    आमच्या येथे टेलिफोन केंद्रासमोर डॉक्टर तारा नाईक यांचा दवाखाना होता. त्यांचा नवरा श्री शंकर नाईक हे माझ्या चांगलेच परिचयाचे होते. ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये वितरण विभागात मुख्य पदावर होते. त्यांना मी नागरीक समस्येवर आम्ही घेतलेल्या स्पर्धेबद्दलची माहिती दिली. बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आर के लक्ष्मण यांना बोलावण्याचे ठरविल्याच सांगितले. ते बोलले कठीण आहे तरी आपण प्रयत्न करूया. आर के लक्ष्मण सर्वांना भेटतात फक्त त्यांना वेळ असायला पाहिजे असं ऐकलं होतं. चेतनने पत्र तयार केलं. तारीख व वेळ ठरवून मी त्यांच्या ऑफिसला गेलो. V.T. स्टेशनच्या बाहेरच टाइम्स ऑफ इंडिया ची इमारत होती. मी सांगितलेल्या वेळेवर पोचलो. नाईक अंकलना भेटण्यासाठी थोडा वेळ बाहेर बसलो. नाईक अंकल आल्यावर त्यांच्या सोबत आर के लक्ष्मण यांच्या केबिनकडे गेलो. बाहेरून समजलं की ते खूप व्यस्त आहेत आज भेटू शकत नाही असं समजल्यावर मी आणलेलं पत्र अंकलकडे देऊन डोंबिवलीला परतलो. दुसऱ्या दिवशी आर के लक्ष्मण सर महिना भर वेळ देऊ शकत नाही असं अंकल कडून समजलं. आता प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं याचा प्रश्न पडला. सर्वांनी मिळून लोकसत्ताचे व्यंगचित्रकार सत्येन टंनू यांना बोलावण्याचे ठरविले. त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी येण्याचे कबुल केले.

      डोंबिवलीतल्या आंबेडकर सभागृह येथे कार्यक्रम करण्याचे ठरविले. कार्यक्रमाच्या दिवशी पाहुणे सत्येन टंनू ठरल्या प्रमाणे वेळेवर डोंबिवली स्टेशनवर उतरले. मी आणि काही सदस्य त्यांना घ्यायला स्टेशनवर गेलो. आंबेडकर हॉलवर आम्ही सर्व तयारी केली होती. सभागृहाच्या दोन्ही बाजूला लोकांकडून आलेले व्यंग्यचित्र लावले होते. सभागृह दीडशे ते दोनशे नागरिकांनी भरलेला होता. युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली चा पहिलाच कार्यक्रम आम्ही सर्वांनी छान पैकी हाताळला. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे वेळेवर सुरू केला. स्टेजवर मी चेतन आणि प्रमुख पाहुणे सत्येनं टंनू होतो. सूत्रसंचालन विनायकने उत्तम रीत्या सांभाळले. प्रास्ताविक मी मांडले. स्पर्धेच्या मागचा उद्देश लोकांसमोर मांडून नागरिक समस्यावर त्यावर तोडगा काढण्यासाठी उपाय योजना मांडल्या. चेतनने युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली संघटने विषयी माहिती व आजच्या कार्यक्रमा विषयी थोडक्यात माहिती दिली. नंतर अध्यक्षीय भाषण झाले. नागरीक समस्यांवर लोकांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे भरभरून कौतुक केलं. नागरीक समस्यांवर व्यंगचित्र स्पर्धा ही एक वेगळीच कल्पना आहे. याच्यामुळे जन जागृती होईल. प्रशासनाने याची दखल घेतली तर डोंबिवलीतल्या बरेचसे समस्या सुटू शकतील असे ते बोलले. त्यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. आलेलं नागरिकांनी कार्यक्रम आयोजनाच खूप कौतुक केलं. व्यंगचित्र बघण्यासाठी डोंबिवलीतल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर या व्यंगचित्रांचे समोरच्या पाटकर हॉल मध्ये प्रदर्शन भरवलं. डोंबिवलीतल्या नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन व्यंग चित्रांचे भरभरून कौतुक केले. युथ असोसिएशनचा हा पहिलाच कार्यक्रम यशस्वी ठरला. या कार्यक्रमात  चेतन, समीर, विनायक, मंगेश, शैलेंद्र, शर्मिला, दीपक, विष्णू, किशोर अजून बरेचसे सदस्यांनी हातभार लावला होता....

Tuesday, May 26, 2020

"गेटवे ऑफ इंडिया" वर Happy New Year ३१ डिसेंबर १९८६


दुपारच्या वेळेत गिऱ्हाईक कमी असल्यामुळे आमच्या दुकानात माझ्या मित्रांची फौज जमलेली असायची. कॉलेजचा मित्र विनायक शेट्ये, पेप्सी कोला विकायला येणारा विष्णू नाईक, सकाळी दूध टाकणारा किशोर समोर रजत सोसायटीत राहणारा प्रवीण, इमारतीतला संतोष ओक अजून बरेचसे मित्र जमायचे. क्रिकेटचे किस्से, सिनेमाचे किस्से स्वतःच्या करिअर बद्दलच्या चर्चा असायच्या. १९८६ डिसेंबरचा महिना होता. आम्ही गप्पा मारता मारता ३१ डिसेंबरला काय करायचं यावर चर्चा सुरू झाली. विनायक बोलला आपण "गेटवे ऑफ इंडिया"ला जाऊया. तिकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम छान असतो अस मी ऐकलंय. काही मित्रांनी होकार दिला. ते यायला तयार झाले. ट्रेनने जायचं आणि ट्रेनने यायचं त्यामुळे जास्त खर्च येणार नव्हता. फक्त जाण्या येण्याचा आणि थोडाफार खाण्याचा खर्च. मी थोडा विचार करायला लागलो. बाकीच्यांना फरक पडणार नव्हता मला सकाळी उठून दुकान उघडायचा होतं. काही जण तयार झाले मग मी पण होकार दिला.

   अण्णांची तब्यत सुधारली होती. अण्णांच्या पाठीच्या मणक्याचे दुखणे कमी होऊन ते दुकानात यायला लागले. सर्वेश हॉल च्या बाजूला पिठावाला हे  गृहस्थ मुंबईहून आठवड्यातून एकदा यायचे. ते रुग्णाच्या पाठीवर लाथ मारायचे. त्यांनी बरेचसे रुग्ण बरे केले होते. अण्णा पण त्यांच्याकडे गेले. त्यांच्या उपचारामुळे अण्णांना बर वाटायला लागलं. अण्णा चालायला फिरायला लागले. अण्णांना मी मित्रांबरोबर ३१ तारखेला "गेटवे ऑफ इंडिया"ला जाण्याचं सांगितलं. अण्णा चालेल बोलले तू जाऊन ये सकाळी दुकान मी उघडतो. मग काय मी हवेत!! हॅपी न्यू इयर थेट मुंबईत "गेटवे ऑफ इंडियावर" मित्रांसोबत साजरा करणार...

