Saturday, November 21, 2020

संतोषच्या आजाराचे निदान झाल्यावर माझी व सुमनची झालेली अवस्था...

"मेरे जीवन का खारा जल, मेरे जीवन का हालाहल, कोई अपने स्वर में मधमय कर गाता, मैं सो जाता, कोई गाता मैं सो जाता" अशी झोप उडवून टाकणारी, डोळ्यातील खारे अश्रु सुकवून टाकणारी व हलाहल पचवायला लावणारी वेळ सामान्य माणसांवर सुद्धा येते. रामायणात अग्निपरीक्षा फक्त सितेलाच द्यावी लागली होती असे नाही तर प्रतिकूल परिस्थितीत सितेच्या विरहाने रामाला सुद्धा सतत अग्नीदाह भोगावा लागला होता. प्रतिकुल परिस्थितीचा पहाड जेव्हा सामान्य माणसाच्या अंगावर कोसळतो तेव्हा ती परिस्थिती पेलवून नेण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. त्या प्रतिकुल परिस्थितीचे ओझे वाहणे हीच त्याच्यासाठी एक दाहक अशी अग्नीपरिक्षा असते. त्यात एखादी छोटीशी विषारी वेळ अशी ठरते की ओझ्याने अगोदरच वाकलेल्या उंटाच्या पाठीवरची ती शेवटची काडी ठरते. मग वटवृक्षसारखा पाळमुळे घट्ट रोवून प्रतिकुल परिस्थितीशी सामना करणारा हा खंबीर सामान्य मनुष्य सुद्धा मुळासकट उन्मळून पडतो. 

शनिवारी, दिनांक ३१ मे २००६ रोजी मी, सुमन व संतोष डोंबिवलीहून वाडिया रुग्णालयात जायला निघालो. आज वरिष्ठ तज्ञ डॉक्टर भेटणार होते. त्यांना सर्व तपासणी अहवाल दाखवल्यावर ते काय सांगतात याची चिंता वाटत होती. तसेच पुढे काय करायचे हे सुद्धा त्यांच्याकडूनच समजणार होते. गेले महिनाभर यासाठीच नुसती धावपळ चालू होती. प्रत्येक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वेळा पाळून हजर राहिलो होतो. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करून त्या पुर्ण केल्या होत्या. वेळात वेळ काढून संतोषला गाडीतून घेऊन जाणे, डॉक्टरांना भेटणे व सर्व अहवाल तयार करून घेणे हे सोपे काम नव्हतेच. जराही न कंटाळता जिद्दीने प्रत्येक काम पूर्ण केल्यामुळे मनावरचा ताण थोडा हलका झाल्यासारखा वाटत होता. एक पिता म्हणून संतोषसाठी योग्य उपचार करणे हे माझे कर्तव्य होते व त्याची मला जाणीव होती. कोणतीही गोष्ट एकदा हातात घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय मी कधीच गप्प बसत नसे. आता तर संतोषच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न होता. माझ्यासाठी ही अग्निपरीक्षाच होती व मला त्यातून बाहेर पडायचे होते.


सुमनने सकाळी चवदार नाष्टा केला होता परंतु आज मला तो रूचकर लागत नव्हता. माझे नाष्ट्यात लक्षच नव्हते. लक्ष्य फक्त एकच होते वाडिया रुग्णालयात जायचे व डॉक्टरांना भेटायचे. त्या खेरीज काहीच सुचत नव्हते. नेहमीप्रमाणे संतोष चालकाच्या (ड्रायव्हरच्या) बाजूला बसला होता. मी आणि सुमन मागे बसलो होतो. आम्ही दोघेही शांत होतो. आज वरिष्ठ तज्ञ डॉक्टर काय सांगतील? पुढे काय करावे लागेल? असे अनेक प्रश्न गाडीतून प्रवास चालू असताना मनात येत होते. वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांनी काहीही सांगितले तरी मन घट्ट करून ते ऐकायचे अशी मी मनाची तयारी केली होती. कोणताही प्रश्न असो त्याचे उत्तर सुद्धा असतेच असा माझा ठाम विश्वास होता. दिवसेंदिवस जग खूप पुढे जात आहे. विज्ञानाने भरपुर प्रगती केली आहे. अनेक दुर्धर व्याधी-विकारांवर मात करणारी औषधे शोधून काढण्यात विज्ञानाला यश लाभले आहे. कोणताही आजार असला तरी त्यावर काहीना काही उपाय हा असणारच याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. संतोषसाठी सर्व काही उपचार करण्याची माझी तयारी होती.

