Sunday, January 3, 2021

जेव्हा वाचनालयाची रामनगर येथे नविन शाखा सुरू होते.

"देहाची तिजोरी भक्ती त्यात ठेवा...'' असं भक्तीगीत ऐकायला मिळते. परंतु दत्ताची सोन्याची मुर्ती बँकेच्या तिजोरीत (लॉकरमध्ये) ठेवल्याची बातमी मध्यंतरी वाचनात आली. वर्षातून फक्त एकदाच दत्तजयंतीला तिची विधीवत पुजा करून परत ती सोन्याची मुर्ती बँकेच्या तिजोरीत बंद केली जाते. वास्तविक पहाता देहाच्या तिजोरीत भक्तीभाव बंद (लॉक) करून ठेवायचा असतो. सोन्याची मुर्ती नव्हे. सोन्याची मुर्ती चोरांनी चोरली तरी देव चोरून न्यावा अशी त्यांची पुण्याई नसते. भक्तीभाव चोरता येत नाही. चोरीला जाते ते सोनं असते. सोनं, दत्तमुर्ती व भक्तीभाव यातील महत्वाचे काय हे प्रत्येकजण आपआपल्या प्रारब्धानुसार विचार करून ठरवतो. विद्या, ज्ञान हे सुद्धा कोणी चोरून नेऊ शकत नाही. कोणाला विद्याज्ञान वाटण्यासाठी असते असं वाटते तर कोणाला वैयक्तिक उत्कर्षासाठी ते आहे असं वाटते. विद्याज्ञान सर्वांना वाटून वैयक्तिक व सामाजिक उत्कर्ष व्हावा असेच मला नेहमी वाटे. माझे हे ध्येय चोरीला गेले असते तरी मला आनंदच झाला असता.


आपले वाचनालय खाजगी असल्यामुळे आपल्याला कोणतेही सरकारी अनुदान मिळत नव्हते. त्याचबरोबर वाचनालयात किती कर्मचारी नेमायचे? वर्गणी किती आकारायची? किती पुस्तके मागवायची? त्यांच्या किती प्रती ठेवायच्या? वाचनालयाच्या वेळा काय ठेवायच्या? वगैरे बाबतीत सुद्धा माझ्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मीच सर्वेसर्वा असल्याकारणाने प्रत्येक निर्णय मीच घ्यायचो. अर्थात वाचनालयाची भरभराट होऊन सभासदांची संख्या वाढली किंवा कमी झाली असती तरी मीच त्याला जबाबदार राहणार होतो. मला सल्ले देणारी बरीच मंडळी माझ्या अवतीभवती होती. काही जणांनी मला चांगले मार्गदर्शन सुद्धा केले होते, त्यामुळे मी वाचनालयाच्या बाबतीत काही चांगले निर्णय घेऊ शकलो होतो. मी ज्या ज्या वेळी निर्णय घेतले होते त्या त्या वेळी वाचनालयाची चांगलीच भरभराट व प्रगती झाली होती. अर्थात त्याचे श्रेय मी एकट्याने न घेता माझ्याबरोबर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि माझ्या मित्रांना सुद्धा द्यायला विसरत नसे. वाचनालयाची प्रगती हे माझे एकमेव लक्ष्य होते. 


फ्रेंड्स लायब्ररीच्या टिळकनगर शाखेतील पुस्तकांची व सभासदांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. डोंबिवलीतील अनेक सुप्रसिद्ध वाचनालये ज्यावेळी बंद पडायच्या मार्गावर होती त्यावेळी मी नवीन शाखा उघडण्याचा बेत आखत होतो. शैक्षणिक विभाग, गांधीनगर शाखा, डोंबिवली पश्चिमेकडील बदाम गल्ली शाखा या सर्व जोमात सुरू होत्या. डोंबिवलीच्या निरनिराळ्या विभागात फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखा असाव्यात असा मी नेहमी विचार करायचो. डोंबिवलीमध्ये वाचकांची संख्या पुष्कळ होती. परंतु मोजकीच वाचनालये चांगली चालत होती. डोंबिवलीत ठीकठिकाणी फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखा उघडण्याचे मी निश्चित केले.