    ३१ तारखेला आठ वाजता निघायचं ठरलं. अण्णा दुकान बंद करणार होते. लायब्ररीत गेलो त्यादिवशी काहीच पैसे जमा नव्हते. दुकानात येऊन अण्णा कडे खर्चासाठी तीस रुपये मागितले. एवढा गल्ला माझ्या ताब्यात असताना मी कधीही एक रुपया पण काढायचो नाही. अण्णा जे देतील ते. आणि मी मागितलं की अण्णा कधीच नाकारायचे नाही. अण्णांनी लगेच तीस रुपये काढून दिले. सात वाजता मी घरी निघालो. घरी जाऊन जेवलो. आठ वाजता डोंबिवली स्टेशन तिकीट खिडकीच्या इथे आम्हीच जमायचं ठरलं होतं. मी V.T. च रिटर्न तिकीट काढलं. थोड्यावेळात बाकीचे सर्व जमले. ८.३०ची स्लो ट्रेन पकडली. मला "गेटवे ऑफ इंडिया" बघायची उत्सुकता होती. ट्रेन तशी रिकामी होती. आमच्यासारखे ३१ डिसेंबर साजरा करणारे थोडेफार लोकं होते. मी, विनायक, प्रवीण अजून तिघे असे आम्ही सहा जण होतो. ट्रेनला V.T. ला पोचायला कमीत कमी दीड तास लागणार होता. आम्ही आमच्या सोबत पत्ते घेतले होते. थोडावेळ पत्ते खेळलो. नंतर चित्रपटातली गाण्यांना सुरुवात केली. दादर स्टेशन आल्यावर मस्ती करायला सुरुवात झाली. V.T. स्टेशनला गाडी थांबली. तसं स्टेशन मला परिचित होतं. यापूर्वी दोन तीन वेळा घरातल्यांसोबत V.T. स्टेशनला यायची संधी मिळाली होती. स्टेशनवर उतरल्यावर प्लॅटफॉर्म, गर्दी, शेकडोंच्या संख्येने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या, कामावर जाणारी माणसं बघून मुंबईचा अभिमान वाटायचा.

    आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो, समोरच्या घड्याळात सव्वा दहा वाजले होते. बराच सिनेमामध्ये मुंबईत उतरला म्हटलं की जे दृश्य दाखवायचे ते दृश्य आता माझ्या डोळ्यांसमोर होतं. जगातल्या काही मोजक्या रेल्वे स्टेशनमध्ये हे एक स्टेशन मोजल जायचं. V.T.  स्टेशनची इमारत रात्रीच्या वेळेला छान दिसत होती. सर्वजण बोलले इथंच काहीतरी खाऊन घेऊया पुढे महाग पण असेल आणि गर्दीही असेल. आता काय खायचं समोर वडापाव, पाव भाजी, सँडविच ची दुकाने होती. वडापाव घ्यायचं ठरलं. मी घरून जेवून आलो होतो तरी पण मी एक वडापाव खाल्ला. जेवलो नसतो तर कमीत कमी तीन चार तरी वडापाव खाल्ले असते. वडापाव जाम चमचमीत होता.


   आम्ही D.N. रोड वरून चालत निघालो. विनायक बोलला चालत गेलो तर अर्धा तासात आपण पोचू. आमच्याकडे वेळ होता. आत्ताशी फक्त अकरा वाजले होते. आम्हाला बाराच्या आधी तिकडे पोचायचं होत. रात्रीची वेळ असली तरी सर्वजण ३१ डिसेंबर न्यू इयर साजरा करण्यासाठी बाहेर पडले होते. बरेचसे जण आमच्यासारखे "गेटवे ऑफ इंडिया" बघायला आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक चालत होते. रस्त्यावर गाड्या वेगाने धावत होत्या. चालत आम्ही फ्लोरा फाऊंटनला पोचलो. विनायक सर्व ठिकाणाची नावे सांगत होता. तो आमचा गाईडच होता म्हणा.पुढे डाव्याबाजूला जहांगीर आर्ट गॅलरी लागली मग रिगल सिनेमा. आता दहा मिनिटात आपण पोचू असा विनायक बोलला. पुढे छोटीसी गल्ली लागली त्यातून बाहेर पडताच समोर गेटवे ऑफ इंडिया दिसत होतं. सागरा सारखा जनसमुदाय दिसत होता. जास्त करून कॉलेजला जाणारे तरुण मुलं मुली आणि काही प्रमाणात फिरायला आलेली फॅमिली होती. थोडाफार प्रमाणात विदेशी नागरिकही होते. "गेटवे ऑफ इंडियाची" इमारत प्रकाश झोतात उठून दिसत होती. ताज हॉटेल सुद्धा लायटिंगमुळे एखाद्या चित्रकाराने चित्र रंगवल्यासारख दिसत होतं. मला विश्वासच बसेना की मी हे सर्व माझ्याच डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतोय. सर्व लोकं छान सजून दजून आले होते. लाऊड स्पीकर वर म्युझिक सुरू होतं. मुलं मुली त्या चालीवर नाचत होते. फोटो काढणारे आपले कॅमेरा घेऊन फिरत होते. लोकं आपापल्या ग्रुप चे फोटो काढून घेत होते. खाण्यापिण्याचे काही दुकाने उघडी होती. या दुकानात सुद्धा काही लोकांनी गर्दी केली होती. समुद्रात बोटी हालचाल करत होत्या. बोटीतून माणसं फिरायला जात होते. बारा वाजायला काही सेकंद बाकी होते. इतक्यात सर्व लाईट्स बंद झाल्या. सर्वत्र अंधार पसरला. लोकांनी जोरात ओरडायला सुरुवात केली "हॅपी न्यू इयर!!!". इतक्यात बारा वाजले, १९८६ साल संपून १९८७ सालची सुरुवात झाली. समोर समुद्रात आणि बाजूला फटाके वाजायला सुरुवात झाली. आकाशात वेगवेगळ्या रंगाचे फटाके उडतांना दिसत होते..., ते दृश्य बघण्यासारख होतं. मला अजिबात विश्वास बसत नव्हता की मी घरातून फक्त अडीच तासाच्या अंतरावर असलेल्या जगातल्या काही मोजके रमणीय स्थळातल्या "गेटवे ऑफ इंडिया" येथे नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटत होतो....

Sunday, May 24, 2020

"फ्रेंड्स लायब्ररी" चे पहिले काही दिवस आणि "फ्रेंड्स स्टोअर्स" मध्ये जून महिना...

२२ मे १९८६ रोजी "फ्रेंड्सलायब्ररी" ची सुरुवात झाली. लायब्ररीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळाच होता. डोंबिवलीतल्या इतर वाचनालयात किती वर्गणी आहे? ते किती पुस्तके देतात? त्यांच्याकडे किती पुस्तके आहेत? किती सभासद आहेत? या सर्वांचा मी कधीच विचार केला नाही. त्यांचे वेळापत्रक, नियम व अटी वेगळ्याच होत्या. फ्रेंड्स लायब्ररीत मी तीस रुपये अनामत रक्कम आणि दहा रुपये महिन्याची वर्गणी ठेवली होती. एकावेळी एक पुस्तक आणि ते महिन्यातून कितीही वेळा बदलण्याची मुभा. विलंब शुल्क नाही. कमीत कमी नियम व अटी ठेवल्या. त्या मानाने आपल्या लायब्ररीत सभासद खूप कमी होते. कारण पुस्तकांची संख्या कमी, नवीन पुस्तकांची भर पडत नव्हती. मासिकं ठेवायला सुरुवात केली नव्हती. सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी पाच ते आठ एवढाच वेळ लायब्ररी उघडी असायची. वाचकांना पुस्तकं बदलायला वेळ कमी मिळायचा. त्यात सोमवारी लायब्ररी बंद. वाचक यायचे पुस्तकं बघून निघून जायचे. जी मुलगी स्टाफ ठेवली होती ती नवीन असल्यामुळे वाचकांना समजून सांगू शकत नव्हती. दुकानाच्या जबाबदारीमुळे मला स्वतःला लायब्ररीसाठी वेळ देता येत नव्हता. रोज संध्याकाळी लायब्ररीत जायचो. दिवसातून एखादा सभासद पुस्तक बदलून गेला किंवा नवीन सभासद नाव नोंदणी झाली की मी खुश. घरी व मित्रांना सांगायचो आज एक सभासदांनी पुस्तक बदललं!! आज एक नवीन सभासद झाला!!! माझ्याकडे भांडवल कमी होतं, त्यामुळे मी जास्त पैसे लायब्ररीत गुंतवू शकत नव्हतो. पण मी ठरवलं होतं जे काही उत्पन्न होईल ते न वापरता त्या उत्पन्नातून नवीन पुस्तके खरेदी करायची. जेणे करून नवीन पुस्तकं वाढतील तसेच नवीन सभासदही नाव नोंदवतील. मला मात्र दुकानात जास्त लक्ष द्यायला लागायचं.

