Monday, January 18, 2021

बुधवार दिनांक २९ ऑक्टोबर २००८ रोजी पै फ्रेंड्स लायब्ररीच्या मुलुंड व ठाणे येथे घरपोच सेवेचा शुभारंभ

'कालाय तस्मै नमः' असं नेहमीच म्हटले जाते. ज्या समस्येवर उत्तर सापडत नाही त्यावर काळाचे औषध बरोबर लागू पडते. ज्या विषयावर निर्णय घेता येत नाही तो विषय प्रलंबित ठेवला की काळच त्यावर उत्तर शोधून देतो. जीवनातील सर्व प्रांतात स्पर्धा ठासून भरलेली असली तरी त्यामध्ये काही रिकाम्या जागा म्हणजे संधी या काळाच्या परिवर्तनाच्या मुलभूत नियमानुसार निर्माण होत असतात. या निर्माण झालेल्या संधी म्हणजे अनेकदा प्रलंबित समस्येवर काळाने शोधलेले उत्तर असते. या प्रलंबित संधी साधताना थोडा उशीर जरी झाला तरी निराश न होता तसेच न डगमगता निर्णय घेणे आवश्यक व अधिक महत्वाचे असते. 'ती' माझा दरवाजा अजूनही वाजवत होती परंतु मी मात्र घरपोच पुस्तक सेवा परवडेल की नाही या द्विधा मनस्थितीत अडकून निर्णय घ्यायला विलंब करीत होतो. परंतु काळ नावाच्या औषधानेच माझी ही समस्या सोडवली होती. संधी साधायला अधिक उशीर करू नका अशी जेव्हा हितचिंतकांनी जाणीव करून दिली तेव्हा मी सावध झालो व तात्काळ प्रयत्नांचा दरवाजा उघडला. उशीर इतका सुद्धा झाला नव्हता की संधीचे सोने करणे अशक्य होते. अजूनही नियती मला प्रगती पथावर पुढे पुढे जाण्यास मदत करीतच होती.


वाचनालय व्यवसायाच्या वृद्धीसाठी नवीन मार्ग चोखाळणे आवश्यक होते. महाजालावरील संकेतस्थळाद्वारे घरपोच पुस्तक सेवा देणे हा नविन विचार घेऊन नागेंद्र आणि साईनाथ माझ्याकडे आले होते. घरपोच पुस्तक सेवा हा अपारंपारिक पर्याय आपल्याला कितपत परवडेल याबाबत मी कमालीचा साशंक झालो होतो. ज्या विषयावर निर्णय घेता येत नाही त्याला काळ हे औषध लागू पडते असा विचार करून मी तो विषय प्रलंबित ठेवला होता. सदर विषय माझ्या विस्मरणात गेला असला तरी तो मी सोडून दिला नव्हता. नागेंद्र व साईनाथ हे मला भेटून आता जवळपास सहा महिन्याचा कालावधी लोटला होता. सन २००८ चा एप्रिल महिना होता. एक दिवस मला साईनाथ यांचा दूरध्वनी आला. ''मामाजी इस महिने का 'डिजीटल मॅक्झिन' (Digital Magazine) देखा क्या?'', मी विचारले ''काय आहे त्यात?'' त्यांनी डिजीटल मासिकातील एक विशिष्ट क्रमांकाचे पान वाचायला सांगितले. मी डिजीटल मासिक आपल्या वाचनालयासाठी नियमितपणे मागवायचो. साईनाथने सांगितल्याप्रमाणे मासिकातील ते पान उघडून वाचायला सुरुवात केली आणि मी एकदम सावध व सतर्क झालो. संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) घरपोच पुस्तक सेवा देण्याची जी योजना सहा महिन्यापुर्वी आम्ही आखत होतो तीच योजना 'लायब्ररीवाला डॉट कॉम' (www.librarywala.com) या संकेतस्थळाद्वारे काही दिवसांपुर्वी मुंबईत सुरू झाली होती. डिजिटल मासिकात त्याबद्दलची संपूर्ण माहिती छापून आली होती. मुंबईच्या वडाळा येथील संगणक तंत्रज्ञान शिकलेल्या सात तरुणांनी ही कंपनी सुरू करून पुस्तकांच्या घरपोच सेवेला प्रारंभ केला होता. माझ्याकडे २१ वर्षांचा वाचनालय व्यवसायाचा अनुभव होता. डोंबिवलीत पै फ्रेंड्स लायब्ररीचे नावं सर्वश्रुत झाले होते. साईनाथ आणि नागेंद्र यांनी मला सहा महिने आधीच संकेतस्थळाद्वारे घरपोच पुस्तक सेवा देण्याचे सुचविले होते. परंतु मी पुढाकार घेऊन कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सदर योजना प्रत्यक्षात चालू झाली नव्हती. कोणताही निर्णय न घेणे हा सुद्धा एक निर्णयच असतो व त्याचे परिणाम सुद्धा आपल्या वाट्याला येतच असतात. काळाने मला माझ्या समस्येवर उत्तर शोधून दिले होते. डिजिटल मासिकातील ती बातमी माझ्यासाठी उत्तरच होते. ती बातमी मी वाचली आणि ताबडतोब नागेंद्रला बोलावून घेतले. त्याला लगेचच पुढच्या कामाला सुरुवात करायला सांगितले.


संकेतस्थळ (वेबसाईट) सुरू करणे सोपी गोष्ट नव्हती. मुख्य म्हणजे त्यासाठी भरपुर भांडवल लागणार होते. यावर तोडगा काढण्यासाठी सन २००८च्या मे महिन्यामध्ये मी, नागेंद्र व साईनाथ अशी आमची तिघांची पहिली बैठक (मीटिंग) झाली. तिघांनी प्रत्येकी एक लाख रुपये या व्यवसायात गुंतवायचे असं चर्चेअंती ठरले. इतर तदानुषंगिक मुद्यांवर सुद्धा त्या बैठकीत चर्चा झाली. संकेतस्थळ बनवणे हा माझा विषय नव्हता त्यामुळे त्याची जवाबदारी साईनाथ यांनी घेतली होती. त्यांनी संकेतस्थळ बनविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मागवून घेतला. संकेतस्थळ बनवण्यासाठी साईनाथ यांचा भाऊ अविनाश व अविनाशचा मित्र अश्या दोघांची नियुक्ती करण्यात आली. ते दोघे नोकरी करून संध्याकाळी घरी आल्यावर संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम करणार असल्याने त्यांना त्या कामासाठी चार महिन्याएवढा कालावधी लागणार होता. एकदा का संकेतस्थळ तयार झाले की मग अंदाजे ऑक्टोबर महीन्यामध्ये एखाद्या दिवशी घरपोच पुस्तक सेवेला प्रारंभ करायचा असं ठरले. 


वाचनालयाच्या या अपारंपारिक, नविन प्रकारच्या व्यवसायिक उपक्रमाला 'पै फ्रेंड्स लायब्ररी ऑनलाईन' हे नाव द्यायचे असं तिघांच्या सहमतीने ठरले. वाचनालयाच्या या नवीन प्रकारच्या उपक्रमासाठी वेगळे बोधचिन्ह (लोगो) आवश्यक होते. चारपाच ओळखीच्या लोकांकडून बोधचिन्हाचे (लोगोचे) रेखाटन (डिझाईन) करवून घेतले. परंतु आम्हा तिघांना त्यापैकी कोणतेही बोधचिन्ह (डिझाईन) पसंद पडले नाही. शेवटी साईनाथच्या ओळखीने हे काम एका अमेरिकन कंपनीकडे सोपविण्यात आले. काही दिवसांतच त्या कंपनीने सात आठ निरनिराळी बोधचिन्हे (लोगो डिझाईन्स) तयार करून ई-मेलद्वारे आम्हाला पाठविली. त्यातील एका बोधचिन्हांमध्ये पै फ्रेंड्स लायब्ररीचे नावं, पृथ्वीचे निर्देशन करणारा एक छानसा वाटोळा गोल, त्या गोलात आम्ही तिघे भागीदार व पुस्तकांच्या चिन्हांचे रेखाटन केले होते. हे बोधचिन्ह आम्हाला परिपूर्ण वाटले कारण या बोधचिन्हातून आम्ही तिघे भागीदार, पुस्तके तसेच हा व्यवसाय जगात कुठेही सेवा देऊ शकतो हे अचूकपणे निर्देशित केले गेले होते. त्यामुळे आम्हा तिघांना ते बोधचिन्ह पसंद पडले. सदर बोधचिन्हांसाठी त्या अमेरिकन कंपनीला शंभर डॉलर इतकी घसघशीत रक्कम द्यावी लागली होती. सभासद संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करणार असल्याने बोधचिन्हाला व्यवसायिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व होते. जाहिरातीसाठी त्याचा सर्वाधिक उपयोग होणार होता.


संकेतस्थळाचे (वेबसाईटचे) काम साईनाथ पाहत होते. पुस्तकं निवडण्याची जवाबदारी माझ्याकडे होती. जाहीरात करणे, कुशल कर्मचारी नियुक्ती करणे व पुस्तक घरपोच पोहोचवणारी यंत्रणा सांभाळणे इत्यादी गोष्टींची जवाबदारी नागेंद्रकडे होती. नागेंद्र व साईनाथ दोघेही ई-बे (e-Bay) कंपनीत नोकरी करत असल्याने महिन्यातील केवळ एकाच रविवारी आम्हाला भेटता येत असे. अश्याप्रकारे दिवस सरत होते. सन २००८ चा ऑक्टोबर महिना आता जवळ आला होता. त्यामुळे आता दर रविवारी भेटायचे ठरले. काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार होते. घरपोच पुस्तक सेवा कोणत्या शहरातून सुरू करायची? या मुद्यावर सर्वात प्रथम आमच्यामध्ये चर्चा झाली. संपुर्ण मुंबई शहरात सदर सेवेला प्रारंभ करावा असे माझे मत होते. परंतु साईनाथ यासाठी तयार नव्हते. "सुरुवात आपल्या जवळ असलेल्या ठाणे व मुलुंड या मुंबईच्या उपनगरांतून करू या. त्यानंतर आपल्याला सदर सेवा देणे सर्वदृष्टीने परवडत आहे का ते आधी तपासू या" असं साईनाथ म्हणाले. ठाणे शहर खूप मोठे होते तर मुलुंडमध्ये मराठी भाषिक वाचक मोठ्या संख्येने रहात होते. अनेक वाचक डोंबिवलीहून ठाण्याला घोडबंदर रोड विभागात स्थलांतरीत झाले होते. मग तिघांच्या सहमतीने मुलुंड व ठाण्यापासून घरपोच पुस्तक सेवेला प्रारंभ करायचे ठरले.


दुसरा महत्त्वाचा मुद्धा म्हणजे सदर सेवेसाठी वर्गणी किती आकरायची? हा होता. मग यावर आमच्यामध्ये चर्चा झाली. सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत जे वाचक पुस्तकांची मागणी (ऑर्डर) नोंदवतील. त्यांच्याकडे संध्याकाळी पुस्तक पोहचवायचे असं ठरले. घरपोच पुस्तक सेवेमध्ये एका फेरीचा (डिलिव्हरीचा) खर्च अंदाजे शंभर रुपयापर्यंत येणार होता. एकाच परिसरात जास्त सभासद असतील तर खर्च कमी होण्याची शक्यता होती. सध्या तरी एकच ग्रंथवाहक कर्मचारी (डिलिव्हरी बॉय) ठेवायचे निश्चित केले. जसजसे सभासद वाढत जातील तसतसे अजून ग्रंथवाहक कर्मचारी नियुक्त करायचे असं ठरले. कार्यालयीन दैनंदिन खर्चापासून ते घरपोच फेरीपर्यंतच्या होणार्‍या सर्व खर्चांचा विचार केल्यावर मासिक वर्गणी रू. १५०/-, अनामत रक्कम ३००/- व प्रवेश शुल्क १००/- आकारायचे ठरले. एवढा आकार वाचकांना परवडेल का? लोक एवढे पैसे मोजून सभासद बनतील का? यावर आमची चर्चा झाली. सभासदांच्या आर्थिक क्षमतेचा सुद्धा विचार करणे आवश्यक होते म्हणून सुरुवातीला थोडे नुकसान झाले तरी चालेल परंतु कमीत कमी वर्गणीमध्ये उत्तम सेवा देण्याचे ठरले.


