'Every cloud has a silver lining' म्हणजे प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कडा असते अशी इंग्रजीत म्हण आहे. प्रत्येक दुःखाला किंवा वाईट गोष्टीला एक चांगली बाजू असते हा त्याचा मतितार्थ. परंतु कधी कधी दुःखाला चांगल्या बाजूने वेढले आहे की चांगल्या बाजूला दुःखाने वेढले आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सुद्धा उद्-भवते. दुःख निवारण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आनंद देऊ शकतील अश्या अनेक गोष्टी जेव्हा आपल्या वाट्याला येतात तेव्हा सुख व दुःख यांची बेमालूमपणे सरमिसळ नियतीने करून टाकली आहे याची जाणीव होते. सुखाने माजू नये व दुःखाने कोसळू नये हाच संदेश त्यातून नियती आपल्याला देत असते. मी सुद्धा तोच संदेश देणारी संमिश्र मनस्थिती अनुभवत होतो.
डोंबिवलीत असताना दिवसभर इतकी धावपळ व्हायची की दिवस कसा जायचा तेच कळत नसे. दिवसाचे अठरा तास, आठवड्याचे आठही दिवस व वर्षाचे बारा महिने फक्त काम आणि काम असे. मी, माझे कुटुंब व माझे वाचनालय याऐवजी वेगळा विचार करायला काही वावच नसे. कधी सुट्टी काढून फिरायला जायचा विचार सुद्धा मी करीत नसे. कौटुंबिक, सामाजिक जवाबदारी लक्षात घेऊन अपवादात्मक प्रसंगी जबरदस्तीने सुट्टी घेऊन वेळ काढावा लागत असे. आता मात्र दूर देशातील कॅसा दि कँम्पो या एका विश्रामधामच्या खोलीत काहीच धावपळ नसल्याने कोंडून ठेवल्यासारखे वाटत होते. बाहेर कोणीच ओळखीचे नव्हते. माझी भाषा तेथील लोकांना येत नव्हती व त्यांची भाषा मला समजत नव्हती. खोलीत एक मोठा दुरदर्शनसंच (टिव्ही) होता परंतु त्यावर मला पाहिजे ते काहीच दिसत नव्हते. एक बरं झाले त्यावर कार्टून आणि डिस्कव्हरी वाहीन्या दिसत होत्या. त्यामुळे संतोषचा थोडाफार वेळ चांगला जात होता. मी काही आराम किंवा मजा करण्यासाठी तिथे गेलो नव्हतो. संतोषच्या उपचारासाठी एवढ्या लांब दूर देशात आपण आलो आहोत याची मला पुर्णपणे जाणीव होती. दुःखं मनाला डंख मारत असताना अनेक सुखं समोर हात जोडून उभी होती. माझी संमिश्र मनस्थिती झाली होती.
पुढचे दोन दिवस आम्ही दोघांनी मजा व आराम करण्यात घालवले. सकाळी मी लवकर उठायचो. काहीच काम नसल्याने रात्री लवकर झोपायचो. परिणामतः सकाळी लवकर जाग यायची. स्नानगृहामध्ये पाणकुंड (टब) होते. त्यामध्ये गरम पाणी सोडायचो. अर्धा तास त्यात निवांत डुंबून राहायचो. आठच्या सुमारास संतोष उठायचा. तो उठला की चहा बनवायचो. तिकडे पाणी खूप महाग मिळायचे. त्यामुळे साफसफाई करणारे कर्मचारी आले की त्यांच्याकडून भरपुर बर्फ घेऊन ठेवायचो. बर्फ वितळून तयार केलेले पाणी चहा बनवण्याच्या यंत्रामध्ये भरायला लागायचे. दुधाची पावडर आणि चहा पुड्या (टी बॅग्ज्) होत्या. चहा तयार झाला की दोघे चहा प्यायचो. विमानतळावर हरवलेली बॅग अजून परत आलेली नव्हती त्यामुळे चहा बरोबर खायला काहीच नव्हते. सकाळी नऊ वाजता पाव व मख्खन (ब्रेड बटर) नाष्ट्यासाठी मागविला की तो अर्ध्या तासाने येत असे. खरतरं आम्हा दोघांना त्याचा कंटाळा आला होता. दुपारच्या जेवणासाठी त्या नाष्ट्यातील दोन तीन पाव बाजूला काढून ठेवायचो. दुपारचे जेवण संतोष मागवायचा. कमीतकमी किंमतीचे जेवण मागवण्याचे धोरण असायचे. दुपारी एकच्या सुमारास जेवण झाले की चार वाजेपर्यंत मी यथेच्छ वामकुक्षी काढायचो. संतोष कार्टुन, डिस्कव्हरी वगैरे वाहीन्यांवर त्याच्या आवडीचा कुठलातरी कार्यक्रम बघत बसायचा. संध्याकाळी पाच वाजता चहा पिऊन झाल्यावर मी फेरफटका मारण्यासाठी खोली बाहेर पडायचो.