     जून महिन्याला सुरुवात झाली की खूप मज्जा असायची. जून तेरा तारखेला जास्त करून डोंबिवलीतल्या सर्व शाळा सुरू होत होत्या. डोंबिवलीत बरेचसे लोक मुंबईला नोकरीला जात होते. एक तारीखेनंतर सर्वांचा पगार यायचा. एकदा पगार हातात आला की खरेदीला सुरुवात. एक जून नंतर दुकानात तुफान गर्दी असायची. मे महिन्यातच आम्ही वह्या, पाट्या, पाठ्य पुस्तके, नवनीतचे गाईड, जीवनदीप प्रकाशनाचे वर्क बुक, पेन ,पेन्सिल, कंपास पेट्या सर्व समानांचा भरपूर स्टॉक करून ठेवायचो. सकाळी गर्दी कमी असायची तेव्हा सर्व सामान लावून घ्यायचो. संपलेल्या सामानाची यादी तयार करून मार्केटला पाठवायचो. संध्याकाळी मात्र पाच वाजल्यापासून गिऱ्हाईकांच्या गर्दीला जी सुरुवात व्हायची तर कधी नऊ वाजले हे कळायचं नाही. दुकानात मी आणि दोन कर्मचारी असायचो. कॅश सांभाळण्यासाठी कामत पेनचे मालक लक्ष्मण कामत असायचे. दहा ,वीस, पन्नास रुपयांच्या नोटांनी गल्ला भरलेला असायचा. मी आलेल्या गिऱ्हाईक सांभाळायचो. वेगवेगळ्या शाळांची यादी लोकं घेऊन यायचे. पुस्तक शोधताना खूप वेळ जायचा. सर्व पुस्तकं मिळाली की गिऱ्हाईक खुश!! नाहीतर ते नाराज होत होते. मग त्यांना त्या पुस्तकांसाठी दुसऱ्या दुकानात जायला लागायचं आम्ही सांगायचो की एक दोन दिवसात मागवून देतो पण लोक काही ऐकायचे नाही. संध्याकाळी गर्दी असताना काही लोकं पुस्तक डबल झाली म्हणून परत घेऊन यायचे. घरातले दोन तीन माणसं यादीत न मिळणारी पुस्तकं जिथे मिळेल तिथून आणायची आणि डबल झाली की आमच्याकडे परत करायला यायचे. या वरून पुष्कळ भांडण व्हायची. तुमच्या बिलावर पुस्तके परत घेतले जाणार नाही असं कुठेच लिहलेले नाहीये असे काही लोक म्हणायचे. मी मष्करीत म्हणायचो बिलावर पुस्तके परत घेतो असं पण कुठेही लिहलेले नाहीये!! ओळखीचे असले तर त्यांना दुपारी मी एकटा असतांना पुस्तक बदलून देण्यासाठी बोलवाचो. मला भांडण करायला आवडायचं नाही!!


     पाठ्यपुस्तके अण्णा मुंबईहून घेऊन यायचे. दरवर्षी कुठल्यातरी इयत्तेचा पाठ्यक्रम बदलेला असायचा. सरकारी कारोबार असल्यामुळे आधी छापून तयार नसायचे. रोज एक दोन विषयांचे पुस्तके येत होती. डोंबिवलीतील काही पुस्तकांचे दुकानदार जसे बागडे, गद्रे बंधू,आम्ही आणि काही कल्याणचे दुकानदार मिळून टेम्पो करून मुंबईहून पाठ्यपुस्तके घेऊन यायचो. त्यांना डोंबिवलीमध्ये यायला रात्रीचे आठ ते नऊ वाजयचे. टेम्पो यायच्या आधीच लोकं गर्दी करून थांबायचे. प्रत्येक पुस्तकांचे पन्नास साठ प्रति असायच्या ते एका तासात संपायचे. त्यानंतर आलेल्या लोकांना पुस्तके मिळायचे नाही.

     एका वर्षी दहावीच्या अभ्यास क्रमातले शंभर मार्कचे संस्कृत पुस्तकाचे सरकारने कमी प्रति छापल्या होत्या. ते काही दिवसात संपल्या पण. एक दिवशी संध्याकाळी दहावीच्या दोन मुली दुकानात आल्या. दुकानात पुष्कळ गर्दी होती. त्या दोघींनी दहावीच्या शंभर मार्क्सच्या संस्कृत पुस्तकाची चौकशी केली. मी पटकन बोलून गेलो शंभर मार्क्सचे संस्कृतचे पुस्तक संपलेत पन्नास मार्कचे दोन पुस्तके दिले तर चालतील का? किती गर्दी असली तरी दुकानात माझी मस्करी चालू असायची. त्या मुलींना माझा राग आला वाटतं त्या मुली दुकानातून निघून गेल्या.थोड्यावेळाने त्या दोघी त्यांच्या घरातल्यांना घेऊन आल्या. त्यांच्याबरोबर एकीची आई तर एकीचा भाऊ होता. भाऊ माझ्या ओळखीचा होता. त्या दोघी मला बोट दाखवून बोलल्या हाच तो ज्यांनी आम्ही शंभर मार्क्सचे संस्कृत पुस्तक विचारलं तर म्हणतो कसा पन्नास मार्क्सचे दोन घ्या!! आलेल्या दोघांना मी कसं तरी समजावून सांगितलं की मी मस्करीत बोललो. शंभर मार्क्सचे पुस्तक मिळत नाहीये पण एक दोन दिवसात कुठूनतरी मागवून द्यायचा प्रयत्न करतो. मी समजावून सांगितल्यावर ते निघून गेले काही दिवसांनी त्यांना दोन पुस्तक मागवून दिली. असे बरेचसे किस्से शाळा सुरू होत असताना दुकानातल्या गर्दीत होत होते. आलेल्या प्रत्येक गिऱ्हाईकांना पुस्तके व इतर सामान मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असायचा...

Friday, May 22, 2020

२२ मे १९८६ रोजी "फ्रेंड्स लायब्ररी" ची स्थापना झाली!!!!

