'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असं म्हटले जाते. वास्तविक पहाता आयुष्यभर जरी वाळूचे कण रगडले तरी त्यातून तेल निघणार नाही हे सत्य असते. मृगजळाचे भासमान पाणी कोणाचीही तहान शमवू शकत नाही. मनाचे मांडे कितीही खाल्ले तरी पोट भरणार नाही. परंतु अशी अशक्यप्राय परिस्थिती असताना सुद्धा जेव्हा झपाटल्यासारखे प्रयत्न केले जातात तेव्हा बुडत्याला काडीचा आधार पुरेसा आहे हे सुद्धा सत्य बनू लागते. प्राप्त प्रतिकूल परिस्थितीत तोच आशेचा आनंददायी किरण वाटू लागतो. अंधाराच्या पलिकडे उजेड आहे या विचाराने माणूस चालत रहातो. संतोषच्या दुर्धर आजारावर उपचार नाही ही गोष्ट स्विकारून शांत बसणे माझ्यासाठी अशक्य होते. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' यानुसार मी माझे अथक प्रयत्न चालू ठेवले होते.
दिनांक १३ जून २००६ रोजी संतोषची शाळा सुरू झाली. शाळेत जाताना सातवीपर्यंत संतोष सोबत सुमन असायची. आता तो आठवीत गेला होता. यावर्षी पहिल्या दिवसापासून त्याला शाळेत सोडण्याची व परत घेऊन येण्याची जवाबदारी आता मी घेतली होती. मी माझ्या दुचाकीवरून दुपारी त्याला शाळेत घेऊन जायचो व संध्याकाळी साडेपाच वाजता न चुकता शाळेतून परत घेऊन यायचो. संतोषची मंजुनाथ शाळा आमच्या घरापासून काही अंतरावरच होती. आठवीत त्याचा वर्ग चौथ्या मजल्यावर होता. शाळा भरत असताना कोणा विद्यार्थ्याचा धक्का लागून संतोषच्या पडण्याची मला भीती वाटत होती म्हणून शाळा भरत असताना संतोषला त्याच्या वर्गापर्यंत घेऊन जायची परवानगी मी शाळेतील शिक्षकांकडून मिळवली. जेवढी शक्य आहे तेवढी सर्व प्रकारची काळजी मी संतोषच्या बाबतीत घेत होतो. एवढा मोठा आजार असून सुद्धा तो शाळेत जाताना कंटाळा करत नव्हता. उलट त्याला शाळेत जायला खूप आवडत असे. शाळेत वर्गमित्रांबरोबर गप्पा, मस्ती करण्यात मन रमून जात असल्याने दिवस कसा जायचा ते त्याचे त्याला सुद्धा कळत नसे.
माझ्यापेक्षा सुमनचा देवावर अधिक विश्वास होता. ती देवाधर्माचे, नामस्मरण वगैरे खूप करायची. 'देवावर विश्वास ठेवला की तो सर्व ठीक करतो' अशी तिची प्रगाढ श्रद्धा होती. "संतोषच्या आयुष्यात जे काय लिहीले आहे ते त्याला भोगावेच लागेल. आपण फक्त चांगल्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करु शकतो. आपल्या हातात एवढेच असते. देव सुत्रधार आहे. आपण पात्रधार आहोत. देवाने आधीच ठरवले आहे कोणाला काय द्यायचे. आपल्याकडून जेवढे सत्कर्म करता येईल तितके आपण करायचे. बाकी सर्व त्याच्या हातात आहे", इतक्या सोप्या शब्दात निष्काम कर्मयोग सुमन मला नेहमी सांगत असे. तिने संतोषला हनुमान चालीसा तोंडपाठ करायला लावला होता. ती दिवसातून दोनदा हनुमान चालीसा त्याला म्हणायला लावायची. दर शनीवारी मी संतोषला गोग्रासवाडी येथील हनुमान मंदिरात घेऊन जायचो. आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे संतोष पालन करायचा. त्याला कितीही त्रास झाला तरी तो सर्व त्रास आम्हाला न सांगता सहन करायचा.
