बाण मारीत असताना जेव्हा अर्जुनाला द्रोणाचार्यांनी विचारले की "तुला आत्ता काय दिसत आहे?" त्यावर अर्जुन म्हणाला होता की "गुरूवर्य मला तुम्ही सांगितलेले फक्त आणि फक्त लक्ष्य दिसत आहे. बाकी अन्य काही दिसत नाही." जेव्हा माणसाचे मन ठरलेल्या लक्ष्यावर पुर्णपणे केंद्रीत होते तेव्हा त्या लक्ष्याच्या आड येणारे सर्व अडथळे कसे पार करायचे याची शक्ती, बुद्धी त्याला प्रयत्नातून प्राप्त होत असते. लक्ष्य गाठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा जिद्दी स्वभाव असल्यास लक्ष्याच्या मार्गातील अडथळे अधिक वेगाने दूर करणार्या घटना सुद्धा घडून येत असतात. संकटांची मालिका संपत नसली तरी माझे लक्ष्यावर केंद्रीत झालेले मन व माझा जिद्दी स्वभाव यामुळे मला सुद्धा मार्ग सापडत गेला व त्याचा अनुभव यावेळी मी घेत होतो.
माझे लक्ष फक्त आणि फक्त संतोषच्या आजारावर केंद्रित झाले होते. मी त्याला जन्माला घातले असल्याने त्याला बरं करणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजत होतो. माझ्याकडून जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न करायची तयारी मी केली होती. लहानपणापासूनच मी जिद्दी होतो. एखादी गोष्ट माझ्या मनात आली की मग ती करायचीच असे माझे स्वभाववैशिष्ठ्य होते. जिद्दीपणाचे उदाहरण म्हणून एक छोटीशी आठवण परत एकदा सांगावीशी वाटते. लहानपणी कुंदापूरला जेव्हा मी चौथीत होतो तेव्हा फणसाच्या झाडावरून फणसे काढायला आम्ही नारायण नावाच्या एका व्यक्तीला बोलवायचो. एकदा झाडावरचे सर्व फणस त्या नारायणने काढले. परंतु फांदीच्या टोकाशी असलेला एक फणस त्याने काढला नव्हता. फांदी टोकापाशी निमुळती होत गेल्याने ती तुटण्याची शक्यता होती. ते लक्षात घेऊन बहुधा त्याने तो फणस काढला नसावा. माझी बरोबर त्याच फणसावर नजर खिळली होती. तो फणस सोडून दिल्याची चुटपुट माझ्या मनाला लागली होती. तो फणस काढायचाच असं मी पक्के ठरवले. एके दिवशी दुपारी सर्वजण झोपलेले असताना झाडावर चढून तो फणस मी तोडलाच व त्याचवेळी रंगेहाथ पकडलो गेलो. नंतर ताईच्या हातचा मी बेदम मार खल्ला तो भाग वेगळा. परंतु मी एकदा का ठरवले की परिणामांची चिंता न करीता ती गोष्ट जिद्दीने करायचो हे स्वभाववैशिष्ठ्य सांगण्यासाठी हा स्मृतीप्रपंच केला. संतोषच्या बाबतीत हाच जिद्दीपणा परत एकदा कार्यरत झाला होता. इथे तर संतोषच्या अस्तित्वाचा व भवितव्याचाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे एवढे अडथळे येऊन सुद्धा मी अजिबात डगमगलो नव्हतो की खचलो नव्हतो. उलट कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी मी दिवसेंदिवस अधिकच खंबीर बनत चाललो होतो.
डोमिनिकन रिपब्लिक या देशात आम्ही नियोजित स्थळी (हॉटेलवर) पोहचेपर्यंत दिवस उजाडला होता. तिकडे सकाळचे सात वाजले होते. ज्या टॅक्सीचालकाच्या अक्राळविक्राळ दिसण्याची मला भीती वाटत होती, त्या टॅक्सीचालकाने आम्हाला मुक्कामी (हॉटेलवर) व्यवस्थित व सुखरूप आणून सोडले. जिथे भिती वाटत होती तिथे काहीच विपरित घडत नव्हेत व जिथे निश्चिंत होतो तिथे अचानक काहीतरी धक्कादायक घटना घडवून नियती आम्हाला हुलकावणीचे मनःस्ताप देत होती. त्या टॅक्सीचालकाचे पैसे चुकते करून मी त्याचे आभार सुद्धा मानले. तो दिसायला कसाही असला तरी मनाने खूप चांगला होता असं त्याच्या देहबोलीतून व कृतीतून लक्षात येत होते. हातात असलेली छोटीशी बॅग व संतोषला घेऊन कॅसा दि कँम्पो या विश्रामधामाच्या (हॉटेलच्या) स्वागतकक्षात प्रवेश केला. आधी संतोषला समोर असलेल्या खुर्चीवर नीट बसवले. मग मी प्रवेशकक्षाकडे (कौऊंटरवर) गेलो. माझे नाव-गांव सांगून मी भारतातून मुलाच्या उपचारासाठी आलो असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी संगणकावर माझे नावं टाकून पाहिले. "माफ करा, तुमच्या नावाने कोणतीही खोली (रूम) आरक्षित (बुक) करण्यात आलेली नाही", असं मेजवरील कर्मचारी म्हणाला. जिथे मी निश्चिन्त होतो तिथे नियतीने परत फासे फेकून मला गोत्यात आणले होते. आमच्या दोघांच्या नावांची नोंद त्यांना सापडली नव्हती. आता हे काय नवीन संकट? काय चाललयं काय? एवढी मोठमोठी आव्हानं झेलून व अनेक अडथळ्यांना न जुमानता इथपर्यंत आलो आणि आता ही नवी समस्या जीव जाळायला समोर उभी राहीली होती. तिथे बाहेर बसून तरी किती वेळ काढणार? मी एकटा असतो तर गोष्ट वेगळी होती. परंतु माझ्याबरोबर संतोष होता व त्याला कसे सांभाळायचे हाच तर मुख्य प्रश्न होता. मग पुन्हा एकदा त्यांना सर्व कागदपत्रे दाखवली. डॉक्टरांनी पाठवलेलं पत्र दाखवले. त्यांनी सुद्धा ती सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक पडताळून पहिली व शेवटी हात वर करीत 'आम्हाला काहीच करता येणार नाही, तुम्हाला खोली देता येणार नाही' हेच वाक्य परत एकदा विनम्र माफीसह ऐकविले. एकतर प्रवासातून दमून आलो होतो. त्यात भर म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी वाजवलेल्या नकारघंटेने अक्षरशः डोके फिरवले होते. परंतु आपले काम करूनच जायचे अशी जिद्द ठेवून मी इथपर्यंत आलो असल्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा यावर विचार करू लागलो.
असहाय्यपणे संतोषच्या बाजूला जाऊन बसलो. संतोषला सांगितले की 'आपल्या नावावर खोली आरक्षित झालेली नाही असं ते म्हणत आहेत'. अर्थात तो बिचारा यावर काय बोलणार? 'किस्मत की हवा कभी नरम, तो कभी गरम गरम, ओ पिताजी' असंच तो बहुधा मनात म्हणाला असेल. खरंतर त्याला पण काहीच सुचत नव्हते. आता काय करायचे? तिकडे आपल्या भारतासारखी परिस्थिती नव्हती. इथे अगोदरच खोली आरक्षित करायला लागते. सर्व चूक मेड्रा इंक कंपनीची होती. एक तास आम्ही तिथेच बसून विचार करीत होतो. काय करायचे तेच कळत नव्हते. मेड्रा इंक कंपनीत दूरध्वनी (फोन) करायचा विचार मनात वारंवार येत होता परंतु त्यांचे कार्यालय (ऑफिस) अजून उघडलेले नसणार हे घड्याळाकडे पाहिल्यावर लक्षात येत होते. मी परत एकदा तेथील कर्मचाऱ्याजवळ गेलो थेट डॉक्टर विल्यम रडार यांना दूरध्वनी करण्याची विनंती केली. त्यांनी डॉक्टरांना दूरध्वनी केला. मग मी थेट डॉक्टरांशी बोललो. "आम्ही इथे कॅसा दी कँम्पो या विश्रामधामावर (हॉटेलवर) पोहचलो आहोत पण आमच्या नावाने खोली आरक्षित नाही असं आम्हाला सांगण्यात येत आहे. आम्ही दोघेजण इथे बाहेर बसून असहाय्यपणे प्रतिक्षा करीत आहोत." डॉक्टरांनी मला तेथील कर्मचाऱ्याकडे दूरध्वनीसंच (फोन) द्यायला सांगितला. काही वेळ त्यांचे आपआपसात बोलणे झाले. मग त्या कर्मचाऱ्याने दूरध्वनीसंच खाली ठेवला. लगेच त्यांनी माझ्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या व माझ्या नावावर एक खोली आरक्षित केली. त्याचबरोबर पाच दिवसांचे पैसे सुद्धा आगाऊ भरायला सांगितले. मी बरोबर आणलेले उधारपत्र (क्रेडिट कार्ड) त्यांना दिले. त्याने देयक (बिल) बनवले व त्यावर माझी सही घेतली. तेथील सहाय्यकाला बोलावून आम्हा दोघांना खोलीवर घेऊन जायला त्याला सांगितले.
