Tuesday, November 17, 2020

संतोषच्या आजाराचे लवकरात लवकर निदान व्हावे म्हणून केलेले प्रयत्न...

'इंतजार में जो मजा है वह याँर के आने में कहाँ?' याचा भावार्थ प्रिय व्यक्तीची वाट बघण्यात जो आनंद असतो तो त्याच्या प्रत्यक्ष भेटण्यात नसतो. परंतु प्रतिक्षा ही दरवेळी आनंददायकच असते असं नाही. कंसाने आपला पिता उग्रसेन यांना तुरूंगात डांबून ठेवले होते. एक दिवस दुष्ट कंस आपल्या पित्याला मनःस्ताप देण्याच्या उद्देशाने तुरूंगात त्यांना भेटायला जातो. तिथे त्याचे पिता उग्रसेन कंसाला विचारतात की "तु माझी सुटका कधी करणार आहेस? मी आणखी किती प्रतिक्षा करू?" त्यावर कंस तर्कदुष्ट पद्धतीने उत्तर देत म्हणतो, "तुम्हाला आता आयुष्यात फक्त वेळच काढायचा आहे. प्रतिक्षा करताना वेळ खूप छान जातो." जेव्हा नियती आपल्याला प्रतिकुल परिस्थितीच्या तुरूंगात डांबून ठेवून कंसासारखी तर्कदुष्ट पद्धतीने फक्त प्रतिक्षा करायला लावते तेव्हा मनातल्या मनात जीव कसा जळतो ते ज्याचे त्यालाच कळते. 


वाडिया रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सुचविलेली बॉम्बे व हिंदुजा ही दोन्ही रुग्णालये खूप लांब होती. तेव्हा सुरुवात कोणत्या रूग्णालयातून करायची ते कळत नव्हते. ही दोन्ही रूग्णालये खूप मोठी व तेवढीच नामांकित होती. या दोन्ही रूग्णालयात संतोषला रक्त तपासणीसाठी नेणे आवश्यक होते. तपासणी अहवाल किती दिवसांनी हाती पडेल याचा काहीच अंदाज नव्हता. अजय व मामा हे माझे दोघे प्रामाणिक व विश्वासू सहकारी ग्रंथालय व्यवस्थित सांभाळत असल्याने मला व्यवसायिक चिंता नव्हती. त्यामुळे मी संतोषकडे पुर्णपणे लक्ष देऊ शकत होतो. आर्थिक चिंता विशेष जरी नसली तरी सुद्धा रुग्णालयात गाडीने जाणे-येणे तथा वैद्यकीय तपासणी व भावी उपचार इत्यादींसाठी भरपुर पैसा खर्च करावा लागणार याची मला कल्पना आली होती. सर्व प्रकारचे तपासणी अहवाल हाती येऊन जोपर्यंत आजाराचे निदान होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसून राहायचे नाही असे मी ठरवले होते. आता माझे एकच ध्येय होते ते म्हणजे संतोषला बरा करणे. त्याला काय झाले आहे ही गोष्ट अद्याप अध्याहृत असल्याने मी त्याच्या आजाराबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. मी आणि सुमन संतोषकडे काळजीपूर्वक लक्ष देत होतो. बॉम्बे व हिंदुजा या दोन्ही रूग्णालयात जाऊन तपासणी करणे बाकी होते. तसेच त्यांचे अहवाल आल्यावर ते वाडिया रुग्णालयात नेऊन दाखवणे व त्यानंतर पुढे काय करायचे हे सुद्धा अद्याप ठरवायचे होते. मग सर्वात प्रथम बॉम्बे रुग्णालयात तपासणीला जायचे ठरवले.