संतोषच्या आजारावर औषध शोधताना यावेळी मी एकटा नव्हतो. माझ्याबरोबर आता नागेंद्र सुद्धा होता. मला नागेंद्रची भावनिक, वैचारिक साथ व मदत मिळत होती. आम्ही दोघे आठवड्यातून एकदा कुठल्यातरी सायबर कॅफेमध्ये ठरवून भेटायचो. ई-मेल तपासणे-वाचणे तसेच गूगलवर मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारावर कुठे काही औषध उपलब्ध आहे का हे शोधणे वगैरे कामे आम्ही करायचो. आतापर्यंत ज्यांना कोणाला आम्ही ईमेल पाठवले होते त्यांची ईमेलद्वारे प्रत्युत्तरे आलेली होती. "सदर आजारावर आमचे संशोधन सुरू आहे. जर यावर काही औषध निघाले तर आम्ही तुम्हाला जरूर कळवू", अशी एकसाच्यातील उत्तरे बहुसंख्यांकडून आली होती. कोणाकडूनही सकारात्मक उत्तर आले नव्हते. असेच एक दिवशी आम्ही महाजालावर (इंटरनेटवर) औषध शोधत होतो. अचानक आम्हाला अमेरिकेतील एका कंपनीचा शोध लागला. त्या कंपनीने मस्क्युलर डिस्ट्रॉफीवर औषध बनवल्याचा दावा केला होता. त्या दिवशी मला खूपच आनंद झाला होता.
महाजालावर (इंटरनेटवर) बरीच मुशाफिरी (सर्फिंग) केल्यानंतर या अपवादात्मक कंपनीचा छडा लागला होता. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे डॉक्टर विल्यम रडार यांची मेड्रा इंक या नावाची कंपनी होती. त्यांनी अश्या काही दुर्मिळ आजारांवर औषधं शोधून काढल्याचा दावा केला होता. ज्या आजारावर जगात कुठेही औषधोपचार नाही अश्या रुग्णांना ती औषधं दिल्याने ते बरे होण्याची शक्यता मेड्रा इंक या कंपनीने व्यक्त केली होती. मी आणि नागेंद्रने या विषयाचा सखोल आढावा घ्यायचे ठरवले. मेड्रा इंकचे औषध नेमके काय आहे? ते औषध खरोखरच संतोषच्या आजारावर लागू होईल काय? योग्य तो परिणाम साधेल काय? आतापर्यंत कितीजण ते औषध वापरून बरे झाले आहेत? कोण कोण बरे झाले आहेत? वगैरे प्रश्नांचा मागोवा घ्यायला आम्ही सुरुवात केली.
स्टेम सेल्स (Stem Cells) |
मेड्रा इंक या अमेरिकन कंपनीचे डॉक्टर विल्यम रडार हे बरे न होणाऱ्या किंवा ज्याला औषध नाही अश्या आजारावर 'स्टेम सेल्स थेरेपी' वापरून उपचार करीत होते. मी आणि नागेंद्र दोघांनी मिळून स्टेम सेल्स म्हणजेच मुलभूत पेशी याबद्दल थोडीफार माहिती मिळवली. जगात अनेक देशांमध्ये यावर संशोधन सुरू होते. भारतात सुद्धा काही ठिकाणी मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) यावर संशोधनाला सुरुवात झाली होती. परंतु मेड्रा इंक कंपनीने ज्या मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) वापरून औषधोपचाराचे तंत्रज्ञान विकसित केले होते ते भारतात अजून कोणाकडेही उपलब्ध नव्हते. या मुलभूत पेशी म्हणजे काय असते? मातेच्या गर्भात पुबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन फलित बिजांड तयार होते. त्यातूनच पुढे हातापायासह नखशिखान्त सर्व अवयव असलेले छोटेसे बाळ तयार होते. सुरूवातीला केवळ एकच असलेल्या फलित बीजांडापासून अगणित पेशी असलेला बहुपेशीय असा संपुर्ण मानव कसा तयार होत जातो? कोणत्या पेशी ठरवतात की कोणी हात बनायचे, कोणी मेंदू बनायचे? रक्त, मांस, धमन्या, हाडे हे कोणत्या पेशी समुहातून तयार होतात? ते ठरवते कोण? सुरूवातीला फलित बिजांडातून एका पेशीच्या दोन पेशी व दोनाच्या चारपेशी होत जातात त्यातच शरीराचे सर्व अवयव बनवणार्या मुलभूत पेशी म्हणजे स्टेम सेल्स या सुद्धा जन्माला येतात. या मुलभूत पेशी ज्या पेशींना जन्माला घालतात त्यातून बाळाचे विविध अवयव तयार होतात. मुलभूत पेशींच्या समुहाला उती (टिश्यु) म्हणतात. विविध अवयव बनवणाऱ्या विविध उती (टिश्युज्) असतात. अश्याप्रकारे अपघातात जर एखादी व्यक्ती हात गमावून बसली असेल तर हात बनवणाऱ्या मुलभूत पेशींच्या समुहाचे म्हणजे त्या उतींचे त्या व्यक्तीच्या शरीरात रोपण केले जाऊन त्याच्या हाताची पुनर्निर्मिती केली जाणे शक्य आहे असं सर्व शास्त्रज्ञांचे एकमत आहे. यावर जगात सर्वत्र संशोधन चालू आहे. ज्या असाध्य रोगात शरीराच्या ज्या पेशींची हानी तो रोग करतो त्या नष्ट झालेल्या पेशी मुलभूत पेशींच्या म्हणजे उतींच्या मदतीने परत निर्माण करून रूग्णाला बरे करणे शक्य आहे असं जगातील सर्व शास्त्रज्ञ दाव्याने सांगत आहेत. यासाठी गरोदर मातेच्या गर्भनळीतील रक्त काढून एका विशिष्ट तापमानात साठवून ठेवतात. त्या रक्तातील मुलभूत पेशींमध्ये कुठलाही आजार बरा करण्याची क्षमता असते. मानवी शरीरातील कुठल्याही अवयवांची पुन्हा निर्मिती करण्याची क्षमता या मुलभूत पेशींमध्ये (स्टेम सेल्समध्ये) असते असे आजपर्यंत शास्त्रज्ञ सांगत आले आहेत. परंतु यावर अजून बरेच संशोधन होणे बाकी आहे. आताशी कुठे कल्पना मान्य झाली असली तरी ती प्रत्यक्षात उतरून तीचा वापर उपचारासाठी होण्यास अजून कित्येक वर्षे लागण्याची शक्यता आहे.