एक कर्मचारी छोटसे विद्युत वाहन (इलेक्ट्रिक गाडी) घेऊन आला. रिक्षा सारखी ती विद्युतगाडी होती. आम्ही दोघे मागे बसलो. आमची खोली या स्वागतकक्षापासून खूप लांब होती. विद्युतगाडीने खोलीवर पोहोचण्यास दोन ते तीन मिनिटे लागली. कॅसा दि कँम्पो हे विश्रामधाम (हॉटेल) म्हणजे छोटी छोटी शंभरहून अधिक कौलारू घरे असलेला परिसर होता. हा परिसर खूप विस्तीर्ण होता. बाहेर एक सुद्धा माणुस फिरताना दिसत नव्हता. प्रत्येक कौलारू घरासमोर छोटे छोटे बगीचे होते. कुठेच कचरा दिसत नव्हता. संपुर्ण परिसर स्वच्छ आणि हिरवागार दिसत होता. समान अंतरावर छोटी छोटी घरे व त्यांच्यामध्ये नारळाची झाडे लावलेली दिसत होती. प्रत्येक घरासमोरील छोट्याश्या बगीच्यात निरनिराळ्या रंगांच्या फुलांची झाडे लावलेली होती. मधल्या अंगणात असलेले हिरवगार गवत दिसायला खूप सुंदर दिसत होते. हा सर्व परिसर पांढऱ्या रंगांची वाळू व लाल मातीचा दिसत होता. एकंदरीत तिकडचा नीटनेटकेपणा बघतच रहावा असा होता. काही मिनिटांच्या विद्युतगाडीतील प्रवासानंतर आमचे घर म्हणजे खोली आली. त्या चालकाने माझ्याकडे खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी एक चौरसपट्टी (कार्ड) दिली. ती चौरसपट्टी (कार्ड) दाराच्या खाचेत ठेवली. मग दाराची मुठ (हँडल) फिरवून दार उघडले. आम्ही आत जाताच विद्युतगाडीचा तो चालक गाडीसह निघून गेला.
आम्ही दार उघडून घरात गेलो. छोटीशी खोली होती पण अतिशय सुंदर व नीटनेटकी होती. एक छानसा पलंग, दोन मोठ्या खुर्च्या, आतमध्ये स्नानगृह, त्याच्या बाजूला छोटासा सज्जा (बाल्कनी), सज्ज्याबाहेर छोटी छोटी झाडे लावलेली दिसत होती. सज्जेतून बाहेरच्या गोल्फ मैदानाचे दृश्य खूपच छान दिसत होते. संतोषला पलंगावर व्यवस्थित बसवून मी आतमध्ये गेलो. कपड्यांची बॅग हरवल्यामुळे कपडे बदलता येत नव्हते. स्नानगृहाच्या बाजूला रात्री परिधान करण्यासाठी पांढर्या रंगाचा एक गणवेश (ड्रेस) लटकवलेला दिसत होता. बॅग येईपर्यंत आता हाच गणवेश वापरावा लागणार असं दिसत होते. खोलीतील आंतरजोडणी वरून (इंटरकॉमवरून) आधी सकाळचा नाष्टा मागविला. काही पाव आणि बटर मागविले. सुमनला दूरध्वनी लावला व फक्त आम्ही सुखरूप पोहोचल्याचा झटपट निरोप दिला. मला दूरध्वनीच्या देयकाची (बिलाची) काळजी वाटत होती. सुमन सुद्धा दूरध्वनीचीच वाट पाहत होती. थोडक्यात ख्यालीखुशाली कळवून दूरध्वनीसंच ठेवून दिला.
थोड्यावेळात कोणीतरी दरवाजा वाजवल्याचा आवाज आला. दार उघडले तर एक कर्मचारी समोर नाष्टा घेऊन उभा होता. त्याच्याकडून नाष्ट्याची थाळी (ट्रे) घेऊन दरवाजा बंद केला. मी आणि संतोषने नाष्टा उरकला. मला संतोषच्या उपचाराचा दिनांक, वेळ आणि ठिकाण यांची माहिती करून घ्यायची होती. मग मेड्रा इंक कंपनीत दूरध्वनी केला. त्यांना आम्ही आल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार आम्ही एक दिवस आधीच पोहोचलो होतो. अमेरिका खंड आपल्या भारतीय तारखेच्या एक दिवस मागे असतो. आम्ही एक दिवस आधीच पोहोचल्यामुळे त्यांच्याकडून टॅक्सी आणि खोली (हॉटेल बुकिंग) आरक्षित करण्याची तारीख चुकली होती. जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मला हा सर्व गोंधळ कळला. सर्व गोंधळ तारखेवरून झाला होता. दिनांक २ डिसेंबर २००६ रोजी म्हणजे शनीवारी इथल्या रुग्णालयात संतोषवर उपचार होणार होते. त्यासाठी त्यांनी गाडी पाठविण्याचे व विश्रामधाम (हॉटेल) आरक्षित करण्याचे कबुल केले होते. त्यामुळे मी निश्चिन्त होतो. आम्ही ३० नोव्हेंबरला मुक्कामी (हॉटेलवर) पोहोचलो होतो. संतोषवर उपचार शनिवार, दिनांक २ डिसेंबर २००६ रोजी होणार होते. अजून दोन दिवस त्यासाठी वाट पाहायला लागणार होती. किस्मत की हवा दोन दिवस कशी नरम गरम रहाते ते आता पहायचे होते....
क्या बात है। तुम्ही तिथं पोचून रुम मिळवलीत. तुमची जिद्द चिकाटी कमालीची कौतुकास्पद आहे.
ReplyDeleteगोंधळात गोंधळ रे बाबा !!
ReplyDelete