आपल्या वाचनालयाच्या रामनगर शाखेच्या आतील जागेमध्ये ऑनलाईन सेवेच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजांसाठी एक छोटासा कार्यकक्ष (ऑफिस) बनवून घेतला. दोन संगणक, एक मेज (टेबल) व अनुक्रमांकानुसार ओळीत असलेले तीन दूरध्वनी क्रमांक खरेदी केले. सुमारे एक हजार पुस्तके मावतील असे कपाट बनवून घेतले. आज्ञावलीचे (सॉफ्टवेअरचे) काम आता संपत आले होते. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी नवीन उपक्रमाची सुरुवात करायची होती. एक दिवस आधी पुस्तकं संकेतस्थळावर अग्रेषित (लोड) करायला सुरुवात केली. सुरुवातीला पुस्तकं संकेतस्थळवर व्यवस्थित दिसत होती. संध्याकाळी काहीतरी समस्या निर्माण झाली आणि पुस्तकं संकेतस्थळावरून दिसेनाशी झाली. प्रथमाग्रासे मक्षिकापात झाला होता. उद्या पूजा करून संकेतस्थळाचा व नव्या उपक्रमाचा शुभारंभ करायचे निश्चित झाले होते आणि आज अचानक ही समस्या उद्-भवल्याने मी कमालीचा नाराज झालो. कसेही करून सकाळपर्यंत पुस्तकं संकेतस्थळावर दिसलीच पाहिजे असे मी साईनाथ आणि नागेंद्रला बजावून सांगितले. मध्येच माशी कुठे शिंकली हे न समजल्याने ते दोघे सुद्धा चांगलेच अस्वस्थ झाले होते. माझी संतप्त नाराजी पाहून नागेंद्र, साईनाथ, त्यांचा भाऊ अविनाश व अविनाशचा मित्र या चौघांनी रात्रभर जागून सर्व पुस्तकं परत स्कॅन करून पहाटे सात वाजेपर्यंत जवळपास ८०० पुस्तकं संकेतस्थळावर पुन्हा अग्रेषित (लोड) केली होती. सकाळी मी जेव्हा संकेतस्थळाची तपासणी केली तेव्हा सर्व पुस्तकं परत व्यवस्थित दिसत होती. मला खूप हायसे वाटले. संकेतस्थळाद्वारे घरपोच पुस्तक सेवा या उपक्रमाला सुरूवात झाल्यानंतर काही विघ्न आले असते तर मला अधिक मनःस्ताप झाला असता व इतर व्यवसायिक समस्यांना तोंड द्यावे लागले असते हे लक्षात घेऊन नियतीने ते विघ्न अगोदरच दूर केले होते. नियती अजूनही मला साथ देत प्रगती पथावर पुढे पुढे नेत होती त्याची ही खूणगाठ होती. त्याच सायंकाळी घरातील काही मंडळी तसेच माझ्या काही मित्रांना बोलावून मनोभावे यथासांग पूजा केली. 'कालाय तस्मै नमः' करीत दिनांक २९ ऑक्टोबर २००८ रोजी पै फ्रेंड्स लायब्ररीच्या संकेतस्थळाद्वारे ठाणे व मुलुंड परिसरात घरपोच पुस्तक सेवा देण्याच्या अपारंपारिक नवीन उपक्रमाचा शुभारंभ केला.....

Wednesday, January 13, 2021

आपल्या वाचनालयाच्या विकासासाठी नवीन योजना आखताना...

'परिवर्तन - एक चुनौती' असा एक हिंदी कार्यक्रम मुंबई दुरदर्शनवर ८० च्या दशकात होत असे. परिवर्तन हा सृष्टीचा न बदलणारा नियम आपण जितक्या सहजपणे स्विकारू तितका तो आपल्याला चुनौती किंवा आव्हानात्मक न वाटता आपल्या प्रगतीस पुरकच ठरतो. परिवर्तनात संधी शोधणे किंवा संधीतून परिवर्तन घडवून आणणे हे कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असते. संधी कोणत्या स्वरूपात कधी येईल सांगता येत नाही. लेखक वि. स. खांडेकर म्हणतात, "तीने माझा दरवाजा वाजवला परंतु मी माझ्याच विश्वात रमून गेलो होतो. मी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा ती निघून गेली होती. कोण होती ती? संधी"....संधी जेव्हा आपल्या जीवनाच्या दरवाजावर दस्तक देते तेव्हा ती परिवर्तनाची म्हणजेच प्रगतीची खूण आहे हे ओळखून त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नांचे सर्व दरवाजे उघडे केले पाहिजेत. परिवर्तनाची चाहूल आता मला सुद्धा लागली होती कारण संधी आता माझ्या वाचनालयाच्या दरवाजावर सुद्धा टकटक करीत होती.  


नागेंद्र आणि साईनाथ पूर्ण तयारीनिशी माझ्याकडे आले होते. त्यांना माहीत होते मला संपूर्ण माहिती दिल्याशिवाय मी त्यांचे ऐकणार नाही. माझ्याकडे वाचनालयाच्या व्यवसायाचा एकवीस वर्षाचा अनुभव होता. या कालावधीत फ्रेंड्स लायब्ररीचे नाव डोंबिवलीच्या कानाकोपऱ्यात नेण्यात मी यशस्वी झालो होतो. परंतु थांबणे हे माझ्या स्वभावातच नव्हते. यशाच्या याच वळणावर न थांबता मी वाचनालयाच्या व्यवसायामध्येच अजून प्रगतीच्या संधी शोधत होतो. मला काय करायची इच्छा आहे तसेच माझ्या भावी योजनांचे सर्वसाधारण स्वरूप कसे आहे हे सर्व नागेंद्रने साईनाथ यांना अगोदरच सांगितले होते. मला एखादी गोष्ट पटवून देणे हे खूप कठीण काम होते. साईनाथ कोणतीही गोष्ट पटवून देण्यात तरबेज होते. त्यांनी व्यवयाय व्यवस्थापनातील उच्चपदवी (M.B.A.) घेतली होती. ते ई-बे (e-Bay) कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यांनीच नागेंद्रला त्यांच्या कंपनीत सामील (जॉईन) करून घेतले होते. आम्ही तिघांनी टिळकनगरमधील आपल्या वाचनालयाच्या शैक्षणिक विभागात बसून चर्चेला सुरुवात केली. ही चर्चा फ्रेंड्स लायब्ररीच्या भावी वाटचालीसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार होती.


सन २००७ मधील ऑक्टोबर महिना होता. साईनाथ व नागेंद्र ज्या ई-बे (e-Bay) कंपनीत काम करीत होते ती कंपनी मूळची अमेरिकेतील होती. ही अमेरिकन कंपनी स्वतःच्या संकेतस्थळावरून (वेबसाईटवरून) अनेक प्रकारच्या वस्तुंची बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये विक्री करीत होती. त्यांनी निरनिराळ्या वस्तूंचे विवरण आपल्या संकेतस्थळावर (साईटवर) दिलेले होते. एखादी वस्तू आवडली की संकेतस्थळावरूनच मागणी (ऑर्डर) नोंदवायची. मग काही दिवसांतच ती वस्तू घरपोच मिळायची. वस्तू हातात मिळाली की पैसे द्यायचे. त्याला 'कॅश ऑन डिलिव्हरी' असं म्हटले जाते. वस्तु खरेदी-विक्रीचा हा प्रकार त्याकाळी ग्राहकांसाठी नवीनच होता. नागेंद्र आणि साईनाथ यांनी आधी मला त्यांच्या कंपनीबद्दल सविस्तर माहिती दिली. खरेतर या आधी नागेंद्र कधी कधी त्यांच्या कंपनीबद्दल मला सांगत असे. त्यांच्या कंपनीचे स्वरूप काय आहे?, ते कश्या पद्धतीने वस्तू विकतात?, वस्तूंची किंमत बाजारभावापेक्षा कमी असते, घर बसल्या वस्तू मागविता येतात वगैरे माहिती मला अगोदरच नागेंद्रकडून मिळाली होती. त्यामुळे मला थोडीफार कल्पना होतीच. ते दोघे जे काही सांगत होते ते सर्व मी शांतपणे ऐकून घेत होतो. काहीतरी नवीन ऐकायला, बघायला व शिकायला मिळत असेल तर अशी कोणतीही नवीन गोष्ट जाणुन घेण्यात फायदा असतो याची मला जाणीव होती.

साईनाथ आणि नागेंद्र

आम्ही घरी कोकणी बोलायचो जेव्हा बाहेर भेटायचो तेव्हा शक्यतो हिंदीमधून बोलायचो. नागेंद्र मला मामाजी म्हणायचा त्यामुळे साईनाथ सुध्दा मला मामाजी नावानेच संबोधू लागले. "मामाजी आपकी आगे की क्या योजना (प्लॅन) है?" असं साईनाथने विचारले. मी नागेंद्रला जे सांगितले होते तेच त्यांना सुद्धा सांगितले. महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरात फ्रेंड्स लायब्ररीची शाखा उघडायचे माझे स्वप्न आहे हे साईनाथला समजल्यावर त्या अनुषंगाने मग त्यांनी मला एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. जागा कशी शोधणार?, कोण शोधणार?, भांडवल किती लागेल?, तिथल्या वाचनालयाच्या शाखा कोण सांभाळणार?, पुस्तके कोण हाताळणार?, पैशांचे व्यवहार कसे सांभाळणार? अश्या अनेक प्रश्नांचा भडीमार त्यांनी माझ्यावर केला. काही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे होती. परंतु काही गोष्टींवर मी काहीच विचार केला नव्हता. तिथे मी निरुत्तर झालो होतो. ज्या गोष्टींचा मी कधीच विचार केला नव्हता त्यासंदर्भातील वेगवेगळे प्रश्न त्याक्षणी माझ्या मनात येऊ लागले. डोंबिवलीत प्रत्येक शाखेत मी स्वतः जातीने लक्ष घालत होतो त्यामुळे सर्व शाखा माझ्या मनाप्रमाणे सुरुळीत चालल्या होत्या. एखाद्या शाखेत काही समस्या निर्माण झालीच तर निर्णय घ्यायला मी स्वतः हजर असायचो. साईनाथ व नागेंद्र यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जर माझ्याकडे नसतील तर माझे स्वप्न पुर्ण कसे होणार? यावर मी अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. माझा २१ वर्षाचा वाचनालय क्षेत्रातील अनुभव परिपूर्ण व व्यापक नाही याची परत एकदा या तरूण अननुभवी मुलांनी मला जाणीव करून दिली होती. हे परिवर्तन माझ्यासाठी चुनौती नसून प्रगती पुरकच होते कारण मी ते सहजपणे स्विकारले होते. 


साईनाथ हे जरी मला प्रश्न विचारत असले तरी त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा आराखडा त्यांच्याकडे अगोदरच तयार होता. आज ई-बे (e-Bay) सारखी कंपनी आपल्या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) विविध वस्तू उपलब्ध करून ग्राहकांना घरपोच सेवा देत आहे तीच पद्धत जर आपण वाचनालयासाठी राबवली तर महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई , नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर या सारख्या मोठमोठ्या शहरातील वाचकांपर्यंत आपण सहजपणे पोहचू शकू असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी मांडलेल्या प्रस्ताववजा दाव्यावर विचार करणे मला भाग पडले होते. मला ती कल्पना आवडली व पटली सुद्धा होती. काळाची गरज ओळखून भविष्यकालीन विचार करून त्यांनी तो प्रस्ताव माझ्यासमोर मांडला होता. काळ बदलतच असतो परंतु बदलत्या काळानुरूप जर आपण व्यवसायात बदल केले नाहीत तर त्या व्यवसायात पुढे जाणे शक्य नसते. काळानुसार बदल न केल्याने अनेक उद्योगधंदे माझ्या डोळ्यादेखत काळाच्या अंधाररूपी उदरात गुडूप झाले होते. मला वाचनालयाच्या व्यवसायात खूप पुढे जायचे होते. त्यामुळे बदल हा मला हवाच होता. परिवर्तनाची संधी साधून किंवा संधीतून परिवर्तन घडवण्याची माझी तयारी होती. साईनाथने जे काही सादरीकरण केले होते ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर माझ्या डोळ्यासमोर वेगवेगळी कल्पना चक्रे फिरू लागली. मनात काही प्रश्न सुद्धा उभे राहिले. इथपर्यंत सर्वकाही शांतपणे ऐकून घेतल्यावर मग मी दोघांबरोबर पुढील मुद्द्यांवर चर्चा करायला सुरुवात केली.