संतोषच्या आजारावर जगात कुठेही औषध नसल्याने मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) या विषयाने माझ्या आशा पल्लवित झाल्या. "आपण मेड्रा इंकशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊ या का?", असं मी नागेंद्रला विचारले. नागेंद्रने सुद्धा लगेच होकार दिला आणि मेड्रा इंक कंपनीच्या संबंधीत व्यक्तीशी आम्ही ईमेलद्वारे संपर्क साधला. घरी सुमनला सुद्धा ईमेल पाठवल्याची कल्पना दिली. प्रयत्न करायला हरकत नाही असे तिचे म्हणणे होते. दोन दिवस वाट पहिल्यानंतर त्या कंपनीकडून संदेश आला. संतोषच्या आजाराबद्दलची संपूर्ण माहिती व आतापर्यंत काढलेल्या अहवालाची सर्व कागदपत्रे पाठविण्यास त्यांनी सांगितले होते. वेळ न घालवता त्याच दिवशी आम्ही संतोषचे आतापर्यंतचे सर्व अहवाल त्यांना ईमेलद्वारे पाठवून दिले.
काही दिवसातच मेड्रा इंक कंपनीकडून एक मोठं पुडके (पार्सल) दाराशी आले. आजतागायत मला बाहेरच्या देशातून कधीच कोणतेच टपाल (पार्सल) आले नव्हते. त्यात संतोषच्या आजारावरील औषधाची माहिती आल्याचे समजताच माझ्या आनंदाला सीमाच राहीली नव्हती. वेळ न दवडता उत्साहाने पुडके उघडले. त्यात साधारणतः शे-दोनशे पानांचे एक पुस्तक होते. त्या पुस्तकात 'स्टेम सेल थेरेपी'ची इत्यंभूत माहिती दिली होती. मुलभूत पेशींचा (स्टेम सेल्सचा) शोध कसा लागला? कधी लागला? कोणकोणत्या आजारांवर मुलभूत पेशींच्या (स्टेम सेल्सच्या) मदतीने मात करता येते? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यात होती. मेड्रा इंका कंपनी कोणत्या प्रकारच्या मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) वापरतात? त्या पेशी ते कसे मिळवतात? वगैरे माहिती सुद्धा पुस्तकात दिली होती. मेड्रा इंक कंपनी एका निराळ्या पद्धतीने मुलभूत पेशी (स्टेम सेल्स) वापरत असल्याचा त्यांनी त्या पुस्तकात माहितीपुर्ण दावा केला होता. मी त्याचा संपूर्ण अभ्यास केला. संतोषच्या आजारावर दुसरा कोणताच उपाय नसल्याने मुलभूत पेशींची (स्टेम सेल्सची) उपचार पद्धती वापरायचे ठरवले. परत ईमेलद्वारे त्यांच्या उपचार पद्धतीची संपूर्ण माहिती मागवली. तसेच खर्च किती येणार ? किती दिवस लागतील? त्यासाठी कुठे यावे लागेल? वगैरे इतर सर्व गोष्टींची सविस्तर माहिती पाठविण्यास त्यांना विनंती केली. सर्वत्र अंधःकार असताना मला पलिकडे प्रकाश असल्याची जाणीव होऊ लागली होती. स्थानिक पातळीवर सर्व वैद्यकीय तज्ञ ना-इलाजाची नकार घंटा वाजवीत असताना मला कुठेतरी एक आशेचा किरण दिसू लागला. बुडत्याला काडीचा आधार पुरेसा असतो हे त्यावेळी मनोमन पटल्याने पटकन आठवले की "डुबनेवाले को तिनके का सहारा भी बहुत होता है।"......