महाभारतात यक्ष धर्मराजाला अनेक प्रश्न विचारतो. त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर देताना धर्मराज म्हणतो की माणसाला 'चिता' नव्हे तर 'चिंता' खर्या अर्थाने जाळते. हजारो वर्षापूर्वी जे धर्मराज बोलून गेला ते आजच्या कलीयुगातील मानवाला सुद्धा तंतोतंत लागू होते. काळजी करू नये असे म्हटले जाते परंतु काळजी केल्याने माणुस निष्काळजी होत नसतो हे सुद्धा सत्य असते. परिणामतः चिंता किंवा काळजी याबाबतीत माणसाची अवस्था 'धरले तर चावते व सोडले तर पळते' अशी होऊन बसते. विशेषत: ज्या प्रिय व्यक्तीमुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे अशी आपली भावनिकता, मानसिकता बनलेली असते तिच्यावर जेव्हा एखादे संकट आल्याची चाहूल आपल्याला लागते तेव्हा हा चिंता नावाचा अग्नी आपले खर्या अर्थाने आत्मदहन करायला सुरूवात करतो.
संतोषला मी गावी (कळसाला) आल्याचा खूप आनंद झाला होता. जेव्हा त्याला ताप आला होता तेव्हा मी त्याच्याजवळ असायला हवे असं त्याला वाटत होते. मी कळसाला पोहोचल्यावर त्याला म्हणालो, "आता मी आलो आहे तेव्हा अजिबात घाबरायचे नाही." माझे कळसाला येणे सुमनला सुद्धा धीर देऊन गेले. खरतर तिथे बहीणीपासून घरातील सर्व मंडळी दोघांची काळजी घेत होती. प्रेम, आपुलकी, आत्मियता यांची तिथे काहीच कमी नव्हती. असे जरी असले तरी शेवटी माझी अनुपस्थिती त्या दोघांना माझ्यात आणि त्यांच्यात फरक करायला लावत होती. कळसाला पोहोचल्यावर आता मला वाटू लागले होते की मी सुद्धा दोघांसोबत यायला पाहिजे होते. नेहमी मस्ती करणारा संतोष तापामुळे शांत होता असं तिथे गेल्यावर कळले. औषध देऊन सुद्धा ताप उतरत नव्हता. त्यात थंडी भरून ताप आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. मी तिथे पोहचलो त्या दिवसापासून त्याचा ताप उतरला होता. परंतु या आजारपणामुळे तो कळसाच्या मन प्रसन्न करणार्या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेऊ शकत नव्हता. मला संतोषची काळजी वाटत होती म्हणून मग फक्त तीनच दिवस कळसाला थांबून डोंबिवलीला परतायचे असे ठरवले.
एप्रिल महिन्यात आपल्या डोंबिवलीला गर्मी जाणवायला सुरुवात झाली होती. परंतु मी कळसाला जेव्हा पोहोचलो तेव्हा तिकडे खूप थंडी जाणवत होती. भरीस भर म्हणून तिथे अधून मधून पाऊस पडायचा. रात्री थंडीमुळे दोन दोन चादरी अंगावर ओढून झोपायला लागायचे. पंखे नव्हतेच. मच्छर सुद्धा नव्हते. त्यामुळे एकदा का चादर ओढून झोपलो की मस्त गाढ झोप लागायची. थंडीमुळे रात्री एकदा तरी लघुशंकेसाठी उठायला लागायचे. अश्या वातावरणात तीन दिवस सुमन संतोष बरोबर कळसाला राहिलो. झटपट परतीला निघालो कारण म्हणजे एक तर वाचनालयाची आठवण येत होती आणि संतोषला डॉक्टरकडे घेऊन जाणे मला आवश्यक वाटत होते. तीन दिवसांनी काळसाहून निघालो व बसने चौथ्या दिवशी डोंबिवलीला पोहचलो. कळसाच्या आणि डोंबिवलीच्या वातावरणात जमीन-आस्मानाचा फरक होता. तिकडे कडाक्याची थंडी आणि इकडे हैराण करणारी मरणाची गर्मी. आम्ही डोंबिवलीला येताच भाऊ बहीण व सर्व नातेवाईक संतोषला पहायला आले. सर्वांना त्याला ताप आल्याचे समजले होते. इकडच्या डॉक्टरांना दाखवावे असं सर्वांनी सुचविले. मला व सुमनला संतोषची खूप काळजी वाटत होती.