याआधी मुंबईला जायचो तेव्हा वेळ कसा जायचा ते कळत नसे. आज मात्र मुंबई खूप लांब वाटत होती. गाडी वेगाने धावत होती परंतु काळ मात्र थांबून राहिला आहे असं वाटत होते. कधी एकदाचे वाडिया रुग्णालयात पोहोचतो असे झाले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अकराच्या सुमारास आम्ही रुग्णालयात पोहचलो. थेट डॉक्टरांना भेटायला गेलो. आधीचे काही रुग्ण तपासून झाल्यावर त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलावले. आतापर्यंत चार पाच वेळा आम्ही या डॉक्टरांना भेटलो होतो त्यामुळे त्यांना संतोषचे खूप कौतुक वाटू लागले होते. त्यांनी आम्हाला पाहिल्यावर "वरिष्ठ तज्ञ डॉक्टर काही वेळात येतील तोपर्यंत अजून एक तपासणी राहिली आहे ती उरकून घेऊ या", असे सुचविले. तपासणीसाठी त्यांनी आम्हाला एका खोलीत नेले. तिकडे संतोषची तपासणी झाली. नंतर त्यांनी आम्हाला बाहेर बसायला सांगितले. वरिष्ठ तज्ञ डॉक्टर यायला अजून थोडा वेळ लागणार होता. दुपारचे दोन वाजले होते. संतोषला भूक लागली होती. "काहीतरी खाऊन परत येवु या" असे मी संतोषला व सुमनला सुचविले. रुग्णालयाच्या समोरचा रस्ता ओलांडल्यावर एक छोटे उपहारगृह (हॉटेल) होते. संतोषला पावभाजी खूप आवडायची. मग तिघांसाठी पावभाजी घेतली. पावभाजी खाऊन रुग्णालयात परतलो. वरिष्ठ तज्ञ डॉक्टर चार वाजता येणार असल्याचे समजले. वाट बघण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मी संतोषला घेऊन बाहेरच्या पटांगणात फेरफटका मारायला लागलो. बाहेर रणरणते ऊन होते. कसातरी वेळ घालवायचा होता. परत आत आलो तेव्हा कळले की आता डॉक्टर यायची वेळ झाली आहे. मग पुन्हा त्यांची वाट बघू लागलो.

वरिष्ठ तज्ञ डॉक्टर येताच तिथले सर्व कर्मचारी वेगाने कामाला लागले. त्यांची लगबग व हलचाली वाढल्या. वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. परत एक छोटी तपासणी केली आणि संतोषला बाहेरच बसून रहाण्यास सांगितले. आता त्या वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांसमोर फक्त मी आणि सुमन होतो. मी मनातून खूप अस्वस्थ होतो. माझे आणि सुमनचे लक्ष आता डॉक्टर काय बोलतात याकडे लागले होते. त्यांनी परत एकदा सर्व अहवाल तपासले. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. मला इंग्रजी समजत नसल्याने मग त्या महिला वरिष्ठ तज्ञ डॉक्टर हिंदीतून बोलू लागल्या. "आप के लडके को मांसपेशी की बिमारी है। विग्यान में इसे मस्क्युलर डिस्ट्रॉपी (Muscular Distrophy) कहते है। यह बिमारी बहुत ही कम बच्चों में पायी जाती है। ज्यादातर लडकों को यह असाधारण बिमारी होती है। कुछ महिनों बाद में मरिज का चलना फिरना बंद होके वह बिस्तर पकड लेता है। इस असाधारण बिमारी का दुनिया में कहीं भी कोई इलाज नही है। ऐसे मरिजों की आयु भी बहुत ही कम होती है। आपको अपने बेटे को बहुत ध्यान से संभालना होगा।" त्यांचे शब्द मला ध्वमस्फोटासारखे वाटून मला माझे डोकं फाटल्यासारखे वाटले. मी अंतर्बाह्य हादरलो. काहीच सुचत नव्हते. त्यांना काय प्रश्न विचारायचे हे सुद्धा आठवेना. मी सुमनकडे पाहिले. ती सुद्धा स्तब्ध झाली होती. डॉक्टर नंतर जे काही सांगत होते त्यातील काही समजत होते तर काही कळत नव्हते. तरी सुद्धा आम्ही ते सर्व नीट ऐकून घेतले. काही वेळाने मी आणि सुमन सुन्न मनाने त्या खोलीतून बाहेर आलो. संतोष बाहेर बसला होता. त्याने आम्हाला पाहताच डॉक्टर काय म्हणाले? मला काय आजार झाला आहे? पुढे काय करायला सांगितले? वगैरे प्रश्न विचारायला सुरूवात केली. मी त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ झालो होतो. सुमन पण शांत होती. त्याला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न पडला होता. संतोष आता अगदी लहान राहीला नव्हता. चौदा वर्षाचा झाला होता. अनेक गोष्टी त्याला समजत होत्या. "आता इथून निघु या. गाडीत बसलो की नीट तुला समजावून सांगतो", अशी टाळंटाळ करणारी उत्तरे मी देऊ लागलो. आम्ही तिघे गाडीत बसण्यास निघालो. 

