'परिवर्तन - एक चुनौती' असा एक हिंदी कार्यक्रम मुंबई दुरदर्शनवर ८० च्या दशकात होत असे. परिवर्तन हा सृष्टीचा न बदलणारा नियम आपण जितक्या सहजपणे स्विकारू तितका तो आपल्याला चुनौती किंवा आव्हानात्मक न वाटता आपल्या प्रगतीस पुरकच ठरतो. परिवर्तनात संधी शोधणे किंवा संधीतून परिवर्तन घडवून आणणे हे कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असते. संधी कोणत्या स्वरूपात कधी येईल सांगता येत नाही. लेखक वि. स. खांडेकर म्हणतात, "तीने माझा दरवाजा वाजवला परंतु मी माझ्याच विश्वात रमून गेलो होतो. मी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा ती निघून गेली होती. कोण होती ती? संधी"....संधी जेव्हा आपल्या जीवनाच्या दरवाजावर दस्तक देते तेव्हा ती परिवर्तनाची म्हणजेच प्रगतीची खूण आहे हे ओळखून त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नांचे सर्व दरवाजे उघडे केले पाहिजेत. परिवर्तनाची चाहूल आता मला सुद्धा लागली होती कारण संधी आता माझ्या वाचनालयाच्या दरवाजावर सुद्धा टकटक करीत होती.
नागेंद्र आणि साईनाथ पूर्ण तयारीनिशी माझ्याकडे आले होते. त्यांना माहीत होते मला संपूर्ण माहिती दिल्याशिवाय मी त्यांचे ऐकणार नाही. माझ्याकडे वाचनालयाच्या व्यवसायाचा एकवीस वर्षाचा अनुभव होता. या कालावधीत फ्रेंड्स लायब्ररीचे नाव डोंबिवलीच्या कानाकोपऱ्यात नेण्यात मी यशस्वी झालो होतो. परंतु थांबणे हे माझ्या स्वभावातच नव्हते. यशाच्या याच वळणावर न थांबता मी वाचनालयाच्या व्यवसायामध्येच अजून प्रगतीच्या संधी शोधत होतो. मला काय करायची इच्छा आहे तसेच माझ्या भावी योजनांचे सर्वसाधारण स्वरूप कसे आहे हे सर्व नागेंद्रने साईनाथ यांना अगोदरच सांगितले होते. मला एखादी गोष्ट पटवून देणे हे खूप कठीण काम होते. साईनाथ कोणतीही गोष्ट पटवून देण्यात तरबेज होते. त्यांनी व्यवयाय व्यवस्थापनातील उच्चपदवी (M.B.A.) घेतली होती. ते ई-बे (e-Bay) कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यांनीच नागेंद्रला त्यांच्या कंपनीत सामील (जॉईन) करून घेतले होते. आम्ही तिघांनी टिळकनगरमधील आपल्या वाचनालयाच्या शैक्षणिक विभागात बसून चर्चेला सुरुवात केली. ही चर्चा फ्रेंड्स लायब्ररीच्या भावी वाटचालीसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार होती.
सन २००७ मधील ऑक्टोबर महिना होता. साईनाथ व नागेंद्र ज्या ई-बे (e-Bay) कंपनीत काम करीत होते ती कंपनी मूळची अमेरिकेतील होती. ही अमेरिकन कंपनी स्वतःच्या संकेतस्थळावरून (वेबसाईटवरून) अनेक प्रकारच्या वस्तुंची बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये विक्री करीत होती. त्यांनी निरनिराळ्या वस्तूंचे विवरण आपल्या संकेतस्थळावर (साईटवर) दिलेले होते. एखादी वस्तू आवडली की संकेतस्थळावरूनच मागणी (ऑर्डर) नोंदवायची. मग काही दिवसांतच ती वस्तू घरपोच मिळायची. वस्तू हातात मिळाली की पैसे द्यायचे. त्याला 'कॅश ऑन डिलिव्हरी' असं म्हटले जाते. वस्तु खरेदी-विक्रीचा हा प्रकार त्याकाळी ग्राहकांसाठी नवीनच होता. नागेंद्र आणि साईनाथ यांनी आधी मला त्यांच्या कंपनीबद्दल सविस्तर माहिती दिली. खरेतर या आधी नागेंद्र कधी कधी त्यांच्या कंपनीबद्दल मला सांगत असे. त्यांच्या कंपनीचे स्वरूप काय आहे?, ते कश्या पद्धतीने वस्तू विकतात?, वस्तूंची किंमत बाजारभावापेक्षा कमी असते, घर बसल्या वस्तू मागविता येतात वगैरे माहिती मला अगोदरच नागेंद्रकडून मिळाली होती. त्यामुळे मला थोडीफार कल्पना होतीच. ते दोघे जे काही सांगत होते ते सर्व मी शांतपणे ऐकून घेत होतो. काहीतरी नवीन ऐकायला, बघायला व शिकायला मिळत असेल तर अशी कोणतीही नवीन गोष्ट जाणुन घेण्यात फायदा असतो याची मला जाणीव होती.
