Monday, November 2, 2020

पै फ्रेंड्स लायब्ररीची पहिली शाखा - गांधीनगर...

 

"अनुभवातून मनुष्य योग्य निर्णय घ्यायला शिकतो. परंतु सर्व अनुभव मात्र अयोग्य निर्णयातून आलेले असतात.'' असं वाक्य जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बिल गेट्सच्या एका मुलाखतीत वाचले होते. वाचनालयाच्या व्यवसायात वाचनालय कशा पद्धतीने चालवायला हवे तसेच त्यासाठी श्रम, वेळ व पैसा किती, कुठे, कसा मोजायचा या सर्व गोष्टी मी मागील कडूगोड अनुभवातूनच शिकलो होतो. या अनुभव नावाच्या गुरूने माझ्यामध्ये असा काही आत्मविश्वास निर्माण केला होता की लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी माझी प्रबळ भावना झाली होती. त्यामुळेच तोट्यातील वाचनालयाचा व्यवसाय सुद्धा मी चालवू शकतो याची मला बालंबाल खात्री होती. ते सिद्ध करण्याची संधी सुद्धा नियतीने मला दिली. 


वास्तविक पाहता पै फ्रेंड्स लायब्ररीची पहिली शाखा सन २००२ च्या एप्रिल महिन्यात डोंबिवलीच्या औद्योगिक परिसरातील निवासी विभागात उघण्यात आली होती. ही शाखा भागीदारी तत्वावर मी आणि माझ्या मित्राची बायको सौ. रचना नाईक आम्ही दोघांनी मिळून चालू केली होती. त्या वाचनालयाचा दैनंदिन कारभार सौ. रचना नाईक या पहात होत्या. त्यावेळी मी जपान लाईफ कंपनीत कार्यरत होतो. दिवसभर कंपनीच्या कामात गुंतून पडत असल्याने मला त्या वाचनालयात जायला जमत नसे. वेळेच्या आभावी मी त्या शाखेकडे फारसे लक्ष देऊ न शकल्याने माझ्या अनुभवाचा वापर मला तिथे करता आला नाही. याचा परिणाम आम्ही पुरेसे व भरपुर सभासद जमवू शकलो नाही. सभासद संख्या कमीच राहील्यामुळे त्या शाखेतून उत्पन्न मिळत नव्हते. खर्च मात्र वाढत  चालला होता. तेव्हा अखेर ती शाखा बंद करून वाचनालय  विकायचे ठरवले. मला त्याचवेळी पैशांची सुद्धा गरज होतीच. डोंबिवलीच्या निवासी विभागातील हे वाचनालय सुरू करून दोन वर्षे झाली होती. आम्ही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने सन २००४मध्ये ते वाचनालय पुस्तकं व नावासह श्री. भट नावाच्या एक सद्-गृहस्थाला विकून टाकले. 


सन १९९८ ते २००३ पर्यंत जपान लाईफ कंपनीच्या कार्यसंस्कृतीचा माझ्याकडे भरपुर अनुभव जमा झाला होता. या कालावधीत मी खूप काही शिकलो होतो. आता तोच अनुभव मला वाचनालयाच्या व्यवसायामध्ये वापरायचा होता. आपले शैक्षणिक वाचनालय चांगले चालले होते. तिथे शिक्षणासंबंधी विविध विषयांवरील पुस्तकांचा विपुल साठा जमा झाला होता. हवे ते पुस्तक उपलब्ध होत असल्याने डोंबिवलीच्या बाहेरील विद्यार्थी सुद्धा त्या वाचनालयाचे सभासद झाले होते. एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तके कमी पडत असल्याने सभासद नोंदणी बंद करायला लागायची. अगोदरच जे काही विद्यार्थी सभासद बनले होते निदान त्यांना तरी हवे ते पुस्तक वेळेवर मिळायला पाहिजे हा त्या नोंदणी बंद करण्यामागचा एकमेव उद्देश होता.


डोंबिवलीत आपली स्वतःची एक शाखा असायला हवी असे विचार सारखे माझ्या मनामध्ये येत असत. टिळकनगरमध्ये सुशिक्षित लोकांची वस्ती होती. वाचकांची संख्याही भरपुर होती त्यामुळे टिळकनगर मधील फ्रेंड्स लायब्ररी नेहमी वाचकांनी भरलेली असायची. तेव्हा आता प्रश्न असा होता की दुसरीकडे शाखा कुठे उघडायची? डोंबिवलीच्या औद्योगिक परिसरात शाखा उघडल्यानंतर ती जेमतेम दोन वर्षात बंद करावी लागली होती. त्यामुळे तो परिसर सोडून मी दुसऱ्या अन्य परिसराच्या विचारात व शोधात होतो. सन २००५ या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात गांधीनगर येथील एक वाचनालय बंद होत असल्याचे मला समजले. एकेदिवशी सकाळी मी ते वाचनालय पाहण्यासाठी गांधीनगरला गेलो. दोन तीन ठिकाणी चौकशी केल्यावर अखेर मी त्या वाचनालयात पोहोचलो.