३१ मे हा महिन्याचा शेवटचा दिवस. दिवसभर रणरणत्या ऊन्हामुळे खूप उकडत होते. परंतु आम्ही जेव्हा वाडिया रुग्णालयातून बाहेर पडलो तेव्हा आभाळ भरून आले होते. गाडीत बसलो तेव्हा संतोषच्या भविष्याच्या विचाराने माझे डोळे भरून आले. संतोषला काय सांगायचे? कसे सांगायचे? तो सारखा विचारात होता डॉक्टर काय म्हणाले? "आपण घरी जाऊन सविस्तर बोलू या", असं सांगून परत एकदा वेळ मारून नेली. संतोषशी बोलताना मला रडू आवरेना. सुमानच्या ही डोळ्यात पाणी आले. गाडी निघल्यावर काही वेळातच भरून आलेल्या आभाळातून  विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू लागला. सन २००६ चा हा पहिला पाऊस होता. बाहेर पाऊसामुळे गारवा निर्माण झाला होता परंतु माझ्या मनात मात्र अग्नीवर्षावाचा दाह होत होता. काहीच सुचत नव्हते. डॉक्टरांचे शब्द सारखे मनावर घणाचे घाव घालत होते. मी एवढा मनाने आणि विचाराने मजबूत असून सुद्धा त्या क्षणी खचलो होतो. डोळ्यासमोर अंधार पसरला होता. हा असा कुठला रोग आहे ज्याचा इलाज नाही? तो संतोषला कसा झाला? इतके वर्ष तर सर्व ठीक चालले होते मग अचानक हे असे कसे घडले? वगैरे प्रश्नांची उत्तरे मिळून सुद्धा भीषण सत्य कबुल करायला मन तयार होत नव्हते. मी काय गुन्हा केलाय? माझे ठीक आहे परंतु माझ्या निरागस लेकराने कोणाचे काय वाईट केले आहे? हे सर्व माझ्याच पदरी का पडले? असे सर्व प्रश्न वारंवार मनात येत होते. आता माझ्यापुढे एकच प्रश्न होता संतोषच्या आयुष्याचे पुढे काय?....

4 comments:

  1. Hello Pai kaka
    Me sudha ashach bhayanak anubhavatun geli ahe, mazya mulila sudha Wadia Hospital la admit kele hote kidney disease zalya mule.......tya velela amchi ji manasthiti hoti agdi tashich tumhi varnan keli ahe....vachtana dole bharun aale....Devachya krupene aata ti thik ahe.

    ReplyDelete
  2. अरे बापरे ! खूपच कठीण प्रसंग अनुभवले तुम्ही आणि तुमच्या परिवाराने... एकीकडे मनात यातना आणि दुसरीकडे व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळणे हा कठीण balance देखिल तुम्ही सांभाळलात हे खरंच inspiring आहडत.

    ReplyDelete
  3. वाचताना गहिवरून आलं.‌देव चांगल्या माणसांची परीक्षा घेतो.🙏

    ReplyDelete