आपण आपल्या वाचनालयाचे संकेतस्थळ (वेबसाईट) सुरू करून घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली तर फ्रेंड्स लायब्ररीची पुस्तके कोणत्याही शहरातील वाचकांपर्यत आपण पोहोचवू शकत होतो. अनेक वाचक असे असतात की ज्यांच्या घराच्या जवळपास उत्तम वाचनालय नसते. अनेक वाचकांच्या घराजवळ वाचनालय असते परंतु नवीन पुस्तके उपलब्ध नसतात. जे वाचक आजारी आहेत घराबाहेर पडू शकत नाहीत किंवा वयानुसार बाहेर पडणे त्यांना गैरसोईचे होते अश्या असंख्य वाचकांना संकेतस्थळवरून मागणी नोंदविल्यावर मिळणारी घरपोच पुस्तक सेवा लाभदायक होणार होती. माझ्या डोक्यात यादृष्टीने विचारचक्र सुरू झाले. किती वाचक या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात याचा मी विचार करीत होतो. मी विचारमग्न झाल्याचे पाहून साईनाथ आणि नागेंद्र दोघेही खुश झाले. 'अब आया है उंट पहाड के नीचे' अशीच त्यांची भावना असावी. परंतु आपण वाचकांसाठी एक चांगला उपक्रम साकारू पहातोय याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. संकेतस्थळ (वेबसाईट) कोण बनवणार? त्याला खर्च किती येईल? या मुद्यांवर त्यानंतर चर्चा झाली. संकेतस्थळाच्या दैनंदिन कारभारासाठी कार्यालयाची (ऑफिसची) जागा सुदैवाने तयारच होती. रामनगर शाखेतील आतील रिकामी खोली त्यासाठी उपलब्ध होती. मग त्या जागेत संकेतस्थळाचे कार्यालय (ऑफिस) सुरू करायचे निश्चित झाले. त्या कार्यकक्षेसाठी (ऑफिससाठी) लागणारे कुशल कर्मचारी शोधण्याची जवाबदारी नागेंद्रने घेतली. कार्यालयातील प्रत्येक जण कोणती जवाबदारी घेणार यावर सुद्धा चर्चा झाली. मग घरपोच पुस्तक सेवेचा विषय निघाला. कागदावर सर्व ठीकठाक दिसत असले तरी हा विषय थोडा गुंतागुंतीचा होता. आपण जी वर्गणी आकारणार आहोत त्यात घरपोच पुस्तके देणे आपल्याला परवडेल का? हा मोठा यक्षप्रश्न होता. त्याचबरोबर चाळीस पन्नास वर्षावरील जेष्ठ नागरिक वाचक असल्यास त्यांना संकेतस्थळ हाताळणे व पुस्तकांची मागणी नोंदवणे कितपत जमेल अथवा सोईचे होईल? तसेच यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहे का? असा विचार मनात आला व मी तो दोघांसमोर मांडला. माझ्या दृष्टिकोनातून सभासद खूप महत्वाचे होते. सभासदांना हवी ती पुस्तके वेळेवर घरपोच मिळणे यामध्ये त्या व्यवसायाचा प्राण होता. आम्ही तिघे जवळपास तीन तास या मुद्यावर काथ्याकूट करीत होतो. दोन वाजून गेले होते. पोटातील भूक सुमनच्या घरपोच सेवेची आठवण करून देत होती. आतापर्यंत जवळ जवळ सर्व मुद्यांवर उहापोह झाला होता परंतु घरपोच पुस्तक सेवा देण्यावरून घोडं अडले होते. वाहतुकीची सर्व किफायतशीर वाहने उपलब्ध असलेल्या मुंबईसारख्या शहरातून घरपोच पुस्तक सेवेला प्रारंभ केला तरी सुद्धा पुस्तकं घरी पोहचविण्याचा खर्च परवडणारा नव्हता. आपल्याला यावर अजून विचार करावा लागेल असे मी त्या दोघांना सांगितले. काही वेळाने ते दोघे निघून गेले. काही दिवस मी या प्रश्नांवर चिंतन मनन करीत होतो. नंतर आपल्याला ही योजना अंमलात आणणे जमेल की नाही अशी द्विधा मनस्थिती झाली. पुढे दैनंदिन कामाच्या व्यापात हळू हळू त्या विषयाचे मला विस्मरण झाले. परंतु 'ती' दरवाजा अजूनही वाजवत होती आणि मी मात्र माझ्याच विश्वात रमून गेलो होतो.....

Saturday, January 9, 2021

वाचनालयाच्या वाटचालीतील नागेंद्र भटचे मौलिक योगदान…

"ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटींत तृष्टता मोठी…" या भावगीतात उल्लेखिलेल्या ऋणानुबंधाच्या गाठी कधी, कुठे, कश्या पडतात हे समजणे कठीणच. ऋणानुबंध धन (घेणे) आणि ऋण (देणे) असे दोन्ही बाजूने असतात. विद्युतमंडळात धन व ऋण आयनांचे वर्तुळ पुर्ण झाले की दिवा प्रदीप्त होतो. त्याप्रमाणे मानवी जीवनात धन व ऋण बंधांचे वर्तुळ पुर्ण झाले की कर्मविपाक होऊन ऋणानुबंधाची तृष्टता होते. जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधाची तृष्टता कधी, कशी, कोणामुळे होईल सांगता येत नाही. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही याच ऋणानुबंधाची तृष्टता करण्यासाठीच आलेली असते. आपले नातेवाईक, परिचित मंडळी ही सर्व याच ऋणानुबंधाच्या धाग्याने आपल्याशी जोडलेली असतात. इतर परिचित व्यक्तींप्रमाणेच माझ्या नात्यातील व्यक्ती सुद्धा कर्मविपाकाद्वारे ऋणानुबंधाची तृष्टता करण्यासाठीच माझ्या आयुष्यात येत असल्याचा अनुभव माझ्यासाठी नक्कीच आनंददायी व समाधान देणारा होता.


वाचनालयाच्या व्यवसायात आतापर्यंत बऱ्याच नातेवाईकांनी, मित्रांनी मला मदत केली होती. परंतु सर्वात जास्त मदत मला नागेंद्रने केली होती. फ्रेंड्स लायब्ररीच्या यशामागे प्रेमा अक्काचा मुलगा म्हणजे माझा भाचा नागेंद्र भट याचे खूप मोठे योगदान होते. माझ्याप्रमाणेच नागेंद्र सुद्धा लहानपणी खूप मस्ती करायचा. तो कोणाचे ऐकत नसे. दिवसभर घराबाहेर असायचा. क्रिकेट हा त्याचा आवडता खेळ. एकदा क्रिकेट खेळायला गेला की खाणं-पिणे, देहभान सर्व विसरून जायचा. प्रेमाक्काने अनेकवेळा समजावून सांगितले. परंतु स्वारी कायम खेळण्यातच मग्न असायची. सहाजिकच त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असे. आपल्या मुलाचे पुढे कसे होईल ही चिंता प्रेमाक्काला सारखी सतावत होती. दहावी नंतर नागेंद्र महाविद्यालयात (कॉलेजला) जायला लागल्यावर तो माझ्या सहवासात अधिक येऊ लागला. त्याचे वडील म्हणजे माझे मेहुणे स्वभावाने सरळ आणि कडक शिस्तीचे. ते कॅनरा बँकेत दैनिक बचत योजनेच्या संकलनाचे (पिग्मी कलेक्शनचे) काम करायचे. त्याचबरोबर त्यांचा छायाचित्रणाचा (फोटोग्राफीचा) व्यवसाय सुद्धा होता. महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला नागेंद्र माझ्या सहवासात अधिक येऊ लागल्याने त्याचे बाबा मला हक्काने व आग्रहाने सांगायचे की ''नागेंद्रचे शिक्षण पुर्ण करून देण्याची जवाबदारी आता तुझी.'' नागेंद्रने पुढे चांगली नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. त्याच्या मस्तीखोर स्वभावाने प्रेमाक्का हैराण झाली होती. परंतु महाविद्यालयात जायला लागल्यापासून नागेंद्र नीट अभ्यास करू लागला. आभ्यासात चांगले गुण सुद्धा मिळवू लागला. मलाही तो वाचनालयात मदत करीत असे.


फ्रेंड्स लायब्ररीच्या गांधीनगर शाखेमध्ये कधी एखाद्या दिवशी कर्मचारी सुट्टीवर असला की नागेंद्र ते वाचनालय उघडून सांभाळायचा. कधी कधी विद्यालयाच्या सुट्टीच्या दिवशी तो एकटाच दिवसभर वाचनालय उघडून बसायचा. त्याला पुस्तकांबद्दल थोडीफार जुजबी माहिती होती. परंतु संगणकाच्या आज्ञावलीचे (सॉफ्टवेअरची) त्याला उत्कृष्ट व परिपूर्ण ज्ञान होते. त्यामुळे सभासदांनी आणलेल्या व नेलेल्या पुस्तकांची नोंद तो संगणकामध्ये सहजपणे करायचा. एकूणच त्याची आवड लक्षात घेऊन मी कोणत्याही शाखेचा एखादा कर्मचारी रजेवर गेला की नागेंद्रला बोलावून घ्यायचो. वाचनालयात काही बदल करायचे असतील तर तो आधी मला विचारायचा. त्याच्या म्हणण्यानुसार मी वाचनालयात काही बदल केले सुद्धा होते. आमचे भलेही मामा भाच्याचे नातं असले व मी वयाने मोठा जरी असलो तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा होतो. एकमेकांना खूप सांभाळून घ्यायचो. आशिष व फेनील हे नागेंद्रचे आणखी दोन मित्र नेहमी त्याच्यासोबत असायचे. या दोघांनी सुद्धा मला व्यवसायात खूप मदत केली होती.


सन २००६ च्या एप्रिल महिन्यात नागेंद्र वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाची (टी.वाय.बी.कॉमची) परीक्षा देत होता. मी ज्यांचा विद्यार्थी होतो त्याच उमेश पै सरांच्या गणेश क्लासची शिकवणी नागेंद्रने सुद्धा लावली होती. शेवटचे वर्ष असल्याने चांगले गुण मिळवण्यासाठी त्याने मन लावून अभ्यास केला होता. परिक्षेच्या दरम्यान सुरूवातीला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका (पेपर) सोप्या गेल्या होत्या. परंतु ज्यादिवशी नागेंद्र अर्थशास्त्राची परिक्षा (पेपर) देणार होता त्याच्या एकदिवस आधी मला प्रेमाक्काचा दूरध्वनी आला. "उद्या नागेंद्रची अर्थशास्त्राची परिक्षा आहे आणि त्याचा काहीच अभ्यास होत नाहीए असं तो म्हणत आहे. त्याला अर्थशास्त्राचा अभ्यास केलेले काहीच आठवत नाहीए...आता काय करायचे?" मी त्यावेळी वाचनालयात होतो. "थांब मी पाच मिनिटांत घरी पोहचतोय" असं प्रेमाक्काला सांगितले. सर्व कामे बाजूला टाकली. गाडी घेतली आणि पाच मिनिटांत गोग्रासवाडी येथील आक्काच्या घरी पोहचलो. नागेंद्र पलंगावर उदास बसला होता. घरात प्रवेश करताच मी आधी त्याची घट्ट गळाभेट घेतली. "बोल माझ्या वाघ्या काय झालं तुला?" असा मरगळ झटकून टाकणारा, प्रोत्साहीत करणारा प्रश्न पाठीत थाप मारीत त्याला विचारला. "मला काहीच आठवत नाही. अभ्यास केलेलं सर्व विसरलो आहे. उद्याची प्रश्नपत्रिका कशी सोडवू तेच समजत नाही", असं काळजीयुक्त स्वरात नागेंद्र म्हणाला. मी अधिक न बोलता त्याला म्हणालो, "चल आपण बाहेर फिरून येऊ या.'' त्याला कसेबसे घरातून बाहेर काढले आणि गाडीत बसवून वाचनालयात घेऊन आलो. त्यानंतर जवळपास एक तास आम्ही हिंडलो फिरलो. त्या एका तासात अभ्यासाचा विषय काढलाच नाही. आम्ही दोघांनी इतर विषयांवर भरपूर अवांतर गप्पा मारल्या. त्यालाही खूप बरं वाटले. त्याचे मन प्रसन्न व मोकळे झाल्यासारखे दिसत होते. मग मी त्याला परत घरी नेऊन सोडले. प्रेमक्काला सूचित केले की, ''त्याच्याशी अभ्यासाचे काहीच बोलू नकोस." मग मी काहीच न बोलता हळूच तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी दूरध्वनीद्वारे चौकशी केली असता कळले की घरी आल्यावर नागेंद्रने उत्साहाने आभ्यास करून परीक्षेची चांगली तयारी केली. तो परिक्षेचा शेवटचा विषय होता. त्यानंतर परिक्षासत्र संपले. वाणिज्य शाखेच्या (बि.कॉम.च्या) शेवटच्या वर्षात चांगले गुण मिळवून नागेंद्र उत्तीर्ण झाला होता. त्याच्या बाबांची माझ्याकडून असलेली अपेक्षा पुर्ण झाली होती. कर्मविपाक होऊन ऋणानुबंधाची तृष्टता माझ्या मनाला समाधान व खूप आनंद देऊन गेली.