पेंढरकर कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षी आम्हाला कॉम्प्युटर हा एक अभ्यासातील विषय होता. तेव्हा डोंबिवलीत कॉम्प्युटर आला नसावा, कॉम्प्युटर शिकवणारा मॅडमने आम्हाला कॉम्प्युटरच्या प्रॅक्टिकलसाठी मुलुंड पश्चिमेला घेऊन गेले. तेव्हा मी पहिल्यांदा कॉम्प्युटर पहिला. तिकडच्या शिक्षकाने त्यांच्याकडे कॉम्प्युटर क्लास लावायला सांगितलं. दोन वर्षांचा कोर्स होता. फीस सात हजार रुपये इतके होते. सर्टिफिकेट मिळाल्यावर अमेरिकेत नोकरी मिळु शकेल असे ते बोलले. मला माहित होतं आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मी तो विचार मनातून काढून टाकला. नाहीतर मी तेव्हा कोर्स पूर्ण करून अमेरिकेत गेलो असतो!!

    मी T.Y. कॉमर्सला असताना अण्णा आजारी होते. आम्ही चार भावंडं अण्णांनी आमच्या तिघांच्याही भविष्याची सोय केली होती. वेंकटेश अण्णा इकॉनॉमिक्समध्ये M.A. करून lecturer बनणार होता. त्याची शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी घेतली होती. पांडुरंग अण्णाला मंजुनाथ शाळे समोर संदेश स्टोअर्स दुकानाची व्यवस्था करून दिली. आता राहिलो मी. माझ्यासाठी अण्णाने टिळक नगर विद्यामंदिरा समोर जागा घेऊन ठेवली. त्या जागेवर किराणाचा दुकान होतं. टिळकनगर शाळेसमोर राम कृपा बिल्डिंगमध्ये मुरडेर्श्वर आजी राहायच्या. त्यांची जागा होती. एका बाजूला पिठाची गिरणी तर दुसऱ्या बाजूला पॉवर लॉड्री होती. जानेवारी १९८३ ला ती जागा अण्णांनी घेऊन ठेवली. त्या जागेवर काय करायचं ठरवलं नव्हतं. अण्णांच आणि माझं  चांगलं पटायच. "फ्रेंड्स स्टोअर्स' अक्ख मी सांभाळायचो. त्यामुळे अण्णा माझ्यावर खुश!!! माझी T. Y. B.com ची परीक्षा संपल्यावर घरी चर्चा झाली घेतलेल्या जागेवर काय सुरू करायचं?

     "फ्रेंड्स स्टोअर्स'मध्ये बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी यायचे. त्यातले काही विद्यार्थी कॉलेजच्या पुस्तकांची लायब्ररी सुरू करायला सांगायचे. जर विद्यार्थी स्वतःहून सांगत असतील तर छोट्या प्रमाणात कॉलेजची लायब्ररी सुरू करायला हरकत नाही असा विचार मनात आला. मी अण्णा आणि वेंकटेश अण्णांने निर्णय घेतला. दोन कॉमर्सचे आणि तीन सायन्सचे विद्यार्थी सभासद होण्यासाठी तयार झाले. वेंकटेश
अण्णांने काही अकाउंट्सची पुस्तके, केमिस्ट्रीची पुस्तके छान बायडिंग करून आणले. पुस्तकांचे सिलेबस बदलत असल्यामुळे पुढे लायब्ररी सुरू ठेवण्यास जमलं नाही.

       माझी शेवटच्या वर्षाची परीक्षा संपली. आता पुढे काय? याचा विचार करणं भाग पडलं. कुठल्याही परिस्थितीत नोकरी करायची नाही असं माझ ठामपणे ठरवलं!! घरून पण काही आग्रह नव्हताच. मी जे काय ठरवणार त्याला घरातल्या सर्वांचा पाठिंबा होताच. नेमकं अण्णाने जागा घेऊन ठेवली होती. कुठला तरी व्यवसाय सुरू करूया असा मनात विचार आला. दुकानात सुरू केलेलं वाचनालय त्या जागेवर करूया असा मनात विचार आला. अण्णा आणि इतरांशी चर्चा केली. वाचनालय सुरू करायचं ठरलं. काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा. वाचनालय व्यवसाय निवडण्याचामागे बरीशी कारण होती. वाचनालयात स्वतः बसायची गरज नव्हती. एखादा स्टाफ ठेवलं तरी चालत. माझ्याकडे गेले पाच सहा वर्षांचा पुस्तकांबरोबरचा अनुभव होता. दुकानामुळे ओळखीही भरपूर होत्या. महत्वाचं म्हणजे गुंतवणूक कमी लागणार. त्यामुळे जास्त भांडवलाची गरज नव्हती.
 
     वाचनालय सुरू करायचं अजून एक मुख्य कारण माझी स्वतःची वाचनाची आवड. लहानपणी कुंदारपूरमध्ये संघाच्या लायब्ररीत जायचो. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस असे बरेचसे थोर पुरुषांचे चरित्र वाचले होते. दहावी नंतर दुकानात बसायचो. दुकानात बाबुराव अर्नाळकरांचे बरीचशी छोटी छोटी पुस्तके होती तेव्हा त्यांची किंमत दीड ते दोन रुपये असायची. दुपारी एकटा असताना मी त्यांची पुस्तके वाचायचो. रणझुंझार, काळापहाड असे नायक असलेली रहस्यमयी छोटी छोटी पुस्तके मला खूप आवडायची.बाबुराव अर्नाळकरांची ही पुस्तके मला वाचनालय सुरू करण्यास कारणीभूत ठरली.

     अण्णांनी दुकानासाठी सारस्वत बँकेकडून कर्ज घेतलं होतं. सारस्वत बँकेला दुकानाच कागदपत्र व वार्षिक अहवाल द्यायला लागायचं. दुकानाच अकाउंटसाठी मी पै सरांकडे गेलो. सरांनी विचारलं दुकान कसं चालाय तुझं शिक्षण झालाय फक्त निकाल लागायचं बाकी आहे. पुढे काय करणार आहेस? मी वाचनालय सुरू करण्याच सांगितलं. थोडाफार भांडवल ही लागेल असं बोललो. सरांनी लगेच पाच हजार रुपये काढून दिले!!

     हातात पैसे होते अण्णांनी घेऊन ठेवलेली जागाही होती. वाचनालय सुरू करायचं ठरलं. लगेच कामाला लागलो. सुरुवातीला जागेच काम सुरू केलं. बरेच दिवस जागा रिकामी पडून असल्यामुळे वरचे पत्रे बाजूची भिंत खराब झाली होती. समोरच शटर पण गंजल होत. आमच्या ओळखीच्या एका कडीयाला बोलावलं सर्व नीट करून भिंतीला रंग-रंगोटी करून घेतली. सर्व काम संपल्यावर जागा छान दिसत होती. जागा समोरून छोटी असली तरी आतून खूप मोठी. वाचनालयाला पुरेशी एकूण तीनशे फूटची जागा. पुस्तक मांडण्यासाठी तयार असलेले चार लोखंडी रॅक मागवले. एक टेबल, एक पंखा, चार बल्ब मागवून इलेक्ट्रिक कामं करून घेतल.