शिवप्रसाद इमारतीतील कृष्णा दुग्धालयाचे मालक श्री. रामलखन यांनी एकदा मला त्यांच्या दुकानात बोलावले. कशासाठी बोलावले असेल याचा विचार करीतच मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या दुकानात गेलो तर ते मला रामनगर येथील त्यांच्या दुकानात घेवून गेले. हे दुकान त्यांनी नुकतेच विकत घेऊन ठेवले होते. रामनगर येथील एस. के. पाटील शाळेसमोर असलेल्या विश्वनाथ दर्शन इमारतीमध्ये त्यांचा गाळा होता. जागा खूप मोठी होती. तिथला परिसर आणि जागा मला खूप आवडली. "तू आपलाच माणूस आहेस. मला अनामत रक्कम (डिपॉझिट) देण्याची आवश्यकता नाही. तुला जेवढे जमेल तेवढे भाडे दे. तुला इथे वाचनालयाची शाखा सुरू करता येईल का याचा विचार करून मला कळव", असे ते म्हणाले. मी तर जागेच्या शोधात होतोच. एक चांगली संधी आपणहून माझ्यासमोर आली होती. मग मी लगेच त्यांना माझा होकार कळविला. टिळकनगर, गांधीनगर, बदाम गल्ली यानंतर आता रामनगर ही पै फ्रेंड्स लायब्ररीची चौथी शाखा ठरणार होती. माझा निर्णय कळताच रामनगर परिसरातील सभासद खुश झाले. त्यांना आता एवढे लांब टिळकनगरपर्यंत यावे लागणार नव्हते.


रामनगर शाखा उघडताना पुस्तकांची कमतरता नव्हतीच. परंतु पुस्तके ठेवण्यासाठी लाकडी काम (फर्निचर), रंगरंगोटी, विद्युतविषयक (इलेक्ट्रिक) कामे आणि इतर किरकोळ कामांसाठी पैसे खर्च करावे लागणार होते. डोंबिवली पश्चिमेला एकाकडे मी भिशीचे पैसे भरत होतो. सन २००७च्या फेब्रुवारी महिन्यात ते पैसे मी उचलले आणि आवश्यक लाकडी कामाला (फर्निचरच्या) ताबडतोब सुरुवात केली. किती सभासद जमतील? आपल्याला भाडे द्यायला जमेल का? कर्मचाऱ्यांचा पगार? वीज देयक (बिल)? असे अनेक निरनिराळे प्रश्न मनात येत होते. परंतु एकदा का वाचनालयाची शाखा चालू करायची हा निर्णय घेतल्यावर शक्यतो अश्या प्रश्नांना मी दुय्यम स्थान देत असे. आधी नवीन शाखा सुरू करणे हे मला जास्त महत्वाचे वाटत असे. आपण उत्तम सुविधा दिली, दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली, पुस्तकांची आकर्षक मांडणी केली, सभासदांशी चांगला सुसंवाद साधला की वाचनालयाची भरभराट व्हायला वेळ लागत नाही असं माझे खात्रीपूर्वक मत होते. आतापर्यंत याच कारणांमुळे टिळकनगर, गांधीनगर, बदाम गल्ली तिन्ही शाखांमध्ये सभासदांची उपस्थिती बऱ्यापैकी होती. आता रामनगरमध्ये नवीन शाखा चालू झाल्यावर नविन किती सभासद बनतील याकडे लक्ष द्यायला लागणार होते.


रामनगर येथील शाखेचे काम मला लवकरात लवकर संपवायचे होते. माझ्याकडे रंगकाम, विद्युतकाम (इलेक्ट्रिक काम) व लाकडीकाम (फर्निचरचे काम) करणारे कारागिर ठरलेलेच होते. त्यांना फक्त मला काय हवं आहे याची थोडीशी जुजबी माहिती दिली की ते लगेच कामाला सुरूवात करायचे. आतापर्यंत सर्व शाखांची कामे याच लोकांनी केलेली होती. आता एकीकडे या कारागिरांची कामे सुरू झाली होती तर दुसरीकडे शाखा कधीपासून सुरू करायची? कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे? उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कसे करायचे? वगैरे प्रश्नांवर मी विचार करीत होतो. यासर्व गोष्टींवर मीच निर्णय घेत असल्याने मला याबाबतीत कोणाला विचारावे लागायचे नाही. दिनांक १९ मार्च २००७ रोजी गुडीपाडवा होता. पाडव्याच्या दिवशी रामनगर शाखा सुरू करायची असा विचार मनात आला. परंतु आता 'कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे' हा प्रश्न होता. त्याकाळी 'श्वास' या मराठी चित्रपटाचा खूपच बोलबाला झाला होता. 'श्वास' या पारितोषिक विजेता चित्रपटाच्या लेखिका सौ. माधवी घारपुरे आपल्या डोंबिवलीत राहत होत्या. मी त्यांना भेटलो व त्यांना पै फ्रेंड्स लायब्ररीच्या रामनगर शाखेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यास विनंती केली. त्यांनी सुद्धा तात्काळ होकर दिला.