डोंबिवलीहून गाडी करून मी, सुमन व संतोष बॉम्बे रूग्णालयात जाण्यास निघालो. माझ्या आणि सुमनच्या मनात एकसारखेच विचार येत होते. 'तिकडे काय तपासणी होईल? किती वेळ लागेल? अहवाल हाती कधी पडेल?' वगैरे प्रश्नांवर आम्ही एकमेकांशी चर्चा करीत होतो. आम्ही दुपारी बॉम्बे रुग्णालयात पोहोचलो. वाडिया रुग्णालयातून आणलेले वैद्यकीय शिफारस पत्र तेथील संबंधित तज्ञांना दाखवले. तिथल्या डॉक्टरांनी संतोषकडे एक कटाक्ष टाकला आणि अकराव्या मजल्यावर रक्त तपासणीसाठी जायला सांगितले. अकराव्या मजल्यावर गेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी काही रक्कम जमा करायला तळमजल्यावर जाण्यास सुचविले. मी पुरेसे पैसे बरोबर आणले होते. सुमन व संतोषला अकराव्या मजल्यावरच थांबायला सांगून मी तळमजल्यावर पैसे जमा करायला गेलो. तिथे खूप गर्दी होती. बरेच जण रांगेत उभे होते. पैसे जमा करणे या प्रकारात किमान एक तास गेला. पैसे भरल्यावर जी पावती मिळाली ती घेऊन परत अकराव्या मजल्यावर आलो. तिकडच्या परिचारिकेला (नर्सला) ती पावती दाखवली. पावती पाहिल्यावर त्या परिचारिकेने संतोषच्या रक्ताचा नमुना घेतला. तिने आमची सुद्धा चौकशी केली. कुठून आलात? कसे आलात? वगैरे प्रश्नोत्तरी संवादातून त्यांच्याबरोबर चांगली ओळख झाली. मी त्यांना विचारले "ही तपासणी कशासाठी? संतोषला काय आजार आहे?" त्यावर त्या म्हणाल्या की "मला यातील काहीच कळत नाही. अहवाल आल्यावर तुम्हाला वाडिया रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर सांगतील." "चार दिवसांनी अहवालासाठी पुन्हा या. त्यासाठी सर्वांनी येण्याची गरज नाही. कोणीतरी एकजण आला तरी चालेल", असेही पुढे त्या म्हणाल्या. संतोषची रक्त तपासणी झाल्यावर आम्ही तिघे रुग्णालयातून बाहेर पडलो. संतोषला कंटाळा आला होता. तिथे जवळच एक चांगले उडपी उपहारगृह (हॉटेल) होते. दोघांना तिथे घेऊन गेलो. गाडीच्या चालकाला सुद्धा तिथे बोलावले. चौघांसाठी जेवण मागवले. जेवण झाल्यावर मग डोंबिवलीला निघालो.


बॉम्बे रुग्णालयातुन अहवाल यायला चार दिवस लागणार होते. एक दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी हिंदुजा रुग्णालयात जायचे ठरवले. सुमन मला प्रत्येक गोष्टीत साथ देत होती. एका गृहीणीसाठी घरची कामे व जवाबदार्‍या सांभाळून संतोषला बरोबर घेऊन निरनिराळ्या रुग्णालयात जाणे सोपे नक्कीच नव्हते. संतोषने सुद्धा कुठल्याही गोष्टीला विरोध केला नव्हता. मी सांगितल्याप्रमाणे तो वागायचा. त्याने जर विरोध केला असता तर सुमनला आणि मला खूप त्रास झाला असता. परंतु आई, आण्णांच्या पुण्याईमुळे व आशीर्वादामुळे तर्कदुष्ट नियतीने निदान एका बाजू तरी सांभाळून घेतली होती. संतोषला शरीर साथ देत नव्हते. चालायला त्रास होत होता. तसेच तो खाली बसला की त्याला उठायला जमत नसे. मलाच त्याला उचलायला लागायचे. 'कधी एकदाचे सर्व अहवाल हाती पडून कधी एकदाचे त्याच्यावर योग्य ते औषधोपचार सुरू होतील' असं मला झाले होते. प्रतिक्षेमुळे मला वेळ प्रदीर्घ वाटून माझा जीव जळू लागला होता. 


हिंदुजा रुग्णालयात आम्ही दुपारी अकराच्या सुमारास पोहोचलो. इथे सुद्धा रुग्णांची संख्या भरपुर होती. आम्हाला ज्या डॉक्टरांना भेटायला सांगितले होते आम्ही त्यांची चौकशी केली. ते डॉक्टर अजून आलेले नाहीत असं कळले. आम्ही बरोबर आणलेली वैद्यकीय कागदपत्रे तिथल्या कर्मचार्‍यांनी तपासली व त्यांना आवश्यक वाटल्या त्या सर्व नोंदी त्यांनी त्यांच्याकडे करून घेतल्या. काही वेळाने डॉक्टर आले व त्यांनी संतोषला तपासले. तिथल्या कर्मचाऱ्यांना काही सूचना देऊन ते बाहेर निघून गेले. तेथील कर्मचाऱ्यांनी मला काही रक्कम भरायला सांगितली. मी रक्कम भरून येईपर्यंत संतोषच्या काही तपासण्या झाल्या होत्या. आम्हाला थोडावेळ तिकडेच बसून राहायला सांगण्यात आले. काही वेळातच त्यांचे तपासणी अहवाल आमच्या हाती पडले. आता आम्ही डॉक्टरांची वाट पाहत होतो. डॉक्टर बाहेरून परत आल्यावर त्यांनी संतोषचे अहवाल तपासले व त्या अहवालावर स्वाक्षरी करून ते वाडिया रुग्णालयातील संबंधीत डॉक्टरांना दाखवायला सांगितले. त्यांनी दिलेली फाईल घेऊन आम्ही तिथून निघालो. गाडीत बसल्यावर ती फाईल उघडून तो संपूर्ण वैद्यकीय अहवाल वाचण्याचा मी प्रयत्न केला. परंतु मला त्यातील काहीच समजले नाही.


