Wednesday, December 30, 2020

मी परत एकदा वाचनालयाकडे पुर्ण लक्ष देऊ लागलो...

"जशी दृष्टी तशी सृष्टी" असं म्हटले जाते. सृष्टी तर माणुस बदलू शकत नाही. परंतु दृष्टी बदलू शकतो. दृष्टी बदलली की सृष्टी आपोआपच बदलते. कोणतीही वस्तू जेवढी जवळून पाहू तेवढी ती अधिक मोठी दिसते. परंतु त्याच वस्तूला थोडेसे दुरून तटस्थपणे पाहिले की तीच वस्तू छोटी वाटू लागते. वस्तू तीच असते. वस्तूमध्ये बदल होत नाही. परंतु बदलते ती आपली दृष्टी किंवा दृष्टीकोन. दुःखाने भावूक झालेल्या व्यक्तीला समस्त सृष्टी दुःखी वाटते. मनुष्य दुःखाशी जेवढे आसक्त होत जातो तेवढे त्याला ते दुःख अधिकाधिक मोठे वाटू लागते. परंतु त्याच दुःखाकडे कर्माच्या सिद्धांतानुसार प्रारब्धाचे भोग समजून दुरून तटस्थपणे पहायला सुरूवात केली की ते दुःख हलके व सुसह्य करणारी दृष्टी प्राप्त होऊ लागते. 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे कडू औषध मग ती व्यक्ती स्विकारू लागते. संतोषच्या उपचारानंतर मला सुद्धा भावनेपेक्षा दैनंदिन कर्तव्य कर्मांकडे घेऊन जाणारे कडू औषध घेणे हेच योग्य आहे ही दृष्टी मिळू लागली होती. 


स्नायुक्षय (मस्क्युलर डिस्ट्रॉपी) हा बरा न होणारा व कुठेही औषध उपलब्ध नसणारा असा अत्यंत दुर्मिळ असलेला आजार दुर्दैवाने संतोषला झाला होता. मला त्याच्या भविष्याची चिंता वाटत असली तरी माझ्याकडून जे काही करता येईल ते मी करीतच होतो. दररोज माझी आणि सुमनची या विषयावर चर्चा होत होती. परदेशात जाऊन संतोषवर औषधोपचार करून आल्यावर आम्ही दोघांनी ठरवले की यापुढे जास्त विचार करायचा नाही व आपण आपल्या दैनंदिन कर्तव्य कर्मांकडे लक्ष द्यायचे. संतोषकडे जराही दुर्लक्ष न करीता त्याला ज्या काही सुखसुविधा देता येतील त्या सर्व देण्याचा प्रयत्न करायचाच परंतु हे करीत असताना आपल्या दैनंदिन कर्तव्यकर्मांकडे सुद्धा दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायचे आम्ही ठरवले. यामुळे दोघांच्या दुःखाचा भार थोडासा कमी होणार होता. लक्ष दुसरीकडे लागल्याने मन थोडेसे हलकं होणार होते अन्यथा तोच तोच विचार करून आम्हा दोघांना खूप त्रास होणार हे नक्की होते. त्याचा परिणाम आम्हा दोघांच्या प्रकृतीवर पडण्याची शक्यता सुद्धा होतीच. यावर एकच उपाय होता व तो म्हणजे आम्ही दोघांनी स्वतःला आपापल्या रोजच्या कामात गुंतवून आपले लक्ष दुसरीकडे वळवणे.


वाचनालयाच्या व्यवसायक्षेत्रात खूप प्रगती करायची व खूप मोठं नाव कमवायचे हे माझे ध्येय होते. मी एकटा काहीच करू शकणार नाही याची मला जाणीव होती. माझ्याबरोबर असलेल्या कष्टाळू, प्रामाणिक कर्मचारी वर्गाला मी त्यासाठी विश्वासात घेऊन त्यांना जास्तीत जास्त चांगले मार्गदर्शन केले होते. वाचनालयाबद्दलचे माझे ज्ञान व अनुभव त्यांना दिले होते. कर्मचाऱ्यांनी सुद्धा मला आतापर्यंत योग्य तो उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता. यापुढे सुद्धा हेच धोरण राबविले तरच उतरतीकळा लागलेल्या वाचनालयाच्या व्यवसायक्षेत्रामध्ये आपण टिकून राहून प्रगती करू शकतो याची मला खात्री होती. आपल्या वाचनालयाच्या टिळकनगर शाखेमधील कर्मचारी अजय, मामा, गोडबोले तसेच शैक्षणिक विभागातील नवगरे काका अश्या चार महत्वाच्या कर्मचाऱ्यांची एक चिंतन बैठक (मिटिंग) घ्यायचे मी ठरवले. माझ्या अनुपस्थितीत हीच मंडळी वाचनालय उत्तमप्रकारे सांभाळत आली होती. चिंतन बैठक कुठे, कधी घ्यायची यावर मी विचार करू लागलो. या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मलाच घ्यावा लागणार होता.


आपली फ्रेंड्स लायब्ररीची टिळकनगरमधील शाखा खूप लहान होती. त्या जागेत मला अपेक्षित असलेली चिंतन बैठक घेणे शक्य नव्हते. जपान लाईफ कंपनीमध्ये असताना चर्चासत्र, बैठका घेण्याचा मी भरपुर अनुभव घेतला होता. अर्थात त्या कंपनीप्रमाणे मोठमोठ्या पंचतारांकित उपहारगृहात (हॉटेलमध्ये) चिंतन बैठक घेणे मला परवडणारे नव्हते. डोंबिवलीच्या मानपाडा रस्त्यावरील गोदरेज शोरूम समोरील गुरुप्रसाद उपहारगृह (हॉटेल) मी सदर बैठकीसाठी निश्चित केले. वाचनालयातील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करणे ही कल्पना काही जणांना विचित्र वाटत होती. मी काही लोकांशी याबद्दल बोललो तेव्हा त्यांनी आश्चर्य सुद्धा व्यक्त केले. वाचनालयाच्या पुढच्या वाटचालीसाठी तसेच उतरती कळा लागून एका मागोमाग बंद होत चाललेल्या वाचनालयांच्या क्षेत्रात व्यवसायिक यश मिळवण्यासाठी सदर चिंतन बैठक घेणे मला आवश्यक वाटत होते. आज अमुक वाचनालय बंद पडले, वाचनालयाच्या सभासदांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, या व्यवसायात नफा राहीला नाही वगैरे बातम्या माझ्यासह कर्मचाऱ्यांच्या सुद्धा कानावर पडत होत्या. तेव्हा त्यांच्या मनातील संभ्रम व भविष्यकालीन चिंता दूर करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे हे मला जास्त महत्वाचे व गरजेचे वाटत होते. संतोषच्या उपचारानंतर सन २००७च्या जानेवारीमध्ये सदर बैठक त्यासाठीच मी आयोजित करीत होतो. 


सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना मी अगोदरच चिंतन बैठकीची (मिटिंगची) कल्पना देऊन ठेवली होती. शनिवारी रात्री वाचनालय बंद झाल्यावर त्या सर्वांना मी गुरुप्रसाद उपहारगृहात घेऊन गेलो. अजय, मामा, गोडबोले, नवगरे काका आणि मी अश्या पाच उपस्थितांसाठी पाच जेवणाच्या थाळ्या मागविल्या. जेवण येईपर्यंत सर्वांशी गप्पा मारल्या. सर्वांना वाचनालयाच्या पुढच्या वाटचालीबद्दल व नवीन उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. सभासद वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? सभासदांच्या समस्या, मागण्या व गरजा कोणत्या?, वाचनालयात काही सुधारणा झाल्या पाहिजेत का?, कर्मचार्‍यांच्या स्वतःच्या समस्या कोणत्या आहेत? वगैरे सर्व विषयांवर त्या बैठकीत चर्चा झाली. थोडयावेळाने जेवण आले. सर्वांनी गप्पा मारीत जेवणाचा आस्वाद घेतला. एक तासाच्या या चिंतन बैठकीनंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. भविष्यकालीन चिंता व संभ्रम यांचे मळभ दूर झाल्यामुळे त्या बैठकीनंतर सर्व कर्मचारी वर्गात खूपच उत्साह संचारला होता. सन २००७च्या जानेवारीमध्ये गुरुप्रसाद उपहारगृहात घेतलेली पै फ्रेंड्स लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांची ही पहिलीच चिंतन बैठक होती.


सन २००७ च्या फेब्रुवारी महिन्यात एकदिवशी टिळकनगरच्या वाचनालयात एक ओळखीच्या महिला सभासद मला भेटायला आल्या. त्या नियमितपणे वाचनालयात येत असत. "आपल्या वाचनालयात कामासाठी एखाद्या मुलीची नियुक्ती करण्याचा विचार आहे का?" असा त्यांनी मला प्रश्न विचारला. "आमच्या शेजारी नूतन नावाची एक मुलगी राहते. ती कोकणातून इथे आली आहे. सध्या कामाच्या शोधात आहे. जवळपास काम मिळाले तर तिची काम करण्याची इच्छा आहे" अशी माहिती सुद्धा त्यांनी मला दिली. "सध्या तरी असा काही विचार नाही. इथे माझ्याकडे पुरेसे कर्मचारी आहेत. परंतु आपल्या वाचनालयाच्या शैक्षणिक विभागात मुलगी नेमणे आहे. तुम्ही उद्या तुमच्या सोबत तिला घेवून या. तिच्याशी बोलणे झाल्यावर मी काय ते सांगू शकतो", असं मी त्यांना उत्तर दिले. "मी तिला उद्याच घेवून येते" असं सांगून त्या महिला सभासद निघून गेल्या.


फ्रेंड्स लायब्ररीच्या टिळकनगर शाखेच्या बाजूला पिठाची गिरणी असल्यामुळे गिरणीचे पीठ आपल्या वाचनालयाच्या विद्यापिठात पिठा-पिठाचा बादरायण संबंध दाखवत आगंतुक पाहुण्यासारखे कायमच्या वस्तीला यायचे. लोकांचा पिठ व विद्यापीठ यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून पुस्तकांची वारंवार साफफाई करून आगंतुक पाहुण्याला हाकलावे लागायचे. या आगंतुक पाहुण्याची आपल्या विद्यापीठात एवढी वर्दळ असे की काळे केस रात्रीपर्यंत पांढरे होवून जायचे. टिळकनगरचे आपले वाचनालय पुस्तकाने खचून भरलेले असल्याने बसायला जागा शिल्लक राहीली नव्हती. त्यामुळे तिथे मुलींना कामावर नेमण्याच्या मी विरूद्ध होतो. सकाळी काळ्या केसांची तरूण मुलगी रात्री पांढर्‍या केसांची म्हातारी होऊन बाहेर पडताना लोकांना दिसली असती हे सुद्धा मला मान्य नव्हते. परंतु शैक्षणिक विभागात एक कर्मचारी नेमण्याचा माझा विचार होता. तो विभाग सांभाळणारे नवगरे काका सुट्टीवर गेले की माझी पंचाईत व्हायची. दुसऱ्याच दिवशी त्या महिला सभासद नूतन नावाच्या मुलीला घेवून आल्या. नूतन दिसायला सुंदर होती. तिचा पेहराव सुसभ्य होता. तिचे बोलणे सुद्धा संयमित होते. नेहमीचेच काही प्रश्न विचारून मी तीला उद्यापासून कामावर येण्यास सांगितले. एवढ्या कमी पगारात ती माझ्याकडे किती दिवस काम करेल याबाबत मी साशंक होतो.

नूतन 

दुसऱ्या दिवसापासून नूतन कामावर यायला लागली. शैक्षणिक विभागात जास्त काम नसल्याने एकदा का साफसफाई झाली की ती भ्रमणध्वनीवर (मोबाईलवर) गाणी ऐकत बसायची. काही दिवसांनी मी तिला आपल्या टिळकनगरमधील मुख्य शाखेत बोलावून घेतले. ज्यादिवशी नूतन मुख्य शाखेत आली त्या दिवसापासून तिने सर्व कामे शिकायला सुरुवात केली. संगणकावर विविध नोंदी करणे, पुस्तकं जागेवर लावणे, वर्गणीची पावती बनविणे, सभासदांशी सुसंवाद साधणे, रात्री निघण्यापुर्वी हिशोब करणे वगैरे सर्व कामे तिने पटापट शिकून घेतली. तिच्यामुळे माझी बरीचशी कामे कमी झाली.


वाचनालयाची सुरुवात जरी मी केली असली तरी आतापर्यंत माझ्याकडे रूजु झालेल्या कर्मचाऱ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळाले होते. त्यांनी दिलेले अनेक सल्ले मी अंमलात आणले होते व त्यात मला कधीच कमीपणा वाटला नव्हता. जे योग्य ते योग्यच हीच माझी त्यामागची भूमिका होती. नूतनकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे हे मला लक्षात येत होते. ती कधीच सुट्टी घेत नव्हती. सकाळी नऊ वाजता कामावर रूजु होण्याची तिची वेळ होती, त्यासाठी ती पाच मिनिटे आधीच यायची. एकदा वाचनालयात आली की दिलेले प्रत्येक काम ती न विसरता नियमितपणे करायची. कोणतेही काम दुसर्‍या दिवसांसाठी शिल्लक ठेवायची नाही. कामं प्रलंबित ठेवणे हा प्रकारच तीला मान्य नव्हता. नेहमी हसतुख राहून सर्व सभासदांशी सुसंवाद साधायची. वाचनालयात सुधारणा करण्यासाठी तिने अनेकवेळा मला सल्ले दिले होते. मी, अजय, मामा, गोडबोले आणि नूतन मिळून टिळकनगर शाखेतील सर्व सभासदांना उतम सुविधा देण्याचा प्रयत्न करायचो. नूतन दोनच वर्षे वाचनालयात होती परंतु आपल्या कामाची व व्यक्तीमत्वाची तीने छाप पाडली होती. नंतर तीचे लग्न ठरले. डोंबिवली सोडून बाहेर जायला टाळाटाळ करणारा मी कोकणात तिच्या लग्नाला जातीने हजर होतो. वेळेचे व्यवस्थापन नूतनकडून मला शिकायला मिळाले होते. आज सुद्धा मी जेव्हा कर्मचाऱ्यांची बैठक घेतो तेव्हा वेळेच्या बाबतीत नूतनचे उदाहरण मी न विसरता देत असतो. नूतन आली परंतु वरून न दिसणारे वाचनालयाचे, मनाचे नूतनीकरण करून गेली. संतोषच्या आजारपणामुळे खिन्न झालेल्या माझ्या मनाला दैनंदिन कर्तव्यकर्म करण्यासाठी मनाचे हे नुतनीकरण उपयोगी पडत होते. दृष्टी बदलल्यामुळे मला आता सृष्टी सुद्धा बदलल्यासारखी वाटत होती. कर्माच्या सिद्धांतानुसार मी आता संतोषच्या आजाराकडे पाहण्याचा प्रयत्न करीत होतो व मनातील दुःखाला वेसण घालायला शिकत होतो....

Friday, December 25, 2020

संतोषवर विदेशात उपचार झाल्यावर परत भारतात आगमन...

"तुझ्या-माझ्या संसाराला आणि काय हवं?

तुझ्या-माझ्या लेकराला घरकुल नवं,

नव्या घरामंदी काय नविन घडंल?

घरकुला संग समदं येगळं होईल, 

दिस जातील, दिस येतील, 

भोग सरंल, सुख येईल", या आशेवर जगातील यच्चयावत संसारी जीवात्मे दुःखाशी संघर्ष करीत व स्वप्नं रंगवीत संसाराचे रहाटगाडे ओढत असतात. सर्व दुःख भोग आपोआप संपत नसतात. काही दुःख भोगांवर अथक प्रयत्न केल्यावर मात करता येते. दुःख सरेल की नाही हा परिणाम आपल्या हातात नसला तरी कर्तव्यपुर्तीचे समाधान त्या अथक प्रयत्नातून नक्कीच लाभते. संतोषवर उपचार केल्यावर पितृकर्तव्याची पुर्तता केल्याचे समाधान मला मिळाले असले तरी ते करीत असताना झालेले समाजऋण फेडणे अजून बाकी होते. आता त्याची पुर्तता करण्याची मी तयारी करू लागलो होतो.


डोमिनिकन रिपब्लिक देशात कधी एकदा पोहोचतो व संतोषवर उपचार करवून घेतो असं मुंबईहून निघण्यापूर्वी सारखं वाटायचे. शनिवार, दिनांक २ डिसेंबर २००६ रोजी संतोषवर मुलभूत पेशींचा (स्टेम सेल्सचा) उपचार झाल्यावर त्याला रुग्णालयातून जेव्हा परत खोलीवर मी घेऊन आलो तेव्हा मला माझ्या मनावरचा खूप मोठा ताण कमी झाल्यासारखे वाटले. त्याच दिवशी संध्याकाळी सुमनला दूरध्वनी करून सविस्तर माहिती दिली. ती सुद्धा माझ्या दूरध्वनीची वाट पाहत होती. तिला हरवलेली बॅग मिळल्याचेही सांगितले. संतोष बरोबर सुद्धा तीचे बोलणं झाले. दूरध्वनीवरून संतोषचा आवाज ऐकताना तिच्या काळजाचे अक्षरशः पाणी पाणी झाले. संतोषशी बोलल्यावर तिला खूप बरं वाटले. आमच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे तिने सांगितले. दिनांक ४ डिसेंबर रोजी आमचे परतीचे तिकीट असल्याने अजून दोन दिवस आम्हाला तिथेच कॅसा दि कँम्पो या विश्रामधाममध्येच राहायला लागणार होते. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आम्ही दोघांनी मजेत घालवले. उपचाराआधीचे दिवस आणि आताचे दिवस यामध्ये खूप फरक जाणवत होता. उपचार होण्यापुर्वी मनावर पडलेला ताण आता कमी झाल्याने नंतरचे दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही.


सोमवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी आमचे परतीचे विमान होते. काहीच काम नसल्याने बॅगेतील सर्व खाद्यपदार्थ आम्ही दोघांनी दोन दिवसात संपवून टाकले होते. वेळ घालवण्यासाठी आम्ही दोघे अधून मधून पत्ते सुद्धा खेळायचो. सोमवारी निघायच्या दिवशी सकाळचा नाष्टा केल्यावर अकरा वाजता आम्ही विमानतळावर जाण्यासाठी गाडी मागवली. सुमारे एक वाजता आम्ही डोमेनिकन रिपब्लिकच्या सॅन्टो डोमिंगो या विमानतळावर पोहोचलो. भारतातून फ्रँकफर्टमार्गे जेव्हा इथे पोहचलो होतो तेव्हा सर्वत्र अंधार होता, त्यामुळे विमानतळ व तिथला परिसर नीट पाहता आला नव्हता. आता परत त्याच विमानतळावर भरदिवसा पोहचत होतो. दिवसाच्या प्रकाशात विमानतळ खूप छान दिसत होते. विमानतळ छोटं असले तरी स्वच्छ आणि सुंदर होते. प्रवाश्यांची वर्दळ खूपच कमी होती. दिवसातून मोजकीच विमान उड्डाणे तिथून होत असल्याने फारशी वर्दळ नसावी. आम्ही एक तास आधीच पोहोचलो होतो. आमचे विमान वेळेवर निघाले. संतोषला ज्या उपचारासाठी आणले होते ते सोपस्कार पार पाडल्यामुळे प्रवास करताना एक वेगळीच आनंदानुभूती होत होती.