गांधीनगरमधील हे वाचनालय रस्त्यापेक्षा दोन तीन पायऱ्या उंचावर होते. त्या पायर्‍या चढून मी त्या वाचनालयात गेलो. त्या वाचनालयाचे मालक श्री. सतीश वाणी यांनी मला लगेच ओळखले. आदरातिथ्य म्हणून त्यांनी माझ्यासाठी बाजूच्या चहावाल्याकडून चहा मागविला. माझी नजर मात्र तेथील पुस्तकांवर फिरत होती. एका लोखंडी फडताळ्यावर (स्टँडवर) काही तामिळ, मल्याळम व कन्नड मासिकं होती. काही लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तके होती तसेच मराठी कथा-कादंबऱ्या होत्या. सर्व पुस्तकांवर धूळ जमली होती. वाचनालयाच्या आतमध्ये कुबट वास येत होता. पुस्तकांची अवस्था खूपच खराब होती. अशी दुर्दशा झालेली पुस्तके ठेवली तर सभासद कसे येतील याचा मी विचार करत होतो. परंतु नंतर त्यांनी जे सांगितले ते ऐकून मी एकदम थक्क झालो.


दिनांक २६ जुलै २००५ रोजी प्रलयकारी पाऊस पडला त्यामुळे डोंबिवलीच्या सखल भागात पाणी साठून महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी रस्त्यापेक्षा अगोदरच दोन तीन फुट उंचीवर असलेल्या या वाचनालयात चार फूटापर्यंत पाणी साचले होते असे श्री सतिश वाणी यांनी सांगितले. सर्व पुस्तके भिजली होती. पुस्तकांची कपाटे व मेज (टेबल) अक्षरशः पाण्यात तरंगत होती. त्या पावसाने वाचनालयाचे खूप नुकसान झाले असंही त्यांनी सांगितले. श्री. सतिश वाणी हे स्वतः सकाळी घरोघरी पेपर टाकून वाचनालय चालवत असल्याने वाचनालयासाठी ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते. तरी सुद्धा त्यांच्याकडे जवळपास शंभर सभासद होते हे माझ्या लक्षात आले. श्री. सुधीर पै हे त्या जागेचे मालक होते. या जागेसाठी अनामत रक्कम व किती पैसे द्यावे लागतील याची मी माहिती घेतली. मी जास्त विचार न करता श्री. सतिश वाणी यांना मी ते वाचनालय चालविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. मी नेहमी सकारात्मक विचार करायचो. जर या परिस्थितीत इथे शंभर सभासद असतील तर आपण हे वाचनालय ताब्यात घेतल्यानंतर काही मुलभूत बदल केल्यास तसेच पुस्तकांची संख्या आणि वेळा यामध्ये फेरफार केल्यास सभासद संख्या नक्कीच वाढेल याची मला पुर्ण खात्री होती. हाच सकारात्मक विचार करून मी त्यांना लगेच माझा होकार कळविला.


सदर व्यवहारासाठी पुढील काही दिवसांत पैश्यांची जमवाजमव केली आणि एक दिवस सुमनला बरोबर घेऊन गांधीनगरच्या वाचनालयात पोहोचलो. जसे आम्ही आत गेलो सुमनची नजर सुद्धा पुस्तकांवर गेली. तिकडच्या भिंती, मेज (टेबल), पुस्तकं, मासिकं, फडताळ (रॅक) या सर्वांची दुर्दशा पाहून तिच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त घर्मबिंदू चमकू लागलेले मला स्पष्टपणे दिसत होते. तरीसुद्धा सुमनच्या समोरच ठरलेल्या रकमेचा धनादेश (चेक) श्री. सतिश वाणी यांना दिला व पुढील काही दिवसांत नव्याने सुरूवात करू या असं त्यांना सांगितले. ते सुद्धा खुश झाले होते. ते गेले काही वर्षे वाचनालय चालवत होते परंतु पाहिजे तितके यश त्यांना मिळाले नव्हते. एवढी मेहनत करून चालू केलेले वाचनालय बंद करण्याऐवजी आज ते आपण योग्य व्यक्तीच्या ताब्यात सोपवत आहोत असं सांगून त्यांनी माझ्याजवळ आपला आनंद व्यक्त केला. 