बॉम्बे रुग्णालयाचा अहवाल अजून मिळायचा होता. अर्थात परत तिकडे संतोषला घेऊन जाण्याची गरज नव्हती. मी रेल्वेगाडीने जाऊन तो अहवाल घेऊन आलो. त्यामध्ये सुद्धा कोणत्याही आजाराचा उल्लेख नव्हता. आता फक्त वाडिया रुग्णालयातील शेवटची रक्त तपासणी करायची बाकी राहीली होती. त्यासाठी आम्ही तिघे गाडीनेच वाडिया रुग्णालयात गेलो. तेथील डॉक्टरांना आवश्यक ती कागदपत्रे दाखवून रक्ताचा नमुना तपासणीसाठी दिला. वाडीया रूग्णालयाचा अहवाल येण्यासाठी अजून दोन दिवस लागणार होते. त्यांचा अहवाल ज्या दिवशी मिळाला त्याच दिवशी वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांना भेटलो व त्यांना मी बरोबर आणलेले बॉम्बे व हिंदुजा रुग्णालयाचे अहवाल सुद्धा दाखविले. त्यांनी ते दोन्ही अहवाल तपासून दिनांक मे ३१ पर्यंत विशेष तज्ञ डॉक्टर (स्पेशालिस्ट) येणार असल्याचे सांगितले. ''विशेष तज्ञ डॉक्टर सर्व अहवाल पाहून पुढे काय करायचे ते सांगतील'' असे त्यांनी सांगितले. मला वाटले होते की आजच आजार काय झाला आहे ते समजेल व त्याप्रमाणे औषधोपचार सुरू होतील. परंतु त्यांनी दिनांक ३१ मे रोजी परत यायला सांगितले होते. आता त्यासाठी अजून काही दिवस थांबावे लागणार होते. माझ्याजवळ वाट बघण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. प्रतिकूल परिस्थितीच्या तुरूंगात मी डांबलो गेलो आहे अशी माझी भावना झाली होती. 'आता वेळ खूप छान जाईल' असं कंसरूपी नियती कुचेष्टेने मला सुचवून माझा जीव जाळत होती. 


मे महिन्याच्या सुरुवातीपासून संतोषला अनेक डॉक्टरांकडे नेले होते. उपचारांसाठी तपासणी अहवाल आवश्यक होते. त्यासाठी एकसारख्या रुग्णालयाच्या चकरा मारत होतो. जराही न कंटाळता, कुठेही न थांबता एक एक डॉक्टरांना भेटणे चालू होते. आता सर्व तपासणी अहवाल माझ्या हाती पडले होते. पुढे काय होईल याची चिंता सतावत होती. यंदा संतोषचा सातवीचा निकाल लागला होता. सातवीत उत्तीर्ण होऊन तो आता आठवीत गेला होता. त्या गुणी मुलाने चांगले गुण सुद्धा मिळवले होते. जून महिन्यात शाळा सुरू होणार होती परंतु त्या आधीच संतोषचे बरे होणे अत्यावश्यक होते. नियतीने प्रतिक्षा अजून संपवलेली नव्हती. दिनांक ३१ मे २००६ रोजी देवाची प्रार्थना करून मी, सुमन व संतोष वाडिया रुग्णालयात जायला निघालो..... (क्रमशः)

4 comments:

  1. परिस्थितीची परीक्षा देताना चांगले दिवस येतील हे सारखं मनाला समजावून सांगण्यासारखं कठीण काहीच नाही!! आणि तुम्ही दोघे ह्या परीक्षेला बसला आहात ते कळतंय.

    ReplyDelete
  2. परिस्थितीची परीक्षा देताना चांगले दिवस येतील हे सारखं मनाला समजावून सांगण्यासारखं कठीण काहीच नाही!! आणि तुम्ही दोघे ह्या परीक्षेला बसला आहात ते कळतंय.

    ReplyDelete
  3. परिस्थितीची परीक्षा देताना चांगले दिवस येतील हे सारखं मनाला समजावून सांगण्यासारखं कठीण काहीच नाही!! आणि तुम्ही दोघे ह्या परीक्षेला बसला आहात ते कळतंय.

    ReplyDelete
  4. खूप कठीण परिस्थिती होती
    आणि तुम्ही ती ज्या प्रकारे मांडलाय त्यासाठी तुम्हाला hats off आहे

    ReplyDelete