Friday, December 25, 2020

संतोषवर विदेशात उपचार झाल्यावर परत भारतात आगमन...

"तुझ्या-माझ्या संसाराला आणि काय हवं?

तुझ्या-माझ्या लेकराला घरकुल नवं,

नव्या घरामंदी काय नविन घडंल?

घरकुला संग समदं येगळं होईल, 

दिस जातील, दिस येतील, 

भोग सरंल, सुख येईल", या आशेवर जगातील यच्चयावत संसारी जीवात्मे दुःखाशी संघर्ष करीत व स्वप्नं रंगवीत संसाराचे रहाटगाडे ओढत असतात. सर्व दुःख भोग आपोआप संपत नसतात. काही दुःख भोगांवर अथक प्रयत्न केल्यावर मात करता येते. दुःख सरेल की नाही हा परिणाम आपल्या हातात नसला तरी कर्तव्यपुर्तीचे समाधान त्या अथक प्रयत्नातून नक्कीच लाभते. संतोषवर उपचार केल्यावर पितृकर्तव्याची पुर्तता केल्याचे समाधान मला मिळाले असले तरी ते करीत असताना झालेले समाजऋण फेडणे अजून बाकी होते. आता त्याची पुर्तता करण्याची मी तयारी करू लागलो होतो.


डोमिनिकन रिपब्लिक देशात कधी एकदा पोहोचतो व संतोषवर उपचार करवून घेतो असं मुंबईहून निघण्यापूर्वी सारखं वाटायचे. शनिवार, दिनांक २ डिसेंबर २००६ रोजी संतोषवर मुलभूत पेशींचा (स्टेम सेल्सचा) उपचार झाल्यावर त्याला रुग्णालयातून जेव्हा परत खोलीवर मी घेऊन आलो तेव्हा मला माझ्या मनावरचा खूप मोठा ताण कमी झाल्यासारखे वाटले. त्याच दिवशी संध्याकाळी सुमनला दूरध्वनी करून सविस्तर माहिती दिली. ती सुद्धा माझ्या दूरध्वनीची वाट पाहत होती. तिला हरवलेली बॅग मिळल्याचेही सांगितले. संतोष बरोबर सुद्धा तीचे बोलणं झाले. दूरध्वनीवरून संतोषचा आवाज ऐकताना तिच्या काळजाचे अक्षरशः पाणी पाणी झाले. संतोषशी बोलल्यावर तिला खूप बरं वाटले. आमच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे तिने सांगितले. दिनांक ४ डिसेंबर रोजी आमचे परतीचे तिकीट असल्याने अजून दोन दिवस आम्हाला तिथेच कॅसा दि कँम्पो या विश्रामधाममध्येच राहायला लागणार होते. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आम्ही दोघांनी मजेत घालवले. उपचाराआधीचे दिवस आणि आताचे दिवस यामध्ये खूप फरक जाणवत होता. उपचार होण्यापुर्वी मनावर पडलेला ताण आता कमी झाल्याने नंतरचे दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही.


सोमवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी आमचे परतीचे विमान होते. काहीच काम नसल्याने बॅगेतील सर्व खाद्यपदार्थ आम्ही दोघांनी दोन दिवसात संपवून टाकले होते. वेळ घालवण्यासाठी आम्ही दोघे अधून मधून पत्ते सुद्धा खेळायचो. सोमवारी निघायच्या दिवशी सकाळचा नाष्टा केल्यावर अकरा वाजता आम्ही विमानतळावर जाण्यासाठी गाडी मागवली. सुमारे एक वाजता आम्ही डोमेनिकन रिपब्लिकच्या सॅन्टो डोमिंगो या विमानतळावर पोहोचलो. भारतातून फ्रँकफर्टमार्गे जेव्हा इथे पोहचलो होतो तेव्हा सर्वत्र अंधार होता, त्यामुळे विमानतळ व तिथला परिसर नीट पाहता आला नव्हता. आता परत त्याच विमानतळावर भरदिवसा पोहचत होतो. दिवसाच्या प्रकाशात विमानतळ खूप छान दिसत होते. विमानतळ छोटं असले तरी स्वच्छ आणि सुंदर होते. प्रवाश्यांची वर्दळ खूपच कमी होती. दिवसातून मोजकीच विमान उड्डाणे तिथून होत असल्याने फारशी वर्दळ नसावी. आम्ही एक तास आधीच पोहोचलो होतो. आमचे विमान वेळेवर निघाले. संतोषला ज्या उपचारासाठी आणले होते ते सोपस्कार पार पाडल्यामुळे प्रवास करताना एक वेगळीच आनंदानुभूती होत होती.


