Sunday, December 6, 2020

संतोषच्या परदेश प्रवासाची आखणी करताना केलेला संघर्ष...


'तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।' असा निर्धार व विश्वास मनात जेव्हा असतो तेव्हा प्रयत्नांचा अग्नीपथ कितीही दाहक, कष्टमय व अवघड असला तरी नियतीला परिणाम हे प्रयत्न करणार्‍याच्या बाजूने द्यावेच लागतात. 'कोशीश करनेवाले की कभी हार नही होती' याची अनुभूती ही तेव्हाच खर्‍या अर्थाने येते. अथक प्रयत्नांच्या अश्या दाहक अग्नीपथावरून चालताना मी सुद्धा तोच निर्धार व विश्वास मनी बाळगून नियतीच्या कृपेने परिणाम साध्य करण्यासाठी जीवाचे रान करीत होतो. 


जिजाजींच्या ओळखीने खार येथील ज्योती इंटरनॅशनल या यात्रासंस्थेत (ट्रॅव्हल्स एजन्सीत) गेलो तेव्हा त्या संस्थेच्या संचालकांनी मला धीर दिला. 'आपण सर्वतोपरी प्रयत्न करू या. नियतीच्या मनात असेल तर आपल्याला कोणीही आडवू शकणार नाही' या त्यांच्या अश्वासक शब्दांत खूप काही जाणवत होते. त्यांच्या बोलण्याने मनाला हुरूप आला, समाधान वाटले. त्यांना मी बरोबर आणलेली सर्व कागदपत्रे दाखविली. "आधी डोमिनिकन रिपब्लिकचे विदेशसंचारपत्र (व्हिसा) मिळविण्याचा प्रयत्न करू या", असं ते म्हणाले. त्यांनी मला जे काही सांगितले ते सर्व करायची माझी तयारी होती. विदेशसंचारपत्र (व्हिसा) मिळण्याआधीच विमान तिकिट काढण्यात काहीच हशील नव्हते. आधी त्यांनी स्वतः विदेशसंचारपत्रासाठी खूप प्रयत्न केले. नंतर मला स्वतःला दिल्लीला जाऊन डोमिनिकन रिपब्लिकच्या दूतावासातील संबंधित अधिकार्‍यांना भेटून येण्यास सुचविले. मग मी विदेशसंचारपत्रासाठी (व्हिसासाठी) दिल्लीला जायचे ठरवले.


आता परिस्थिती वेगळी होती. डोंबिवलीहून बाहेर पडताना मला दहावेळा विचार करायला लागायचा. कारण संतोष अधून मधून चालताना अचानक तोल जाऊन पडायचा. त्यावेळी त्याला उचलणे हे फक्त माझ्यानेच होणार होते. दिल्लीला जाणे तर आवश्यक होते. मी नागेंद्रला संतोषकडे लक्ष ठेवण्याबाबत विचारले. नागेंद्रने संतोषला सांभाळायची जवाबदारी स्वीकारून मला निश्चिंत केले. सकाळच्या विमानाने दिल्लीला जाऊन, तिकडची कामे उरकून, संध्याकाळच्या विमानाने परतायचे असं मी ठरवले. सकाळी सहा वाजता घरून निघालो व साडेसात वाजेपर्यंत विमानतळावर पोहोचलो. साडे आठ वाजता दिल्लीला जाणारे विमान होते. ते विमान पकडून दहा वाजता दिल्लीला पोहोचलो. ज्योती इंटरनॅशनलच्या संचालकांनी दिलेला पत्ता माझ्याकडे होता. कुठेही न थांबता थेट डोमिनिकन रिपब्लिक दूतावासाच्या कार्यालयात गेलो. माझ्याकडे असलेली सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे सोपवली. त्यांनी थोडावेळ थांबायला सांगितले म्हणून तिकडेच थांबलो. मला वाटले होते आजच विदेशसंचारपत्र (व्हिसा) हाती पडेल. काही वेळाने एका अधिकार्‍याने मला आत बोलावून घेतले व बरीच चौकशी केली. मी दिलेली कागदपत्रे पडताळून मी सांगितलेल्या काही गोष्टी त्याने लिहून घेतल्या. त्याने मला आठ दिवसांनी यायला सांगितले. आठ दिवसांनी परत येण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यावेळी दुपारचे दोन वाजले होते. मला खळखळून भूक लागली होती. पोटात आग होतीच परंतु काम अर्धवट झाल्याने मनात सुद्धा आगआगं होत होती. कार्यालयाच्या बाहेरच दूरध्वनीसेवा केंद्र (टेलिफोन बूथ) होते. तिथून सुमनला दूरध्वनी केला. संतोषची विचारपूस केली. कामाच्या संदर्भातील माहिती सुमनला दिली. मग जवळच्याच एका उपहारगृहात (हॉटेलात) जाऊन जेवलो व नंतर मुंबईला परतण्यासाठी विमानतळावर पोहोचलो. काही वेळ विमानतळावर व्यतीत करावा लागला. संध्याकाळी सहा वाजताचे विमान पकडून मुंबईला पोहोचलो.


