"ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटींत तृष्टता मोठी…" या भावगीतात उल्लेखिलेल्या ऋणानुबंधाच्या गाठी कधी, कुठे, कश्या पडतात हे समजणे कठीणच. ऋणानुबंध धन (घेणे) आणि ऋण (देणे) असे दोन्ही बाजूने असतात. विद्युतमंडळात धन व ऋण आयनांचे वर्तुळ पुर्ण झाले की दिवा प्रदीप्त होतो. त्याप्रमाणे मानवी जीवनात धन व ऋण बंधांचे वर्तुळ पुर्ण झाले की कर्मविपाक होऊन ऋणानुबंधाची तृष्टता होते. जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधाची तृष्टता कधी, कशी, कोणामुळे होईल सांगता येत नाही. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही याच ऋणानुबंधाची तृष्टता करण्यासाठीच आलेली असते. आपले नातेवाईक, परिचित मंडळी ही सर्व याच ऋणानुबंधाच्या धाग्याने आपल्याशी जोडलेली असतात. इतर परिचित व्यक्तींप्रमाणेच माझ्या नात्यातील व्यक्ती सुद्धा कर्मविपाकाद्वारे ऋणानुबंधाची तृष्टता करण्यासाठीच माझ्या आयुष्यात येत असल्याचा अनुभव माझ्यासाठी नक्कीच आनंददायी व समाधान देणारा होता.
वाचनालयाच्या व्यवसायात आतापर्यंत बऱ्याच नातेवाईकांनी, मित्रांनी मला मदत केली होती. परंतु सर्वात जास्त मदत मला नागेंद्रने केली होती. फ्रेंड्स लायब्ररीच्या यशामागे प्रेमा अक्काचा मुलगा म्हणजे माझा भाचा नागेंद्र भट याचे खूप मोठे योगदान होते. माझ्याप्रमाणेच नागेंद्र सुद्धा लहानपणी खूप मस्ती करायचा. तो कोणाचे ऐकत नसे. दिवसभर घराबाहेर असायचा. क्रिकेट हा त्याचा आवडता खेळ. एकदा क्रिकेट खेळायला गेला की खाणं-पिणे, देहभान सर्व विसरून जायचा. प्रेमाक्काने अनेकवेळा समजावून सांगितले. परंतु स्वारी कायम खेळण्यातच मग्न असायची. सहाजिकच त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असे. आपल्या मुलाचे पुढे कसे होईल ही चिंता प्रेमाक्काला सारखी सतावत होती. दहावी नंतर नागेंद्र महाविद्यालयात (कॉलेजला) जायला लागल्यावर तो माझ्या सहवासात अधिक येऊ लागला. त्याचे वडील म्हणजे माझे मेहुणे स्वभावाने सरळ आणि कडक शिस्तीचे. ते कॅनरा बँकेत दैनिक बचत योजनेच्या संकलनाचे (पिग्मी कलेक्शनचे) काम करायचे. त्याचबरोबर त्यांचा छायाचित्रणाचा (फोटोग्राफीचा) व्यवसाय सुद्धा होता. महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला नागेंद्र माझ्या सहवासात अधिक येऊ लागल्याने त्याचे बाबा मला हक्काने व आग्रहाने सांगायचे की ''नागेंद्रचे शिक्षण पुर्ण करून देण्याची जवाबदारी आता तुझी.'' नागेंद्रने पुढे चांगली नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. त्याच्या मस्तीखोर स्वभावाने प्रेमाक्का हैराण झाली होती. परंतु महाविद्यालयात जायला लागल्यापासून नागेंद्र नीट अभ्यास करू लागला. आभ्यासात चांगले गुण सुद्धा मिळवू लागला. मलाही तो वाचनालयात मदत करीत असे.
फ्रेंड्स लायब्ररीच्या गांधीनगर शाखेमध्ये कधी एखाद्या दिवशी कर्मचारी सुट्टीवर असला की नागेंद्र ते वाचनालय उघडून सांभाळायचा. कधी कधी विद्यालयाच्या सुट्टीच्या दिवशी तो एकटाच दिवसभर वाचनालय उघडून बसायचा. त्याला पुस्तकांबद्दल थोडीफार जुजबी माहिती होती. परंतु संगणकाच्या आज्ञावलीचे (सॉफ्टवेअरची) त्याला उत्कृष्ट व परिपूर्ण ज्ञान होते. त्यामुळे सभासदांनी आणलेल्या व नेलेल्या पुस्तकांची नोंद तो संगणकामध्ये सहजपणे करायचा. एकूणच त्याची आवड लक्षात घेऊन मी कोणत्याही शाखेचा एखादा कर्मचारी रजेवर गेला की नागेंद्रला बोलावून घ्यायचो. वाचनालयात काही बदल करायचे असतील तर तो आधी मला विचारायचा. त्याच्या म्हणण्यानुसार मी वाचनालयात काही बदल केले सुद्धा होते. आमचे भलेही मामा भाच्याचे नातं असले व मी वयाने मोठा जरी असलो तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा होतो. एकमेकांना खूप सांभाळून घ्यायचो. आशिष व फेनील हे नागेंद्रचे आणखी दोन मित्र नेहमी त्याच्यासोबत असायचे. या दोघांनी सुद्धा मला व्यवसायात खूप मदत केली होती.
