Thursday, May 14, 2020

माझ्या दृष्टिकोनातून भारताने जिंकलेलं क्रिकेट वर्ल्डकप १९८३

क्रिकेट हा माझा आवडता खेळ. कुंदापूरपासूनच या खेळाची आवड निर्माण झाली. नारळाच्या झाडाची फांदी बॅट म्हणून वापरायचो. छोटं नारळाचं फळाला रबर लावून त्याचा चेंडू बनवायचो. तीन लाकडाचे तुकडे किंवा एखाद्या भिंतीवर खडूने तीन रेगोट्या मारून त्याला स्टंप बनवायचो. मग खेळायला सुरुवात. फलंदाजी करताना बाद झालो तरी मी नाही म्हणून चिडायचो. गोलंदाजी करताना पण चेंडू कुठेही टाकायचो. समोरच्याला बाद ठरवायचो. क्रिकेट खेळताना खूपदा पडलो, हाता-पायांना मारही लागला. घरातले ओरडायचे तुझे हे क्रिकेट खेळणे बंद कर किती जखमा झालेत? त्यावर कपडे पण फाडून येतोस. डोंबिवलीत आल्यानंतर सुद्धा मी क्रिकेट खेळणं काय सोडलं नाही. मला मजा यायची. चेंडू गटारात पडला की मीच उचलायचो घरी जाऊन हातपाय धुतले तर धुतले नाहीतर तसच जेवायला बसायचो. दिवसभर दुकान आणि क्रिकेटच्या धावपळीमुळे कधी झोप लागत होती ते कळतच नव्हतं .

    लहानपणी सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा, विश्वनाथ, प्रसन्ना, चंद्रशेखर या सारख्या क्रिकेटपटूंची नावं ऐकली होती. डोंबिवलीत आल्यावर मुन्नाच्या घरी रेडिओवर क्रिकेट मॅच ऐकण्याची संधी मिळाली. क्रिकेट मॅच ऐकताना गरम गरम खायलाही मिळायचं. मला अजूनही आठवतय मुन्नाच्या घरी एके दिवशी, मॅच ऐकताना भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होता, सिमसॅन गोलंदाजी करत होता, त्याच्या पायाला दुखायला लागलं होतं आणि तो अर्ध्यावर गोलंदाजी सोडून मैदानामधून निघून गेला. मला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं की हा असं कसं मधूनच निघून गेला? तेव्हा काल झालेल्या मॅच च आज प्रसारण होत होतं.ते पण ऐकायला मजा यायची. रिची बॅनो कंमेंटरी करायचे. सुरुवातीला ते काय बोलायचे समजतं नसायचं. नंतर ऐकून ऐकून सवयी झाली. अभ्यास करताना सुद्धा मॅचकडे लक्ष असायच.

   नुकतंच १२ मे १९८३ला मंजुनाथ शाळेसमोर आमचं दुसर दुकान "संदेश' सुरू झालं होतं. पांडुरंग अण्णा "संदेश' दुकान सांभाळायचा. कधी-कधी पुस्तके आणि इतर समान आणायला तो मुंबईला जायचा. तो मुंबईत गेला की मी "संदेश' दुकानात  बसायचो. समोरच मंजुनाथ शाळा आणि कल्याण रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे दुकान चांगलं चालायचं. फ्रेंड्स स्टोअर्स चा चांगला अनुभव मला होताच आणि बरेचसे गिऱ्हाईक ओळखीचे सुद्धा होते. जून महिन्यात शाळा सुरू होत असल्यामुळे दुकानात गर्दी ही असायची. जून महिन्यात इंग्लंडमध्ये क्रिकेटचं तिसरं वर्ल्डकप भरणार होतं आता पर्यंत झालेल्या दोन्ही वर्ल्डकप मालिका वेस्टइंडीसने जिंकल्या होत्या. ९ जूनपासून तिसऱ्या वर्ल्डकप सामन्याला सुरुवात झाली. आमच्या दुकानाच्यासमोर अश्वमेध सोसायटी मधला भट म्हणून एक मुलगा माझा मित्र बनला. त्याचे वडील सिंडिकेट बँकेत मॅनेजर होते. तो भारताचा सामना असला की पहिलं डाव संपलावर दुकानात येऊन मला स्कोर सांगायचा. उरलेला सामना मुन्नाच्या घरी जाऊन रेडिओ वर ऐकायचो. वेस्टइंडिस, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसमोर भारताचा संघ कमकुवत होता. का माहीत नाही पण मी आशावादी होतो, हा वर्ल्डकप भारतच जिंकणार मला आधीच्या सामन्यांचे किंवा बाकीच्या संघाशी काहीच घेणं देणं नव्हतं. मला एकच माहीत होतं की आपण वर्ल्डकप जिंकणारच !!

   सामन्याला सुरुवात झाली. अ आणि ब गट होत्या. प्रत्येक गटात चार संघ होते. आपण ब गटात होतो. आपल्या गटात वेस्टइंडिस,ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे संघ होते. प्रत्येक संघाबरोबर दोन सामने होणार होते. मला वाटतं भारताचा पहिला सामना वेस्टइंडिस बरोबर होता आणि तो सामना आपण ३४ धावाने जिंकलो. वेस्टइंडिस सारख्या बलाढ्य संघाला हरवल्यामुळे मी खूप खुश होतो. दुकानात येणाऱ्या गिराइकांबरोबर वर्ल्डकपची चर्चा असायची. आता दुसरा सामना झीम्बॉबे बरोबर होता आणि तो आपण सहज जिंकलो. पण तिसरा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर आपण खूप अंतराने हरलो. दुसऱ्या दिवशी मी आणि माझा मित्र दुकानात बोलत असतांना एक गिराइक ऐकत होते. ते बोलले क्रिकेट काय सोपं नाहीये पहिली स्पर्धा जिंकली नशिबाने. दुसरी टीम  झीम्बॉबे साधी होती. वेस्टइंडिस,ऑस्ट्रेलिया इंग्लंडसमोर आपला संघ कमजोर आहे. जुने अनुभवी खेळाडूंना वगळून त्या कपिलला कप्तान केलाय, त्याला काय कळतंय का? वगैरे... मला खूप राग आला मी बोललो समजा हरलो तर काय बिघडलं? आपल्या देशावर आपल्याला अभिमान असायला पाहिजे, ते काय टाईमपास म्हणून तिकडे गेले नाहीत त्यांना पण सामना जिंकायचय.सर्वांनी मिळून चांगली कामगिरी केली तर हा वर्ल्डकप आपणच जिंकू. तरी ते बडबड करत होते. नंतर मी आणि मित्रांनी त्यांच्याकडे लक्ष्य दिलं नाही. चौथा सामना वेस्टइंडिस बरोबरचा आपण हरलो. तरी पण मला वर्ल्डकप जिंकण्याचा विश्वास होता!!
जेव्हा झीम्बॉबे बरोबर १७ धावांवर ५ खेळाडू बाद झाले, तेव्हा मी खूप निराश झालो. पण कपिलदेवच्या खेळीने सामनाच बदलून टाकला.त्याच दिवशी ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिस सामना असल्यामुळे आपल्या सामन्याच थेट प्रक्षेपण दाखवलं गेलं नव्हतं. कपिलदेव मुळे आपण तो सामना जिंकला.पुढचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबरचा मोठ्या अंतराने जिंकलो आणि आपण सेमी फायनलला पोचलो. सेमी फायनलचा सामना इंग्लंडबरोबर होता. इंग्लंडमध्ये इंग्लंडला हरवणं कठीण होतं. इंग्लंडने आपल्यासमोर २१७ धावांचा आवाहन उभं केलं. मोहिंदर अमरनाथ यशपाल शर्मा आणि संदीप पाटील यांच्या फलंदाजीमुळे सामना जिंकून भारत एकदाचा फायनल ला पोचला!!