दिनांक ४ डिसेंबर रोजी डोमिनिकन रिपब्लिक देशातून निघालो व ५ डिसेंबरला फ्रँकफर्ट विमानतळावर पोहोचलो. यावेळी फ्रँकफर्ट विमानतळावर आम्हाला फक्त सहा तास घालवायचे होते. आधीचा अनुभव असल्याने फ्रँकफर्ट विमानतळ परिचयाचे झाले होते. आम्ही दोघे खूप हिंडलो फिरलो. माझ्या बरोबर संतोषने सुद्धा तिथल्या मुशाफिरीचा आनंद लुटला. दिनांक ५ डिसेंबर रोजी फ्रँकफर्टवरून निघून बुधवारी ६ डिसेंबरला संध्याकाळी सुमारे ५ वाजता आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचलो. घरी पोहोचेपर्यंत आठ वाजले होते. सुमनला आम्ही येत असल्याचे अगोदरच कळवले होते. तिने गरम गरम चहा बनवून तयार ठेवला होता. चहा बरोबर आठ दहा मारी बिस्कीटे संपवली. थोड्याच वेळात सुमनने निरडोसा बनवून दिला. बर्‍याच दिवसांनी सुमनच्या हातचा नीरडोसा खायला मिळत होता. बाह्या सरसावून त्यावर तुटून पडलो. मी एकट्याने किमान आठदहा निरडोसे संपवले असतील. संतोषचा स्कोअर माहित नाही. इथे बाप से बेटा सवाई असू शकतो. तो अगोदरच वजनदार गटात सामील झाला होता. आपला नवरा व मुलगा आज बकासुर व भस्मासुर का झाले आहेत हे सुमनने ओळखले होते. तोंड बंद ठेऊन ती गुमान निरडोसे बनवत गेली व आमची तोंडे बंद करीत राहीली. गेले आठ दिवस नुसते पाव आणि मख्खन (बटर) खाऊन जीव पार मेटकुटीला आला होता. दुष्काळग्रस्त भागातून आल्यासारखा आत्मा बुभुक्षित झाला होता. सुमनच्या हातचा नीरडोसा पाहिल्यावर आत्मा बेभान झाला. बर्‍याच दिवसांनी घरचा नीरडोसा मनसोक्त खायला मिळाल्यामुळे क्षुधाशांती, आत्मशांती म्हणजे काय असते त्याची प्रत्यक्ष अनुभूती मी घेत होतो. भरल्या पोटात आनंद थुईथुई नाचत होता. सुमनच्या हातचे नीरडोसे खाताना मला ब्रह्मांनंदी टाळी लागली होती. 


लगेच दुसऱ्याच दिवसापासून वाचनालयाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. संतोषच्या उपचारासाठी मी बाहेरच्या देशात जाऊन आल्याचे काही जणांना समजले होते. काही लोकं मला भेटायला वाचनालयात येत असत. संतोषच्या तब्येतीची विचारपूस करीत असत. आता माझे एकच लक्ष्य होते व ते म्हणजे लोकांकडून उपचारासाठी घेतलेले पैसे परत करणे. समाजऋण फेडून कर्तव्यपुर्ती करणे आवश्यक होते. जर संतोषच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली असती तर सर्वांनी माझे कौतुक केले असते. परंतु समजा जर प्रकृतीत काही फरकच पडला नसता तर लोकांकडून मला खूप काही ऐकायला लागले असते. त्यामुळे सर्वांचे पैसे परत करायचे ठरविले. फक्त वाचनालयाच्या उत्पन्नातून एवढे पैसे परत करणे कठीणच होते. एका महिन्यात सर्वांचे पैसे परत करायचे ठरवले व ते सुद्धा वाचनालयाकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता. संतोषच्या उपचारामुळे माझे वाचनालयाकडे दुर्लक्ष झाले होते. अजय, मामा आणि गोडबोले उत्तमरीत्या वाचनालयाचा कारभार संभाळत होते. परंतु माझी निर्णायक उपस्थिती सुद्धा गरजेची होती.