     जागा तयार होती आता नाव काय द्यायचं? कधी पासून सुरुवात करायची?? हे ठरवायचं होतं. त्यावेळी डोंबिवलीत शंभराहून अधिक छोट्या-मोठ्या वाचनालय होत्या. त्यातले काही वाचनालयामध्ये एक हजारपेक्षा जास्त सभासद होते. फक्त मानपाडा रोडवर पाच सहा वाचनालय होत्या. विकास वाचनालय, ज्ञान विकास वाचनालय, योगायोग वाचनालय, ज्ञानदा वाचनालय अश्या कित्येक वाचनालयात पुष्कळ गर्दी असायची आणि वाचकही खूप असायचे. प्रत्येक वाचकांचे दोन-दोन, तीन-तीन वाचनालय असायच्या. वाचक एका वाचनालयातून पुस्तके तर दुसरीकडून मासिकं आणायचे. घरातले सर्वजण पेपर व पुस्तके वाचायचे. वाचनालये सुद्धा नवीन पुस्तके, नवीन मासिकांनी भरलेली असायच्या. आपली जागा डोंबिवली शहराच्या एका कोपऱ्यात होती. कितपत सभासद जमतील याची शंका होती. मी पण पुस्तकांच्या जमवा जमविला लागलो.


     दुकानात बरीचशी कॉलेजची पुस्तके होती. सुहास शिरवळकर, अरुण हरकारे, गुरुनाथ नाईक, प्र.के.अत्रे, व्ही. स. खांडेकर अशा वेगवेगळया लेखकांच्या आणि काही ऐतिहासिक मिळून शंभरेक मराठी कथा, कादंबऱ्या विकत आणल्या. पुस्तकांना शिवून बायडिंग करून घेतले. आता फक्त नाव आणि तारिख ठरवायची होती.

       उदघाटन समारंभ करायचा नव्हता. फक्त देवाचा फोटो ठेवून जवळचे नातेवाईक, काही मित्र, काही दुकानाचे नेहमीच्या गिऱ्हाईकांना बोलवायचं ठरवलं. अण्णा बोलले फ्रेंड्स नावं चांगलं आहे पुढे लायब्ररी किंवा वाचनालय शब्द लावलं की झालं. मी विचार केला फ्रेंड्स इंग्लिश शब्द आहे त्याला लायब्ररी हाच शब्द जुळेल म्हणून फ्रेंड्स लायब्ररी असं नाव सुचलं. आणि सर्वांनी ते मान्य ही केलं. आता तारीख आणि नावाचा फलक फक्त राहिलं होतं. बोर्ड लिहून देणाऱ्या एका पेंटरला बोलवलं त्यांनी निळा आणि लाल रंगात छानपैकी फ्रेंड्स लायब्ररी नावाचा बोर्ड बनवून दिला. माझ्या कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाचा निकाल यायचा होता. त्याच्या आधीच बावीस मे ला वाचनालय सुरु करायचं ठरलं.


    एकवीस मे ला सर्व तयारी पूर्ण केली. दुकानातील पुस्तके, नवीन विकत आणलेल्या कथा, कादंबऱ्या लोखंडी रॅकवर सजवून ठेवल्या. पुस्तकांना नंबरही दिले गेले. नावाचा बोर्ड लावून घेतला. फक्त कोणाला आधी दिसू नये म्हणून त्यावर रद्दीचा कागद लावून घेतला.वेंकटेश अण्णाने माधुरी म्हणून एका स्टाफची नेमणूक केली.


                                            २२ मे १९८६ रोजी "फ्रेंड्स लायब्ररीची" स्थापना झाली!!!
    पहिल्याच दिवशी तीन सभासद झाले. वृषाली वालावलकर हिने "फ्रेंड्स लायब्ररीची" पहिली सभासद म्हणून नाव नोंदणी केली...

Wednesday, May 20, 2020

पै सरांच्या एका वाक्यामुळे एप्रिल १९८६ ला T.Y.B.com ची परीक्षा दिली....

पेंढरकर कॉलेजमध्ये चार वर्षे कसे गेले कळलेच नव्हते. मी चौदावी उत्तीर्ण होऊन कॉमर्सच्या शेवटच्या वर्षात T.Y.Bcom ला पोचलो. पुढच्या भविष्याचा विचार केला नव्हता. कॉलेजमध्ये सर्व लेक्चर मी वर्गात उपस्थित असायचो. लेक्चर नसेल तर कॉलेजच्या मागे असलेल्या पाटील यांच्या कॅन्टीनमध्ये मी आणि बरेचसे मित्र असायचो. त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती. कधी कधी आम्ही क्रिकेट खेळायचो. पाटील पण आमच्या बरोबर खेळायचे. खरंतर T.Y.Bcom कॉलेजचं शेवटचं वर्ष. पुढच्या करियर साठी महत्वाचं वर्ष. चौदावी पर्यंत मी कुठलाही क्लास लावला नव्हता. कॉलेजमध्ये जे शिकवले तेवढच. बाकी मित्रांचे नोट्स, त्यांच्या बरोबर चर्चा करायचो. चेतना प्रकाशनाची गाईड वापरून परीक्षा दिली. आता शेवटच्या वर्षात पोचलो होतो....
   
      कॉलेज सुरू झालं आणि नेमके अण्णा आजारी पडले. त्यांना पाठीच्या मणक्याचे आजार होता. त्यांना चालायला उठून बसायला जमत नव्हतं. दुकानाचा भार माझा अंगावर आला. दुकानात दोन कामगार होते पण रोखचा व्यवहारासाठी घरातली व्यक्ती पाहिजे होती. तसा प्रेमानंद माझा भाचा मोठ्या बहिणीचा मुलगा होताच. त्याच पण कॉलेज होत. अधून मधून वेंकटेश अण्णा येत होता तो पण दुकान सांभाळायचा. जून मध्ये कॉलेज सुरू झालं होतं. जवळ जवळ महिनाभर कॉलेजमध्ये अकाउंटसाठी शिकवायला कोणच नव्हतं. शेवटचं वर्ष असल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष्य द्यायला हवं होतं. बाकीच्या सर्व मित्रांनी कोणता ना कोणता क्लास लावला होता. त्यावेळी डोंबिवलीत कॉमर्ससाठी दोनच क्लास प्रचलित होते. शिरीष देशपांडे सरांचा सरस्वती क्लास ज्यात कॉलेजसारखे पुष्कळ विद्यार्थी होते. आणि दुसरा गणेश क्लास जो उमेश पै सर आणि वाणी सर चालवत होते. मला त्यातलं त्यात गणेश क्लास लावायचा होता. पै सर माझ्या ओळखीचे होते. ते आमचे नातेवाईक पण होते. मी बारावी झाल्यावर C.A. एन्ट्रन्स ची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेला बसण्यासाठी पै सरांची सही घ्यायला त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. परीक्षेत सर्व विषयात दहा आणि पंधरा असे खूप कमी गुण मिळाले होते. मी कमी गुण मिळवून नापास झाल्यामुळे C.A.चा नाद सोडून दिला. त्यानंतर मी पै सरांकडे गेलो नाही.

     आता शेवटच्या वर्षासाठी क्लास लावायचा होता. कॉलेजमध्ये जे शिकवतात ते परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी पुरेस नव्हत. मी जुलै महिन्यात क्लास लावायचा विचार केला. कॉलेजच्या मित्रांकडून ऐकलं होतं की पै सरांचं क्लास फुल्ल झालाय. आता काय करायचं? तरी मी विचार केला एकदा जाऊन सरांना भेटून विचारुया, म्हणून त्याच्या क्लासमध्ये गेलो. पै सर वर्गात शिकवत होते. मी त्यांची वाट बघत बाहेर थांबलो. क्लास सुटल्यावर सरांनी मला आत बोलावलं. मी पेंढरकर कॉलेजमध्ये T.Y. कॉमर्सला आहे, मला आपला क्लास लावायचा आहे, तर सर बोलले तुला खूप उशीर झालाय क्लासचे सर्व बॅच भरले गेले आहेत. ऍडमिशनची शक्यता खूप कमी आहे. सर मला कोणतीही बॅच चालेल माझी एक सीट ऍडजस्ट करा प्लीज. अशी मी पै सरांना विनंती केली. सरांनी थोडावेळ घेतला मग म्हणाले, ठीक आहे तू माझा नातेवाईक आहेस आणि तुझ्या भावांना मी चांगला ओळखतो, तुम्ही खूप मेहनती आहात. तू उद्यापासून संध्याकाळच्या बॅचला ये पण एक अट आहे सीट फुल आहेत तुला टेबलवर बसायला लागेल तुला चालेल का? मी चालेल बोललो मला फक्त क्लासमध्ये प्रवेश हवा होता.