    २५ जून १९८३ रविवारचा दिवस होता. क्रिकेटच्या इतिहासात भारताचा सर्वात मोठा दिवस. भारताची पहिली फलंदाजी होती.वेस्टइंडिसकडे मार्शल, रॉबर्टसारखे दिग्गज फलंदाज होते. सामना जिंकण्यासाठी मोठ्या धावा अपेक्षित होत्या. मी समोरच्या मित्राची वाट बघत होतो. तो संध्याकाळी आला आणि बोलला आपले फलंदाज फक्त १८३ वर बाद झालेत वेस्टइंडिसला ६० ओव्हरमध्ये फक्त १८४ धावा बनवायचा आहेत ते सहज जिंकतील असं वाटतं. माझ्या पण मनात थोडी शंका होतीच, एवढे धावा पुरतील का? पण मी खुश होतो की आपण फायनलला पोचलो जे होईल ते बघूया. मला आपल्या भारतीय संघावर गर्व होता. दुकानात येणारे सांगत होते वेस्टइंडिसचे खेळाडू एक एक करून बाद होत आहेत. मी लवकर दुकान बंद करून घरी आलो. बाजूच्या रमेशभाईकडे क्रिकेट फायनल बघण्यासाठीच दोन दिवसांपूर्वी नवीन ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आणला होता. भरपूर गर्दी जमली होती सर्व टाळ्या वाजवत होते वेस्टइंडिसचे सात फलंदाज बाद झाले होते. मला शेवटचे तीन खेळाडू बाद होताना बघायला मिळाले. शेवटी मोहिंदर अमरनाथ यांनी होल्डिंगला बाद केलं, आणि भारताने १९८३ चा चषक जिंकला !!!  भारताच्या संघातल्या प्रत्येक खेळाडूचा त्यात वाटा होता. मला तो शेवटचा क्षण अजून ही आठवतोय ज्वेल गार्नर आणि मायकेल होल्डिंग मैदानात बसले होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं. पण हा खेळ आहे कोणाला एकाला जिंकायचं होतं तर त्यातला एक हरणार होता या नियमानुसार भारत जगातल्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये क्रिकेटचा बादशाह बनला होता.... लोकं जोर-जोरात ओरडायला लागले भारत माता की जय!!! जयाबेनने पेढे वाटायला सुरुवात केली आम्ही फटाके वाजवले, सर्वजण उत्सव साजरा करत होते.....

Tuesday, May 12, 2020

(१९८३) मी बारावीत असताना अनुभवलेली रंगपंचमी.....

भारतात लोकं वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे सण साजरा करत असतात. या सणांमुळेच भारतीय संस्कृतीची ओळख आहे. जन्माष्टमी, गोविंदा, राखीपूर्णिमा, गणेशोत्सव,दसरा, दिवाळी आणि होळी असे कित्येक सण आपण साजरा करत असतो. प्रत्येक सणांमागे कारणे ही असतात व त्या दिवसांचे महत्व ही असते. बरेचसे सण पुरातन काळापासून चालत आलेले आहेत. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे वयाप्रमाणे त्या सणांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलत जातो.लहान असताना आपल्याला कोणाची भीती नसते. इतर लोक करतात त्याचप्रमाणे आपण ही त्यांच अनुसरण करत जातो. लहानपणी जी मस्ती-मजा आपण प्रत्येक सणांच्या वेळेला करतो ते कधीच पुढच्या आयुष्यात अनुभवायला मिळत नाही त्या फक्त आठवणी म्हणून आपल्या सोबत राहतात. सारख्या शहरात वेगवेगळ्या प्रांतातून लोकं येऊन स्थायीक झाले आहेत. सणांच्या वेळेला सर्व एकत्र येतात आणि जाती धर्म सर्व विसरून धुमधडाक्यात प्रत्येक सण साजरा करत असतात. आमच्या शिवप्रसाद बिल्डिंगमध्ये सुद्धा आम्ही सर्व एकत्र येऊन नवरात्रीला दांडिया, जन्माष्टमीला गोविंदा, मार्च महिन्यात रंगपंचमी साजरा करायचो.

    मी बारावीची परीक्षा होतो त्याचवेळी २९ मार्चला होळी होती व ३० मार्चला रंगपंचमी आणि माझा हिंदीचा शेवटचा पेपर ३१ मार्च ला होता. हिंदीच्या पेपरला चार दिवसाची सुट्टी होती. शनिवारी २६ मार्चपासून आम्ही होळीच्या तयारीला लागलो होतो. इमारतीच्या आजूबाजूला जिथे जिथे सुके लाकड पडलेली होती ते सर्व आम्ही जमा करायला लागलो. मंगळवारपर्यंत पुष्कळ लाकडं जमा झाली होती. संध्याकाळी इमारतीतले सर्वजण जमा झाले काहींनी नारळ तर काहींनी आरतीचा समान वगैरे आणलं. आम्ही सर्वांनी मिळून एका काठीला आग लावून त्या काठीने होळी पेटवली. लाऊड स्पीकर वर गाणं सुरू होत. प्रत्येकाचं नाव घेऊन त्याच्या बैलाला ढोल जोरात ओरडायला सुरुवात केली. जे जे आम्हाला खेळताना त्रास देत होते त्या प्रत्येकच नाव आम्ही घेत होतो. या सर्व कार्यक्रमात पुढाकार माझाच होता. वर्गणी काढायचो सामान आणायचो खूप मजा केली.

    रंगपंचमीच्या दिवसही. सकाळी लवकर उठून दुकानात गेलो. दुकानात आम्ही रंगपंचमीचे रंग, पिचकारी, फुगे सर्व सामान विक्रीला ठेवायचो. जास्त करून सामान सर्व आदल्या दिवशीच संपायच. उरलेल सामान रंगपंचमीच्या दिवशी दहा वाजेपर्यंत विकायचो.त्यादिवशी आम्ही पिचकारी, फुगे, रंग खूप विकले काही लोकांनी अंडी पण विकत घेतली लोकांवर फेकायला!!! दहा वाजता दुकानातून थोडे रंग, दोन पाकीट फुगे, एक पिचकारी घेऊन घरी निघालो. सर्व मित्र बोलवत होते मी त्यांना घरी जाऊन येतो अस सांगितलं. घरी आई, वहिनी माझी वाट बघत होते. शेजारच्यांनी पुरणपोळी दिली होती. आमच्याकडे पुरण पोळीची पद्धत नव्हती. मला पुरणपोळी वर साजूक तूप, साखर आणि मध टाकून खायची सवय होती. साजूक तूप, साखर आणि मध टाकून दोन पुरणपोळ्यावर दाबून खाल्या. आईने सांगितल्याप्रमाणे चेहऱ्याला, केसांना आणि हाताला खोबरेल तेल लावलं. आदल्या दिवशीच काढून ठेवलेले जुने कपडे घातले आणि मित्रांसोबत होळी मज्जा करायला निघालो. इमारतीतले सर्व मित्र गच्चीवर जमले होते. मला बघताच माझ्या अंगावर धावून आले. सर्वांनी माझ्यावर मनसोक्तपणे रंग लावला.मी पण कोणालाच सोडलं नाही. थोड्यावेळाने आम्हीसर्वजण गच्चीवरून खाली उतरलो. जे घरून बाहेर पडले नव्हते अश्या लोकांच्या घरी जाऊन प्रत्येकाला रंग लावत सुटलो. गम्मत म्हणजे कोणीही विरोध केला नाही. त्यांनाही आवडत होत या खेळण्याच्या नादात कधी एक वाजला समजलंच नाही. सर्वाना भूक लागली, सर्वजण आपापल्या घरी निघून गेले मी पण घरी गेलो अंगोळ केली चेहऱ्याला तेल लावल्यामुळे रंग लवकर निघाला. घरी जेवण तयार होत.थोडासा जेवलो आणि दुपारच्या कामाला लागलो.