घरी आल्यावर माझ्या अपेक्षेनुसार माझी सुमन बरोबर त्या जागेबद्दल गंभीर चर्चा झाली. ती जागा बघून सुमन नाराज झाली होती हे मला ठाऊक होते. पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झालेले व सभासद संख्या कमी असलेले वाचनालय आपण चालवायला घेत आहोत यावर पुनर्विचार करावा असा तिचा आग्रह होता. मी कशीबशी तिची समजूत घातली. तिने बराच विचार केला व अखेर मला पुढे जाण्यास अनुमती दिली. श्री. सतीश वाणी यांना दिलेला धनादेश वटल्यावर काही दिवसांतच त्या वाचनालयात पुस्तके ठेवण्यासाठी टिळकनगर सारखे मार्बलचे फडताळ (रॅक) बनवून घेण्याचे ठरविले. श्री. मंजुनाथ भट यांना त्याची जवाबदारी दिली. सात ते आठ दिवसात रंगरंगोटी करून वाचनालयासाठी जागा तयार झाली. मग टिळकनगर मधील काही पुस्तके आणि काही नवीन विकत घेतलेली पुस्तके या वाचनालयासाठी तयार ठेवली. सकाळी साडेसात ते एक आणि संध्याकाळी साडेचार ते नऊ अश्या वाचनालयाच्या वेळा निश्चित केल्या. आता त्या सर्व पुस्तकांची वाचनालयात मांडणी करून एखाद्या शुभदिनी, शुभमुहूर्तावर वाचनालयाचे उद्-घाटन करायचे तेवढे बाकी राहीले होते. 


फक्त पै फ्रेंड्स लायब्ररीची ही पहिलीच शाखा होती. टिळकनगर मधील परिचित श्री. शंकर नाईक यांच्या हस्ते उद्-घाटन करायचे ठरवले. ते टिळकनगर मधील आपल्या वाचनालयाच्या समोरच राहत होते. श्री. नाईक काकांना जाऊन भेटलो व त्यांच्या हस्ते गांधीनगर शाखेचे उद्-घाटन करण्यासंबंधीचे आमंत्रण पत्र त्यांना दिले. त्यांनी ते आमंत्रणपत्र आनंदाने स्विकारले व आपला होकार कळविला. मग उद्-घाटन समारंभाच्या काही पत्रिका छापल्या व परिचितांना दिल्या तसेच गांधीनगर परिसरात घरोघरी पत्रके वाटण्यात आली. उद्-घाटनाच्या एक दिवस आधी पुस्तके व मासिके यांची योग्य ती मांडणी करून वाचनालय सुसज्ज करण्यात आले.


दिनांक २९ ऑक्टोबर २००५ रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता काही नातेवाईक, मित्रमंडळी व नियमित येणारे सभासद यांच्या उपस्थितीत गांधीनगरच्या पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पहिल्या शाखेचा उद्-घाटन समारंभ थाटामाटात पार पडला. पहिल्याच दिवशी बारा वाचकांनी आपली नावनोंदणी केली. आलेल्या सर्व पाहुण्यांना विविध फळं कापून तयार केलेली थाळी देण्यात आली होती. त्या दिवशी श्री. रवींद्र चव्हाण यांनी वाचनालयास भेट दिली होती. तेव्हा ते नगरसेवक होते. त्या दिवशी प्रथमच माझी आणि श्री. रवींद्र चव्हाण यांची भेट झाली होती.


तोट्यात चालणारे वाचनालय चालविण्याचा सर्वात मोठा निर्णय मी घेतला होता. सदर वाचनालय आधी जे चालवत होते व ज्यांच्याकडून मी हे वाचनालय विकत घेतले होते, त्या श्री. सतीश वाणी यांनाच मी तिथे कामावर ठेवून घेतले. गांधीनगर मधील बहुसंख्य सभासद त्यांच्या ओळखीचे होते. त्यांना त्यांचे आवडते कामं मिळाले होते व मला  वाचनालय सांभाळण्यासाठी एक चांगला विश्वासू माणूस लाभला होता....

4 comments:

  1. Great, तुमच्या हिम्मतीला दाद‌ आहे. आणि म्हणूनच तुम्ही यशस्वी होता.

    ReplyDelete
    Replies
    1. हिंमत है तो जहाँ है। जहाँ है तो खुदा है असं म्हणूनच म्हणतात. पै सरांनी तेच सिद्ध केलयं...

      Delete
  2. तुमचा आतापर्यंत प्रवास वाचल्यावर हे लक्षात येत की आत्मविश्वास, साहस आणि धाडस यांच्या जोरावर तुम्ही नशिबावर मात करून यश मिळविले तुमच्या या कारकीर्दीला सलाम

    ReplyDelete
  3. वा सर आपले खूप खूप अभिनंदन।
    आजच्या आय टी च्या युगात ग्रँथालय चे अस्तित्व टेकवून ठेवणे फार जिकरीचे होत आहे पण आपण हे सारस्वताच काम खूप नेटाने आणि प्रामाणिक पणे करत आहात
    आपले व आपल्या टीम चे अभिनंदन।

    ReplyDelete