'अकल बडी की भैस बडी' असा प्रश्न लहान मुलांना नेहमी गोंधळात टाकतो. मानवी मेंदू किलो दिड किलो वजनाचा असतो तर जिभ फक्त ५० ग्रॅम वजनाची. जीभ वाट्टेल तशी वापरली तर मेंदूचे वजन खरोखरच किलो दिडकिलो असल्याचे सिद्ध होते. परंतु तिच जीभ योग्य प्रकारे वापरली तर चहावाला सुद्धा मेंदूचे खरे वजन कश्यात मोजतात ते दाखवून देतो. तेव्हा मानवी व्यवहारात जसे खरे वजन वजनावर किंवा आकारावर मोजले जात नसते तसे पुस्तकाचे वजन त्यातील पानांची संख्या व आकारावर ठरत नसते. पुस्तकातील दर्जेदार ज्ञान हेच त्या पुस्तकाचे खरे वजन असते. अशी दर्जेदार पुस्तके कधी कधी अल्प किंमतीत मिळण्याचे योग येत असतात. अश्या संधीचे सोनं करणे आपल्या निर्णयस्वातंत्र्यावर अवलंबून असते. परिणाम आपला विषय नसला तरी निर्णय सकारात्मक असेल तर इच्छा तिथे मार्ग नियती करून देते व परिणामाचे फळ सुद्धा आपल्या मनासारखे देते. मी घेतलेल्या काही सकारात्मक निर्णयामुळे मला तसाच अनुभव येत होता.
रामनगरची शाखा सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी वाचनालयात चोरी झाली होती. बरेच नुकसान झाले होते. 'तुम्ही ताळा लावला नसेल' असा आरोप करून पोलीसांनी दिलेल्या मनःस्तापाने त्यात अधिकच भर पडल्याने खूप वाईट वाटले होते. गेल्या २१ वर्षाच्या कालावधीत आपल्या कोणत्याही शाखेत चोरी झाली नव्हती. आम्ही वाचनालयाच्या दरवाजाला (शटरला) एकच ताळा लावायचो. रामनगर शाखेत घडणारी चोरीची घटना ही प्रथमच होत होती त्यामुळे जास्त विचलित न होता मी माझी दैनंदिन कर्तव्यकर्मे पुन्हा करू लागलो. रामनगर येथील नवीन वाचनालयाची जागा आपल्या टिळकनगरच्या वाचनालयापेक्षा खूप मोठी होती. तिथे दोन खोल्या होत्या. बाहेरची खोली मोठी होती व आतली खोली बाहेरच्या खोलीपेक्षा किंचित लहान होती. मी सुरुवातीला फक्त बाहेरच्या खोलीमध्ये लाकडीकाम (फर्निचर) करवून घेतले होते. कारण पैश्यांची कमतरता तर होतीच त्याचबरोबर आतील खोली सुद्धा भरून जाईल एवढी पुस्तक संख्या माझ्याकडे उपलब्ध नव्हती. प्रत्येक शाखांमध्ये सुरुवातीला मर्यादित संख्येने पुस्तकं ठेवायचो. जसजशी सभासद संख्या वाढत जायची तसतशी पुस्तकांची संख्या वाढवत न्यायचो. रामनगरच्या वाचनालयाची जागा खूपच मोठी होती. आतील खोलीचा कसा वापर करता येईल यावर माझे चिंतन चालूच होते.
सन १९८६ मध्ये जेव्हा टिळकनगरमध्ये फ्रेंड्स लायब्ररीची स्थापना झाली तेव्हा डोंबिवलीमध्ये अनेक वाचनालये होती. त्यातील छोटी वाचनालये कालौघात बंद पडत चालली होती. परंतु मी मात्र या उलट विविध ठिकाणी वाचनालयाच्या नवीन शाखा सुरू करीत होतो व हे आता सर्वांना माहीत झाले होते. अनेक ग्रंथालय व्यवसायिक मला भेटण्यासाठी येत असत. त्यातील काहींना वाचनालय बंद न करीता चालूच ठेवण्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन मी करीत असे. परंतु काही व्यवसायिकांनी आधीच ठरवून टाकले होते की त्यांना वाचनालय चालवता येणार नाही. परिणामतः त्यांना वाचनालय चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शन करून सुद्धा ती मंडळी वाचनालय बंदच करण्यावर ठाम रहात होती. वाचनालय बंद करीत असल्याने शिल्लक राहिलेली पुस्तके त्यांना विकायची होती. डोंबिवलीतील बर्याच वाचनालयातील पुस्तके मी विकत घेतली होती. त्यामुळे डझनभर वाचनालयाची पुस्तके माझ्याकडे जमा झालेली होती. या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने कथा, कादंबरी व ललित साहित्यविषयक पुस्तकांची संख्या जास्त होती. त्या काळात सदर पुस्तकांना खूप मागणी सुद्धा होती.
डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकाजवळील केळकर मार्गावर विकास वाचनालय नावाचे एक नावाजलेले वाचनालय होते. ते वाचनालय कै. श्री. श्रीकांत टोळ चालवीत होते. ते महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे पत्रकार होते. श्री. टोळ काकांचे वाचन अफाट होते. ते वाचकांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तक निवडून द्यायचे. त्यांच्याकडे वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच तत्वज्ञानविषयक पुस्तकांचा खूप मोठा साठा आहे असं मी ऐकले होते. डोंबिवलीतील बरेचसे नामवंत लोकं त्यांच्या वाचनालयाचे सभासद होते. श्री. टोळ काकांना रस्त्यावरून जाता येताना मी बर्याचवेळा पाहीले होते. परंतु त्यांची माझी कधी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्याशी कधी संवाद साधण्याचा योग आला नाही. त्यांचे वाचनालय वाचकांमध्ये सर्वश्रुत होते. माझ्याकडे येणारे काही वाचक विकास वाचनालयाचे सुद्धा सभासद होते. विकास वाचनालयात दर्जेदार पुस्तके उपलब्ध असतात असं ही वाचक मंडळी मला नेहमी सांगत असत. मग मी सुद्धा तश्या प्रकारची पुस्तके जमवण्याच्या मागे लागायचो.
श्री. टोळ काकांच्या पश्चात विकास वाचनालय चालविणारे वारसदार कोणी नव्हते. त्यामुळे ते वाचनालय बंद झाले. त्या वाचनालयातील पुस्तके विकणे आहे अशी बातमी माझ्या कानावर आली. परंतु श्री. टोळ काका आता हयात नसल्याने त्यासाठी कोणाला भेटायचे हे मला माहित नव्हते. त्यामुळे माझ्या हालचालींना मर्यादा आल्या. खरेतर मला पुस्तकांची गरज होती. जर विकास वाचनालयातील पुस्तके मिळाली तर आपल्या वाचनालयातील दर्जेदार पुस्तकांची संख्या वाढणारच होती. मी आतापर्यंत ज्या वाचनालयाची पुस्तके विकत घेतली ती पुस्तकं निवडून न घेता सरसकट घेतली होती. त्यामुळे विक्रेत्या व्यवसायिकांकडे एकही पुस्तक शिल्लक राहत नसे. ज्याचा फायदा मला सुद्धा व्यवहार करताना मिळे व जास्तकरून एका पुस्तकामागे पाच रूपये ते दहा रुपये असा भाव आधीच ठरवून घेता येत असे. आतापर्यंत सर्वांना रोख रक्कम देवून त्यांची पुस्तकं ताब्यात घेतली होती.
विकास वाचनालयाची पुस्तके विकणे असून त्याबाबतचा व्यवहार श्री. टोळ काकांचे बंधू बघतात असे मला मित्रांकडून समजले. मी त्यांना भेटायचे ठरवले. मला ती दर्जेदार पुस्तके हवी होती. शेवटी माझा आणि त्यांचा संपर्क झाला. आपल्या टिळकनगर वाचनालयाच्या थोडे पुढे गेले की कर्हाडे ब्राह्मण समाज संस्थेचे कार्यालय आहे. तिथे जवळच ते राहत होते. मी त्यांच्या घरी गेलो. ते मला ओळखत होते. विकास वाचनालयाची सर्व पुस्तके त्यांनी तळेगावला रहाणार्या त्यांच्या दुसर्या बंधूंकडे ठेवली होती. ती पुस्तकं डोंबिवलीत असताना त्यांनी ती विकायचा खूप प्रयत्न केला होता. परंतु ती पुस्तके विकत घेणारे कोणीही त्यांना त्यावेळी भेटले नाही. शेवटी त्यांनी ती सर्व पुस्तके तळेगावला आपल्या भावाच्या बंगल्यावर नेऊन ठेवली. त्यानंतर मी ती पुस्तके विकत घेऊ इच्छितो अशी माहिती त्यांना कोणाकडून तरी मिळाली. श्री. टोळ काका यांचे बंधू त्यासाठी दोन वेळा टिळकनगर शाखेत येवून गेले. पण माझी आणि त्यांची चुकामूक झाली. तिसर्या वेळी जेव्हा ते आले तेव्हा मी वाचनालयात होतो. "किती पुस्तके आहेत? पुस्तकांची आत्ताची अवस्था कशी आहे? पुस्तके कश्यापद्धतीने ठेवली आहेत? जर विकणार असाल तर काय किंमत ठरवली आहे?", असे अनेक प्रश्नं मी त्यांना विचारले. "या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असल्यास तुम्हाला त्यासाठी तळेगावला यावे लागेल. कारण तुम्ही पुस्तके प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी त्याबाबत काही बोलणे योग्य होणार नाही. आपण त्यासाठी तळेगावला येऊ शकता का?" असं त्यांनी मला विचारले. मग एक दिवस निश्चित केला व गाडी करून त्यांच्या सोबत तळेगावला जायचे ठरवले.