संतोषच्या आजारपणाबद्दल जेव्हा मला समजले तेव्हा मी नागेंद्रची मदत घेतली होती. महाजालावर (इंटरनेटवर) मुलभूत पेशींच्या (स्टेम सेल्सच्या) उपचाराच्या माहितीचा शोध घेण्यापासून ते प्रत्यक्ष परदेशात जाऊन औषधोपचार करून परत येईपर्यंतच्या सर्व प्रवासात नागेंद्रने मला लाखमोलाची मदत केली होती. परदेशातील कॅसा दि कॅम्पो विश्रामधामवरून (हॉटेलवरून) जेव्हा आम्ही परत यायला निघालो तेव्हा तिकडच्या कर्मचारीवर्गाने देण्याघेण्याचा आर्थिक व्यवहार पुर्ण करताना चुकून दोन वेळा माझे उधारपत्र (क्रेडिट कार्ड) वापरले होते. जेव्हा आम्ही डोंबिवलीला पोहचलो तेव्हा काही दिवसांनी उधारपत्राचे (क्रेडिट कार्डचे) देयक (बिल) हाती आले. तेव्हा समजले की दोन वेळा पैसे भरले गेले आहेत. कॅसा दि कॅम्पोच्या त्या परदेशातील कर्मचारीवर्गाशी मी दोन वेळा संपर्क साधला होता परंतु त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मला वाटले पैसे गेल्यात जमा आहेत. या विषयावर मी नागेंद्रशी बोललो. त्याने त्या परदेशी कर्मचारीवर्गाला ई-मेल करून त्यांना त्यांची चूक पटवून देणारी सविस्तर व सुस्पष्ट माहिती पुराव्यासहीत दिली. दोन वेळा पैसे भरल्याचे सप्रमाण सिद्ध केले. तेव्हा काही दिवसांत अधिक भरलेली रक्कम माझ्या खात्यात त्या लोकांनी जमा केली. अशी अनेक वेळा नागेंद्रची मला मदत झाली होती. धन व ऋण बंधातील हे कोणत्या प्रकारचे ऋणानुंबध होते ते नियतीलाच ठाऊक. 


वाणिज्य शाखेची (बी.कॉम.ची) पदवी मिळाल्यानंतर नागेंद्र ई-बे (e-Bay) या कंपनीत नोकरीला लागला. नोकरीला लागल्यावर त्याच्या माझ्या गाठीभेटी कमी झाल्या. आम्ही फक्त रविवारी भेटायचो. ई-बे (e-Bay) ही एक मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी होती. त्या कंपनीत नागेंद्र महेनत व आपल्या उत्कृष्ट कामाच्या जोरावर अल्पावधीतच चांगल्या पदावर पोहचला. अनेक कर्मचारी त्याच्या हाताखाली काम करीत होते. कर्मचाऱ्यांच्या एका संपुर्ण गटाला (टीमला) तो सांभाळत होता. जेव्हा तो मला भेटत असे तेव्हा मी त्याला सांगायचो की ''आता डोंबिवलीत आपल्या वाचनालयाच्या चार शाखा झाल्या आहेत. आता डोंबिवलीच्या बाहेर व्यवसायाची सुरुवात झाली पाहिजे. पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर अश्या मोठ्या शहरात पै फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखा असाव्यात अशी माझी इच्छा आहे''. मग नागेंद्रने या विषयावर  साईनाथ पै बरोबर चर्चा केली. नागेंद्रला ई-बे (e-Bay) कंपनीत साईनाथ पै याने नोकरीला लावले होते. त्या दोघांमध्ये काय बोलणे झाले कोणास ठाऊक एके दिवशी सकाळी साईनाथ पै आणि नागेंद्र भट दोघेही त्यांच्या हातातील संगणकासहीत (लॅपटॉपसह) माझ्या वाचनालयात आले. मी त्यांना शैक्षणिक विभागात घेऊन गेलो. तिथे सभासदांची जास्त वर्दळ नसल्याने निवांतपणे बोलता येणार होते. मला वाटले होते की बाजारातील एखाद्या उत्पादनासंबंधित नवीन योजना (स्कीम) घेऊन ते आले असतील. पण त्यांनी जेव्हा त्यांचा संगणक (लॅपटॉप) उघडला आणि बोलायला सुरुवात केली तेव्हा मला समजले की त्यांना वाचनालयासंबंधित विषयांवर माझ्याशी चर्चा करायची आहे. वाचनालय हा मी निवडलेला व्यवसाय होता. गेले २१ वर्षे मी वाचनालय चालवीत होतो. ते दोघेही वयाने माझ्यापेक्षा लहान असले तरी ते जे काही सांगतील ते ऐकून घ्यायची तयारी मी दर्शवली. जपान लाईफ कंपनीचा प्रस्ताव सुद्धा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींनी मला दिला होता. त्यावेळी हे वयाने लहान आहेत मला व्यवयासातील अधिक कळते असा माझा समज होता. परंतु पुढे तो चुकीचा असल्याचा मला अनुभव आला होता. कर्मविपाक होऊन ऋणानुबंधाची तृष्टता असा सुद्धा आनंद व शहाणपण देऊन गेली होती. त्यामुळे 'दुध का जला छाँस भी फुँक के पिता है' तसा मी आता अनुभवाने शहाणा होऊन साईनाथ व नागेंद्र काय सांगतात याकडे लक्ष देऊन ऐकू लागलो….

Wednesday, January 6, 2021

वाचनालयासाठी पुस्तकांची जमवाजमव करताना घडलेला एक किस्सा...

'अकल बडी की भैस बडी' असा प्रश्न लहान मुलांना नेहमी गोंधळात टाकतो. मानवी मेंदू किलो दिड किलो वजनाचा असतो तर जिभ फक्त ५० ग्रॅम वजनाची. जीभ वाट्टेल तशी वापरली तर मेंदूचे वजन खरोखरच किलो दिडकिलो असल्याचे सिद्ध होते. परंतु तिच जीभ योग्य प्रकारे वापरली तर चहावाला सुद्धा मेंदूचे खरे वजन कश्यात मोजतात ते दाखवून देतो. तेव्हा मानवी व्यवहारात जसे खरे वजन वजनावर किंवा आकारावर मोजले जात नसते तसे पुस्तकाचे वजन त्यातील पानांची संख्या व आकारावर ठरत नसते. पुस्तकातील दर्जेदार ज्ञान हेच त्या पुस्तकाचे खरे वजन असते. अशी दर्जेदार पुस्तके कधी कधी अल्प किंमतीत मिळण्याचे योग येत असतात. अश्या संधीचे सोनं करणे आपल्या निर्णयस्वातंत्र्यावर अवलंबून असते. परिणाम आपला विषय नसला तरी निर्णय सकारात्मक असेल तर इच्छा तिथे मार्ग नियती करून देते व परिणामाचे फळ सुद्धा आपल्या मनासारखे देते. मी घेतलेल्या काही सकारात्मक निर्णयामुळे मला तसाच अनुभव येत होता. 


रामनगरची शाखा सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी वाचनालयात चोरी झाली होती. बरेच नुकसान झाले होते. 'तुम्ही ताळा लावला नसेल' असा आरोप करून पोलीसांनी दिलेल्या मनःस्तापाने त्यात अधिकच भर पडल्याने खूप वाईट वाटले होते. गेल्या २१ वर्षाच्या कालावधीत आपल्या कोणत्याही शाखेत चोरी झाली नव्हती. आम्ही वाचनालयाच्या दरवाजाला (शटरला) एकच ताळा लावायचो. रामनगर शाखेत घडणारी चोरीची घटना ही प्रथमच होत होती त्यामुळे जास्त विचलित न होता मी माझी दैनंदिन कर्तव्यकर्मे पुन्हा करू लागलो. रामनगर येथील नवीन वाचनालयाची जागा आपल्या टिळकनगरच्या वाचनालयापेक्षा खूप मोठी होती. तिथे दोन खोल्या होत्या. बाहेरची खोली मोठी होती व आतली खोली बाहेरच्या खोलीपेक्षा किंचित लहान होती. मी सुरुवातीला फक्त बाहेरच्या खोलीमध्ये लाकडीकाम (फर्निचर) करवून घेतले होते. कारण पैश्यांची कमतरता तर होतीच त्याचबरोबर आतील खोली सुद्धा भरून जाईल एवढी पुस्तक संख्या माझ्याकडे उपलब्ध नव्हती. प्रत्येक शाखांमध्ये सुरुवातीला मर्यादित संख्येने पुस्तकं ठेवायचो. जसजशी सभासद संख्या वाढत जायची तसतशी पुस्तकांची संख्या वाढवत न्यायचो. रामनगरच्या वाचनालयाची जागा खूपच मोठी होती. आतील खोलीचा कसा वापर करता येईल यावर माझे चिंतन चालूच होते. 


सन १९८६ मध्ये जेव्हा टिळकनगरमध्ये फ्रेंड्स लायब्ररीची स्थापना झाली तेव्हा डोंबिवलीमध्ये अनेक वाचनालये होती. त्यातील छोटी वाचनालये कालौघात बंद पडत चालली होती. परंतु मी मात्र या उलट विविध ठिकाणी वाचनालयाच्या नवीन शाखा सुरू करीत होतो व हे आता सर्वांना माहीत झाले होते. अनेक ग्रंथालय व्यवसायिक मला भेटण्यासाठी येत असत. त्यातील काहींना वाचनालय बंद न करीता चालूच ठेवण्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन मी करीत असे. परंतु काही व्यवसायिकांनी आधीच ठरवून टाकले होते की त्यांना वाचनालय चालवता येणार नाही. परिणामतः त्यांना वाचनालय चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शन करून सुद्धा ती मंडळी वाचनालय बंदच करण्यावर ठाम रहात होती. वाचनालय बंद करीत असल्याने शिल्लक राहिलेली पुस्तके त्यांना विकायची होती. डोंबिवलीतील बर्‍याच वाचनालयातील पुस्तके मी विकत घेतली होती. त्यामुळे डझनभर वाचनालयाची पुस्तके माझ्याकडे जमा झालेली होती. या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने कथा, कादंबरी व ललित साहित्यविषयक पुस्तकांची संख्या जास्त होती. त्या काळात सदर पुस्तकांना खूप मागणी सुद्धा होती.


डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकाजवळील केळकर मार्गावर विकास वाचनालय नावाचे एक नावाजलेले वाचनालय होते. ते वाचनालय कै. श्री. श्रीकांत टोळ चालवीत होते. ते महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे पत्रकार होते. श्री. टोळ काकांचे वाचन अफाट होते. ते वाचकांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तक निवडून द्यायचे. त्यांच्याकडे वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच तत्वज्ञानविषयक पुस्तकांचा खूप मोठा साठा आहे असं मी ऐकले होते. डोंबिवलीतील बरेचसे नामवंत लोकं त्यांच्या वाचनालयाचे सभासद होते. श्री. टोळ काकांना रस्त्यावरून जाता येताना मी बर्‍याचवेळा पाहीले होते. परंतु त्यांची माझी कधी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्याशी कधी संवाद साधण्याचा योग आला नाही. त्यांचे वाचनालय वाचकांमध्ये सर्वश्रुत होते. माझ्याकडे येणारे काही वाचक विकास वाचनालयाचे सुद्धा सभासद होते. विकास वाचनालयात दर्जेदार पुस्तके उपलब्ध असतात असं ही वाचक मंडळी मला नेहमी सांगत असत. मग मी सुद्धा तश्या प्रकारची पुस्तके जमवण्याच्या मागे लागायचो.