दिनांक ४ डिसेंबर रोजी डोमिनिकन रिपब्लिक देशातून निघालो व ५ डिसेंबरला फ्रँकफर्ट विमानतळावर पोहोचलो. यावेळी फ्रँकफर्ट विमानतळावर आम्हाला फक्त सहा तास घालवायचे होते. आधीचा अनुभव असल्याने फ्रँकफर्ट विमानतळ परिचयाचे झाले होते. आम्ही दोघे खूप हिंडलो फिरलो. माझ्या बरोबर संतोषने सुद्धा तिथल्या मुशाफिरीचा आनंद लुटला. दिनांक ५ डिसेंबर रोजी फ्रँकफर्टवरून निघून बुधवारी ६ डिसेंबरला संध्याकाळी सुमारे ५ वाजता आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचलो. घरी पोहोचेपर्यंत आठ वाजले होते. सुमनला आम्ही येत असल्याचे अगोदरच कळवले होते. तिने गरम गरम चहा बनवून तयार ठेवला होता. चहा बरोबर आठ दहा मारी बिस्कीटे संपवली. थोड्याच वेळात सुमनने निरडोसा बनवून दिला. बर्‍याच दिवसांनी सुमनच्या हातचा नीरडोसा खायला मिळत होता. बाह्या सरसावून त्यावर तुटून पडलो. मी एकट्याने किमान आठदहा निरडोसे संपवले असतील. संतोषचा स्कोअर माहित नाही. इथे बाप से बेटा सवाई असू शकतो. तो अगोदरच वजनदार गटात सामील झाला होता. आपला नवरा व मुलगा आज बकासुर व भस्मासुर का झाले आहेत हे सुमनने ओळखले होते. तोंड बंद ठेऊन ती गुमान निरडोसे बनवत गेली व आमची तोंडे बंद करीत राहीली. गेले आठ दिवस नुसते पाव आणि मख्खन (बटर) खाऊन जीव पार मेटकुटीला आला होता. दुष्काळग्रस्त भागातून आल्यासारखा आत्मा बुभुक्षित झाला होता. सुमनच्या हातचा नीरडोसा पाहिल्यावर आत्मा बेभान झाला. बर्‍याच दिवसांनी घरचा नीरडोसा मनसोक्त खायला मिळाल्यामुळे क्षुधाशांती, आत्मशांती म्हणजे काय असते त्याची प्रत्यक्ष अनुभूती मी घेत होतो. भरल्या पोटात आनंद थुईथुई नाचत होता. सुमनच्या हातचे नीरडोसे खाताना मला ब्रह्मांनंदी टाळी लागली होती. 


लगेच दुसऱ्याच दिवसापासून वाचनालयाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. संतोषच्या उपचारासाठी मी बाहेरच्या देशात जाऊन आल्याचे काही जणांना समजले होते. काही लोकं मला भेटायला वाचनालयात येत असत. संतोषच्या तब्येतीची विचारपूस करीत असत. आता माझे एकच लक्ष्य होते व ते म्हणजे लोकांकडून उपचारासाठी घेतलेले पैसे परत करणे. समाजऋण फेडून कर्तव्यपुर्ती करणे आवश्यक होते. जर संतोषच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली असती तर सर्वांनी माझे कौतुक केले असते. परंतु समजा जर प्रकृतीत काही फरकच पडला नसता तर लोकांकडून मला खूप काही ऐकायला लागले असते. त्यामुळे सर्वांचे पैसे परत करायचे ठरविले. फक्त वाचनालयाच्या उत्पन्नातून एवढे पैसे परत करणे कठीणच होते. एका महिन्यात सर्वांचे पैसे परत करायचे ठरवले व ते सुद्धा वाचनालयाकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता. संतोषच्या उपचारामुळे माझे वाचनालयाकडे दुर्लक्ष झाले होते. अजय, मामा आणि गोडबोले उत्तमरीत्या वाचनालयाचा कारभार संभाळत होते. परंतु माझी निर्णायक उपस्थिती सुद्धा गरजेची होती.


लोकांकडून घेतलेले केवळ एक दोन लाख रूपये नव्हे तर तब्बल १६ लाख रुपये मला परत करायचे होते. सर्वांनी दिलेल्या धनादेशाच्या (चेकच्या) छायाप्रती (झेरॉक्स) मी काढून ठेवल्या होत्या. सुरुवातीला छोटछोट्या रक्कमांची उधारी संपवायचे ठरवले. घरात जेवढे दागिने होते ते सर्व बाहेर काढायचे ठरवले. सुमनने संकोच न करीता व कोणतेही आढेवेढे न घेता सर्व दागिने माझ्या स्वाधीन केले. आम्ही जास्त करून डोंबिवलीच्या पश्चिमेकडील शिरोडकर ज्वेलर्सकडून दागिने बनवून घेतले होते. सर्व दागिने त्यांच्याकडे परत केले. "एवढे दागिने का विकत आहात?" असा प्रश्न त्यांनी विचारला. उपचारासाठी घेतलेले पैसे परत करायचे आहेत असे सांगितल्यावर त्यांनी ते दागिने विकत घेतले. त्यावेळी सोन्याचा भाव वधारलेला असल्यामुळे मला त्यातून चांगली रक्कम मिळाली. ताबडतोब छोटछोट्या रक्कमांची लोकांची देणी फेडून टाकून त्यातून मोकळा झालो. मग मोठ्या रक्कमांची देणी फेडण्याच्या प्रयत्नाला लागलो. माझ्या आणि सुमनच्या नावाने काही विमा पॉलिसी होत्या. डोंबिवलीच्या औद्योगिक विभागात (एम.आय.डी.सी.) असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन आमच्या दोघांच्या सर्व विमा पॉलिसी तिथे जमा केल्या. त्यांचे पैसे मिळवायला काही काळ लागणार होता. तोपर्यंत माझ्याकडे जेवढे समभाग (शेअर्स) व एकसामायिक निधीपत्रं (म्युअचल फंड) होती ती सुद्धा विकायला काढली. परंतु हे सर्व पैसे माझ्या खात्यात जमा होण्यास जवळ जवळ एक ते दीड महिना लागणार होता. पैसे जमा होण्यास माझ्या अपेक्षापेक्षा अधिक उशीर होत असल्याने मी माझे राहते घर सुद्धा विकायला काढायचा विचार करू लागलो होतो. त्यासाठी जेव्हा मी इमारतीचे विकासक (बिल्डर) श्री. नंदू म्हात्रे यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला परत एकदा शांतपणे विचार करायला सांगितले. मग मी घर विकायचा विचार सोडून दिला. अर्थात हे सर्व मी सुमनला सांगूनच करीत होतो. प्रत्येकाची देणी तुकड्या तुकड्यात परत न करीता एका हप्त्यातच परत करून टाकायची असे आम्ही दोघांनी ठरवले होते.... 


मुलभूत पेशींच्या (स्टेम सेल्सच्या) उपचारानंतर संतोषमध्ये खूप फरक जाणवायला लागला होता. आधी खूप चिडचिड करणारा संतोष आता थोडा शांत झाला होता. आधी त्याची प्रकृती ज्या वेगाने खालावत चालली होती तो प्रकृती खालावण्याचा वेग आता खूप कमी झाल्याचे मला स्पष्टपणे दिसत होते. त्याला जास्त दिवस चालता येणार नाही, लवकरच तो अंथरूण पकडेल व त्याचे आयुष्य खूप कमी असेल असे वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले होते. जगात कुठेही या आजारावर अजूनपर्यंत तरी औषध नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले होते. असं असूनही गेले सहा महिने खूप धावपळ करून मुलभूत पेशींचा उपचार कुठे केला जातो याचा शोध घेतला होता व एवढ्या लांब परिचय नसलेल्या देशात जाऊन ते उपचार संतोषला दिल्याचे समाधान माझ्या मनाला होत होते. पुढे काय होईल हे माझ्या हातात नसले तरी मी माझे पितृकर्तव्य बजावले होते. समाजऋण फेडले होते. "दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल" या आशेवर जगणे एवढेच आता माझ्या हातात राहीले होते....

Sunday, December 20, 2020

संतोषवर उपचार होईपर्यंतच्या दोन-तीन दिवसांचा घटनाक्रम...

'Every cloud has a silver lining' म्हणजे प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कडा असते अशी इंग्रजीत म्हण आहे. प्रत्येक दुःखाला किंवा वाईट गोष्टीला एक चांगली बाजू असते हा त्याचा मतितार्थ. परंतु कधी कधी दुःखाला चांगल्या बाजूने वेढले आहे की चांगल्या बाजूला दुःखाने वेढले आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सुद्धा उद्-भवते. दुःख निवारण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आनंद देऊ शकतील अश्या अनेक गोष्टी जेव्हा आपल्या वाट्याला येतात तेव्हा सुख व दुःख यांची बेमालूमपणे सरमिसळ नियतीने करून टाकली आहे याची जाणीव होते. सुखाने माजू नये व दुःखाने कोसळू नये हाच संदेश त्यातून नियती आपल्याला देत असते. मी सुद्धा तोच संदेश देणारी संमिश्र मनस्थिती अनुभवत होतो. 


डोंबिवलीत असताना दिवसभर इतकी धावपळ व्हायची की दिवस कसा जायचा तेच कळत नसे. दिवसाचे अठरा तास, आठवड्याचे आठही दिवस व वर्षाचे बारा महिने फक्त काम आणि काम असे. मी, माझे कुटुंब व माझे वाचनालय याऐवजी वेगळा विचार करायला काही वावच नसे. कधी सुट्टी काढून फिरायला जायचा विचार सुद्धा मी करीत नसे. कौटुंबिक, सामाजिक जवाबदारी लक्षात घेऊन अपवादात्मक प्रसंगी जबरदस्तीने सुट्टी घेऊन वेळ काढावा लागत असे. आता मात्र दूर देशातील कॅसा दि कँम्पो या एका विश्रामधामच्या खोलीत काहीच धावपळ नसल्याने कोंडून ठेवल्यासारखे वाटत होते. बाहेर कोणीच ओळखीचे नव्हते. माझी भाषा तेथील लोकांना येत नव्हती व त्यांची भाषा मला समजत नव्हती. खोलीत एक मोठा दुरदर्शनसंच (टिव्ही) होता परंतु त्यावर मला पाहिजे ते काहीच दिसत नव्हते. एक बरं झाले त्यावर कार्टून आणि डिस्कव्हरी वाहीन्या दिसत होत्या. त्यामुळे संतोषचा थोडाफार वेळ चांगला जात होता. मी काही आराम किंवा मजा करण्यासाठी तिथे गेलो नव्हतो. संतोषच्या उपचारासाठी एवढ्या लांब दूर देशात आपण आलो आहोत याची मला पुर्णपणे जाणीव होती. दुःखं मनाला डंख मारत असताना अनेक सुखं समोर हात जोडून उभी होती. माझी संमिश्र मनस्थिती झाली होती. 


पुढचे दोन दिवस आम्ही दोघांनी मजा व आराम करण्यात घालवले. सकाळी मी लवकर उठायचो. काहीच काम नसल्याने रात्री लवकर झोपायचो. परिणामतः सकाळी लवकर जाग यायची. स्नानगृहामध्ये पाणकुंड (टब) होते. त्यामध्ये गरम पाणी सोडायचो. अर्धा तास त्यात निवांत डुंबून राहायचो. आठच्या सुमारास संतोष उठायचा. तो उठला की चहा बनवायचो. तिकडे पाणी खूप महाग मिळायचे. त्यामुळे साफसफाई करणारे कर्मचारी आले की त्यांच्याकडून भरपुर बर्फ घेऊन ठेवायचो. बर्फ वितळून तयार केलेले पाणी चहा बनवण्याच्या यंत्रामध्ये भरायला लागायचे. दुधाची पावडर आणि चहा पुड्या (टी बॅग्ज्) होत्या. चहा तयार झाला की दोघे चहा प्यायचो. विमानतळावर हरवलेली बॅग अजून परत आलेली नव्हती त्यामुळे चहा बरोबर खायला काहीच नव्हते. सकाळी नऊ वाजता पाव व मख्खन (ब्रेड बटर) नाष्ट्यासाठी मागविला की तो अर्ध्या तासाने येत असे. खरतरं आम्हा दोघांना त्याचा कंटाळा आला होता. दुपारच्या जेवणासाठी त्या नाष्ट्यातील दोन तीन पाव बाजूला काढून ठेवायचो. दुपारचे जेवण संतोष मागवायचा. कमीतकमी किंमतीचे जेवण मागवण्याचे धोरण असायचे. दुपारी एकच्या सुमारास जेवण झाले की चार वाजेपर्यंत मी यथेच्छ वामकुक्षी काढायचो. संतोष कार्टुन, डिस्कव्हरी वगैरे वाहीन्यांवर त्याच्या आवडीचा कुठलातरी कार्यक्रम बघत बसायचा. संध्याकाळी पाच वाजता चहा पिऊन झाल्यावर मी फेरफटका मारण्यासाठी खोली बाहेर पडायचो.


आमच्या खोलीपासून थोड्याश्या अंतरावर एक संमेलनालय (क्लब हाऊस) होते. तिथे बरेच लोक जमायचे. ते सर्व लोक पेयपान (ड्रिंक्स) करून नाचत असत. तिथले संगीत निराळेच होते. मी एका मेजवर (टेबलवर) बसून त्यांच्या पदलालित्याचा पदविन्यास (डान्स) न्याहळत वेळ काढायचो. तिकडे खाणे पिणे महाग होते. मी फक्त एकदाच एक अपेयकुपी (बिअर कॅन) विकत घेतली होती. काही विकत घ्यायच्या आधी मला संतोषचा आणि पैश्यांचा विचार करणे भागच होते. ते एक ठिकाण सोडले तर मनोरंजन व्हावे असे जवळपास काहीच नव्हते. एक तास तिकडे घालवून परत खोलीवर यायचो. रात्रीच्या जेवणाची सोय झाली की मग थोडावेळ संतोष बरोबर मजामस्ती करायचो. आठ वाजता जेवण झाले की मग बरोबर नऊला ढाराढुर पंढरपूर म्हणजे गाढ झोपुन जाणे. अश्या पद्धतीने दुःखाची झालर असलेल्या सुखमय परिस्थितीत दोन दिवस घालवले.


मेड्रा इंक कंपनीकडून संपर्क (कॉल) केला जाणार होता. आम्ही त्यांच्या निरोपाची (कॉलची) प्रतीक्षा करीत होतो. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्याकडून दूरध्वनी (कॉल) आला. शनीवार, २ डिसेंबर २००६ रोजी सकाळी दहा वाजता आम्हाला घ्यायला ते गाडी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदल्या दिवशी शुक्रवारी थोडीशी भीती वाटत होती. उपचार पद्धत (ट्रीटमेंट) कशी असेल? त्याला किती वेळ लागेल? संतोषला त्रास तर होणार नाही ना? असे काही प्रश्न मनात थयथय करून काळजी व भिती निर्माण करीत होते. संतोष मात्र बिनधास्तपणे त्याच्याच भावविश्वात रमुन गेला होता. "उद्याचे उद्या बघू या. आता शांत झोपु या" असं सांगून तोच मला धीर देत होता. अखेर शनिवारचा दिवस उजाडला. दिनांक ३१ मे २००६ रोजी संतोषचा आजार समजल्यापासून ते आजपर्यंतच्या दिवसांची उजळणी मी मनामध्ये करीत होतो. आजपर्यंत सर्व ठीक झाले तसेच पुढे सुद्धा सर्व काही ठीक होईल असा स्वसमाधान करणारा विचार करून सकाळी साडेनऊ वाजताच संतोषला तयार केले व मी स्वतः सुद्धा तयार झालो. दोघांनी एकत्र चहा घेतला. त्यावेळी घरच्या चहाची आठवण येत होती. सुमनला दूरध्वनी करून आम्ही उपचारासाठी निघत असल्याचे कळविले. तिने मला महामृत्युंजय मंत्र जपायला सांगितले. सुमनशी बोलणे झाल्यावर आम्ही दोघे गाडीची वाट पाहू लागलो. 


बरोबर दहा वाजता आमच्या खोलीबाहेर एक गाडी येऊन उभी राहिली. आधी संतोषला व्यवस्थित गाडीत बसवले व मग मी सुद्धा गाडीत बसलो. दोन दिवसांनी उपचारासाठी त्या खोलीतून एकत्र बाहेर पडताना वेगळेच वाटत होते. पाच मिनिटांत गाडी एका रुग्णालयापाशी पोहोचली. रूग्णालय तसं छोटेसे होते. तिथे बरेच लोकं आमच्यासारखे उपचार करून घेण्यासाठी आले होते. आम्हाला दुसऱ्या मजल्यावर जाण्यास सांगण्यात आले. उद्-वाहनाने (लिफ्टने) संतोषला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेलो. आमच्यासाठी एक खोली आरक्षित होती. खोलीतील पलंगावर संतोषला झोपण्यास सांगण्यात आले. काही वेळात त्याला सलाईन देण्यात आले. मी काळजीमुळे थोडासा घाबरलो होतो. पुढे काय होईल? असा विचार करीत होतो, इतक्यात एक नर्स एक इंजेक्शन घेऊन आली. तिने ते इंजेक्शन संतोषला दिलेल्या सलाईनमध्ये टोचले. संतोषचा हात हातात घेऊन मी त्याच्या बाजूलाच बसलो होतो. अजून एक तास तरी सलाईन चालू रहाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. काही वेळात डॉक्टर विलियम रडार तिथे आले. ते वयस्कर असले तरी देखणे व्यक्तीमत्व होते. ते मला समजेल अश्या सध्या सोप्या सुबोध इंग्रजीमध्ये बोलत होते. "जगातील सर्वात उत्तम उपचार (ट्रिटमेंट) आज तुला दिले जात आहेत. आम्ही ज्या मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) वापरतो ती उपचारपद्धती (टेक्नॉलॉजी) अजून कोणाकडेही उपलब्ध नाही. या उपचाराने खूप फरक पडेल. तुझे वडील तुझ्यावर खूप प्रेम करतात. अन्यथा इतके पैसे खर्च करून एवढे लांब दूरदेशी येणे  सोपे नाही. तुझे वडील महान आहेत. तू नशीबवान आहेस तुला असा पिता मिळाला. तू लवकरच बरा होशील", असे डॉक्टर विल्यम रडार संतोषला म्हणाले. भारतातून उपचार घेण्यासाठी येणारे आम्ही पहिलेच होतो अशीही माहिती त्यांनी आम्हाला दिली. त्यांच्या अश्वासक बोलण्याने माझ्या मनाला  खूप हुरूप आला व समाधान वाटले. 


