"जशी दृष्टी तशी सृष्टी" असं म्हटले जाते. सृष्टी तर माणुस बदलू शकत नाही. परंतु दृष्टी बदलू शकतो. दृष्टी बदलली की सृष्टी आपोआपच बदलते. कोणतीही वस्तू जेवढी जवळून पाहू तेवढी ती अधिक मोठी दिसते. परंतु त्याच वस्तूला थोडेसे दुरून तटस्थपणे पाहिले की तीच वस्तू छोटी वाटू लागते. वस्तू तीच असते. वस्तूमध्ये बदल होत नाही. परंतु बदलते ती आपली दृष्टी किंवा दृष्टीकोन. दुःखाने भावूक झालेल्या व्यक्तीला समस्त सृष्टी दुःखी वाटते. मनुष्य दुःखाशी जेवढे आसक्त होत जातो तेवढे त्याला ते दुःख अधिकाधिक मोठे वाटू लागते. परंतु त्याच दुःखाकडे कर्माच्या सिद्धांतानुसार प्रारब्धाचे भोग समजून दुरून तटस्थपणे पहायला सुरूवात केली की ते दुःख हलके व सुसह्य करणारी दृष्टी प्राप्त होऊ लागते. 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे कडू औषध मग ती व्यक्ती स्विकारू लागते. संतोषच्या उपचारानंतर मला सुद्धा भावनेपेक्षा दैनंदिन कर्तव्य कर्मांकडे घेऊन जाणारे कडू औषध घेणे हेच योग्य आहे ही दृष्टी मिळू लागली होती.
स्नायुक्षय (मस्क्युलर डिस्ट्रॉपी) हा बरा न होणारा व कुठेही औषध उपलब्ध नसणारा असा अत्यंत दुर्मिळ असलेला आजार दुर्दैवाने संतोषला झाला होता. मला त्याच्या भविष्याची चिंता वाटत असली तरी माझ्याकडून जे काही करता येईल ते मी करीतच होतो. दररोज माझी आणि सुमनची या विषयावर चर्चा होत होती. परदेशात जाऊन संतोषवर औषधोपचार करून आल्यावर आम्ही दोघांनी ठरवले की यापुढे जास्त विचार करायचा नाही व आपण आपल्या दैनंदिन कर्तव्य कर्मांकडे लक्ष द्यायचे. संतोषकडे जराही दुर्लक्ष न करीता त्याला ज्या काही सुखसुविधा देता येतील त्या सर्व देण्याचा प्रयत्न करायचाच परंतु हे करीत असताना आपल्या दैनंदिन कर्तव्यकर्मांकडे सुद्धा दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायचे आम्ही ठरवले. यामुळे दोघांच्या दुःखाचा भार थोडासा कमी होणार होता. लक्ष दुसरीकडे लागल्याने मन थोडेसे हलकं होणार होते अन्यथा तोच तोच विचार करून आम्हा दोघांना खूप त्रास होणार हे नक्की होते. त्याचा परिणाम आम्हा दोघांच्या प्रकृतीवर पडण्याची शक्यता सुद्धा होतीच. यावर एकच उपाय होता व तो म्हणजे आम्ही दोघांनी स्वतःला आपापल्या रोजच्या कामात गुंतवून आपले लक्ष दुसरीकडे वळवणे.
वाचनालयाच्या व्यवसायक्षेत्रात खूप प्रगती करायची व खूप मोठं नाव कमवायचे हे माझे ध्येय होते. मी एकटा काहीच करू शकणार नाही याची मला जाणीव होती. माझ्याबरोबर असलेल्या कष्टाळू, प्रामाणिक कर्मचारी वर्गाला मी त्यासाठी विश्वासात घेऊन त्यांना जास्तीत जास्त चांगले मार्गदर्शन केले होते. वाचनालयाबद्दलचे माझे ज्ञान व अनुभव त्यांना दिले होते. कर्मचाऱ्यांनी सुद्धा मला आतापर्यंत योग्य तो उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता. यापुढे सुद्धा हेच धोरण राबविले तरच उतरतीकळा लागलेल्या वाचनालयाच्या व्यवसायक्षेत्रामध्ये आपण टिकून राहून प्रगती करू शकतो याची मला खात्री होती. आपल्या वाचनालयाच्या टिळकनगर शाखेमधील कर्मचारी अजय, मामा, गोडबोले तसेच शैक्षणिक विभागातील नवगरे काका अश्या चार महत्वाच्या कर्मचाऱ्यांची एक चिंतन बैठक (मिटिंग) घ्यायचे मी ठरवले. माझ्या अनुपस्थितीत हीच मंडळी वाचनालय उत्तमप्रकारे सांभाळत आली होती. चिंतन बैठक कुठे, कधी घ्यायची यावर मी विचार करू लागलो. या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मलाच घ्यावा लागणार होता.