श्री. टोळ काकांच्या पश्चात विकास वाचनालय चालविणारे वारसदार कोणी नव्हते. त्यामुळे ते वाचनालय बंद झाले. त्या वाचनालयातील पुस्तके विकणे आहे अशी बातमी माझ्या कानावर आली. परंतु श्री. टोळ काका आता हयात नसल्याने त्यासाठी कोणाला भेटायचे हे मला माहित नव्हते. त्यामुळे माझ्या हालचालींना मर्यादा आल्या. खरेतर मला पुस्तकांची गरज होती. जर विकास वाचनालयातील पुस्तके मिळाली तर आपल्या वाचनालयातील दर्जेदार पुस्तकांची संख्या वाढणारच होती. मी आतापर्यंत ज्या वाचनालयाची पुस्तके विकत घेतली ती पुस्तकं निवडून न घेता सरसकट घेतली होती. त्यामुळे विक्रेत्या व्यवसायिकांकडे एकही पुस्तक शिल्लक राहत नसे. ज्याचा फायदा मला सुद्धा व्यवहार करताना मिळे व जास्तकरून एका पुस्तकामागे पाच रूपये ते दहा रुपये असा भाव आधीच ठरवून घेता येत असे. आतापर्यंत सर्वांना रोख रक्कम देवून त्यांची पुस्तकं ताब्यात घेतली होती.


विकास वाचनालयाची पुस्तके विकणे असून त्याबाबतचा व्यवहार श्री. टोळ काकांचे बंधू बघतात असे मला मित्रांकडून समजले. मी त्यांना भेटायचे ठरवले. मला ती दर्जेदार पुस्तके हवी होती. शेवटी माझा आणि त्यांचा संपर्क झाला. आपल्या टिळकनगर वाचनालयाच्या थोडे पुढे गेले की कर्‍हाडे ब्राह्मण समाज संस्थेचे कार्यालय आहे. तिथे जवळच ते राहत होते. मी त्यांच्या घरी गेलो. ते मला ओळखत होते. विकास वाचनालयाची सर्व पुस्तके त्यांनी तळेगावला रहाणार्‍या त्यांच्या दुसर्‍या बंधूंकडे ठेवली होती. ती पुस्तकं डोंबिवलीत असताना त्यांनी ती विकायचा खूप प्रयत्न केला होता. परंतु ती पुस्तके विकत घेणारे कोणीही त्यांना त्यावेळी भेटले नाही. शेवटी त्यांनी ती सर्व पुस्तके तळेगावला आपल्या भावाच्या बंगल्यावर नेऊन ठेवली. त्यानंतर मी ती पुस्तके विकत घेऊ इच्छितो अशी माहिती त्यांना कोणाकडून तरी मिळाली. श्री. टोळ काका यांचे बंधू त्यासाठी दोन वेळा टिळकनगर शाखेत येवून गेले. पण माझी आणि त्यांची चुकामूक झाली. तिसर्‍या वेळी जेव्हा ते आले तेव्हा मी वाचनालयात होतो. "किती पुस्तके आहेत? पुस्तकांची आत्ताची अवस्था कशी आहे? पुस्तके कश्यापद्धतीने ठेवली आहेत? जर विकणार असाल तर काय किंमत ठरवली आहे?", असे अनेक प्रश्नं मी त्यांना विचारले. "या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असल्यास तुम्हाला त्यासाठी तळेगावला यावे लागेल. कारण तुम्ही पुस्तके प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी त्याबाबत काही बोलणे योग्य होणार नाही. आपण त्यासाठी तळेगावला येऊ शकता का?" असं त्यांनी मला विचारले. मग एक दिवस निश्चित केला व गाडी करून त्यांच्या सोबत तळेगावला जायचे ठरवले.


सन २००७च्या मे महिन्यातील तो रविवार होता. मे महिन्यात सकाळी संतोषची सर्व कामे उरकून तळेगावला जायला निघालो. श्री. टोळ काकांचे बंधू, त्यांची पत्नी आणि मी असे आम्ही तिघे खाजगी गाडीने निघालो. मे महिना असल्याने डोंबिवलीतून बाहेर पडेपर्यंत खूप उकडत होते. महामार्गावर (हायवेवर) आल्यावर थोडे बरं वाटले. सुमारे अकराच्या दरम्यान आम्ही तळेगावला त्यांच्या बंधूंच्या बंगल्यावर पोहचलो. आम्ही येणार असल्याचे त्यांना माहीत असल्याने त्यांनी नाष्टा तयार ठेवला होता. गरम गरम इडली आणि चटणी तयार होती. परंतु त्या इडली, चटणीला सुमनच्या हाताची चव होती की नाही ते आठवत नाही. कारण मला कधी एकदा पुस्तकं बघतो असं झाले होते. माझे खाण्यामध्ये लक्षच नव्हते. नंतर चहा आला. परंतु मारी बिस्कीटे आली नाहीत. मग नुसता चहा घेवून झाल्यावर त्यांनी मला पुस्तकं ठेवलेल्या खोलीत नेले. पुस्तकांनी भरलेले वीस एक मोठे मोठे खोके (बॉक्स) तिथे ठेवले होते. अंदाजे सात हजार पुस्तके त्यात छान पद्धतीने जपून ठेवलेली होती. त्यातील काही खोके (बॉक्स) मी उघडून पाहिले. ते खोके उघडत असताना नुकतीच उघडलेली रामनगर शाखेतील रिकामी आतील खोली माझ्या डोळ्यासमोर आली. कथा, कादंबरी, ऐतिहासिक, अनुवादित, चरित्रे अश्या निरनिराळ्या विषयांची पुस्तके त्या खोक्यांमध्ये होती. पुस्तकं मला आवडली होती. परंतु आता व्यवहाराचे बोलायचे होते. त्यांच्याकडून पुस्तकांची किंमत कळल्यावर बोलायचे असं मी ठरवले होते, त्यामुळे मी काहीच बोललो नाही. शेवटी त्यांनीच विषय काढत विचारले की, "तुम्ही या पुस्तकांचे किती देऊ शकाल?" मी उत्तर न देता त्यांनाच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही काय ठरवले आहे?" त्यांनी ७ हजार पुस्तकांची ऐंशी हजार इतकी किंमत सांगितली. मी त्यांना साठ हजारपर्यंत मी देऊ शकतो असे सांगितल्यावर ते शेवटी सत्तर हजारावर ती पुस्तके विकायला तयार झाले. चाळीस हजाराचा त्याच दिवसाचा धनादेश (चेक) आणि उरलेल्या तीस हजारांचा पंधरा दिवसानंतरचा धनादेश (चेक) त्यांना दिला. सर्व पुस्तके मालवाहनातून (टेम्पोतून) पाठवण्याचे त्यांनी मान्य केले. दुपारी एकच्या दरम्यान सर्व व्यवहार आटोपून तिथून निघालो. 


दोन दिवसांनी ज्ञानगंगा अंगणी आली. दर्जेदार पुस्तकांनी भरलेले पुष्पक विमान (टेम्पो) रामनगरच्या शाखेत आले.  आम्ही सर्व ज्ञानखंड (पुस्तके) रामनगर शाखेमध्ये आतील खोलीत ठेवले. त्यातील अनेक पुस्तकं खूप वेळा हाताळल्याने खराब झाली होती. त्या पुस्तकांची पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. रोज थोडी थोडी पुस्तकं काढून व नीट साफसफाई करून त्यांना नवीन अच्छादनं (कव्हर) घालण्याचे काम सुरू केले. ती सर्व पुस्तके ठीकठाक करण्यासाठी आम्हाला जवळपास तीन महिने लागले. कै. श्री. श्रीकांत टोळ काकांच्या विकास वाचनालयाच्या जवळपास सात हजार पुस्तकांमुळे फ्रेंड्स लायब्ररीमध्ये दर्जेदार पुस्तकांची भर पडली होती. पुस्तक संख्या केवळ सात हजाराने वाढली नव्हती तर आपले वाचनालय सात हजारपट ज्ञानसमृद्ध व खर्‍या अर्थाने वजनदार झाले होते....

Sunday, January 3, 2021

जेव्हा वाचनालयाची रामनगर येथे नविन शाखा सुरू होते.

"देहाची तिजोरी भक्ती त्यात ठेवा...'' असं भक्तीगीत ऐकायला मिळते. परंतु दत्ताची सोन्याची मुर्ती बँकेच्या तिजोरीत (लॉकरमध्ये) ठेवल्याची बातमी मध्यंतरी वाचनात आली. वर्षातून फक्त एकदाच दत्तजयंतीला तिची विधीवत पुजा करून परत ती सोन्याची मुर्ती बँकेच्या तिजोरीत बंद केली जाते. वास्तविक पहाता देहाच्या तिजोरीत भक्तीभाव बंद (लॉक) करून ठेवायचा असतो. सोन्याची मुर्ती नव्हे. सोन्याची मुर्ती चोरांनी चोरली तरी देव चोरून न्यावा अशी त्यांची पुण्याई नसते. भक्तीभाव चोरता येत नाही. चोरीला जाते ते सोनं असते. सोनं, दत्तमुर्ती व भक्तीभाव यातील महत्वाचे काय हे प्रत्येकजण आपआपल्या प्रारब्धानुसार विचार करून ठरवतो. विद्या, ज्ञान हे सुद्धा कोणी चोरून नेऊ शकत नाही. कोणाला विद्याज्ञान वाटण्यासाठी असते असं वाटते तर कोणाला वैयक्तिक उत्कर्षासाठी ते आहे असं वाटते. विद्याज्ञान सर्वांना वाटून वैयक्तिक व सामाजिक उत्कर्ष व्हावा असेच मला नेहमी वाटे. माझे हे ध्येय चोरीला गेले असते तरी मला आनंदच झाला असता.


आपले वाचनालय खाजगी असल्यामुळे आपल्याला कोणतेही सरकारी अनुदान मिळत नव्हते. त्याचबरोबर वाचनालयात किती कर्मचारी नेमायचे? वर्गणी किती आकारायची? किती पुस्तके मागवायची? त्यांच्या किती प्रती ठेवायच्या? वाचनालयाच्या वेळा काय ठेवायच्या? वगैरे बाबतीत सुद्धा माझ्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मीच सर्वेसर्वा असल्याकारणाने प्रत्येक निर्णय मीच घ्यायचो. अर्थात वाचनालयाची भरभराट होऊन सभासदांची संख्या वाढली किंवा कमी झाली असती तरी मीच त्याला जबाबदार राहणार होतो. मला सल्ले देणारी बरीच मंडळी माझ्या अवतीभवती होती. काही जणांनी मला चांगले मार्गदर्शन सुद्धा केले होते, त्यामुळे मी वाचनालयाच्या बाबतीत काही चांगले निर्णय घेऊ शकलो होतो. मी ज्या ज्या वेळी निर्णय घेतले होते त्या त्या वेळी वाचनालयाची चांगलीच भरभराट व प्रगती झाली होती. अर्थात त्याचे श्रेय मी एकट्याने न घेता माझ्याबरोबर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि माझ्या मित्रांना सुद्धा द्यायला विसरत नसे. वाचनालयाची प्रगती हे माझे एकमेव लक्ष्य होते. 


फ्रेंड्स लायब्ररीच्या टिळकनगर शाखेतील पुस्तकांची व सभासदांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. डोंबिवलीतील अनेक सुप्रसिद्ध वाचनालये ज्यावेळी बंद पडायच्या मार्गावर होती त्यावेळी मी नवीन शाखा उघडण्याचा बेत आखत होतो. शैक्षणिक विभाग, गांधीनगर शाखा, डोंबिवली पश्चिमेकडील बदाम गल्ली शाखा या सर्व जोमात सुरू होत्या. डोंबिवलीच्या निरनिराळ्या विभागात फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखा असाव्यात असा मी नेहमी विचार करायचो. डोंबिवलीमध्ये वाचकांची संख्या पुष्कळ होती. परंतु मोजकीच वाचनालये चांगली चालत होती. डोंबिवलीत ठीकठिकाणी फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखा उघडण्याचे मी निश्चित केले.