डॉक्टर विल्यम रडार यांनी मला त्यांच्या कार्यालयात (केबिनमध्ये) बोलावले. रूग्णालयाच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय होते. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा ते समोरच्या खुर्चीवर बसले होते. त्यांनी माझे सुहास्यवदने स्वागत केले. तुम्ही खूप मोठी कामगिरी बजावली आहे. संतोषला मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा जो आजार आहे त्याला जगात कुठेही औषध नाही. सध्या तरी मुलभूत पेशींचा (स्टेम सेल्स) उपचार हा एकच पर्याय उपलब्ध आहे. ही उपचारपद्धती खूप महाग आहे. या विषयावर जगभर जोरात संशोधन सुरू आहे. आम्ही सुद्धा संशोधन करीत आहोत. या उपचारपद्धतीमध्ये आम्ही ज्या निर्णायक मुलभूत पेशी (Fetal Stem Cells) वापरतो त्या जगात अजून कुठेही उपलब्ध नाहीत. आज संतोषला दहा मिलीलीटर त्या निर्णायक मुलभूत पेशी दिल्या आहेत. त्याचा जो आजार आहे तो संपुर्ण शरीरात असल्याने डोक्यापासून पायापर्यंत त्याला बरं होण्यास वेळ लागेल. कदाचित अजून चार पाच वेळा त्याला इथे घेऊन यावे लागेल" असं डॉक्टरांनी मला सविस्तर समजावून सांगितले. मी त्यांना एकच प्रश्न विचारला,"तो पुर्वीसारखाच व्यवस्थित चालेल ना?" "हे पहिलेच प्रकरण (केस) आहे. आपल्याला थोडे दिवस वाट पाहायला लागेल", असे त्यांनी उत्तर दिले. माझ्या डोळ्यात पाणी आले. डॉक्टर माझ्याजवळ आले त्यांनी मला घट्ट धरले. "देवावर विश्वास ठेवा. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप काही केले आहे. एक खंबीर बाप त्याच्या बरोबर असताना तो नक्कीच लवकर बरा होईल. देवावर विश्वास ठेवा. परमेश्वर सर्वशक्तिमान आहे", असं बोलून त्यांनी माझे सांत्वन केले. दुःखाला सुखाची की सुखाला दुःखाची झालर जोडली आहे हेच मला समजत नव्हते. संमिश्र मनस्थितीतच मी डोळे पुसले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. संतोषकडे गेलो. एका तासात त्याच्यावरील उपचार (ट्रीटमेंट) संपले. आम्ही दोघे तिथून निघालो व काही वेळातच परत आमच्या खोलीवर पोहचलो.


आम्ही जसे खोलीवर पोहोचलो दूरध्वनीची घंटी वाजली. मी दूरध्वनी घेतला. आमची हरवलेली बॅग कॅसा दि कँम्पोला आल्याचे समजले. काही वेळातच तिथल्या कर्मचार्‍यांनी आमची बॅग आणून दिली. बॅग उघडली. तब्बल चार दिवसांनी कपडे, खाण्याचे जिन्नस बघून मी आणि संतोष खूपच खुश झालो. मॅग्गी, चकल्या, चितळेची बाकरवडी, मारी बिस्कीटे, संतोषसाठी क्रीम बिस्कीटे, दोघांचे कपडे बघून खुपच आनंद झाला. रोज रोज नाष्ट्यामध्ये पाव मख्खन खाऊन तोंडाची चवच पळून गेली होती. दिनांक ४ डिसेंबर २००६ रोजी डोमिनिकन रिपब्लिक या देशातून आमचे परतीचे तिकीट होते. आता पुढचे दोन दिवस मजेत जाणार होते. एवढे दिवस अनेक समस्यांना तोंड देत एवढ्या लांब एका अपरिचित देशात येताना खूप पैसे खर्च करून शेवटी संतोषवर उपचार केल्याचे एक अभूतपूर्व समाधान माझ्या मनाला लाभले होते. आमच्या प्रारब्धात जे काही लिहीले आहे तेच पुढे होणार असले तरी मी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती याचे मला खूप समाधान वाटत होते. संमिश्र मनस्थिती आता राहिली नव्हती. काळ्या ढगाची रूपेरी कडा आता एवढी विस्तृत झाली होती की संपूर्ण ढगंच रूपेरी वाटू लागला होता...

Thursday, December 17, 2020

डोमिनिकन रिपब्लिक देशात विश्रामधामची जागा आरक्षित करताना झालेला गोंधळ ....

बाण मारीत असताना जेव्हा अर्जुनाला द्रोणाचार्यांनी विचारले की "तुला आत्ता काय दिसत आहे?" त्यावर अर्जुन म्हणाला होता की "गुरूवर्य मला तुम्ही सांगितलेले फक्त आणि फक्त लक्ष्य दिसत आहे. बाकी अन्य काही दिसत नाही." जेव्हा माणसाचे मन ठरलेल्या लक्ष्यावर पुर्णपणे केंद्रीत होते तेव्हा त्या लक्ष्याच्या आड येणारे सर्व अडथळे कसे पार करायचे याची शक्ती, बुद्धी त्याला प्रयत्नातून प्राप्त होत असते. लक्ष्य गाठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा जिद्दी स्वभाव असल्यास लक्ष्याच्या मार्गातील अडथळे अधिक वेगाने दूर करणार्‍या घटना सुद्धा घडून येत असतात. संकटांची मालिका संपत नसली तरी माझे लक्ष्यावर केंद्रीत झालेले मन व माझा जिद्दी स्वभाव यामुळे मला सुद्धा मार्ग सापडत गेला व त्याचा अनुभव यावेळी मी घेत होतो. 


माझे लक्ष फक्त आणि फक्त संतोषच्या आजारावर केंद्रित झाले होते. मी त्याला जन्माला घातले असल्याने त्याला बरं करणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजत होतो. माझ्याकडून जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न करायची तयारी मी केली होती. लहानपणापासूनच मी जिद्दी होतो. एखादी गोष्ट माझ्या मनात आली की मग ती करायचीच असे माझे स्वभाववैशिष्ठ्य होते. जिद्दीपणाचे उदाहरण म्हणून एक छोटीशी आठवण परत एकदा सांगावीशी वाटते. लहानपणी कुंदापूरला जेव्हा मी चौथीत होतो तेव्हा फणसाच्या झाडावरून फणसे काढायला आम्ही नारायण नावाच्या एका व्यक्तीला बोलवायचो. एकदा झाडावरचे सर्व फणस त्या नारायणने काढले. परंतु फांदीच्या टोकाशी असलेला एक फणस त्याने काढला नव्हता. फांदी टोकापाशी निमुळती होत गेल्याने ती तुटण्याची शक्यता होती. ते लक्षात घेऊन बहुधा त्याने तो फणस काढला नसावा. माझी बरोबर त्याच फणसावर नजर खिळली होती. तो फणस सोडून दिल्याची चुटपुट माझ्या मनाला लागली होती. तो फणस काढायचाच असं मी पक्के ठरवले. एके दिवशी दुपारी सर्वजण झोपलेले असताना झाडावर चढून तो फणस मी तोडलाच व त्याचवेळी रंगेहाथ पकडलो गेलो. नंतर ताईच्या हातचा मी बेदम मार खल्ला तो भाग वेगळा. परंतु मी एकदा का ठरवले की परिणामांची चिंता न करीता ती गोष्ट जिद्दीने करायचो हे स्वभाववैशिष्ठ्य सांगण्यासाठी हा स्मृतीप्रपंच केला. संतोषच्या बाबतीत हाच जिद्दीपणा परत एकदा कार्यरत झाला होता. इथे तर संतोषच्या अस्तित्वाचा व भवितव्याचाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे एवढे अडथळे येऊन सुद्धा मी अजिबात डगमगलो नव्हतो की खचलो नव्हतो. उलट कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी मी दिवसेंदिवस अधिकच खंबीर बनत चाललो होतो.


डोमिनिकन रिपब्लिक या देशात आम्ही नियोजित स्थळी (हॉटेलवर) पोहचेपर्यंत दिवस उजाडला होता. तिकडे सकाळचे सात वाजले होते. ज्या टॅक्सीचालकाच्या अक्राळविक्राळ दिसण्याची मला भीती वाटत होती, त्या टॅक्सीचालकाने आम्हाला मुक्कामी (हॉटेलवर) व्यवस्थित व सुखरूप आणून सोडले. जिथे भिती वाटत होती तिथे काहीच विपरित घडत नव्हेत व जिथे निश्चिंत होतो तिथे अचानक काहीतरी धक्कादायक घटना घडवून नियती आम्हाला हुलकावणीचे मनःस्ताप देत होती. त्या टॅक्सीचालकाचे पैसे चुकते करून मी त्याचे आभार सुद्धा मानले. तो दिसायला कसाही असला तरी मनाने खूप चांगला होता असं त्याच्या देहबोलीतून व कृतीतून लक्षात येत होते. हातात असलेली छोटीशी बॅग व संतोषला घेऊन कॅसा दि कँम्पो या विश्रामधामाच्या (हॉटेलच्या) स्वागतकक्षात प्रवेश केला. आधी संतोषला समोर असलेल्या खुर्चीवर नीट बसवले. मग मी प्रवेशकक्षाकडे (कौऊंटरवर) गेलो. माझे नाव-गांव सांगून मी भारतातून मुलाच्या उपचारासाठी आलो असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी संगणकावर माझे नावं टाकून पाहिले. "माफ करा, तुमच्या नावाने कोणतीही खोली (रूम) आरक्षित (बुक) करण्यात आलेली नाही", असं मेजवरील कर्मचारी म्हणाला. जिथे मी निश्चिन्त होतो तिथे नियतीने परत फासे फेकून मला गोत्यात आणले होते. आमच्या दोघांच्या नावांची नोंद त्यांना सापडली नव्हती. आता हे काय नवीन संकट? काय चाललयं काय? एवढी मोठमोठी आव्हानं झेलून व अनेक अडथळ्यांना न जुमानता इथपर्यंत आलो आणि आता ही नवी समस्या जीव जाळायला समोर उभी राहीली होती. तिथे बाहेर बसून तरी किती वेळ काढणार? मी एकटा असतो तर गोष्ट वेगळी होती. परंतु माझ्याबरोबर संतोष होता व त्याला कसे सांभाळायचे हाच तर मुख्य प्रश्न होता. मग पुन्हा एकदा त्यांना सर्व कागदपत्रे दाखवली. डॉक्टरांनी पाठवलेलं पत्र दाखवले. त्यांनी सुद्धा ती सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक पडताळून पहिली व शेवटी हात वर करीत 'आम्हाला काहीच करता येणार नाही, तुम्हाला खोली देता येणार नाही' हेच वाक्य परत एकदा विनम्र माफीसह ऐकविले. एकतर प्रवासातून दमून आलो होतो. त्यात भर म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी वाजवलेल्या नकारघंटेने अक्षरशः डोके फिरवले होते. परंतु आपले काम करूनच जायचे अशी जिद्द ठेवून मी इथपर्यंत आलो असल्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा यावर विचार करू लागलो. 


असहाय्यपणे संतोषच्या बाजूला जाऊन बसलो. संतोषला सांगितले की 'आपल्या नावावर खोली आरक्षित झालेली नाही असं ते म्हणत आहेत'. अर्थात तो बिचारा यावर काय बोलणार? 'किस्मत की हवा कभी नरम, तो कभी गरम गरम, ओ पिताजी' असंच तो बहुधा मनात म्हणाला असेल. खरंतर त्याला पण काहीच सुचत नव्हते. आता काय करायचे? तिकडे आपल्या भारतासारखी परिस्थिती नव्हती. इथे अगोदरच खोली आरक्षित करायला लागते. सर्व चूक मेड्रा इंक कंपनीची होती. एक तास आम्ही तिथेच बसून विचार करीत होतो. काय करायचे तेच कळत नव्हते. मेड्रा इंक कंपनीत दूरध्वनी (फोन) करायचा विचार मनात वारंवार येत होता परंतु त्यांचे कार्यालय (ऑफिस) अजून उघडलेले नसणार हे घड्याळाकडे पाहिल्यावर लक्षात येत होते. मी परत एकदा तेथील कर्मचाऱ्याजवळ गेलो थेट डॉक्टर विल्यम रडार यांना दूरध्वनी करण्याची विनंती केली. त्यांनी डॉक्टरांना दूरध्वनी केला. मग मी थेट डॉक्टरांशी बोललो. "आम्ही इथे कॅसा दी कँम्पो या विश्रामधामावर (हॉटेलवर) पोहचलो आहोत पण आमच्या नावाने खोली आरक्षित नाही असं आम्हाला सांगण्यात येत आहे. आम्ही दोघेजण इथे बाहेर बसून असहाय्यपणे प्रतिक्षा करीत आहोत." डॉक्टरांनी मला तेथील कर्मचाऱ्याकडे दूरध्वनीसंच (फोन) द्यायला सांगितला. काही वेळ त्यांचे आपआपसात बोलणे झाले. मग त्या कर्मचाऱ्याने दूरध्वनीसंच खाली ठेवला. लगेच त्यांनी माझ्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या व माझ्या नावावर एक खोली आरक्षित केली. त्याचबरोबर पाच दिवसांचे पैसे सुद्धा आगाऊ भरायला सांगितले. मी बरोबर आणलेले उधारपत्र (क्रेडिट कार्ड) त्यांना दिले. त्याने देयक (बिल) बनवले व त्यावर माझी सही घेतली. तेथील सहाय्यकाला बोलावून आम्हा दोघांना खोलीवर घेऊन जायला त्याला सांगितले.


एक कर्मचारी छोटसे विद्युत वाहन (इलेक्ट्रिक गाडी) घेऊन आला. रिक्षा सारखी ती विद्युतगाडी होती. आम्ही दोघे मागे बसलो. आमची खोली या स्वागतकक्षापासून खूप लांब होती. विद्युतगाडीने खोलीवर पोहोचण्यास दोन ते तीन मिनिटे लागली. कॅसा दि कँम्पो हे विश्रामधाम (हॉटेल) म्हणजे छोटी छोटी शंभरहून अधिक कौलारू घरे असलेला परिसर होता. हा परिसर खूप विस्तीर्ण होता. बाहेर एक सुद्धा माणुस फिरताना दिसत नव्हता. प्रत्येक कौलारू घरासमोर छोटे छोटे बगीचे होते. कुठेच कचरा दिसत नव्हता. संपुर्ण परिसर स्वच्छ आणि हिरवागार दिसत होता. समान अंतरावर छोटी छोटी घरे व त्यांच्यामध्ये नारळाची झाडे लावलेली दिसत होती. प्रत्येक घरासमोरील छोट्याश्या बगीच्यात निरनिराळ्या रंगांच्या फुलांची झाडे लावलेली होती. मधल्या अंगणात असलेले हिरवगार गवत दिसायला खूप सुंदर दिसत होते. हा सर्व परिसर पांढऱ्या रंगांची वाळू व लाल मातीचा दिसत होता. एकंदरीत तिकडचा नीटनेटकेपणा बघतच रहावा असा होता. काही मिनिटांच्या विद्युतगाडीतील प्रवासानंतर आमचे घर म्हणजे खोली आली. त्या चालकाने माझ्याकडे खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी एक चौरसपट्टी (कार्ड) दिली. ती चौरसपट्टी (कार्ड) दाराच्या खाचेत ठेवली. मग दाराची मुठ (हँडल) फिरवून दार उघडले. आम्ही आत जाताच विद्युतगाडीचा तो चालक गाडीसह निघून गेला.


आम्ही दार उघडून घरात गेलो. छोटीशी खोली होती पण अतिशय सुंदर व नीटनेटकी होती. एक छानसा पलंग, दोन मोठ्या खुर्च्या, आतमध्ये स्नानगृह, त्याच्या बाजूला छोटासा सज्जा (बाल्कनी), सज्ज्याबाहेर छोटी छोटी झाडे लावलेली दिसत होती. सज्जेतून बाहेरच्या गोल्फ मैदानाचे दृश्य खूपच छान दिसत होते. संतोषला पलंगावर व्यवस्थित बसवून मी आतमध्ये गेलो. कपड्यांची बॅग हरवल्यामुळे कपडे बदलता येत नव्हते. स्नानगृहाच्या बाजूला रात्री परिधान करण्यासाठी पांढर्‍या रंगाचा एक गणवेश (ड्रेस) लटकवलेला दिसत होता. बॅग येईपर्यंत आता हाच गणवेश वापरावा लागणार असं दिसत होते. खोलीतील आंतरजोडणी वरून (इंटरकॉमवरून) आधी सकाळचा नाष्टा मागविला. काही पाव आणि बटर मागविले. सुमनला दूरध्वनी लावला व फक्त आम्ही सुखरूप पोहोचल्याचा झटपट निरोप दिला. मला दूरध्वनीच्या देयकाची (बिलाची) काळजी वाटत होती. सुमन सुद्धा दूरध्वनीचीच वाट पाहत होती. थोडक्यात ख्यालीखुशाली कळवून दूरध्वनीसंच ठेवून दिला.


थोड्यावेळात कोणीतरी दरवाजा वाजवल्याचा आवाज आला. दार उघडले तर एक कर्मचारी समोर नाष्टा घेऊन उभा होता. त्याच्याकडून नाष्ट्याची थाळी (ट्रे) घेऊन दरवाजा बंद केला. मी आणि संतोषने नाष्टा उरकला. मला संतोषच्या उपचाराचा दिनांक, वेळ आणि ठिकाण यांची माहिती करून घ्यायची होती. मग मेड्रा इंक कंपनीत दूरध्वनी केला. त्यांना आम्ही आल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार आम्ही एक दिवस आधीच पोहोचलो होतो. अमेरिका खंड आपल्या भारतीय तारखेच्या एक दिवस मागे असतो. आम्ही एक दिवस आधीच पोहोचल्यामुळे त्यांच्याकडून टॅक्सी आणि खोली (हॉटेल बुकिंग) आरक्षित करण्याची तारीख चुकली होती. जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मला हा सर्व गोंधळ कळला. सर्व गोंधळ तारखेवरून झाला होता. दिनांक २ डिसेंबर २००६ रोजी म्हणजे शनीवारी इथल्या रुग्णालयात संतोषवर उपचार होणार होते. त्यासाठी त्यांनी गाडी पाठविण्याचे व विश्रामधाम (हॉटेल) आरक्षित करण्याचे कबुल केले होते. त्यामुळे मी निश्चिन्त होतो. आम्ही ३० नोव्हेंबरला मुक्कामी (हॉटेलवर) पोहोचलो होतो. संतोषवर उपचार शनिवार, दिनांक २ डिसेंबर २००६ रोजी होणार होते. अजून दोन दिवस त्यासाठी वाट पाहायला लागणार होती. किस्मत की हवा दोन दिवस कशी नरम गरम रहाते ते आता पहायचे होते....

Sunday, December 13, 2020

फ्रँकफर्ट विमानतळ ते डोमिनिकन रिपब्लिक देशात ईप्सित स्थळी पोहचेपर्यंतचा प्रवास...

'आस्माँन से टपके और खजूर पे लटके' याचे प्रत्यंतर कधी कधी जीवनात प्रत्यक्षात अनुभवावे लागते. गीतेतील कर्मसिद्धांतानुसार आपल्याला फक्त निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य भगवंताने दिले आहे. परिणाम हा आपला विषय नाही हे भगवंताने स्पष्टपणे सांगितले आहे. आपले प्रारब्ध बदलण्याचा निर्णय एकाच वेळी अनेकजण घेत असतात. नियतीला जे मान्य नसते ते सुद्धा बदलून टाकण्याचा निर्णय काहीजण घेत असतात. अशावेळी इतरांचे निर्णय व प्रयत्न आपल्या प्रयत्नांचे परिणाम बदलून टाकत असतात. त्यामुळे एका अग्निपरिक्षेच्या संकटातून आपण बाहेर पडत नाही की परत दुसरी अग्निपरिक्षा वाटेत हात जोडून आपल्यासाठी तयारच असल्याचा परिणाम आपल्या वाट्याला येत असतो. आगीतून फोफाट्यात अशी त्यावेळी माणसाची अवस्था होत असते. संतोषवर कोणत्याही परिस्थितीत उपचार करायचेच हा मी नियतीला मान्य नसलेला निर्णय खंबीरपणे घेतला होता. त्यामुळे त्याचवेळी इतरांनी घेतलेल्या निर्णयाचे व प्रयत्नांचे परिणाम माझ्या आयुष्यावर प्रभाव पाडत होते या कर्मसिद्धांताची मला जाणीव होऊ लागली होती. संकटांची मालिका काही संपतच नव्हती.


