Sunday, December 13, 2020

फ्रँकफर्ट विमानतळ ते डोमिनिकन रिपब्लिक देशात ईप्सित स्थळी पोहचेपर्यंतचा प्रवास...

'आस्माँन से टपके और खजूर पे लटके' याचे प्रत्यंतर कधी कधी जीवनात प्रत्यक्षात अनुभवावे लागते. गीतेतील कर्मसिद्धांतानुसार आपल्याला फक्त निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य भगवंताने दिले आहे. परिणाम हा आपला विषय नाही हे भगवंताने स्पष्टपणे सांगितले आहे. आपले प्रारब्ध बदलण्याचा निर्णय एकाच वेळी अनेकजण घेत असतात. नियतीला जे मान्य नसते ते सुद्धा बदलून टाकण्याचा निर्णय काहीजण घेत असतात. अशावेळी इतरांचे निर्णय व प्रयत्न आपल्या प्रयत्नांचे परिणाम बदलून टाकत असतात. त्यामुळे एका अग्निपरिक्षेच्या संकटातून आपण बाहेर पडत नाही की परत दुसरी अग्निपरिक्षा वाटेत हात जोडून आपल्यासाठी तयारच असल्याचा परिणाम आपल्या वाट्याला येत असतो. आगीतून फोफाट्यात अशी त्यावेळी माणसाची अवस्था होत असते. संतोषवर कोणत्याही परिस्थितीत उपचार करायचेच हा मी नियतीला मान्य नसलेला निर्णय खंबीरपणे घेतला होता. त्यामुळे त्याचवेळी इतरांनी घेतलेल्या निर्णयाचे व प्रयत्नांचे परिणाम माझ्या आयुष्यावर प्रभाव पाडत होते या कर्मसिद्धांताची मला जाणीव होऊ लागली होती. संकटांची मालिका काही संपतच नव्हती.


संतोषला विमानातून उतरविणे हा माझ्यासमोर मोठा यक्ष प्रश्न होता. पायऱ्या उतरताना जर तो खाली पडला असता तर त्याला सावरून घेणे कठीण होते. त्यामुळे विमानात असतानाच मी संबंधित अधिकाऱ्यांना आसनचाकी (व्हील चेअर) व दोन माणसांची गरज असल्याची माहीतीवजा सूचना दिली होती. फ्रँकफर्ट विमानतळावर दोघेजण संतोषसाठी आसनचाकी घेऊन आले होते. संतोषचे वजन वयाच्यामनाने जास्तच होते. मदतीला आलेले दोघेजण सहा फूट उंच आणि मजबूत होते. त्यांनी संतोषला खुर्चीमध्ये आसनपट्ट्याने घट्ट गुंढाळले आणि अलगद उचलून खाली आणले. जेव्हा ते संतोषला विमानतळापर्यंत आसनचाकीतून आणत होते तेव्हा मी त्यांच्या बरोबरच थंडीने कुडकुडत चालत होतो. त्यांनी आम्हाला विमानतळावरील प्रतिक्षालयात (वेटिंग रूममध्ये) नेऊन सोडले. सकाळचे नऊ वाजले होते. नुकतीच सूर्याची किरणे बाहेर पडू लागल्याने अंधाराचे जाळे फिटू लागले होते. बाहेर कडाक्याची थंडी असली तरी विमानतळावर प्रतिक्षालयात थंडी जाणवत नव्हती. बुधवार, दिनांक २९ नोव्हेंबर २००६ रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही फ्रँकफर्ट विमानतळावर होतो व त्याच दिवशी रात्री ३ वाजता फ्रँकफर्टवरून डोमेनिकन रिपब्लिकसाठी आमचे विमान निघणार होते. तब्बल अठरा तास आम्हाला फ्रँकफर्ट विमानतळावर घालवणे भागच होते.