आठ दिवसांनी परत दिल्लीला जायचे होते. विदेशसंचारपत्र (व्हिसा) मिळाल्याशिवाय काहीच करता येत नव्हते. आठ दिवसांनी दिल्लीला त्याच कार्यालयात गेलो. तिथे गेल्यावर समजले विदेशसंचारपत्राचे काम झालेले नाही. अजून दोन दिवस लागणार होते. मी संबंधीत वरिष्ठ अधिकार्‍याची भेट मिळावी म्हणून तेथील कर्मचाऱ्यांना विनंती केली. माझी विनंती मान्य करून त्यांनी मला संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटू दिले. मला इंग्रजी नीट बोलता येत नव्हते तरी पण मी पोटतिडकीने वरिष्ठ अधिकाऱ्याला संतोषच्या औषधोपचाराची माहिती दिली. मेड्रा इंककडून आलेले पत्र त्यांना दाखवले. "वारंवार मुंबईहून दिल्लीला जाण्या-येण्याचा खर्च परवडत नाही तसेच वेळही वाया जात आहे. जर उद्यापर्यंत विदेशसंचारपत्र मिळाले तर बरं होईल. त्यासाठी आज एक दिवस मी दिल्लीला थांबतो'', अशी माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजी भाषेत भावूक होऊन त्या अधिकार्‍याला विनंती केली. शेवटी त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत विदेशसंचारपत्र देण्याचे कबुल केले. मला खूप बरं वाटले. त्यादिवशी दिल्लीतच मुक्काम केला. मी दिल्लीत एक दिवस थांबणार असल्याचे दूरध्वनीवरून घरी कळवले. आपले काम होणार आहे कळल्यावर सुमनला सुद्धा आनंद झाला. आता फक्त एकच दिवस संतोषला तिला एकटीला सांभाळायला लागणार होते. तसंही गरज पडली तर मदतीला नागेंद्र होताच.


दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, दिनांक २४ नोव्हेंबर २००६ रोजी सकाळी तयार होऊन डोमिनिकन रिपब्लिकच्या विदेशसंचारपत्र कार्यालयात (व्हिसा ऑफिसमध्ये) जाऊन बसलो. त्या कार्यालयात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. त्यादिवशी तर मी एकटाच होतो. माझ्या जिद्दीला व चिवटपणाला त्यांनी दाद दिली आणि मला लगेच कागदपत्रे तयार करून दिली. विदेशसंचारपत्र जसे माझ्या हातात पडले मी तडक दिल्ली विमानतळ गाठले व आधी मुंबईला जाणार्‍या विमानाचे तिकीट काढले. मग विमानाची निवांतपणे वाट पाहत बसलो. संध्याकाळी मुंबईत पोहोचताच ज्योती इंटरनॅशनलच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांना विदेशसंचारपत्र मिळाल्याचे कळवले. त्यांनी अजून एक अडचण सांगितली. डोमिनिकन रिपब्लिकला जाताना पॅरिसचा संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) लागेल. शनिवार रविवार फ्रान्स दूतावासाचे कार्यालय बंद असल्याने मला सोमवारी तिकडे जावे लागणार होते. डोमिनिकन रिपब्लिकला जाण्यासाठी विदेशसंचारपत्र मिळाल्यानंतर मी त्या देशात जाण्याचे मंगळवारच्या संध्याकाळचे विमानाचे तिकीट काढून बसलो होतो. आता ही नवी समस्या समोर उभी राहीली होती. अस्वस्थ झालो होतो परंतु डोकं शांत ठेवून सोमवारची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मनात एकच निर्धार होता काहीही करून संतोषला तिकडे न्यायचेच व औषधोपचार करून परत यायचे.