    दुकानातून दोन पाकीट फुगे आणले होते. फुग्यात पाणी भरायचं होत. नळाला पाण्याचा दाब कमी होता. फुग्यात पाणी भरलं जात नव्हत .एका बादलीमध्ये पाणी भरलं त्यातून पिचकरीने एक एक फुग्यात पाणी भरून वीस ते पंचवीस पाण्याचे फुगे तयार केले. ते सर्व फुगे बादली ठेवले आणि ती बादली घेऊन गच्चीवर गेलो दुपारचे दोन वाजले होते रस्त्यावर शुकशुकाट होता. दोन-चार लोकं दिसत होते. जाणारा-येणारंमध्ये कोणी ओळखीचे दिसले की फुगा मारायला सुरुवात केली. त्यातलं कोण ओरडायला लागले की खाली लपून बसायचो. माझ्या बरोबर अजून माझे दोघे मित्र होते. कोण होत आठवत नाही. फुगे मारत असताना माझ्या ओळखीतला एकजण रिक्षात बसताना मला दिसले.माझ्याकडे बरेच फुगे शिल्लक होते. त्यातला एक फुगा काढून नेम धरून मी त्यांना मारला. इतक्यात बाजूनी एक जीप वेगाने आली, मी मारलेला फुगा त्या जीपच्या बॉंनेटवर आपटला. फुग्यातलं पाणी आत बसलेल्या माणसावर पडलं. त्यांनी चांगला सफारी ड्रेस घातला होता. गाडीला वेग असल्यामुळे ड्रायव्हरने ब्रेक मारून सुद्धा ती जीप पुढे जाऊन थांबली आणि त्याने गाडी मागे घेतली. गाडी  इमारतीजवळ थांबली त्यातून तीन चार जण खाली उतरले. मी घाबरलो .मी आणि माझे मित्र गच्ची वरून सटकलो. मी बादली घरी ठेवली आणि घाबरत घाबरत खाली आलो. आमच्या इमारतीत तळमजल्यावर VCR च दुकान होतं. तिथला मालक माझ्या ओळखीचा होता. त्याने माझ्या चेहऱ्यावर सिल्वर रंग लावला. मला खूप भीती वाटत होती. तिकडून बाहेर पडलो. रस्त्यावर गुंजन, मानस, काकी स्मृती, राजहंस सोसायटीमधली लोक जमली होती. खूप गर्दी होती. मी जिना चढून घरी जात होतो इतक्यात चार पाच माणसं हातात लोखंडी सळी घेऊन खाली उतरत होते. माझ्या चेहऱ्याला सिल्वर रंग लावल्यामुळे त्यांनी कदाचित मला ओळखलं नाही ते सरळ निघून गेले मी घरी गेलो. नंतर कळलं की त्यांना शेजरच्या रमेशभाई यांनी समजावून सांगितलं लहान मुलं असतील परत असं करणार नाहीत!! त्या दिवशी जर मी सापडलो असतो तर तो पाण्याचा फुगा माझ्या जीवावर बेतला असता.... आणि मी जो पाण्याच्या फुगा ओळखीच्यांवर मारायला गेलेलो तो फुगा चुकून ज्यांना लागला ते होते स्वतः सीताराम शेलार (S. B. शेलार).

Sunday, May 10, 2020

पेंढरकर कॉलेजच माझ पाहिलं वर्ष, स्नेहसंमेलनातले मला आवडलेल फिश पौंड

संपूर्ण चार वर्षे सातवी ते दहावीपर्यंत मुलुंडला शाळेत जायला लागल्यामुळे ट्रेनचा प्रवास नकोसा झाला होता. दुसरं म्हणजे मला पुढच्या शिक्षणासाठी डोंबिवलीच्या बाहेर जायची इच्छा नव्हती. डोंबिवलीतच पेंढरकर कॉलेजात प्रवेश मिळाल्याने मला समाधान वाटत होतं. आता मला दुकानात ही वेळ देणं शक्य होणार होतं. कॉलेजला जायची तयारी करायची होती. कॉलेजला जायला माझ्याकडे पॅन्ट-शर्ट नव्हते. मी कधीच घरी काहीच विचारत नव्हतो. कुठल्याही वस्तूंसाठी माझा आग्रह नसायाचा. अण्णांनी माझ्यासाठी शर्ट आणि पॅन्ट पीस आणले, आमच्या इमारतीतल्या दिलीप टेलर कडून एका दिवसात शिवूनही घेतल. पुस्तकं आमच्या दुकानात होतीच पण अण्णा बोलले की अकरावीला फक्त मराठी, इंग्लिश, हिंदी चे पाठ्यपुस्तके असतात बाकीच्या विषयांसाठी निरनिराळे प्रकाशन व लेखकाचे पुस्तके असतात ते कॉलेजमध्ये सांगतील तसे घ्यावे लागणार.

     कॉलेजचा पहिलाच दिवस होता. टिळकनगरमधून कॉलेजला जाणार ओळखीच कोणही नव्हत. मी एकटाच चालत निघालो. चालत जाताना मनात वेगवेगळे विचार येत होते. वर्ग कसा असेल? वर्गात ओळखीच कोण असेल का? सर काय प्रश्न विचारतील? याच विचारात कॉलेजला पोचायला अर्धा तास लागला. दुपारची वेळ होती. कॉलेजमध्ये पोचल्यावर वर्गाची चौकशी केली माझ नाव ब वर्गाच्या तुकडीत होत. इमारतीच्या बाजूला सिमेंटच्या पत्र्याच शेड होतं त्यात माझा वर्ग होता. वर्गात ओळखीच कोणच नव्हतं. मी तस स्वतःहून कोणाशी सहजपणे बोलत नव्हतो. कॉलेजमधल पहिलं लेक्चर सुरू होण्याआधी कॉलेजचे प्रिन्सिपल प्रा. N.G.kale आणि कोणतरी त्यांच्याबरोबर वर्गात आले. काळे सर दिसायला सुंदर होते ते मराठी आणि इंग्रजीमध्ये आम्हाला समजेल असं बोलत होते. ते बोलले की आज आपल्याला विको कंपनीचे मालक श्री. पेंढरकर यांच्यामुळे ही जागा मिळाली आहे, त्यामुळे डोंबिवलीत या कॉलेजची स्थापना झाली. तुम्हा सर्वांना संधी मिळाली या संधीचा तुम्ही नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करावा. काळे सरांनी अकरावी व बारावीसाठी OC आणि SP ची पुस्तकही लिहिली होती. विपुल प्रकाशनाने ही पुस्तके प्रकाशित केली होती. काळे सरांच्या संभाषणानंतर पहिल्या लेक्चरला सुरुवात झाली. इंग्लिश मराठी/हिंदी Economics (Eco), Book Keeping(B.K.), organization of Commerce(O.C.) आणि Secraterial practice(S.P.) असे सहा विषय होते. मराठी किंवा हिंदी पैकी मी हिंदी निवडलं होतं. BK साठी खिस्ती सर, हिंदी ला पाटील मॅडम, OC & SP साठी डॉली मॅडम आणि ECO  ला एक साऊथ इंडियन मॅडम होत्या. अकरावी म्हणजे कॉमर्सच्या पुढच्या टप्प्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मी प्रत्येक लेक्चर व्यवस्थित अटेंड करायचो. अकाउंट्स मधला बेसिक रुल अजून ही माझ्या डोक्यात घट्ट बसलाय Debit What Comes In & Credit What Goes Out. हे तत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा खूप महत्वाचं आहे.दुकानात सुद्धा हे मला खूप उपयोगी पडणार होत. सुरुवातीला मला वाटायचं की कॉलेजला गेल्यावर इंग्रजीमध्ये बोलायला लागेल की काय? सर्व सर इंग्रजीमध्ये बोलत असतील तर. आधीच माझं इंग्रजी कच्च होत मला इंग्रजी बोलायला, लिहायला आणि वाचायला अजिबात येत नव्हतं. पुढे कसं होईल? मला जमेल का? असे सर्व प्रश्न मनात होते पण जसं जसं कॉलेज जायला लागलो माझ्या मनातील भीती कमी होत होती. कॉलेजमध्ये ओळखी झाल्या सर पण ओळखायला लागले. अकाउंटचे खिस्ती सर मस्त शिकवायचे त्यांचं व्यक्तीमत्व खूप चांगलं होतं. ते जास्त करून मराठीत बोलायचे लेक्चरच्या अधून-मधून त्यांचे जोक्स पण असायचे. पाटील मॅडम हिंदी शिकवायच्या त्यांचं हिंदी वरच प्रभुत्व कमालीचं होत. त्या उदाहरणं पण चांगलं देत असायच्या असं वाटायचं की हिंदीचा तास संपूच नये. OC आणि SP माझे आवडते विषय होते. डॉली मॅडम, त्यांच नाव आठवत नाही पण सर्वजण त्यांना डॉली मॅडम म्हणायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती. फक्त इंग्रजीचा तास माझ्या डोक्यावरून जायचा. तरी पण मी खूप समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाल्या. मी परीक्षेची तयारी चांगला केल्यामुळे सर्व विषयांमध्ये मला पन्नास पेक्षा जास्त गुण मिळाले. हळूहळू मी कॉलेजमध्ये रमायला लागलो. योगेंद्र ओझे हा माझा कॉलेज मधला एकमेव मित्र बनला. जास्त करून कॉलेजमध्ये आम्ही दोघे एकत्र असायचो. एखाद लेक्चर नसलं की आम्ही कॉलेजच्या मागे भूत बंगला होता तिकडे जायचो. असं ऐकलं होतं की तिथे आधी घोडे बांधायचे त्यामुळे कधी कधी घोड्यांचा आवाज येतो. मी कधी कुणालाच घाबरायचो नाही त्यामुळे आम्ही बिनदास तिथे फिरायला जायचो. कॉलेजची इतर मुलं ही असायची. लेक्चरला सुरुवात होण्या आधीच परत वर्गात असायचो.