संतोषला एका जागेवर बसवून स्वस्त आणि मस्त काही खायला मिळते का याच्या शोधात मी एकटाच निघालो. फ्रँकफर्ट विमानतळाचे कार्यालय खूप विस्तीर्ण होते. आपण कुठून निघालो आणि कुठे पोहचलो तेच कळत नव्हते. विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा भरपूर दिसत होती. ध्वनीक्षेपकावर (माईकवर) सतत निरनिराळ्या ठिकाणी जाणाऱ्या विमानांच्या सूचना व घोषणा दिल्या जात होत्या. त्या जाहीर सुचनांनुसार प्रत्येक जण आपआपले सामान घेऊन इकडे तिकडे धावपळ करीत होता. मला लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लोकांची सर्वात जास्त गर्दी उपहारगृहामध्ये (हॉटेलमध्ये) होती. त्यानंतर अधिक गर्दी पुस्तकांच्या दुकानात होती. तिथे दुकाने पुष्कळ होती. उपहारगृह सोडले तर पुस्तकांच्या दुकानात जेवढी गर्दी होती तेवढी अन्य कुठल्याच दुकानात नव्हती. बहुतेक करून सर्व लोकांच्या हातात पुस्तकं, मासिकं किंवा वृत्तपत्र दिसत होते. तेथील मंडळी वाचनप्रेमी दिसत होती. ते पाहून मला खूप बरं वाटले. जर्मनसारख्या प्रगत देश, जिथे महाजालाचा (इंटरनेटचा) सर्वात जास्त वापर होत होता, तिथे लोकं पुस्तक खरेदीसाठी सुद्धा गर्दी करीत होते व प्रत्येकाच्या हातात पुस्तक होते हे दृष्य पाहून मला खूप समाधान वाटले. मी मनातल्या मनात म्हटले पुस्तकांना पर्याय नाही. महाजाल असो की मोहमयी दृकश्राव्य माध्यमे असोत, वाचनाची आवड असणारे लोकं पुस्तकं वाचतातच.


मी संतोषच्या खाण्यापिण्याच्या बंदोबस्तासाठी फिरत होतो. प्रत्येक दुकानातील किंमत फलक (बोर्ड) वाचत होतो. त्यातल्या त्यात कमी किंमतीचे दुकान शोधत होतो. विमानतळाच्या दुसऱ्या मजल्यावर मला मॅकडोनाल्डचे दुकान दिसले. पिझ्झा, बर्गर हे संतोषच्या आवडीचे जिन्नस. त्याच्यासाठी बर्गर घेतला. माझ्यासाठी साधा पाव आणि मख्खन (बटर) घेतले. संतोषला जेव्हा बर्गर दिला तेव्हा 'परत काही आणायचे असल्यास मला सुद्धा बरोबर घेऊन जायचे' या अटीवर त्याने मी दिलेला बर्गर खल्ला. संतोषला कुठे न्यायचे म्हटले तर मला खूप विचार करावा लागायचा. तिथे विमानतळावर एकतर खूप गर्दी होती त्यात जर कोणाचा थोडा जरी धक्का लागला असता तर त्याची पडण्याची शक्यता होती. माझ्यासमोर विमानतळावर अठरा तास कसे काढायचे हा प्रश्न होता. त्यामुळे दोन तीन वेळा त्याला बरोबर घेऊन गेलो. ते अठरातास आम्ही दोघे खूप हिंडलो फिरलो. परंतु मी पैसे मात्र मोजूनमापून खर्च करीत होतो. माझ्याकडे मर्यादित पैसे होते आणि मला ते मुंबईला परत येईपर्यंत पुरवायचे होते. तसेच ते पैसे मी 'पै गुद्धी पावणे' या कानडी म्हणीप्रमाणे म्हणजे आडनावाप्रमाणे पै पै करीत लोकांकडून जमवले होते. ते वर्षभरात लोकांना परत करायचे अश्वासन मी सुमनला दिले होते. एक दोन वेळा भारतातील वेळ पाहून सुमनला दूरध्वनी केला. संतोष सुद्धा सुमनशी बोलला. तिलाही खूप बरं वाटले. ते अठरा तास काढणे ही सुद्धा एक छोटीशी कठीण परिक्षाच बनली होती.