संतोषला विमानातून उतरविणे हा माझ्यासमोर मोठा यक्ष प्रश्न होता. पायऱ्या उतरताना जर तो खाली पडला असता तर त्याला सावरून घेणे कठीण होते. त्यामुळे विमानात असतानाच मी संबंधित अधिकाऱ्यांना आसनचाकी (व्हील चेअर) व दोन माणसांची गरज असल्याची माहीतीवजा सूचना दिली होती. फ्रँकफर्ट विमानतळावर दोघेजण संतोषसाठी आसनचाकी घेऊन आले होते. संतोषचे वजन वयाच्यामनाने जास्तच होते. मदतीला आलेले दोघेजण सहा फूट उंच आणि मजबूत होते. त्यांनी संतोषला खुर्चीमध्ये आसनपट्ट्याने घट्ट गुंढाळले आणि अलगद उचलून खाली आणले. जेव्हा ते संतोषला विमानतळापर्यंत आसनचाकीतून आणत होते तेव्हा मी त्यांच्या बरोबरच थंडीने कुडकुडत चालत होतो. त्यांनी आम्हाला विमानतळावरील प्रतिक्षालयात (वेटिंग रूममध्ये) नेऊन सोडले. सकाळचे नऊ वाजले होते. नुकतीच सूर्याची किरणे बाहेर पडू लागल्याने अंधाराचे जाळे फिटू लागले होते. बाहेर कडाक्याची थंडी असली तरी विमानतळावर प्रतिक्षालयात थंडी जाणवत नव्हती. बुधवार, दिनांक २९ नोव्हेंबर २००६ रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही फ्रँकफर्ट विमानतळावर होतो व त्याच दिवशी रात्री ३ वाजता फ्रँकफर्टवरून डोमेनिकन रिपब्लिकसाठी आमचे विमान निघणार होते. तब्बल अठरा तास आम्हाला फ्रँकफर्ट विमानतळावर घालवणे भागच होते.


संतोषला एका जागेवर बसवून स्वस्त आणि मस्त काही खायला मिळते का याच्या शोधात मी एकटाच निघालो. फ्रँकफर्ट विमानतळाचे कार्यालय खूप विस्तीर्ण होते. आपण कुठून निघालो आणि कुठे पोहचलो तेच कळत नव्हते. विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा भरपूर दिसत होती. ध्वनीक्षेपकावर (माईकवर) सतत निरनिराळ्या ठिकाणी जाणाऱ्या विमानांच्या सूचना व घोषणा दिल्या जात होत्या. त्या जाहीर सुचनांनुसार प्रत्येक जण आपआपले सामान घेऊन इकडे तिकडे धावपळ करीत होता. मला लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लोकांची सर्वात जास्त गर्दी उपहारगृहामध्ये (हॉटेलमध्ये) होती. त्यानंतर अधिक गर्दी पुस्तकांच्या दुकानात होती. तिथे दुकाने पुष्कळ होती. उपहारगृह सोडले तर पुस्तकांच्या दुकानात जेवढी गर्दी होती तेवढी अन्य कुठल्याच दुकानात नव्हती. बहुतेक करून सर्व लोकांच्या हातात पुस्तकं, मासिकं किंवा वृत्तपत्र दिसत होते. तेथील मंडळी वाचनप्रेमी दिसत होती. ते पाहून मला खूप बरं वाटले. जर्मनसारख्या प्रगत देश, जिथे महाजालाचा (इंटरनेटचा) सर्वात जास्त वापर होत होता, तिथे लोकं पुस्तक खरेदीसाठी सुद्धा गर्दी करीत होते व प्रत्येकाच्या हातात पुस्तक होते हे दृष्य पाहून मला खूप समाधान वाटले. मी मनातल्या मनात म्हटले पुस्तकांना पर्याय नाही. महाजाल असो की मोहमयी दृकश्राव्य माध्यमे असोत, वाचनाची आवड असणारे लोकं पुस्तकं वाचतातच.


मी संतोषच्या खाण्यापिण्याच्या बंदोबस्तासाठी फिरत होतो. प्रत्येक दुकानातील किंमत फलक (बोर्ड) वाचत होतो. त्यातल्या त्यात कमी किंमतीचे दुकान शोधत होतो. विमानतळाच्या दुसऱ्या मजल्यावर मला मॅकडोनाल्डचे दुकान दिसले. पिझ्झा, बर्गर हे संतोषच्या आवडीचे जिन्नस. त्याच्यासाठी बर्गर घेतला. माझ्यासाठी साधा पाव आणि मख्खन (बटर) घेतले. संतोषला जेव्हा बर्गर दिला तेव्हा 'परत काही आणायचे असल्यास मला सुद्धा बरोबर घेऊन जायचे' या अटीवर त्याने मी दिलेला बर्गर खल्ला. संतोषला कुठे न्यायचे म्हटले तर मला खूप विचार करावा लागायचा. तिथे विमानतळावर एकतर खूप गर्दी होती त्यात जर कोणाचा थोडा जरी धक्का लागला असता तर त्याची पडण्याची शक्यता होती. माझ्यासमोर विमानतळावर अठरा तास कसे काढायचे हा प्रश्न होता. त्यामुळे दोन तीन वेळा त्याला बरोबर घेऊन गेलो. ते अठरातास आम्ही दोघे खूप हिंडलो फिरलो. परंतु मी पैसे मात्र मोजूनमापून खर्च करीत होतो. माझ्याकडे मर्यादित पैसे होते आणि मला ते मुंबईला परत येईपर्यंत पुरवायचे होते. तसेच ते पैसे मी 'पै गुद्धी पावणे' या कानडी म्हणीप्रमाणे म्हणजे आडनावाप्रमाणे पै पै करीत लोकांकडून जमवले होते. ते वर्षभरात लोकांना परत करायचे अश्वासन मी सुमनला दिले होते. एक दोन वेळा भारतातील वेळ पाहून सुमनला दूरध्वनी केला. संतोष सुद्धा सुमनशी बोलला. तिलाही खूप बरं वाटले. ते अठरा तास काढणे ही सुद्धा एक छोटीशी कठीण परिक्षाच बनली होती.


रात्री ३ वाजता डोमिनिकन रिपब्लिकसाठी आमचे छोटेसे विमान निघणार होते. जेमतेम पन्नास प्रवासी बसू शकतील एवढे छोटेसे ते विमान होते. डोमेनिकन रिपब्लिक हा छोटासा बेटसदृश देश असल्याने तिथे खूप कमी लोकं जात असावीत व त्यामुळे तिथे छोटी विमाने जात असतील असा मी अंदाज केला. फ्रँकफर्टवरून सहा तासांचा प्रवास होता. आम्ही पहाटे सहाच्या दरम्यान डोमेनिकन रिपब्लिकच्या विमानतळावर उतरलो. विदेशसंचारपत्रावर (व्हिसावर) शिक्का मारून मी माझ्याकडे असलेले काही युरो चलन बदलून तेथील स्थानिक पेस्सो चलन घेतले आणि बॅग घेण्यासाठी खाली उतरलो. कमी प्रवासी असल्याने काही वेळातच सर्वजण आपआपली बॅग घेऊन बाहेर पडले. मी आमच्या बॅगेची वाट पाहत होतो. पट्ट्यावरून बॅग काढून देणाऱ्या माणसाकडे माझ्या सामानाचे कागदपत्र देऊन ठेवले होते. सर्वांच्या बॅगा आल्या, परंतु फक्त आमचीच बॅग आली नव्हती. तेथील अधिकाऱ्यांनी आमची बॅग हरवल्याचे मला सांगितले. पायाखाली व डोक्यावर एकाचवेळी ध्वमस्फोट (बाँम्बस्फोट) झाल्यासारखे मला वाटले. ''तुम्ही तुमच्या मुक्कामी (हॉटेलवर) जा. तुमची बॅग हाती पडली की आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहचवतो. तुम्ही निश्चिंत रहा'', असे तेथील अधिकारी म्हणाला. 'काय चाललंय? हा काय प्रकार आहे?' तेच मला समजत नव्हते. 'तुम्ही निश्चिंत रहा' हे त्या अधिकाऱ्याचे बोलणे माझ्या जखमेवर मिठ चोळत होते. बॅगेत खाण्यापिण्याचे सामान, कपडे वगैरे सर्वकाही होते. आता काय करायचे? अंगावरच्या कपड्यावरच काही दिवस काढायला लागणार होते. वाद घालून काहीच उपयोग नव्हता. खरंतर मी हतबल झालो होतो परंतु तरी सुद्धा धीर न सोडता खोलात जाऊन चौकशी केली. तेव्हा समजले की आमची बॅग चुकून दुसऱ्या विमानात चढवली गेली होती. ती शोधून परत आणण्यासाठी किमान दोन तीन दिवस तरी लागणार होते. त्या अधिकाऱ्यांनी आमची माफी सुद्धा मागितली. परंतु मला मात्र नियतीने परदेशात नेऊन माझी बोलती बंद करून टाकल्यासारखे वाटले. कफल्लक झाल्यासारखे नाईलाजाने बॅगेविना आम्ही विमानतळावरून बाहेर पडलो.


मेड्रा इंक कंपनीने 'कॅसा दी कँम्पो' (Casa De Campo) नावाच्या विश्रामधाममध्ये (हॉटेलमध्ये) आमची रहाण्याची सोय केली होती. ते विश्रामधाम विमानतळापासून ५० किलोमीटरवर होते. आम्हाला विमानतळावरून आणण्यासाठी मेड्रा इन्क कंपनीने टॅक्सी आरक्षित केली होती. बॅग शोधण्यात वेळ गेल्याने आम्ही दोघे विमानतळावरून उशीरा बाहेर पडलो. तोपर्यंत बाकीचे सर्व प्रवासी तिथे उपलब्ध असलेल्या टॅक्सीने निघून गेले होते. आमच्यासाठी आरक्षित असलेल्या टॅक्सीचालकाने बहुधा आमची वाट पाहून तो दुसऱ्या प्रवाशांना घेऊन निघून गेला असावा. कारण आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा तिथे एक सुद्धा टॅक्सी नव्हती. मी आणि संतोष फक्त दोघेच विमानतळाच्या बाहेर उभे होतो. तिथे सकाळचे सहा वाजले होते परंतु बाहेर सर्वत्र अंधार होता. अंधार तर माझ्या मनात सुद्धा दाटून आला होता. खरोखरच आम्ही आकाशातून टपकलो होतो व आता इथे वाळंवटी परिस्थितीत अनिश्चिततेच्या खजूराच्या झाडावर लटकलो होतो. संकटांची मालिका काही संपतच नव्हती. अक्षरश: तोंडचे पाणी पळाले होते. आता संतोषला पाठीवर घेऊन मी ५० किलोमीटर चालत जावे अशी नियतीची योजना आहे की काय असे मन उद्विग्न करणारे विचार सुद्धा येऊन गेले. मला काय करायचे सुचेना. मला संतोषला माझी अस्वस्थता दाखवूनही चालणार नव्हते. मग मी तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याला गाठले. त्यांना माझे विश्रामधाम (हॉटेल) व तिथपर्यंत घेऊन जाणारी टॅक्सी आरक्षित (बुक) असल्याचे सांगितले. तिकडे सर्व लोकं स्पॅनिश भाषेत बोलायचे. त्यांना इंग्रजी नीट येत नव्हते. तेवढ्यात एक टॅक्सीचालक आमच्या समोर भली मोठी टॅक्सी घेऊन उभा राहीला. ''तुमची ठरवलेली आरक्षित टॅक्सी आली नाही, तेव्हा तुम्ही या टॅक्सीने जा. हा टॅक्सीचालक तुम्हाला तुमच्या मुक्कामी (हॉटेलपर्यंत) पोहचवेल'' असे तो पोलीस अधिकारी म्हणाला. तो टॅक्सीचालक दिसायला कमालीचा भयानक तसेच आडवातिडवा सहाफुट, काळाकुट्ट, गलेलठ्ठ होता. त्याला नुसते पाहूनच भीती वाटत होती. त्याने मुक्कामी (हॉटेलपर्यंत) जाण्यासाठी १०० डॉलर सांगितले. माझ्याकडे पर्याय नसल्याने आम्ही त्या टॅक्सीत बसलो. आता हा वाल्याकोळी आपल्याला मुक्कामी पोहचवतो की नीजधामी पोहचवतो की आधीच बॅगेवीना कफल्लक झालेल्या आपली वाटेतच वाटमारी करतो हा चिंताजनक विचार एकादा मनात येऊन गेला. खिशात असलेले तेथील स्थानिक पेस्सो चलन हाच काय तो आता शेवटचा भौतिक आधार शिल्लक राहीला होता. सकाळचा प्रहर होता. उजाडायला सुरुवात झाली होती. प्रवास एकाच सरळ रस्त्यावरून चालू होता. आजूबाजूला छोटी छोटी झाडे लावलेली दिसत होती. नुकताच तो रस्ता बनविला असणार असं वाटावे इतक्या सुस्थितीत तो दिसत होता. रस्ता निर्जनच होता कारण आजूबाजूला घरं नव्हतीच. त्या टॅक्सीचालकाला इंग्रजी येत नव्हते. आणि मला स्पॅनिश येत नव्हते त्यामुळे प्रवासाच्या दरम्यान आमचा काहीच संवाद झाला नाही. मी शांतपणे बाहेरचे दृश्य बघत होतो. आम्हाला मुक्कामी पोहचायला दिडतास लागला. टॅक्सीचालकाने आम्हाला नियोजित स्थळी (हॉटेलवर) आणून सोडले परंतु नियतीने मात्र बॅगेवीना आम्हाला अजूनही अनिश्चितेच्या झाडावर लटकवून ठेवले होते....

Thursday, December 10, 2020

जेव्हा मी व संतोष मुंबईहून परदेशात जायला निघातो…

'हाथी निकल जाता है, मगर पुछ अडक जाता है।' म्हणजे अथक प्रयत्न केल्यावर महाकाय संपुर्ण हत्ती दाराच्या छोट्याश्या अरुंद फटीतून निघून जातो परंतु शेवटच्या क्षणी त्याची शेपटी मात्र त्या दाराच्या फटीत अडकून पडते. आपण करीत असलेले एखादे अवघड कार्य अथक प्रयत्नांच्या अनेक मोठमोठ्या दिव्यातून जात असताना शेवटच्या क्षणी मात्र एखादी छोटीशी गोष्ट हत्तीच्या शेपटीप्रमाणे अडकून पडते व आपल्या संपुर्ण कामाचा खोळंबा करते. त्यावेळी आपली मानसिकता अशी होते की 'पाटावरती धीर धरला परंतु ताटावरती धीर नाही.' म्हणजे खळखळून भूक लागलेली असताना अन्नपदार्थ जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत पाटावरती बसून धीर धरवतो परंतु तोच गरमागरम पदार्थ ताटात येऊन पडला की तो थंड होईस्तोवर मात्र पोटातील भूक धीर धरू देत नाही. अश्यावेळी संयम कमजोर ठरतो. अर्थात अश्या प्रसंगी संयम सुटला तरी सुद्धा शेवटपर्यंत आपण आपला खंबीरपणा सोडायचा नसतो व खंबीरपणाच्या जोरावरच संयम व परिस्थितीवर मात करायची असते हेच नियती आपल्याला शिकवत असते. आपल्या खंबीरपणाची परिक्षा नियती शेवटच्या क्षणापर्यंत घेत असते. माझ्यासाठी अशीच एक परिक्षा देणे अजून बाकी राहीले होते.


मंगळवार, दिनांक २८ डिसेंबर २००६ रोजी डोमेनिकन रिपब्लिक या देशात जाण्यासाठी विमानाचे तिकीट मी अगोदरच काढले होते. परंतु त्यासाठी आदल्या दिवसापर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत आवश्यक असलेला फ्रान्सचा संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) मिळवण्यासाठी मला खूप धडपड करावी लागली होती. माझ्या व संतोषच्या या परदेश प्रवासाची सुमनने खूप आधीपासूनच तयारी केली होती. फ्रान्सचा संक्रमण परवाना मिळाल्यावर सर्व अडथळे दूर होऊन जाण्याचे निश्चित झाले. सोमवारी संध्याकाळी घरी आल्यावर प्रवासाला जाण्याच्या तयारीला लागलो. खाण्यापिण्याचे सामान, कपडे, माझी औषधे इत्यादी सर्वांची तजवीज केली. संतोषवर केल्या जाणाऱ्या मुलभूत पेंशीच्या उपचारपद्धतीबाबत डॉ. श्रीमती तारा नाईक आणि डॉ. योगेश आचार्य यांचा सल्ला मी घेतला होता. दुसरा कोणताही पर्यायी इलाज नसल्याने त्या दोघांनी मला मुलभूत पेंशीचा उपचार घेण्याची परवानगी दिली होती. बाकी इतर कोणालाही मी याबाबत काही विचारले नव्हते. सोमवारी रात्री प्रवासाची सर्व तयारी करून झोपलेलो असताना रात्री सुमारे एकच्या दरम्यान अमेरिकेतून मेड्रा इंक कंपनीचा दूरध्वनी आला. त्यांनी आमच्यासाठी विश्रामगृह आरक्षित (हॉटेल बुक) करून ठेवले होते. राहण्याचा व रुग्णालयाचा पत्ता ई-मेलद्वारे त्यांनी आम्हाला अगोदरच कळवला होता. आम्ही सुद्धा त्यांना आम्ही तिकडे येत असल्याचे कळवले. त्यांच्याशी बोलणे झाल्यावर मग परत शांतपणे झोपलो. मंगळवारी म्हणजे निघायच्याच दिवशी सकाळी घाटकोपरच्या कॉर्पोरेशन बँकेतून काही रक्कम युरो चलनामध्ये बदलून घ्यायची होती. त्यासाठी डोंबिवलीच्या कॉर्पोरेशन बँकेतून पत्र घेऊन गेलो. घाटकोपरच्या कॉर्पोरेशन बँकेत पत्र दाखवून त्यांच्याकडून युरो चलन घेऊन आलो. तिकडे खर्चासाठी युरो चलन लागणार होते. मग दुपारी घरी आल्यावर जेवण उरकून एक तासाची विश्रांती घेतली.


मंगळवारी ३.२५ वाजता आमचे विमान निघणार होते. संध्याकाळी वाचनालयात जाऊन सर्वांना आठ दिवस वाचनालय नीट सांभाळण्यास सांगितले. ''सर तुम्ही इथली चिंता करू नका. तुम्ही फक्त संतोषची व्यवस्थीत काळजी घ्या" असा सर्वांनी शब्दविश्वास दिला. मग सर्वांचा निरोप घेऊन घरी आलो. नऊ वाजता सुमन व संतोषबरोबर एकत्र जेवण केले. रात्री दहा वाजेपर्यंत निघण्यास तयार झालो. विमानतळावर जाण्यासाठी चारचाकी (कार) मागवली होती. आधी सर्व सामान गाडीत ठेवून आलो. निघण्याआधी सुमनबरोबर साश्रु नयनांनी घट्ट हृदयभेट घेतली. कसाबसा तिला निरोप दिला. आठ दिवस सुमनविना काढायचे होते. मग संतोषला दुसऱ्या मजल्यावरून हात पकडून व्यवस्थीत खाली न्यायला सुरुवात केली. खाली आल्यावर त्याला नेहमीप्रमाणे पुढे चालकाच्या बाजूला बसवले. मी मागे बसलो. सुमन निरोप देण्यासाठी खाली उतरली होती. गाडी सुरू झाली. सुमन हात हलवून निरोप देत होती. मी मागे वळून सुमनलाच पाहत होतो. आम्ही दोघेही एकमेकांना नीट पाहू शकत नव्हतो कारण तिच्या आणि माझ्या दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते. विमानतळावर पोहचेपर्यंत सुमनची आठवण येत होती.