      दुसऱ्याच दिवशी क्लास ची फी भरून मी क्लासला जायला सुरुवात केली. कॉलेजमधले सर्व लेक्चरस अटेंड करायला सुरुवात केली. गणेश क्लास संध्याकाळी असायचा. पै सर खूप चांगले शिकवायचे. ते खूप खोलात जाऊन अकाउंट्स शिकवायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांना समजेपर्यंत पुढचा विषय घ्यायचे नाही. समजा वर्गात कोण जांभई घेत असले तर हातातला खडू सरळ फेकून मारायचे. अभ्यासाबरोबर इतर गोष्टीही सांगायचे. सर्वांना विषय समजेल असे चांगले उदाहरणे द्यायचे. इनकम टॅक्स त्यांचा आवडता विषय होता ते स्वतः C.A. असल्यामुळे इनकम टॅक्स बद्दल नीट समजावून सांगायचे.

    मी नियमितपणे कॉलेज आणि क्लासला जायला लागलो. अण्णांची तब्येत खूप बिघडली अण्णांना उठायला, बसायला त्रास होऊ लागला. अण्णांना दुकानात यायला जमेनासे झाले. दुकानाचा सर्व भार माझ्यावर आला. तसं मदतीला वेंकटेश अण्णा, प्रेमानंद आणि दोन कामगार होते. मला दुकानाची काळजी वाटत होती. एप्रिलमध्ये परीक्षा जाहीर झाल्या. मी द्विधा मनःस्थिती होतो. परीक्षा दयायची का नाही? दोन दिवस मी पै सरांच्या क्लासला गेलो नव्हतो. पै सरांनी मला भेटायला बोलावलं. मी पै सरांना भेटायला क्लासमध्ये गेलो. सर्व मुलं घरी गेल्यावर सरांनी मला आत बोलावलं. विचारलं क्लासला का येत नाहीस? मी माझ्या अडचणी सराजवळ मांडल्या. सर बोलले सर्व ठीक आहे तू परीक्षेला बस जास्तीत जास्त काय होईल नापास ना? समजा पास झालास तर एक वर्ष वाया जाणार नाही, डिग्री पण मिळून जाईल!! सरांचं हे वाक्य मला पटलं. बस! त्या दिवसापासून दिवसा दुकान रात्रीचा अभ्यास. रात्री एक वाजेपर्यंत अभ्यास सकाळी ६.३० ला दुकान. घरच्यांनी पण खूप मदत केली. इमारतीतले सर्व मित्र मुन्ना, मनसुख भाई, संतोष प्रत्येकांनी मला मदत केली. अर्थशास्त्र आणि कॉम्प्युटर विषय मला कठीण जायचे. बाकीच्या विषयांमध्ये मला चिंता नव्हती. पै सरांचे ते वाक्य लक्षात ठेवून बाकीचं काही विचार न करता मार्च महिन्यात फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. एप्रिल १९८६ ला मी T.Y. Bcom ची परीक्षा दिली

Monday, May 18, 2020

एका दिवसात ६०० अंडी आणि ३०० ब्रेड विकण्याचा विक्रम

माझा जास्तीत जास्त वेळ दुकानात जायचा. कॉलेज नसेल तर सकाळी साडेसहाच्या सुमारास मी दुकान उघडायचो. दुकानातल्या सामानांची मांडणी करेपर्यंत नऊ वाजायचे. फ्रेंड्स स्टोअर्स एक सुपरमार्केट सारखच होतं. पुस्तकाचं दुकान असलं तरी आम्ही दुकानात अंडी, ब्रेड, पाव, बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट, फरसाण, अगरबत्ती, नारळ असे बरेचसे सामान ठेवायचो. सकाळी दुकान उघडायच्या आधीच लोकं अंडी आणि ब्रेड खरेदीला यायचे. लोक जास्त करून अर्धा ब्रेड घ्यायचे त्या काळी कंपनी कडून अक्खा ब्रेड येत होता. तो ब्रेड चाकूने मध्येच कापून वर रद्दी पेपर ने बांधून देत होतो. त्यात खूप वेळ जात होता. सर्व सामान बाहेर काढायला मला कमीत कमी एक दीड तास लागायचा. त्यामध्ये आलेल्या गिराई गिऱ्हाईकांना सामानही द्यायचं. त्यात अंडीसाठी कागदी पिशव्या वापरायचो. दुपारच्या वेळेला कागदी पिशव्या मीच तयार करायचो. पिशव्यांसाठी खळ पण मीच बनवायचो. एका तपेलात एक ग्लास पाणी, दोन चमच मैदा टाकून उकळल की दोनशे पिशव्यासाठी खळ तयार!! दुकानाची मांडणी झाली की चहा प्यायला घरी.

   १९८४ ला माझ्या भाचा (मोठ्या बहिणीचा मुलगा) प्रेमानंद गावाहून (कळसा ,चिकमंगळूर जिल्हा कर्नाटक) पुढच्या शिक्षणासाठी राहायला आमच्याकडे आला होता. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. त्याला पेंढरकर कॉलेजमध्ये आर्टससाठी प्रवेश मिळाला. तो पण माझ्यासोबत दुकानात असायचा. दुकानाची खरेदी सर्व अण्णा बघायचे. त्यांचं पेमेंट पण अण्णांच करायचे. मी फक्त विकायचं काम करायचो. जर अण्णा कुठे बाहेर गेले, समजा गावाला वगैरे तर सर्व जबाबदारी माझ्याकडे असायची. एकदा सर्वात जास्त ब्रेड विकणारी विब्स कंपनी बंध झाली होती. तेव्हा आम्ही मुलुंड वरून मॉडर्न ब्रेड आणून विकायचो. कुठलही गिऱ्हाईक परत जावू नये हा त्यामागचा एकमेव हेतू असायचा.
दिवाळीत आम्ही भरपूर सामान विकायचो. अण्णा मुंबईच्या बाजारातून दिवाळीत विक्रीसाठी ग्रीटिंग कार्ड्स आणायचे. दिवाळी शुभेच्छा पत्र, वेग वेगळ्या नक्षीचे हे पत्र लोकं बाहेरगावी पाठवण्यासाठी पण खरेदी करायचे. जवळपास दिवाळीच्या दहा दिवस आधीपासून लोकं खरेदीला यायचे. आम्ही दुकानात फटकेही ठेवायचो. तेव्हा दुकानात फटाके ठेवण्यासाठी परवान्याची गरज नव्हती. फटाक्यांचा धंदा असा होता की त्यात जो नफा असतो तेवढाच माल उरायचा. पुढच्या वर्षीसाठी ठेवायला लागायचा.