   आमच्या कुंदापूरमध्ये भंडारकर्स कॉलेज होतं आणि इथे डोंबिवलीत पेंढरकर कॉलेज हा एक योगायोग होता. मी कुंदापूरमध्ये असताना कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला लपुनछपून जायचो. आता माझा कॉलेजच स्नेसंमेलन होतं. सुरुवातीचे भाषणं मला अजिबात आवडायच नाही. कधी यांचे भाषणं संपतय आणि कार्यक्रमाला सुरुवात होते याची वाट बघायचो. एकदा कार्यक्रम सुरू झाला की धमाल. कॉलेजच पहिलंच स्नेहसंमेलन कॉलेजच्या पटांगणात होतं. कार्यक्रम मला नीट आठवत नाहीत पण फिश पौंड चा कार्यक्रम छान होता. पूर्वी कॉलेजच्या स्नेसंमेलनमध्ये फिश पौंड चे कार्यक्रम असायचे. बरेचसे फिश पौंड छान होते त्यातलं मला एकच आठवतंय. एका विद्यार्थ्याने एका सरांना लिहिलं होत.
          "भाजीवाले वजनात कापतात आणि आमचे सर मार्कात कापतात" या फिश पौंड जबरदस्त टाळ्या वाजल्या होत्या......

Friday, May 8, 2020

दहावीत ६१ टक्के आणि शेवटी पेंढरकर कॉलेजात कॉमर्स विभागात प्रवेश मिळाला .....

  दहावीच्या परीक्षेनंतर जास्तीत जास्त माझा वेळ दुकानात जायचा. सर्व शाळांना सुट्टी लागली होती. दुकानात गर्दी कमी असली की मी  मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला जायचो. कधी-कधी पत्ते खेळायचो. दुकान सकाळी सात वाजता उघडलं की रात्री दहा वाजता बंद करायचो. घरी जाऊन लवकरात लवकर जेवण संपवून झोपायला गच्चीवर. घर छोटं आणि माणसं जास्त त्यामुळे घरचे काहीच बोलत नव्हते, त्यांची परवानगी होती. शाळेला सुट्टी लागली होती, घरी उकडत असल्यामुळे इमारतीतले बरेचसे लोकं झोपायला गच्चीवर यायचे. गच्चीवर झोपायची मजा काही निराळीच होती.गच्चीवर झोपायला जाताना बरोबर रेडिओ असायचा. रेडिओवर रात्रीचे बेलाके फूल, छायागीत असे कार्यक्रम असायचे. त्या व्यतिरिक्त नवीन चित्रपटाची गाणी आणि माहिती असायची. मग त्या चित्रपटावर आमच्या गप्पा असायच्या. गच्चीवरील गार वारा, आकाशातील तारे, धावते ढग ती मजा वेगळीच होती. कधीतरी अधून-मधून पाऊस पडायचा. पाऊस पडला की अंथरूण व उशी सकट पायऱ्यांवर जाऊन बसायचो. पाऊस थांबण्याची वाट बघायचो. पाऊस थांबेपर्यंत गाण्याच्या भेंड्या खेळायचो. भेंड्याच्या आरडाओरडामुळे इमारतीतले लोक ओरडायला यायचे रात्रीचे किती वाजले बघा? तुम्ही झोपत नाही आम्हाला तरी शांतपणे झोपू द्या!!

  जून महिन्यात दहावीचा निकाल होता, तारीख समजली होती. आमच्याकडे टिळकनगरला शिल्पा प्रिंटिंग प्रेसमध्ये दहावीचा निकाल एक दिवस आधीच मिळायचा. प्रेस असल्यामुळे त्यांच्याकडे एक दिवस आधी बातमी पत्रात छापण्यासाठी दहावीचा निकाल आलेला असायचा. आपला दहावीचा नंबर दिला की ते निकाल सांगायचे. यासाठी दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी असायची.कधी-कधी गर्दी आवरण्यासाठी पोलीस ही यायचे. मी पण माझा नंबर चिट्टीवर लिहून दिला. मिळालेल्या निकालाप्रमाणे मला दहावीत ६१% गुण मिळाले होते. एवढे कमी गुण मिळाल्यामुळे मी खूपच नाराज झालो. माझा निकाल हातात येताच सरळ रडत रडत घरी गेलो. आई, प्रेमाक्का, भाऊ सर्वांनी विचारलं "काय झालं?" त्यांना निकालाच सांगितलं पण मला काही रडू आवरेना. तेवढ्यात अण्णा पण आले त्यांना कळलं होतं मला ६१ टक्के मिळालेत. ताई पण आली, सर्वांनी समजूत घातली, रडून रडून चेहरा सुजला होता माझा. मी माझा चेहरा लपवत होतो. मी ज्याप्रमाणे अभ्यास केला होता त्यापेक्षा मला खूपच कमी गुण मिळालेले.

   सर्वांशी हसत खेळत राहणार मी त्यादिवशी कोणाशीच बोललो नव्हतो.जेवण पण नीट जात नव्हतं. मला अजून आठवतंय त्यादिवशी गच्चीवर न जाता आईच्या समाधानासाठी थोडा फार जेवून झोपलो....

  दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शाळेत जायच्या तयारीला लागलो अण्णा बोलले मार्कशीट आणि शाळेचा दाखला घेऊन सरळ घरी ये, कॉलेज ऍडमिशनच नंतर बघूया तू काळजी करू नकोस. अण्णांनी धीर दिला. ठरल्याप्रमाणे मार्कशीटआणि स्कूल लिविंग सर्टिफिकेटसाठी शाळेत पोचलो. माझा निकाल मला माहीत असल्यामुळे मी शांत होतो. शाळेत बरेचसे मित्र भेटले. नववीत मी वर्गात चौथा आलो पण यावेळी दहावीत बरेचसे मित्रांना माझ्यापेक्षा जास्त गुण मिळाले होते. सर्व विषयाचे गुण बघत होतो सर्व कागदपत्र घेऊन मी घरी आलो. निकाल हातात होता,सर्व विषयांवर नजर फिरवली ज्या विषयात जास्त गुण पाहिजे होते नेमकं त्याच विषयात कमी गुण मिळाले होते. कन्नडमध्ये शंभर पैकी फक्त त्रेपन्न गणितात दीडशे पैकी फक्त ऐंशी गुण मिळाले होते. एकूण सातशेपैकी चारशे एकोणतीस म्हणजे ६१ टक्के फक्त.