आपली फ्रेंड्स लायब्ररीची टिळकनगरमधील शाखा खूप लहान होती. त्या जागेत मला अपेक्षित असलेली चिंतन बैठक घेणे शक्य नव्हते. जपान लाईफ कंपनीमध्ये असताना चर्चासत्र, बैठका घेण्याचा मी भरपुर अनुभव घेतला होता. अर्थात त्या कंपनीप्रमाणे मोठमोठ्या पंचतारांकित उपहारगृहात (हॉटेलमध्ये) चिंतन बैठक घेणे मला परवडणारे नव्हते. डोंबिवलीच्या मानपाडा रस्त्यावरील गोदरेज शोरूम समोरील गुरुप्रसाद उपहारगृह (हॉटेल) मी सदर बैठकीसाठी निश्चित केले. वाचनालयातील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करणे ही कल्पना काही जणांना विचित्र वाटत होती. मी काही लोकांशी याबद्दल बोललो तेव्हा त्यांनी आश्चर्य सुद्धा व्यक्त केले. वाचनालयाच्या पुढच्या वाटचालीसाठी तसेच उतरती कळा लागून एका मागोमाग बंद होत चाललेल्या वाचनालयांच्या क्षेत्रात व्यवसायिक यश मिळवण्यासाठी सदर चिंतन बैठक घेणे मला आवश्यक वाटत होते. आज अमुक वाचनालय बंद पडले, वाचनालयाच्या सभासदांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, या व्यवसायात नफा राहीला नाही वगैरे बातम्या माझ्यासह कर्मचाऱ्यांच्या सुद्धा कानावर पडत होत्या. तेव्हा त्यांच्या मनातील संभ्रम व भविष्यकालीन चिंता दूर करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे हे मला जास्त महत्वाचे व गरजेचे वाटत होते. संतोषच्या उपचारानंतर सन २००७च्या जानेवारीमध्ये सदर बैठक त्यासाठीच मी आयोजित करीत होतो.
सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना मी अगोदरच चिंतन बैठकीची (मिटिंगची) कल्पना देऊन ठेवली होती. शनिवारी रात्री वाचनालय बंद झाल्यावर त्या सर्वांना मी गुरुप्रसाद उपहारगृहात घेऊन गेलो. अजय, मामा, गोडबोले, नवगरे काका आणि मी अश्या पाच उपस्थितांसाठी पाच जेवणाच्या थाळ्या मागविल्या. जेवण येईपर्यंत सर्वांशी गप्पा मारल्या. सर्वांना वाचनालयाच्या पुढच्या वाटचालीबद्दल व नवीन उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. सभासद वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? सभासदांच्या समस्या, मागण्या व गरजा कोणत्या?, वाचनालयात काही सुधारणा झाल्या पाहिजेत का?, कर्मचार्यांच्या स्वतःच्या समस्या कोणत्या आहेत? वगैरे सर्व विषयांवर त्या बैठकीत चर्चा झाली. थोडयावेळाने जेवण आले. सर्वांनी गप्पा मारीत जेवणाचा आस्वाद घेतला. एक तासाच्या या चिंतन बैठकीनंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. भविष्यकालीन चिंता व संभ्रम यांचे मळभ दूर झाल्यामुळे त्या बैठकीनंतर सर्व कर्मचारी वर्गात खूपच उत्साह संचारला होता. सन २००७च्या जानेवारीमध्ये गुरुप्रसाद उपहारगृहात घेतलेली पै फ्रेंड्स लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांची ही पहिलीच चिंतन बैठक होती.
सन २००७ च्या फेब्रुवारी महिन्यात एकदिवशी टिळकनगरच्या वाचनालयात एक ओळखीच्या महिला सभासद मला भेटायला आल्या. त्या नियमितपणे वाचनालयात येत असत. "आपल्या वाचनालयात कामासाठी एखाद्या मुलीची नियुक्ती करण्याचा विचार आहे का?" असा त्यांनी मला प्रश्न विचारला. "आमच्या शेजारी नूतन नावाची एक मुलगी राहते. ती कोकणातून इथे आली आहे. सध्या कामाच्या शोधात आहे. जवळपास काम मिळाले तर तिची काम करण्याची इच्छा आहे" अशी माहिती सुद्धा त्यांनी मला दिली. "सध्या तरी असा काही विचार नाही. इथे माझ्याकडे पुरेसे कर्मचारी आहेत. परंतु आपल्या वाचनालयाच्या शैक्षणिक विभागात मुलगी नेमणे आहे. तुम्ही उद्या तुमच्या सोबत तिला घेवून या. तिच्याशी बोलणे झाल्यावर मी काय ते सांगू शकतो", असं मी त्यांना उत्तर दिले. "मी तिला उद्याच घेवून येते" असं सांगून त्या महिला सभासद निघून गेल्या.
