'हाथी निकल जाता है, मगर पुछ अडक जाता है।' म्हणजे अथक प्रयत्न केल्यावर महाकाय संपुर्ण हत्ती दाराच्या छोट्याश्या अरुंद फटीतून निघून जातो परंतु शेवटच्या क्षणी त्याची शेपटी मात्र त्या दाराच्या फटीत अडकून पडते. आपण करीत असलेले एखादे अवघड कार्य अथक प्रयत्नांच्या अनेक मोठमोठ्या दिव्यातून जात असताना शेवटच्या क्षणी मात्र एखादी छोटीशी गोष्ट हत्तीच्या शेपटीप्रमाणे अडकून पडते व आपल्या संपुर्ण कामाचा खोळंबा करते. त्यावेळी आपली मानसिकता अशी होते की 'पाटावरती धीर धरला परंतु ताटावरती धीर नाही.' म्हणजे खळखळून भूक लागलेली असताना अन्नपदार्थ जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत पाटावरती बसून धीर धरवतो परंतु तोच गरमागरम पदार्थ ताटात येऊन पडला की तो थंड होईस्तोवर मात्र पोटातील भूक धीर धरू देत नाही. अश्यावेळी संयम कमजोर ठरतो. अर्थात अश्या प्रसंगी संयम सुटला तरी सुद्धा शेवटपर्यंत आपण आपला खंबीरपणा सोडायचा नसतो व खंबीरपणाच्या जोरावरच संयम व परिस्थितीवर मात करायची असते हेच नियती आपल्याला शिकवत असते. आपल्या खंबीरपणाची परिक्षा नियती शेवटच्या क्षणापर्यंत घेत असते. माझ्यासाठी अशीच एक परिक्षा देणे अजून बाकी राहीले होते.
मंगळवार, दिनांक २८ डिसेंबर २००६ रोजी डोमेनिकन रिपब्लिक या देशात जाण्यासाठी विमानाचे तिकीट मी अगोदरच काढले होते. परंतु त्यासाठी आदल्या दिवसापर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत आवश्यक असलेला फ्रान्सचा संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा) मिळवण्यासाठी मला खूप धडपड करावी लागली होती. माझ्या व संतोषच्या या परदेश प्रवासाची सुमनने खूप आधीपासूनच तयारी केली होती. फ्रान्सचा संक्रमण परवाना मिळाल्यावर सर्व अडथळे दूर होऊन जाण्याचे निश्चित झाले. सोमवारी संध्याकाळी घरी आल्यावर प्रवासाला जाण्याच्या तयारीला लागलो. खाण्यापिण्याचे सामान, कपडे, माझी औषधे इत्यादी सर्वांची तजवीज केली. संतोषवर केल्या जाणाऱ्या मुलभूत पेंशीच्या उपचारपद्धतीबाबत डॉ. श्रीमती तारा नाईक आणि डॉ. योगेश आचार्य यांचा सल्ला मी घेतला होता. दुसरा कोणताही पर्यायी इलाज नसल्याने त्या दोघांनी मला मुलभूत पेंशीचा उपचार घेण्याची परवानगी दिली होती. बाकी इतर कोणालाही मी याबाबत काही विचारले नव्हते. सोमवारी रात्री प्रवासाची सर्व तयारी करून झोपलेलो असताना रात्री सुमारे एकच्या दरम्यान अमेरिकेतून मेड्रा इंक कंपनीचा दूरध्वनी आला. त्यांनी आमच्यासाठी विश्रामगृह आरक्षित (हॉटेल बुक) करून ठेवले होते. राहण्याचा व रुग्णालयाचा पत्ता ई-मेलद्वारे त्यांनी आम्हाला अगोदरच कळवला होता. आम्ही सुद्धा त्यांना आम्ही तिकडे येत असल्याचे कळवले. त्यांच्याशी बोलणे झाल्यावर मग परत शांतपणे झोपलो. मंगळवारी म्हणजे निघायच्याच दिवशी सकाळी घाटकोपरच्या कॉर्पोरेशन बँकेतून काही रक्कम युरो चलनामध्ये बदलून घ्यायची होती. त्यासाठी डोंबिवलीच्या कॉर्पोरेशन बँकेतून पत्र घेऊन गेलो. घाटकोपरच्या कॉर्पोरेशन बँकेत पत्र दाखवून त्यांच्याकडून युरो चलन घेऊन आलो. तिकडे खर्चासाठी युरो चलन लागणार होते. मग दुपारी घरी आल्यावर जेवण उरकून एक तासाची विश्रांती घेतली.
