Saturday, November 7, 2020

जेव्हा बर्‍याच वर्षांनी सुमन व संतोष कळसा गावी जातात...

"सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वता एवढे।" असं तुका माऊली जे म्हणून गेली त्याचे प्रत्यंतर सर्वच जीव संसार करीत असताना घेत असतात. सुखाचा कालावधी झटपट निघून जातो परंतु दुःखाचा एक एक क्षण सुद्धा युगासारखा प्रदिर्घ वाटतो. ज्यांच्यामध्ये आपला जीव गुंतलेला असतो ती व्यक्ती आपल्यापासून काही काळासाठी जरी दूर गेली तरी आपल्याला तिच्यावीना जी अस्वस्थता येते त्यावेळी तुकामाईचे उपरोक्त शब्द प्रत्ययास येतात. प्रिय व्यक्तीवीना जीवन म्हणजे लंबी जुदाई वाटु लागते.


संतोष मंजुनाथ शाळेत शिकत होता. मी कधी त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले नव्हते कारण तसा तो अभ्यासात हुशार होता. तो हुशार असून सुद्धा त्याचा वर्गात पहिला किंवा दुसरा क्रमांक यावा अशी मी कधीच अपेक्षा केली नव्हती. मी आणि सुमन अभ्यासात हुशार होतो त्यामुळे तो सुद्धा चांगले गुण मिळवेल याची मला खात्री होती. खरं तर मला संतोषच्या अभ्यासाची काळजी करण्याची गरजच नव्हती कारण सुमन त्याच्या मागे लागून त्याच्याकडून अभ्यास करवून घेत असे. लहानपणापासून संतोष माझ्यासारखाच मस्तीखोर होता. त्याचे मित्र सुद्धा ठरलेलेच होते. शाळेतील दोन मित्र आणि इमारतीतील (सोसायटीतील) ठरलेले काही मित्र फक्त त्यांच्याबरोबरच तो खेळत असे. बाकी कोणामध्ये तो सहसा मिसळत नसे. तो मितभाषी म्हणजे कमी बोलायचा. आपल्या इमारतीतील मित्रांना घेऊन कधी कधी तो आपल्या वाचनालयात येत असे. वाचनालयातील कर्मचारी श्री. सुनिल वडके उर्फ मामा यांना संतोषचे फार कौतुक होते. संतोष वाचनालयात आला की मामा मला न सांगताच त्याला पेप्सीकोला घेऊन द्यायचे. मग काय छोटे रावसाहेब एकदम खुश... 


सन २००३ मध्ये संतोषचा अपघात होऊन त्याच्या पायाचे हाड मोडले (फ्रॅक्चर) होते. काही महिन्यांनी त्यातून तो बराही झाला होता. परंतु त्यानंतर काही काळाने संतोष डावा पाय जमिनीवर नीट टेकवत नाही असं माझ्या निदर्शनास आले. त्याच्या अस्थिभंगाच्या (फ्रॅक्चरच्या) वेळी झालेल्या शस्त्रक्रियेबाबत (ऑपरेशनबाबत) माझ्या मनात शंका निर्माण झाली होती. मी डॉक्टर कोपर्डेंना परत एकदा संतोषला दाखवले. त्यांनी संतोषला तपासले. 'शस्त्रक्रिया (ऑपरेशन) व्यवस्थित झाली आहे व त्याचा पाय सुद्धा बरा आहे' असे सांगून डॉक्टर कोपर्डेंनी मला व सुमनला अश्वस्त केले. यंदा संतोषने सातवीची परीक्षा दिली होती. वयाच्या मनाने त्याचे वजन जरा जास्तच वाढले होते. माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझा भाचा नागेंद्र याला संतोषला व्यायाम शिकवण्यास मी सांगितले. नागेंद्रने आनंदाने ती जवाबदारी स्विकारली. मग मी, नागेंद्र आणि संतोष आम्ही तिघेही रोज सकाळी व्यायाम करू लागलो. आमच्या इमारतीच्या आवारात चांगली मोठी रिकामी जागा होती. आम्ही संतोषला धावण्याच्या दहा बारा फेर्‍या मारायला लावायचो. काही वेळातच तो दमून जात असे. मला त्याची दया यायची परंतु नागेंद्र ठरलेल्या वेळेनुसार संतोषकडून व्यायाम करवून घ्यायचा.


