Thursday, November 26, 2020

संतोषच्या असाध्य आजारावर निदान शोधण्यासाठी मी सुरू केलेले प्रयत्न...


"जिंदगी एक पहेली भी है, सुखदुःख की सहेली भी है। जिंदगी एक वचन भी तो है, जिसे सबको निभाना पडेगा। जिंदगी गम का सागर भी है, हँस के उस पार जाना पडेगा। जिंदगी प्यार का गीत है, उसे हर दिल को गाना पडेगा।" अश्या थोडक्या शब्दांत जीवनाचे सार सांगणारी अनुभूती जेव्हा दुःखग्रस्त उध्वस्त मनाला होऊ लागते तेव्हा परत एकदा फिनिक्स पक्षासारखी भरारी मारायची भावना होऊ लागते. थांबणे हे माझ्या रक्तातच नसल्याने दुःखावर उपाय शोधण्याऐवजी गलितगात्र होऊन बसणे मला योग्य वाटेना. प्रयत्नांती परमेश्वर असेल किंवा नसेल परंतु प्रयत्न हे करायचेच एवढेच मला त्या दुःखी अवस्थेत सुद्धा जाणवू लागले होते. माझे जीवन कोरा कागद नसून प्रयत्नांचा ललाटलेख मीच त्यावर लिहीणार असा मी संकल्प केला. 


वाडिया रूग्णालयातून आम्ही निघालो. गाडी रस्त्यावरून भरधाव वेगाने चालली होती. बाहेर पडणार्‍या पहिल्या पावसाचा जोर वाढला होता. चालकाने रेडिओवरील बातम्या लावल्या होत्या. येत्या काही तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवणारी बातमी सांगितली जात होती. मला कधी एकदा घर गाठतो असे झाले होते. डोळ्यासमोर डॉक्टर दिसत होते. त्यांचे शब्द वारंवार कानांमध्ये घुमत होते. स्वतःला कितीही सांभाळायचा प्रयत्न केला तरी अश्रु काही रोखता येत नव्हते. आभाळाप्रमाणे डोळे सुद्धा भरून आले होते. संतोषचे काय होणार हा एकच प्रश्न मनात प्रश्नांची मालिका तयार करीत होता. त्याला काय सांगायचे? जर त्याचे आयुष्य कमी असेल तर तो जन्माला का आला? का म्हणून त्याला असे शापित आयुष्य मिळाले? आतापर्यंत सर्व सुरळीत चालले असताना आता अचानक हा कोणता आजार उद्-भवला? त्याच्या शिक्षणाचे काय? इथून पुढे आपण काय करू शकतो? या सर्व विचारांनी माझे डोकं सुन्न झाले होते. काही वेळाने आम्ही डोंबिवलीला पोहचलो. 


घरी आल्यावर संतोषला डॉक्टरांनी सांगितलेले सर्व समजावून सांगितले. मला वाटले होते की त्याच्या मनावर विपरित परिणाम होईल. परंतु उलट तोच आमचे सांत्वन करीत म्हणाला, "जे काय होईल त्याला आपण सामोरे जाऊ या. आपण या आजारावर उपाय शोधु या. तुम्ही काळजी करू नका." त्याच्या या बोलण्याने मला व सुमनला थोडेसे हायसे जरी वाटत असले तरी मनामध्ये मात्र दुःखाचा सागर उसळून आला होता. त्याला बाहेरच बसवून मी आणि सुमन आतल्या खोलीत गेलो. त्या दिवशी एकांतात आम्ही दोघे खूप रडलो. एकच चिंता सतावत होती आता पुढे काय होईल? शनिवारी मी ग्रंथालयात गेलो नाही. प्रथमच असं घडत होते की मी डोंबिवलीत व घरी असून सुद्धा वाचनालयात गेलो नाही. अन्यथा एरवी माझी दिवसातून एखादी तरी फेरी वाचनालयात असायचीच. त्या दिवशी मला कोणालाच भेटावेसे वाटत नव्हते. कोणाशी सुद्धा बोलायची इच्छा होत नव्हती. कोणी विचारले तर काय सांगायचे या प्रश्नावर उत्तरच मिळत नव्हते. काहीच सुचत नव्हते म्हणून घरीच थांबलो.