शिवप्रसाद इमारतीतील कृष्णा दुग्धालयाचे मालक श्री. रामलखन यांनी एकदा मला त्यांच्या दुकानात बोलावले. कशासाठी बोलावले असेल याचा विचार करीतच मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या दुकानात गेलो तर ते मला रामनगर येथील त्यांच्या दुकानात घेवून गेले. हे दुकान त्यांनी नुकतेच विकत घेऊन ठेवले होते. रामनगर येथील एस. के. पाटील शाळेसमोर असलेल्या विश्वनाथ दर्शन इमारतीमध्ये त्यांचा गाळा होता. जागा खूप मोठी होती. तिथला परिसर आणि जागा मला खूप आवडली. "तू आपलाच माणूस आहेस. मला अनामत रक्कम (डिपॉझिट) देण्याची आवश्यकता नाही. तुला जेवढे जमेल तेवढे भाडे दे. तुला इथे वाचनालयाची शाखा सुरू करता येईल का याचा विचार करून मला कळव", असे ते म्हणाले. मी तर जागेच्या शोधात होतोच. एक चांगली संधी आपणहून माझ्यासमोर आली होती. मग मी लगेच त्यांना माझा होकार कळविला. टिळकनगर, गांधीनगर, बदाम गल्ली यानंतर आता रामनगर ही पै फ्रेंड्स लायब्ररीची चौथी शाखा ठरणार होती. माझा निर्णय कळताच रामनगर परिसरातील सभासद खुश झाले. त्यांना आता एवढे लांब टिळकनगरपर्यंत यावे लागणार नव्हते.


रामनगर शाखा उघडताना पुस्तकांची कमतरता नव्हतीच. परंतु पुस्तके ठेवण्यासाठी लाकडी काम (फर्निचर), रंगरंगोटी, विद्युतविषयक (इलेक्ट्रिक) कामे आणि इतर किरकोळ कामांसाठी पैसे खर्च करावे लागणार होते. डोंबिवली पश्चिमेला एकाकडे मी भिशीचे पैसे भरत होतो. सन २००७च्या फेब्रुवारी महिन्यात ते पैसे मी उचलले आणि आवश्यक लाकडी कामाला (फर्निचरच्या) ताबडतोब सुरुवात केली. किती सभासद जमतील? आपल्याला भाडे द्यायला जमेल का? कर्मचाऱ्यांचा पगार? वीज देयक (बिल)? असे अनेक निरनिराळे प्रश्न मनात येत होते. परंतु एकदा का वाचनालयाची शाखा चालू करायची हा निर्णय घेतल्यावर शक्यतो अश्या प्रश्नांना मी दुय्यम स्थान देत असे. आधी नवीन शाखा सुरू करणे हे मला जास्त महत्वाचे वाटत असे. आपण उत्तम सुविधा दिली, दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली, पुस्तकांची आकर्षक मांडणी केली, सभासदांशी चांगला सुसंवाद साधला की वाचनालयाची भरभराट व्हायला वेळ लागत नाही असं माझे खात्रीपूर्वक मत होते. आतापर्यंत याच कारणांमुळे टिळकनगर, गांधीनगर, बदाम गल्ली तिन्ही शाखांमध्ये सभासदांची उपस्थिती बऱ्यापैकी होती. आता रामनगरमध्ये नवीन शाखा चालू झाल्यावर नविन किती सभासद बनतील याकडे लक्ष द्यायला लागणार होते.


रामनगर येथील शाखेचे काम मला लवकरात लवकर संपवायचे होते. माझ्याकडे रंगकाम, विद्युतकाम (इलेक्ट्रिक काम) व लाकडीकाम (फर्निचरचे काम) करणारे कारागिर ठरलेलेच होते. त्यांना फक्त मला काय हवं आहे याची थोडीशी जुजबी माहिती दिली की ते लगेच कामाला सुरूवात करायचे. आतापर्यंत सर्व शाखांची कामे याच लोकांनी केलेली होती. आता एकीकडे या कारागिरांची कामे सुरू झाली होती तर दुसरीकडे शाखा कधीपासून सुरू करायची? कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे? उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कसे करायचे? वगैरे प्रश्नांवर मी विचार करीत होतो. यासर्व गोष्टींवर मीच निर्णय घेत असल्याने मला याबाबतीत कोणाला विचारावे लागायचे नाही. दिनांक १९ मार्च २००७ रोजी गुडीपाडवा होता. पाडव्याच्या दिवशी रामनगर शाखा सुरू करायची असा विचार मनात आला. परंतु आता 'कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे' हा प्रश्न होता. त्याकाळी 'श्वास' या मराठी चित्रपटाचा खूपच बोलबाला झाला होता. 'श्वास' या पारितोषिक विजेता चित्रपटाच्या लेखिका सौ. माधवी घारपुरे आपल्या डोंबिवलीत राहत होत्या. मी त्यांना भेटलो व त्यांना पै फ्रेंड्स लायब्ररीच्या रामनगर शाखेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यास विनंती केली. त्यांनी सुद्धा तात्काळ होकर दिला.


सोमवारी दिनांक १९ मार्च २००७ रोजी सकाळी दहा वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामनगर शाखेचे उद्घाटन सौ. माधवी घारपुरे यांच्या हस्ते करायचे ठरले. त्याप्रमाणे काही पत्रके छापून रामनगर परिसरात वाटली. आपल्या वाचनालयाच्या इतर शाखेतील सभासदांना उद्घाटन समारंभास येण्याचे आमंत्रण दिले. नवीन शाखा उघडण्यात येत असल्याचे समजल्यावर अनेकांनी कौतुक सुद्धा केले. उद्घाटन समारंभ दहा वाजता होता परंतु सौ. माधवी घारपुरे ताई पंधरा मिनिटे अगोदरच हजर झाल्या होत्या. ठरल्याप्रमाणे ठीक दहा वाजता दीप प्रज्वलन करून सौ. माधवी घारपुरे ताईंनी रामनगर शाखेचे उद्घाटन केले. सदर कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित असलेल्या जवळपास तीस ते पस्तीस वाचक सभासदांना सौ. माधवी घारपुरे ताईंनी आपल्या छोटेखानी प्रास्ताविकाने संबोधित केले. पहिल्या तासभरातच चार पाच सभासदांनी नावं नोंदणी केली. साधारणपणे याच वेगाने दिवसभर रामनगर येथे राहणारे वाचक आपली नावे नोंदवत होते. पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने मला खूप बरं वाटले. 


माझे सर्वात जेष्ठ बंधु श्री. मंजुनाथ अण्णांचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या संकेत याला मी रामनगर शाखेची जवाबदारी दिली होती. फ्रेंड्स लायब्ररीच्या सर्व शाखा सकाळी ७.३० वाजता उघडत असत. उद्घाटनाच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी सकाळी ७.३० वाजता संकेतचा मला दूरध्वनी आला. "आपल्या शाखेमध्ये चोरी झाली आहे. दुकानाचे कुलुप तोडले आहे. काही वस्तू चोरीला गेल्या आहेत", असे तो म्हणाला. मी वेळ न घालवता रामनगर शाखेत पोहचलो.  ताळा तोडून चोरांनी आतील पूजेची मोठी समई, छोटी समई व दहावीस रूपयांच्या सर्व नोटा चोरल्या होत्या. मोठी समई मी जय अंबे डेकोरेटर्स यांच्याकडून मागवली होती व छोटी समई घरून पुजेसाठी नेली होती. मला काही वेळ काय करायचे तेच सुचेना. डोकं शांत ठेवायचे ठरवले. रामनगर पोलीस ठाणे जवळच होते. मग पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना चोरी झाल्याचे कळविले. पोलीस मलाच उलटे वारंवार विचारू लागले की "तुम्ही रात्री ताळा लावला होता का?" या सततच्या प्रश्नांच्या भडीमाराने मी हैराण झालो. मी तिथे जास्त वेळ न घालवता सरळ वाचनालयात आलो. तोपर्यंत काही लोक जमले होते. जो ताळा तोडला होता तो बाजूच्या गटारात सापडला. मी परत काही पोलीसांकडे गेलो नाही. सामान माझे चोरीला गेले होते. ते काही परत मिळणार नव्हते हे मला कळून चुकले होते. ज्यांच्याकडून मोठी समई भाड्यानी आणली होती त्यांना रू. ५००० किंमतीची नवीन समई घेवून दिली. चोरांनी एकही पुस्तक चोरले नव्हते कारण त्यांची विद्यादेवीला, ज्ञानदेवाला चोरून नेण्याएवढी पुण्याई नव्हती. विझलेल्या, प्रकाश न देणार्‍यां छोट्या मोठ्या समई चोरांना त्यांच्या प्रारब्धानुसार अधिक महत्वाच्या वाटल्या. विद्यावाटपाचे, ज्ञानवाटपाचे माझे ध्येय किंवा नशीब चोरांनी चोरले असते तर नक्कीच आनंद झाला असता. परंतु तसे झाले नव्हते त्यामुळे चोरी झाली यावर जास्त विचार न करता 'झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच रहावे' यानुसार मी माझ्या ध्येयाकडे परत वाटचाल करू लागलो....

Wednesday, December 30, 2020

मी परत एकदा वाचनालयाकडे पुर्ण लक्ष देऊ लागलो...

"जशी दृष्टी तशी सृष्टी" असं म्हटले जाते. सृष्टी तर माणुस बदलू शकत नाही. परंतु दृष्टी बदलू शकतो. दृष्टी बदलली की सृष्टी आपोआपच बदलते. कोणतीही वस्तू जेवढी जवळून पाहू तेवढी ती अधिक मोठी दिसते. परंतु त्याच वस्तूला थोडेसे दुरून तटस्थपणे पाहिले की तीच वस्तू छोटी वाटू लागते. वस्तू तीच असते. वस्तूमध्ये बदल होत नाही. परंतु बदलते ती आपली दृष्टी किंवा दृष्टीकोन. दुःखाने भावूक झालेल्या व्यक्तीला समस्त सृष्टी दुःखी वाटते. मनुष्य दुःखाशी जेवढे आसक्त होत जातो तेवढे त्याला ते दुःख अधिकाधिक मोठे वाटू लागते. परंतु त्याच दुःखाकडे कर्माच्या सिद्धांतानुसार प्रारब्धाचे भोग समजून दुरून तटस्थपणे पहायला सुरूवात केली की ते दुःख हलके व सुसह्य करणारी दृष्टी प्राप्त होऊ लागते. 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे कडू औषध मग ती व्यक्ती स्विकारू लागते. संतोषच्या उपचारानंतर मला सुद्धा भावनेपेक्षा दैनंदिन कर्तव्य कर्मांकडे घेऊन जाणारे कडू औषध घेणे हेच योग्य आहे ही दृष्टी मिळू लागली होती. 


स्नायुक्षय (मस्क्युलर डिस्ट्रॉपी) हा बरा न होणारा व कुठेही औषध उपलब्ध नसणारा असा अत्यंत दुर्मिळ असलेला आजार दुर्दैवाने संतोषला झाला होता. मला त्याच्या भविष्याची चिंता वाटत असली तरी माझ्याकडून जे काही करता येईल ते मी करीतच होतो. दररोज माझी आणि सुमनची या विषयावर चर्चा होत होती. परदेशात जाऊन संतोषवर औषधोपचार करून आल्यावर आम्ही दोघांनी ठरवले की यापुढे जास्त विचार करायचा नाही व आपण आपल्या दैनंदिन कर्तव्य कर्मांकडे लक्ष द्यायचे. संतोषकडे जराही दुर्लक्ष न करीता त्याला ज्या काही सुखसुविधा देता येतील त्या सर्व देण्याचा प्रयत्न करायचाच परंतु हे करीत असताना आपल्या दैनंदिन कर्तव्यकर्मांकडे सुद्धा दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायचे आम्ही ठरवले. यामुळे दोघांच्या दुःखाचा भार थोडासा कमी होणार होता. लक्ष दुसरीकडे लागल्याने मन थोडेसे हलकं होणार होते अन्यथा तोच तोच विचार करून आम्हा दोघांना खूप त्रास होणार हे नक्की होते. त्याचा परिणाम आम्हा दोघांच्या प्रकृतीवर पडण्याची शक्यता सुद्धा होतीच. यावर एकच उपाय होता व तो म्हणजे आम्ही दोघांनी स्वतःला आपापल्या रोजच्या कामात गुंतवून आपले लक्ष दुसरीकडे वळवणे.