    १९८४ बुधवार चोवीस ऑक्टोबरला दिवाळी होती.दिवाळीसाठी खूप सामान भरलं होतं. मी ,अण्णा, प्रेमानंद आणि दोन कामगार होते. दुकानात फटाके ,ग्रीटिंगस, ड्रायफ्रूट चे बॉक्स , उटणे, मोती साबण असे बरेचसे वस्तू विकायला ठेवले होते .गर्दीही भरपूर होती.भरपूर सामान विकलं गेलं होतं.फक्त थोडेफार फटाके आणि ड्रायफ्रूट बॉक्स शिल्लक होते.ते पुढच्या पाच सहा दिवसात संपणार होते.

    ३१ ऑक्टोबरला सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास रेडिओ आणि टीव्हीवर बातमी आली, भारताचे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्याच अंगरक्षकाने मारले. बातमी हळू हळू पसरायला लागली. दुकाने सर्व बंध ठेवण्यासाठी लोक आग्रह करत होती. मानपाडा रस्त्यावरील सर्व दुकानं बंद करायला सुरुवात झाली. मला पण लोकांनी दुकान बंद करायला सांगितलं. मला आपल्या देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी बद्दल खूप आदर होतं. त्यादिवशी मी खूप विब्स ब्रेड घेऊन ठेवले होते. सर्वांनी दुकानं बंध ठेवल्यामुळे आम्ही पण साडेअकरा च्या दरम्यान दुकान बंद केलं. दुपारी जेवून शांतपणे झोपलो. संध्याकाळी पाच वाजता खाली उतरलो. बघतो तर सर्व दुकानं बंद होती. अख्या टिळकनगर परिसर शांत होतं. मला फक्त ब्रेडची चिंता होती. सेल्समॅनने उरलेले ब्रेड पण माझ्याकडे ठेवले होते. संध्याकाळी घरून चहा नास्ता करून आलो. मी आणि प्रेमानंदने संध्याकाळी सात वाजता अर्ध शटर उघडं ठेवून दुकान उघडलं. सर्व दुकानं बंध होती, टिळकनगरमधील आपलं एकच दुकान उघडं असल्यामुळे पुष्कळ गर्दी झाली. त्या दिवशी फक्त दोन तासात जवळपास सहाशे अंडी आणि जवळ जवळ तीनशे विब्स ब्रेड विकले गेले....

माझा आवडता नट राजेश खन्ना. त्याची एक वेगळीच स्टाईल होती. डोळे मारणं, मान हलवण्, त्याची बोलायची पद्धत या सर्व गोष्टींमुळे मला खूप आवडायचा तो राजेश खन्ना. त्याच्या चित्रपटाची स्टोरी पण चांगली असायची. त्याच्या जास्त करून सर्व चित्रपटाची गाणी हिट होती. किशोर कुमारचा आवाज त्याला एकदम सूट करायचा. सर्वांच्या तोंडावर त्याच्या चित्रपटाची गाणी असायची. त्याची हेअर स्टाईल पण खूप प्रचलित होती. अमिताभचा मुकदर का सिकंदर हा माझा सर्वात आवडता चित्रपट "ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना' माझं आवडत गाणं.का माहीत नाही हे गाणं लागलं की थोड्या वेळासाठी मी स्तब्ध होतो. बुधवारी एकतीस ऑक्टोबरला श्रीमती इंदिरा गांधी यांचं निधन झालं. दुकाने बंद होत्या. शुक्रवारी टिळक सिनेमगृहमध्ये अमिताभचा "शराबी" चित्रपट लागला. अमिताभच्या कुठल्याही चित्रपटाला पाहिल्या दिवशी खूप गर्दी असायची. तिकीट ब्लॅक ने घ्यायला लागायचं. त्यादिवशी लोकं घरातून बाहेर पडायला मागत नव्हते. आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं रात्री नऊच्या शो ला जायचं. सर्वांच्या घरातले नाही म्हणत होते. एवढं काय आहे दोन दिवस जाऊ दे. आम्हाला तर त्याच दिवशी जायचं होतं. पावणे नऊला घरून निघालो. टिळक सिनेमगृहच्या बाहेर पहिल्यांदा अमिताभचा चित्रपट असून सुद्धा काहीच गर्दी नव्हती. एका माणसाकडे बरेचसे तिकीट होते. तो त्या तिकिटं कमी दराने विकत होता. आयुष्यात पहिल्यांदा छापील किंमतीपेक्षा कमी पैसे देऊन अमिताभचा सिनेमा पाहायला मिळाला. ते पण पहिल्याच दिवशी!!! चित्रपट आवडला सर्वांना पण येतानाची भीती होती आम्ही चार जण होतो न घाबरता दहा मिनिटात आपापल्या घरी पोचलो...

Saturday, May 16, 2020

माझ्या कारकिर्दीत "फ्रेंड्स स्टोअर्स" मध्ये मी विकलेलं सर्वात महागडं पुस्तक....

आमच्या "फ्रेंड्स स्टोअर्स" दुकानाला सुरू करून पाच वर्षे होऊन गेले होते. हळूहळू धंदा वाढत होता. त्याकाळी परीक्षा संपल्यानंतर किंवा परीक्षेचा निकाल लागल्यावर लोक आपल्या मुलांचे वहीमध्ये उरलेल्या न लिहलेल्या पानं बांधून घेऊन येत होते. आम्ही त्यातले एकेरी, दुहेरी, चारेगी, चौकटी व इतर पानं वेगळे करायचो आणि ती पानं एकत्र करून छान पुठ्ठा बायडिंग करून तयार झालेली नवीन वही अत्यल्प किमतीत द्यायचो. बायडिंगला बाजूच्या काकी स्मृती मधील भारत प्रिंटिंग प्रेसमध्ये द्यायचो. तिकडे डेव्हिस नावाचा मित्र होता तो कमी किमतीत वह्या बायडिंग करून द्यायचा. ती वही मुलं रफ वही म्हणून वापरायचे. त्यामुळे वहितल्या उरलेल्या पानाचा सदुपयोग होत होता. मुलांना कमी किमतीत वही बनवून मिळायची. सुट्टीमध्ये दुकानात असे भरपूर वह्या यायच्या. थोडीफार भांडणही व्हायची. आम्ही जास्त पानं दिली होती आमची दुरेगी पान होती वगैरे.. धंदा म्हटलं की सर्व चालायचं!!

    त्याकाळी कॉलेजची नवीन पुस्तके कमी लोकं खरेदी करायचे. कॉलेजच्या पुस्तकांची किमती ही जास्त असायची. काही पुस्तके खूप महाग असायची. सर्वसामान्य लोकांना नवीन पुस्तके खरेदी करायला परवडत नसे. लोक काठ कसर करून पैसे खर्च करायचे. दुकानातून जुनी पुस्तके किंवा मित्र-मैत्रिणीकडून पुस्तके आदल्या-बदली करून घेत असायचे. जुनी पुस्तके निम्म्या किमतीत  मिळत असल्यामुळे जुनी पुस्तकांना जास्त मागणी असायची. मी तेरावीत असताना कॉलेजच्या पुस्तकांसाठी एक नवीन योजना सुरू केली. अशी योजना मुंबईत प्रचलीत होती. जे कोण कॉलेजची पुस्तके आमच्याकडून घेत होते ते पुस्तक एक वर्षांनी मूळ किंमतीच्या साठ टक्क्यांनी आम्ही परत घ्यायचो. पुस्तके देताना त्या पुस्तकाच्या मागे नियम व अटीचे रबर स्टॅम्प मारून द्यायचो. दोनच नियम महत्वाचे एक पान फाटलेली नसावी,दुसरं अभ्यासक्रम बदलेला नसावा. बरेच लोक त्याबदल्यात पुढच्या वर्षाची पुस्तके घ्यायचे. ज्यांना पुस्तके नकोत त्यांना पुस्तकांच्या मूळ किंमतीच्या साठ टक्के रक्कम परत. याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचे पैसे वाचायचे. पुस्तकांचा चांगलाच उपयोग होत होता. या योजनेमुळे बरेचसे विध्यार्थी आमच्याकडे यायला लागले.