मंगळवारी ३.२५ वाजता आमचे विमान निघणार होते. संध्याकाळी वाचनालयात जाऊन सर्वांना आठ दिवस वाचनालय नीट सांभाळण्यास सांगितले. ''सर तुम्ही इथली चिंता करू नका. तुम्ही फक्त संतोषची व्यवस्थीत काळजी घ्या" असा सर्वांनी शब्दविश्वास दिला. मग सर्वांचा निरोप घेऊन घरी आलो. नऊ वाजता सुमन व संतोषबरोबर एकत्र जेवण केले. रात्री दहा वाजेपर्यंत निघण्यास तयार झालो. विमानतळावर जाण्यासाठी चारचाकी (कार) मागवली होती. आधी सर्व सामान गाडीत ठेवून आलो. निघण्याआधी सुमनबरोबर साश्रु नयनांनी घट्ट हृदयभेट घेतली. कसाबसा तिला निरोप दिला. आठ दिवस सुमनविना काढायचे होते. मग संतोषला दुसऱ्या मजल्यावरून हात पकडून व्यवस्थीत खाली न्यायला सुरुवात केली. खाली आल्यावर त्याला नेहमीप्रमाणे पुढे चालकाच्या बाजूला बसवले. मी मागे बसलो. सुमन निरोप देण्यासाठी खाली उतरली होती. गाडी सुरू झाली. सुमन हात हलवून निरोप देत होती. मी मागे वळून सुमनलाच पाहत होतो. आम्ही दोघेही एकमेकांना नीट पाहू शकत नव्हतो कारण तिच्या आणि माझ्या दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते. विमानतळावर पोहचेपर्यंत सुमनची आठवण येत होती.
विमानतळावर आतमध्ये प्रवेश करताच सामान एका जागेवर ठेवले व संतोषला त्याच जागेवर थांबायला सांगितले. अनुमतीपत्रासाठी (बोर्डिंग पाससाठी) मी समोरच्या मेजकक्षाजवळ (टेबलाजवळ) गेलो. माझ्यापुढे रांगेत आणखीन दोघेजण होते. त्यांच्या नंतर माझा क्रमांक होता. माझा क्रमांक येताच मी बरोबर आणलेले आमचे दोघांचे तिकीट व पारपत्र (पासपोर्ट) तेथील कर्मचाऱ्याला दाखवले. 'बरोबर असलेला दुसरा प्रवासी कुठे आहे?' असं त्या कर्मचाऱ्याने मला विचारले. मी समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या संतोषकडे बोट दाखवले. संतोष शांतपणे उभा होता. त्याला बघुन कोणालाही वाटत नव्हते की तो असाध्य व्याधीने ग्रस्त आहे. मी दिलेले तिकीट घेऊन तो कर्मचारी आतल्या दालनातील त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेला आणि काही वेळाने बाहेर आला. त्याने मला अनुमतीपत्र (बोर्डिंग पास) देण्यास चक्क नकार दिला. क्षणभरासाठी मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. हत्तीएवढे सर्व प्रयत्न करून इथपर्यंत येऊन पोहचलो. आता हे हत्तीचे शेपुट त्रास देत आहे. आता काय परत जायचे? छे, शक्यच नाही. माझी काय चूक आहे? असे असंख्य विचार मनात येऊन गेले. नियमानुसार सर्व कागदपत्रे माझ्याकडे होती. त्यांनी मला नकाराचे कारण सुद्धा सांगितले नव्हते. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायची माझी तयारी होती. मी माझ्या प्रयत्नांना सुरुवात केल्यावर त्या कर्मचाऱ्याने मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला सांगितले. मी आत जाऊन संबंधीत अधिकाऱ्याला भेटलो. मेड्रा इंक कंपनीकडून आलेले डॉक्टरांनी दिलेले अधिकृत पत्र, डोमिनिकन रिपब्लिकचे विदेशसंचारपत्र (व्हिसा), फ्रान्सचा संक्रमण परवाना (ट्रान्झिट व्हिसा), जाण्या-येण्याचे विमानाचे तिकीट, विदेशी चलनाचे पुरावे इत्यादी सर्वकाही दाखवले. तरीपण तो वरिष्ठ अधिकारी ऐकायला तयार नव्हता. शिवाय तो मला अनुमतीपत्र (बोर्डींग पास) का नाकारत आहे त्याचे कारणही सांगायला तयार नव्हता. मग माझा संयम सुटला. वीनाकारण मी पराभूत होत आहे असं मला वाटू लागले. ते मला मान्य नव्हते. मग मी खंबीरपणे भांडायला सुरुवात केली. एकीकडे मला संतोषची काळजी वाटत होती. तो एकटाच बाहेर उभा होता. माझा अंतरात्मा जळत होता परंतु त्यांना माझी समस्या समजत नव्हती. "विद्यमान घडीला संतोषच्या आजारावर मुलभूत पेशींच्या उपचाराशिवाय (स्टेमसेल्स शिवाय) दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. पैसे माझे, मुलगा माझा, जाण्याचा निर्णय सुद्धा माझाच आहे", असे मी त्या वरिष्ठ अधिकार्याला निक्षून सांगितले. मी तिथेच त्याच्यासमोर खंबीरपणे उभा राहिलो. माझा हट्ट व त्वेष पाहून त्या अधिकाऱ्याने कोणाला तरी दूरध्वनी (फोन) केला. मग काय झाले कोणास ठाऊक परंतु थोड्यावेळाने त्याने माझ्या हातात अनुमतीपत्र आणून दिले व चक्क माझी माफी सुद्धा मागितली. एवढ्या सगळ्या ताणतणावानंतर असं काहीतरी घडल्यावर माझे हृदय सुद्धा भरून आले. अनुमती पत्र हाती पडताच मला खूप बरं वाटले. सामान तपासणीसाठी दिले. ते झाल्यावर अनुमती कक्षालयामध्ये (बोर्डिंग हॉलमध्ये) प्रवेश केला. प्रवाश्यांसाठी असलेल्या खुर्चीवर संतोषला बसवले व विमानाची वाट पाहत बसलो. रात्रीचे सुमारे साडेबारा-एक वाजले होते. अजून दोन तास काढायचे होते. संतोषकडे बरोबर आणलेला भ्रमणध्वनी (मोबाईल) दिला आणि मी तिथेच बाजूच्या खुर्चीत शांतपणे झोपी गेलो.