वाचनालयाच्या व्यवसायक्षेत्रात खूप प्रगती करायची व खूप मोठं नाव कमवायचे हे माझे ध्येय होते. मी एकटा काहीच करू शकणार नाही याची मला जाणीव होती. माझ्याबरोबर असलेल्या कष्टाळू, प्रामाणिक कर्मचारी वर्गाला मी त्यासाठी विश्वासात घेऊन त्यांना जास्तीत जास्त चांगले मार्गदर्शन केले होते. वाचनालयाबद्दलचे माझे ज्ञान व अनुभव त्यांना दिले होते. कर्मचाऱ्यांनी सुद्धा मला आतापर्यंत योग्य तो उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता. यापुढे सुद्धा हेच धोरण राबविले तरच उतरतीकळा लागलेल्या वाचनालयाच्या व्यवसायक्षेत्रामध्ये आपण टिकून राहून प्रगती करू शकतो याची मला खात्री होती. आपल्या वाचनालयाच्या टिळकनगर शाखेमधील कर्मचारी अजय, मामा, गोडबोले तसेच शैक्षणिक विभागातील नवगरे काका अश्या चार महत्वाच्या कर्मचाऱ्यांची एक चिंतन बैठक (मिटिंग) घ्यायचे मी ठरवले. माझ्या अनुपस्थितीत हीच मंडळी वाचनालय उत्तमप्रकारे सांभाळत आली होती. चिंतन बैठक कुठे, कधी घ्यायची यावर मी विचार करू लागलो. या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मलाच घ्यावा लागणार होता.


आपली फ्रेंड्स लायब्ररीची टिळकनगरमधील शाखा खूप लहान होती. त्या जागेत मला अपेक्षित असलेली चिंतन बैठक घेणे शक्य नव्हते. जपान लाईफ कंपनीमध्ये असताना चर्चासत्र, बैठका घेण्याचा मी भरपुर अनुभव घेतला होता. अर्थात त्या कंपनीप्रमाणे मोठमोठ्या पंचतारांकित उपहारगृहात (हॉटेलमध्ये) चिंतन बैठक घेणे मला परवडणारे नव्हते. डोंबिवलीच्या मानपाडा रस्त्यावरील गोदरेज शोरूम समोरील गुरुप्रसाद उपहारगृह (हॉटेल) मी सदर बैठकीसाठी निश्चित केले. वाचनालयातील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करणे ही कल्पना काही जणांना विचित्र वाटत होती. मी काही लोकांशी याबद्दल बोललो तेव्हा त्यांनी आश्चर्य सुद्धा व्यक्त केले. वाचनालयाच्या पुढच्या वाटचालीसाठी तसेच उतरती कळा लागून एका मागोमाग बंद होत चाललेल्या वाचनालयांच्या क्षेत्रात व्यवसायिक यश मिळवण्यासाठी सदर चिंतन बैठक घेणे मला आवश्यक वाटत होते. आज अमुक वाचनालय बंद पडले, वाचनालयाच्या सभासदांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, या व्यवसायात नफा राहीला नाही वगैरे बातम्या माझ्यासह कर्मचाऱ्यांच्या सुद्धा कानावर पडत होत्या. तेव्हा त्यांच्या मनातील संभ्रम व भविष्यकालीन चिंता दूर करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे हे मला जास्त महत्वाचे व गरजेचे वाटत होते. संतोषच्या उपचारानंतर सन २००७च्या जानेवारीमध्ये सदर बैठक त्यासाठीच मी आयोजित करीत होतो. 


सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना मी अगोदरच चिंतन बैठकीची (मिटिंगची) कल्पना देऊन ठेवली होती. शनिवारी रात्री वाचनालय बंद झाल्यावर त्या सर्वांना मी गुरुप्रसाद उपहारगृहात घेऊन गेलो. अजय, मामा, गोडबोले, नवगरे काका आणि मी अश्या पाच उपस्थितांसाठी पाच जेवणाच्या थाळ्या मागविल्या. जेवण येईपर्यंत सर्वांशी गप्पा मारल्या. सर्वांना वाचनालयाच्या पुढच्या वाटचालीबद्दल व नवीन उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. सभासद वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? सभासदांच्या समस्या, मागण्या व गरजा कोणत्या?, वाचनालयात काही सुधारणा झाल्या पाहिजेत का?, कर्मचार्‍यांच्या स्वतःच्या समस्या कोणत्या आहेत? वगैरे सर्व विषयांवर त्या बैठकीत चर्चा झाली. थोडयावेळाने जेवण आले. सर्वांनी गप्पा मारीत जेवणाचा आस्वाद घेतला. एक तासाच्या या चिंतन बैठकीनंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. भविष्यकालीन चिंता व संभ्रम यांचे मळभ दूर झाल्यामुळे त्या बैठकीनंतर सर्व कर्मचारी वर्गात खूपच उत्साह संचारला होता. सन २००७च्या जानेवारीमध्ये गुरुप्रसाद उपहारगृहात घेतलेली पै फ्रेंड्स लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांची ही पहिलीच चिंतन बैठक होती.


सन २००७ च्या फेब्रुवारी महिन्यात एकदिवशी टिळकनगरच्या वाचनालयात एक ओळखीच्या महिला सभासद मला भेटायला आल्या. त्या नियमितपणे वाचनालयात येत असत. "आपल्या वाचनालयात कामासाठी एखाद्या मुलीची नियुक्ती करण्याचा विचार आहे का?" असा त्यांनी मला प्रश्न विचारला. "आमच्या शेजारी नूतन नावाची एक मुलगी राहते. ती कोकणातून इथे आली आहे. सध्या कामाच्या शोधात आहे. जवळपास काम मिळाले तर तिची काम करण्याची इच्छा आहे" अशी माहिती सुद्धा त्यांनी मला दिली. "सध्या तरी असा काही विचार नाही. इथे माझ्याकडे पुरेसे कर्मचारी आहेत. परंतु आपल्या वाचनालयाच्या शैक्षणिक विभागात मुलगी नेमणे आहे. तुम्ही उद्या तुमच्या सोबत तिला घेवून या. तिच्याशी बोलणे झाल्यावर मी काय ते सांगू शकतो", असं मी त्यांना उत्तर दिले. "मी तिला उद्याच घेवून येते" असं सांगून त्या महिला सभासद निघून गेल्या.


फ्रेंड्स लायब्ररीच्या टिळकनगर शाखेच्या बाजूला पिठाची गिरणी असल्यामुळे गिरणीचे पीठ आपल्या वाचनालयाच्या विद्यापिठात पिठा-पिठाचा बादरायण संबंध दाखवत आगंतुक पाहुण्यासारखे कायमच्या वस्तीला यायचे. लोकांचा पिठ व विद्यापीठ यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून पुस्तकांची वारंवार साफफाई करून आगंतुक पाहुण्याला हाकलावे लागायचे. या आगंतुक पाहुण्याची आपल्या विद्यापीठात एवढी वर्दळ असे की काळे केस रात्रीपर्यंत पांढरे होवून जायचे. टिळकनगरचे आपले वाचनालय पुस्तकाने खचून भरलेले असल्याने बसायला जागा शिल्लक राहीली नव्हती. त्यामुळे तिथे मुलींना कामावर नेमण्याच्या मी विरूद्ध होतो. सकाळी काळ्या केसांची तरूण मुलगी रात्री पांढर्‍या केसांची म्हातारी होऊन बाहेर पडताना लोकांना दिसली असती हे सुद्धा मला मान्य नव्हते. परंतु शैक्षणिक विभागात एक कर्मचारी नेमण्याचा माझा विचार होता. तो विभाग सांभाळणारे नवगरे काका सुट्टीवर गेले की माझी पंचाईत व्हायची. दुसऱ्याच दिवशी त्या महिला सभासद नूतन नावाच्या मुलीला घेवून आल्या. नूतन दिसायला सुंदर होती. तिचा पेहराव सुसभ्य होता. तिचे बोलणे सुद्धा संयमित होते. नेहमीचेच काही प्रश्न विचारून मी तीला उद्यापासून कामावर येण्यास सांगितले. एवढ्या कमी पगारात ती माझ्याकडे किती दिवस काम करेल याबाबत मी साशंक होतो.

नूतन 

दुसऱ्या दिवसापासून नूतन कामावर यायला लागली. शैक्षणिक विभागात जास्त काम नसल्याने एकदा का साफसफाई झाली की ती भ्रमणध्वनीवर (मोबाईलवर) गाणी ऐकत बसायची. काही दिवसांनी मी तिला आपल्या टिळकनगरमधील मुख्य शाखेत बोलावून घेतले. ज्यादिवशी नूतन मुख्य शाखेत आली त्या दिवसापासून तिने सर्व कामे शिकायला सुरुवात केली. संगणकावर विविध नोंदी करणे, पुस्तकं जागेवर लावणे, वर्गणीची पावती बनविणे, सभासदांशी सुसंवाद साधणे, रात्री निघण्यापुर्वी हिशोब करणे वगैरे सर्व कामे तिने पटापट शिकून घेतली. तिच्यामुळे माझी बरीचशी कामे कमी झाली.


वाचनालयाची सुरुवात जरी मी केली असली तरी आतापर्यंत माझ्याकडे रूजु झालेल्या कर्मचाऱ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळाले होते. त्यांनी दिलेले अनेक सल्ले मी अंमलात आणले होते व त्यात मला कधीच कमीपणा वाटला नव्हता. जे योग्य ते योग्यच हीच माझी त्यामागची भूमिका होती. नूतनकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे हे मला लक्षात येत होते. ती कधीच सुट्टी घेत नव्हती. सकाळी नऊ वाजता कामावर रूजु होण्याची तिची वेळ होती, त्यासाठी ती पाच मिनिटे आधीच यायची. एकदा वाचनालयात आली की दिलेले प्रत्येक काम ती न विसरता नियमितपणे करायची. कोणतेही काम दुसर्‍या दिवसांसाठी शिल्लक ठेवायची नाही. कामं प्रलंबित ठेवणे हा प्रकारच तीला मान्य नव्हता. नेहमी हसतुख राहून सर्व सभासदांशी सुसंवाद साधायची. वाचनालयात सुधारणा करण्यासाठी तिने अनेकवेळा मला सल्ले दिले होते. मी, अजय, मामा, गोडबोले आणि नूतन मिळून टिळकनगर शाखेतील सर्व सभासदांना उतम सुविधा देण्याचा प्रयत्न करायचो. नूतन दोनच वर्षे वाचनालयात होती परंतु आपल्या कामाची व व्यक्तीमत्वाची तीने छाप पाडली होती. नंतर तीचे लग्न ठरले. डोंबिवली सोडून बाहेर जायला टाळाटाळ करणारा मी कोकणात तिच्या लग्नाला जातीने हजर होतो. वेळेचे व्यवस्थापन नूतनकडून मला शिकायला मिळाले होते. आज सुद्धा मी जेव्हा कर्मचाऱ्यांची बैठक घेतो तेव्हा वेळेच्या बाबतीत नूतनचे उदाहरण मी न विसरता देत असतो. नूतन आली परंतु वरून न दिसणारे वाचनालयाचे, मनाचे नूतनीकरण करून गेली. संतोषच्या आजारपणामुळे खिन्न झालेल्या माझ्या मनाला दैनंदिन कर्तव्यकर्म करण्यासाठी मनाचे हे नुतनीकरण उपयोगी पडत होते. दृष्टी बदलल्यामुळे मला आता सृष्टी सुद्धा बदलल्यासारखी वाटत होती. कर्माच्या सिद्धांतानुसार मी आता संतोषच्या आजाराकडे पाहण्याचा प्रयत्न करीत होतो व मनातील दुःखाला वेसण घालायला शिकत होतो....

Friday, December 25, 2020

संतोषवर विदेशात उपचार झाल्यावर परत भारतात आगमन...

"तुझ्या-माझ्या संसाराला आणि काय हवं?

तुझ्या-माझ्या लेकराला घरकुल नवं,

नव्या घरामंदी काय नविन घडंल?