विमानतळावर आतमध्ये प्रवेश करताच सामान एका जागेवर ठेवले व संतोषला त्याच जागेवर थांबायला सांगितले. अनुमतीपत्रासाठी (बोर्डिंग पाससाठी) मी समोरच्या मेजकक्षाजवळ (टेबलाजवळ) गेलो. माझ्यापुढे रांगेत आणखीन दोघेजण होते. त्यांच्या नंतर माझा क्रमांक होता. माझा क्रमांक येताच मी बरोबर आणलेले आमचे दोघांचे तिकीट व पारपत्र (पासपोर्ट) तेथील कर्मचाऱ्याला दाखवले. 'बरोबर असलेला दुसरा प्रवासी कुठे आहे?' असं त्या कर्मचाऱ्याने मला विचारले. मी समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या संतोषकडे बोट दाखवले. संतोष शांतपणे उभा होता. त्याला बघुन कोणालाही वाटत नव्हते की तो असाध्य व्याधीने ग्रस्त आहे. मी दिलेले तिकीट घेऊन तो कर्मचारी आतल्या दालनातील त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेला आणि काही वेळाने बाहेर आला. त्याने मला अनुमतीपत्र (बोर्डिंग पास) देण्यास चक्क नकार दिला. क्षणभरासाठी मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. हत्तीएवढे सर्व प्रयत्न करून इथपर्यंत येऊन पोहचलो. आता हे हत्तीचे शेपुट त्रास देत आहे. आता काय परत जायचे? छे, शक्यच नाही. माझी काय चूक आहे? असे असंख्य विचार मनात येऊन गेले. नियमानुसार सर्व कागदपत्रे माझ्याकडे होती. त्यांनी मला नकाराचे कारण सुद्धा सांगितले नव्हते. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायची माझी तयारी होती. मी माझ्या प्रयत्नांना सुरुवात केल्यावर त्या कर्मचाऱ्याने मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला सांगितले. मी आत जाऊन संबंधीत अधिकाऱ्याला भेटलो. मेड्रा इंक कंपनीकडून आलेले डॉक्टरांनी दिलेले अधिकृत पत्र, डोमिनिकन रिपब्लिकचे विदेशसंचारपत्र (व्हिसा), फ्रान्सचा संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा), जाण्या-येण्याचे विमानाचे तिकीट, विदेशी चलनाचे पुरावे इत्यादी सर्वकाही दाखवले. तरीपण तो वरिष्ठ अधिकारी ऐकायला तयार नव्हता. शिवाय तो मला अनुमतीपत्र (बोर्डींग पास) का नाकारत आहे त्याचे कारणही सांगायला तयार नव्हता. मग माझा संयम सुटला. वीनाकारण मी पराभूत होत आहे असं मला वाटू लागले. ते मला मान्य नव्हते. मग मी खंबीरपणे भांडायला सुरुवात केली. एकीकडे मला संतोषची काळजी वाटत होती. तो एकटाच बाहेर उभा होता. माझा अंतरात्मा जळत होता परंतु त्यांना माझी समस्या समजत नव्हती. "विद्यमान घडीला संतोषच्या आजारावर मुलभूत पेशींच्या उपचाराशिवाय (स्टेमसेल्स शिवाय) दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. पैसे माझे, मुलगा माझा, जाण्याचा निर्णय सुद्धा माझाच आहे", असे मी त्या वरिष्ठ अधिकार्‍याला निक्षून सांगितले. मी तिथेच त्याच्यासमोर खंबीरपणे उभा राहिलो. माझा हट्ट व त्वेष पाहून त्या अधिकाऱ्याने कोणाला तरी दूरध्वनी (फोन) केला. मग काय झाले कोणास ठाऊक परंतु थोड्यावेळाने त्याने माझ्या हातात अनुमतीपत्र आणून दिले व चक्क माझी माफी सुद्धा मागितली. एवढ्या सगळ्या ताणतणावानंतर असं काहीतरी घडल्यावर माझे हृदय सुद्धा भरून आले. अनुमती पत्र हाती पडताच मला खूप बरं वाटले. सामान तपासणीसाठी दिले. ते झाल्यावर अनुमती कक्षालयामध्ये (बोर्डिंग हॉलमध्ये) प्रवेश केला. प्रवाश्यांसाठी असलेल्या खुर्चीवर संतोषला बसवले व विमानाची वाट पाहत बसलो. रात्रीचे सुमारे साडेबारा-एक वाजले होते. अजून दोन तास काढायचे होते. संतोषकडे बरोबर आणलेला भ्रमणध्वनी (मोबाईल) दिला आणि मी तिथेच बाजूच्या खुर्चीत शांतपणे झोपी गेलो.


आमच्या विमानाची घोषणा ऐकताच संतोषने मला उठवले. प्रसाधनालयात (वॉशरूमला) जाऊन ताजातवाना (फ्रेश) होऊन परत आलो. नंतर हातात तिकीट घेऊन संतोषबरोबर रांगेत उभा राहिलो. तिकिट तपासून आम्हाला विमानात सोडण्यात आले. विमानाच्या आत प्रवेश केला तेव्हा हवाईसुंदऱ्या आमचे स्वागत करीत होत्या. त्यांना नमस्ते करून आतमधील भागात वळतच होतो तेवढ्यात संतोष खाली पडला. त्याला कसे उचलायचे हे फक्त मलाच माहीत होते. दोन्ही हात त्याच्या काखेत घालून त्याला उचलून उभं केले. त्यावेळी सर्वजण बघत होते. कोणीही मदतीला आले नाही. परंतु नंतर फुकटचे सल्ले द्यायला मात्र अनेक लब्धप्रतिष्ठीत पुढे आले. त्याचे वजन जास्त आहे, आधी त्याच्या वजनाकडे लक्ष द्या वगैरे वगैरे. मी कोणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत पडलो नाही. संतोषचा हात पकडून आमच्या खुर्चीकडे वळलो. संतोषला बाहेरचे दृश्य पहायचे होते. त्याला खिडकी जवळच्या जागेवर बसवले. सामान वरच्या रकान्यात ठेवून मी त्याच्या बाजूला बसलो.


संतोष प्रथमच विमानातून प्रवास करत होता. मी भारतात चार पाच वेळा आणि हाँगकाँगला एक वेळा विमानातून प्रवास केला होता. काही वेळातच विमान मुंबईहुन फ्रँकफर्टला निघण्यास तयार झाले. विमान सुरू होताच मी निश्चिंत झालो. आता मात्र मला कोणीच अडवू शकणार नव्हते, थांबवू शकणार नव्हते. नियतीच्या भारतातील अग्नी परिक्षेतून मी तावलून सुलाखून बाहेर पडत होतो. सकाळी नऊच्या सुमारास आमचे विमान फ्रँकफर्ट विमानतळावर उतरले. बाहेर अजून अंधार होता. तिकडे सुर्योदय अजून झाला नव्हता. बाहेर जवळपास ७ अंश तापमान असल्याचे विमानातील तापमापक दर्शवित होता. मी आणि संतोष स्वेटर घालून तयार झालो. सर्व लोक उतरल्यावर शेवटी आम्ही खुर्चीवरून उठलो. मी अगोदरच संतोषसाठी आसनचाकी (व्हील चेअर) आणि मदतनीस बोलावले होते. ते आमची वाट पाहत होते. आम्ही बाहेर पडताच दोन मदतनीस आसनचाकी (व्हील चेअर) घेऊन पुढे सरसावले. त्या दोघांनी संतोषला खुर्चीत (व्हील चेअरवर) बसवले. आसनपट्टा त्याच्याभोवती घट्ट गुंढाळला. मग संतोषला पायऱ्यांवरून सुरक्षितपणे खाली आणले. बाहेर खूप थंडी होती. मी थंडीने कुडकुडत होतो. काही वेळातच आम्ही दोघे फ्रँकफर्ट विमानतळावर पोहचलो. हाड फोडून टाकणार्‍या त्या थंडीत मी आता नियतीच्या पुढील नव्या अग्नीपरिक्षेची प्रतिक्षा करीत होतो....

Sunday, December 6, 2020

संतोषच्या परदेश प्रवासाची आखणी करताना केलेला संघर्ष...


'तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।' असा निर्धार व विश्वास मनात जेव्हा असतो तेव्हा प्रयत्नांचा अग्नीपथ कितीही दाहक, कष्टमय व अवघड असला तरी नियतीला परिणाम हे प्रयत्न करणार्‍याच्या बाजूने द्यावेच लागतात. 'कोशीश करनेवाले की कभी हार नही होती' याची अनुभूती ही तेव्हाच खर्‍या अर्थाने येते. अथक प्रयत्नांच्या अश्या दाहक अग्नीपथावरून चालताना मी सुद्धा तोच निर्धार व विश्वास मनी बाळगून नियतीच्या कृपेने परिणाम साध्य करण्यासाठी जीवाचे रान करीत होतो. 


जिजाजींच्या ओळखीने खार येथील ज्योती इंटरनॅशनल या यात्रासंस्थेत (ट्रॅव्हल्स एजन्सीत) गेलो तेव्हा त्या संस्थेच्या संचालकांनी मला धीर दिला. 'आपण सर्वतोपरी प्रयत्न करू या. नियतीच्या मनात असेल तर आपल्याला कोणीही आडवू शकणार नाही' या त्यांच्या अश्वासक शब्दांत खूप काही जाणवत होते. त्यांच्या बोलण्याने मनाला हुरूप आला, समाधान वाटले. त्यांना मी बरोबर आणलेली सर्व कागदपत्रे दाखविली. "आधी डोमिनिकन रिपब्लिकचे विदेशसंचारपत्र (व्हिसा) मिळविण्याचा प्रयत्न करू या", असं ते म्हणाले. त्यांनी मला जे काही सांगितले ते सर्व करायची माझी तयारी होती. विदेशसंचारपत्र (व्हिसा) मिळण्याआधीच विमान तिकिट काढण्यात काहीच हशील नव्हते. आधी त्यांनी स्वतः विदेशसंचारपत्रासाठी खूप प्रयत्न केले. नंतर मला स्वतःला दिल्लीला जाऊन डोमिनिकन रिपब्लिकच्या दूतावासातील संबंधित अधिकार्‍यांना भेटून येण्यास सुचविले. मग मी विदेशसंचारपत्रासाठी (व्हिसासाठी) दिल्लीला जायचे ठरवले.


आता परिस्थिती वेगळी होती. डोंबिवलीहून बाहेर पडताना मला दहावेळा विचार करायला लागायचा. कारण संतोष अधून मधून चालताना अचानक तोल जाऊन पडायचा. त्यावेळी त्याला उचलणे हे फक्त माझ्यानेच होणार होते. दिल्लीला जाणे तर आवश्यक होते. मी नागेंद्रला संतोषकडे लक्ष ठेवण्याबाबत विचारले. नागेंद्रने संतोषला सांभाळायची जवाबदारी स्वीकारून मला निश्चिंत केले. सकाळच्या विमानाने दिल्लीला जाऊन, तिकडची कामे उरकून, संध्याकाळच्या विमानाने परतायचे असं मी ठरवले. सकाळी सहा वाजता घरून निघालो व साडेसात वाजेपर्यंत विमानतळावर पोहोचलो. साडे आठ वाजता दिल्लीला जाणारे विमान होते. ते विमान पकडून दहा वाजता दिल्लीला पोहोचलो. ज्योती इंटरनॅशनलच्या संचालकांनी दिलेला पत्ता माझ्याकडे होता. कुठेही न थांबता थेट डोमिनिकन रिपब्लिक दूतावासाच्या कार्यालयात गेलो. माझ्याकडे असलेली सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे सोपवली. त्यांनी थोडावेळ थांबायला सांगितले म्हणून तिकडेच थांबलो. मला वाटले होते आजच विदेशसंचारपत्र (व्हिसा) हाती पडेल. काही वेळाने एका अधिकार्‍याने मला आत बोलावून घेतले व बरीच चौकशी केली. मी दिलेली कागदपत्रे पडताळून मी सांगितलेल्या काही गोष्टी त्याने लिहून घेतल्या. त्याने मला आठ दिवसांनी यायला सांगितले. आठ दिवसांनी परत येण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यावेळी दुपारचे दोन वाजले होते. मला खळखळून भूक लागली होती. पोटात आग होतीच परंतु काम अर्धवट झाल्याने मनात सुद्धा आगआगं होत होती. कार्यालयाच्या बाहेरच दूरध्वनीसेवा केंद्र (टेलिफोन बूथ) होते. तिथून सुमनला दूरध्वनी केला. संतोषची विचारपूस केली. कामाच्या संदर्भातील माहिती सुमनला दिली. मग जवळच्याच एका उपहारगृहात (हॉटेलात) जाऊन जेवलो व नंतर मुंबईला परतण्यासाठी विमानतळावर पोहोचलो. काही वेळ विमानतळावर व्यतीत करावा लागला. संध्याकाळी सहा वाजताचे विमान पकडून मुंबईला पोहोचलो.


आठ दिवसांनी परत दिल्लीला जायचे होते. विदेशसंचारपत्र (व्हिसा) मिळाल्याशिवाय काहीच करता येत नव्हते. आठ दिवसांनी दिल्लीला त्याच कार्यालयात गेलो. तिथे गेल्यावर समजले विदेशसंचारपत्राचे काम झालेले नाही. अजून दोन दिवस लागणार होते. मी संबंधीत वरिष्ठ अधिकार्‍याची भेट मिळावी म्हणून तेथील कर्मचाऱ्यांना विनंती केली. माझी विनंती मान्य करून त्यांनी मला संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटू दिले. मला इंग्रजी नीट बोलता येत नव्हते तरी पण मी पोटतिडकीने वरिष्ठ अधिकाऱ्याला संतोषच्या औषधोपचाराची माहिती दिली. मेड्रा इंककडून आलेले पत्र त्यांना दाखवले. "वारंवार मुंबईहून दिल्लीला जाण्या-येण्याचा खर्च परवडत नाही तसेच वेळही वाया जात आहे. जर उद्यापर्यंत विदेशसंचारपत्र मिळाले तर बरं होईल. त्यासाठी आज एक दिवस मी दिल्लीला थांबतो'', अशी माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजी भाषेत भावूक होऊन त्या अधिकार्‍याला विनंती केली. शेवटी त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत विदेशसंचारपत्र देण्याचे कबुल केले. मला खूप बरं वाटले. त्यादिवशी दिल्लीतच मुक्काम केला. मी दिल्लीत एक दिवस थांबणार असल्याचे दूरध्वनीवरून घरी कळवले. आपले काम होणार आहे कळल्यावर सुमनला सुद्धा आनंद झाला. आता फक्त एकच दिवस संतोषला तिला एकटीला सांभाळायला लागणार होते. तसंही गरज पडली तर मदतीला नागेंद्र होताच.


दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, दिनांक २४ नोव्हेंबर २००६ रोजी सकाळी तयार होऊन डोमिनिकन रिपब्लिकच्या विदेशसंचारपत्र कार्यालयात (व्हिसा ऑफिसमध्ये) जाऊन बसलो. त्या कार्यालयात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. त्यादिवशी तर मी एकटाच होतो. माझ्या जिद्दीला व चिवटपणाला त्यांनी दाद दिली आणि मला लगेच कागदपत्रे तयार करून दिली. विदेशसंचारपत्र जसे माझ्या हातात पडले मी तडक दिल्ली विमानतळ गाठले व आधी मुंबईला जाणार्‍या विमानाचे तिकीट काढले. मग विमानाची निवांतपणे वाट पाहत बसलो. संध्याकाळी मुंबईत पोहोचताच ज्योती इंटरनॅशनलच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांना विदेशसंचारपत्र मिळाल्याचे कळवले. त्यांनी अजून एक अडचण सांगितली. डोमिनिकन रिपब्लिकला जाताना पॅरिसचा संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) लागेल. शनिवार रविवार फ्रान्स दूतावासाचे कार्यालय बंद असल्याने मला सोमवारी तिकडे जावे लागणार होते. डोमिनिकन रिपब्लिकला जाण्यासाठी विदेशसंचारपत्र मिळाल्यानंतर मी त्या देशात जाण्याचे मंगळवारच्या संध्याकाळचे विमानाचे तिकीट काढून बसलो होतो. आता ही नवी समस्या समोर उभी राहीली होती. अस्वस्थ झालो होतो परंतु डोकं शांत ठेवून सोमवारची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मनात एकच निर्धार होता काहीही करून संतोषला तिकडे न्यायचेच व औषधोपचार करून परत यायचे.


 श्रीधर अण्णा, ज्यांनी आम्हा सर्वांना मुंबईत आणले होते, त्यांना जेव्हा संतोषच्या आजाराबाबत कळले ते माझ्या घरी संतोषला भेटायला आले. संतोषला पाहून त्यांना सुद्धा खूप दुःख झाले. "तू जे काही करीत आहेस ते योग्यच आहे. प्रयत्न सुरू ठेव," असं ते म्हणाले. त्यांनी मला रोज महामृत्युंजय जप म्हणायला सांगितला. त्यांनी मला तो मंत्र लिहून दिला होता. मी दिवसातून किमान दहा वेळा तो मंत्र म्हणायला सुरुवात केली होती. मी शुक्रवारी दिल्लीहून परतलो होतो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संतोषच्या आरोग्यासाठी आमच्या घरी महामृत्युंजय होमहवन यज्ञ करण्यात येणार होता. मी दिल्लीत असल्याने त्याची सर्व तयारी सुमनने केली होती. एका बाजूने औषधोपचाराची तयारी तर दुसरीकडे देवाची प्रार्थना. दोन्ही मागचा उद्देश फक्त आणि फक्त संतोषला बरं करणे. 