फ्रेंड्स लायब्ररीच्या टिळकनगर शाखेच्या बाजूला पिठाची गिरणी असल्यामुळे गिरणीचे पीठ आपल्या वाचनालयाच्या विद्यापिठात पिठा-पिठाचा बादरायण संबंध दाखवत आगंतुक पाहुण्यासारखे कायमच्या वस्तीला यायचे. लोकांचा पिठ व विद्यापीठ यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून पुस्तकांची वारंवार साफफाई करून आगंतुक पाहुण्याला हाकलावे लागायचे. या आगंतुक पाहुण्याची आपल्या विद्यापीठात एवढी वर्दळ असे की काळे केस रात्रीपर्यंत पांढरे होवून जायचे. टिळकनगरचे आपले वाचनालय पुस्तकाने खचून भरलेले असल्याने बसायला जागा शिल्लक राहीली नव्हती. त्यामुळे तिथे मुलींना कामावर नेमण्याच्या मी विरूद्ध होतो. सकाळी काळ्या केसांची तरूण मुलगी रात्री पांढर्या केसांची म्हातारी होऊन बाहेर पडताना लोकांना दिसली असती हे सुद्धा मला मान्य नव्हते. परंतु शैक्षणिक विभागात एक कर्मचारी नेमण्याचा माझा विचार होता. तो विभाग सांभाळणारे नवगरे काका सुट्टीवर गेले की माझी पंचाईत व्हायची. दुसऱ्याच दिवशी त्या महिला सभासद नूतन नावाच्या मुलीला घेवून आल्या. नूतन दिसायला सुंदर होती. तिचा पेहराव सुसभ्य होता. तिचे बोलणे सुद्धा संयमित होते. नेहमीचेच काही प्रश्न विचारून मी तीला उद्यापासून कामावर येण्यास सांगितले. एवढ्या कमी पगारात ती माझ्याकडे किती दिवस काम करेल याबाबत मी साशंक होतो.
नूतन |
दुसऱ्या दिवसापासून नूतन कामावर यायला लागली. शैक्षणिक विभागात जास्त काम नसल्याने एकदा का साफसफाई झाली की ती भ्रमणध्वनीवर (मोबाईलवर) गाणी ऐकत बसायची. काही दिवसांनी मी तिला आपल्या टिळकनगरमधील मुख्य शाखेत बोलावून घेतले. ज्यादिवशी नूतन मुख्य शाखेत आली त्या दिवसापासून तिने सर्व कामे शिकायला सुरुवात केली. संगणकावर विविध नोंदी करणे, पुस्तकं जागेवर लावणे, वर्गणीची पावती बनविणे, सभासदांशी सुसंवाद साधणे, रात्री निघण्यापुर्वी हिशोब करणे वगैरे सर्व कामे तिने पटापट शिकून घेतली. तिच्यामुळे माझी बरीचशी कामे कमी झाली.
वाचनालयाची सुरुवात जरी मी केली असली तरी आतापर्यंत माझ्याकडे रूजु झालेल्या कर्मचाऱ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळाले होते. त्यांनी दिलेले अनेक सल्ले मी अंमलात आणले होते व त्यात मला कधीच कमीपणा वाटला नव्हता. जे योग्य ते योग्यच हीच माझी त्यामागची भूमिका होती. नूतनकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे हे मला लक्षात येत होते. ती कधीच सुट्टी घेत नव्हती. सकाळी नऊ वाजता कामावर रूजु होण्याची तिची वेळ होती, त्यासाठी ती पाच मिनिटे आधीच यायची. एकदा वाचनालयात आली की दिलेले प्रत्येक काम ती न विसरता नियमितपणे करायची. कोणतेही काम दुसर्या दिवसांसाठी शिल्लक ठेवायची नाही. कामं प्रलंबित ठेवणे हा प्रकारच तीला मान्य नव्हता. नेहमी हसतुख राहून सर्व सभासदांशी सुसंवाद साधायची. वाचनालयात सुधारणा करण्यासाठी तिने अनेकवेळा मला सल्ले दिले होते. मी, अजय, मामा, गोडबोले आणि नूतन मिळून टिळकनगर शाखेतील सर्व सभासदांना उतम सुविधा देण्याचा प्रयत्न करायचो. नूतन दोनच वर्षे वाचनालयात होती परंतु आपल्या कामाची व व्यक्तीमत्वाची तीने छाप पाडली होती. नंतर तीचे लग्न ठरले. डोंबिवली सोडून बाहेर जायला टाळाटाळ करणारा मी कोकणात तिच्या लग्नाला जातीने हजर होतो. वेळेचे व्यवस्थापन नूतनकडून मला शिकायला मिळाले होते. आज सुद्धा मी जेव्हा कर्मचाऱ्यांची बैठक घेतो तेव्हा वेळेच्या बाबतीत नूतनचे उदाहरण मी न विसरता देत असतो. नूतन आली परंतु वरून न दिसणारे वाचनालयाचे, मनाचे नूतनीकरण करून गेली. संतोषच्या आजारपणामुळे खिन्न झालेल्या माझ्या मनाला दैनंदिन कर्तव्यकर्म करण्यासाठी मनाचे हे नुतनीकरण उपयोगी पडत होते. दृष्टी बदलल्यामुळे मला आता सृष्टी सुद्धा बदलल्यासारखी वाटत होती. कर्माच्या सिद्धांतानुसार मी आता संतोषच्या आजाराकडे पाहण्याचा प्रयत्न करीत होतो व मनातील दुःखाला वेसण घालायला शिकत होतो....