सन २००६ च्या एप्रिल महिन्यात नागेंद्र वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाची (टी.वाय.बी.कॉमची) परीक्षा देत होता. मी ज्यांचा विद्यार्थी होतो त्याच उमेश पै सरांच्या गणेश क्लासची शिकवणी नागेंद्रने सुद्धा लावली होती. शेवटचे वर्ष असल्याने चांगले गुण मिळवण्यासाठी त्याने मन लावून अभ्यास केला होता. परिक्षेच्या दरम्यान सुरूवातीला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका (पेपर) सोप्या गेल्या होत्या. परंतु ज्यादिवशी नागेंद्र अर्थशास्त्राची परिक्षा (पेपर) देणार होता त्याच्या एकदिवस आधी मला प्रेमाक्काचा दूरध्वनी आला. "उद्या नागेंद्रची अर्थशास्त्राची परिक्षा आहे आणि त्याचा काहीच अभ्यास होत नाहीए असं तो म्हणत आहे. त्याला अर्थशास्त्राचा अभ्यास केलेले काहीच आठवत नाहीए...आता काय करायचे?" मी त्यावेळी वाचनालयात होतो. "थांब मी पाच मिनिटांत घरी पोहचतोय" असं प्रेमाक्काला सांगितले. सर्व कामे बाजूला टाकली. गाडी घेतली आणि पाच मिनिटांत गोग्रासवाडी येथील आक्काच्या घरी पोहचलो. नागेंद्र पलंगावर उदास बसला होता. घरात प्रवेश करताच मी आधी त्याची घट्ट गळाभेट घेतली. "बोल माझ्या वाघ्या काय झालं तुला?" असा मरगळ झटकून टाकणारा, प्रोत्साहीत करणारा प्रश्न पाठीत थाप मारीत त्याला विचारला. "मला काहीच आठवत नाही. अभ्यास केलेलं सर्व विसरलो आहे. उद्याची प्रश्नपत्रिका कशी सोडवू तेच समजत नाही", असं काळजीयुक्त स्वरात नागेंद्र म्हणाला. मी अधिक न बोलता त्याला म्हणालो, "चल आपण बाहेर फिरून येऊ या.'' त्याला कसेबसे घरातून बाहेर काढले आणि गाडीत बसवून वाचनालयात घेऊन आलो. त्यानंतर जवळपास एक तास आम्ही हिंडलो फिरलो. त्या एका तासात अभ्यासाचा विषय काढलाच नाही. आम्ही दोघांनी इतर विषयांवर भरपूर अवांतर गप्पा मारल्या. त्यालाही खूप बरं वाटले. त्याचे मन प्रसन्न व मोकळे झाल्यासारखे दिसत होते. मग मी त्याला परत घरी नेऊन सोडले. प्रेमक्काला सूचित केले की, ''त्याच्याशी अभ्यासाचे काहीच बोलू नकोस." मग मी काहीच न बोलता हळूच तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी दूरध्वनीद्वारे चौकशी केली असता कळले की घरी आल्यावर नागेंद्रने उत्साहाने आभ्यास करून परीक्षेची चांगली तयारी केली. तो परिक्षेचा शेवटचा विषय होता. त्यानंतर परिक्षासत्र संपले. वाणिज्य शाखेच्या (बि.कॉम.च्या) शेवटच्या वर्षात चांगले गुण मिळवून नागेंद्र उत्तीर्ण झाला होता. त्याच्या बाबांची माझ्याकडून असलेली अपेक्षा पुर्ण झाली होती. कर्मविपाक होऊन ऋणानुबंधाची तृष्टता माझ्या मनाला समाधान व खूप आनंद देऊन गेली.