माझ्याकडे सोमवार, दिनांक २७ डिसेंबर २००६ हा एकच दिवस होता. काही करून फ्रान्सचा संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) मिळवायचा होता. त्यादिवशी पहाटे सहा वाजताची गाडी पकडून सुमारे आठच्या दरम्यान चर्चगेट येथील फ्रान्सच्या कार्यालयापाशी पोहचलो. ते कार्यालय नऊ नंतर उघडणार होते. थोडावेळ तिथेच थांबून प्रतिक्षा केली. नऊ वाजता कार्यालय उघडताच तिकडच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी नरिमन पॉईंट येथील कार्यालयात जायला सांगितले. चर्चगेटवरून नरिमन पॉईंटला त्यांनी दिलेल्या पत्त्यावर चालत गेलो. तिथे मला इमारतीच्या खालीच अडवण्यात आले. 'इथे भेटीची पुर्वपरवानगी (अपॉइंटमेंट) आधी घ्यावी लागते, मगच तुम्हाला आतमध्ये जाता येईल' हे मला ऐकावे लागले. मला काय करायचे तेच सुचेना. तिकडून व्यंकटेशअण्णांना दुरध्वनी केला. त्यांनी मला तिकडेच थांबायला सांगितले. ते चर्चगेट इथेच कामाला असल्याने काही वेळातच टॅक्सी करून आले. त्यांच्या बरोबर माझा मेहुणा आणि एक युवती सुद्धा होती. त्या युवतीला फ्रेंच भाषा बोलता येत होती. आता आम्ही चौघेजण एकत्रित प्रयत्न करणार होतो. सकाळपासून माझ्या पोटात काही गेले नव्हते हे व्यंकटेशअण्णांच्या लक्षात आले. अण्णांनी मला बिस्कीटे खायला दिली. खरंतर खायची इच्छाच मरून गेली होती. तरी सुद्धा चार बिस्कीटे व पाणी कसेबसे पोटात ढकलले. "आता काय करायचं?" मी अण्णांना विचारले. अण्णांनी कशी तरी विनंती करून आत जाण्याची परवानगी मिळवली. कार्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावर होते. आम्ही चौघे कार्यालयात गेलो. आमच्या बरोबर असलेल्या युवतीने तेथील कर्मचाऱ्यांशी फ्रेंच भाषेतून चर्चा केली. "उद्याचे विमानाचे तिकीट आहे. कृपया आम्हाला संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याला भेटू द्यावे" अशी विनंती केली. परंतु कोणीही ऐकायला तयार नव्हते. हताश होऊन नाईलाजाने आम्ही चौघेजण त्या कार्यालयातून बाहेर पडलो. इमारतीच्या उद्-वाहनाने (लिफ्टने) वरून खाली उतरत असताना अचानक मला एक कल्पना सुचली. त्या कार्यालयातील संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक माझ्याकडे होता. इमारतीच्या खालच्या मजल्यावरून मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी माझा कॉल घेतला नाही. मी सर्वांना घेऊन परत उद्-वाहनाने वर गेलो. तिकडे बाहेर बसलेल्या व्यक्तीस मला आत्ताच आतून त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दूरध्वनी आल्याचे सांगितले. पुरावा म्हणून माझा भ्रमणध्वनी (मोबाईल) त्यांना दाखवला. त्या व्यक्तीने फक्त क्रमांक पाहीला. खरोखरच तोच नंबर होता. परंतु तो क्रमांक आलेला (रिसिव्हड) आहे की केलेला (डायल्ड) दूरध्वनी आहे हे त्या व्यक्तीने पाहिले नाही आणि मला एकट्यालाच आत जाण्यास परवानगी दिली. माझ्या जीवात जीव आला. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. त्या व्यक्तीची नजरबंदी नियतीने माझ्यासाठीच केली होती. माझ्या आधीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दोन चार लोकं बसलेले होते. त्यांच्याशी बोलून झाल्यावर मला बोलायची संधी मिळणार होती. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एका बाजूला भारतातील माणूस बसला होता, ज्याने मला संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) देण्याचे नाकारले होते. त्याच्या दुसऱ्या बाजूला फ्रेंच माणूस बसला होता. तो वरिष्ठ अधिकारी व माझ्यामध्ये मोठी काच होती. त्यांच्याशी बोलायचे असेल तर समोरासमोर दूरध्वनी करून बोलायला लागायचे. मला इंग्रजी नीट येत नव्हते. माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत मी संतोषच्या आजार व उपचाराबाबत सांगितले. मला आणि संतोषला उद्या औषधोपचारासाठी डोमिनिकन रिपब्लिक या देशात जायचे आहे त्यासाठी संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) मिळावा ही विनंती केली. आणीबाणीची वेळ असून सुद्धा बाजूच्या माणसाने तो देण्याचे नाकारले हे पण त्याला सांगितले. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माझी सर्व कागदपत्रे पडताळली. हातातील दूरध्वनी खाली ठेवला व मला तत्काळ संक्रमण परवाना देण्याचा आदेश त्या भारतीय माणसाला दिला. माझ्या समोरच तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांची चांगली खरडपट्टी काढली. नंतर मला परत बोलावून माझी माफी मागीतली. काही वेळातच संक्रमण परवाना मिळेल असं सांगून मला तिथेच बसून रहायला सांगितले. संक्रमण परवाना हाती पडताच तिकडून बाहेर पडलो. अण्णा, मेहुणा आणि ती युवती माझी वाट पाहत होते. त्यांना तो संक्रमण परवाना दाखवला. सर्व जण खुश झाले. लगेच तिथून सुमनला दूरध्वनी केला व खुश खबर दिली. कुठेही थांबलो नाही, कुठेही थकलो, केव्हाही मागे वळून पहात कुढत बसलो नाही त्यामुळे अथक प्रयत्नांच्या या अग्नीपथातील सर्व अडथळे दूर करीत परिणाम नियतीने माझ्या पारड्यात टाकला होता. संतोष आणि मी उद्या म्हणजे मंगळवार, दिनांक २८ डिसेंबर २००६ रोजी डोमिनिकन रिपब्लिकला जाणार असल्याचा पक्का परवाना नियतीने पारित केला होता......

Thursday, December 3, 2020

संतोषला उपचारासाठी विदेशात नेण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न करू लागलो...

'सर्व सोंगं करता येतात परंतु पैशाचे सोंग करीता येत नाही' असं वाक्य व्यवहारात नेहमी वापरले जाते. पैश्यासाठी हात पसरले की तोच पैसा आपला कोण, परका कोण याची जाणीव करून देत असतो. अश्यावेळी नकारात्मक विचार केला की 'दुड्डे दोडप्पा' ही कानडी म्हण खरी वाटू लागते. परंतु 'पैसाच सर्व काही आहे' असं सांगणारी कानडी म्हण खोटी ठरवणारी माणसे सुद्धा समाजात असतात. गरजु असूनही आपले विचार सकारात्मक ठेवले की मग ते सकारात्मक विचारच आपल्याला अश्या योग्य माणसांकडे घेऊन जातात. ही माणसे पैसाच काय माणुसकीपेक्षाही मोठी असतात. कारण एका माणसाचा जीव वाचण्यास मदत करणे म्हणजे संपुर्ण जगातील माणुसकी जीवंत ठेवण्यासारखे असते. 'पैसा खूप काही आहे परंतु सर्व काही नाही' हे अश्या सहृदयी लोकांमुळे मनाला पटते. 


ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेड्रा इन्क कंपनीकडून लिखीत संदेश (ईमेल) आला. पत्रामध्ये त्यांनी त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या उपचार पद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली होती. दर महिन्याला फक्त दोनवेळा ठरलेल्या शनिवारी-रविवारी ते रुग्णांमध्ये मुलभूत पेशींचे (स्टेम सेल्सचे) आरोपण करीत असत. अमेरिकेत मुलभूत पेशींच्या उपचार पद्धतीला (ट्रीटमेंटला) कायदेशीर परवानगी नसल्याने मेड्रा इंक कंपनीने अमेरिकेच्या जवळील डोमिनिकन रिपब्लिक नावाच्या एका स्वायत्त बेटावर रुग्णालय चालू केले होते. तिथे अमेरिकन कायद्यांची आडकाठी येत नसल्याने त्या रूग्णालयात ते सर्व रुग्णांवर मुलभूत पेशींच्या उपचार पद्धतीनुसार इलाज करीत असत. परंतु त्यासाठी त्याच रूग्णालयात जाणे आवश्यक होते. ही सर्व माहिती त्यांनी पत्रात दिली होती. खरे तर त्यांनी ऑगस्ट महिन्यातच संतोषला घेऊन येण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यावेळी माझी आर्थिक तयारी झालेली नसल्याने तसेच इतर काही आवश्यक व मुलभूत तयारी करणे सुद्धा बाकी असल्याने मी त्यांच्याकडून पुढच्या तारखा मागवून घेतल्या होत्या. संतोषला बरा करण्यासाठी त्याला जगात कुठेही नेण्याची माझी तयारी होती. आता सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे एकूण आर्थिक खर्च किती येणार? मेड्रा इंकच्या उपचार पद्धतीचा (ट्रीटमेंटचा) खर्च, जाण्या-येण्याचा खर्च, तिथे राहण्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च असे सर्व मिळून एकूण खर्च किती येणार याची मला माहिती काढायची होती.


मेड्रा इंक कंपनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात असल्याने प्रामुख्याने आम्ही ईमेलद्वारे एकमेकांशी संपर्क साधायचो. जेव्हा आम्ही त्यांना पुढची तारीख द्यायला सांगितली तेव्हा त्यांनी नोव्हेंबर व डिसेंबर मधील तारखा दिल्या. तिथे जाण्यास आवश्यक असलेली सर्व प्रकारची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून मी त्यातील डिसेंबरची तारीख निवडली. संतोषला कुठल्याही परिस्थितीत तिथे घेऊन जायचेच असा मी निर्धार केला होता. आम्ही मेड्रा इंक कंपनीला उपचार पद्धतीचा (ट्रीटमेंटचा) खर्च विचारला. मुलभूत पेशींची एक सुई टोचण्याचा (इंजेक्शनचा) खर्च त्यांनी २० हजार डॉलर इतका सांगितला. त्यावेळी एका डॉलरला ५४ रुपयाच्या आसपास किंमत होती. भारताच्या रुपयानुसार ११ लाख रुपये खर्च फक्त एक सुई टोचण्यासाठी (इंजेक्शनसाठी) येणार होता. सुदैवाने संतोषला फक्त एकच सुई टोचावी (इंजेक्शन) लागणार होती. परंतु बाकी जाण्या-येण्याचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च वेगळा येणार होता. या आर्थिक समस्येवर एकच पर्याय होता व तो म्हणजे पैसा जमवून त्याला तिथे घेऊन जाणे. अर्थात ते इतके सोप्पं सुद्धा नव्हतेच. तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत संतोषला तिथे नेऊन त्यांच्याकडून उपचार करवून घ्यायचे मी ठरवले होते. 


आपली कितीही तयारी असली तरी पैश्याशिवाय कुठलेही काम करता येत नाही हे सत्य आहे. मुलभूत पेशींची सुई टोचण्याच्या महत्वाच्या उपचारासाठी अकरा लाख व बाकीचा खर्च चार लाख असे एकूण १५ लाख रुपये लागणार होते. मी सर्वात पाहिले कॉर्पोरेशन बँकेत गेलो व पास बुक भरून ते अद्ययावत केले. खात्यात फक्त आणि फक्त १६ हजार रुपये शिल्लक होते. मला तर चक्क १५ लाख रूपये उभे करायचे होते. माझ्यासमोर पैसे कसे जमा करायचे हा मोठा यक्ष प्रश्न होता. परंतु पैसे कसे जमा करता येतात याचा जपान लाईफ मधला चांगला प्रदिर्घ अनुभव माझ्या गाठी जमा होता. ती माझी जमेची बाजू होती. जपान लाईफमध्ये असताना आम्ही पैसे जमवण्यासाठी जवळचे मित्र व नातेवाईक यांची यादी तयार करायचो. तीच पद्धत यावेळी कामाला आली. अर्थात छोट्या छोट्या रक्कमा जमवल्या असत्या तर १५ लाख रूपये जमायला खूप वेळ लागला असता, म्हणून मी एक लाखापर्यंत मदत करू शकतील अश्या माझ्या पन्नास मित्र व नातेवाईकांची एक यादी तयार केली. लोकांकडून पैसे जमवून संतोषवर उपचार करण्याची कल्पना सुमनला मान्य नव्हती व तीला ते आवडत सुद्धा नव्हते. ''पुढील काही महिन्यात किंवा जास्तीत जास्त वर्षभरात आपण सर्वांचे घेतलेले पैसे नक्की परत करू'', असं अश्वासन देऊन मी सुमानची समजूत घालू लागलो. मग विचार करून 'सर्वांचे पैसे वेळेवर परत करण्याच्या' अटीवर तिने संमती दर्शविली. त्यानंतर ओळखयादी करताना सुमनने सुद्धा मदत केली. एकवेळ पैसे गोळा करणे सोप्पं होते परंतु ते परत करणे व ते सुद्धा वेळेवर हे खूपच कठीण होते याची मला आतून जाणीव होत होती. परंतु संतोषसाठी काहीही करायची माझी तयारी होती. अखेर सुमनचा हातभार लागल्याने पन्नासपेक्षा जास्त लोकांची यादी तयार झाली.


माझ्या जागी दुसरा कोणी असता तर एखाद्याने कदाचित पैसे असून सुद्धा एवढा मोठा निर्णय घेतला नसता. कारण एवढे महागडे उपचार करून सुद्धा संतोषमध्ये फरक पडला नसता तर हा प्रश्न शिल्लक होता. मी सकारात्मक विचार केला की झाला तर फायदाच आहे. बाकी पैसे काय आज आहेत, उद्या नसतील. मग जास्त विचार न करता मी माझ्या कामाला लागलो. तयार केलेल्या ओळखयादीतील लोकांना भेटण्यास सुरुवात केली. कधी कधी आपल्याला वाटते की एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असल्यामुळे असाध्य आजारावर उपचारासाठी जर पैसे मागितले तर ती धनवान व्यक्ती तात्काळ मदत करेल. परंतु प्रत्यक्ष भेटून चर्चा केल्यावर समजते की त्यांची मदत करायची कितपत तयारी आहे. त्यांच्या मनात आपल्याबद्दल किती स्नेहभाव किंवा भरोसा आहे हे त्यांच्याशी बोलल्यावर समजते. मला काही ठिकाणी खूप चांगले अनुभव आले. काहीही न विचारता लगेच पैसे देणारे भेटले. तर काही जणांनी 'पैसे परत नाही केले तरी चालेल परंतु हाती घेतलेले संकल्पित कार्य पूर्ण करच' असं प्रेमाने निक्षून सांगितले. काहींनी 'संतोष लवकर बरा होवो' अश्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. अर्थात समाज म्हटले की काही लोकांकडून वाईट अनुभव सुद्धा येतातच. आर्थिक मदत काही नाही परंतु फुकटचे सल्ले मात्र अश्यांकडून भरपूर ऐकायला लागतात. तू एवढे पैसे खर्च करीत आहेस पण त्या उपचार पद्धतीने संतोष बरा होईल का?, डॉक्टरांनी संतोष बरा होण्याची काही हमी (गॅरंटी) किंवा शाश्वती दिली आहे का?, संतोष बरा नाही झाला तर पैसे फुकट जातील, खर्चाची रक्कम खूप मोठी आहे, परत एकदा विचार कर, वगैरे वगैरे भरपुर काही ऐकावे लागले. मी कोणाच्या उलटसुलट बोलण्याने कुठेच थांबलो नाही किंवा विचलित सुद्धा झालो नाही. ते माझ्या प्रारब्धाचे भोग होते असं समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले व माझे काम सुरूच ठेवले. काही जवळच्या लोकांनी दोन हजारापासून ते दोन लाखापर्यंत यथाशक्ती मदत केली. जे मोठी रक्कम देऊ शकतील अश्याच लोकांना मी प्रामुख्याने गाठत होतो. परिणामतः दहा बारा लोकांमध्येच मला १५ लाखाऐवजी १६ लाख रुपये जमवता आले. मी जाणीवपुर्वक प्रत्येकाकडून धनादेशाच्या (चेकच्या) स्वरूपात पैसे घेतले. घेतलेल्या प्रत्येक धनादेशाची (चेकची) छायांकित प्रत (झेरॉक्स) काढून ठेवली. त्या सर्व छायांकित प्रती आजही मी आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत. दुसरे म्हणजे आर्थिक मदत करणार्‍या सर्व लोकांना वेळेवर पैसे करताना धनादेशाच्या त्या छायांकित प्रती मला उपयोगी पडणार होत्या. पैसे जमा झाले होते. आता माझ्याकडे वेळ कमी होता. इतर आवश्यक व महत्वाच्या पुरक कामाची सुद्धा तयारी करणे अजून बाकी होते. 


उपचारासाठी मी आणि संतोषने जायचे ठरले. सुमनला नेता येत नव्हते. कारण एकतर तिघांचा खर्च जास्त झाला असता. परत तिचे सुद्धा पारपत्र (पासपोर्ट) बनवायला लागले असते. त्यामुळे फक्त मी आणि संतोषने जायचे ठरले. संतोषचे पारपत्र (पासपोर्ट) बनवण्याच्या मागे लागलो. मानपाडा मार्गावरील रवी इंटरनॅशनल यांच्याकडे संतोषचे पारपत्र बनविण्यास गेलो. पारपत्र लवकर मिळवण्यासाठी अतिरिक्त रक्कम सुद्धा भरली. कारण पारपत्राशिवाय पुढच्या हालचाली करता येणार नव्हत्या. अर्ज केल्या दिवसानंतर दोन महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर २००६ मध्ये संतोषचे पारपत्र हाती पडले. आता विदेशसंचारपत्र (व्हिसा) मिळवणे आणि विमानाचे तिकीट काढणे ही दोन मोठी आव्हानात्मक कामे बाकी होती.


डोमिनिकन रिपब्लिक या देशाचे नाव मी प्रथमच ऐकत होतो. जिथे संतोषवर उपचार होणार आहेत त्या देशात कसे जायचे याची मी माहिती काढायला सुरुवात केली. डोमिनिकन रिपब्लिक हा एक छोटासा बेटवजा स्वायत्त देश आहे. भारतातून तिथे थेट विमाने जात नव्हती. त्यासाठी जर्मनी किंवा फ्रान्स मार्गे त्या बेटवजा देशात जावे लागणार होते. डोमिनिकन रिपब्लिक या छोट्याशा देशात जगभरातून जाणाऱ्यांची एकूणच संख्या कमी असल्याने जर्मनी किंवा फ्रान्स या देशातून सुद्धा आठवड्यातून दोन वेळाच छोटी छोटी विमान त्या देशात ये-जा करीत असत. फ्रान्स किंवा जर्मनीतून डोमिनिकन रिपब्लिक या देशात जाणाऱ्या त्या छोट्या विमानांच्या वेळेनुसार मला इथे भारतातून विमान तिकीट काढायला लागणार होते. विमानाचे तिकीट आधी काढायचे की विदेशसंचारपत्र (व्हीसा) आधी मिळवायचे याची मला कल्पना नव्हती. त्यासाठी मी माझ्या जिजाजींना भेटलो. मुंबईतील खार येथे विमान तिकीट व विदेशसंचारपत्र (व्हिसा) मिळवून देणारे अनेक प्रवासी दलाल (ट्रॅव्हल एजंट) त्यांच्या ओळखीचे होते. त्यांच्या बरोबर मी खारला गेलो. सुरुवातीला एकदोन जणांना भेटलो. तेव्हा पदरी घोर निराशा पडली. डोमिनिकन रिपब्लिकचे विदेशसंचारपत्र कार्यालय (व्हिसा ऑफिस) मुंबईत नव्हते. त्यासाठी दिल्लीला जावे लागेल आणि ते खूप कठीण आहे असं त्या प्रवासी दलालांकडून कळले. दिल्लीला तिथे अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील तेव्हा एवढा पैसा का खर्च करीत आहात? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. शेवटी जिजाजींनी त्यांच्या एका खास मित्राकडे नेले. त्यांची ज्योती इंटरनॅशनल नावाची खूप मोठी यात्रासंस्था (ट्रॅव्हल एजन्सी) होती. आम्ही जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा ते कामात व्यग्र होते. त्यामुळे थोडावेळ वाट पाहावी लागली. मग त्यांनी आम्हाला आत बोलावले. आम्ही त्यांना त्यांच्याकडे येण्याचे सविस्तर कारण सांगितले. त्यावेळी ते जे म्हणाले ते वाक्य माझ्या मनावर कायमचे छापले गेले. ते म्हणाले, "तुमच्यासाठी आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. जर संतोषच्या नशिबात तिकडे जाऊन उपचार घ्यायचे लिहीले असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही".....