साईनाथ आणि नागेंद्र |
आम्ही घरी कोकणी बोलायचो जेव्हा बाहेर भेटायचो तेव्हा शक्यतो हिंदीमधून बोलायचो. नागेंद्र मला मामाजी म्हणायचा त्यामुळे साईनाथ सुध्दा मला मामाजी नावानेच संबोधू लागले. "मामाजी आपकी आगे की क्या योजना (प्लॅन) है?" असं साईनाथने विचारले. मी नागेंद्रला जे सांगितले होते तेच त्यांना सुद्धा सांगितले. महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरात फ्रेंड्स लायब्ररीची शाखा उघडायचे माझे स्वप्न आहे हे साईनाथला समजल्यावर त्या अनुषंगाने मग त्यांनी मला एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. जागा कशी शोधणार?, कोण शोधणार?, भांडवल किती लागेल?, तिथल्या वाचनालयाच्या शाखा कोण सांभाळणार?, पुस्तके कोण हाताळणार?, पैशांचे व्यवहार कसे सांभाळणार? अश्या अनेक प्रश्नांचा भडीमार त्यांनी माझ्यावर केला. काही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे होती. परंतु काही गोष्टींवर मी काहीच विचार केला नव्हता. तिथे मी निरुत्तर झालो होतो. ज्या गोष्टींचा मी कधीच विचार केला नव्हता त्यासंदर्भातील वेगवेगळे प्रश्न त्याक्षणी माझ्या मनात येऊ लागले. डोंबिवलीत प्रत्येक शाखेत मी स्वतः जातीने लक्ष घालत होतो त्यामुळे सर्व शाखा माझ्या मनाप्रमाणे सुरुळीत चालल्या होत्या. एखाद्या शाखेत काही समस्या निर्माण झालीच तर निर्णय घ्यायला मी स्वतः हजर असायचो. साईनाथ व नागेंद्र यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जर माझ्याकडे नसतील तर माझे स्वप्न पुर्ण कसे होणार? यावर मी अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. माझा २१ वर्षाचा वाचनालय क्षेत्रातील अनुभव परिपूर्ण व व्यापक नाही याची परत एकदा या तरूण अननुभवी मुलांनी मला जाणीव करून दिली होती. हे परिवर्तन माझ्यासाठी चुनौती नसून प्रगती पुरकच होते कारण मी ते सहजपणे स्विकारले होते.
साईनाथ हे जरी मला प्रश्न विचारत असले तरी त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा आराखडा त्यांच्याकडे अगोदरच तयार होता. आज ई-बे (e-Bay) सारखी कंपनी आपल्या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) विविध वस्तू उपलब्ध करून ग्राहकांना घरपोच सेवा देत आहे तीच पद्धत जर आपण वाचनालयासाठी राबवली तर महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई , नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर या सारख्या मोठमोठ्या शहरातील वाचकांपर्यंत आपण सहजपणे पोहचू शकू असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी मांडलेल्या प्रस्ताववजा दाव्यावर विचार करणे मला भाग पडले होते. मला ती कल्पना आवडली व पटली सुद्धा होती. काळाची गरज ओळखून भविष्यकालीन विचार करून त्यांनी तो प्रस्ताव माझ्यासमोर मांडला होता. काळ बदलतच असतो परंतु बदलत्या काळानुरूप जर आपण व्यवसायात बदल केले नाहीत तर त्या व्यवसायात पुढे जाणे शक्य नसते. काळानुसार बदल न केल्याने अनेक उद्योगधंदे माझ्या डोळ्यादेखत काळाच्या अंधाररूपी उदरात गुडूप झाले होते. मला वाचनालयाच्या व्यवसायात खूप पुढे जायचे होते. त्यामुळे बदल हा मला हवाच होता. परिवर्तनाची संधी साधून किंवा संधीतून परिवर्तन घडवण्याची माझी तयारी होती. साईनाथने जे काही सादरीकरण केले होते ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर माझ्या डोळ्यासमोर वेगवेगळी कल्पना चक्रे फिरू लागली. मनात काही प्रश्न सुद्धा उभे राहिले. इथपर्यंत सर्वकाही शांतपणे ऐकून घेतल्यावर मग मी दोघांबरोबर पुढील मुद्द्यांवर चर्चा करायला सुरुवात केली.