रविवारचा दिवस सुद्धा असाच उदासवाणा गेला. कुठून सुरुवात करायची? कोणाशी बोलायचे? या प्रश्नांवर अजूनही काहीच सुचत नव्हते. परंतु असे किती दिवस चालणार? काही तरी करावे लागणार होते. खूप विचार केल्यानंतर संतोषच्या आजाराची संपूर्ण माहिती मिळवायची व मग पुढे काय करायचे ते त्यानंतर ठरवायचे या निर्णयापर्यंत मी पोहचलो. माहिती मिळवण्यासाठी आपल्या वाचनालयापासून आधी सुरुवात केली. दुर्दैवाने या आजाराचा कुठल्याही पुस्तकात उल्लेख सापडला नाही. मग सोमवारी सकाळी मुंबईला जायचे ठरवले. मुंबई रेल्वे स्थानकाबाहेर नुकतेच एक नवीन वाचनालय सुरू झाले होते. तिथे फक्त आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तके उपलब्ध होती. दुपारी त्या वाचनालयात पोहोचलो. तिथे पुस्तकं बाहेर घेऊन जायची मुभा नव्हती. तिथेच बसून पुस्तक वाचायचे हा तिथला नियम होता. "मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाच्या आजाराविषयी कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत?" अशी तेथील ग्रंथपालकडे चौकशी केली. "आपण विचारत आहात त्या आजाराविषयी इथे कोणतेही पुस्तक उपलब्ध नाही" असे त्याने उत्तर दिले. तरी सुद्धा मी स्नायुपेशी संबंधित इतर काही पुस्तके चाळली. तेव्हा एका पुस्तकात मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारा संबंधी काही उल्लेख मला सापडले. त्याव्यतिरिक्त अजून बरीच काही माहिती मिळवली. काही वेळ तिकडे घालवल्यावर मग डोंबिवलीला परतलो.


त्याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री संतोषचे सर्व अहवाल घेऊन डॉक्टर योगेश आचार्य यांच्याकडे गेलो. इतर सर्व रुग्णांच्या तपासणी नंतर मी एकटाच असताना डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलावले. बरोबर आणलेली सर्व कागदपत्रे व तपासणी अहवाल त्यांना दाखवले. वाडिया रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी सांगितलेले सर्व त्यांच्या कानावर घातले. सर्व कागदपत्रे पहिल्यानंतर ते म्हणाले, "हा आजार खूप कमी लोकांमध्ये आढळतो. यावर कोणतेही औषध नाही. तुमच्याकडून तुम्हाला जे काही प्रयत्न करता येतील ते तुम्ही करा. बाकी सर्व देवावर अवलंबून आहे." माझ्या पदरी परत एकदा निराशा पडली. फिरून फिरून परत त्याच प्रश्नावर येऊन थांबावे लागत होते. घरातून बाहेर पडलो की कामाच्या नादात तात्पुरते का होईना सर्व विसरायला व्हायचे, परंतु घरी आलो की परत तोच प्रश्न आवाचून पुढे उभा रहायचा?


त्याकाळी माहितीचे महाजाल म्हणजे इंटरनेट खूप कमी लोक वापरायचे. मोजक्याच लोकांकडे महाजालाची (इंटरनेटची) जोडणी (कनेक्शन) असायची. महाजालाचा (इंटरनेटचा) उपयोग लोकं जास्त करून सायबर कॅफेमध्ये जाऊन माहिती गोळा करणे तसेच ईमेल करणे-तपासणे, सर्फिंग, चॅटिंग वगैरे कामांसाठी करीत असत. मस्क्युलर डिस्ट्रॉफीची काही माहिती महाजालावर (इंटरनेटवर) मिळू शकेल का असा माझ्या मनात विचार आला. मानपाडा रोडवरील कस्तुरी प्लाझा या इमारतीत तेव्हा काही सायबर कॅफेज् उपलब्ध होती. रात्रीचे जेवण झाल्यावर त्यापैकी एका सायबर कॅफेमध्ये गेलो. त्यांना संगणक सुरू करून देण्यास सांगितले. गूगल सुरू केले आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी असं इंग्रजीमध्ये टंकीत (टाईप) केले. बरीच माहिती समोर आली. या आजाराची लक्षणे कोणती, कोणाला हा आजार होतो, त्यावर उपाय काय आहेत, या आजारावर काही इलाज आहे का वगैरेबाबत बरीच माहिती महाजालावर उपलब्ध होती. मला त्यातील थोडसे समजले. बाकी सर्व डोक्यावरून गेले कारण माझे इंग्रजी कच्चे होते. इंग्रजी शब्दांचे कधी कधी अर्थ कळत नाहीत तर कधी कधी वाक्यातील सर्व इंग्रजी शब्दांचे अर्थ माहित असून सुद्धा त्या वाक्याचा अर्थबोध होत नाही. परत मी जी माहिती शोधत होतो त्यात जास्त करून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित इंग्रजी शब्द वापरलेले होते. मला त्याचा अर्थ सहजासहजी काही लागत नव्हता. मी तरी सुद्धा एक तास माझी शोध मोहीम चालू ठेवली. या आजारावर मी खोलात जाऊन माहिती खंगाळत होतो. दरम्यान काही रोगपिडीत मुलांची छायाचित्रे (फोटो) सुद्धा पाहिली. मन अस्वस्थ झाले. काहीच सुचत नव्हते. मग थोड्या वेळाने घरी परतलो.