 आता पुढे काय? तसं मला मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हतं. जास्त करून सगळे कॉमर्स, आर्टस् आणि सायन्स या तीन पैकी एक पर्याय निवडत होते. मी पुढचा विचारच केला नव्हता. नोकरी करायची का व्यवसाय करायचा? माझा मित्र संतोष ओक ला ७७ टक्के मिळाले होते, त्यांनी सायन्स निवडलं. मला एकच पर्याय दिसत होता आणि तो म्हणजे कॉमर्स. मी कॉमर्स निवडलं पण ऍडमिशनच काय? कुठलं कॉलेज? तेव्हा डोंबिवलीत कॉलेज फक्त अकरावी बारावी पर्यंतच होतं. पुढच्या शिक्षणासाठी डोंबिवलीच्या बाहेर जायला लागायचं. मी पास झालो त्याच वर्षी डोंबिवली M.I.D.C. मध्ये पेंढरकर कॉलेज सुरू झालं. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला विको कंपनीचे मालक पेंढरकर यांनी कॉलेजसाठी जागा उपलब्ध करून दिली त्या जागेवर कॉलेज बांधलं होतं. पण तिकडे कॉमर्ससाठी एकच वर्ग होता आणि त्या वर्गासाठी फक्त सत्तर टक्केला ऍडमिशन फुल झाली होती. आता डोंबिवलीच्या बाहेर जावं लागणार होतं. व्यंकटेश अण्णा घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये शिकायला होता. त्याने त्याच्या कॉलेजचा फॉर्म आणला होता. नाहीतर मग उल्हासनगर किंवा मुलुंडला जावं लागणार बहुतेक. मला डोंबिवलीतच पुढचं शिक्षण करायचं होतं. ऍडमिशनसाठी धावपळ सुरू होती. एका दिवशी व्यंकटेश अण्णा माझे कागदपत्रे घेऊन ठाण्याला जिल्हा परिषदच्या ऑफिसला जाऊन तिकडेचा फॉर्म भरला. जिल्हा परिषद कडे माझ्यासारखे अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म्स आले होते. मला वाटत जिल्हापरिषदने पेंढरकर कॉलेजमध्ये दुसरा वर्ग सुरू करण्यास सांगितल असावं. पेंढरकर कॉलेजमध्ये दुसरा वर्ग सुरू करण्यात आला. भावाने जिल्हा परिषद मधून कागदपत्रे आणले मग मी आणि भाऊ पेंढरकर कॉलेज मध्ये ऍडमिशनसाठी गेलो. एवढ्या दिवसांमध्ये कॉलेजला सुरुवात पण झाली होती. माझा जीव कासावीस होत होता. कधी एकदाचं ऍडमिशन मिळतय, कधी एकदाचं कॉलेज सुरू होतं असं झालं होतं. पेंढरकर कॉलेजमध्ये फॉर्म भरून दिले. त्यांनी दोन दिवसांनी बोलावलं. आम्ही फी किती भरावी लागेल आणि कॉलेजच्या वेळेची चौकशी करून निघालो.

  आधी आम्ही टिळकनगर वरून पाथर्लीला सुद्धा जायला घाबरायचो. पाथर्लीच्या कोपऱ्यावर जकात नाका होता. तिथून पुढे पंधरा मिनिटाच्या अंतरा वर कॉलेज होतं आजूबाजूला खूप झाडी होती. रात्री तर त्या वाटेने कोणचं जात नव्हतं. दोन दिवसांनी कॉलेजला जाऊन चौकशी केली तर माझं नाव नवीन वर्गात नोंदवल गेल होत. लगेच मी फी भरली आणि मला पेंढरकर कॉलेजात अकरावी कॉमर्समध्ये प्रवेश मिळाला. पुढच्या पाच वर्षांसाठी मी डोंबिवलीतल्या पेंढरकर कॉलेजचा विध्यार्थी झालो....

Wednesday, May 6, 2020

१९८०-८१ दहावीची परीक्षा दिली.....

  घरातल्यांना माझ्या अभ्यासाची काळजी नव्हतीच. आई, प्रेमआक्का, अण्णा, भाऊ सर्वांना माहीत होत की मी चांगले गुण मिळवून पास होणारच.त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नववीत मी वर्गात चौथा आलो. नववीत असतानाच काही विध्यार्थी दहावीच्या तयारीला लागले होते. वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे क्लासेस, पाठ्यपुस्तके व्यतिरिक्त, सर्व विषयांचे नवनीत चे गाईड, कुटमुटिया प्रश्नसंच,जीवनदिप प्रश्नसंच, नवनीत प्रकाशनाचे २१ अपेक्षित प्रश्नसंच असे बरेचसे पुस्तकं जमवायला लागले. सुट्टीचे वेगळे क्लास. ज्या विषयात जास्त गुण मिळण्याचे शक्यता आहे त्यासाठी शाळेत वेगळे वर्ग. असं सर्वांनी दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती.

  दहावीत पोचलो की पालकांची खूप अपेक्षा असते. चांगले गुण मिळाले तर पुढचं शिक्षण सोपं जाईल. पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन सहज मिळू शकेल. डॉक्टर, इंजिनिअर सारख्या पुढच्या शिक्षणाला सोपे जाईल.म्हणून नववीपासून त्याचे क्रिकेट खेळणे, पत्ते, कॅरॅम सर्व प्रकारचे खेळ, टि.व्ही. बघणं सिनेमागृहातील चित्रपट, बाहेर फिरायला जाणं, मित्राच्या घरी जाणं सर्व बंद!!! एकच ध्येय फक्त अभ्यास आणि अभ्यास. दहावीत चांगले गुण मिळाले पाहिजेत. तुझा मित्र बघ किती अभ्यास करतोय त्याला तुझ्यापेक्षा जास्त गुण मिळतील. त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल तुझ्यापेक्षा तो पुढे जाईल असा ओरडा असायचा.

  मला दहावीच काहीच विशेष वाटलं नव्हतं. नववीनंतर दुकानात बसायला सुरुवात केली. दुकानात दहावीची पुस्तके होतीच. पण मी कधी उघडून बघितलीच नाही. शाळा सुरू झाल्यावर पुस्तकांना हात लावला. मी नियमितपणे शाळेत जायचो. जे शाळेत शिकवायचे घरी येऊन गृहपाठ करायचो घरीच न कंटाळता अभ्यास असायचा तेवढच. बाकी कुठलाही क्लास नाही किंवा कोणी मार्गदर्शन करणारही नाही. घरातल्यांनी पण कधी माझा अभ्यास घेतला नाही. किती अभ्यास झालाय? काय करतोस? कधीच काही विचारलं नाही. दिवाळीत दुकानात नवनीत प्रकाशनाची नवीन २१ अपेक्षित प्रश्नसंच आले.मी त्याबद्दल खूप ऐकलं होतं .पण ते सर्व मराठीत किंवा इंग्रजीत होते .इंग्रजी माझी भारी होती!! सर्व डोक्यावरून जात होतं मग काय !! अण्णाना विचारून कन्नड सोडून बाकी  सर्व विषयांचे मराठीतले २१ अपेक्षित प्रश्नसंच घेतले. कन्नड विषयाचे काहीच उपलब्ध नव्हतं, किव्हा गाईड दुसर काहीच नव्हतं. फक्त पाठ्यपुस्तक. सरांनी शाळेत शिकवलेलं जे वहीत उतरवून घेतलं तेवढच. दिवाळीनंतर मी दहावीच्या अभ्यासाला सुरुवात केली.