आपण आपल्या वाचनालयाचे संकेतस्थळ (वेबसाईट) सुरू करून घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली तर फ्रेंड्स लायब्ररीची पुस्तके कोणत्याही शहरातील वाचकांपर्यत आपण पोहोचवू शकत होतो. अनेक वाचक असे असतात की ज्यांच्या घराच्या जवळपास उत्तम वाचनालय नसते. अनेक वाचकांच्या घराजवळ वाचनालय असते परंतु नवीन पुस्तके उपलब्ध नसतात. जे वाचक आजारी आहेत घराबाहेर पडू शकत नाहीत किंवा वयानुसार बाहेर पडणे त्यांना गैरसोईचे होते अश्या असंख्य वाचकांना संकेतस्थळवरून मागणी नोंदविल्यावर मिळणारी घरपोच पुस्तक सेवा लाभदायक होणार होती. माझ्या डोक्यात यादृष्टीने विचारचक्र सुरू झाले. किती वाचक या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात याचा मी विचार करीत होतो. मी विचारमग्न झाल्याचे पाहून साईनाथ आणि नागेंद्र दोघेही खुश झाले. 'अब आया है उंट पहाड के नीचे' अशीच त्यांची भावना असावी. परंतु आपण वाचकांसाठी एक चांगला उपक्रम साकारू पहातोय याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसत होते. संकेतस्थळ (वेबसाईट) कोण बनवणार? त्याला खर्च किती येईल? या मुद्यांवर त्यानंतर चर्चा झाली. संकेतस्थळाच्या दैनंदिन कारभारासाठी कार्यालयाची (ऑफिसची) जागा सुदैवाने तयारच होती. रामनगर शाखेतील आतील रिकामी खोली त्यासाठी उपलब्ध होती. मग त्या जागेत संकेतस्थळाचे कार्यालय (ऑफिस) सुरू करायचे निश्चित झाले. त्या कार्यकक्षेसाठी (ऑफिससाठी) लागणारे कुशल कर्मचारी शोधण्याची जवाबदारी नागेंद्रने घेतली. कार्यालयातील प्रत्येक जण कोणती जवाबदारी घेणार यावर सुद्धा चर्चा झाली. मग घरपोच पुस्तक सेवेचा विषय निघाला. कागदावर सर्व ठीकठाक दिसत असले तरी हा विषय थोडा गुंतागुंतीचा होता. आपण जी वर्गणी आकारणार आहोत त्यात घरपोच पुस्तके देणे आपल्याला परवडेल का? हा मोठा यक्षप्रश्न होता. त्याचबरोबर चाळीस पन्नास वर्षावरील जेष्ठ नागरिक वाचक असल्यास त्यांना संकेतस्थळ हाताळणे व पुस्तकांची मागणी नोंदवणे कितपत जमेल अथवा सोईचे होईल? तसेच यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहे का? असा विचार मनात आला व मी तो दोघांसमोर मांडला. माझ्या दृष्टिकोनातून सभासद खूप महत्वाचे होते. सभासदांना हवी ती पुस्तके वेळेवर घरपोच मिळणे यामध्ये त्या व्यवसायाचा प्राण होता. आम्ही तिघे जवळपास तीन तास या मुद्यावर काथ्याकूट करीत होतो. दोन वाजून गेले होते. पोटातील भूक सुमनच्या घरपोच सेवेची आठवण करून देत होती. आतापर्यंत जवळ जवळ सर्व मुद्यांवर उहापोह झाला होता परंतु घरपोच पुस्तक सेवा देण्यावरून घोडं अडले होते. वाहतुकीची सर्व किफायतशीर वाहने उपलब्ध असलेल्या मुंबईसारख्या शहरातून घरपोच पुस्तक सेवेला प्रारंभ केला तरी सुद्धा पुस्तकं घरी पोहचविण्याचा खर्च परवडणारा नव्हता. आपल्याला यावर अजून विचार करावा लागेल असे मी त्या दोघांना सांगितले. काही वेळाने ते दोघे निघून गेले. काही दिवस मी या प्रश्नांवर चिंतन मनन करीत होतो. नंतर आपल्याला ही योजना अंमलात आणणे जमेल की नाही अशी द्विधा मनस्थिती झाली. पुढे दैनंदिन कामाच्या व्यापात हळू हळू त्या विषयाचे मला विस्मरण झाले. परंतु 'ती' दरवाजा अजूनही वाजवत होती आणि मी मात्र माझ्याच विश्वात रमून गेलो होतो.....
संधीचा सोनं करण्यासाठी प्रयत्नांची जोड... अशा विचारांनीच तुमची प्रगती झाली आहे.हे परिवर्तन तुम्हाला खूप मोठं करणार.
ReplyDeleteमागच्या १२८ क्रमांकाच्या स्तंभलेखनावर (ब्लॉगवर) कोणाचीच प्रतिक्रिया नाही. नेहमीच्या वाचकांची सुद्धा प्रतिक्रिया नाही याचे आश्चर्य वाटते.
Delete