रात्री ३ वाजता डोमिनिकन रिपब्लिकसाठी आमचे छोटेसे विमान निघणार होते. जेमतेम पन्नास प्रवासी बसू शकतील एवढे छोटेसे ते विमान होते. डोमेनिकन रिपब्लिक हा छोटासा बेटसदृश देश असल्याने तिथे खूप कमी लोकं जात असावीत व त्यामुळे तिथे छोटी विमाने जात असतील असा मी अंदाज केला. फ्रँकफर्टवरून सहा तासांचा प्रवास होता. आम्ही पहाटे सहाच्या दरम्यान डोमेनिकन रिपब्लिकच्या विमानतळावर उतरलो. विदेशसंचारपत्रावर (व्हिसावर) शिक्का मारून मी माझ्याकडे असलेले काही युरो चलन बदलून तेथील स्थानिक पेस्सो चलन घेतले आणि बॅग घेण्यासाठी खाली उतरलो. कमी प्रवासी असल्याने काही वेळातच सर्वजण आपआपली बॅग घेऊन बाहेर पडले. मी आमच्या बॅगेची वाट पाहत होतो. पट्ट्यावरून बॅग काढून देणाऱ्या माणसाकडे माझ्या सामानाचे कागदपत्र देऊन ठेवले होते. सर्वांच्या बॅगा आल्या, परंतु फक्त आमचीच बॅग आली नव्हती. तेथील अधिकाऱ्यांनी आमची बॅग हरवल्याचे मला सांगितले. पायाखाली व डोक्यावर एकाचवेळी ध्वमस्फोट (बाँम्बस्फोट) झाल्यासारखे मला वाटले. ''तुम्ही तुमच्या मुक्कामी (हॉटेलवर) जा. तुमची बॅग हाती पडली की आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहचवतो. तुम्ही निश्चिंत रहा'', असे तेथील अधिकारी म्हणाला. 'काय चाललंय? हा काय प्रकार आहे?' तेच मला समजत नव्हते. 'तुम्ही निश्चिंत रहा' हे त्या अधिकाऱ्याचे बोलणे माझ्या जखमेवर मिठ चोळत होते. बॅगेत खाण्यापिण्याचे सामान, कपडे वगैरे सर्वकाही होते. आता काय करायचे? अंगावरच्या कपड्यावरच काही दिवस काढायला लागणार होते. वाद घालून काहीच उपयोग नव्हता. खरंतर मी हतबल झालो होतो परंतु तरी सुद्धा धीर न सोडता खोलात जाऊन चौकशी केली. तेव्हा समजले की आमची बॅग चुकून दुसऱ्या विमानात चढवली गेली होती. ती शोधून परत आणण्यासाठी किमान दोन तीन दिवस तरी लागणार होते. त्या अधिकाऱ्यांनी आमची माफी सुद्धा मागितली. परंतु मला मात्र नियतीने परदेशात नेऊन माझी बोलती बंद करून टाकल्यासारखे वाटले. कफल्लक झाल्यासारखे नाईलाजाने बॅगेविना आम्ही विमानतळावरून बाहेर पडलो.