घरकुला संग समदं येगळं होईल, 

दिस जातील, दिस येतील, 

भोग सरंल, सुख येईल", या आशेवर जगातील यच्चयावत संसारी जीवात्मे दुःखाशी संघर्ष करीत व स्वप्नं रंगवीत संसाराचे रहाटगाडे ओढत असतात. सर्व दुःख भोग आपोआप संपत नसतात. काही दुःख भोगांवर अथक प्रयत्न केल्यावर मात करता येते. दुःख सरेल की नाही हा परिणाम आपल्या हातात नसला तरी कर्तव्यपुर्तीचे समाधान त्या अथक प्रयत्नातून नक्कीच लाभते. संतोषवर उपचार केल्यावर पितृकर्तव्याची पुर्तता केल्याचे समाधान मला मिळाले असले तरी ते करीत असताना झालेले समाजऋण फेडणे अजून बाकी होते. आता त्याची पुर्तता करण्याची मी तयारी करू लागलो होतो.


डोमिनिकन रिपब्लिक देशात कधी एकदा पोहोचतो व संतोषवर उपचार करवून घेतो असं मुंबईहून निघण्यापूर्वी सारखं वाटायचे. शनिवार, दिनांक २ डिसेंबर २००६ रोजी संतोषवर मुलभूत पेशींचा (स्टेम सेल्सचा) उपचार झाल्यावर त्याला रुग्णालयातून जेव्हा परत खोलीवर मी घेऊन आलो तेव्हा मला माझ्या मनावरचा खूप मोठा ताण कमी झाल्यासारखे वाटले. त्याच दिवशी संध्याकाळी सुमनला दूरध्वनी करून सविस्तर माहिती दिली. ती सुद्धा माझ्या दूरध्वनीची वाट पाहत होती. तिला हरवलेली बॅग मिळल्याचेही सांगितले. संतोष बरोबर सुद्धा तीचे बोलणं झाले. दूरध्वनीवरून संतोषचा आवाज ऐकताना तिच्या काळजाचे अक्षरशः पाणी पाणी झाले. संतोषशी बोलल्यावर तिला खूप बरं वाटले. आमच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे तिने सांगितले. दिनांक ४ डिसेंबर रोजी आमचे परतीचे तिकीट असल्याने अजून दोन दिवस आम्हाला तिथेच कॅसा दि कँम्पो या विश्रामधाममध्येच राहायला लागणार होते. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आम्ही दोघांनी मजेत घालवले. उपचाराआधीचे दिवस आणि आताचे दिवस यामध्ये खूप फरक जाणवत होता. उपचार होण्यापुर्वी मनावर पडलेला ताण आता कमी झाल्याने नंतरचे दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही.


सोमवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी आमचे परतीचे विमान होते. काहीच काम नसल्याने बॅगेतील सर्व खाद्यपदार्थ आम्ही दोघांनी दोन दिवसात संपवून टाकले होते. वेळ घालवण्यासाठी आम्ही दोघे अधून मधून पत्ते सुद्धा खेळायचो. सोमवारी निघायच्या दिवशी सकाळचा नाष्टा केल्यावर अकरा वाजता आम्ही विमानतळावर जाण्यासाठी गाडी मागवली. सुमारे एक वाजता आम्ही डोमेनिकन रिपब्लिकच्या सॅन्टो डोमिंगो या विमानतळावर पोहोचलो. भारतातून फ्रँकफर्टमार्गे जेव्हा इथे पोहचलो होतो तेव्हा सर्वत्र अंधार होता, त्यामुळे विमानतळ व तिथला परिसर नीट पाहता आला नव्हता. आता परत त्याच विमानतळावर भरदिवसा पोहचत होतो. दिवसाच्या प्रकाशात विमानतळ खूप छान दिसत होते. विमानतळ छोटं असले तरी स्वच्छ आणि सुंदर होते. प्रवाश्यांची वर्दळ खूपच कमी होती. दिवसातून मोजकीच विमान उड्डाणे तिथून होत असल्याने फारशी वर्दळ नसावी. आम्ही एक तास आधीच पोहोचलो होतो. आमचे विमान वेळेवर निघाले. संतोषला ज्या उपचारासाठी आणले होते ते सोपस्कार पार पाडल्यामुळे प्रवास करताना एक वेगळीच आनंदानुभूती होत होती.


दिनांक ४ डिसेंबर रोजी डोमिनिकन रिपब्लिक देशातून निघालो व ५ डिसेंबरला फ्रँकफर्ट विमानतळावर पोहोचलो. यावेळी फ्रँकफर्ट विमानतळावर आम्हाला फक्त सहा तास घालवायचे होते. आधीचा अनुभव असल्याने फ्रँकफर्ट विमानतळ परिचयाचे झाले होते. आम्ही दोघे खूप हिंडलो फिरलो. माझ्या बरोबर संतोषने सुद्धा तिथल्या मुशाफिरीचा आनंद लुटला. दिनांक ५ डिसेंबर रोजी फ्रँकफर्टवरून निघून बुधवारी ६ डिसेंबरला संध्याकाळी सुमारे ५ वाजता आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचलो. घरी पोहोचेपर्यंत आठ वाजले होते. सुमनला आम्ही येत असल्याचे अगोदरच कळवले होते. तिने गरम गरम चहा बनवून तयार ठेवला होता. चहा बरोबर आठ दहा मारी बिस्कीटे संपवली. थोड्याच वेळात सुमनने निरडोसा बनवून दिला. बर्‍याच दिवसांनी सुमनच्या हातचा नीरडोसा खायला मिळत होता. बाह्या सरसावून त्यावर तुटून पडलो. मी एकट्याने किमान आठदहा निरडोसे संपवले असतील. संतोषचा स्कोअर माहित नाही. इथे बाप से बेटा सवाई असू शकतो. तो अगोदरच वजनदार गटात सामील झाला होता. आपला नवरा व मुलगा आज बकासुर व भस्मासुर का झाले आहेत हे सुमनने ओळखले होते. तोंड बंद ठेऊन ती गुमान निरडोसे बनवत गेली व आमची तोंडे बंद करीत राहीली. गेले आठ दिवस नुसते पाव आणि मख्खन (बटर) खाऊन जीव पार मेटकुटीला आला होता. दुष्काळग्रस्त भागातून आल्यासारखा आत्मा बुभुक्षित झाला होता. सुमनच्या हातचा नीरडोसा पाहिल्यावर आत्मा बेभान झाला. बर्‍याच दिवसांनी घरचा नीरडोसा मनसोक्त खायला मिळाल्यामुळे क्षुधाशांती, आत्मशांती म्हणजे काय असते त्याची प्रत्यक्ष अनुभूती मी घेत होतो. भरल्या पोटात आनंद थुईथुई नाचत होता. सुमनच्या हातचे नीरडोसे खाताना मला ब्रह्मांनंदी टाळी लागली होती. 


लगेच दुसऱ्याच दिवसापासून वाचनालयाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. संतोषच्या उपचारासाठी मी बाहेरच्या देशात जाऊन आल्याचे काही जणांना समजले होते. काही लोकं मला भेटायला वाचनालयात येत असत. संतोषच्या तब्येतीची विचारपूस करीत असत. आता माझे एकच लक्ष्य होते व ते म्हणजे लोकांकडून उपचारासाठी घेतलेले पैसे परत करणे. समाजऋण फेडून कर्तव्यपुर्ती करणे आवश्यक होते. जर संतोषच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली असती तर सर्वांनी माझे कौतुक केले असते. परंतु समजा जर प्रकृतीत काही फरकच पडला नसता तर लोकांकडून मला खूप काही ऐकायला लागले असते. त्यामुळे सर्वांचे पैसे परत करायचे ठरविले. फक्त वाचनालयाच्या उत्पन्नातून एवढे पैसे परत करणे कठीणच होते. एका महिन्यात सर्वांचे पैसे परत करायचे ठरवले व ते सुद्धा वाचनालयाकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता. संतोषच्या उपचारामुळे माझे वाचनालयाकडे दुर्लक्ष झाले होते. अजय, मामा आणि गोडबोले उत्तमरीत्या वाचनालयाचा कारभार संभाळत होते. परंतु माझी निर्णायक उपस्थिती सुद्धा गरजेची होती.


लोकांकडून घेतलेले केवळ एक दोन लाख रूपये नव्हे तर तब्बल १६ लाख रुपये मला परत करायचे होते. सर्वांनी दिलेल्या धनादेशाच्या (चेकच्या) छायाप्रती (झेरॉक्स) मी काढून ठेवल्या होत्या. सुरुवातीला छोटछोट्या रक्कमांची उधारी संपवायचे ठरवले. घरात जेवढे दागिने होते ते सर्व बाहेर काढायचे ठरवले. सुमनने संकोच न करीता व कोणतेही आढेवेढे न घेता सर्व दागिने माझ्या स्वाधीन केले. आम्ही जास्त करून डोंबिवलीच्या पश्चिमेकडील शिरोडकर ज्वेलर्सकडून दागिने बनवून घेतले होते. सर्व दागिने त्यांच्याकडे परत केले. "एवढे दागिने का विकत आहात?" असा प्रश्न त्यांनी विचारला. उपचारासाठी घेतलेले पैसे परत करायचे आहेत असे सांगितल्यावर त्यांनी ते दागिने विकत घेतले. त्यावेळी सोन्याचा भाव वधारलेला असल्यामुळे मला त्यातून चांगली रक्कम मिळाली. ताबडतोब छोटछोट्या रक्कमांची लोकांची देणी फेडून टाकून त्यातून मोकळा झालो. मग मोठ्या रक्कमांची देणी फेडण्याच्या प्रयत्नाला लागलो. माझ्या आणि सुमनच्या नावाने काही विमा पॉलिसी होत्या. डोंबिवलीच्या औद्योगिक विभागात (एम.आय.डी.सी.) असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन आमच्या दोघांच्या सर्व विमा पॉलिसी तिथे जमा केल्या. त्यांचे पैसे मिळवायला काही काळ लागणार होता. तोपर्यंत माझ्याकडे जेवढे समभाग (शेअर्स) व एकसामायिक निधीपत्रं (म्युअचल फंड) होती ती सुद्धा विकायला काढली. परंतु हे सर्व पैसे माझ्या खात्यात जमा होण्यास जवळ जवळ एक ते दीड महिना लागणार होता. पैसे जमा होण्यास माझ्या अपेक्षापेक्षा अधिक उशीर होत असल्याने मी माझे राहते घर सुद्धा विकायला काढायचा विचार करू लागलो होतो. त्यासाठी जेव्हा मी इमारतीचे विकासक (बिल्डर) श्री. नंदू म्हात्रे यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला परत एकदा शांतपणे विचार करायला सांगितले. मग मी घर विकायचा विचार सोडून दिला. अर्थात हे सर्व मी सुमनला सांगूनच करीत होतो. प्रत्येकाची देणी तुकड्या तुकड्यात परत न करीता एका हप्त्यातच परत करून टाकायची असे आम्ही दोघांनी ठरवले होते.... 


मुलभूत पेशींच्या (स्टेम सेल्सच्या) उपचारानंतर संतोषमध्ये खूप फरक जाणवायला लागला होता. आधी खूप चिडचिड करणारा संतोष आता थोडा शांत झाला होता. आधी त्याची प्रकृती ज्या वेगाने खालावत चालली होती तो प्रकृती खालावण्याचा वेग आता खूप कमी झाल्याचे मला स्पष्टपणे दिसत होते. त्याला जास्त दिवस चालता येणार नाही, लवकरच तो अंथरूण पकडेल व त्याचे आयुष्य खूप कमी असेल असे वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले होते. जगात कुठेही या आजारावर अजूनपर्यंत तरी औषध नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले होते. असं असूनही गेले सहा महिने खूप धावपळ करून मुलभूत पेशींचा उपचार कुठे केला जातो याचा शोध घेतला होता व एवढ्या लांब परिचय नसलेल्या देशात जाऊन ते उपचार संतोषला दिल्याचे समाधान माझ्या मनाला होत होते. पुढे काय होईल हे माझ्या हातात नसले तरी मी माझे पितृकर्तव्य बजावले होते. समाजऋण फेडले होते. "दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल" या आशेवर जगणे एवढेच आता माझ्या हातात राहीले होते....