आमच्या खोलीपासून थोड्याश्या अंतरावर एक संमेलनालय (क्लब हाऊस) होते. तिथे बरेच लोक जमायचे. ते सर्व लोक पेयपान (ड्रिंक्स) करून नाचत असत. तिथले संगीत निराळेच होते. मी एका मेजवर (टेबलवर) बसून त्यांच्या पदलालित्याचा पदविन्यास (डान्स) न्याहळत वेळ काढायचो. तिकडे खाणे पिणे महाग होते. मी फक्त एकदाच एक अपेयकुपी (बिअर कॅन) विकत घेतली होती. काही विकत घ्यायच्या आधी मला संतोषचा आणि पैश्यांचा विचार करणे भागच होते. ते एक ठिकाण सोडले तर मनोरंजन व्हावे असे जवळपास काहीच नव्हते. एक तास तिकडे घालवून परत खोलीवर यायचो. रात्रीच्या जेवणाची सोय झाली की मग थोडावेळ संतोष बरोबर मजामस्ती करायचो. आठ वाजता जेवण झाले की मग बरोबर नऊला ढाराढुर पंढरपूर म्हणजे गाढ झोपुन जाणे. अश्या पद्धतीने दुःखाची झालर असलेल्या सुखमय परिस्थितीत दोन दिवस घालवले.
मेड्रा इंक कंपनीकडून संपर्क (कॉल) केला जाणार होता. आम्ही त्यांच्या निरोपाची (कॉलची) प्रतीक्षा करीत होतो. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्याकडून दूरध्वनी (कॉल) आला. शनीवार, २ डिसेंबर २००६ रोजी सकाळी दहा वाजता आम्हाला घ्यायला ते गाडी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदल्या दिवशी शुक्रवारी थोडीशी भीती वाटत होती. उपचार पद्धत (ट्रीटमेंट) कशी असेल? त्याला किती वेळ लागेल? संतोषला त्रास तर होणार नाही ना? असे काही प्रश्न मनात थयथय करून काळजी व भिती निर्माण करीत होते. संतोष मात्र बिनधास्तपणे त्याच्याच भावविश्वात रमुन गेला होता. "उद्याचे उद्या बघू या. आता शांत झोपु या" असं सांगून तोच मला धीर देत होता. अखेर शनिवारचा दिवस उजाडला. दिनांक ३१ मे २००६ रोजी संतोषचा आजार समजल्यापासून ते आजपर्यंतच्या दिवसांची उजळणी मी मनामध्ये करीत होतो. आजपर्यंत सर्व ठीक झाले तसेच पुढे सुद्धा सर्व काही ठीक होईल असा स्वसमाधान करणारा विचार करून सकाळी साडेनऊ वाजताच संतोषला तयार केले व मी स्वतः सुद्धा तयार झालो. दोघांनी एकत्र चहा घेतला. त्यावेळी घरच्या चहाची आठवण येत होती. सुमनला दूरध्वनी करून आम्ही उपचारासाठी निघत असल्याचे कळविले. तिने मला महामृत्युंजय मंत्र जपायला सांगितले. सुमनशी बोलणे झाल्यावर आम्ही दोघे गाडीची वाट पाहू लागलो.