Monday, November 30, 2020

संतोषच्या आजारावर जेव्हा आशेचा किरण दिसू लागला...

'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असं म्हटले जाते. वास्तविक पहाता आयुष्यभर जरी वाळूचे कण रगडले तरी त्यातून तेल निघणार नाही हे सत्य असते. मृगजळाचे भासमान पाणी कोणाचीही तहान शमवू शकत नाही. मनाचे मांडे कितीही खाल्ले तरी पोट भरणार नाही. परंतु अशी अशक्यप्राय परिस्थिती असताना सुद्धा जेव्हा झपाटल्यासारखे प्रयत्न केले जातात तेव्हा बुडत्याला काडीचा आधार पुरेसा आहे हे सुद्धा सत्य बनू लागते. प्राप्त प्रतिकूल परिस्थितीत तोच आशेचा आनंददायी किरण वाटू लागतो. अंधाराच्या पलिकडे उजेड आहे या विचाराने माणूस चालत रहातो. संतोषच्या दुर्धर आजारावर उपचार नाही ही गोष्ट स्विकारून शांत बसणे माझ्यासाठी अशक्य होते. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' यानुसार मी माझे अथक प्रयत्न चालू ठेवले होते. 


दिनांक १३ जून २००६ रोजी संतोषची शाळा सुरू झाली. शाळेत जाताना सातवीपर्यंत संतोष सोबत सुमन असायची. आता तो आठवीत गेला होता. यावर्षी पहिल्या दिवसापासून त्याला शाळेत सोडण्याची व परत घेऊन येण्याची जवाबदारी आता मी घेतली होती. मी माझ्या दुचाकीवरून दुपारी त्याला शाळेत घेऊन जायचो व संध्याकाळी साडेपाच वाजता न चुकता शाळेतून परत घेऊन यायचो. संतोषची मंजुनाथ शाळा आमच्या घरापासून काही अंतरावरच होती. आठवीत त्याचा वर्ग चौथ्या मजल्यावर होता. शाळा भरत असताना कोणा विद्यार्थ्याचा धक्का लागून संतोषच्या पडण्याची मला भीती वाटत होती म्हणून शाळा भरत असताना संतोषला त्याच्या वर्गापर्यंत घेऊन जायची परवानगी मी शाळेतील शिक्षकांकडून मिळवली. जेवढी शक्य आहे तेवढी सर्व प्रकारची काळजी मी संतोषच्या बाबतीत घेत होतो. एवढा मोठा आजार असून सुद्धा तो शाळेत जाताना कंटाळा करत नव्हता. उलट त्याला शाळेत जायला खूप आवडत असे. शाळेत वर्गमित्रांबरोबर गप्पा, मस्ती करण्यात मन रमून जात असल्याने दिवस कसा जायचा ते त्याचे त्याला सुद्धा कळत नसे.


माझ्यापेक्षा सुमनचा देवावर अधिक विश्वास होता. ती देवाधर्माचे, नामस्मरण वगैरे खूप करायची. 'देवावर विश्वास ठेवला की तो सर्व ठीक करतो' अशी तिची प्रगाढ श्रद्धा होती. "संतोषच्या आयुष्यात जे काय लिहीले आहे ते त्याला भोगावेच लागेल. आपण फक्त चांगल्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करु शकतो. आपल्या हातात एवढेच असते. देव सुत्रधार आहे. आपण पात्रधार आहोत. देवाने आधीच ठरवले आहे कोणाला काय द्यायचे. आपल्याकडून जेवढे सत्कर्म करता येईल तितके आपण करायचे. बाकी सर्व त्याच्या हातात आहे", इतक्या सोप्या शब्दात निष्काम कर्मयोग सुमन मला नेहमी सांगत असे. तिने संतोषला हनुमान चालीसा तोंडपाठ करायला लावला होता. ती दिवसातून दोनदा हनुमान चालीसा त्याला म्हणायला लावायची. दर शनीवारी मी संतोषला गोग्रासवाडी येथील हनुमान मंदिरात घेऊन जायचो. आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे संतोष पालन करायचा. त्याला कितीही त्रास झाला तरी तो सर्व त्रास आम्हाला न सांगता सहन करायचा.


संतोषच्या आजारावर औषध शोधताना यावेळी मी एकटा नव्हतो. माझ्याबरोबर आता नागेंद्र सुद्धा होता. मला नागेंद्रची भावनिक, वैचारिक साथ व मदत मिळत होती. आम्ही दोघे आठवड्यातून एकदा कुठल्यातरी सायबर कॅफेमध्ये ठरवून भेटायचो. ई-मेल तपासणे-वाचणे तसेच गूगलवर मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारावर कुठे काही औषध उपलब्ध आहे का हे शोधणे वगैरे कामे आम्ही करायचो. आतापर्यंत ज्यांना कोणाला आम्ही ईमेल पाठवले होते त्यांची ईमेलद्वारे प्रत्युत्तरे आलेली होती. "सदर आजारावर आमचे संशोधन सुरू आहे. जर यावर काही औषध निघाले तर आम्ही तुम्हाला जरूर कळवू", अशी एकसाच्यातील उत्तरे बहुसंख्यांकडून आली होती. कोणाकडूनही सकारात्मक उत्तर आले नव्हते. असेच एक दिवशी आम्ही महाजालावर (इंटरनेटवर) औषध शोधत होतो. अचानक आम्हाला अमेरिकेतील एका कंपनीचा शोध लागला. त्या कंपनीने मस्क्युलर डिस्ट्रॉफीवर औषध बनवल्याचा दावा केला होता. त्या दिवशी मला खूपच आनंद झाला होता.


महाजालावर (इंटरनेटवर) बरीच मुशाफिरी (सर्फिंग) केल्यानंतर या अपवादात्मक कंपनीचा छडा लागला होता. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे डॉक्टर विल्यम रडार यांची मेड्रा इंक या नावाची कंपनी होती. त्यांनी अश्या काही दुर्मिळ आजारांवर औषधं शोधून काढल्याचा दावा केला होता. ज्या आजारावर जगात कुठेही औषधोपचार नाही अश्या रुग्णांना ती औषधं दिल्याने ते बरे होण्याची शक्यता मेड्रा इंक या कंपनीने व्यक्त केली होती. मी आणि नागेंद्रने या विषयाचा सखोल आढावा घ्यायचे ठरवले. मेड्रा इंकचे औषध नेमके काय आहे? ते औषध खरोखरच संतोषच्या आजारावर लागू होईल काय? योग्य तो परिणाम साधेल काय? आतापर्यंत कितीजण ते औषध वापरून बरे झाले आहेत? कोण कोण बरे झाले आहेत? वगैरे प्रश्नांचा मागोवा घ्यायला आम्ही सुरुवात केली.


स्टेम सेल्स (Stem Cells)


मेड्रा इंक या अमेरिकन कंपनीचे डॉक्टर विल्यम रडार हे बरे न होणाऱ्या किंवा ज्याला औषध नाही अश्या आजारावर 'स्टेम सेल्स थेरेपी' वापरून उपचार करीत होते. मी आणि नागेंद्र दोघांनी मिळून स्टेम सेल्स म्हणजेच मुलभूत पेशी याबद्दल थोडीफार माहिती मिळवली. जगात अनेक देशांमध्ये यावर संशोधन सुरू होते. भारतात सुद्धा काही ठिकाणी मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) यावर संशोधनाला सुरुवात झाली होती. परंतु मेड्रा इंक कंपनीने ज्या मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) वापरून औषधोपचाराचे तंत्रज्ञान विकसित केले होते ते भारतात अजून कोणाकडेही उपलब्ध नव्हते. या मुलभूत पेशी म्हणजे काय असते? मातेच्या गर्भात पुबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन फलित बिजांड तयार होते. त्यातूनच पुढे हातापायासह नखशिखान्त सर्व अवयव असलेले छोटेसे बाळ तयार होते. सुरूवातीला केवळ एकच असलेल्या फलित बीजांडापासून अगणित पेशी असलेला बहुपेशीय असा संपुर्ण मानव कसा तयार होत जातो? कोणत्या पेशी ठरवतात की कोणी हात बनायचे, कोणी मेंदू बनायचे? रक्त, मांस, धमन्या, हाडे हे कोणत्या पेशी समुहातून तयार होतात? ते ठरवते कोण? सुरूवातीला फलित बिजांडातून एका पेशीच्या दोन पेशी व दोनाच्या चारपेशी होत जातात त्यातच शरीराचे सर्व अवयव बनवणार्‍या मुलभूत पेशी म्हणजे स्टेम सेल्स या सुद्धा जन्माला येतात. या मुलभूत पेशी ज्या पेशींना जन्माला घालतात त्यातून बाळाचे विविध अवयव तयार होतात. मुलभूत पेशींच्या समुहाला उती (टिश्यु) म्हणतात. विविध अवयव बनवणाऱ्या विविध उती (टिश्युज्) असतात. अश्याप्रकारे अपघातात जर एखादी व्यक्ती हात गमावून बसली असेल तर हात बनवणाऱ्या मुलभूत पेशींच्या समुहाचे म्हणजे त्या उतींचे त्या व्यक्तीच्या शरीरात रोपण केले जाऊन त्याच्या हाताची पुनर्निर्मिती केली जाणे शक्य आहे असं सर्व शास्त्रज्ञांचे एकमत आहे. यावर जगात सर्वत्र संशोधन चालू आहे. ज्या असाध्य रोगात शरीराच्या ज्या पेशींची हानी तो रोग करतो त्या नष्ट झालेल्या पेशी मुलभूत पेशींच्या म्हणजे उतींच्या मदतीने परत निर्माण करून रूग्णाला बरे करणे शक्य आहे असं जगातील सर्व शास्त्रज्ञ दाव्याने सांगत आहेत. यासाठी गरोदर मातेच्या गर्भनळीतील रक्त काढून एका विशिष्ट तापमानात साठवून ठेवतात. त्या रक्तातील मुलभूत पेशींमध्ये कुठलाही आजार बरा करण्याची क्षमता असते. मानवी शरीरातील कुठल्याही अवयवांची पुन्हा निर्मिती करण्याची क्षमता या मुलभूत पेशींमध्ये (स्टेम सेल्समध्ये) असते असे आजपर्यंत शास्त्रज्ञ सांगत आले आहेत. परंतु यावर अजून बरेच संशोधन होणे बाकी आहे. आताशी कुठे कल्पना मान्य झाली असली तरी ती प्रत्यक्षात उतरून तीचा वापर उपचारासाठी होण्यास अजून कित्येक वर्षे लागण्याची शक्यता आहे. 


संतोषच्या आजारावर जगात कुठेही औषध नसल्याने मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) या विषयाने माझ्या आशा पल्लवित झाल्या. "आपण मेड्रा इंकशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊ या का?", असं मी नागेंद्रला विचारले. नागेंद्रने सुद्धा लगेच होकार दिला आणि मेड्रा इंक कंपनीच्या संबंधीत व्यक्तीशी आम्ही ईमेलद्वारे संपर्क साधला. घरी सुमनला सुद्धा ईमेल पाठवल्याची कल्पना दिली. प्रयत्न करायला हरकत नाही असे तिचे म्हणणे होते. दोन दिवस वाट पहिल्यानंतर त्या कंपनीकडून संदेश आला. संतोषच्या आजाराबद्दलची संपूर्ण माहिती व आतापर्यंत काढलेल्या अहवालाची सर्व कागदपत्रे पाठविण्यास त्यांनी सांगितले होते. वेळ न घालवता त्याच दिवशी आम्ही संतोषचे आतापर्यंतचे सर्व अहवाल त्यांना ईमेलद्वारे पाठवून दिले.


काही दिवसातच मेड्रा इंक कंपनीकडून एक मोठं पुडके (पार्सल) दाराशी आले. आजतागायत मला बाहेरच्या देशातून कधीच कोणतेच टपाल (पार्सल) आले नव्हते. त्यात संतोषच्या आजारावरील औषधाची माहिती आल्याचे समजताच माझ्या आनंदाला सीमाच राहीली नव्हती. वेळ न दवडता उत्साहाने पुडके उघडले. त्यात साधारणतः शे-दोनशे पानांचे एक पुस्तक होते. त्या पुस्तकात 'स्टेम सेल थेरेपी'ची इत्यंभूत माहिती दिली होती. मुलभूत पेशींचा (स्टेम सेल्सचा) शोध कसा लागला? कधी लागला? कोणकोणत्या आजारांवर मुलभूत पेशींच्या (स्टेम सेल्सच्या) मदतीने मात करता येते? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यात होती. मेड्रा इंका कंपनी कोणत्या प्रकारच्या मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) वापरतात? त्या पेशी ते कसे मिळवतात? वगैरे माहिती सुद्धा पुस्तकात दिली होती. मेड्रा इंक कंपनी एका निराळ्या पद्धतीने मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) वापरत असल्याचा त्यांनी त्या पुस्तकात माहितीपुर्ण दावा केला होता. मी त्याचा संपूर्ण अभ्यास केला. संतोषच्या आजारावर दुसरा कोणताच उपाय नसल्याने मुलभूत पेशींची (स्टेम सेल्सची) उपचार पद्धती वापरायचे ठरवले. परत ईमेलद्वारे त्यांच्या उपचार पद्धतीची संपूर्ण माहिती मागवली. तसेच खर्च किती येणार ? किती दिवस लागतील? त्यासाठी कुठे यावे लागेल? वगैरे इतर सर्व गोष्टींची सविस्तर माहिती पाठविण्यास त्यांना विनंती केली. सर्वत्र अंधःकार असताना मला पलिकडे प्रकाश असल्याची जाणीव होऊ लागली होती. स्थानिक पातळीवर सर्व वैद्यकीय तज्ञ ना-इलाजाची नकार घंटा वाजवीत असताना मला कुठेतरी एक आशेचा किरण दिसू लागला. बुडत्याला काडीचा आधार पुरेसा असतो हे त्यावेळी मनोमन पटल्याने पटकन आठवले की "डुबनेवाले को तिनके का सहारा भी बहुत होता है।"......

Thursday, November 26, 2020

संतोषच्या असाध्य आजारावर निदान शोधण्यासाठी मी सुरू केलेले प्रयत्न...


"जिंदगी एक पहेली भी है, सुखदुःख की सहेली भी है। जिंदगी एक वचन भी तो है, जिसे सबको निभाना पडेगा। जिंदगी गम का सागर भी है, हँस के उस पार जाना पडेगा। जिंदगी प्यार का गीत है, उसे हर दिल को गाना पडेगा।" अश्या थोडक्या शब्दांत जीवनाचे सार सांगणारी अनुभूती जेव्हा दुःखग्रस्त उध्वस्त मनाला होऊ लागते तेव्हा परत एकदा फिनिक्स पक्षासारखी भरारी मारायची भावना होऊ लागते. थांबणे हे माझ्या रक्तातच नसल्याने दुःखावर उपाय शोधण्याऐवजी गलितगात्र होऊन बसणे मला योग्य वाटेना. प्रयत्नांती परमेश्वर असेल किंवा नसेल परंतु प्रयत्न हे करायचेच एवढेच मला त्या दुःखी अवस्थेत सुद्धा जाणवू लागले होते. माझे जीवन कोरा कागद नसून प्रयत्नांचा ललाटलेख मीच त्यावर लिहीणार असा मी संकल्प केला. 


वाडिया रूग्णालयातून आम्ही निघालो. गाडी रस्त्यावरून भरधाव वेगाने चालली होती. बाहेर पडणार्‍या पहिल्या पावसाचा जोर वाढला होता. चालकाने रेडिओवरील बातम्या लावल्या होत्या. येत्या काही तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवणारी बातमी सांगितली जात होती. मला कधी एकदा घर गाठतो असे झाले होते. डोळ्यासमोर डॉक्टर दिसत होते. त्यांचे शब्द वारंवार कानांमध्ये घुमत होते. स्वतःला कितीही सांभाळायचा प्रयत्न केला तरी अश्रु काही रोखता येत नव्हते. आभाळाप्रमाणे डोळे सुद्धा भरून आले होते. संतोषचे काय होणार हा एकच प्रश्न मनात प्रश्नांची मालिका तयार करीत होता. त्याला काय सांगायचे? जर त्याचे आयुष्य कमी असेल तर तो जन्माला का आला? का म्हणून त्याला असे शापित आयुष्य मिळाले? आतापर्यंत सर्व सुरळीत चालले असताना आता अचानक हा कोणता आजार उद्-भवला? त्याच्या शिक्षणाचे काय? इथून पुढे आपण काय करू शकतो? या सर्व विचारांनी माझे डोकं सुन्न झाले होते. काही वेळाने आम्ही डोंबिवलीला पोहचलो. 


घरी आल्यावर संतोषला डॉक्टरांनी सांगितलेले सर्व समजावून सांगितले. मला वाटले होते की त्याच्या मनावर विपरित परिणाम होईल. परंतु उलट तोच आमचे सांत्वन करीत म्हणाला, "जे काय होईल त्याला आपण सामोरे जाऊ या. आपण या आजारावर उपाय शोधु या. तुम्ही काळजी करू नका." त्याच्या या बोलण्याने मला व सुमनला थोडेसे हायसे जरी वाटत असले तरी मनामध्ये मात्र दुःखाचा सागर उसळून आला होता. त्याला बाहेरच बसवून मी आणि सुमन आतल्या खोलीत गेलो. त्या दिवशी एकांतात आम्ही दोघे खूप रडलो. एकच चिंता सतावत होती आता पुढे काय होईल? शनिवारी मी ग्रंथालयात गेलो नाही. प्रथमच असं घडत होते की मी डोंबिवलीत व घरी असून सुद्धा वाचनालयात गेलो नाही. अन्यथा एरवी माझी दिवसातून एखादी तरी फेरी वाचनालयात असायचीच. त्या दिवशी मला कोणालाच भेटावेसे वाटत नव्हते. कोणाशी सुद्धा बोलायची इच्छा होत नव्हती. कोणी विचारले तर काय सांगायचे या प्रश्नावर उत्तरच मिळत नव्हते. काहीच सुचत नव्हते म्हणून घरीच थांबलो.


रविवारचा दिवस सुद्धा असाच उदासवाणा गेला. कुठून सुरुवात करायची? कोणाशी बोलायचे? या प्रश्नांवर अजूनही काहीच सुचत नव्हते. परंतु असे किती दिवस चालणार? काही तरी करावे लागणार होते. खूप विचार केल्यानंतर संतोषच्या आजाराची संपूर्ण माहिती मिळवायची व मग पुढे काय करायचे ते त्यानंतर ठरवायचे या निर्णयापर्यंत मी पोहचलो. माहिती मिळवण्यासाठी आपल्या वाचनालयापासून आधी सुरुवात केली. दुर्दैवाने या आजाराचा कुठल्याही पुस्तकात उल्लेख सापडला नाही. मग सोमवारी सकाळी मुंबईला जायचे ठरवले. मुंबई रेल्वे स्थानकाबाहेर नुकतेच एक नवीन वाचनालय सुरू झाले होते. तिथे फक्त आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तके उपलब्ध होती. दुपारी त्या वाचनालयात पोहोचलो. तिथे पुस्तकं बाहेर घेऊन जायची मुभा नव्हती. तिथेच बसून पुस्तक वाचायचे हा तिथला नियम होता. "मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाच्या आजाराविषयी कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत?" अशी तेथील ग्रंथपालकडे चौकशी केली. "आपण विचारत आहात त्या आजाराविषयी इथे कोणतेही पुस्तक उपलब्ध नाही" असे त्याने उत्तर दिले. तरी सुद्धा मी स्नायुपेशी संबंधित इतर काही पुस्तके चाळली. तेव्हा एका पुस्तकात मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारा संबंधी काही उल्लेख मला सापडले. त्याव्यतिरिक्त अजून बरीच काही माहिती मिळवली. काही वेळ तिकडे घालवल्यावर मग डोंबिवलीला परतलो.