सन २००७च्या मे महिन्यातील तो रविवार होता. मे महिन्यात सकाळी संतोषची सर्व कामे उरकून तळेगावला जायला निघालो. श्री. टोळ काकांचे बंधू, त्यांची पत्नी आणि मी असे आम्ही तिघे खाजगी गाडीने निघालो. मे महिना असल्याने डोंबिवलीतून बाहेर पडेपर्यंत खूप उकडत होते. महामार्गावर (हायवेवर) आल्यावर थोडे बरं वाटले. सुमारे अकराच्या दरम्यान आम्ही तळेगावला त्यांच्या बंधूंच्या बंगल्यावर पोहचलो. आम्ही येणार असल्याचे त्यांना माहीत असल्याने त्यांनी नाष्टा तयार ठेवला होता. गरम गरम इडली आणि चटणी तयार होती. परंतु त्या इडली, चटणीला सुमनच्या हाताची चव होती की नाही ते आठवत नाही. कारण मला कधी एकदा पुस्तकं बघतो असं झाले होते. माझे खाण्यामध्ये लक्षच नव्हते. नंतर चहा आला. परंतु मारी बिस्कीटे आली नाहीत. मग नुसता चहा घेवून झाल्यावर त्यांनी मला पुस्तकं ठेवलेल्या खोलीत नेले. पुस्तकांनी भरलेले वीस एक मोठे मोठे खोके (बॉक्स) तिथे ठेवले होते. अंदाजे सात हजार पुस्तके त्यात छान पद्धतीने जपून ठेवलेली होती. त्यातील काही खोके (बॉक्स) मी उघडून पाहिले. ते खोके उघडत असताना नुकतीच उघडलेली रामनगर शाखेतील रिकामी आतील खोली माझ्या डोळ्यासमोर आली. कथा, कादंबरी, ऐतिहासिक, अनुवादित, चरित्रे अश्या निरनिराळ्या विषयांची पुस्तके त्या खोक्यांमध्ये होती. पुस्तकं मला आवडली होती. परंतु आता व्यवहाराचे बोलायचे होते. त्यांच्याकडून पुस्तकांची किंमत कळल्यावर बोलायचे असं मी ठरवले होते, त्यामुळे मी काहीच बोललो नाही. शेवटी त्यांनीच विषय काढत विचारले की, "तुम्ही या पुस्तकांचे किती देऊ शकाल?" मी उत्तर न देता त्यांनाच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही काय ठरवले आहे?" त्यांनी ७ हजार पुस्तकांची ऐंशी हजार इतकी किंमत सांगितली. मी त्यांना साठ हजारपर्यंत मी देऊ शकतो असे सांगितल्यावर ते शेवटी सत्तर हजारावर ती पुस्तके विकायला तयार झाले. चाळीस हजाराचा त्याच दिवसाचा धनादेश (चेक) आणि उरलेल्या तीस हजारांचा पंधरा दिवसानंतरचा धनादेश (चेक) त्यांना दिला. सर्व पुस्तके मालवाहनातून (टेम्पोतून) पाठवण्याचे त्यांनी मान्य केले. दुपारी एकच्या दरम्यान सर्व व्यवहार आटोपून तिथून निघालो.
दोन दिवसांनी ज्ञानगंगा अंगणी आली. दर्जेदार पुस्तकांनी भरलेले पुष्पक विमान (टेम्पो) रामनगरच्या शाखेत आले. आम्ही सर्व ज्ञानखंड (पुस्तके) रामनगर शाखेमध्ये आतील खोलीत ठेवले. त्यातील अनेक पुस्तकं खूप वेळा हाताळल्याने खराब झाली होती. त्या पुस्तकांची पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. रोज थोडी थोडी पुस्तकं काढून व नीट साफसफाई करून त्यांना नवीन अच्छादनं (कव्हर) घालण्याचे काम सुरू केले. ती सर्व पुस्तके ठीकठाक करण्यासाठी आम्हाला जवळपास तीन महिने लागले. कै. श्री. श्रीकांत टोळ काकांच्या विकास वाचनालयाच्या जवळपास सात हजार पुस्तकांमुळे फ्रेंड्स लायब्ररीमध्ये दर्जेदार पुस्तकांची भर पडली होती. पुस्तक संख्या केवळ सात हजाराने वाढली नव्हती तर आपले वाचनालय सात हजारपट ज्ञानसमृद्ध व खर्या अर्थाने वजनदार झाले होते....
पै काका तुम्हाला टोळकाकांचे आशिर्वादच मिळाले आहेत. आम्हा अनेकांना टोळकाका खूप आदरणीय व्यक्ती होते.🙏
ReplyDeleteअनमोल ठेवा जमवल्याची आठवण सुंदर आहे.
ReplyDeleteअनमोल ठेवा शब्द आवडले जॉय...चांगली प्रतिक्रीया....
Delete