माझ्याकडून जे काही प्रयत्न करता येणे शक्य आहे ते सर्व प्रयत्न करायचेच असे मी ठरवले होते. डोंबिवलीत सावरकर रोडवर दवाखाना असलेले डॉक्टर आचार्य काही आजारांवर अ‍ॅक्युप्रेशर थेरपी वापरून उपचार करतात अशी मला माहिती मिळाली. संतोषला तिकडे घेऊन गेलो. त्यांनी संतोषची तपासणी केली. "आपण प्रयत्न करू या", असे ते म्हणाले. मग रोज सायंकाळी त्यांच्या दवाखान्यात जायला सुरुवात केली. संतोषला एक आयुर्वेदिक काढा सुद्धा द्यायला लागलो. संतोषची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्याला आता खुर्चीवरून सुद्धा उठताना त्रास होत होता. मी निराश झालो होतो परंतु हताश झालो नव्हतो. कुठे तरी या आजारावर औषध मिळेलच व संतोष पुर्वीसारखा ठीक होईल असा मला ठाम विश्वास होता. 


जगाच्या कोणत्या तरी कानाकोपऱ्यात यावर उपाय उपलब्ध असणारच फक्त आपण तिथपर्यंत पोहोचले पाहिजे याची मला खात्री होती. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी एकाच माध्यम होते व ते म्हणजे माहितीचे महाजाल उर्फ इंटरनेट. माझे इंग्रजी उत्तम नसल्याने आणि महाजालाचा (इंटरनेटचा) वापर नीट करता येत नसल्याने कोणाची तरी मदत घ्यायचे ठरवले. यासाठी माझ्या बहिणीचा मुलगा नागेंद्र भटची मी मदत घ्यायचे ठरवले. संतोषचे वजन कमी व्हावे म्हणून नागेंद्र, मी व संतोष याआधी एकत्र व्यायाम करायचो. नागेंद्रला घरी बोलावून घेतले व त्याला आतापर्यंत जे काय घडले त्याची सर्व माहिती दिली. जेव्हा त्याला संतोषच्या आजाराबद्दल समजले तेव्हा त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. दुःखावेगाने त्याने मला घट्ट मिठी मारली. त्याला म्हटले "जगात कुठेही या आजारावर औषध असेल तर तिथे संतोषला घेऊन जायची माझी तयारी आहे. फक्त महाजालावरून (इंटरनेटवरून) ती माहिती शोधून काढणे आता तुझी जवाबदारी आहे". नागेंद्रने ती जवाबदारी तत्काळ स्वीकारली. त्याने संतोषसाठी caring4santosh या नावाचा ईमेल आयडी तयार केला. अमेरिका, इंग्लंड, इस्रायल, दक्षिण कोरिया, चीन अशा काही देशातल्या मोठ्या रुग्णालयातल्या डॉक्टरांना आणि संबंधीत अधिकाऱ्यांना त्याने संदेश (ईमेल) पाठवले. संतोषच्या आजाराबाबत तपशीलवार माहिती व आतापर्यंत काढलेले तपासणी अहवाल याची ईमेलमधून माहिती पुरवली. 'जर आपल्याकडे या आजारावर काही औषधोपचार असल्यास कळवावे' अशी त्या लोकांना विनंती केली. आठवड्यातून एकदा तरी सायबर कॅफेमध्ये आपल्यापैकी एकाने जाऊन संदेश (ईमेल) तपासण्याचे मी व नागेंद्रने आपआपसात ठरवले. कोणाचे प्रत्युत्तर आले असल्यास एकमेकांना कळविण्याचे ठरवले. जे माझ्या पदरी पडले आहे त्याला सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधायचाच असे मी ठरवले होते. संतोषला मी व सुमनने जन्म दिला होता. त्याच्या आजारावर औषध शोधणे आणि त्याला बरा करणे माझे कर्तव्य होते. आता मी सर्व दुःख विसरून संतोषच्या आजारावर औषध शोधू लागलो होतो. दुःख मी स्विकारले होते म्हणूनच "वह सुखी है जो खुशी से दर्द सह गया।" या कोरा कागज चित्रपटातील गाण्याच्या शेवटच्या कडव्यानुसार मी प्रयत्नांचा ललाटलेख माझ्या जीवनाच्या कागदावर लिहून तो कोरा ठेवायचा नाही हे निश्चित केले होते.

3 comments:

  1. संतोषच्या आजारपणामुळे ‌‌‌तुमची झालेली मनस्थिती आणि तुम्ही करत असलेले प्रयत्न सगळं वाचताना डोळे भरून आले.

    ReplyDelete
  2. हे सगळं खूपच touching आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. भावस्पर्शी असा टचिंगला मराठीत शब्द उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.

      Delete