मेड्रा इंक कंपनीने 'कॅसा दी कँम्पो' (Casa De Campo) नावाच्या विश्रामधाममध्ये (हॉटेलमध्ये) आमची रहाण्याची सोय केली होती. ते विश्रामधाम विमानतळापासून ५० किलोमीटरवर होते. आम्हाला विमानतळावरून आणण्यासाठी मेड्रा इन्क कंपनीने टॅक्सी आरक्षित केली होती. बॅग शोधण्यात वेळ गेल्याने आम्ही दोघे विमानतळावरून उशीरा बाहेर पडलो. तोपर्यंत बाकीचे सर्व प्रवासी तिथे उपलब्ध असलेल्या टॅक्सीने निघून गेले होते. आमच्यासाठी आरक्षित असलेल्या टॅक्सीचालकाने बहुधा आमची वाट पाहून तो दुसऱ्या प्रवाशांना घेऊन निघून गेला असावा. कारण आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा तिथे एक सुद्धा टॅक्सी नव्हती. मी आणि संतोष फक्त दोघेच विमानतळाच्या बाहेर उभे होतो. तिथे सकाळचे सहा वाजले होते परंतु बाहेर सर्वत्र अंधार होता. अंधार तर माझ्या मनात सुद्धा दाटून आला होता. खरोखरच आम्ही आकाशातून टपकलो होतो व आता इथे वाळंवटी परिस्थितीत अनिश्चिततेच्या खजूराच्या झाडावर लटकलो होतो. संकटांची मालिका काही संपतच नव्हती. अक्षरश: तोंडचे पाणी पळाले होते. आता संतोषला पाठीवर घेऊन मी ५० किलोमीटर चालत जावे अशी नियतीची योजना आहे की काय असे मन उद्विग्न करणारे विचार सुद्धा येऊन गेले. मला काय करायचे सुचेना. मला संतोषला माझी अस्वस्थता दाखवूनही चालणार नव्हते. मग मी तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याला गाठले. त्यांना माझे विश्रामधाम (हॉटेल) व तिथपर्यंत घेऊन जाणारी टॅक्सी आरक्षित (बुक) असल्याचे सांगितले. तिकडे सर्व लोकं स्पॅनिश भाषेत बोलायचे. त्यांना इंग्रजी नीट येत नव्हते. तेवढ्यात एक टॅक्सीचालक आमच्या समोर भली मोठी टॅक्सी घेऊन उभा राहीला. ''तुमची ठरवलेली आरक्षित टॅक्सी आली नाही, तेव्हा तुम्ही या टॅक्सीने जा. हा टॅक्सीचालक तुम्हाला तुमच्या मुक्कामी (हॉटेलपर्यंत) पोहचवेल'' असे तो पोलीस अधिकारी म्हणाला. तो टॅक्सीचालक दिसायला कमालीचा भयानक तसेच आडवातिडवा सहाफुट, काळाकुट्ट, गलेलठ्ठ होता. त्याला नुसते पाहूनच भीती वाटत होती. त्याने मुक्कामी (हॉटेलपर्यंत) जाण्यासाठी १०० डॉलर सांगितले. माझ्याकडे पर्याय नसल्याने आम्ही त्या टॅक्सीत बसलो. आता हा वाल्याकोळी आपल्याला मुक्कामी पोहचवतो की नीजधामी पोहचवतो की आधीच बॅगेवीना कफल्लक झालेल्या आपली वाटेतच वाटमारी करतो हा चिंताजनक विचार एकादा मनात येऊन गेला. खिशात असलेले तेथील स्थानिक पेस्सो चलन हाच काय तो आता शेवटचा भौतिक आधार शिल्लक राहीला होता. सकाळचा प्रहर होता. उजाडायला सुरुवात झाली होती. प्रवास एकाच सरळ रस्त्यावरून चालू होता. आजूबाजूला छोटी छोटी झाडे लावलेली दिसत होती. नुकताच तो रस्ता बनविला असणार असं वाटावे इतक्या सुस्थितीत तो दिसत होता. रस्ता निर्जनच होता कारण आजूबाजूला घरं नव्हतीच. त्या टॅक्सीचालकाला इंग्रजी येत नव्हते. आणि मला स्पॅनिश येत नव्हते त्यामुळे प्रवासाच्या दरम्यान आमचा काहीच संवाद झाला नाही. मी शांतपणे बाहेरचे दृश्य बघत होतो. आम्हाला मुक्कामी पोहचायला दिडतास लागला. टॅक्सीचालकाने आम्हाला नियोजित स्थळी (हॉटेलवर) आणून सोडले परंतु नियतीने मात्र बॅगेवीना आम्हाला अजूनही अनिश्चितेच्या झाडावर लटकवून ठेवले होते....

3 comments:

  1. संकटांची मालिका आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न!! अक्षरशः सिनेमा बघितल्यासारखं वाटतंय!!

    ReplyDelete
  2. पै सरांनी सिनेमा प्रत्यक्ष भोगाला आहे.

    ReplyDelete
  3. एवढ्या हतबलतेचा सामना करायला लागल्यावर धैर्य खचून न देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना नाही जमत ते. तुम्हा पिता-पुत्राकडे जबरदस्त आठवणींचा ठेवा आहे.

    ReplyDelete