   आमचं दुकान थोडंसं आत असलं तरी आमच्याकडे अख्या डोंबिवलीतून लोकं पुस्तकं घ्यायला यायचे. अण्णांचा अनुभव व आमच्या तिन्ही भावंडांची मेहनत, लोकांशी असलेल्या व्यवहार, संबंधांमुळे सर्वांशी चांगली नाती जुळत होत होती.

     मी तेरावीची परीक्षा दिली होती दुपारी दुकानात मी एकटा होतो. दुकानासमोर निळया रंगाची प्रीमियर पद्मिनी कार येऊन उभी राहिली. कार तशी माझ्या परिचयाची, अधून-मधून त्या कार मधून विको कंपनीचे घरातली एक छोटी मुलगी आणि मॅडम आमच्या दुकानात पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर सामान घ्यायला याच गाडीतून यायच्या. पण त्या सकाळच्या वेळी यायच्या. आज एक गृहस्थ त्या गाडीतून उतरले त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं. ते स्वतःगाडी चालवून आले होते. ते आमच्या दुकानात आले आणि मला विचारलं दुकानात अजून कोण आहे का? नाही सध्या मी एकटाच आहे, बोला ना काय हवंय? तुम्ही बाहेरची पुस्तके मागवून देता का? मी हो बोललो. मी हो म्हणताच त्यांनी एक चिट्टी काढली आणि माझ्याकडे दिली. त्यात पुस्तकाचं नाव आणि प्रकाशनच नाव लिहलं होतं. ते बोलले पुस्तक इंग्लंडच आहे तुम्ही मागवून देऊ शकता का? मी बोललो मला दोन तीन दिवस द्या मी कळवतो तुम्हाला. आपल्या घरातले आमच्याकडे खरेदीला येत असतात त्यांच्याकडे निरोप देतो. चालेल बोलून ते निघून गेले. आम्ही कॉलेज व इंग्रजी पुस्तकांची ऑर्डर मुंबईतल्या स्टुडंट एजन्सीकडे द्यायचो. त्यांचं मागच्या महिन्याचं बिल या महिन्याच्या पाच तारीखपर्यंत आम्ही चुकतं करायचो. मी विकोतल्या सरांनी दिलेली चिट्टीतल नाव एका वहीवर लिहून घेतलं चिट्टी एजन्सीकडे पाठवली. तेव्हा आमच्याकडे फोन नव्हता. बाजूला मनसुखलाल हिरजी यांच्याकडे एकच फोन होता. काही अर्जेन्ट असेल तर आम्ही तो नंबर द्यायचो. दुसऱ्याच दिवशी एजन्सी वरून त्या फोनवर मला कॉल आला. त्यांनी विचारलं अण्णा कुठे आहेत? मी बोललो ते गावाला गेलेत सध्या मीच दुकान संभाळतोय. काल जे चिट्टी पाठवली होती ना ते पुस्तक इंग्लंडच आहे त्याची किंमत पाउंड स्टर्लिंगमध्ये आहे अंदाजे सात ते आठ हजार किंमत होईल ट्रान्सपोर्ट वगैरे पकडून चालत असेल तरच आम्ही ते पुस्तक मागवू आणि हां पुस्तक कुठलाही कारणाने परत घेतलं जाणार नाही. ज्यांनी ऑर्डर दिली त्यांना नीट विचारून कळव बोलले. किंमत सात ते आठ हजार ऐकल्यावर मी पण सुन्न झालो.


परत दोन दिवसांनी सर स्वतः दुकानात येऊन पुस्तकाबद्दल चौकशी केली. मी त्या पुस्तकाची किंमत सांगितली पुस्तक ऑर्डर देऊन पंधरा दिवसांनी येईल, ते परत करता येणार नाही चालेल का? ते चालेल बोलले फक्त त्याच लेखकाचे तेच पुस्तक पाहिजे. लगेच त्यांनी पाच हजार रुपये ऍडव्हान्स ही दिले. आता ऑर्डर नक्की झालं होतं. पाच हजार रुपये हातात आले होते महिन्याभरात सुध्दा एवढी रक्कम जमा होत नसायची. आता पुस्तक मागवयाचं होत. मी लगेच एजन्सीला त्या पुस्तकाची ऑर्डर दिली. ऍडव्हान्स पाच हजार पाठवून दिले. पुस्तकाची ऑर्डर देऊन पंधरा दिवस होऊन गेले अजून पुस्तक आलं नव्हतं परत चौकशी केली तर दोन दिवसात येईल असं कळलं. दोन दिवसांनी किशोर ट्रान्स्पोर्टची गाडी दुकानासमोर येऊन उभी राहिली. मला फक्त एक पुस्तक ट्रान्सपोर्टमध्ये येईल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की एजन्सीचा माणूस पुस्तक घेऊन येईल. मी ट्रान्सपोर्टवाल्यांना बोललो की माझं सामान नाहीये. ट्रान्सपोर्टवाल्यांनी बिल दाखवल ते एजन्सीच होतं. ट्रान्सपोर्ट वाल्यांनी ट्रक मधून आंब्याच्या पेटी सारखी एक पेटी काढली आणि दुकानात घेऊन आले. त्यांनी जे दहा रुपये मागितले ते मी देऊन टाकले. पेटी ताब्यात घेतली. ती पेटी थेट इंग्लंड वरून मुंबईला आली होती. मुंबईहून ते पुस्तक पेटीमध्ये ठेवून नीटसर पाठवलं होतं. एवढं किमतीच पुस्तकं मी कधीच बघितलं नव्हतं. अंदाजे पेटी सकट त्याच वजन चार किलो असावं बहुतेक. आता विकोवाले सरांची वाट बघत होतो. सकाळी मॅडम आल्या, त्यांच्या बरोबर निरोप पाठवला.दुसऱ्या दिवशी सर स्वतः आले त्यांनी ती पेटी बघितली पैसे विचारले मी त्यांना सात हजार सातशे पन्नास रुपयांच बिल दिलं. त्यांनी पाच हजार रुपये ऍडव्हान्स दिले होते ते वजा करून उरलेले दोन हजार सातशे पन्नास रुपये देऊन पुस्तकाची पेटी ताब्यात घेतली ते बोलले मी घरी जाऊन पेटी उघडून बघतो काही असेल तर निरोप देतो. पैसे हातात आले होते पण निरोप आल्याशिवाय चैन पडत नव्हतं. दोन दिवसांनी पुस्तक बरोबर असल्याचा निरोप आला. पुस्तकबरोबर नसतं तर खूप नुकसाव न झालं असतं. माझ्या जीवात जीव आला. माझ्या पुस्तकातल्या व्यवहारातील सर्वात जास्त किमतीच पुस्तक मी विकलं होतं.....