   नेहमी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दहावीची परीक्षा सुरू होत असते. माझ्याकडे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस होते. सात विषय, प्रत्येक विषयाला सतरा दिवस मिळणार त्यानुसार अनुक्रमणिका तयार केली. जानेवारीपर्यंत शाळा होती तेव्हा शाळा सुटल्यावर घरी येऊन ठरलेल्या विषयाचा अभ्यास करायचो. थोडावेळ शाळेत दिलेल्या गृहपाठ करत होतो. तसेही अण्णा बोलले होते दहावीच वर्ष आहे परीक्षा संपेपर्यंत दुकानात नाही आलास तरी चालेल. माझ्याकडे पाठ्यपुस्तक शाळेच्या नोट्स आणि सर्व विषयांचे मराठीतून नवनीतचे २१ अपेक्षित प्रश्नसंच होते.अभ्यासाला सुरुवात केली, २१ अपेक्षित मराठीत असले तरी मी त्याच्यावरूनच जास्त अभ्यास केला. इमारतीत माझ्याबरोबर संतोष ओक पण दहावीला होता. तो माझ्यापेक्षा हुशार होता. मला काही प्रश्न पडले की त्याला विचारायचो संतोष नीट समजावून सांगायचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. इमारतीत एक खोली रिकामी होती. त्याची किल्ली संतोष कडे होती. त्या खोलीत मी, संतोष, मुन्ना, अशोक, मनसुख असे आम्ही पाच-सहाजण एकत्र अभ्यास करायचो. दोन तास अभ्यास केला की पंधरा मिनिटं त्याच खोलीत क्रिकेट खेळायचो. अभ्यासाबरोबर थोडं मनोरंजन ही असायचं.

  जानेवारी अखेरीस प्रिलियम परीक्षा जाहीर झाली माझी तेवढी तयारी नव्हती, परीक्षा दिली. सर्व विषयात खूप कमी गुण मिळाले होते. सर ओरडले  सरांचे कन्नड मधील एक वाक्य मला अजून ही आठवत "बर बरूता रायन कुदुरे कथे अगुतीदे' म्हणजे हळू हळू राजाचं घोडं गाढव होत चालंय!! अजूनही दिवस आहेत नीट अभ्यास केलास तर चांगले गुण मिळतील. दिवस व विषयाचे नियोजन केलंच होतं आता मात्र जास्त लक्ष देऊन अभ्यास करायला लागणार. नंतरचा एक महिना मी दिवस रात्र एक करून अभ्यास करायला सुरुवात केली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हॉल तिकीट मिळालं मुलुंड पश्चिमेला माझं सेंटर आलं. माझ्या मित्रांपैकी माझ्या एकट्याच नंबर त्या शाळेत आला होता. मी एकटा जाऊन शाळा बघून आलो. शाळा स्टेशनवरून लांब होती अर्धा तास चालायला लागत होतं. आदल्या दिवशी परीक्षेसाठी नवीन पेन, पेन्सिल, पॅड सर्व तयारी केली. दहावीचा पहिला पेपर असूनसुध्दा घरातून कोणच मला सोडायला आले नव्हते. आईच्या पाया पडून मी एकटाच निघालो. वेळेच्या आधीच शाळेत पोचलो सर्व मुलं पुस्तक काढून वाचत होते. मी मात्र शांत होतो. मला मी जेवढा अभ्यास केला होता तो पुरेसा वाटायचा. मी शेवटच्या घडीला अभ्यास कधीच केला नव्हता. घरून रोज मला खर्चासाठी एक रुपया मिळायचा. पेपर सुटला की स्टेशन जवळच्या दुकानातून आइस्क्रीम घेऊन खायचो. घरी जाऊन परत पुढच्या पेपरच्या तयारीला लागायचो. कुठलाही विषय कठीण गेला नव्हता सर्व पेपर सोपे होते. माझ्याप्रमाणे मी सर्व विषय चांगले लिहिले होते. गुण मिळणं माझ्या हातात नव्हतं. इतिहासाचा शेवटचा पेपर होता. पेपर सुटल्यावर आम्ही सर्व मित्र एकत्र भेटणार होतो. ठरल्याप्रमाणे मुलुंडला मेहुल सिनेमागृहाच्या बाहेर सर्वजण भेटलो.पेपर कसे गेले? कोणाला कुठल्या विषयांवर अंदाजे किती गुण मिळतील? कुठला पेपर सोपा होता? कुठला कठीण गेला? यावर चर्चा झाली. माझं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. पेपर देऊन झाला होता आता जे गुण मिळणार त्यातच समाधान मानल्याशिवाय बाकी काहीच आपल्या हातात नव्हतं. परीक्षेच्या आधीच माझं ठरलं होतं मुलुंडच्या मेहुल सिनेमागृहात जो चित्रपट असेल तो बघायचा. मेहुलला मनोजकुमार, दिलीपकुमारचा 'क्रांती ' चित्रपट लागला होता. घरून आधीच पैसे घेऊन ठेवले होते. सर्वांनी पैसे काढले तिकीट घेतलं आणि "जिंदगी की ना तुटे लडी प्यार करले घडी दो घडी" क्रांती चित्रपटात मग्न झालो....

Monday, May 4, 2020

डोंबिवलीहून मुलुंडला शाळेत जाताना ट्रेनचा प्रवास देशपांडे सरांकडून मार खाल्लेला एकमेव विद्यार्थी ..

   मी सातवीत असताना कुंदापूर वरून डोंबिवलीत आलो. डोंबिवलीत कन्नड माध्यमाची शाळा नसल्यामुळे मुलुंडच्या V.P.M. कन्नड माध्यममध्ये माझं नांव नोंदवलं. तेव्हापासून मी डोंबिवलीहून मुलुंडला शाळेत जायला लागलो. सुरुवातीला एक-दोन दिवस घरातील कोणीतरी सोडायला आणि न्यायला यायचे. नंतर मात्र मी एकटाच जायला लागलो. मी आणि हरीश शेट्टी मानपाडा रोडवर शिवाजी पुतळ्याजवळ भेटायचो. स्टेशनजवळ सामंत डेअरीच्या बाजूला एका दुकानातून हरीश लिमलेटच चॉकलेट घ्यायचा ते खात खात आम्ही स्टेशनला पोचायचो .

   डोंबिवलीहून मी, हरीश शेट्टी, सीताराम प्रभू, कल्याणहून रेमंड, अंबरनाथवरून चेलुवादी तिमप्पा असे सर्वजण डोंबिवलीत दोन नंबर प्लेटफॉर्मवर अकरा दहाच्या गाडीला भेटायचो. गाडी सुरू झाल्याशिवाय आम्ही चढायचो नाही. नेहमी आम्ही सर्वजण चालती गाडी धावून पकडायचो. गाडीत गर्दी असली तर कधी कधी फर्स्ट क्लासमध्ये चढायचो. आम्ही सगळेच नेहमी दारातच उभे राहायचो. दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे प्रत्येक स्टेशनवर खाली उतरून गाडी सुरू झाली की परत चालू ट्रेनमध्ये चढायचो. ट्रेनमधल्या हँडलला लटकायचो. नेहमी स्लो ट्रेन असायची. आमच्या ट्रेनने एखादी फास्ट ट्रेनला किंवा मेलला मागे टाकल की त्या ट्रेनच्या लोकांना चिडवताना खूप मजा यायची. ट्रेन लेट असेल तर प्लॅटफॉर्म वर क्रिकेट खेळायचो. प्लास्टिकचा चेंडू, मित्रांची कोणाची तरी वही बॅट म्हणून वापरायचो. खेळताना चेंडू लोकांना लागायचा मग काय ओरडा खायाला आम्ही तयार. चेंडू खाली पडला तर उचलायला मी. शाळेत जातानाचा अर्धा तास आणि येतानाचा अर्धा तास खुप मजा असायची. ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्याची मला खूप दया यायची. त्यांचे मळके, फाटके कपडे, न धुतलेला चेहरा बघून, ते जवळ आले की आम्ही  बाजूला सरकायचो. ते दोन दगड घेऊन गाणं म्हणायचे. शक्यतो एकच गाणं असायच "शिर्डीवाले साईबाबा". गाडीला गर्दी कमी असल्यामुळे फळ विकणारे, छोट्या छोट्या वस्तू विकणारे, सारखे ये-जा करायचे. आम्ही त्यांच्या आवाज काढून मष्करी करायचो. गाडीतला तो अर्धा तास कसा जायचा कळायचा पण नाही.