बरोबर दहा वाजता आमच्या खोलीबाहेर एक गाडी येऊन उभी राहिली. आधी संतोषला व्यवस्थित गाडीत बसवले व मग मी सुद्धा गाडीत बसलो. दोन दिवसांनी उपचारासाठी त्या खोलीतून एकत्र बाहेर पडताना वेगळेच वाटत होते. पाच मिनिटांत गाडी एका रुग्णालयापाशी पोहोचली. रूग्णालय तसं छोटेसे होते. तिथे बरेच लोकं आमच्यासारखे उपचार करून घेण्यासाठी आले होते. आम्हाला दुसऱ्या मजल्यावर जाण्यास सांगण्यात आले. उद्-वाहनाने (लिफ्टने) संतोषला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेलो. आमच्यासाठी एक खोली आरक्षित होती. खोलीतील पलंगावर संतोषला झोपण्यास सांगण्यात आले. काही वेळात त्याला सलाईन देण्यात आले. मी काळजीमुळे थोडासा घाबरलो होतो. पुढे काय होईल? असा विचार करीत होतो, इतक्यात एक नर्स एक इंजेक्शन घेऊन आली. तिने ते इंजेक्शन संतोषला दिलेल्या सलाईनमध्ये टोचले. संतोषचा हात हातात घेऊन मी त्याच्या बाजूलाच बसलो होतो. अजून एक तास तरी सलाईन चालू रहाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. काही वेळात डॉक्टर विलियम रडार तिथे आले. ते वयस्कर असले तरी देखणे व्यक्तीमत्व होते. ते मला समजेल अश्या सध्या सोप्या सुबोध इंग्रजीमध्ये बोलत होते. "जगातील सर्वात उत्तम उपचार (ट्रिटमेंट) आज तुला दिले जात आहेत. आम्ही ज्या मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) वापरतो ती उपचारपद्धती (टेक्नॉलॉजी) अजून कोणाकडेही उपलब्ध नाही. या उपचाराने खूप फरक पडेल. तुझे वडील तुझ्यावर खूप प्रेम करतात. अन्यथा इतके पैसे खर्च करून एवढे लांब दूरदेशी येणे सोपे नाही. तुझे वडील महान आहेत. तू नशीबवान आहेस तुला असा पिता मिळाला. तू लवकरच बरा होशील", असे डॉक्टर विल्यम रडार संतोषला म्हणाले. भारतातून उपचार घेण्यासाठी येणारे आम्ही पहिलेच होतो अशीही माहिती त्यांनी आम्हाला दिली. त्यांच्या अश्वासक बोलण्याने माझ्या मनाला खूप हुरूप आला व समाधान वाटले.