सोमवारी दिनांक १९ मार्च २००७ रोजी सकाळी दहा वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामनगर शाखेचे उद्घाटन सौ. माधवी घारपुरे यांच्या हस्ते करायचे ठरले. त्याप्रमाणे काही पत्रके छापून रामनगर परिसरात वाटली. आपल्या वाचनालयाच्या इतर शाखेतील सभासदांना उद्घाटन समारंभास येण्याचे आमंत्रण दिले. नवीन शाखा उघडण्यात येत असल्याचे समजल्यावर अनेकांनी कौतुक सुद्धा केले. उद्घाटन समारंभ दहा वाजता होता परंतु सौ. माधवी घारपुरे ताई पंधरा मिनिटे अगोदरच हजर झाल्या होत्या. ठरल्याप्रमाणे ठीक दहा वाजता दीप प्रज्वलन करून सौ. माधवी घारपुरे ताईंनी रामनगर शाखेचे उद्घाटन केले. सदर कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित असलेल्या जवळपास तीस ते पस्तीस वाचक सभासदांना सौ. माधवी घारपुरे ताईंनी आपल्या छोटेखानी प्रास्ताविकाने संबोधित केले. पहिल्या तासभरातच चार पाच सभासदांनी नावं नोंदणी केली. साधारणपणे याच वेगाने दिवसभर रामनगर येथे राहणारे वाचक आपली नावे नोंदवत होते. पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने मला खूप बरं वाटले. 


माझे सर्वात जेष्ठ बंधु श्री. मंजुनाथ अण्णांचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या संकेत याला मी रामनगर शाखेची जवाबदारी दिली होती. फ्रेंड्स लायब्ररीच्या सर्व शाखा सकाळी ७.३० वाजता उघडत असत. उद्घाटनाच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी सकाळी ७.३० वाजता संकेतचा मला दूरध्वनी आला. "आपल्या शाखेमध्ये चोरी झाली आहे. दुकानाचे कुलुप तोडले आहे. काही वस्तू चोरीला गेल्या आहेत", असे तो म्हणाला. मी वेळ न घालवता रामनगर शाखेत पोहचलो.  ताळा तोडून चोरांनी आतील पूजेची मोठी समई, छोटी समई व दहावीस रूपयांच्या सर्व नोटा चोरल्या होत्या. मोठी समई मी जय अंबे डेकोरेटर्स यांच्याकडून मागवली होती व छोटी समई घरून पुजेसाठी नेली होती. मला काही वेळ काय करायचे तेच सुचेना. डोकं शांत ठेवायचे ठरवले. रामनगर पोलीस ठाणे जवळच होते. मग पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना चोरी झाल्याचे कळविले. पोलीस मलाच उलटे वारंवार विचारू लागले की "तुम्ही रात्री ताळा लावला होता का?" या सततच्या प्रश्नांच्या भडीमाराने मी हैराण झालो. मी तिथे जास्त वेळ न घालवता सरळ वाचनालयात आलो. तोपर्यंत काही लोक जमले होते. जो ताळा तोडला होता तो बाजूच्या गटारात सापडला. मी परत काही पोलीसांकडे गेलो नाही. सामान माझे चोरीला गेले होते. ते काही परत मिळणार नव्हते हे मला कळून चुकले होते. ज्यांच्याकडून मोठी समई भाड्यानी आणली होती त्यांना रू. ५००० किंमतीची नवीन समई घेवून दिली. चोरांनी एकही पुस्तक चोरले नव्हते कारण त्यांची विद्यादेवीला, ज्ञानदेवाला चोरून नेण्याएवढी पुण्याई नव्हती. विझलेल्या, प्रकाश न देणार्‍यां छोट्या मोठ्या समई चोरांना त्यांच्या प्रारब्धानुसार अधिक महत्वाच्या वाटल्या. विद्यावाटपाचे, ज्ञानवाटपाचे माझे ध्येय किंवा नशीब चोरांनी चोरले असते तर नक्कीच आनंद झाला असता. परंतु तसे झाले नव्हते त्यामुळे चोरी झाली यावर जास्त विचार न करता 'झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच रहावे' यानुसार मी माझ्या ध्येयाकडे परत वाटचाल करू लागलो....

2 comments:

  1. अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करत तुम्ही पूढे जात आहात. तुमच्या कडून प्रेरणा मिळतेय.

    ReplyDelete
  2. एखाद्या लायब्ररीच्या संख्या वाढताना पाहून आम्हाला त्या काळी ही खूप आनंद झाल्याचे स्मरते. लै भारी !!

    ReplyDelete