त्याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री संतोषचे सर्व अहवाल घेऊन डॉक्टर योगेश आचार्य यांच्याकडे गेलो. इतर सर्व रुग्णांच्या तपासणी नंतर मी एकटाच असताना डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलावले. बरोबर आणलेली सर्व कागदपत्रे व तपासणी अहवाल त्यांना दाखवले. वाडिया रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी सांगितलेले सर्व त्यांच्या कानावर घातले. सर्व कागदपत्रे पहिल्यानंतर ते म्हणाले, "हा आजार खूप कमी लोकांमध्ये आढळतो. यावर कोणतेही औषध नाही. तुमच्याकडून तुम्हाला जे काही प्रयत्न करता येतील ते तुम्ही करा. बाकी सर्व देवावर अवलंबून आहे." माझ्या पदरी परत एकदा निराशा पडली. फिरून फिरून परत त्याच प्रश्नावर येऊन थांबावे लागत होते. घरातून बाहेर पडलो की कामाच्या नादात तात्पुरते का होईना सर्व विसरायला व्हायचे, परंतु घरी आलो की परत तोच प्रश्न आवाचून पुढे उभा रहायचा?


त्याकाळी माहितीचे महाजाल म्हणजे इंटरनेट खूप कमी लोक वापरायचे. मोजक्याच लोकांकडे महाजालाची (इंटरनेटची) जोडणी (कनेक्शन) असायची. महाजालाचा (इंटरनेटचा) उपयोग लोकं जास्त करून सायबर कॅफेमध्ये जाऊन माहिती गोळा करणे तसेच ईमेल करणे-तपासणे, सर्फिंग, चॅटिंग वगैरे कामांसाठी करीत असत. मस्क्युलर डिस्ट्रॉफीची काही माहिती महाजालावर (इंटरनेटवर) मिळू शकेल का असा माझ्या मनात विचार आला. मानपाडा रोडवरील कस्तुरी प्लाझा या इमारतीत तेव्हा काही सायबर कॅफेज् उपलब्ध होती. रात्रीचे जेवण झाल्यावर त्यापैकी एका सायबर कॅफेमध्ये गेलो. त्यांना संगणक सुरू करून देण्यास सांगितले. गूगल सुरू केले आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी असं इंग्रजीमध्ये टंकीत (टाईप) केले. बरीच माहिती समोर आली. या आजाराची लक्षणे कोणती, कोणाला हा आजार होतो, त्यावर उपाय काय आहेत, या आजारावर काही इलाज आहे का वगैरेबाबत बरीच माहिती महाजालावर उपलब्ध होती. मला त्यातील थोडसे समजले. बाकी सर्व डोक्यावरून गेले कारण माझे इंग्रजी कच्चे होते. इंग्रजी शब्दांचे कधी कधी अर्थ कळत नाहीत तर कधी कधी वाक्यातील सर्व इंग्रजी शब्दांचे अर्थ माहित असून सुद्धा त्या वाक्याचा अर्थबोध होत नाही. परत मी जी माहिती शोधत होतो त्यात जास्त करून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित इंग्रजी शब्द वापरलेले होते. मला त्याचा अर्थ सहजासहजी काही लागत नव्हता. मी तरी सुद्धा एक तास माझी शोध मोहीम चालू ठेवली. या आजारावर मी खोलात जाऊन माहिती खंगाळत होतो. दरम्यान काही रोगपिडीत मुलांची छायाचित्रे (फोटो) सुद्धा पाहिली. मन अस्वस्थ झाले. काहीच सुचत नव्हते. मग थोड्या वेळाने घरी परतलो.


माझ्याकडून जे काही प्रयत्न करता येणे शक्य आहे ते सर्व प्रयत्न करायचेच असे मी ठरवले होते. डोंबिवलीत सावरकर रोडवर दवाखाना असलेले डॉक्टर आचार्य काही आजारांवर अ‍ॅक्युप्रेशर थेरपी वापरून उपचार करतात अशी मला माहिती मिळाली. संतोषला तिकडे घेऊन गेलो. त्यांनी संतोषची तपासणी केली. "आपण प्रयत्न करू या", असे ते म्हणाले. मग रोज सायंकाळी त्यांच्या दवाखान्यात जायला सुरुवात केली. संतोषला एक आयुर्वेदिक काढा सुद्धा द्यायला लागलो. संतोषची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्याला आता खुर्चीवरून सुद्धा उठताना त्रास होत होता. मी निराश झालो होतो परंतु हताश झालो नव्हतो. कुठे तरी या आजारावर औषध मिळेलच व संतोष पुर्वीसारखा ठीक होईल असा मला ठाम विश्वास होता. 


जगाच्या कोणत्या तरी कानाकोपऱ्यात यावर उपाय उपलब्ध असणारच फक्त आपण तिथपर्यंत पोहोचले पाहिजे याची मला खात्री होती. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी एकाच माध्यम होते व ते म्हणजे माहितीचे महाजाल उर्फ इंटरनेट. माझे इंग्रजी उत्तम नसल्याने आणि महाजालाचा (इंटरनेटचा) वापर नीट करता येत नसल्याने कोणाची तरी मदत घ्यायचे ठरवले. यासाठी माझ्या बहिणीचा मुलगा नागेंद्र भटची मी मदत घ्यायचे ठरवले. संतोषचे वजन कमी व्हावे म्हणून नागेंद्र, मी व संतोष याआधी एकत्र व्यायाम करायचो. नागेंद्रला घरी बोलावून घेतले व त्याला आतापर्यंत जे काय घडले त्याची सर्व माहिती दिली. जेव्हा त्याला संतोषच्या आजाराबद्दल समजले तेव्हा त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. दुःखावेगाने त्याने मला घट्ट मिठी मारली. त्याला म्हटले "जगात कुठेही या आजारावर औषध असेल तर तिथे संतोषला घेऊन जायची माझी तयारी आहे. फक्त महाजालावरून (इंटरनेटवरून) ती माहिती शोधून काढणे आता तुझी जवाबदारी आहे". नागेंद्रने ती जवाबदारी तत्काळ स्वीकारली. त्याने संतोषसाठी caring4santosh या नावाचा ईमेल आयडी तयार केला. अमेरिका, इंग्लंड, इस्रायल, दक्षिण कोरिया, चीन अशा काही देशातल्या मोठ्या रुग्णालयातल्या डॉक्टरांना आणि संबंधीत अधिकाऱ्यांना त्याने संदेश (ईमेल) पाठवले. संतोषच्या आजाराबाबत तपशीलवार माहिती व आतापर्यंत काढलेले तपासणी अहवाल याची ईमेलमधून माहिती पुरवली. 'जर आपल्याकडे या आजारावर काही औषधोपचार असल्यास कळवावे' अशी त्या लोकांना विनंती केली. आठवड्यातून एकदा तरी सायबर कॅफेमध्ये आपल्यापैकी एकाने जाऊन संदेश (ईमेल) तपासण्याचे मी व नागेंद्रने आपआपसात ठरवले. कोणाचे प्रत्युत्तर आले असल्यास एकमेकांना कळविण्याचे ठरवले. जे माझ्या पदरी पडले आहे त्याला सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधायचाच असे मी ठरवले होते. संतोषला मी व सुमनने जन्म दिला होता. त्याच्या आजारावर औषध शोधणे आणि त्याला बरा करणे माझे कर्तव्य होते. आता मी सर्व दुःख विसरून संतोषच्या आजारावर औषध शोधू लागलो होतो. दुःख मी स्विकारले होते म्हणूनच "वह सुखी है जो खुशी से दर्द सह गया।" या कोरा कागज चित्रपटातील गाण्याच्या शेवटच्या कडव्यानुसार मी प्रयत्नांचा ललाटलेख माझ्या जीवनाच्या कागदावर लिहून तो कोरा ठेवायचा नाही हे निश्चित केले होते.

Saturday, November 21, 2020

संतोषच्या आजाराचे निदान झाल्यावर माझी व सुमनची झालेली अवस्था...

"मेरे जीवन का खारा जल, मेरे जीवन का हालाहल, कोई अपने स्वर में मधमय कर गाता, मैं सो जाता, कोई गाता मैं सो जाता" अशी झोप उडवून टाकणारी, डोळ्यातील खारे अश्रु सुकवून टाकणारी व हलाहल पचवायला लावणारी वेळ सामान्य माणसांवर सुद्धा येते. रामायणात अग्निपरीक्षा फक्त सितेलाच द्यावी लागली होती असे नाही तर प्रतिकूल परिस्थितीत सितेच्या विरहाने रामाला सुद्धा सतत अग्नीदाह भोगावा लागला होता. प्रतिकुल परिस्थितीचा पहाड जेव्हा सामान्य माणसाच्या अंगावर कोसळतो तेव्हा ती परिस्थिती पेलवून नेण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. त्या प्रतिकुल परिस्थितीचे ओझे वाहणे हीच त्याच्यासाठी एक दाहक अशी अग्नीपरिक्षा असते. त्यात एखादी छोटीशी विषारी वेळ अशी ठरते की ओझ्याने अगोदरच वाकलेल्या उंटाच्या पाठीवरची ती शेवटची काडी ठरते. मग वटवृक्षसारखा पाळमुळे घट्ट रोवून प्रतिकुल परिस्थितीशी सामना करणारा हा खंबीर सामान्य मनुष्य सुद्धा मुळासकट उन्मळून पडतो. 

शनिवारी, दिनांक ३१ मे २००६ रोजी मी, सुमन व संतोष डोंबिवलीहून वाडिया रुग्णालयात जायला निघालो. आज वरिष्ठ तज्ञ डॉक्टर भेटणार होते. त्यांना सर्व तपासणी अहवाल दाखवल्यावर ते काय सांगतात याची चिंता वाटत होती. तसेच पुढे काय करायचे हे सुद्धा त्यांच्याकडूनच समजणार होते. गेले महिनाभर यासाठीच नुसती धावपळ चालू होती. प्रत्येक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वेळा पाळून हजर राहिलो होतो. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करून त्या पुर्ण केल्या होत्या. वेळात वेळ काढून संतोषला गाडीतून घेऊन जाणे, डॉक्टरांना भेटणे व सर्व अहवाल तयार करून घेणे हे सोपे काम नव्हतेच. जराही न कंटाळता जिद्दीने प्रत्येक काम पूर्ण केल्यामुळे मनावरचा ताण थोडा हलका झाल्यासारखा वाटत होता. एक पिता म्हणून संतोषसाठी योग्य उपचार करणे हे माझे कर्तव्य होते व त्याची मला जाणीव होती. कोणतीही गोष्ट एकदा हातात घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय मी कधीच गप्प बसत नसे. आता तर संतोषच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न होता. माझ्यासाठी ही अग्निपरीक्षाच होती व मला त्यातून बाहेर पडायचे होते.


सुमनने सकाळी चवदार नाष्टा केला होता परंतु आज मला तो रूचकर लागत नव्हता. माझे नाष्ट्यात लक्षच नव्हते. लक्ष्य फक्त एकच होते वाडिया रुग्णालयात जायचे व डॉक्टरांना भेटायचे. त्या खेरीज काहीच सुचत नव्हते. नेहमीप्रमाणे संतोष चालकाच्या (ड्रायव्हरच्या) बाजूला बसला होता. मी आणि सुमन मागे बसलो होतो. आम्ही दोघेही शांत होतो. आज वरिष्ठ तज्ञ डॉक्टर काय सांगतील? पुढे काय करावे लागेल? असे अनेक प्रश्न गाडीतून प्रवास चालू असताना मनात येत होते. वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांनी काहीही सांगितले तरी मन घट्ट करून ते ऐकायचे अशी मी मनाची तयारी केली होती. कोणताही प्रश्न असो त्याचे उत्तर सुद्धा असतेच असा माझा ठाम विश्वास होता. दिवसेंदिवस जग खूप पुढे जात आहे. विज्ञानाने भरपुर प्रगती केली आहे. अनेक दुर्धर व्याधी-विकारांवर मात करणारी औषधे शोधून काढण्यात विज्ञानाला यश लाभले आहे. कोणताही आजार असला तरी त्यावर काहीना काही उपाय हा असणारच याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. संतोषसाठी सर्व काही उपचार करण्याची माझी तयारी होती.

याआधी मुंबईला जायचो तेव्हा वेळ कसा जायचा ते कळत नसे. आज मात्र मुंबई खूप लांब वाटत होती. गाडी वेगाने धावत होती परंतु काळ मात्र थांबून राहिला आहे असं वाटत होते. कधी एकदाचे वाडिया रुग्णालयात पोहोचतो असे झाले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अकराच्या सुमारास आम्ही रुग्णालयात पोहचलो. थेट डॉक्टरांना भेटायला गेलो. आधीचे काही रुग्ण तपासून झाल्यावर त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलावले. आतापर्यंत चार पाच वेळा आम्ही या डॉक्टरांना भेटलो होतो त्यामुळे त्यांना संतोषचे खूप कौतुक वाटू लागले होते. त्यांनी आम्हाला पाहिल्यावर "वरिष्ठ तज्ञ डॉक्टर काही वेळात येतील तोपर्यंत अजून एक तपासणी राहिली आहे ती उरकून घेऊ या", असे सुचविले. तपासणीसाठी त्यांनी आम्हाला एका खोलीत नेले. तिकडे संतोषची तपासणी झाली. नंतर त्यांनी आम्हाला बाहेर बसायला सांगितले. वरिष्ठ तज्ञ डॉक्टर यायला अजून थोडा वेळ लागणार होता. दुपारचे दोन वाजले होते. संतोषला भूक लागली होती. "काहीतरी खाऊन परत येवु या" असे मी संतोषला व सुमनला सुचविले. रुग्णालयाच्या समोरचा रस्ता ओलांडल्यावर एक छोटे उपहारगृह (हॉटेल) होते. संतोषला पावभाजी खूप आवडायची. मग तिघांसाठी पावभाजी घेतली. पावभाजी खाऊन रुग्णालयात परतलो. वरिष्ठ तज्ञ डॉक्टर चार वाजता येणार असल्याचे समजले. वाट बघण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मी संतोषला घेऊन बाहेरच्या पटांगणात फेरफटका मारायला लागलो. बाहेर रणरणते ऊन होते. कसातरी वेळ घालवायचा होता. परत आत आलो तेव्हा कळले की आता डॉक्टर यायची वेळ झाली आहे. मग पुन्हा त्यांची वाट बघू लागलो.

वरिष्ठ तज्ञ डॉक्टर येताच तिथले सर्व कर्मचारी वेगाने कामाला लागले. त्यांची लगबग व हलचाली वाढल्या. वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. परत एक छोटी तपासणी केली आणि संतोषला बाहेरच बसून रहाण्यास सांगितले. आता त्या वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांसमोर फक्त मी आणि सुमन होतो. मी मनातून खूप अस्वस्थ होतो. माझे आणि सुमनचे लक्ष आता डॉक्टर काय बोलतात याकडे लागले होते. त्यांनी परत एकदा सर्व अहवाल तपासले. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. मला इंग्रजी समजत नसल्याने मग त्या महिला वरिष्ठ तज्ञ डॉक्टर हिंदीतून बोलू लागल्या. "आप के लडके को मांसपेशी की बिमारी है। विग्यान में इसे मस्क्युलर डिस्ट्रॉपी (Muscular Distrophy) कहते है। यह बिमारी बहुत ही कम बच्चों में पायी जाती है। ज्यादातर लडकों को यह असाधारण बिमारी होती है। कुछ महिनों बाद में मरिज का चलना फिरना बंद होके वह बिस्तर पकड लेता है। इस असाधारण बिमारी का दुनिया में कहीं भी कोई इलाज नही है। ऐसे मरिजों की आयु भी बहुत ही कम होती है। आपको अपने बेटे को बहुत ध्यान से संभालना होगा।" त्यांचे शब्द मला ध्वमस्फोटासारखे वाटून मला माझे डोकं फाटल्यासारखे वाटले. मी अंतर्बाह्य हादरलो. काहीच सुचत नव्हते. त्यांना काय प्रश्न विचारायचे हे सुद्धा आठवेना. मी सुमनकडे पाहिले. ती सुद्धा स्तब्ध झाली होती. डॉक्टर नंतर जे काही सांगत होते त्यातील काही समजत होते तर काही कळत नव्हते. तरी सुद्धा आम्ही ते सर्व नीट ऐकून घेतले. काही वेळाने मी आणि सुमन सुन्न मनाने त्या खोलीतून बाहेर आलो. संतोष बाहेर बसला होता. त्याने आम्हाला पाहताच डॉक्टर काय म्हणाले? मला काय आजार झाला आहे? पुढे काय करायला सांगितले? वगैरे प्रश्न विचारायला सुरूवात केली. मी त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ झालो होतो. सुमन पण शांत होती. त्याला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न पडला होता. संतोष आता अगदी लहान राहीला नव्हता. चौदा वर्षाचा झाला होता. अनेक गोष्टी त्याला समजत होत्या. "आता इथून निघु या. गाडीत बसलो की नीट तुला समजावून सांगतो", अशी टाळंटाळ करणारी उत्तरे मी देऊ लागलो. आम्ही तिघे गाडीत बसण्यास निघालो. 

३१ मे हा महिन्याचा शेवटचा दिवस. दिवसभर रणरणत्या ऊन्हामुळे खूप उकडत होते. परंतु आम्ही जेव्हा वाडिया रुग्णालयातून बाहेर पडलो तेव्हा आभाळ भरून आले होते. गाडीत बसलो तेव्हा संतोषच्या भविष्याच्या विचाराने माझे डोळे भरून आले. संतोषला काय सांगायचे? कसे सांगायचे? तो सारखा विचारात होता डॉक्टर काय म्हणाले? "आपण घरी जाऊन सविस्तर बोलू या", असं सांगून परत एकदा वेळ मारून नेली. संतोषशी बोलताना मला रडू आवरेना. सुमानच्या ही डोळ्यात पाणी आले. गाडी निघल्यावर काही वेळातच भरून आलेल्या आभाळातून  विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू लागला. सन २००६ चा हा पहिला पाऊस होता. बाहेर पाऊसामुळे गारवा निर्माण झाला होता परंतु माझ्या मनात मात्र अग्नीवर्षावाचा दाह होत होता. काहीच सुचत नव्हते. डॉक्टरांचे शब्द सारखे मनावर घणाचे घाव घालत होते. मी एवढा मनाने आणि विचाराने मजबूत असून सुद्धा त्या क्षणी खचलो होतो. डोळ्यासमोर अंधार पसरला होता. हा असा कुठला रोग आहे ज्याचा इलाज नाही? तो संतोषला कसा झाला? इतके वर्ष तर सर्व ठीक चालले होते मग अचानक हे असे कसे घडले? वगैरे प्रश्नांची उत्तरे मिळून सुद्धा भीषण सत्य कबुल करायला मन तयार होत नव्हते. मी काय गुन्हा केलाय? माझे ठीक आहे परंतु माझ्या निरागस लेकराने कोणाचे काय वाईट केले आहे? हे सर्व माझ्याच पदरी का पडले? असे सर्व प्रश्न वारंवार मनात येत होते. आता माझ्यापुढे एकच प्रश्न होता संतोषच्या आयुष्याचे पुढे काय?....