डोंबिवलीत आल्यावर दुसऱ्याच दिवशी कस्तुरी प्लाझा येथील अस्थितज्ञ (आर्थोपेडीक) डॉक्टर गोखले यांच्याकडे संतोषला घेऊन गेलो. जिना चढताना त्याला त्रास होत होता. अधून मधून चालताना तो अचानक तोल जाऊन पडायचा. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्याला चालता येत नव्हते. इयत्ता पाचवी-सहावीपासून त्याला हा त्रास जास्त जाणवू लागला होता. संतोषला डावा पाय जमिनीवर नीट टेकवता येत नव्हता. मी सर्व समस्या विस्तृतपणे डॉक्टरांना सांगितली. इयत्ता तिसरीत असताना अपघाताने त्याच्या पायाचा अस्थिभंग झाल्याचे सुद्धा सांगितले. डॉक्टर गोखल्यांनी नीट तपासून त्याच्या हाडांमध्ये काही समस्या नाही असे सांगितले. ''तुम्ही या बाबतीत बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा'' असेही डॉक्टर गोखले म्हणाले.
डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकाजवळ दवाखाना असलेल्या बालरोग तज्ञ डॉक्टर योगेश आचार्य यांच्याकडे मग संतोषला घेऊन गेलो. डॉक्टर आचार्य माझ्या चांगल्या परिचयाचे होते. डॉक्टरांनी संतोषला तपासले व काही प्रकारच्या रक्त तपासण्या करायला सांगितल्या. रक्त चाचण्यांसाठी डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मंजुनाथ शाळेसमोरील 'प्लाझ्मा ब्लड बँकेत' गेलो. त्यांनी आठ दिवसांनी रक्त तपासणीचा अहवाल (रिपोर्ट) येईल असं सांगितले. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रक्त तपासणी अहवाल यायला एवढे दिवस का लागत आहेत? काही मोठा आजार तर नसेल ना? काहीही असले तरी येईल त्या परिस्थितीला सामोरे जायचे असे मी मनाशी पक्कं ठरवले. आठ दिवसांनी अहवाल (रिपोर्ट) हाती पडला. खरंतर अश्या अहवालातील वैज्ञानिक भाषेतील आकडेवारीचे अचूक मर्म डॉक्टरांनाच काय ते समजत असते. परंतु तरी सुद्धा मी तो अहवाल (रिपोर्ट) वाचला. त्यामध्ये एक संख्या कमाल मर्यादा ओलांडून खूप जास्त झाल्याची नोंद होती. दुसऱ्या दिवशी संतोषला घेऊन बालरोगतज्ञ डॉक्टर योगेश आचार्य यांच्याकडे गेलो. त्यांनी तो अहवाल पाहून संतोषला मुंबईतील वाडिया रूग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. वाडिया रूग्णालयातील एका विशिष्ट डॉक्टरांना भेटायला सांगून त्यांच्यासाठी एक चिठ्ठी मला लिहून दिली. संतोषला नक्की काय झाले आहे? काही गंभीर आजार आहे का? चिंता करण्यासारखे काही आहे का? तो बरा होईल ना? असे काही प्रश्न मी डॉक्टरांना विचारले. "सर्व ठीक होईल. संतोषला वाडिया रूग्णालयात घेऊन जा. तिथले तज्ञ डॉक्टर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील", असे डॉक्टर आचार्य म्हणाले.
मी, सुमन, संतोष व आई असे आमचे चौघांचे चौकोनी कुटुंब. खाऊन पिऊन सुखी होतो. काहीच चिंता नव्हती. वाचनालय सुरळीत चालले होते. उत्पन्न ही समाधानकारक होते. सर्वांची आरोग्यं उत्तम होती. सुमन देवधर्माच्या व गृहीणीच्या कर्तव्यकर्मात मग्न होती. मी ग्रंथालय व इतर समाजकार्य करून लोकांना यथाशक्ती मदत करत होतो. कधी कोणाचे वाईट केले नव्हते की चिंतीले सुद्धा नव्हते. कोणासाठी कधी वाईट विचार सुद्धा मनात येत नसत. असे असून सुद्धा संतोष आजारी का पडला? काहीतरी गंभीर आजार आहे का? असे प्रश्न आम्हा दोघांना छळू लागले होते. मी आणि सुमन खूप अस्वस्थ झालो होतो. संतोष असा का चालतो? चालताना अचानक तोल जाऊन का पडतो? असे अनेक विचार मनाला चिंताग्रस्त करू लागले. चिंतेचा दाह आम्हा दोघांना जाळू लागला. आम्ही दोघांनी ठरवले डॉक्टर आचार्यांनी सांगितल्या प्रमाणे संतोषला वाडिया रूग्णालयात घेऊन जायचे व तेथील डॉक्टर काय म्हणतात ते जाणून घ्यायचे तसेच तेथील डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे औषधोपचार करायचे. संतोषला रेल्वेमध्ये नीट चढता येत नसल्याने गाडी करून जायचे ठरवले. आईला अण्णांच्या घरी सोडले. आई एकसारखे विचारात होती 'संतोषला डॉक्टरांकडे का नेत आहात? काय झाले आहे संतोषला?' 'काही काळजी करू नकोस. सर्व ठीक होईल' असं सांगून कशीतरी आईची समजूत घातली. तेव्हा कुठे आई अण्णांकडे रहायला तयार झाली.