 श्रीधर अण्णा, ज्यांनी आम्हा सर्वांना मुंबईत आणले होते, त्यांना जेव्हा संतोषच्या आजाराबाबत कळले ते माझ्या घरी संतोषला भेटायला आले. संतोषला पाहून त्यांना सुद्धा खूप दुःख झाले. "तू जे काही करीत आहेस ते योग्यच आहे. प्रयत्न सुरू ठेव," असं ते म्हणाले. त्यांनी मला रोज महामृत्युंजय जप म्हणायला सांगितला. त्यांनी मला तो मंत्र लिहून दिला होता. मी दिवसातून किमान दहा वेळा तो मंत्र म्हणायला सुरुवात केली होती. मी शुक्रवारी दिल्लीहून परतलो होतो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संतोषच्या आरोग्यासाठी आमच्या घरी महामृत्युंजय होमहवन यज्ञ करण्यात येणार होता. मी दिल्लीत असल्याने त्याची सर्व तयारी सुमनने केली होती. एका बाजूने औषधोपचाराची तयारी तर दुसरीकडे देवाची प्रार्थना. दोन्ही मागचा उद्देश फक्त आणि फक्त संतोषला बरं करणे. 


माझ्याकडे सोमवार, दिनांक २७ डिसेंबर २००६ हा एकच दिवस होता. काही करून फ्रान्सचा संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) मिळवायचा होता. त्यादिवशी पहाटे सहा वाजताची गाडी पकडून सुमारे आठच्या दरम्यान चर्चगेट येथील फ्रान्सच्या कार्यालयापाशी पोहचलो. ते कार्यालय नऊ नंतर उघडणार होते. थोडावेळ तिथेच थांबून प्रतिक्षा केली. नऊ वाजता कार्यालय उघडताच तिकडच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी नरिमन पॉईंट येथील कार्यालयात जायला सांगितले. चर्चगेटवरून नरिमन पॉईंटला त्यांनी दिलेल्या पत्त्यावर चालत गेलो. तिथे मला इमारतीच्या खालीच अडवण्यात आले. 'इथे भेटीची पुर्वपरवानगी (अपॉइंटमेंट) आधी घ्यावी लागते, मगच तुम्हाला आतमध्ये जाता येईल' हे मला ऐकावे लागले. मला काय करायचे तेच सुचेना. तिकडून व्यंकटेशअण्णांना दुरध्वनी केला. त्यांनी मला तिकडेच थांबायला सांगितले. ते चर्चगेट इथेच कामाला असल्याने काही वेळातच टॅक्सी करून आले. त्यांच्या बरोबर माझा मेहुणा आणि एक युवती सुद्धा होती. त्या युवतीला फ्रेंच भाषा बोलता येत होती. आता आम्ही चौघेजण एकत्रित प्रयत्न करणार होतो. सकाळपासून माझ्या पोटात काही गेले नव्हते हे व्यंकटेशअण्णांच्या लक्षात आले. अण्णांनी मला बिस्कीटे खायला दिली. खरंतर खायची इच्छाच मरून गेली होती. तरी सुद्धा चार बिस्कीटे व पाणी कसेबसे पोटात ढकलले. "आता काय करायचं?" मी अण्णांना विचारले. अण्णांनी कशी तरी विनंती करून आत जाण्याची परवानगी मिळवली. कार्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावर होते. आम्ही चौघे कार्यालयात गेलो. आमच्या बरोबर असलेल्या युवतीने तेथील कर्मचाऱ्यांशी फ्रेंच भाषेतून चर्चा केली. "उद्याचे विमानाचे तिकीट आहे. कृपया आम्हाला संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याला भेटू द्यावे" अशी विनंती केली. परंतु कोणीही ऐकायला तयार नव्हते. हताश होऊन नाईलाजाने आम्ही चौघेजण त्या कार्यालयातून बाहेर पडलो. इमारतीच्या उद्-वाहनाने (लिफ्टने) वरून खाली उतरत असताना अचानक मला एक कल्पना सुचली. त्या कार्यालयातील संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक माझ्याकडे होता. इमारतीच्या खालच्या मजल्यावरून मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी माझा कॉल घेतला नाही. मी सर्वांना घेऊन परत उद्-वाहनाने वर गेलो. तिकडे बाहेर बसलेल्या व्यक्तीस मला आत्ताच आतून त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दूरध्वनी आल्याचे सांगितले. पुरावा म्हणून माझा भ्रमणध्वनी (मोबाईल) त्यांना दाखवला. त्या व्यक्तीने फक्त क्रमांक पाहीला. खरोखरच तोच नंबर होता. परंतु तो क्रमांक आलेला (रिसिव्हड) आहे की केलेला (डायल्ड) दूरध्वनी आहे हे त्या व्यक्तीने पाहिले नाही आणि मला एकट्यालाच आत जाण्यास परवानगी दिली. माझ्या जीवात जीव आला. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. त्या व्यक्तीची नजरबंदी नियतीने माझ्यासाठीच केली होती. माझ्या आधीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दोन चार लोकं बसलेले होते. त्यांच्याशी बोलून झाल्यावर मला बोलायची संधी मिळणार होती. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एका बाजूला भारतातील माणूस बसला होता, ज्याने मला संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) देण्याचे नाकारले होते. त्याच्या दुसऱ्या बाजूला फ्रेंच माणूस बसला होता. तो वरिष्ठ अधिकारी व माझ्यामध्ये मोठी काच होती. त्यांच्याशी बोलायचे असेल तर समोरासमोर दूरध्वनी करून बोलायला लागायचे. मला इंग्रजी नीट येत नव्हते. माझ्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत मी संतोषच्या आजार व उपचाराबाबत सांगितले. मला आणि संतोषला उद्या औषधोपचारासाठी डोमिनिकन रिपब्लिक या देशात जायचे आहे त्यासाठी संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) मिळावा ही विनंती केली. आणीबाणीची वेळ असून सुद्धा बाजूच्या माणसाने तो देण्याचे नाकारले हे पण त्याला सांगितले. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माझी सर्व कागदपत्रे पडताळली. हातातील दूरध्वनी खाली ठेवला व मला तत्काळ संक्रमण परवाना देण्याचा आदेश त्या भारतीय माणसाला दिला. माझ्या समोरच तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांची चांगली खरडपट्टी काढली. नंतर मला परत बोलावून माझी माफी मागीतली. काही वेळातच संक्रमण परवाना मिळेल असं सांगून मला तिथेच बसून रहायला सांगितले. संक्रमण परवाना हाती पडताच तिकडून बाहेर पडलो. अण्णा, मेहुणा आणि ती युवती माझी वाट पाहत होते. त्यांना तो संक्रमण परवाना दाखवला. सर्व जण खुश झाले. लगेच तिथून सुमनला दूरध्वनी केला व खुश खबर दिली. कुठेही थांबलो नाही, कुठेही थकलो, केव्हाही मागे वळून पहात कुढत बसलो नाही त्यामुळे अथक प्रयत्नांच्या या अग्नीपथातील सर्व अडथळे दूर करीत परिणाम नियतीने माझ्या पारड्यात टाकला होता. संतोष आणि मी उद्या म्हणजे मंगळवार, दिनांक २८ डिसेंबर २००६ रोजी डोमिनिकन रिपब्लिकला जाणार असल्याचा पक्का परवाना नियतीने पारित केला होता......

7 comments:

  1. वाचताना दमायला होतंय! तुम्ही सगळं कसं निभावलं?खरंच देवाची कृपा!

    ReplyDelete
  2. वाचताना दमायला होतंय! तुम्ही सगळं कसं निभावलं? खरंच देवाची कृपा 🙏

    ReplyDelete
  3. एखाद्या आपत्तीतून चिकाटीने कसा मार्ग काढावा हे आपल्याकडून शिकायला मिळते.

    ReplyDelete
  4. चिकाटी आणि प्रयत्न सोबत देवावर गाढ श्रद्धा म्हणजे सफलता येणारच.

    ReplyDelete
  5. वाचताना Netflix वर series बघितल्यासारखं वाटतंय. खूप जबरदस्त आहेत तुमचे अनुभव !

    ReplyDelete
  6. Sir.ur patience ,efforts commendable.
    The mantra never fails.

    ReplyDelete