आमच्या विमानाची घोषणा ऐकताच संतोषने मला उठवले. प्रसाधनालयात (वॉशरूमला) जाऊन ताजातवाना (फ्रेश) होऊन परत आलो. नंतर हातात तिकीट घेऊन संतोषबरोबर रांगेत उभा राहिलो. तिकिट तपासून आम्हाला विमानात सोडण्यात आले. विमानाच्या आत प्रवेश केला तेव्हा हवाईसुंदऱ्या आमचे स्वागत करीत होत्या. त्यांना नमस्ते करून आतमधील भागात वळतच होतो तेवढ्यात संतोष खाली पडला. त्याला कसे उचलायचे हे फक्त मलाच माहीत होते. दोन्ही हात त्याच्या काखेत घालून त्याला उचलून उभं केले. त्यावेळी सर्वजण बघत होते. कोणीही मदतीला आले नाही. परंतु नंतर फुकटचे सल्ले द्यायला मात्र अनेक लब्धप्रतिष्ठीत पुढे आले. त्याचे वजन जास्त आहे, आधी त्याच्या वजनाकडे लक्ष द्या वगैरे वगैरे. मी कोणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत पडलो नाही. संतोषचा हात पकडून आमच्या खुर्चीकडे वळलो. संतोषला बाहेरचे दृश्य पहायचे होते. त्याला खिडकी जवळच्या जागेवर बसवले. सामान वरच्या रकान्यात ठेवून मी त्याच्या बाजूला बसलो.
संतोष प्रथमच विमानातून प्रवास करत होता. मी भारतात चार पाच वेळा आणि हाँगकाँगला एक वेळा विमानातून प्रवास केला होता. काही वेळातच विमान मुंबईहुन फ्रँकफर्टला निघण्यास तयार झाले. विमान सुरू होताच मी निश्चिंत झालो. आता मात्र मला कोणीच अडवू शकणार नव्हते, थांबवू शकणार नव्हते. नियतीच्या भारतातील अग्नी परिक्षेतून मी तावलून सुलाखून बाहेर पडत होतो. सकाळी नऊच्या सुमारास आमचे विमान फ्रँकफर्ट विमानतळावर उतरले. बाहेर अजून अंधार होता. तिकडे सुर्योदय अजून झाला नव्हता. बाहेर जवळपास ७ अंश तापमान असल्याचे विमानातील तापमापक दर्शवित होता. मी आणि संतोष स्वेटर घालून तयार झालो. सर्व लोक उतरल्यावर शेवटी आम्ही खुर्चीवरून उठलो. मी अगोदरच संतोषसाठी आसनचाकी (व्हील चेअर) आणि मदतनीस बोलावले होते. ते आमची वाट पाहत होते. आम्ही बाहेर पडताच दोन मदतनीस आसनचाकी (व्हील चेअर) घेऊन पुढे सरसावले. त्या दोघांनी संतोषला खुर्चीत (व्हील चेअरवर) बसवले. आसनपट्टा त्याच्याभोवती घट्ट गुंढाळला. मग संतोषला पायऱ्यांवरून सुरक्षितपणे खाली आणले. बाहेर खूप थंडी होती. मी थंडीने कुडकुडत होतो. काही वेळातच आम्ही दोघे फ्रँकफर्ट विमानतळावर पोहचलो. हाड फोडून टाकणार्या त्या थंडीत मी आता नियतीच्या पुढील नव्या अग्नीपरिक्षेची प्रतिक्षा करीत होतो....
प्रत्येक पावलावर परीक्षा देणं किती अवघड आहे. ते वाचताना कळतंय पण पर्यायही नव्हता.तुम्हाला सलाम!!
ReplyDeleteChallenges var Challenges. Baapre....
ReplyDeleteअव्हाना मागून अव्हान असं मराठीत वाचायला छान वाटले असते.
Deleteधन्य आहात तुम्ही आणि तुमच़ धैर्य 💐🙏🏻
ReplyDelete