मुलुंड स्टेशनवरून शाळा तशी खूप लांब होती. चालत जायला कमीत कमी अर्धा तास तरी लागायचा. त्या अर्धा तासात पण आमची मस्ती असायची. मुलुंड पूर्वेला शाळेत जाताना मिठाघर रोडवर खूप चिंचेची झाडं होती. मग काय दगड मारून चिंच पडायचो. बारा चाळीसची शाळा असायची. त्या आधीच आम्ही शाळेजवळ पोचायचो. शाळा सुरू होईपर्यंत कबड्डी खेळताना हाता-पायाला मार लागायचा, पण कधीच तिकडे लक्ष्य दिलं नाही. आमच्या ग्राऊंडमधून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून मोठ-मोठ्या गाड्या वेगानं जाताना दिसायचा. शाळेच्या बाजूला केळकर कॉलेजच बांधकाम सुरू असताना आम्ही बघितलं. आधी त्याच जागेवर क्रिकेट खेळायचो, चेंडू हरवला तर सापडायचा नाही, कारण पुढे संपूर्ण दलदल होती.

मला सर्वात चांगले शिक्षक लाभले होते. त्यातल्या त्यात जवळगिरी सर, देशपांडे सर तसा मी वर्गात शांत असायचो. तिसऱ्या चौथ्या बेंचवर बसायचो. मधल्यासुट्टीत एकत्र डब्बा खाऊन, धकाबुकीं करून सरळ नळाला तोंड देऊन पाणी पिण्याची मजा काही वेगळीच. शारीरिक शिक्षण तासाला मी तर कधीच सरळ उभा राहिलो नाही. कधी ह्याला चिमटा काढ तर कधी कोणाचं शर्ट ओढ्याच, तर कोणाच्या पायावर पाय द्यायचा. पण कधी सराकडून मार खाल्ला नाही.

नववीत असताना कन्नडचा तास होता. आम्हाला कन्नड शिकवायला देशपांडे सर होते ते डोंबिवलीत राहायचे. खूप शांत प्रेमळ स्वभावाचे.आम्हा सर्वांना ते आवडायचे.अधून-मधून छान गोष्टीही सांगायचे आम्ही मन लावून ऐकायचो. एकदा देशपांडे सरांचा तास होता, माझ्या बाजूच्या मित्रांनी घरून सरानी दिलेल होमवर्क करून आणलं नव्हतं सरानी त्याला उभं केलं सर आपले कन्नड शिकवत होते तास संपायला आला सरानी बाजूच्या मित्राला समजावून सांगितलं उद्यापासून नीट होमवर्क करत जा आणि ते फळावर लिहायला वळले, मित्राला बसायला सांगितलं मी मष्करी म्हणून त्याच्या बेंच वर माझी पेन्सिल उभी धरली होती तो त्या पेन्सिलवर बसला, त्याला पेन्सिल जोरात टोचली आणि तो जोरात किंचाळला. सर्व विध्यार्थी आमच्याकडे बघायला लागले. त्याचा आवाज बाजूच्या दोन्ही वर्गात ऐकायला गेला. त्याला पेन्सिल जोरात टोचली होती. खूप दुखत होतं, त्याला रडायला आलं, रडला पण. सरानी मागे वळून पाहिल की मित्र रडत होता. सरानी आमच्या डेस्क जवळ येऊन विचारल, एवढं किंचाळयाला काय झालं? त्यांनी घडलेलं सांगितलं सरानी मला उभं केलं आणि विचारलं तू पेन्सिल ठेवली होती का? मी मान खाली घालून हो बोलताच सरानी हातानी जोरात माझ्या कानखाली वाजवली. अख्या वर्गात आवाज गुंजला. वर्गातले सर्व माझ्याकडे वळून पाहत होते. मी रडलो सराना सॉरी बोललो परत करणार नाही असं सांगितलं. मित्राला पण सॉरी बोललो. मित्राला पेन्सिलच टोक टोचल्यामुळे खूप दुखत होतं. माझ्या आयुष्यातील शाळेमधील ती खूप मोठी घटना होती. माझी चूक मला कळली. मला असं करायला नको होतं. मी मस्ती करायचो नंतर मला त्याची जाणीव व्हायची. सर खूप चांगले होते त्यांनी कधीच कोणवरही हात उचलला नव्हता, मारलं ही नव्हतं. माझ्या मस्तीमुळे पहिल्यांदा त्यांच्याकडून मी मार खाल्ला. नंतर कधी डोंबिवलीत ते मला भेटले तर ते सांगायचे माझ्याकडून मार खाल्लेला एकमेव विद्यार्थी....

Saturday, May 2, 2020

वयाच्या चौदाव्या वर्षी एका छत्रीसाठी रुळावरून ठाणे ते मुलुंड चालत जाण्याचा साहस....

(1979) मी आठवी पास होऊन नववीत गेलो .मे महिन्याची सुट्टी होती .इमारतीतले बरेचसे मित्र गावाला गेले .जे मित्र होते त्यांच्याबरोबर पत्ते खेळायचो. पत्ते खेळताना जोरदार भांडण ही व्हायची, बाजूच्यांचे पत्ते    बघून खेळतो ,पत्ते असून टाकत नाही वगैरे. त्या भांडण्यामागे पण प्रेम असायच .भांडण खेळण्यापूरतच खेळ संपला की परत सर्व एकत्र!!क्रिकेट मॅच असलं की मुन्नाच्या घरी, मी ,मुन्ना ,रुपेश आणि अजून कोण मित्र आले तर.मॅच बघताना गरम गरम खायलाही मिळायचं.मुन्नाची आई जयाबेन आणि बहीण हीना मस्तपैकी खायला आणून ठेवायचे .हीना चांगले पदार्थ बनवायची आणि तशी तिला नवीन पदार्थ बनविण्याची आवड होतीच. खरं तर मुन्नाचे घर माझं दुसरं घर होत. त्याचे वडील हर्षद भाई पण मला खूप आवडायचे शांत आणि प्रेमळ स्वभावाचे .

मे महिना संपत आला होता.काही दिवसांनी शाळा सुरू होणार होती.मला कधी एकदा शाळा सुरू होणार असं झालं होतं.एक सकाळी साडे दहाला घरून बाहेर पडलो की सरळ सात वाजता घरी यायचो. तो  ट्रेनचा प्रवास,शाळेतील मित्र शाळेतील मस्ती खूप मजा यायची .
त्यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला होता.जून तेरा तारखेला शाळा सुरू होणार होती .आमचं स्वतः च पुस्तकाचं दुकानं होत.आम्ही दुकानात  कन्नड पुस्तक ठेवत नव्हतो.अण्णाने माझ्यासाठी नववीची कन्नड माध्यमाची पुस्तक आणली.प्रेमक्काने पुस्तकांना, वह्याना कव्हर घालून दिले. आठवीचे कपडे होते त्यामुळे नवीन कपडे शिवले नव्हते.सर्व तयारी झाली होती .बुधवारी जून तेरा तारखेला शाळा सुरू होणार .जोरदार पावसाला सुरुवात झाली.काही दिवस सतत पाऊस पडत होता .शाळेत जाण्यासाठी माझ्याकडे छत्री नव्हती घरून डोंबिवली स्टेशन,मुलुंडवरून शाळा इथपर्यंत चालत जावं लागतं होतं.मुलुंड स्टेशनवरून शाळा तशी लांब होती .जवळ जवळ अर्धा तास चालत जावं लागायचं,त्यामुळे छत्री किंवा रेनकोट आवश्यक होतं..प्रेमक्का,वहिनीने मिळून मला काळ्या रंगाची गोल हातवाली नवीन छत्री आणली. नवीन कुठलीही वस्तू आणली की ती मला जवळ लागायची.त्यादिवशी मी छत्री जवळ घेऊनच झोपलो होतो.