एप्रिल २००६ मध्ये संतोषची सातवीची परीक्षा संपल्यावर त्याला व सुमनला मी गावी पाठवायचा निर्णय घेतला. त्यांना सुद्धा कळसा गावी जाऊन खूप वर्ष झाली होती. बरेच वर्षे आम्ही एकत्र गावाला गेलोच नव्हतो. यंदा सुद्धा मला वाचनालय सोडून गावी जाणे शक्य होणार नव्हते म्हणून सुमनशी चर्चा करून फक्त त्या दोघांनाच गावी पाठवायचे ठरवले. खरं तर मला मनापासून त्यांना गावी पाठवायची इच्छा होत नव्हती. सुमनला सुद्धा मला सोडून राहणे कठीण जाणार होते हे मलाही ठाऊक होते. जपान लाईफ कंपनीत असताना नाईलाजाने कामानिमित्त मी बाहेरगावी जात असे. बाकी एरवी आम्ही कधीच एकमेकांना सोडून लांब राहिलो नव्हतो. आमचे एकमेकांवर खूपच प्रेम होते. जेवण, कपडे, वेळेवर झोपणे-उठणे, औषध वेळेवर देणे इत्यादी माझ्या सर्व दैनंदिन गरजांची काळजी सुमन घेत होती. त्यामुळे एकमेकांना सोडून दिवस काढणे आमच्यासाठी खूपच कठीण जाणार होते. आमच्यासाठी ती लंबी जुदाई ठरणार होती. 


बरीच वर्षे सुमन कळसाला गेली नव्हती. आता संतोष सुद्धा मोठा झाला होता. अगदी वजनाने सुद्धा. एकदा कळसाला जाऊन त्या दोघांनी सर्वांना भेटणे मला आवश्यक वाटल्याने मीच गावी जाण्याचा आग्रह धरला होता. संतोषचे कारण पुढे करून मी कसेबसे सुमनला गावी जाण्यासाठी तयार केले. संतोषची सातवीची परीक्षा संपल्यावर एप्रिल महिन्यात कळसा गावी जायचे ठरले. रेल्वेचं तिकीट मिळत नव्हते. शाळांच्या सुट्ट्या चालू झाल्यामुळे सर्व गाड्या अगोदरच पुर्णपणे आरक्षित झाल्या होत्या. मग बसने प्रवास करायचे ठरले. सुमनला आणि संतोषला बसमध्ये बसवले. आता काही दिवस मला दोघांपासून लांब राहायला लागणार होते. बस निघत असताना माझ्या डोळ्यांतून नकळतपणे पाणी आले. 'सुमन आय हेट टिअर्स' हा राजेश खन्नाचा अमरप्रेम चित्रपटातील सुप्रसिद्ध संवाद स्वतःसाठी आठवून कशी तरी स्वतःच्या मनाची समजूत घातली. जेव्हा घरी परतलो तेव्हा मला माझ्या जेवणाखाण्याची, पिण्याची चिंता नव्हती. त्यासाठी ताईचे घर होते. इतर हक्काचे नातेवाईक होते. ते कमी होते म्हणून की काय माहित नाही मित्र सुद्धा जेवणासाठी बोलवत असत. परंतु एरवी मला घरी एकटे राहण्याची सवय नव्हती. संतोषची मस्ती पाहिल्याशिवाय जेवण जात नसे. त्याच्या शिवाय करमत नसे त्यामुळे त्यादिवशी रात्री झोप लागत नव्हती. दोघांची खूप आठवण येत होती. मग रात्री उशिरा कधीतरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी दोघेजण गावी कळसाला सुखरूप पोहचल्याचा दूरध्वनी आला. मग दूरध्वनीवर (फोनवर) दोघांशी बराच वेळ बोललो. तेव्हा कुठे त्यादिवशी थोडे बरे वाटले.


एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यामुळे वाचनालयात दररोज दहा बारा नवीन सभासद नाव नोंदवत होते. वाचनालयात वाचकांची वर्दळ वाढत चालली होती. लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांची संख्या वाढविण्यासाठी अनेक विविध पुस्तकांची खरेदी करायला लागायची. बालमासिकांची संख्या सुद्धा वाढवली होती. दिवसभर कामात गुंतून पडत असल्याने दिवस कसा जायचा ते समजत नसे. परंतु घरी पोहचलो की दोघांची आठवण येत असे. सकाळी व रात्री असे दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी दूरध्वनीवरून बोलणे होत होते. त्यांना गावाला पाठवून अद्याप फक्त तीनच दिवस झाले होते. परंतु जणु काही तीन युगे संपली आहेत असे मला वाटत होते. चौथ्या दिवशी सुमनचा दूरध्वनी आला. "संतोषला थंडी भरून ताप आला आहे. इकडच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे" असं तिने सांगितले. खरं तर रूग्णालयात दाखल करण्याच्या एक दिवस आधीच त्याला ताप आला होता. परंतु मी घाबरून जाईन व कदाचित उद्यापर्यंत ताप उतरेल अशी शक्यता वाटल्याने सुमनने कळवले नव्हते. रूग्णालयात दाखल केल्यावर मात्र मला लगेच कळवले. सुमनच्या त्या धीरगंभीर हळुवार आवाजाने मी अस्वस्थ झालो. मागचा पुढचा कसलाच विचार न करता कळसाला जायला निघालो.


संतोष माझ्यासाठी जीव की प्राण होता. एकवेळ मला काही झाले तर ते मी सहन करू शकत होतो परंतु संतोषला आणि सुमनला काही झाले तर मला चिंताग्रस्त व्हायला वेळ लागत नसे. रूग्णालयात दाखल केले आहे म्हटल्यावर माझ्या मनात नको त्या शंकाकुशंका येऊ लागल्या. कळसा गाव छोटसं होते. तिथे मुंबईसारख्या सोई सुविधा जवळपास नव्हत्याच. एकच छोटसे रूग्णालय होते. मी प्रवासाला सुरूवात केल्यावर कधी एकदा कळसाला पोहचतो असे मला झाले होते. प्रवासात जेवण सुद्धा जात नव्हते. कधी एकदा संतोषला पाहतो असे झाले होते. डोंबिवलीपासून कळसा काही जवळ नव्हते. जवळपास तीस तासांचा प्रवास करावा लागणार होता. चार वेळा बस बदलायला लागणार होती. सात समुद्रांचा प्रवास मी करीत आहे असंच मला वाटत होते. अखेर दरमजल करीत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी कळसाला पोहचलो. इथे माझ्या सिंदबादच्या सफरींचा ताप संपला होता त्याचवेळी तिथे तोपर्यंत संतोषचा ताप उतरला होता. मी मुक्कामी पोहचलो तेव्हा तो कळसाच्या घरी परत आला होता. दोघांना पाहिल्यावर मला खूप बरं वाटले व आनंदाचे भरते आले. आता प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नव्हता. दोघे समोर दिसताच घट्ट गळाभेट घेतली. मला पाहून ते दोघेही खुश झाले. परत माझ्या डोळ्यांतून पाणी कधी आले मला कळलेच नाही. 'मेरे आँख में पानी? इंपॉसिबल। पता नही आज यह आसुँ कैसे बहार आ गए। यह आसुँ बहाने में कितना सुख है यह आज मुझे मालुम पडा। अब मैं कभी नहीं कहुँगा सुमन आय हेट टिअर्स' असे राजेश खन्नाचे अमर संवाद जरी मनात येत असले तरी 'सुमन आय हेट लंबी जुदाई' असा त्यावेळी विचार करीत परत कधी या दोघांना मला सोडून कुठेही पाठवायचे नाही हे मनात निश्चित केले....

2 comments:

  1. अरे वाह ! मस्त....

    ReplyDelete
  2. तुमच्या ह्या आठवणींची एक छानशी कादंबरी होते आहे. खूप खूप सुंदर लिखाण!!

    ReplyDelete