संतोषच्या आजारपणाबद्दल जेव्हा मला समजले तेव्हा मी नागेंद्रची मदत घेतली होती. महाजालावर (इंटरनेटवर) मुलभूत पेशींच्या (स्टेम सेल्सच्या) उपचाराच्या माहितीचा शोध घेण्यापासून ते प्रत्यक्ष परदेशात जाऊन औषधोपचार करून परत येईपर्यंतच्या सर्व प्रवासात नागेंद्रने मला लाखमोलाची मदत केली होती. परदेशातील कॅसा दि कॅम्पो विश्रामधामवरून (हॉटेलवरून) जेव्हा आम्ही परत यायला निघालो तेव्हा तिकडच्या कर्मचारीवर्गाने देण्याघेण्याचा आर्थिक व्यवहार पुर्ण करताना चुकून दोन वेळा माझे उधारपत्र (क्रेडिट कार्ड) वापरले होते. जेव्हा आम्ही डोंबिवलीला पोहचलो तेव्हा काही दिवसांनी उधारपत्राचे (क्रेडिट कार्डचे) देयक (बिल) हाती आले. तेव्हा समजले की दोन वेळा पैसे भरले गेले आहेत. कॅसा दि कॅम्पोच्या त्या परदेशातील कर्मचारीवर्गाशी मी दोन वेळा संपर्क साधला होता परंतु त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मला वाटले पैसे गेल्यात जमा आहेत. या विषयावर मी नागेंद्रशी बोललो. त्याने त्या परदेशी कर्मचारीवर्गाला ई-मेल करून त्यांना त्यांची चूक पटवून देणारी सविस्तर व सुस्पष्ट माहिती पुराव्यासहीत दिली. दोन वेळा पैसे भरल्याचे सप्रमाण सिद्ध केले. तेव्हा काही दिवसांत अधिक भरलेली रक्कम माझ्या खात्यात त्या लोकांनी जमा केली. अशी अनेक वेळा नागेंद्रची मला मदत झाली होती. धन व ऋण बंधातील हे कोणत्या प्रकारचे ऋणानुंबध होते ते नियतीलाच ठाऊक.
वाणिज्य शाखेची (बी.कॉम.ची) पदवी मिळाल्यानंतर नागेंद्र ई-बे (e-Bay) या कंपनीत नोकरीला लागला. नोकरीला लागल्यावर त्याच्या माझ्या गाठीभेटी कमी झाल्या. आम्ही फक्त रविवारी भेटायचो. ई-बे (e-Bay) ही एक मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी होती. त्या कंपनीत नागेंद्र महेनत व आपल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर अल्पावधीतच चांगल्या पदावर पोहचला. अनेक कर्मचारी त्याच्या हाताखाली काम करीत होते. कर्मचाऱ्यांच्या एका संपुर्ण गटाला (टीमला) तो सांभाळत होता. जेव्हा तो मला भेटत असे तेव्हा मी त्याला सांगायचो की ''आता डोंबिवलीत आपल्या वाचनालयाच्या चार शाखा झाल्या आहेत. आता डोंबिवलीच्या बाहेर व्यवसायाची सुरुवात झाली पाहिजे. पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर अश्या मोठ्या शहरात पै फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखा असाव्यात अशी माझी इच्छा आहे''. मग नागेंद्रने या विषयावर साईनाथ पै बरोबर चर्चा केली. नागेंद्रला ई-बे (e-Bay) कंपनीत साईनाथ पै याने नोकरीला लावले होते. त्या दोघांमध्ये काय बोलणे झाले कोणास ठाऊक एके दिवशी सकाळी साईनाथ पै आणि नागेंद्र भट दोघेही त्यांच्या हातातील संगणकासहीत (लॅपटॉपसह) माझ्या वाचनालयात आले. मी त्यांना शैक्षणिक विभागात घेऊन गेलो. तिथे सभासदांची जास्त वर्दळ नसल्याने निवांतपणे बोलता येणार होते. मला वाटले होते की बाजारातील एखाद्या उत्पादनासंबंधित नवीन योजना (स्कीम) घेऊन ते आले असतील. पण त्यांनी जेव्हा त्यांचा संगणक (लॅपटॉप) उघडला आणि बोलायला सुरुवात केली तेव्हा मला समजले की त्यांना वाचनालयासंबंधित विषयांवर माझ्याशी चर्चा करायची आहे. वाचनालय हा मी निवडलेला व्यवसाय होता. गेले २१ वर्षे मी वाचनालय चालवीत होतो. ते दोघेही वयाने माझ्यापेक्षा लहान असले तरी ते जे काही सांगतील ते ऐकून घ्यायची तयारी मी दर्शवली. जपान लाईफ कंपनीचा प्रस्ताव सुद्धा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींनी मला दिला होता. त्यावेळी हे वयाने लहान आहेत मला व्यवयासातील अधिक कळते असा माझा समज होता. परंतु पुढे तो चुकीचा असल्याचा मला अनुभव आला होता. कर्मविपाक होऊन ऋणानुबंधाची तृष्टता असा सुद्धा आनंद व शहाणपण देऊन गेली होती. त्यामुळे 'दुध का जला छाँस भी फुँक के पिता है' तसा मी आता अनुभवाने शहाणा होऊन साईनाथ व नागेंद्र काय सांगतात याकडे लक्ष देऊन ऐकू लागलो….
Nice
ReplyDelete