   बुधवार तेरा जुनं १९७९ शाळेचा  नववीतला पहिला दिवस .सकाळचं नास्ता करून डबा घेऊन दप्तर,नवीन छत्री सर्व तयारीने शाळेसाठी निघालो.
नेहमीप्रमाणे अकरा दहाची गाडी होती .वाटेवर डोंबिवलीहून जाणार माझा मित्र हरीश शेट्टी पण भेटला.पहिलाच दिवस होता दोघांनी मुलुंडच रिटर्न तिकीट काढलं.शाळेत गेलो की स्कूल कनसेशन फॉर्म भरणार होतो जेणे करून पास काढता येणार होतं. तिकीट काढून दोन नंबर प्लॅटफॉर्मवर पोचलो. गाडी आली आम्ही दोघे गाडीवर चढलो. नेहमी कल्याणवरून रेमंड रोद्रीगस,अंबरनाथ वरून चेलुवादी तिमप्पा डब्यात असायचे.आज शाळेचा पहिलाच दिवस त्यामुळे मी आणि फक्त हरीश होतो. लोकलला गर्दी कमी होती. नेहमीप्रमाणे आम्ही बाहेरच दारात उभे होतो.महिन्याभरात केलेल्या गोष्टीं एकमेकांना सांगत होतो.मी हरीशला हाजी मलंग गडची सहल पण सांगितली.गप्पा मारता मारता ठाणे स्टेशन आलं,पुढचं स्टेशन मुलुंड ,आम्ही अजून डाव्या बाजूच्या दारावर उभे होतो .गाडीने ठाण्याच्या ब्रिज क्रॉस केला तेव्हा एकच ब्रिज होता.इतक्यात माझ्या हातून नवीन छत्री सटकली आणि ट्रेनमधून खाली पडली .मला खूप रडायला आलं .बाहेर बघितलं रुळावर कोण दिसतंय का? कोणचं नव्हतं.पण छत्री दिसत होती .काय करायचं सुचेना? हरीश पण घाबरला .मुलुंड स्टेशन आलं आम्ही दोघे उतरलो.हरीशला सांगितलं तू पुढे जा मी येतो छत्री घेऊन .तसाच एक नंबर प्लॅटफॉर्म वर गेलो तिकडून ठाणे लोकल पकडली .ट्रेन सुटल्यावर दरवाजात उभे राहून दोन्ही बाजूला छत्री कुठे दिसते का बघितलं. छत्रीचा नामोनिशाण नव्हत .मी रडकुंडीस आलो घरी काय सांगू कष्ट करून नवीन छत्री घेऊन दिली होती. अजून मी  एकदाही छत्रीचा वापर केला नव्हता .ठाणे स्टेशनवर उतरलो .काय करायचं विचार करत होतो.सरळ रुळावरून मुलुंड जायचं ठरवलं .चालत प्लॅटफॉर्म वरून खाली उतरलो .मुलुंडच्या दिशेने रुळावरून चालत निघालो. ठाण्याच्या एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला एक रिकामी ट्रॅक होतं. त्या ट्रॅकवरून गाड्या येत जात नव्हत्या. रुळावर पूर्वेकडुन पश्चिमेला जाणारी माणसं, अजून काही रेल्वे कर्मचारी काम करत होते मला रडायला येत होतं. शाळेचा गणवेश पाठीवर दप्तर बघून मला काही लोकांनी  कुठे चाललास?काय झालं? विचारलं. मी छत्री पडल्याची सांगितलं .त्यांनी मला विचारलं कुठे पडली? कशी पडली? इतका वेळ तिकडे छत्री असेल का?तू सरळ गाडी पकडून शाळेत जा. छत्री मिळण्याची शक्यता कमी आहे!!त्यांचं ऐकून अजून रडायला आलं. तरी मी रुळावरून सरळ चालत होतो .नशीब  पाऊस नव्हता ऊन फार भयंकर होत.त्यात ती तापलेली पटरी. वीस मिनिट चालल्यावर ब्रिज आला.    आजूबाजूला जाम घाण होती,घाणेरडा वास पण येत होता .नाक बंद करून पुढे निघालो .आता मात्र काही झाडी लागली .काही दिवसांपूर्वी पाऊस आल्यामुळे हिरवळ होती .माझ्या डोळ्यासमोर फक्त छत्री दिसत होती.आजूबाजूला शोधत होतो .थोडं पुढे गेल्यावर जिथे छत्री पडली होती तिकडे काही माणसं दिसली पण छत्री नव्हती. त्या माणसांना विचारलं एका तासापूर्वी  ट्रेनमधून माझी छत्री पडली होती  कोणी बघितली का?ते बोलले  अरे इतका वेळ छत्री थोडी राहणार !!इथं तर नाहीये आम्ही नाही बघितली.काय करायचं कळेना चालून चालून पाय दुखायला लागले.ट्रेकच्या आजूबाजूला बाजूच्या झाडीत कुठेच छत्री सापडली नाही. जवळ जवळ एक तास चालत होतो. एवढं करूनसुद्धा निराशाच हाती लागली .तसाच मुलुंड स्टेशनच्या एक नंबर प्लेटफॉर्म वर पोचलो.समोर घड्याळात दीड वाजायला आले होते .समजा शाळेत गेलो तर दोन वाजले असते. शाळेचा पहिलाच दिवस होता शाळा लवकर सुटणार ,जाऊन काहीच उपयोग नव्हता.छत्री हरवल्यामुळे हताश झालो होतो .घरी काय सांगायचं घरचे काय बोलतील मनात विचार येत होते.तेवढयात ट्रेन आली तिच ट्रेन पकडली.पाय दुखत होते,भूक ही लागली होती .सरळ आत जाऊन बसलो. दप्तर मधून वहिनीने दिलेला डबा काढला, सर्व डबा संपवून टाकला .परत तेच विचार घरी काय सांगू .डोंबिवली स्टेशनला उतरलो थोड्या वेळात घरी पोचलो .एवढ्या लवकर कसं काय आलास ? घरच्यांनी विचारलं खोटं बोललो, शाळेचा पहिला दिवस होता ना म्हणून शाळा लवकर सुटली.आईने विचारलं नवीन छत्री घेऊन दिलेली दिसत नाही हरवलीस की काय? तेव्हा मात्र  खरं सांगावं लागलं .मला रडू आवरलं नाही,ढसा ढसा रडायला लागलो घडलेलं सर्व सांगितलं.आईला खूप वाईट वाटलं एका छत्रीसाठी हा एवढा चालत गेला !! सर्वांनी बजावलं या पुढे ट्रेनच्या दरवाजेत उभा राहच नाही, रुळावरून चालायचं पण नाही. रडू नकोस आम्ही दुसरी छत्री घेऊन देऊ तुला ..आईने जेवण वाढलं,थोडंसंच जेवलो  कधीच दुपारी न झोपणार थकून गेल्यामुळे झोपून गेलो झोपताना रुळावरून चाल्यासारखे दिसत होतं . वयाच्या चौदाव्या वर्षी रुळावरून ठाणे ते मुलुंड एकटा चालत जाण्याचा पराक्रम मी केला होता ......