मी, सुमन व संतोष गाडी करून डोंबिवलीहुन निघालो. मी वाडिया रूग्णालयाचे नावं अनेक लोकांकडून ऐकले होते. परंतु कधीतरी आपल्याला सुद्धा तिकडे जावे लागेल असे कधीच वाटले नव्हते. आता नाईलाजाने संतोषला घेऊन जावे लागत होते. संतोषने आम्हाला नेहमीच आनंद दिला होता. गरजेनुसार तो आम्हाला चांगली साथ देत आला होता. आता तो चौदा वर्षाचा झाला होता. जर त्याने साथ दिली नसती तर त्याला कुठेही नेता आले नसते. गाडीमध्ये तो नेहमी चालकाच्या (ड्रायव्हरच्या) बाजूच्या जागेवर बसायचा व आम्ही दोघे मागे बसायचो. आज सुद्धा त्याच पद्धतीने गाडीत बसून आम्ही डोंबिवलीहुन निघालो. आम्ही दीड तासात वाडिया रूग्णालयात पोहचलो. सकाळचा दहाचा सुमार होता. रूग्णालयात पुष्कळ गर्दी होती. अनेक पालक आपल्या आजारी मुलांना घेऊन रांगेत उभे होते. रूग्णालयाचा परिसर स्वच्छ होता. फक्त दहा रुपये भरून आम्हाला रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले. आम्ही ते पैसे भरून रांगेत उभे राहिलो. एक तासानंतर आमचा क्रमांक आला. डोंबिवलीतल्या डॉक्टर योगेश आचार्य यांनी दिलेली चिठ्ठी तेथील तज्ञांना दाखवली. संतोषची वैद्यकीय कागदपत्रे पाहून त्यांनी संतोषला तपासायला घेतले. "आपल्याला अजून काही चाचण्या कराव्या लागतील. त्या चाचण्यांचे अहवाल हाती आले की मगच आपण या समस्येचे नक्की निदान काय ते सांगू शकतो'', असं तेथील तज्ञ महिला म्हणाल्या. एक रक्त तपासणी तिथेच म्हणजे वाडिया रुग्णालयातच करायची होती. बाकीच्या दोन तपासण्या बॉम्बे रूग्णालय व हिंदुजा रूग्णालयामध्ये कराव्या लागणार होत्या. "मी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे देते. तुम्ही दोन्ही रूग्णालयातून तपासणी अहवाल घेऊन या. मगच आपण पुढील उपचार करू," असे त्या तज्ञ महिला म्हणाल्या. इतक्या तपासण्या का करायला सांगितल्या? संतोषला काय आजार असेल? तो बरा होईल ना? या चिंताग्रस्त करणार्या प्रश्नांचे धगधगते बाण हृदयावर झेलत मी आणि सुमन घरी परतलो. माझे कामात लक्ष लागत नव्हते. वाडियाच्या तज्ञांनी सांगितलेले सर्व तपासणी अहवाल लवकरात लवकर त्यांच्याकडे सुपूर्द करायचे आम्ही दोघांनी ठरवले. परंतु या सर्व परिस्थितीत संतोष काय करीत होता? अग्नीदाह अनुभवत असलेल्या आम्हा दोघांच्या मनामध्ये संतोष आम्हा दोघांना धीर देऊन शितलता निर्माण करण्याचा निरागस प्रयत्न करीत होता.....
खूप मोठी काळजी करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुमचे अनुभव वाचताना गहिवरून आलं!!
ReplyDeleteमला पुढील भागाची उत्सुकता लागून राहिली आहे.
Delete