लोकांकडून घेतलेले केवळ एक दोन लाख रूपये नव्हे तर तब्बल १६ लाख रुपये मला परत करायचे होते. सर्वांनी दिलेल्या धनादेशाच्या (चेकच्या) छायाप्रती (झेरॉक्स) मी काढून ठेवल्या होत्या. सुरुवातीला छोटछोट्या रक्कमांची उधारी संपवायचे ठरवले. घरात जेवढे दागिने होते ते सर्व बाहेर काढायचे ठरवले. सुमनने संकोच न करीता व कोणतेही आढेवेढे न घेता सर्व दागिने माझ्या स्वाधीन केले. आम्ही जास्त करून डोंबिवलीच्या पश्चिमेकडील शिरोडकर ज्वेलर्सकडून दागिने बनवून घेतले होते. सर्व दागिने त्यांच्याकडे परत केले. "एवढे दागिने का विकत आहात?" असा प्रश्न त्यांनी विचारला. उपचारासाठी घेतलेले पैसे परत करायचे आहेत असे सांगितल्यावर त्यांनी ते दागिने विकत घेतले. त्यावेळी सोन्याचा भाव वधारलेला असल्यामुळे मला त्यातून चांगली रक्कम मिळाली. ताबडतोब छोटछोट्या रक्कमांची लोकांची देणी फेडून टाकून त्यातून मोकळा झालो. मग मोठ्या रक्कमांची देणी फेडण्याच्या प्रयत्नाला लागलो. माझ्या आणि सुमनच्या नावाने काही विमा पॉलिसी होत्या. डोंबिवलीच्या औद्योगिक विभागात (एम.आय.डी.सी.) असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन आमच्या दोघांच्या सर्व विमा पॉलिसी तिथे जमा केल्या. त्यांचे पैसे मिळवायला काही काळ लागणार होता. तोपर्यंत माझ्याकडे जेवढे समभाग (शेअर्स) व एकसामायिक निधीपत्रं (म्युअचल फंड) होती ती सुद्धा विकायला काढली. परंतु हे सर्व पैसे माझ्या खात्यात जमा होण्यास जवळ जवळ एक ते दीड महिना लागणार होता. पैसे जमा होण्यास माझ्या अपेक्षापेक्षा अधिक उशीर होत असल्याने मी माझे राहते घर सुद्धा विकायला काढायचा विचार करू लागलो होतो. त्यासाठी जेव्हा मी इमारतीचे विकासक (बिल्डर) श्री. नंदू म्हात्रे यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला परत एकदा शांतपणे विचार करायला सांगितले. मग मी घर विकायचा विचार सोडून दिला. अर्थात हे सर्व मी सुमनला सांगूनच करीत होतो. प्रत्येकाची देणी तुकड्या तुकड्यात परत न करीता एका हप्त्यातच परत करून टाकायची असे आम्ही दोघांनी ठरवले होते.... 


मुलभूत पेशींच्या (स्टेम सेल्सच्या) उपचारानंतर संतोषमध्ये खूप फरक जाणवायला लागला होता. आधी खूप चिडचिड करणारा संतोष आता थोडा शांत झाला होता. आधी त्याची प्रकृती ज्या वेगाने खालावत चालली होती तो प्रकृती खालावण्याचा वेग आता खूप कमी झाल्याचे मला स्पष्टपणे दिसत होते. त्याला जास्त दिवस चालता येणार नाही, लवकरच तो अंथरूण पकडेल व त्याचे आयुष्य खूप कमी असेल असे वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले होते. जगात कुठेही या आजारावर अजूनपर्यंत तरी औषध नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले होते. असं असूनही गेले सहा महिने खूप धावपळ करून मुलभूत पेशींचा उपचार कुठे केला जातो याचा शोध घेतला होता व एवढ्या लांब परिचय नसलेल्या देशात जाऊन ते उपचार संतोषला दिल्याचे समाधान माझ्या मनाला होत होते. पुढे काय होईल हे माझ्या हातात नसले तरी मी माझे पितृकर्तव्य बजावले होते. समाजऋण फेडले होते. "दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल" या आशेवर जगणे एवढेच आता माझ्या हातात राहीले होते....

2 comments:

  1. समाजऋण फेडायची तुमची धडपड,तुमचा प्रामाणिकपणा
    खूप कौतुकास्पद आहे.

    ReplyDelete
  2. संतोषच्या तब्येतीतील सुधारणा पाहून जीव भांड्यात पडला.

    ReplyDelete