डॉक्टर विल्यम रडार यांनी मला त्यांच्या कार्यालयात (केबिनमध्ये) बोलावले. रूग्णालयाच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय होते. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा ते समोरच्या खुर्चीवर बसले होते. त्यांनी माझे सुहास्यवदने स्वागत केले. तुम्ही खूप मोठी कामगिरी बजावली आहे. संतोषला मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा जो आजार आहे त्याला जगात कुठेही औषध नाही. सध्या तरी मुलभूत पेशींचा (स्टेम सेल्स) उपचार हा एकच पर्याय उपलब्ध आहे. ही उपचारपद्धती खूप महाग आहे. या विषयावर जगभर जोरात संशोधन सुरू आहे. आम्ही सुद्धा संशोधन करीत आहोत. या उपचारपद्धतीमध्ये आम्ही ज्या निर्णायक मुलभूत पेशी (Fetal Stem Cells) वापरतो त्या जगात अजून कुठेही उपलब्ध नाहीत. आज संतोषला दहा मिलीलीटर त्या निर्णायक मुलभूत पेशी दिल्या आहेत. त्याचा जो आजार आहे तो संपुर्ण शरीरात असल्याने डोक्यापासून पायापर्यंत त्याला बरं होण्यास वेळ लागेल. कदाचित अजून चार पाच वेळा त्याला इथे घेऊन यावे लागेल" असं डॉक्टरांनी मला सविस्तर समजावून सांगितले. मी त्यांना एकच प्रश्न विचारला,"तो पुर्वीसारखाच व्यवस्थित चालेल ना?" "हे पहिलेच प्रकरण (केस) आहे. आपल्याला थोडे दिवस वाट पाहायला लागेल", असे त्यांनी उत्तर दिले. माझ्या डोळ्यात पाणी आले. डॉक्टर माझ्याजवळ आले त्यांनी मला घट्ट धरले. "देवावर विश्वास ठेवा. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप काही केले आहे. एक खंबीर बाप त्याच्या बरोबर असताना तो नक्कीच लवकर बरा होईल. देवावर विश्वास ठेवा. परमेश्वर सर्वशक्तिमान आहे", असं बोलून त्यांनी माझे सांत्वन केले. दुःखाला सुखाची की सुखाला दुःखाची झालर जोडली आहे हेच मला समजत नव्हते. संमिश्र मनस्थितीतच मी डोळे पुसले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. संतोषकडे गेलो. एका तासात त्याच्यावरील उपचार (ट्रीटमेंट) संपले. आम्ही दोघे तिथून निघालो व काही वेळातच परत आमच्या खोलीवर पोहचलो.
आम्ही जसे खोलीवर पोहोचलो दूरध्वनीची घंटी वाजली. मी दूरध्वनी घेतला. आमची हरवलेली बॅग कॅसा दि कँम्पोला आल्याचे समजले. काही वेळातच तिथल्या कर्मचार्यांनी आमची बॅग आणून दिली. बॅग उघडली. तब्बल चार दिवसांनी कपडे, खाण्याचे जिन्नस बघून मी आणि संतोष खूपच खुश झालो. मॅग्गी, चकल्या, चितळेची बाकरवडी, मारी बिस्कीटे, संतोषसाठी क्रीम बिस्कीटे, दोघांचे कपडे बघून खुपच आनंद झाला. रोज रोज नाष्ट्यामध्ये पाव मख्खन खाऊन तोंडाची चवच पळून गेली होती. दिनांक ४ डिसेंबर २००६ रोजी डोमिनिकन रिपब्लिक या देशातून आमचे परतीचे तिकीट होते. आता पुढचे दोन दिवस मजेत जाणार होते. एवढे दिवस अनेक समस्यांना तोंड देत एवढ्या लांब एका अपरिचित देशात येताना खूप पैसे खर्च करून शेवटी संतोषवर उपचार केल्याचे एक अभूतपूर्व समाधान माझ्या मनाला लाभले होते. आमच्या प्रारब्धात जे काही लिहीले आहे तेच पुढे होणार असले तरी मी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती याचे मला खूप समाधान वाटत होते. संमिश्र मनस्थिती आता राहिली नव्हती. काळ्या ढगाची रूपेरी कडा आता एवढी विस्तृत झाली होती की संपूर्ण ढगंच रूपेरी वाटू लागला होता...
काळ्या ढगाला सोनेरी किनार हे शब्द खरे करणारे तुमचे अनुभव वाचताना खूप छान वाटलं.
ReplyDeleteसोनेरी नव्हे रूपेरी कडा...
Deleteछान वाटलं वाचून.
ReplyDeleteखूप कठोर परिस्थिती, पण निकराचा लढा 💐🙏🏻👍👍
ReplyDelete